‘भारत’ : अपरिपक्व आणि अपरिणामकारक असा ‘द ग्रेट सलमान शो’!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘भारत’चं पोस्टर
  • Sat , 08 June 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie भारत BHARAT सलमान खान Salman Khan

भारताची फाळणी ते २०१० पर्यंतच्या कथेच्या माध्यमातून सत्तर वर्षांच्या एका वृद्ध व्यक्तीच्या आयुष्याचा जीवनपट ‘भारत’मध्ये समोर मांडला जातो. पण आपल्या देशाचं नाव धारण केलेल्या, चित्रपटाला त्याचं शीर्षक मिळवून देणाऱ्या - जी भूमिका सलमान खान नामक महानुभावानं साकारली आहे - त्या भारतला वृद्ध तरी कोणत्या तोंडानं म्हणणार? मेक-अपच्या नावाखाली स्पष्टपणे खोटी वाटणारी दाढी आणि वयाने सलमानहून लहान असणारे सहाय्यक कलाकार चित्रपटातील एक विस्तृत काळ त्याच्यासोबत वावरत असताना तर हे अधिकच कठीण होतं. मात्र ‘भारत’मधील उणीवा केवळ तांत्रिक बाबींच्या अपरिणामकारक असण्यापुरत्या मर्यादित नाहीत. इथं या तांत्रिक बाबी किंवा मुख्य भूमिका साकारणाऱ्या कामचलाऊ अभिनेत्यांच्या तितक्याच अपरिणामकारक कामगिरीसोबत (एरवी किमान रंजक ठरेल इतपत चांगलं काम करणाऱ्या) लेखक-दिग्दर्शक अली अब्बास जफरचं एकूणच कसबदेखील अकार्यक्षम ठरणारं आहे.

भारताची फाळणी झाल्यानंतर भारतचं कुटुंब भारतात परतत असताना त्याची लहान बहीण, गुडिया, हरवते. तिला शोधायला गेलेले त्याचे वडीलसुद्धा (जॅकी श्रॉफ) परत येण्याची शक्यता नसते. जाताना कुटुंबाची धुरा आठ वर्षांच्या भारतच्या हाती सोपवून ते निघून जातात. आई (सोनाली कुलकर्णी सिनिअर) आणि बहीण-भावासोबत तो रेफ्युजी कॅम्पमध्ये येतो. भारत नाव असलेल्या छोट्या मुलाला, खासकरून जो पुढे जाऊन धर्मनिरपेक्ष सलमान खान बनणार आहे, त्याला गरजेचा असलेला मित्र विलायती खानच्या (मोठा झाल्यावर - सुनील ग्रोव्हर) रूपात भेटतो. नंतर भारत, त्याचं कुटुंब आणि त्याच्या कुटुंबातील नवनिर्वाचित सदस्य विलायती ‘हिन्द रेशन स्टोअर’ नाव असलेल्या दुकानाची मालकीण असलेल्या त्याच्या आत्याकडे (सीमा पाहवा) येतात. हिंदी चित्रपटांमध्ये भावाच्या कुटुंबाची काळजी असणाऱ्या आत्येसोबत पूरक म्हणून येणारा खाष्ट नवरादेखील (कुमुद मिश्रा) इथे आहे. ‘आपले आणि परके’ असा भेदभाव न करणाऱ्या भारतच्या खडतर प्रवासाची ही केवळ सुरुवात असते. संजय दत्तच्या चरित्रपटाला, ‘संजू’मध्ये उगाच ‘अपनी कुर्सी की पेटियाँ बाँध लिजिए’ असं उगाच म्हटलं, कारण वास्तविक पाहता या वाक्याची खरी गरज तर इथं ‘भारत’मध्ये आहे!

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4902/anartha

...............................................................................................................................................................

ऐंशीच्या दशकातील अमिताभ बच्चनच्या चित्रपटांमध्ये दिसायचं तशा ‘बडे लोगों की कार’ धुण्याच्या दृश्यापासून सुरुवात करत भारत (पात्र आणि चित्रपट दोन्हीही) भारतातील विस्तृत इतिहासात स्वैरपणे वावरत राहतो. या काळात तो करत नाही असं कुठलंच ‘फिल्मी’ कार्य बाकी उरत नाही. तो आणि विलायती जणू राज कपूरच्या चित्रपटविश्वात असल्याप्रमाणे ‘द ग्रेट रशियन सर्कस’मध्ये करामती करतात. भारतच्या शब्दांत सांगायचं झाल्यास, ‘विलायतीचं टक्सिडो घालून अंड्यातून बाहेर येण्याचं दृश्य तर प्रेक्षकांत भावलेल्या (तेव्हा त्याच्या समवयस्क असणाऱ्या, मात्र मेक-अप विभागाच्या अक्षमतेमुळे त्याच्याहून लहान भासणाऱ्या) अमिताभ बच्चनला इतकं भावतं की, पुढे जाऊन तो त्याच्या चित्रपटात ते वापरतो’. राधासोबत (दिशा पटनी) कृष्णलीला करत असतानाच (हे मी नाही, तर राधा स्वतः म्हणते!) घडलेल्या एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगानंतर तरुणाईपुढे चुकीचा आदर्श ठेवत आहोत, असं लक्षात आल्यानं भारत सर्कसमध्ये काम करणं सोडून देतो. सलमानच्या अलीकडील काळातील चित्रपटांमध्ये त्याच्या पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील भूमिकेत फारसा फरक नसला तरी त्या रेषा इथं अधिकच पुसट होतात.

नंतर भारत राज कपूरसोबतच दिलीप कुमार, अमिताभ बच्चन इत्यादी लोकांच्या चित्रपटविश्वात प्रवेश करतो. सत्तरच्या दशकात आखाती देशामध्ये तेल आढळल्यानं जगभरातील मजुरांची निर्यात केली जात होती. त्यानिमित्तानं काही वर्षं बेरोजगार असलेली भारत-विलायती जोडी (ही संज्ञा विशेष प्रयत्न न करताही विनोदी वाटते! पण या जोडीचे चित्रपटातील विनोदाचे प्रयत्न मात्र फारच क्षीण आणि निर्बुद्ध आहेत.) देशाबाहेर जात बच्चन शैलीत खाणकाम करते. भारत तर ‘काला पत्थर’ शैलीत मजुरांच्या हक्कांविषयी आवाजदेखील उठवतो. एक प्रकारे सलमान तो करू इच्छित असलेल्या भूमिका करण्याचे मार्ग शोधतो असं म्हणायला वाव आहे. दरम्यान शरीरसौष्ठव स्पर्धेत अव्वल येईल अशा आपल्या बच्चनला - माफ करा, हं - आपल्या भारतला कुमुदच्या (कतरीना कैफ) रूपात त्याची परवीन बाबी भेटते. त्यांचे प्रेमसंबंध जुळून येतात, तोवर चित्रपटाच्या लांबीचा केवळ अर्धा भाग उरकलेला असतो. महागाथेचा उत्तरार्ध आणि भारतचे पराक्रम अजून बाकी असतात!

‘ओड टू माय फादर’ (२०१४) या साऊथ कोरियन चित्रपटाचं अडाप्टेशन असलेल्या ‘भारत’ला उत्तरार्धात टॉम हँक्सच्या ‘कॅप्टन फिलीप्स’पासून प्रेरणा घ्यावीशी वाटते. सोमालियन समुद्री लुटेऱ्यांपासून वाचण्याकरिता आणि भारतीयांच्या प्रेमळ स्वभावाचं दर्शन घडवण्यासाठी भारतला वर्णद्वेषाचा आधार घ्यावा लागतो. वर्णद्वेषी असायला गौरवर्णीय असावं लागत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध होतं. तथाकथित विनोदाच्या नावाखाली सुमार वर्णद्वेषी विनोदांची सद्दी इथं दिसते. त्यानंतरही बराच काळ चित्रपट सुरू राहतो, सोबतच अतर्क्य आणि निरर्थक दृश्यांची मालिका सुरू राहते.

उडत्या चालीची बरीचशी गाणी त्याच्या लांबीत भर घालतात. शिवाय चित्रपटात उफाड्याच्या नायिका ज्यावर नाचू शकतात, अशा गाण्यांचा आवर्जून समावेश केला जातो.

खऱ्याखुऱ्या व्यक्तींवरील चित्रपटांमध्ये इतिहासाचं बनावटीकरण आणि सदर व्यक्तीची देवरूपी प्रतिमा उभी करत केलेलं चित्रण पहायला मिळत असताना भारतसारख्या काल्पनिक पात्राचा जीवनपट समोर मांडताना असं घडलं तर त्यात फारसं आश्चर्य वाटण्याचं कारण येत नाही. पण ‘भारत’ या चित्रपटाबाबत समस्या अशी की, तो समोर मांडत असलेल्या रंजक मानाव्यात अशी अपेक्षा असलेल्या घटना प्रत्यक्षात पडद्यावर पाहताना तितक्या रंजक वाटत नाहीत. कारण मुळात कथा-पटकथाच अगदी अस्ताव्यस्त स्वरूपाची असल्यानं भारतच्या कथनाद्वारे सांगितल्या जाणाऱ्या घटनादेखील विस्कळीत आहेत. ज्यामुळे सदर चित्रपट म्हणजे भारतीय/पाश्चात्य चित्रपटसृष्टीतील निरनिराळ्या काळातील निरनिराळ्या चित्रपटांकडून काही ना काही उसनं घेत बनवलेला संलग्नतेचा अभाव असलेला चित्रपट बनतो.

अली अब्बास जफर हा कबीर खाननंतर सलमानला भेटलेला एक बऱ्यापैकी चांगला दिग्दर्शक आहे. या अभिनेता-दिग्दर्शक जोडीचा ‘टायगर जिंदा हैं’ (२०१७) विशेष नसला तरी ‘सुलतान’ (२०१६) त्याच्या इतर चित्रपटांमध्ये नक्कीच उजवा ठरतो. विशेषतः सलमानच्या पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील, दोन्ही प्रतिमांना साजेशी, काहीशी जुन्या धाटणीची आणि अधिक व्यावसायिक हाताळणी असलेली त्याची शैली ‘सुलतान’ला सहाय्यक ठरली होती. ‘टायगर जिंदा हैं’ आणि अगदी ‘भारत’मध्येही तिचं अस्तित्त्व असलं तरी लिखाण फारच दोषपूर्ण असताना केवळ त्या शैलीच्या जीवावर चित्रपट तारला जात नाही. परिणामी एकूण चित्रपटाचा विचार करायचा झाल्यास ‘भारत’ अनेक पातळ्यांवर अपरिपक्व आणि अपरिणामकारक ठरतो.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......