बा वाचका, तूही यत्ता कंची?
दिवाळी २०१७ - लेख
अवधूत परळकर
  • या लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत
  • Thu , 27 October 2016
  • अवधूत परळकर वाचक पुस्तकं Awdhoot Paralkar Marathi Books

आठव्या इयत्तेत चाळीस मुलांमध्ये आम्ही पाच-सहा मुलंच अशी होतो, जी अभ्यासाव्यतिरिक्तची पुस्तकं मिळवून वाचत होतो. शाळेत एक छोटेखानी लायब्ररी होती. मधल्या सुट्टीत आमचा मुक्काम या लायब्ररीत असे. शेल्फवर दिसतील ती पुस्तकं आम्ही वाचून काढायचो. इतर मुलांना पत्ता नव्हता, की शाळेत गोष्टींच्या पुस्तकांची अशी एक लायब्ररी आहे. अर्थात पत्ता असता तरी त्यांची पावलं तिथं फिरकली नसती. वाङ्मयीन उदासीनता हा आपल्या समाजाचा विशेष आहे.

म्हणूनच साठ वर्षांपूर्वीची ही टक्केवारी आजच्या आपल्या मराठी समाजाच्या वाचन-संस्कृतीविषयीदेखील बरंच काही सांगते. कालपरवा आलेल्या टीव्हीमुळे किंवा आताच्या स्मार्ट फोनमुळे समाजात वाचनाचं प्रमाण घटलं आहे, असे जे आजकाल म्हटलं जातं ते काही खरं नाही. वाचणारा समाज आणि बिनवाचणारा समाज यांच्या पूर्वीच्या गुणोत्तरात आजही फारसा फरक पडलेला नाही.

तरीपण प्रत्यक्ष लोकांत वावरून हे आपले ठोकताळे खरे आहेत का? की नुसते तर्कवितर्क? हे एकदा अजमवावे असा विचार केला. विविध थरांतल्या लोकात शिरावं, वाचन या प्रकाराबद्दल लोकांना काय वाटतं याचा अंदाज घ्यावा. वाचणाऱ्या लोकांच्या बऱ्यावाईट निवडी काय आहेत, याचा अंदाज घ्यावा असं ठरवलं.

शेजारच्या करमरकरांच्या घरापासून सुरुवात केली. करमरकर चार्टर अकाउंटंट. त्यांची बँकेत काम करणारी बायको आणि समर, तिचा सतरा वर्षांचा मुलगा असे दोघे घरात होते. समीरच्या आईलाच पहिला प्रश्न केला, "बाई, तुम्ही वाचनालयात नियमानं जाताना दिसता. कोणती पुस्तकं आवडतात तुम्हाला?" 
"गोनीदांची पुस्तकं वाचलीत मी तिथून आणून. अलीकडे त्यांच्यासारखं कोणी लिहीत नाही हो! त्यामुळे आजकाल वाचनालयात गेल्यावर काय घ्यावं तेच समजत नाही." 
"अहो, ते अच्युत गोडबोले आहेत ना;  आणि मिलिंद बोकील, भारत सासणे. त्या मोनिका गजेंद्रगडकरही आता कथा-कादंबरी क्षेत्रात नाव मिळवून आहेत."
"या लोकांची नावं मी पेपरच्या रविवार पुरवणीत वाचत आले आहे. पण मला कधी त्यांची पुस्तकं वाचावीशी वाटली नाहीत. गोनीदांच्या नंतर क्रम लावायचा तर मी फारतर सुधा मूर्तीचा लावेन. तुमच्या त्या अच्युत गोडबोलेंची पुस्तकं असतील चांगली, पण नॉट माय कप ऑफ टी. मी आपली फिक्शन पसंत करते."

"तुमचा मुलगा काय वाचतो?" 

"अहो, हातात पुस्तक धरत नाही, तरीपण त्यालाच विचारा." 
मी समरला विचारलं, "आई काही तरी चुकीचं सांगते." तो म्हणाला,  "काकांनी हॅरि पॉटरचे तीन व्हॉल्युम्स आणून दिलेत परवा, त्यातला एक वाचायला घेतलाय." 
" अरे, पण तू ते लहान पोरांचं पुस्तक का वाचतोयस या वयात?" .
"बघा ना!," समोरची आई किचनमधून म्हणाली, "मराठी पुस्तक तर हातात धरायला मागत नाही."

इंग्रजी तर इंग्रजी पण पॉटर सोडून इतर केवढी पुस्तकं आहेत.
"वाढदिवशी मला रोनाल्ड का कुणीतरी लिहिलेलं ते चॉकलेट फॅक्टरीचं पुस्तक दिलं होतं एकानं. मला ते जाम बोअरिंग वाटलं."

जिना उतरून खाली उतरतोय तोच शिवतरकर भेटले. बाजारात चालले होते. त्यांच्या बरोबर गप्पा मारत मारत बाहेर पडलो." पेपर कोणता येतो तुमच्याकडे?" मी शिवतरकरांना विचारलं.
"महाराष्ट्र टाइम्स. महाराष्ट्र टाइम्स अगदी पहिल्या अंकापासून घेत आलोय आम्ही."
"बरे असतात ना अग्रलेख त्यातले? अगदी लहान आणि सुटसुटीत." मी शिवतरकारांना दुजोरा दिला.
"अग्रलेख सुटसुटीत असतात कबूल; पण आम्ही काय राजकारणबिजकारणाच्या भानगडीत पडत नाही. सिंधू त्यातलं कोड्याचं पान तेवढं काढून घेते. मी बातम्या आणि  त्यावरची मल्लीनाथी वाचतो. रविवारी मटात पुस्तकांच्या छान समीक्षा असतात. त्याही वाचतो." 

"अरे वा, फार थोडे वाचक ती समीक्षेची पाने वाचत असतील. मग त्यातली समीक्षा वाचून तुम्ही ठरवता काय कोणती पुस्तकं घ्यायची ते?"
"भलतंच काय. विकत घेण्याच्या भानगडीत पडत नाही. वसुंधरा आपली सारखं म्हणत असते. घरात अनावश्यक कचरा वाढवू नका पुस्तकं विकत आणून." 
"पुस्तके म्हणजे कचरा?"
" हे बघा, मी तिचे शब्द सांगतो,  माझे नाही. मला पुस्तकांपेक्षा समीक्षाच वाचायला आवडते. त्यातली बरीच पुस्तकं आमच्या वाचनालयात ठेवण्यासाठी मी वाचनालयाच्या सेक्रेटरीणबाईंना रेकमेंड करतो. आपल्या भाषेतल्या साहित्याचा सर्वत्र प्रचार व्हायला हवा ना."

विजय चोरमारे परतीच्या वाटेवर भेटला, आयटी क्षेत्रात असूनही तो मराठी पुस्तकं विकत वाचतो, वगैरे मी ऐकले होते. म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर त्याला विचारलं, "काय वाचलंस काय अलीकडे?"

"मेहतांनी अगाथा ख्रिस्तीचा सेट काढलाय मराठीत. तो घेऊन ठेवलाय." 
"घेऊन ठेवला आहेस की वाचतोयस?"

"परवा आणि तेरवा जोडून सुट्ट्या आहेत. तेव्हा फडशा पाडायचा विचार आहे. सध्या अॅटलास श्रग्ड' वाचतोय. आयन रँडचं."

"वाचलं होतंस ना?"
 "पुन्हा वाचतोय. परवा फ्रेडरिक फोर्सिथच्या एका पुस्तकाचा अनुवाद देखील दुसऱ्यांदा वाचून काढला. 'देरसू उझाला' या जपानी कादंबरीचा जयंत कुलकर्णींनी केलेला अनुवाददेखील मध्यंतरी वाचून काढला." 
"अनुवाद सोडून तू दुसरं काही वाचत नाहीस असं दिसतं."
"वाचत नाही हे बरोबर. खरं म्हणजे वाचावंसं वाटत नाही हे जास्त बरोबर. अरे, आपल्या मराठी साहित्यिकांचे अनुभवविश्व ते काय? त्यांच्या साहित्यात ना विषयांचं नावीन्य, ना शैलीची गंमत. तुला म्हणून सांगतो, गेली वीस वर्षं मी मराठी साहित्यिकांचं एकही पुस्तक वाचलेलं नाही."

धन्य! मराठी पुस्तक न वाचता मराठी साहित्याच्या दर्जासंबंधी आत्मविश्वासाने बोलणाऱ्या माझ्या थोर मित्राचा मी निरोप घेतला आणि वर्गमित्र हेमंत विचारेला गाठलं.

"काय म्हणतोहेस?" असं विचारत हात हातात घेत हेमंत म्हणाला. 
मी सांगून टाकलं, "कोणकोण कोणती कोणती पुस्तकं वाचतोय याचा आढावा घेतोय... तर तुझ्याबद्दल सांग." 
"राँग नंबर. हेमंत म्हणाला, " मी कुठं काय वाचतोय? भलते प्रश्न भलत्या माणसाला विचारतोहेस." 
"म्हणजे तू मराठी वाचत नाहीस? जोक करू नकोस, सिरिअसली सांग. शाळेत असताना तर  तुझ्या वाचनाचं सर्वांना कौतुक असायचं. नाथमाधव,  हरी नारायण आपटे, सावरकर, गंगाधर गाडगीळ, पु.भा, भावे, यांची पुस्तकं तुझ्या बॅगमध्ये असायची. काय काय वाचायचास तू. ओ  की ठो समजत नाही तरी वाचून काढतोय म्हणत तू एकदा माझ्या डोळ्यासमोर रा. भा. पाटणकरांचं 'सौंदर्यमीमांसा' नाचवलं होतेस. आठवतं?”

"हो आठवतं. तेव्हा मी वाचत होतो खरा. सांगतो ना, पेंडशांचं 'रथचक्र'  हे मी वाचलेलं शेवटचं पुस्तक."
"का बरं? मराठीत नंतर काही काही निर्माण झालं नाही की काय?"

"ते मला ठाऊक नाही; कारण नंतर मी वाचायचंच सोडून दिलं. वाचनबिचन मला सारं फिजूल वाटायला लागलं. अरे त्या पलीकडे किती इंटरेस्टिंग गोष्टी आहेत जगात." 

कशी काय जगतात बाबा ही माणसं पुस्तकं न वाचता, मी मनातल्या मनात म्हणालो. माझी पाहणी पुढे चालू झाली. आणि मला पुढच्या पाहणीत शेकडो हेमंत भेटू लागले. हेमंतने वाचणं स्वतः होऊन बंद केलं होतं. मला भेटलेल्या काहींना वाचन वगैरे बंद करावं लागलं नाही, कारण त्यांनी आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर वाचन सुरूच केलं नव्हतं. सीमा भोसले म्हणाली, "फ्रँकली सांगायचं तर शाळेत असताना पुस्तकात जे धडे होते तेवढंच मराठी साहित्य मी वाचलं आहे. त्यातही कालेलकरांचं प्रवासवर्णन, ना. ग. गोरे यांचे वैचारिक लेख, अशा गोष्टी क्लिष्ट म्हणून ऑप्शनला टाकल्या होत्या; तुला माहीतच आहे.”

शंकर वाघमारे सीमापेक्षा फ्रॅंक बोलला, त्याने स्पष्ट सांगून टाकलं, "काळ्यावर पांढरी अक्षरं दिसली की कपाळावर आठ्या उमटतात माझ्या. आपला असल्या गोष्टीशी काय संबंध नाही. आता बँकेचे कागद, पासबुक. सरकारी नियम, गाडीचं वेळापत्रक वगैरे व्यवहारासाठी वाचणं भाग पडतं ते सोड."

अक्षरओळख असूनही शाळेबाहेर पडल्यावर अक्षरांना ओळख न दाखवणारे अनेक सुशिक्षित नंतर भेटू लागले. जीवनातून वाचनाला हद्दपार केल्याबद्दल कोणाच्याही चेहऱ्यावर पश्चाताप वा खेदाची एकही रेषा नव्हती. वाचकांच्या आवडीनिवडीचा शोध घेणाऱ्या प्रवासात आणखीही मजेशीर व्यक्ती भेटल्या.
या पार्श्वभूमीवर श्रीनिवास रायकर यांच्या घराचं कपाट कवितासंग्रहांनी भरलेलं पाहून बरं वाटलं. पण संग्रहातले सगळे कवी एकोणीशे पन्नास ते साठ या काळात कविता लिहिणारे. दिलीप चित्रे, नारायण सुर्वे, आरती प्रभू ही नावे रायकरांना ऐकून माहीत होती हे नंतरच्या गप्पांतून लक्षात आलं. एकदा या नव्या लाटेतल्या कवींच्या कविता वाचून पाहिल्या पाहिजेत असे रायकर म्हणाले. त्यांची ही नवी लाट आता  किती जुनी झाली आहे  हे कळण्यासाठी त्यांना हेमंत दिवटे, श्रीधर तिळवे, संजीव खांडेकर वाचायला द्यावेत असं मला वाटलं. जाता जाता मी अरुण कोलटकरचा संग्रह त्यांच्या हातावर ठेवायचा खटयाळपणा केला.
मुखपृष्ठावर कवीचं नाव वाचून ते म्हणाले, "हे कोण? मी अरुण म्हात्रेंचं नाव ऐकलं आहे, टीव्हीवर एकदा त्यांच्या कविताही ऐकल्या आहेत. हे कोलटकर कोण? मराठा समाजात असं पण नाव असतं का?"    

विनायक दाभाडे बॅंकेतला कर्मचारी, त्याची गंमत औरच. तो फक्त चरित्रात्मक पुस्तकं वाचतो. मराठीतली सत्तर टक्के चरित्रं या गड्यानं वाचून काढलीत. काय मिळतं अशा पुस्तकातून असं विचारल्यावर त्याने टिपिकल उत्तर दिलं- "प्रेरणा! प्रेरणा मिळते." सहा डझन व्यक्तींच्या आदर्श जीवनक्रमातून प्रेरणा घायच्या म्हणजे थोरच! सहा-सात वर्षांत सामान्य माणसाचं थोर पुरुषात रूपांतर होऊन जायचं. दाभाडेंच्या व्यक्तिमत्त्वात तशी लहानशीदेखील खूण दिसली नाही. दाभाडे इतर साहित्य का वाचत नाही, हे काही त्याला सांगता आलं नाही.

सौंदामिनी ठाकरे आमच्या ऑफिसात मोठ्या पदावर होत्या. त्यांना मात्र चरित्रमय लिखाणाचा तिटकारा होता. त्या नेहमी म्हणायच्या, "हे सगळं लिखाण ना,  अतिशयोक्तीपूर्ण असतं. एकतर चरित्रकार ज्या व्यक्तीचं चरित्र लिहायला घेतो, त्या व्यक्तीच्या तो प्रेमात असतो. काहींचं तर ते दैवत बनून गेलेलं असतं. अशा लोकांकडून सत्यकथनाची काय अपेक्षा करायची?"  मग सौदामिनीबाई काय वाचायच्या? तर त्यांना कथा-कादंबरी वाचनाची आवड. त्यांचे सगळे कादंबरीकार कोण तर साठ-सत्तरच्या काळातले मराठीतले ज्येष्ठ दिग्गज लेखक. पु.शि.रेगे. जी. ए. कुलकर्णी, विश्राम बेडेकर, ना. सी फडके, शांताराम, गंगाधर गाडगीळ इत्यादी. (माझे लेखक मित्र या सेटमधल्या लेखकांना 'मध्ययुगीन लेखक'  म्हणतात!) त्यापुढचे लेखक बाईंना वर्ज्य. त्यांच्या कथा–कादंबऱ्यांबद्दल सौदामिनीबाईंना काडीचं आकर्षण वा आस्था नव्हती. ह. मो मराठे, राजन खान, श्याम मनोहर, प्रवीण बांदेकर, कविता महाजन, मेघना पेठे, मोनिका गजेंद्रगडकर, प्रिया तेंडुलकर,  मिलिंद बोकील, रत्नाकर मतकरी,  सदानंद देशमुख, राजन गवस, अभिराम भडकमकर या कथा-कादंबरीकारांपैकी अनेकांची नावं त्यांना ठाऊक नव्हती.

पुढच्या शोध प्रवासात तर पुल आणि रणजित देसाई सोडून इतर कुठल्याही लेखकाच्या पुस्तकाला हात न लावणारे भेटायला लागले. हिंदू कॉलनीतल्या वीरकरांनी 'ययाती' आणि 'मृत्युंजय' नंतर बरीच वर्षं काही वाचले नव्हतं. परवा त्यांनी वि. दा. सावरकरांचं 'माझी जन्मठेप'  विकत आणून ठेवलंय. प्रसाद परांजपे, विश्राम काकतकर अशा दोघांनी टीव्ही मालिका ज्यावर बेतल्या आहेत, त्या मूळ साहित्यकृती पैदा करून त्याचा संग्रह करून ठेवला आहे. तर श्याम साळवी या आमच्या वर्गमित्रानं हिंदी  संगीतकार आणि गायक यांच्या चरित्राच्या प्रती गोळा करून ठेवल्या आहेत. केव्हातरी निवांत वाचण्यासाठी. हे असे काही छांदिष्ट वाचक आणि त्यांचे वेडे प्रकल्प सोडले तर वाचकवर्ग मराठी भाषावाचनक्षेत्रात काळाच्या किमान पन्नास साठ वर्षं मागे असल्याचं स्पष्ट जाणवलं.

नव्या इंग्रजाळलेल्या मराठी पिढीच्या वाचनाबद्दल काही बोलायची सोय नाही. पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या मराठी समाजातल्या ज्येष्ठ पिढीचं काय? शाळेतल्या क्रमिक पुस्तकातल्या लेखकांचा संच अजून या मराठी वाचकपिढीच्या डोक्यात घट्ट रुतून आहे. आम्हाला कविता फार आवडतात असं आवर्जून सांगणारे शोधयात्रेत काही भेटले, त्यांच्या घरच्या बुकशेल्फवर पाडगावकर, शिरवाडकर यांच्या संग्रहाशेजारी फक्त संदीप खरेची पुस्तकं आढळली. 

उमा सोवनी यांची भेट हा या वाङ्मयीन अभिरुची-शोध मोहिमेतला सुखद धक्का ठरला. सोवनी मूळच्या मेहता, गुजराती कुटुंबात जन्मलेल्या,  गुजराती भाषेत शिकलेल्या. विवाहानंतर त्यांना मराठी भाषेची गोडी लागली. त्यांनी एकापाठोपाठ एक मराठी पुस्तकं वाचायला सुरवात केली. अगदी खांडेकर, अत्रे, फडके यांच्यापासून सुरवात केली.  त्यांच्या आवडत्या लेखकांची यादी पाहा -  कमल  देसाई, विजय तेंडुलकर, विलास सारंग, भाऊ पाध्ये, मेघना पेठे, सानिया, प्रज्ञा पवार, जयंत पवार, राजन खान, कविता महाजन, प्रतिमा जोशी, वसंत आबाजी डहाके, श्याम मनोहर, सतीश तांबे, मिलिंद बोकील, नीरजा.

उमा सोवनींना मराठी समीक्षेवर आणि समीक्षकांवर तौलनिक मतं मांडताना पाहून मी थक्क झालो. असे आणखी एक दोन लहानमोठे धक्के सोडले तर मराठी वाचकांचं समोर आलेलं चित्र बरंचसं अपेक्षित होतं. 

गेली सहा वर्षं एका सार्वजनिक वाचनालयाचा अध्यक्ष म्हणून मी काम पाहतो आहे. जमेल त्याप्रमाणे शहरी सुशिक्षित वाचकांच्या बदलत्या अभिरुचीची निरीक्षण करतो आहे. उत्साहाने दादर भागातले रहिवाशी वाचनालयात पुस्तक बदलायला गर्दी करतात. बहुचर्चित अशा अधिक खपाच्या पुस्तकांना क्लेम लावले जातात. नवीन पुस्तकं वाचनालयात येऊन दाखल झाली की, ती मिळवण्यासाठी धडपडतात. वरकरणी ही सर्व चांगली लक्षणं वाटतील. पण या वाचकांना स्वत:च्या आवडीनिवडी नसतात. व्यक्तीगत संवाद साधल्यावर त्यांच्या वाङ्मयीन अभिरुचीचा दर्जा शंकास्पद वाटू लागतो

अनेक वाचक काऊंटरवरच्या कर्मचाऱ्यालाच विचारतात, "नाटयमय रहस्य असेल असं काही पुस्तक आहे काय तुमच्याकडे? कौटुंबिक व्यवहारावर विनोदी काही पुस्तक आहे काय, सध्या कोणतं पुस्तक गाजतंय?" घरी वाचायला न्यायच्या पुस्तकाचं, लेखकाचं नाव आणि दर्जा माहीत नसणे हे फार दुर्दैवी वाटतं. तेही अशा जमान्यात जिथं पुस्तक समीक्षा आणि इतर माहितीनं वर्तमानपत्राची पानं भरलेली असतात. ही सांस्कृतिक अवस्था खेदजनक आहे. कोणताही वाचनप्रेमी पुस्तकांच्या जगात आज काय चालू आहे, याविषयी सजग असतो किंवा असायला हवा. ‘दोन दिवस बाहेर चाललो आहे, टाईमपाससाठी काही तरी बरं पुस्तक द्या' असं काही वाचनप्रेमी कार्यालयातल्या कर्मचाऱ्याला सांगताना दिसतात. मधल्या काळात मध्य आशियातल्या मुस्लीम स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मवृत्तपर आणि चरित्रपर करुण लेखनाला  वाचकांत प्रचंड मागणी होती. दीड-दोन वर्षांनी या मागणीला ओहोटी लागली. अलीकडे विविध व्यवसायातील लोक सेवानिवृत्तीनंतर आपल्या  व्यावसायिक चरित्रगाथा लिहू लागले आहेत.

साहित्यिक सर्जनशीलतेचा लवलेश नसूनही या पुस्तकाबद्दल वाचनालयाच्या सदस्यांना आकर्षण असल्याचं अलीकडे जाणवायला लागलं. हिंदी सिनेमा निर्माते प्रेक्षकांचा कल पाहून सिनेमे काढतात, तसे वाचकांचा कल लक्षात घेऊन वाचनालयाचे प्रशासक अशा पुस्तकांच्या खरेदीला प्राधान्य देऊ लागले. त्यामुळे ही अभिरुची आणखी पोसली गेली. सर्जनसाहित्य मागे पडत गेलं. असो.

वास्तविक मराठीचं भवितव्य काय या प्रश्नाइतकाच मराठी समाजाच्या वाङ्मयीन अभिरुचीचं भवितव्य काय हा प्रश्न महत्त्वाचा आहे. फार थोड्या वर्तुळात याची चर्चा चालते. वाचकलोक कोणत्या दर्जाचं साहित्य उचलून धरतात; वाचकांच्या अभिरुचीचा दर्जा काय याची चिंता वाहण्यापेक्षा आज मराठी भाषेतून लोक काही ना काही वाचताहेत हे नशीब माना असं माझे मित्र म्हणतात... खरं आहे त्यांचं. मुलांनी शाळेत जाणं महत्त्वाचं; मुलं कोणत्या इयत्तेत आहेत, काय शिकतात, या सगळ्या नंतरच्या गोष्टी नाहीत काय?

 

लेखक ज्येष्ठ लेखक, पत्रकार आहेत.

awdhooot@gmail.com

Post Comment

Trupti Jounjat

Mon , 21 November 2016

मी पर याच पठडी तली आहे


Bhagyashree Bhagwat

Thu , 27 October 2016

खूपच interesting निरीक्षण आणि documentation आहे. एकदम थेट! मात्र लेखकाचा वाचनविषयक दृष्टिकोन काही ठिकाणी overpower करताना दिसतो.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख