हॅपी बर्थ डे जॉनी! ‘जॉनी मेरा नाम’ रुपेरी पडद्यावर येऊन आज ५० वर्षं झाली!!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
मिलिंद दामले
  • ‘जॉनी मेरा नाम’ची पोस्टर्स
  • Wed , 11 November 2020
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा जॉनी मेरा नाम Johny Mera Naam विजय आनंद Vijay Anand गुलशन राय Gulshan Rai देव आनंद Dev Anand हेमामालिनी Hema Malini

‘‘जॉनी, जुगलकिशोर, उस्मान अली ऐसे कई नाम है उस के... रायसाब मैंने राई के बराबर भरोसा किया और राय के बरोबर धोखा खाया... आपने पहाड के बराबर भरोसा किया और पहाड के बराबर धोका खाया... जॉन खुफिया पुलिस का आदमी है...”

होय, त्याच ‘खुफिया पुलिस’ असलेल्या जॉनीला रुपेरी पडद्यावर येऊन आज ५० वर्षं झाली!

हिंदी सिनेमासाठी ११ नोव्हेंबर १९७० हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. गुलशन राय निर्मित, विजय आनंद दिग्दर्शित ‘जॉनी मेरा नाम’ आज प्रसिद्ध झाला आणि १९७० या वर्षांतला एक मोठा सिनेमा ठरला.

असं काय होतं या जॉनीमध्ये? कुठून सुरू झाला त्याचा प्रवास? त्याच्यासोबत कोण कोण कलाकार होते?

सिनेमाच्या शेवटी जीवन म्हणजेच हिरा प्रेमनाथ भूपिंदरला सांगतो की, ‘आपकी सारी गिरोह की दारोमदार की बात पर टिकी है, जॉनी खुफिया पुलिस का आदमी है.’ या जॉनीवर खूप जणांचं भवितव्य अवलंबून होतं. त्यात सगळ्यात पुढे होता गुलशन राय.

राय एक वितरक होता. त्याने ‘नवकेतन’चे दोन सिनेमे वितरित केले होते. त्यानंतर त्याने एका सिनेमाची निर्मिती केली, पण त्यात त्याला यश तर मिळालं नाहीच, उलट सपाटून मार खावा लागला.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

‘जॉनी मेरा नाम’मध्ये जसे आक्रमक संवाद आहेत, तसाच काहीसा आक्रमक संवाद गुलशन रायबरोबर एका मोठ्या निर्मात्या-दिग्दर्शकाचा झडला. (काहींच्या मते ते बी. आर. चोप्रा होते, काहींच्या मते ते राज कपूर होते...असो.) ती मोठी व्यक्ती कोण आहे, हे इथं महत्त्वाचे नाही, पण संवाद काय झाला आणि त्याचा परिणाम काय झाला हे खूप महत्त्वाचं आहे.

ते निर्माते गुलशन रायला म्हणाले की, ‘तू एक वितरक आहेस. तेव्हा तू वितरणाचंच काम कर. सिनेमा बनवण्याच्या कल्पक क्षेत्रात तुझं काय काम? इथं तुझा निभाव लागणार नाही.’

अपमान ही गोष्ट खूप मोठी असते. ती माणसाला उत्कर्षाकडे नेते किंवा अपयशाकडे. कधी कधी ते ठरवणारा तो स्वत: असतो की, आपण कुठे जायचं. गुलशन राय हुशार होते. ‘नवकेतन’च्या सिनेमांचे वितरक असल्यामुळे त्यांचा देवसाहेबांशी चांगला परिचय होता. गोल्डी (विजय आनंद) हा त्याच्या आवडत्या आणि आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक होता.

गोल्डीने जे मानधन मागितलं तेवढे पैसे गुलशन रायकडे नव्हते, पण त्यासाठी गोल्डीने त्याची अडवणूक केली नाही. सिनेमा करायला तो तयार झाला.

गुलशन रायच्या तीन अटी होत्या. दोन अटी अशा होत्या ज्या पुऱ्या करणं गोल्डीला शक्य होतं. तिसरी अट गोल्डीच्या कामाबद्दल आणि त्याच्यामधल्या कमर्शिअल सक्सेसफुल असलेल्या दिग्दर्शकासाठी आव्हान होतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

गुलशन राय म्हणाले की, ‘के. ए. नारायण माझ्याकडे खूप कथा घेऊन येतो. त्यातली एक कथा आपण निवडू. मला त्याच्या कथा आवडतात.’ गोल्डीने नारायणच्या एका कथेवर ‘ज्वेल थीफ’वर सिनेमा बनवला होता. गोल्डी त्याच्या कथा ऐकून एक निवडायला तयार झाला. दुसरी अट होती संगीतकाराबद्दल. कल्याणजी-आनंदजी यांची गुलशन राय यांच्याशी दोस्ती होती. त्यामुळे तो म्हणाला- ‘ते या सिनेमाला संगीत देतील. त्यांना तुझ्याबद्दल आदर आहे. आणि तुझ्या सोबत त्यांना पण काम करायचंय.’ गोल्डी लगेच तयार झाला.

तिसरी अट मोठी विचित्र होती. गुलशन राय म्हणाला की, मला फक्त हिट सिनेमा बनवायचा आहे. एक असा सिनेमा, जो या वर्षातला सगळ्यात मोठा सिनेमा असेल.

गोल्डी तयार झाला. म्हणाला- ‘मी माझं सर्व कसब पणाला लावेन. आपण असा सिनेमा बनवू जो हिट तर होईलच, पण पुढे लोक लक्षात ठेवतील.’ ‘जॉनी मेरा नाम’ हा नसीर हुसैनच्या ‘तिसरी मंजिल’नंतर ‘नवकेतन’च्या बाहेरचा दुसराच सिनेमा होता, जो गोल्डी दिग्दर्शित करणार होता. ‘तिसरी मंजिल’मध्ये देवसाहेब नव्हते, पण यात असणार होते. गुलशन रायला निर्माता म्हणून उभा करण्यासाठी यशस्वी चित्रपट करणं हे गोल्डीसाठी एक आव्हान होतं.

देव आनंद स्वत: पन्नाशीकडे पोहचले होते. मोठ्या वयाचा तरुण हिरो हे देवसाहेबांपुढे एक मोठं आव्हान होतं.

हेमामालिनीच्या ‘सप्नों का सौदागर’ या राज कपूरच्या बरोबरच्या सिनेमानंतरच्या सहा सिनेमांच्या संचातला हा एक मोठा प्रोजेक्ट होता. हेमामालिनीसाठी जॉनी खूप स्पेशल होता. ‘गाईड’ची यशस्वी टीम यात एकत्र होती. गोल्डी आणि देव यांच्याबरोबर काम करायला ती उत्साहित होती. तिला स्वत:ला यशस्वी हिरॉईन म्हणून हिंदी सिनेमांमध्ये प्रस्थापित करण्यासाठी जॉनी हिरो ठरणार होता.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : आज ‘गॉडफादर’चा बाप, मारिओ पुझो जन्माला आला!

..................................................................................................................................................................

राजेंद्र किशन यांच्याकडून गाणी लिहून घेणं म्हणजे एक मोठी जबाबदारी असे. ‘जॉनी मेरी नाम’मधल्या ‘ओ मेरे राजा’ या गाण्याचा धमाल किस्सा आनंदजींकडून ऐकणं ही एक पर्वणी असे. ते म्हणाले, ‘‘त्या सुमारास राजेंद्रजी आजारी होते. खूप दिवस झाले गाणं मिळालं नाही म्हणून कल्याणजी मला  म्हणाले, चल, जरा राजेंद्रजींच्या घरी जाऊन येऊ. गाण्याचं कुठवर आलंय ते पाहू. तशीही त्यांची तब्येत बरी नाहीये. विचारपूस करून येऊ.’’

घरी जाऊन बघतात तो राजेंद्र एकदम खुशीत. म्हणाले- ‘या, पेढे घ्या.’ कल्याणजी-आनंदजी म्हणाले- ‘अहो, तुमची तब्येत बरी नाही म्हणून आम्ही बघायला आलो, पण तुम्ही इथे मिठाई खिलवताय.’ राजेंद्रजी म्हणाले की, खूप दिवसांनी जॅकपॉट लागलाय. त्याची ही मिठाई आहे. राजेंद्र किशन यांना रेसचा शौक होता.

दोघा भावांनी त्यांचं अभिनंदन केलं. आता या आनंदामध्ये गाण कसं मागणार? कल्याणजी म्हणाले की, ‘ठीक आहे, गाणं झालं की कळवा मग...’ यावर राजेंद्रजी म्हणाले- ‘ऐका, मुखडा....’

‘खफा ना होना, देर से आयी, दूर से आयी, मजबुरी थी, फिर भी मैने वादा तो निभाया’

दोघे भाऊ खुश झाले... ‘जबरदस्त मुखडा आहे. कसा सुचला?’

‘अहो, माझा जॅकपॉट मला म्हणतोय... उशीर झाला यायला नाराज नका होऊ.’ राजेंद्रजींनी उत्तर दिलं.

कल्याणजी म्हणाले- ‘ठीक आहे तर, अंतरा घ्यायला कधी येऊ?’

राजेंद्रजी म्हणाले- ‘‘अंतरा तयार आहे. मुखड्यात जॅकपॉट मला म्हणाला – ‘वादा तो निभाया. अंतऱ्यात मी त्याला काय सांगतोय – ‘इंतजार की इक इक पल का बदला लुंगा, ये ना समजना आज भी एैसे जाने दुंगा’...”

आणि असं तयार झालं ते गाणं, ज्यात तरुण तजेलदार हेमाजी देवसाहेबांबरोबर रोमान्स करताना दिसतात. नालंदाच्या स्टेशनवर हा सीन सुरू होतो आणि बेमालूमपणे गाण्यात बदलतो. गोल्डीने हे गाणं शूट केलं आणि त्यात हिरे असलेल्या बॅगला महत्त्वाचा रोल पण दिला.

हेमाजी लाजत सांगतात की, “केबल कारच्या एका सीटवर मी देवसाहेबांच्या मांडीवर बसले आणि मध्यात पोहचल्यावर वीज गेल्यामुळे केबल कार बंद पडली. एक तास आम्ही तसेच बसून होतो. खूप लाज वाटली, पण देवसाहेबांनी परिस्थिती ओळखून माझ्याशी गप्पा मारल्या त्या माझ्या घराच्या, नातेवाईकांच्या. त्यांनी काही मिनिटांत मला कम्फर्टेबल केलं.”

हा सिनेमा अजून एका कलाकारासाठी खूप महत्त्वाचा ठरला. प्रेमनाथ यांची करिअर संपल्यात जमा होती. त्यांच्याकडे सिनेमे नव्हते आणि आता त्यांना परत तिकडे वळण्यात रसही नव्हता. गोल्डीने त्यांना तयार केलं- एका विक्षिप्त आणि वेगळा खलनायक रंगवून. तिथून पुढे वेगळ्या खलनायकाची ओळख सिनेमाच्या प्रेक्षकांना व्हायला लागली आणि प्रेमनाथ परत एकदा मोठ्या ताकदीनं चरित्र अभिनेता आणि खलनायक साकारू लागले. जॉनीने आपला मैत्रीचा हात त्यांनाही दिला. प्रेमनाथ यांनी या सिनेमामध्ये काही जागा अशा घेतल्या आहेत की, त्या अमर झाल्या आहेत. त्यांच्या मोठ्या पण सावत्र असलेल्या भावाशी होणारा संवाद हा सिनेमाचा हायलाईट आहे.

भूपिंदर सिंग (खरा) रंजित म्हणजे प्रेमनाथला विचारतो की, ‘इस में मेरी क्या गलती थी?’ त्यावर रंजित म्हणतो की, ‘तुम्हारी गलती ये थी, के तुम एक बहोत अच्छे आदमी थे. और मेरी हर गलती इसलिए नजर आता थी, के वो तुम मैं ना थी.’ हा डायलॉग म्हणजे लिखाणाचा उत्तम नमुना आहे. दृश्याची जागा, रंजितचा राग, त्याचा क्रूरपणा हे सगळं यात येतं. या दृश्याच्या शेवटच्या काही क्षणांत रंजितच्या क्रूरतेचा कळस होतो. तो म्हणतो, ‘‘तुम कैसे जान सकते थे एक रईस आदमी की फितरत क्या होती है? एक पैसा उडाने की चीजे है और जवानी अय्याशी का एक खुबसूरत मौका है.”

गोल्डीने आपल्या संवादाने जॉनीला एक वलय मिळवून दिलं.

प्राणसाहेबांची या सिनेमातली एंट्री खूप ड्रॅमॅटिक होती. गोल्डी त्यांना भेटायला गेला, कारण प्राणसाहेबांनी आपल्या सिनेमामध्ये काम करावं असं त्याला वाटत होतं. प्राणसाहेबांनी तारखा पाहिल्या आणि त्या उपलब्ध नसल्याचं सांगून विषय संपवला. गोल्डी तिथून सरळ निघून आला. गुलशन रायने विचारल्यावर गोल्डी म्हणाला की, ‘त्यांच्याकडे तारखा नाहीत. त्यांनी मला डायरी दाखवली. अशा परिस्थितीत मी त्यांना काय विनंती करणार? उगाच त्यांचा आणि माझा वेळ जाणार आणि रिझल्ट काही मिळणार नाही.’ गुलशन राय अस्वस्थ झाले.

इकडे प्राणसाहेबांनी विचार केला- मी तारखा नाही म्हटल्यावर या मुलाने काहीच रिअ‍ॅक्शन दिली नाही. सरळ निघून गेला. हा मुलगा हुशार आहे. उगाच फालतू फिल्मी नखरे करणारा दिसत नाही. त्याला मी हवाय हे त्याने सांगितलं होतं. मी त्याला तारखा द्यायला हव्यात.

प्राणसाहेबांनी स्वत:हून आपल्या हव्या त्या तारखा अ‍ॅडजेस्ट करायची तयारी दाखवली आणि जॉनीमध्ये त्यांचा प्रवेश झाला.

सगळ्यात मोठं आव्हान होतं गुलशन रायसाठी. त्यांना एका ज्योतिषानं सांगितल्यामुळे त्यांनी आपल्या संस्थेचं नाव ठेवलं – ‘त्रिमूर्ती फिल्मस’. त्यांनी त्याच्या बोधचिन्हासाठी एक स्पर्धा ठेवली. देशभरातून आलेल्या प्रवेशिकांमधून त्यांना ‘ब्रह्मा विष्णू महेश’ असलेल्या बोधचिन्हाची निवड केली. त्या विजेत्याला मोठा पुरस्कार दिला गेला. त्याच्या यशावरच पुढे गुलशान राय यांनी ‘जोशिला’, ‘दीवार’, ‘त्रिशूल’ आणि पुढे त्यांच्या मुलाने म्हणजे राजीव राय यांनी ‘त्रिदेव’, ‘गुप्त मोहरा’ यांसारखे बॉक्स ऑफिसवर यशस्वी झालेले सिनेमे बनवले. जॉनीने १९७०मध्ये जितकं यश मोठ्या पडद्यावर मिळवलं त्याहून कितीतरी अधिक यश गेल्या ५० वर्षांत छोट्या पडद्यावर कमावलं.

अनेक वैशिष्ट्यं असलेला ‘जॉनी मेरा नाम’ ११ नोव्हेंबर १९७० रोजी प्रदर्शित झाला. त्या वर्षीच्या मोठ्या सिनेमांना त्याने टक्कर दिली. त्या वर्षी राज कपूरचा ‘मेरा नाम जोकर’ बॉक्स ऑफिसवर चमत्कार करू शकला नाही, पण जॉनीने धमाल उडवून दिली. इतकी वर्षं झाली तरी जॉनीच्या वैशिष्ट्यांपलीकडे फारसं कोणी लक्ष दिलं नाही. ‘कमाई केलेला सिनेमा’ इतक्यावरच त्याच्याबद्दल लिहिलं, बोललं गेलं. ‘अरे मस्त’च्या पलीकडे तो जाऊ शकला नाही, म्हणून त्याच्या गुणवैशिष्ट्यांकडे बघणं गरजेचं आहे.

श्रीराम राघवन या मोठ्या दिग्दर्शकावर जॉनीचा मोठा पगडा आहे. श्रीराम सांगतात की, त्यांचे वडील त्यांना पुण्याच्या वसंत टॉकीजला हा सिनेमा पाहायला घेऊन गेले. श्रीराम तेव्हा लहान होते. हा सिनेमा पाहिल्यावर ते अवाक झाले आणि आज इतकी वर्षं होऊनही जॉनीवरचं त्यांचं प्रेम कमी झालेलं नाही. श्रीराम यांनी आपल्या ‘जॉनी गद्दार’मधून ‘जॉनी मेरा नाम’ला, त्यांच्या आवडत्या फिल्मला आदरांजली वाहिली आहे. गोल्डी हा त्यांचा आवडता दिग्दर्शक आहे. ‘जॉनी मेरा नाम’वर त्यांच्याशी तासनतास गप्पा मारता येऊ शकतात.

जॉनीमध्ये भूमिकांमधून गोल्डीने काही नवीन पर्याय लोकांसमोर आणले. हेमामालिनी एका वेगळ्या ग्लॅमरस रूपात आपल्यासमोर आली. (नुकताच आपल्यातून गेलेल्या भानू अथैय्या यांनी हेमामालिनीचे ड्रेस डिझाइन केले होते.) त्यांच्या वेगवेगळ्या रंगीत साड्या खास स्टाईल स्टेटमेंट बनल्या. नालंदा\राजगीरच्या लाल, मातकट बॅकग्राउंडवर मोरपिशी किनार असलेली काळी साडी घालून हेमामालिनी जेव्हा जॉनीला साद घालते, तेव्हा जॉनी बरोबर त्यांचा पाठलाग करणारे पोलीस पण अवाक होतात.

प्रेमनाथ, प्राण यांच्याबरोबर जीवन आणि आय. एस. जोहर आपल्या भूमिकांमधून लोकांच्या लक्षात राहिले. (पहिले राम, दुजे राम, तिजे राम या तीन विनोदी भूमिका एकाच अभिनेत्याने साकारणं ही खेळी ‘जोकर’च्या तीन मोठ्या स्टारना दिलेली टक्कर होती, असं काही जण म्हणतात!) पद्मा खन्ना एका छोट्या भूमिकेबरोबरच ‘हुस्ने के लाखो रंग’ हा कॅब्रे करून फेमस झाली आणि एक उत्तम भरतनाट्यम डान्सर ही आपली ओळख तिने रुंदावली. त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली होती, हेही तितकंच खरं. त्याचबरोबर जॉनी आणि रेखाला नालंदामध्ये रोमान्स करताना पाहून ओठांवरून जीभ फिरवणारा रंगेल पोलीस ऑफिसर जगदीश राजही आपली छाप पाडून गेला.

गोल्डीने एक वेगळी पटकथा लिहिली. प्रत्येक दृश्यानुसार बदलणारा क्लायमॅक्स हे जॉनीचं खास वैशिष्ट्य. सर्व कलाकारांना एकत्र आणून क्लायमॅक्स गुंफायची परंपरा इथून पुढे सुरू झाली. हरवले ते गवसले का, या प्रकारातला हा सिनेमा, पण गोल्डीने सस्पेन्स थ्रिलरचा सिक्वेन्स पुरा केला. ‘गाइड’चा संवेदनाशील दिग्दर्शक ते ‘तिसरी मंजिल’, ‘ज्वेल थीफ’ आणि ‘जॉनी मेरा नाम’चा ‘कमर्शिअल सक्सेसफुल फिल्ममेकर’ ही त्याची ओळख सिनेजगतातलं त्याचं स्थान पक्कं करून गेली.

गोल्डीची लाजवाब गाणी बनवायची परंपरा या सिनेमात सुरूच राहिली, किंबहुना थोडी पुढे गेली. ‘पल भर के लिए’मधला रोमँटिक देव आनंद प्रेक्षकांना भावला आणि खिडक्यांचा गाणं म्हणून हे गाणंही अमर होऊन गेलं. मुद्दाम सेट लावून गोल्डीने ते शूट केलं होतं. कला दिग्दर्शक टी. के. देसाई यांच्या कामाला पुरेसा वेळ देऊन गोल्डीने त्यांच्या कलाकारीलाही वाव दिला होता. एका गंभीर संवादावरून गोल्डीने रंग बदलून एक रोमँटिक गाणं पडद्यावर लीलया आणलं. टी. के. देसाई यांचे सहायक आणि सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक सुबोध गुरुजी या गाण्याची आठवण सांगताना थेट मेहबूब स्टुडिओमध्ये पोहचतात.

“एक दिवस सकाळी गोल्डीसाहेब सेटवर आले. रेखा या पात्राच्या घरचा सेट उभा राहिला होता. रंग देण्याचं काम सुरू झालं होतं. गोल्डीसाहेब म्हणाले की, ‘यात काही बदल करायचे आहेत.’ त्यांनी जमिनीवर सेटच्या बाहेरची लाइन आखायला सांगितली आणि मग त्या लाईनवर चालत चालत १,२,३,४ असं म्हणत त्यांनी कशा प्रकारच्या खिडक्या हव्या आहेत तेही समजावून सांगितलं. हे काहीतरी वेगळं आहे हे सगळ्यांना समजलं. पण या कामाला वेळ लागणार होता.

गुरुजींनी तसं गोल्डींना सांगितलं- सेट उभा आहे. त्यात खिडक्या काढायच्या आणि त्याही इतक्या म्हणजे पुन्हा काम करावं लागेल. आम्ही ते करणार यांची आम्हाला आणि गोल्डीसाहेबांना खात्री होती. किती वेळ लागेल हीच अडचण होती. ‘हवा तेवढा वेळ घ्या. सेट उभा राहिला की मला सांगा’ असं म्हणून गोल्डीसाहेब निघून गेले. सेट पूर्ण झाल्यावरच परत आले आणि एका दिवसात लायटिंग पूर्ण करून गाणं शूट करून मोकळे झाले.

गुरुजी सांगतात- फक्त १,२,३,४ या नंबरावर त्यांनी प्रत्येक खिडकी कन्फर्म केली आणि त्यात एकही बदल झाला नाही. सगळ्या खिडक्या त्यांच्या डोक्यात फिट होत्या आणि तसंच गाणं त्यांनी शूट केलं.’’

नवरसामधल्या दोन भिन्न रसांना एकत्र करून गाण्याची रंगत वाढवणं गोल्डीला खूप छान जमत असे. ‘जॉनी मेरा नाम’मध्ये त्याचा प्रत्यय अधिक येतो. ‘गोविंद बोलो हरी गोपाल बोलो’ हे खरं पहाट भजन आहे, पण ते एका ठिकाणी येतं जिथं प्रेक्षकांच्या मनात भीती आहे. ज्या मुलीचं अपहरण झालं आहे तिच्या पालकांना ती परत मिळणार का, ही एक भीती आणि गाण्यात जॉनी दिसत नाही, तर तो येऊन रेखा आणि मोतीला पकडणार तर नाही ना, ही दुसरी भीती. ही भीती घेऊन रेखा मीराबाईंच्या वेशभूषेत हा अभंग म्हणतात आणि भक्तीला भीतीची जोड देतात. (जिज्ञासूंनी गोल्डीची बाकीची गाणी ऐकावीत आणि हा आनंद घ्यावा!) ‘ओ मेरे राजा’, ‘हुस्ने के लाखो रंग’, ‘बाबुल प्यारे’, ‘पल भर के लिए’, ‘नफरत करणे वालो के सिनेमे प्यार भर दू’ ही सगळीच गाणी मिश्र रस घेऊन आपल्यासमोर येतात. भावनांच्या हिंदोळ्यावर गोल्डी आपली परीक्षा घेत राहतो.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘जॉनी मेरा नाम’ला फिल्मफेअरचे तीन पुरस्कार मिळाले. गोल्डीला बेस्ट एडिटिंग आणि स्क्रीन प्लेसाठी अवार्ड मिळालं. आय. एस. जोहरना बेस्ट कॉमेडियनचं अवार्ड मिळालं. जॉनी याच्या बराच वरती होता आणि आहे असं वाटतं. १९७०पासून आजपर्यंत जेव्हा जेव्हा ‘जॉनी मेरा नाम’ छोट्या पडद्यावर लागला, तेव्हा तेव्हा लोकांनी तो जिथं आहे तिथून पुढे पाहिला. हेमामालिनीने जेव्हा जेव्हा ‘ओ मेरे राजा’ म्हणत रविवारी सकाळी ‘रंगोली’मध्ये एंट्री घेतली, तेव्हा लोकांनी चहाचा घोट थांबवून जॉनीची रिअ‍ॅक्शन एन्जॉय केली. ‘पल भर के लिए’मध्ये लोकांनी सगळ्या खिडक्यांत डोकावून पाहिलं. काही जण नाक मुरडत का होईना पण ‘हुस्न के लाखो रंग’ चोरट्या नजरेनं परत परत पाहतात!

‘तो क्या आपने हमको चोर समज रखा है?’ असं म्हणणारा खुफिया पुलिस म्हणजे सिक्रेट सर्व्हिसचा ऑफिसर जॉनी आज ५० वर्षांचा होतोय, त्याला खूप खूप शुभेच्छा!

..................................................................................................................................................................

संदर्भ 

१) एक होता गोल्डी - अनिता पाध्ये, अनुबंध प्रकाशन, पुणे

२) 100 Filmfare Days : 31 - Johny Mera Naam, https://www.filmfare.com/features/100-filmfare-days-31-johny-mera-naam-6206.html
३) https://www.thehindu.com/features/cinema/johny-mera-naam-1970/article4054584.ece

४) https://indianarrative.com/culture/50-years-of-johny-mera-naam-an-all-time-entertainer-3154.html

५) मुलाखती श्रीराम राघवन, आनंदजी शहा, हेमामालिनी आणि सुबोध गुरुजी

..................................................................................................................................................................

लेखक प्रा. मिलिंद दामले टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे इथं ‘रिसर्च स्कॉलर’ आणि ‘भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थान’ (FTII, पुणे) इथं टीव्ही दिग्दर्शन विभागाचे प्रमुख व प्राध्यापक आहेत.

mida_1978@yahoo.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......