‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय' : घुसमटीतून प्रसवलेली कविता
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
स्वाती कडू
  • ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय'चं मुखपृष्ठ
  • Fri , 11 August 2017
  • ग्रंथनामा Booksnama शहर आत्महत्या करायचं म्हणतंय Shahar Atmhatya karayach Mhantay सुशीलकुमार शिंदे Susheelkumar Shinde iग्रंथाली Granthali

महानगरीय संवेदना हे मुख्यसूत्र असलेला सुशीलकुमार शिंदे यांचा ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय' हा कवितासंग्रह अस्वस्थ करणारे हजारो प्रश्न उभे करतो. दिवा जळून त्याची काजळी व्हावी, तसंच काळीज चिरून कविता येते, हे सांगताना कवी लिहितो -

कागदाला येते खाज म्हणून थोडीच लिहितो कोणी

काळीज चिरताना गप्प बसवत नाही हेच खरं.

कवीनं लिहिलेली ही ओळ त्याची कवितेविषयीची भूमिका स्पष्ट करते.

या संग्रहातील कविता फक्त शब्द होऊन विरघळणाऱ्या नाहीत, तर चेहरा नसलेल्या क्रूर व्यवस्थेला जाब विचारणाऱ्या आहेत. कवी लिहितो-

ढगांच्या माद्यांनी

प्रसवायचे असतात

फक्त पाण्यांचे फवारे

मातीवर, झाडावर

किंवा उंचच उंच टेकड्यांवर

काळे निळे पांढरे

किंवा कितीही केले प्रकार तरी

बाहेर फक्त पाणीच टाकायचा अधिकार असतो ढगांच्या गरोदर माद्यांना

एकविसाव्या शतकातील ही दाहक अवस्था निश्चितच अस्वस्थ करणारी आहे. आधुनिक काळातही घराघरात ढगांच्या माद्या सापडतील. त्या शिक्षित आहेत, संसार नेटानं करतात, जीवनात वेगवेगळ्या प्रांतात यशस्वी आहेत, पण तरीही बाई म्हणून त्यांना क्रूर वागणूक मिळत नाही का? 
स्त्रीच्या शोषणविरुद्ध आवाज उठवत असताना ही कविता स्त्रीविषयी प्रागतिक स्वर अळवणारी आहे. दुःखी आणि पीडितांविषयीची आत्मीयता हीच गाभा असलेली ही कविता जिजीविषा वृत्तीनं आशेचा कोंब होऊन बहरणारी आहे. शहरातील राक्षसी अनुभवांना आणि घुसमटीला शब्दांकन देणाऱ्या या कविता माणसांच्या जगण्याभोवती फिरत राहतात. त्यांचे काळाच्या पडद्याला व्यापून राहिलेले ‘लार्जर दॅन लाईफ’ मांडत राहतात.

पुलाच्या खाली गांडीवर फाटलेली चड्डी नेसून

उभे असते एखादे अन्नासाठी मोताद लेकरू

खांद्यावर फाटलेलं पोलक घालुन

येणाऱ्या गाडीला अडवत

कडेवरच्या लेकराला चिमटा काढत

ती मागते भीक

सिन्गल सुटतो

लालच हिरवं होतं

तुम्ही सेल्फ मारता आणि

ती पहाते वाट पुढच्या सिन्गलची...

कुठून आलेत हे?

कोणी आणलंय यांना?

असले बेवारस प्रश्न या शहराला कधीच पडत नाहीत

असं कवी लिहितो तेव्हा वाटत राहतं आपण दररोज पाहतो हे सारं, पण आज कुणी जखमेचवरच जखम बांधली. आणि याचं उत्तर शोधताना जाणवत राहतं की, हे सारं दिसून न पाहावं इतकी बधीर आपली संवेदना का झाली आहे?

कवीला जागतिकीकरणाचं शेपूट पकडून आपल्या हाती फक्त लेंडयाच उरल्यात असं वाटतं आणि त्याचसोबत इमारती उभ्या आणि झोपडपट्ट्या आडव्या का वाढत आहेत असा प्रश्न पडतो. कोलंबसची इच्छा ही विश्वविजयाची लालसा वाटावी, बाई ही युगांयुगांची बळी वाटावी, माणसं मुर्दाड वाटावीत आणि शहरानं स्वप्न भाड्यानं ठेवावीत, या साऱ्या कल्पनाच हजारो प्रश्नांनी गुरफटून गेलेल्या मानवी आयुष्याचं व्यामिश्र चित्र उभारणारी ही कविता सक्षम वाटते.

‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ असं सांगत असतानाही मरणाला दारात ताटकळत उभं करून जगण्याचं श्रीमंत स्वप्न पाहणारी कविता कवीनं लिहिली आहे. उद्याचा विवेक हरवू नये म्हणून ही कविता आहे असं मला वाटतं. या संग्रहात मांडलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं तर मग कवितेप्रमाणेच हुकाला टांगलेल्या कोंबडीच्या जागी माणूस असेल यात शंका नाही.

‘रक्तात मिसळत जाणारं राक्षसीकरण’ या कवितेत कवी म्हणतो- जगण्यात आलेलं भयाण तसेच बेवारस लाचारीपण. त्याच भयाण वेदनेनं या संग्रहातील प्रत्येक कविता आकाराला आली आहे. म्हणूनच तो लिहितो -

या गचाळ शहराच्या

कठड्यावर मी सोलून ठेवलाय माझा आत्मा

जसा सलीम अडकून ठेवतो कापलेला बोकड

कत्तल खाण्याच्या खुंटीवर

अशी सुरुवात  करताना आणि

मी सोडून देतो माझा जीव

मी नाकारतोय 

रक्तात मिसळत जाणारं
राक्षसीकरण...

शोषित, दलित, स्त्री आणि दुर्बलांच्या बाजूनं लढताना आपली भूमिका ठामपणे मांडणारा हा कवितासंग्रह निश्चितच आश्वासक आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3500

.............................................................................................................................................

स्वाती कडू

swati.kadu@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......