बाहुबली २ - पुराणकथेचा आधुनिक अवतार
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अभिजित देशपांडे
  • ‘बाहुबली - द कन्क्लूजन’चं एक पोस्टर
  • Sat , 06 May 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा बाहुबली - द कन्क्लूजन Bahubali - The Conclusion S. S. Rajamouli बाहुबली - द बिगिनिंग Bahubali - The Beginning

सिनेमा हे माध्यमच मुळात Larger than Life आहे. त्यातही तमिळी भडकपणाच्या रजनीकांत शैलीतला सुपरहिरो खुजा ठरवत, त्यावर मात देत अधिक व्यापक भारतीय मानसिकतेला आवाहन करणारा पौराणिक साच्यातला ‘बाहुबली’ हा धीरोदात्त पराक्रमी सुपरहिरो या निमित्ताने रचला गेला. दुसरीकडे हॉलिवुडपटांचे डोळे दिपवणारे भव्यदिव्य दृश्यवैभव आणइ त्याला साजेशी चित्रीकरणशैली यांचा नेमका वापर, यांतून हे Larger than Life असणं कैकपटींनी वाढवल्यानं 'बाहुबली- द कन्ल्क्युजन' हा चित्रपट आपलं गारूड तयार करत आणि भारतीय बॉक्सऑफिसचे रेकॉर्डस् वेगानं मोडत यशस्वी होतो आहे. 

कुठल्याही बिग स्टार कास्टशिवाय बिग बजेट, तंत्रज्ञानाचा आत्यंतिक रमणीय, पण भपकेबाज, चलाख तरीही नेमका वापर असलेला ‘पुराणकथेचा आधुनिक अवतार’ ठरावा, असा हा चित्रपट आहे. 

भारतीयांना धीरोदात्त नायकाची भडक भावनांनी भारलेली पराक्रमगाथा नाहीतरी आवडतेच. त्यातही ती विस्तीर्ण पट असलेली नि डोळे दिपवणारी असेल तर विचारायलाच नको. ‘बाहुबली -१’ या चित्रपटाने 'कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?' असा प्रश्न उपस्थित करून त्याविषयीचं औत्स्युक्य ताणत नि त्यापेक्षा अधिक डौलदार व दृश्यश्रीमंत कथानक पडद्यावर साकारल्यानं त्याला हा कमालीचा प्रतिसाद मिळतो आहे. 

काही पिढ्यांचं, अनेक पात्रं असलेलं, गुंतागुंतीचा कृतक आभास निर्माण करणारं, ढोबळ नि बटबटीत मूल्यसंकल्पनांना आवाहन करणारं, कृतक नैतिक पेच उभे करत त्यांची सोप्पी उत्तरं देणारं, अतिशयोक्त पराक्रमांची भव्यदिव्यता आणि प्रसंगी करुण भावनिकतेनं उदात्ततेचा आव आणणारं कथानक, असंच या चित्रपटाचं थोडक्यात वर्णन करावं लागेल. 

राजगादीचा उमेदवार असलेल्या सुंदर व पराक्रमी नायकावर जनतेचं अलोट प्रेम, राजघराण्यातूनच त्याला विरोध होणं, कार्यकारी प्रमुख असलेल्या राजमातेचं तसेच धीरोदात नायकाचं वचनांनी बांधलं जाणं, त्यांतून उद्भवणारे कौटुंबिक- राजकीय व नैतिक पेच, राज्यसुखापासून नायक- नायिकेला दूर जावं लागणं, जनतेची त्याला मिळणारी सहानुभुती, पराक्रमी दासाची सतत सर्व संकटांतील सोबत, कौटुंबिक राजकारणातून अखेरीस विराट युद्ध... असं रामायण-महाभारताच्या व तत्सम अनेक पुराणकथांच्या कथाआशयाशी साधर्म्य असणारं कितीतरी प्रसंग आपसूकच भारतीय मानसिकतेला भावनिक आवाहन करत खिळवून ठेवणारे आहेत. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सर्वदूर प्रभाव असलेली शिवलिंग प्रतिमा नि विशेषत: कर्नाटकापासून ते उत्तरेपर्यंत होणारे राक्षसदहन, संकटनिवारणासाठी देव पुन:पुन्हा अवतार घेईल… आदी श्रद्धासंकल्पनांचा इथं अत्यंत खुबीनं वापर करण्यात आला आहे. 

पुराणकथांइतकीच ही उसनवारी हॉलिवुडपटांनी रचलेल्या ही मॅन, सुपरमॅन, स्पायडरमॅन... ते थेट जेम्स बॉंड- जॅकी चॅन… नि अस्सल तमिळ मातीतली रजनीकांतची प्रतिमा आदी तमाम सुपरहिरोज, यांपासूनही केलेली आहे. चित्रपटाच्या एकुण दृश्यश्रीमंतीवरील प्रभाव ठळकपणे हॉलिवुडचा असला तरी त्याचा रूपाशय मात्र भारतीय राखल्याने ते भारतीयांना जवळचं वाटणारं आहे. 

या संपूर्ण चित्रपटात येणारी राजमाता शिवगामीची व नंतर देवयानीची ठसठशीत मातृप्रतिमा हे त्याचं वेगळेपण विशिष्ट तमिळ संदर्भातही समजून घेता येईल. मातृसत्ताक कुटुंबपद्धती, मातृपूजन, न्यायप्रिय नि पराक्रमी सत्तासूत्रधारी नायिका, या गोष्टी दक्षिणेत, त्यातही तमिळ संस्कृतीला चांगल्याच परिचित नि साजेशा आहेत. 

हॉलिवुड सुपरहिरोजपटांचे प्रभाव रिचवत कथानकातील भारतीय पौराणिक बाज राखल्याने भारतीय नि पाश्चात्य, आधुनिक नि पौराणिक यांचं आपसूकच मिश्रण साधलं गेलं आहे. एरवी अॅक्शनपॅक्ड हॉलिवुडपटांना सहसा अपरिचित असलेले (कृतक का असेनात) मूल्यकल्पना व नैतिक पेच इथं, या कथानकाला रामायण-महाभारताच्या जवळ आणून ठेवतात. मातृप्रेम, संस्कारसंपन्न पराक्रमी नायक, राजनिष्ठ आज्ञाधारक दास, वचनांनी बांधलं जाणं... इत्यादी. राजमाता शिवगामीला वेळोवेळी घ्यावे लागलेले कठोर निर्णय, कटप्पाला नाईलाजानं अमरेंद्र बाहुबलीची हत्या करावी लागणं, या गोष्टी नैतिक पेचातूनच उद्भवल्या आहेत. 

मुख्य नायक अमरेंद्र बाहुबलीला पदत्याग करून राजकीय वातावरणापासून दूर सामान्य माणसाचं कष्टाचं जीवन जगावं लागतं, तर तिथं जनता मनानं जणू त्याला राजा म्हणूनच स्विकारते आहे. कौटुंबिक राजकीय डावपेचात बाहुबलीच्या वाट्याला अपरिमित संकटं आली तरी जनतेचं व आईचं प्रेम त्याला पदोपदी मिळतंच. इतकंच काय, अमरेंद्र बाहुबलीची सख्ख्या मामाकडून हत्या होऊनही ही कथा शोकांतिका होत नाही. महेंद्र बाहुबलीच्या रूपानं तो पुनर्जन्म, (नव्हे अवतार धारण) करून  पुन्हा संकटग्रस्त माहिष्मती साम्राज्याला वाचवतो. बाहुबली संपत नाही, तो पुन:पुन्हा अवतार घेतो, या धारणांनी या कथानकातील महान शोकांतिका टळते. तमिळनाडूतील भाबडी राजनिष्ठा व व्यक्तिपूजेची प्रवृत्ती… तमिळनाडूच कशाला, सद्य भारतीय पटलावरही ती आहेच. कुणीतरी Larger than Life  नायक येऊन आपल्याला संकटमुक्त करेल, या भाबडेपणाला साद घालणारं बाहुबलीचं कथानक त्यामुळेच गारूड करत आहे. 

लेखक प्रभात चित्र मंडळाच्या ‘वास्तव रूपवाणी’ या त्रैमासिकाचे संपादक आहेत.

abhimedh@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......