हा लेखनप्रपंच २००६ ते २०१६ या दशकाचा दस्तऐवज ठरेल…
ग्रंथनामा - आगामी
केशव वाघमारे
  • ‘खैरलांजी ते रोहीत : दशकाची अस्वस्थता’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ केशव वाघमारे
  • Fri , 25 August 2017
  • ग्रंथनामा Granthnama आगामी खैरलांजी ते रोहीत : दशकाची अस्वस्थता Khairlanji Te Rohit : Dashakachi Aswasthata केशव वाघमारे Keshav Waghmare

तळमळीने काम करणारे सामाजिक कार्यकर्ते केशव वाघमारे यांच्या राजकीय-सामाजिक लेखांचे ‘खैरलांजी ते रोहीत : दशकाची अस्वस्थता’ हे पहिलेवहिले पुस्तक उद्या प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला वाघमारे यांनी लिहिलेले निवेदन. यातून त्यांची भूमिका आणि या पुस्तकाचे स्वरूप समजावून घेता येते.

.............................................................................................................................................

विविध नियतकालिकांमधून वेळोवेळी प्रकाशित झालेल्या माझ्या लेखांचे हे माझे पहिलेच पुस्तक आपल्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे.

लेखनसंग्रहाला प्रतिष्ठित अथवा ज्येष्ठ साहित्यिकांची प्रस्तावना घेणे ही साधारणत: परंपराच बनलेली आहे. मी मात्र ही परंपरा जाणीवपूर्वक नाकारत स्वत:च ‘प्रस्तावने’ऐवजी, लिहिण्याचे ठरवले. कारण बऱ्याचदा प्रस्तावनाकार आपल्या साच्यात लेखांना बसवून त्याची ओळख करून देतो किंवा आपल्या विशिष्ट कंपूमध्ये लेखकाला घेऊन येतो. तर काही प्रस्तावनाकारांना असे वाटत असते की, नवलेखक आमच्या शिवाय प्रतिष्ठित होऊ शकत नाहीत. आमची अधिमान्यता असल्याशिवाय त्या लेखकाला किंवा त्यांच्या लेखनाला काही मूल्यच नाही. महाराष्ट्रातील अनेक नवलेखकांचे हे अनुभव आहेत.

२००६ मध्ये खैरलांजी हत्याकांड झाले, तेव्हा खूप अस्वस्थ होऊन मी माझा पहिला लेख लिहिला होता. या लेखसंग्रहातील लेखन हे एका कार्यकर्त्याचे तसेच मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान, शोषणमुक्त समाजाचे स्वप्न व मनामध्ये क्रांतिकारी बदलाची अभिलाषा बाळगून वाटचाल करणाऱ्या एका पांथस्थाचे आहे.

माझ्या लेखनाबाबत एक निरीक्षण आवर्जून नोंदवणे गरजेचे आहे. बदलाची भाषा बोलणारे/लिहिणारे बुद्धिवंत हे शास्त्रीय परिभाषा वापरून लेखन करतात, तिला प्रतिष्ठित करतात. विषयाच्या आकलनासाठी परिभाषेचे महत्त्व आहेच, परंतु ते लेखन जनतेच्या मनाची पकड घेत नाही. या अर्थाने जनता व बुद्धिवंत यांचे नाते तुटलेले असते. मी एक कार्यकर्ता असल्यामुळे जनतेच्याच भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. अकादमिक लेखनाचे महत्त्व मी नाकारत नाही. परंतु शब्दाच्या गाठोड्यात वास्तवाला बांधताना ते बोजड होणार नाही, याची काळजी परिवर्तनाचा ध्यास असलेल्यांनी घेतली पाहिजे. त्या गरजेतून आणि धडपडीतूनच मी हे सर्व लिखाण केले आहे. या धडपडीत मला परिवर्तनाची, क्रांतीची भाषा बोलणाऱ्या अनेक प्रवाहांचा, विचारांचा व व्यक्तींचा परिचय झाला. त्यामधून मला जेवढे समजले, तेवढे घेत प्रगल्भतेकडे सरकत, समकालीन घडणाऱ्या घटनांवर मी प्रतिक्रिया देत गेलो. यादरम्यान अनेकांशी मतभेद, सहमती, वादसंवाद होत गेला आणि हे लेखन आकारास आले.

या संग्रहातील तीन लेखांना मी अधोरेखित करू इच्छितो. कारण हे तीन लेख म्हणजे आंबेडकरी चळवळीत नेहमीच कळीचे राहिलेले तीन प्रश्न आहेत.

‘प्रतिवाद की अज्ञानमूलक असूया?’ या लेखामध्ये मार्क्स-आंबेडकर संबंधाबद्दल चर्चा आहे. मार्क्सला घेऊन आंबेडकरोत्तर कालखंड प्रचंड वाद-विवादांनी भरलेला आहे. त्यावर टोकाच्या प्रतिक्रिया देऊन मार्क्सला हेडगेवार व गोळवलकर यांच्या रांगेत नेऊन बसवण्याचा पराक्रम काहींनी केला आहे. एक कार्यकर्ता म्हणून, तळच्या समाजात काम करताना सातत्याने या प्रश्नाला मलाही सामोरे जावे लागले आहे. काही जण डॉ. आंबेडकर, बुद्ध आणि मार्क्स यांची तुलना करून मार्क्सचे महत्त्व व मर्यादा सांगतात. त्यावर आंबेडकरांचे काही तथाकथित अनुयायी अभिनिवेशी व उथळ चर्चेची प्रतिक्रिया देत राहतात, हे मी पाहत आलेलो आहे. त्यामुळे या प्रश्नाबाबत काही किमान सहमती व्हावी व हा कूट प्रश्न सकारात्मक पद्धतीने सुटण्याकडे वाटचाल व्हावी, ही भूमिका या लेखामागे आहे.

दुसरा महत्त्वाचा लेख आहे ‘मराठा समाजाला खरा धोका कोणाकडून?’. कोपर्डीच्या तात्कालिक कारणाने जरी मराठा समाजाचे मोर्चे सुरू झाले असले तरी, या मोर्चांनी मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण समोर आणले. सामाजिक व आर्थिक मागासलेपण दूर करणे हा तर फुले-आंबेडकरी चळवळीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे त्या भूमिकेतून या मोर्चाला प्रतिसाद दिलेला आहे. खरे तर आकुंचन पावत चाललेल्या आंबेडकरी चळवळीचा परीघ वाढवण्यासाठी ही संधी होती. काही नेत्यांनी तिला सकारात्मक प्रतिसादही दिला. परंतु व्यापक प्रमाणावर ते घडले नाही, हे कटू सत्य आहे. याचा फायदा प्रतिगामी शक्तींनी घेतला आणि परिणाम आपल्या समोर आहेत.

‘वारसा कशाचा? चळवळीचा की संपत्तीचा?’ या लेखामध्ये आंबेडकर भवनाचे विध्वंसन हे फुले-आंबेडकरी चळवळीच्या अनुषंगानेच नव्हे, तर शोषणमुक्त चळवळीच्या अनुषंगाने घडलेले अपकृत्य आहे. या विध्वंसनाकडे आंबेडकरी चळवळीतील बुद्धिजीवी, राजकारणी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. परंतु आरक्षणाचा लाभ घेऊन निर्माण झालेला मध्यमवर्ग, शोषणाच्या मूलभूत विश्लेषणाच्या आधारे सामाजिक उत्तरदायित्वात उभा राहण्याऐवजी वर्तमान शासनसंस्थेच्या आधारेच ते जनकल्याण करू इच्छितात. खरे तर ‘शासनसंस्था हे शोषणाचं हत्यार आहे’, हे मार्क्सचे विधान या ठिकाणी अधोरेखित करणे गरजेचे आहे. एकंदरीत, ‘राज्य’ (स्टेट) या संकल्पनेचे अपुरे आकलन या बुद्धिजीवी मध्यमवर्गाला शासनसत्तेचे ‘भाट’ असे करीत आहे, हे या लेखात अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

अर्थातच या लेखांचे महत्त्व काय आहे, हे वाचकच ठरवू शकतील. पण हा लेखनप्रपंच म्हणजे २००६ ते २०१६ या दशकाचा दस्तऐवज ठरेल, असे वाटते. एका अर्थाने आजच्या ‘वर्तमानाचा इतिहास’ म्हणूनही त्याच्याकडे पाहता येईल. की, जो जनता व कार्यकर्त्याला केंद्रबिंदू मानून लिहिला आहे.

आज जे आपल्या समोर वास्तव आहे ते प्रचंड विरोध-अंतर्विरोधाने भरलेले आहे. कार्यकर्ता या विरोध-अंतर्विरोधाने कमालीचा गोंधळून गेला आहे. अशा प्रसंगी त्याला चळवळीचा मागील इतिहास मार्गदर्शक ठरत असतो. यासाठी चळवळीतील घटनांचे दस्तऐवजीकरण करणे गरजेचे असते. चळवळीतील घटना, घटिते मौखिक पद्धतीने समाजामध्ये जात असतात व नवीन कार्यकर्त्यांना ते प्रेरणा व मार्गदर्शन करत असतात. खेदाची बाब म्हणजे आंबेडकरी चळवळीत दस्तऐवजीकरणाची कमतरता आहे. तेवढी जरी माझ्या पुस्तकाची उपयोगिता सिद्ध झाली आणि वाचक आजच्या भीषण वास्तवाने थोडे जरी अस्वस्थ झाले, तरी माझे लेखन यशस्वी झाले, असे मी समजेन. कारण ही अस्वस्थताच आपल्या सर्वांना जात-वर्ग-स्त्री-दास्यमुक्तीचा क्रांतीचा मार्ग दाखवेल.

खैरलांजी ते रोहीत : दशकाची अस्वस्थता - केशव वाघमारे

हरिती पब्लिकेशन्स, पुणे, पाने -१७६, मूल्य - १२० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3997

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......