गांधींविषयी गैरसमज निर्माण होण्याची काही कारणे…
सदर - गांधी @ १५०
प्रा. विठ्ठल दहिफळे
  • महात्मा गांधी यांच्या विविध भावमुद्रा
  • Wed , 02 August 2017
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram

२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारीपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो…जुलै महिन्यात विनोद शिरसाठ यांचा ‘गांधींविषयी इतके गैरसमज का आहेत?’ हा लेख प्रकाशित झाला होता. त्यावरील ही एक प्रतिक्रिया. शिरसाठ यांचा लेख http://www.aksharnama.com/client/article_detail/979 या लिंकवर जाऊन वाचता येईल.

.............................................................................................................................

म. गांधींच्या जन्माला येत्या २ ऑक्टोबरला १४६ वर्षं पूर्ण होतील. त्यांच्या हयातीत आणि नंतरही गांधीविचार आरोप, गैरसमज, उपेक्षा आणि हेतूलक्षी विपर्यास यात अडकून पडला हे उघड वास्तव आहे. म्हणावी तर ही गंभीर बाब आहे आणि म्हणावी तर संधीही आहे. गंभीर बाब यासाठी की, गांधींनी स्वातंत्र्य चळवळीच्या राजकारणात ते विचारबीज जाणीवपूर्वक रोवले होते, त्याचे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर खरे तर वटवृक्षात रूपांतर व्हायला हवे होते. परंतु उपेक्षा, गैरसमजाच्या भोवऱ्यात रुतत जाऊन मूळ विचारच निष्प्रभ झाल्याचा अनुभव आहे. आणि संधी याकरता की, कोणताही विचार परिपूर्ण नसतो. त्याचा कालसुसंगत विकास घडून येणे आवश्यक असते. अर्थात असा विकास मूळ विचारातील संदिग्ध, रिक्त जागा शोधूनच शक्य असतो. गांधीविचाराबाबत असहमती दर्शवून त्याचा कालसुसंगत विचार शक्य असतो. एखाद्या विचारधारेबाबत असहमती दर्शवणे अथवा समज-गैरसमजाचे थर साचत जाणे म्हणजे त्या विचारधारेशी प्रतारणा करणे नसते तर विकासाची एक संधी म्हणूनही त्याकडे पाहता आले पाहिजे. तरीही मुद्दा शिल्लक राहतोच की, एखाद्या विचाराबाबत (विचारधारा) गैरसमज का निर्माण होतात?

केवळ गांधीविचारच समज-गैरसमजाच्या चक्रात अडकले असे नाही, तर शोषित-वंचितांचे अश्रू पुसणाऱ्या मार्क्सवादालाही समान अन्यायाचे बळी व्हावे लागत आहे. गंमत म्हणजे हा अन्याय कुणा दमनकारी सत्तेने केला नाही तर दस्तुरखुद्द या विचारधारेच्या अनुयायांनीच त्याची दुर्गती केली. शास्त्रीय, व्यवस्थित रचित विचारधारा असूनही अनुयायांच्या हाती गेल्यावर मार्क्सवादाचे मूळ रूप ओळखू न येण्याइतपत त्यात बदल झाले आहेत. तरुण मार्क्स, वृद्ध मार्क्स ते नवमार्क्सवादापर्यंतचे बदल पचवून मार्क्सविचार आजही विश्वातील प्रभावशाली विचार आहे. गांधीविचाराबाबत असा अनुभव आणखी यावयाचा आहे. गांधीविचाराविषयी गैरसमज निर्माण होण्यास पुढील कारणे कारणीभूत ठरली.

पहिले म्हणजे असा गैरसमज उत्पन्न करण्यास स्वत: गांधीच जबाबदार आहेत. गांधींच्या व्यक्तित्वाचे नीट आकलन केल्यावर गांधीविचार अंतर्विरोध, विसंगती आणि परस्पर विरोधाभासांनी युक्त असल्याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. बरे, विचारातील विसंगतीचा आरोप गांधींना मान्य नव्हता, असेही नाही. उलपटपक्षी त्यांनी तो मिरवला असे म्हटले तर चूक ठरू नये. लक्षात घेण्यासारखी बाब ही की, गांधीवादाचा भर विचारप्रक्रियेपेक्षा भावनेवर अधिक राहिल्यामुळे त्यांच्या विचारांत जागोजागी विरोधाभास-विसंगती दिसून येतात. अर्थात बुद्धिवादापेक्षा ‘आतल्या आवाजा’ला गांधी प्राधान्य देत असल्यामुळे वैचारिक स्पष्टतेपेक्षा आतल्या आवाजाचे परस्परविरोधी पडसाद उमटत जाऊन विचारांभोवती गैरसमजाची पुटे अधिकच साचत गेली. प्रत्यक्ष कृतीशी संबंध नसलेला निव्वळ बुद्धिविलासात रंगून जाणारा विचार गांधींना करावासा वाटला नाही. हृदयाच्या खोल गाभ्यातून उदभवलेला, माणसाच्या जीवनानुभूतीचे सारसर्वस्व ज्यात सामावले आहे, असा विचार करून तो कृतीत उतरवण्याला गांधी महत्त्व देत गेले. ज्या वेळी ज्या स्थळी जे महत्त्वाचे वाटले, ते गांधी बोलत वा लिहीत. तार्किक सुसंगतेच्या फंदात न अडकता सत्याला प्रमाण मानून समाजजीवनाला इष्ट वळण देणारा विचार करत गेले. त्यामुळे सुसंगत तत्त्वज्ञानाची रचना गांधींना करता आली नाही. ‘मी सनातनी हिंदू आहे’, ‘चरख्याशिवाय या देशाला दुसरा तरणोपाय नाही’, ‘ख्रिस्ती लोकांचा ‘गॉड’ आणि हिंदू लोकांचा ‘ईश्वर’, तोच मुसलमानांचा ‘अल्ला’ आहे’, ‘हिंदुस्थानचे विच्छेदन करण्यापूर्वी माझे विच्छेदन करा’ अशा तऱ्हेची अनेक वाक्ये गांधींच्या बोलण्यात, लिखाणात सर्वत्र विखुरलेली आढळतात. या सुट्या-सुट्या विधानांच्या आधारे गांधींच्या व्यक्तित्वाचा शोध घेऊ पाहता कमालीचे विरोधाभास, विसंगती जाणवू लागतात. मग ‘गांधी ढोंगी आहेत’, ‘…दांभिक आहेत’, ‘…विसंगत विधाने करतात’ असे म्हणायला विरोधकांना आयतीच संधी मिळते. तथापि गांधी त्याची फिकीर करत नसत ही बाब निराळी.

असे का घडावे? लौकिक अर्थाने गांधी काही हेगेल, मार्क्स वा आपल्याकडील रानडे, एम.एन.रॉय, डॉ. आंबेडकर यांच्याप्रमाणे विचारांची सैद्धान्तिक मांडणी करणारे व्यासंगी विद्वान नव्हते. मात्र कमालीचे लोकप्रिय होते. सत्याग्रहदर्शनाची सुव्यवस्थित मांडणी करणारा एखादा प्रमाणग्रंथ गांधींनी लिहिला नाही. अर्थात त्यांना तशी गरजही वाटली नसावी. त्यांचा पिंडच मुळी कृतिशील समाजसुधारक, धुरंधर राजकारणी आणि सृजनशील धर्मचिंतकाचा होता, निष्णात विचारवंताचा नव्हे. अर्थात व्यवस्थित, सुसंगत आणि एकात्म तत्त्वज्ञानाची अपेक्षा गांधींकडून करता येत नाही, ती करूनही नये. एवढे पथ्य पाळून त्यांच्या सुट्या-सुट्या विधानांवर न जाता सत्यनिष्ठा लक्षात घेऊन समग्र रूपात गांधीविचाराचा विचार केल्यास गैरसमज निश्चितच कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत. सत्यनिष्ठेसाठी एवढी सवलत द्यावयास हरकत नसावी.

याशिवाय अन्यही काही घटक जबाबदार आहेत. गांधीविचाराचे अभ्यासक, संशोधक व अनुयायी जेव्हा त्याचे अन्वयन, विश्लेषण, परिशीलन करतात, तेव्हा दोन गोष्टी संभवतात. एक, जेव्हा एखादा अभ्यासक, संशोधक अथवा अनुयायी गांधीविचाराचा अभ्यास करतो, तेव्हा कळत-नकळत काही संभ्रम निर्माण करतो. परिणामी अनेक वेळा मुलात्म्यापासून तुटलेला, काही वेळा पूर्ण नवा गांधीविचार म्हणून पुढे आणतो. दोन, विद्यमान परिस्थितीत गांधीविचाराची नव्याने फेरमांडणी करून कालसुसंगत त्याचा विकास घडवून आणतो. अर्थात यापैकी पहिली बाब गांधीविचाराच्या परिपोषास घातक सिद्ध झाली आहे, तर दुसरीने गांधीविचाराच्या कालसापेक्ष विकासास हातभार लावला आहे. पण म्हणावी तितकी गती मात्र या दुसऱ्या गोष्टीला पकडता आली नसल्यामुळे पहिल्या गोष्टीचाच जनसामान्यांवर अधिक प्रभाव राहिला हे उघड वास्तव आहे. विद्यापीठीय संशोधन, अभ्यासाद्वारे गांधीविचाराची खोलवर चिकित्सा स्वातंत्र्योत्तर काळात म्हणावी तितकी घडून आली नाही. पश्चिमेत मार्क्सउपरांत विसाव्या शतकात जेवढे चिंतन-मंथन घडून आले, तसे आपल्याकडे घडले नाही. त्यामुळे आरंभापासूनच गांधीविचाराचा तिरस्कार करणाऱ्यांचे फावले. परिणामी ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’ इथपासून ते ‘एका गालात मारली असता दुसरा गाल पुढे करणे म्हणजे ‘गांधीवाद’ ’ असे विकृतीकरण करण्यापर्यंत मजल गेली.

अनुयायांच्या पातळीवर लोहियांसारख्या मूलगामी चिंतन करणाऱ्या प्रतिभावंतापासून (भौतिक विकासाबरोबरच नैतिक विकास आवश्यक मानणारा ‘संकुल कार्यक्षमतेचा सिद्धान्त’, विकेंद्रीकरण व स्वावलंबन या गांधीमूल्यांना समाजवादात महत्त्वपूर्ण स्थान देणारा ‘चौखंबा सिद्धान्त’, गांधींच्या विश्वसांतीच्या विचारांना परिपुष्ट करणारा ‘विश्वमैत्र सिद्धान्त’, सप्तपातकावरील ‘सप्तक्रांती सिद्धान्त’ आदी डॉ. लोहिया यांनी गांधीविचारात मौलिक भर घातली आहे.) ते केअरिंग-शेअरिंग-नर्चरिंग अशी मातृअर्थव्यवस्थेची कल्पना करणाऱ्या जे.सी.कुमारप्पासारख्या अर्थतज्ज्ञापर्यंत, गांधीविचाराची खोलवर चिकित्सा करून समाजप्रकृतीला मानवणाऱ्या गांधीविचाराचा विकास करणाऱ्या प्रयोगशील तत्त्वचिंतक विनोबा भावेंपासून ते निर्भयपणे शासनाच्या अत्याचाराला सामोरे जात समग्र क्रांतीचे रणशिंग फुंकणाऱ्या जयप्रकाशांपर्यंत, आणि नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकरांपासून ते भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठवणाऱ्या अण्णा हजारेंपर्यंत गांधीविचार संभ्रम आणि विकास यात हेलकावे खाताना आढळून येतो. संभ्रमाचे धुके गांधींच्या अनुयायांना दूर करण्यात यश आले नाही. निष्ठावान परंतु चिकित्सक अनुयायी जोडता आले नाहीत. गांधीनामाचा सोयीस्कर जप करणाऱ्या समाजवादी परिवाराला सत्तेचा सोपान चढता आला, पण गांधीविचाराचा कालसुसंगत विकास करता आला नाही, हे ढळढळीत वास्तव आहे.

गांधीविचाराच्या फलनाचे अथवा तोडफोडीचे श्रेय-अपश्रेय दीर्घकाळ देशाच्या सत्तेवर पकड ठेवणाऱ्या काँग्रेस पक्षाकडेही जाते. गांधींना मानणारा (?) एक मोठा गट सरकारमध्ये काम करत राहिला. राज्यबांधणी आणि राष्ट्रबांधणीचे प्रयोग करत असताना काँग्रेसच्या धुरिणांनी एक राजकीय सोय या पलीकडे गांधीविचारांना फारसे महत्त्व दिले नाही. गांधीविचारातील जो गाभा सत्तेला चिकटून राहण्यासाठी किफायतशीर ठरतो, त्याचा स्वीकार आणि प्रतिकूल ठरतो त्याची चिरफाड या काँग्रेसी प्रयोगातून गांधीविचारातील मूळ संघर्षशीलतेला दाबून टाकणाऱ्या संकरित गांधीविचाराच्या फलनाचे उत्तरदायित्व काँग्रेसकडे जाते. रचनात्मक गांधींऐवजी लोकानुरंजनवादी गांधीच या पक्षाने स्वीकारले. स्वच्छता, साधा राहणी, खादीचा वापर, दारूबंदी इ. लोकानुरंजनवादी कार्यक्रमाबाबत जितका उत्साह दाखवला, तितका शिक्षणव्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवू पाहणारा ‘नई तालिम’चा विचार, स्वायत्त गांधी अर्थशास्त्र, स्त्री-पुरुष समतेचा विचार, अस्पृश्यजनोद्धार आदी रचनात्मक कार्याबाबत दाखवला असता तर आजचे चित्र निश्चितच निराळे राहिले असते यात शंका नाही. बरे जे काही केले त्यात विधायकता कमी आणि कर्मकांड अधिक अशीच काहीशी स्थिती राहिली. हल्ली मोदी परिवारही यात सहभागी होऊन सफाईकार्याला वेग आला आहे. गांधीविचारातील संघर्षशीलता, रचनात्मकता समाप्त करून त्याला केवळ कर्मकांडात्मक प्रतीकात्मकतेत अडकवून ठेवण्याचे एक पद्धतशीर षडयंत्र यापलीकडे सध्याच्या सरकारपुरस्कृत सफाई अभियानाला महत्त्व नाही, हे कोणत्याही सुज्ञाला सांगण्याची आवश्यकता नसावी. दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर पिढ्यांना गांधींचे पहिले दर्शन याच रूपात झाले.

गांधीविचाराबाबत गैरसमज पसरवणाऱ्या आणखी एका घटकाचा विचार करणे कर्मप्राप्त आहे. भारतातील वर्ग जातीतील परस्परविरोधी हितसंबंध गांधींभोवती गैरसमज निर्माण करतात. उदा. इंग्रजांशी गांधींनी कधी शत्रूभाव ठेवला नाही. म्हणून येथील राष्ट्रवाद्यांना ते ‘परधार्जिणे’ वाटतात. आंतरराष्ट्रीयवादाची भलामण करतात, म्हणून ‘राष्ट्रवादविरोधी’, भांडवलदार, उद्योगपतींच्या विरोधी गरळ ओकत नाहीत म्हणून समाजवाद्यांना ‘भांडवलवाद्यांचे हस्तक’ वाटतात. गरिबांच्या बाजूने हस्तक्षेपाला प्रोत्साहन देतात म्हणून ‘धनिकहितविरोधी’ ठरतात. सवर्णांना शिव्या देत नाहीत म्हणून ‘सवर्णहितविरोधी’ मानले जातात. मुसलमानांचा द्वेष करत नाहीत म्हणून ‘मुसलमानांचा अनुनय करणारा हिंदूविरोधी’ वा सनातनी हिंदू म्हणवून घेतात म्हमून केवळ ‘हिंदूंचा नेता’ ठरतात. स्वस्थ समाजाच्या बांधणीसाठी हिंसेला अनावश्यक मानतात म्हणून ‘भित्रा’, ‘पळपुटा’ ठरतात. मनुष्यबळ कुजवणाऱ्या पर्यावरणघातकी मोठाल्या उद्योगांना विरोध करतात म्हणून ‘ग्राम्य’, ‘आदिवासी, पारंपरिक वृत्तीचा कृषक’ ठरतात. संततीनियमनासाठी कृत्रिम साधनांपेक्षा ब्रह्मचर्याला महत्त्व देतात, घटस्फोटाला विरोध करतात म्हणून ‘स्त्रीहितद्वेष्टा’ मानले जातात.

या व अशा अनेक गमतीजमती परस्परविरोधी वर्ग-जातींच्या हितसंबंधांमुळे घडून आल्या आहेत.

गांधींविषयी गैरसमज निर्माण होण्यास अशी विविध कारणे कारणीभूत झाली आहेत. समाज-भौतिक वास्तव जाणणाऱ्या कोणाही डोळस साक्षीदारास ते सहज दिसून येतील. विवेकयुक्त साक्षेपीभावाने त्यांचा विचार करणे गांधीजींना खरी आदरांजली ठरेल.

लेखक पिपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

dahiphalevithal@yahoo.com

............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......