रे बिरहा...
संकीर्ण - श्रद्धांजली
पौलमी देशमुख
  • किशोरी आमोणकर एका मैफलीत गाताना
  • Wed , 05 April 2017
  • संकीर्ण श्रद्धांजली किशोरी आमोणकर Kishori Amonkar स्वरार्थरमणी Buy Swararthramani रागरससिद्धान्त Raagrasasiddhant रे बिरहा Re Biraha अवघा रंग एक झाला Avagha Rang Ek Zala

गेल्या वर्षी एप्रिलच्या अशाच एका रात्री मी यु-ट्युबवर किशोरीताईंचा ‘भीमपलास’ ऐकत होते. एकीकडे मांडीवर माझ्या बाळाला झोपवते होते. ऐकता ऐकता माझी लेक झोपते. मी ऐकत राहते.. 'रे बिरहा' ही बंदिश.  ताई भीमपलासमध्ये 'रे बिरहा'चा मुखडा घेऊन आलापी करत रागाची बढत करत आहेत. माझं मन त्या आलापीत एकाग्र होतं… खिळून राहतं. एकातून दुसरी दुसऱ्यातून तिसरी अशा अनेक फ्रेजेस अखंड  झरत असतात. कधीही न संपणाऱ्या ओघासारखी… अनंत... एक नादमय लय चालली आहे अविरत. अवर्तनांमागून आवर्तनं भरली जातायत या अखंड भावपूर्ण आणि लयदार आलापीने. जसे काही अनेक जन्म सरावेत!

मुखडा आल्यावर जन्माच्या उत्कंठेचं विसर्जन होत आहे खरं, पण 'रे बिरहा' म्हणत! काही वेळानं 'रे बिरहा' हा समेवर येण्यासाठीचा मुखडा न राहता माझ्यासाठी एक नामस्मरण होत जातं. ताईंचा भावपूर्ण आवाज, ‘रे बिरहा’, आवर्तने, नादमय लय, माझं मन असं सगळं काही काळ एक होऊन जातं आणि त्याला वेगळं अस्तित्व राहत नाही. भीमपलास नावाच्या रागाचं दर्शन मला होतं. आणि रात्रीच्या वेळीही मला दुपारच्या उन्हाइतकं प्रखर काहीतरी आतपर्यंत जाळत जातं. आत आत पोटामध्ये काहीतरी तुटतं. जणू काही मलाच विरह झालाय जन्मजन्मांतरीचा! पण कोणाशी? अशी अचानक सुखासुखी कळ का उठावी? हा माझा परमात्म्याशी झालेला बिरहा तर नाही ना? एवढं जाणवेपर्यंत 'रंगमे रंग मिलाओ' ही द्रुत बंदिश सुरू होते आणि कुठेतरी त्या श्रीरंगाशी एकरूप होण्याचं ध्येय सापडावं असा आनंद होतो. काय गाणं आहे हे!

मी लहानपणापासून रीतसर 'गायनाच्या क्लास'मध्ये जाऊन गाणं शिकणारी एक सर्वसामान्य मुलगी. पुढे यथावकाश बरा गळा आहे म्हणून केवळ, प्रोत्साहन मिळून मी आणखी बरं गाणं शिकावं आणि गाण्यातच 'करिअर' वगैरे करावं असं माझ्या भाबड्या पालकांना वाटलं. मलाही ते हवंच होतं. कारण इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा मी गाण्यात जास्त रमायचे. माझ्या बालमनाला 'गाणं म्हणजे आनंद' एवढंच कळत होतं. किती खरं आहे ते! गाणं कळत नसलं तरी त्यातून 'आनंद' मिळतो, हे अगदी साधं सरळ गणित! लहानपणी सरळ गोष्टी कळणं हे जितकं सहजभावातून होत असतं ना तसं, जसजसं आपण मोठं होत जातो, तसतसं या सरळ गोष्टी कळायला कठीण होत जातात. कारण त्या सरळ गोष्टींवर जास्तीचं ज्ञान किंवा जादा माहिती, दुनियादारी, करिअर वगैरे भंपक गोष्टींचे ताण, आपला आपल्याशीच तुटलेला संवाद, लोक काय म्हणतील वगैरे अनावश्यक चिंता अशा अनेक गोष्टींची पुटं जमा होतात. म्हणून सरळ गोष्टी आपल्याला जवळ असूनही दिसत नाहीत. आपण लांब जातो त्यापासून. आपणच लांब गेल्यावर त्या दिसणार तरी कशा आणि त्यातून खरा आनंद मिळणार तरी कसा?

किशोरीताईंच्या गाण्यात 'तो' आनंद आहे. कारण त्यांचा कधीही स्वतःशी असलेला योग /संवाद सुटला नाही. जेव्हा तशी परिस्थिती आली, तरी त्या ढळल्या नाहीत. स्वतःवर विश्वास ठेवून बदलत्या काळातही स्वतःच्या अटींवर गाणं केलं. सुदैवानं त्यांना यशही आलं, लौकिकार्थानेही! 

माझ्या शैक्षणिक काळात किशोरीताईंचं गाणं मला सर्वांत आधीपासून भेटायला हवं होतं, असं मला वाटतं. किशोरीताई म्हणजे विक्षिप्त, लहरी वगैरे अशा अनेक सुरस चमत्कारिक कथा ऐकून, एक कलाकार म्हणून त्यांचं गाणं ऐकायच्या आधीच, एक नकारात्मक मत करून घेतलं होतं मी त्यांच्याबद्दल. 'किराणा शिकतो आपण, आपलंच गाणं कसं श्रेष्ठ!' वगैरे नसत्या भ्रमात मी राहिले. 

यथावकाश 'गाण्यात करिअर' वगैरे करताना अनेक सहयात्री भेटले. त्यांच्याशी गप्पा, चर्चा केल्यावर मी माझ्या कूपमंडूक, पूर्वदूषित विचारातून बाहेर पडले आणि कोणताही ग्रह न ठेवता अनेक घराण्यांच्या गायकांचं गाणं निदान ऐकायला तरी लागले. तेव्हा मला सागर दिसायला लागला. एक अथांग सागर. मी किनाऱ्यावरच होते. त्या सागराचं सौंदर्य हळूहळू मला उमगायला लागलं. जिज्ञासा वाढली. ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्याचंही गाणं शिकावं एवढं धाडस मी केलं. सौ. शाल्मली जोशी ताईंकडे जयपूरची तालीम सुरू केली. ती घेता घेता अक्षरशः सुरुवातीला गटांगळ्या खाल्ल्या. नाकातोंडात पाणी गेलं. मेंदूला झिणझिण्या आल्या. एकूणच लक्षात आलं गाणं ही काय चीज आहे! उशिरा का होईना जाग आली होती. यथावकाश पोहायला जमतंय आणि अगदीच पाण्यात पडलो तर डुबणार नाही इतपत विश्वास आला. दरम्यान किशोरीताईंचं गाणं समजून घेऊ लागले. कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय ते ऐकू लागले. या गाण्यातल्या सौंदर्याला वेगळीच झळाळी होती. ताईंची मीरेची भजने तल्लीन करत होती. अभंग ऐकताना समाधी लागत होती. सुगम गाणीही खुणावत होती. वेगवेगळे राग शिकताना संदर्भ म्हणून किशोरीताईंच्याच रेकॉर्डस ऐकल्या जात होत्या. पण त्यातही तीच भावावस्था! 

त्यांचं गाणं जयपूर घराण्याचं असूनसुद्धा वेगळं आहे एवढं जाणवत होतं. आत्मिक समाधान देणारं हे गाणं आहे.

किशोरीताईंच्या अलीकडे जाहीर मैफिली तशा दुर्मीळ होत चाललेल्या. गेल्या वर्षी गानसरस्वती महोत्सवात त्यांचं गाणं ऐकायचंच असं ठरवलं आणि तो योग आलाच. ८३-८४ वर्षांच्या ताई कसं गाणार याची उत्सुकता होतीच. तब्बल एक तासाच्या वर बहादूरी तोडी आणि त्यापुढे अल्हय्या बिलावल. या वयातही स्टेजवर इतका वेळ मांडी ठोकून बसून ५००० लोकांसमोर ताई ज्या एकाग्रतेनं हे अनवट राग गायल्या आहेत त्याला तोड नाही! त्या नेहमी म्हणतात तसं त्या अतिशय प्रामाणिकपणे त्या रागभावाशी एकरूप होताना दिसत होत्या. त्यांची एकेक आलापी सौंदर्यपूर्ण; मला नतमस्तक करत होती त्या स्वरांपुढे. तेव्हा त्या गायिकेची महानता लक्षात आली. त्यांच्या विद्वत्तेबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल अनेक वेळा वाचनात आलं होतं, त्यांच्या कलेची महती जे प्रत्यक्ष त्यांच्याकडे शिकले होते किंवा सहवासात आले होते अशा अनेकांकडून ऐकली होती, पण जाणीवपूर्वक स्वतः ऐकून जी अनुभूती घेतली जाते, त्याचा परिणाम अधिक गहिरा असतो. तसं झालं माझं!

मला वाटलं भेटावं ताईंना. त्यांचं गाणं झाल्यावर मी बॅकस्टेजला पोहोचले. पण सर्वांच्या गराड्यामध्ये मला शांतपणे त्यांच्यापाशी पोहोचता आलं नाही. मी मनोमन त्यांना नमस्कार केला. तसंही त्यांचं गाणं मला (उशिरा का होईना ) 'भेटलं' होतं आणि तेही थेट, अगदी सरळ, या हृदयीचं त्या हृदयी..! तिथं ताई आणि मी वेगळे नव्हतोच! हे बाकी माणसांचं वलय केव्हाच भेदलं होतं आम्ही, नाही का?! त्यांच्या गाण्यातूनच भरभरून मला मिळालं होतं. त्यांचं गाणं कान आणि हृदय असलेल्या प्रत्येकापर्यंत पोहोचलं होतं.

आणि अचानक काल ताईंच्या जाण्याची बातमी येते. तेव्हा विश्वासच बसत नाही. आत्ता कुठे मला या नादसमुद्रात हातपाय मारता येऊ लागले होते.. त्यातली मौज कळू लागली होती. किशोरीताईंना अजून खूप जाणून घ्यायचं आहे मला. ताईंचं वय झालेलं होतं आणि त्या काही अमरत्वाचे वरदान घेऊन आलेल्या नव्हत्या हे माहीत असूनही, 'मानव रूपातली सरस्वती आपल्यात होती' ही भावनाच खूप आधार देणारी होती.

मी गाणं शिकत असल्यामुळे मला ताईंच्या गाण्यातलं व्याकरण, सौंदर्य आत्ता कुठे कळायला लागलं होतं, पण असे कित्येक गाणं न शिकलेले रसिक माझ्या पाहण्यात आहेत जे किशोरीताईंच्या गाण्याबद्दल तितकंच भरभरून बोलले आहेत, त्यांना अगदी आवर्जून ऐकले आहे. ताईंच्या जाण्याने त्यांचं स्वतःचंच कोणी गेल्यासारखे हळहळले आहेत. असं काय होतं त्यांच्या गाण्यामध्ये जे सर्वच तज्ज्ञ आणि सो कॉल्ड अज्ञ रसिकांनाही 'भावलं'? अगदी सरळ आहे, भाव!

किशोरीताईंचं गाणं सहज, मृदू, सुरीलं, जितकं पारंपरिक जयपूर घराणेदार, तितकं नावीन्यपूर्ण, जितकं बुद्धिगामी तितकंच सौंदर्यपूर्ण आणि आत्मिक आनंद देणारं होतं. होय 'आनंद' देणारं! एखाद्या रागाचा भाव करुण असला तरी त्यातुन अंतिमतः निव्वळ आनंदच मिळू शकतो. संगीत हे मुळातच खऱ्या आनंदासाठी आहे.

मध्यंतरीच्या काळात शास्त्रीय संगीत हे रटाळ झालं, त्यातून आनंद नाहीसा होऊ लागला, कारण त्यातला भाव हरपला होता. ताईंनी आयुष्यभर रागसंगीतात भावाचा शोध घेतला. स्वरांना भाव असतो, रागांना भाव असतो, त्या भावाच्या शोधात त्या  प्रवास करत राहिल्या. त्यांचं वैयक्तिक आयुष्य काही कमी वेदनामय नव्हतं. संसार आणि मुलं बाळं याची जबाबदारी स्वतः घेत आपलं हे शोधकार्य अखंड करत राहिल्या. केवळ उत्तम गाणं नाही तर त्या उत्तम सतार, हार्मोनियम आणि तबला ही वाजवत असत. त्यांचे अभंग आणि भजनं उत्तम संगीत दिलेल्या रचनांची उदाहरणं आहेत. त्यांचं इंग्लिश अस्खलित होतं. संतसाहित्य, विशेषतः ज्ञानेश्वरी यावर प्रचंड अभ्यास होता. संस्कृतमधील अनेक संगीतविषयक ग्रंथ त्यांनी वाचले. 'स्वरार्थरमणी' हा ग्रंथ म्हणजे या सगळ्या चिंतनाचं आणि सांगीतिक अनुभवांचं नवनीत. एखाद्या गायकानं फक्त गाण्याचं काम करावं, विश्लेषण, लेखन वगैरे च्या मागे लागू नये या समजालाही त्यांनी छेद दिला. 

"केवळ गळ्याची तयारी म्हणजे गाणं नाही. तीन सप्तकात आवाज फिरवणं म्हणजे गाणं नाही.. तानबाजी करणे म्हणजे गाणं नाही. नुसता मधुर आवाज म्हणजे गाणं नाही, तर प्रत्येक राग काहीतरी सांगत असतो. त्या रागाचा भाव समजून गायला लागतं. सुराला शरण जावं लागतं. त्या स्वरांची भाषा समजावी लागते आणि या सर्वांची वर्षानुवर्षं साधना केल्यानंतर जे गाताना नव्याने, उत्स्फूर्ततेनं निर्माण होतं ते सृजन म्हणजे गाणं! आपण कलाकारच त्या रागभावाशी स्वतःला विसरून एकरूप झालो नाही तर श्रोते तरी कसे एकरूप होणार?" असं किशोरीताई म्हणत. त्यात काय वावगं आहे?

एक कलाकार आपलं सबंध आयुष्य कलेसाठी देतो, तेव्हा त्याला ऐकायला येणाऱ्यांनी किमान एवढी तरी तेहजीब दाखवावी की त्या कलाकाराला त्याच्या कलेशी एकरूप होण्यासाठी जो लागेल तो वेळ त्याला बिनघोर मिळू शकेल. अर्धा-एक तास जरी लागला तरी हरकत नाही. सिद्धीविनायकाला, तिरुपतीला वेळात वेळ काढून तासनतास रांगेत उभे राहून क्षणभरासाठीच देवाच्या मूर्तीचं दर्शन घेण्याबद्दल जसं काही गैर नाहीये तसंच एखाद्या संगीत मैफलीला जाऊन कलाकाराला थोडासा संयम दाखवून सहकार्य करायला हरकत नसावी. कारण यानंतर ही जिवंत साधनामूर्ती पुढचे काही तास जे ऐकवेल, आपल्याला जे दर्शन देईल ते तितकेच स्वर्गीय, पारलौकिक असेल नाही का? कलाकाराचा विक्षिप्तपणा आपण म्हणतो, पण तो कलाकार तेवढा आग्रही का असतो हेही समजून घ्यावं. आपण सर्व भाग्यवान आहोत ज्यांनी किशोरीताईंना वेळोवेळी ऐकलं आहे.

भारतीय संगीत हे आत्मिक समाधान देणारं, ईश्वराच्या जवळ नेणारं आहे, ईश्वरी अनुभूती देणारं संगीत आहे. 

भारतीय अभिजात संगीत हे अगदी शास्त्रशुद्ध आहे, भक्कम शास्त्राच्या पायावरच ते उभं आहे. पण म्हणून आपण शास्त्र गाऊ शकत नाही ना. गाणं ही कला आहे आणि त्यामागे जे शास्त्र आहे, ते आहे 'मनाच्या आनंदाचा शोध घेण्याचं'! किशोरीताईंनी यासाठीच तर आयुष्य वेचलं. आपण साधकांनी (कलाकार आणि रसिक दोघांनीही) आता ताईंनी जे भरभरून दिलं आहे ते योग्य रीतीनं जाणून, त्याचं जतन करून ते वाढवायचं आहे. पुढे न्यायचं आहे. राग ताईंना दिसला तसा तो आपल्यालाही 'दिसणं' महत्त्वाचं आहे. त्याच्याशी एकरूप होण्यासाठी साधना हवी. तरंच हे अभिजात गाणं टिकेल. खरा आनंद सापडेल. बाकी करिअर वगैरे होत राहील. गाणं करणं ही अखंड आनंदयात्रा आहे. ते झालं पाहिजे. ते अंतिम गंतव्य स्थान नाही. 

किशोरीताई आज आपल्यात देहरूपाने नसल्या तरी त्यांनी जे आपल्यासाठी करून ठेवलं आहे, त्याचं आपण सर्व देणं लागतो. ते आपण कधी फेडू शकणार नसलो तरी त्यांनी शोधून काढलेल्या मार्गावरील आनंदयात्री तर नक्कीच होऊ शकतो. अगदी 'रे बिरहा'पासून 'अवघा रंग एक झाला'पर्यंत! हीच असेल किशोरीताईंना खरी 'भावपूर्ण' श्रद्धांजली!

 

लेखिका पुणेस्थित शास्त्रीय गायिका आहेत.

paulamisdeshmukh@gmail.com

Post Comment

Aanand Kharde

Fri , 07 April 2017

किशोरीताईंचे मनच उलगडून आपण ते रासिकांपुढे मांडले. सुंदर लेख. धन्यवाद.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......