भारतातील स्त्रियांची विद्यमान स्थिती चिंताजनक आहे. सर्व आघाड्यांवर त्यांची पीछेहाट सुरू आहे…
अर्धेजग - महिला दिन विशेष
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • पेंटिंग्ज - मुद्रा
  • Wed , 08 March 2023
  • अर्धेजग जागतिक महिला दिन International Women's Day महिला दिन Women's Day भारतीय महिला Indian Women

“The world of humanity has two wings – one is women and the other men. Not until both wings are equally developed can the bird fly. Should one wing remain weak, flight is impossible. Not until the world of women becomes equal to the world of men in the acquisition of virtues and perfections, can success and prosperity be attained as they ought to be.” - Baha’i World Faith

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शनं केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता अशा त्यांच्या मागण्या केल्या. त्याचबरोबर लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणीही जोरकसपणे केली गेली. त्यामुळे क्लारा झेटकिन या जर्मन कम्युनिस्ट कार्यकर्त्या अत्यंत प्रभावित झाल्या. त्यांनी ‘सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणं, हे समाजवादी स्त्रियांचं कर्तव्य आहे’, अशी मागणी केली. १९१० साली कोपनहेगनमध्ये भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लाराने मांडला. तो पास झाला. त्यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशांत सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळालं.

भारतात जागतिक महिला दिन ८ मार्च १९४३ साली साजरा करण्यात आला. १९७५ हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून साजरं केलं. त्यानंतर स्त्रियांच्या समस्यांवर चर्चा होऊ लागली. विज्ञानाची प्रगती, तसंच बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचं स्वरूप बदलत गेलं, तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. भारतीय स्त्रियांना संविधानाच्या कलम ३२६नुसार १९५०मध्ये मतदानाचा अधिकार मिळाला आहे. तो तसा नसता मिळाला, तर इंदिरा गांधी पंतप्रधानपदापर्यंत पोहचू शकल्या नसत्या. (त्या भारताच्या आजगायत पहिल्या व एकमेव स्त्री पंतप्रधान आहेत.)

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

१९४७ साली स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात आज स्त्रियांची परिस्थिती काय आहे?

गेल्या १० वर्षांत सर्व माध्यमांत येणाऱ्या बातम्यांवर नजर टाकली, तर एवढं लक्षात येईल की, स्त्रियांच्या बाबतीतील सकारात्मक बातम्या जवळपास नाहीश्या झाल्या आहेत. यात मोठी भर टाकलीय हिंदी व मराठी मालिका यांनी. सर्व वयोगटातील स्त्रिया केवळ कुचाळक्या, लफडी, भांडण, कारस्थान करत असतात, हे पटवून देण्यात सर्व माध्यमांना यश आलं आहे.

मालिकेतली स्त्री पात्रं आता आपल्या सर्वांच्या प्रत्यक्ष आयुष्यातही दिसू लागली आहेत. मालिकेतसुद्धा घडणार नाहीत, अशा घटना आपल्याला आजूबाजूला घडताना दिसत आहेत. सोशल मीडियामुळे स्त्रीप्रतिमा व स्त्रियांची स्व-प्रतिमा, दोन्ही नकारात्मक झाल्या आहेत. गंमत म्हणजे अशी पात्रं साकारणार्‍या स्त्री कलाकार प्रत्यक्षात अत्यंत स्वतंत्र आयुष्य जगत असतात.

स्त्री वस्तूकरणाचंकाम ८०-९०च्या दशकात हिंदी सिनेमाने केले आणि आता सोशल मीडियाने तर पार वाट लावली आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भारतीय स्त्रियांचं सौंदर्य हे त्यांच्या सावळ्या रंगामुळे ओळखलं जातं, मात्र गेल्या दहा वर्षांत सावळा रंग भारतीयांना नकोसा झाला आहे. आपली त्वचा व शारीरिक ठेवणं, ही आपली ओळख आहे, मात्र माध्यमांतून सातत्यानं गोऱ्या रंगाचा मारा केला जात आहे. २०१० पूर्वी हिंदी सिनेमांत सावळ्या रंगाच्या अनेक यशस्वी, लोकप्रिय नट्या होऊन गेल्या (रेखा, स्मिता पाटील, श्रीदेवी, काजोल, राणी मुखर्जी इ.), मात्र २०१०नंतर हळूहळू त्वचा पांढरी करणारी उत्पादनं व कॅमेऱ्याचे विविध फिल्टर्स वापरून नैसर्गिक भारतीय रंग पडद्यावरून नाहीसा करण्यात आला.

या सावळ्या रंगासोबत आपल्या समाजाची बुद्धी व विवेक या दोन्ही गोष्टी इतिहासजमा झाल्या आहेत. ‘चकाकते ते सर्व सोने नसते’, ही म्हण खोटी ठरत असून साधारण दिसणं व राहणं हे कालबाह्य झालं आहे. एकता कपूर व करण जोहर यांनी अनुक्रमे टीव्ही व सिनेमा यांतील स्त्री-प्रतिमा कचकड्याच्या करून भारतीय समाजाला नको ती ‘रोल मॉडेल्स दिली’ आहेत. ‘दोन मुलींनी एकाच बॉयफ्रेंडवरून एकमेकींच्या झिंज्या उपटल्या’, ‘बॉयफ्रेंडवरून मुलींमध्ये राडा’ यांसारख्या बातम्या ही या संस्कृतीची देण आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

स्त्रियांनी राजकारण, विज्ञान, समाजकार्य, संशोधन व खेळ, अशा क्षेत्रांत जे वर्चस्व दाखवायला हवं, ते तुलनेनं कमी आहे. मोठं होताना आम्ही आमच्या आधीच्या पिढीच्या तुलनेत कमी, मात्र काही प्रमाणात स्त्रियांची चांगली ‘रोल मॉडेल्स’ बघितली. राजकारण, कला, विज्ञान, शेती, तंत्रज्ञान, शिक्षण या क्षेत्रांतली त्यात प्रामुख्यानं नावं होती. पाचवारी किंवा नऊवारी साड्या परिधान करणाऱ्या या स्त्रिया आजच्या मिनी स्कर्ट घालून मिरवणाऱ्या स्त्रियांपेक्षा कितीतरी स्वतंत्र व पुरोगामी विचारांच्या होत्या.

२० वर्षांपूर्वी तंत्रज्ञान प्रगत नसताना रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या स्त्रिया होत्या, म्हणून आज स्त्रियांचे कितीतरी कायदे व सुविधा अस्तित्वात आल्या आहेत. आता मात्र मोबाईल स्क्रीनच्या आड लपून, वेड्यासारखी सेल्फी व रील्स टाकत, हजारो अनुसारक गोळा करत टाईमपास करणाऱ्या स्त्रिया, या स्वतः ला ‘सेलिब्रिटी’ म्हणवत असल्या तरी, त्यांची पुरुषी अहंकाराविरुद्ध ‘ब्र’ काढण्याची हिंमत होत नाही.

अस्तित्वात असलेल्या सर्व शिव्या या स्त्रियांवरून येतात, मात्र आज चांगले ब्रॅण्ड्स घालून मिरवणाऱ्या स्त्रिया अशा शिव्या देताना पुरोगामी असल्याचं सांगतात. यावर काय बोलावं? मी स्वतःला ‘फेमिनिस्ट’ म्हणवून घेत नाही, परंतु स्त्री-स्वातंत्र्याची ही चळवळ भारतात तरी काही चांगल्या दिशेनं जात आहे, असं वाटत नाही.

आज मुलींना लहानपणापासूनच बॉयफ्रेंड असतात, जे त्यांचे सर्व नखरे सहन करतात. बहुतेक मुलींना मैत्रिणी कमीच असतात, कारण बॉयफ्रेंड सर्व हट्ट पुरवतो. मुलींमध्ये पाळी येण्याचं वय व शरीरसंबंध ठेवण्याचं वय कमी झालं आहे. इंटरनेटमुळे पॉर्न सहज उपलब्ध आहे. आमच्या पिढीला महाविद्यालयात असताना PCOD, Thyroid वगैरे नावं माहीतसुद्धा नसायची, जी आज वयात येणाऱ्या मुलींना होतात. नैराश्य, चिंता असले मानसिक त्रास सर्रास बघायला मिळतात. एवढ्या मॉडर्न म्हणवणाऱ्या मुली व स्त्रिया ब्युटी पार्लरवर अमाप खर्च करतील, पण मनाच्या व शरीराच्या आरोग्याची काळजी घेताना दिसत नाहीत.

स्त्रियांमध्ये सर्व प्रकारची व्यसनं वाढीस लागली आहेत. शिक्षण व नोकरी या निमित्तानं बाहेर पडलेल्या मुलींना मिळालेलं स्वातंत्र्य व त्यातून येणारी पॉवर, ज्या पद्धतीनं वापरायला हवी होती, त्या पद्धतीनं वापरली जात नाही. याउलट स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषाचा वापर करून घेणारी व नंतर फेकून देणारी, दुसऱ्या स्त्रीला मदत करण्याऐवजी तिला छळणारी, अशी प्रतिमा झाली आहे. कॉर्पोरेट, विशेषकरून आयटी उद्योगात याचं प्रमाण जास्त आहे. कामजीवनात पुरुषाला स्वातंत्र्य हवंच असतं, मात्र विवाहित स्त्रियांनादेखील आता मला अमुक अमुक प्रकारचे बॉयफ्रेंडस आहेत, या वयातही माझ्याहून लहान मुलांना मी कशी फिरवते, याची शेखी मिरवायला आवडतं. जिममध्ये हे प्रकार भरपूर चालतात.

एवढं सगळं असूनही लग्न मात्र पैसा व स्टेटस बघूनच करतात, हा गेल्या काही वर्षांतील लोकप्रिय ट्रेंड आहे. या ट्रेंडवर भरपूर सिनेमेही आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी ‘normalize’ करण्यात यश आलं आहे. अधिक माहितीसाठी पहा -

https://thelogicalindian.com/mentalhealth/mental-health-women-30111

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

देशाच्या व (पुरोगामी?) महाराष्ट्राच्या राजकारणात स्त्रियांचा टक्का चिंताजनक आहे. सध्याच्या महाराष्ट्र सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. स्त्रिया म्हणजे नाचगाणी करायला किंवा अश्रू ढाळायला जन्माला आल्या आहेत, असंच आताच्या पिढीला वाटतंय. मनोहर भिडेसारखे वाचाळवीर स्त्रियांनी कुंकू लावावं, आणखी कुणी संस्कृतीरक्षक स्त्रियांनी साड्याच नेसाव्या, असं जाहीर करतात; तर याचं विरुद्ध टोक म्हणजे ‘फेमिनिस्ट’ म्हणवणाऱ्या स्त्रिया ‘जे काही पुरुष करतील, ते आम्ही करू’ म्हणत पुरुषांची ‘कॉपी’ करण्याचा प्रयत्न करतात.

पुरुषी अहंकार अनेक ठिकाणी जाणवतो. स्त्रिया काही करू शकतात, याबाबत शंका निर्माण करण्याइतपत तथाकथित संस्कृतीरक्षकांनी व बहुसंख्य स्त्रियांनी परिस्थिती निर्माण केली आहे.

माझी आई सरकारी अधिकारी होती. जवळपास चार दशक तिने पुरुषांच्या वर्चस्व असलेल्या लेखापरीक्षण विभागात यशस्वीपणे काम केलं आहे. आमच्या पिढीच्या तुलनेत तिची पिढी भाग्यवान ठरली, जी निवृत्त होऊन चांगल्या पद्धतीनं आयुष्य व्यतीत करत आहे. तिला मी माझे काही अनुभव सांगितले, तर त्यावर तिचा विश्वासच बसत नाही. माझे वडील नेहमी म्हणायचे की, ‘इंदिरा गांधी जर देश चालवू शकते, तर तू काहीही करू शकते’. त्यांच्या पिढीसमोर इंदिरा गांधींचे यशस्वी ‘रोल मॉडेल’ होते. गेल्या ३०-४० वर्षांत किती स्त्रिया राजकारणात वर्चस्व राखून आहेत? निव्वळ असणं व वर्चस्व असणं, यात कमालीचा फरक आहे. महाराष्ट्रात सुप्रिया सुळे यांना वडिलांचं भक्कम पाठबळ असल्यानं त्या सहज वावरू शकतात, मात्र त्यांचा अपवाद वगळता चटकन आठवणाऱ्या किती स्त्री-नेत्या आहेत?

‘मदर इंडिया’ नावाचा एक खूप जुना सिनेमा आहे. त्यात आई मुलानं एका मुलीला जबरदस्तीनं पळवून आणलं, म्हणून त्याला गोळी घालते. हे फिल्मी आहे आणि टोकाचंही. पण आजकालचे जे राजकारणी मुलींना/स्त्रियांना चुकीची वागणूक देतात, त्यांच्या घरातील स्त्रिया, किमान आई, बहीण वा सहचारिणी त्यांना काहीच म्हणत नसतील का?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

शैक्षणिक क्षेत्रात जिथं स्त्रियांची मक्तेदारी आहे, तिथं ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिकाम्या आहेत. स्त्रियांवर बलात्कार, खून, लैंगिक हिंसा या फार सामान्य घटना वाटाव्या, अशा पद्धतीनं या घटनांचे आकडे वाढत आहेत. सोशल मीडियाने बदललेला, अति आक्रमक झालेला मेंदू, या घटनांसाठी तेवढाच जबाबदार आहे, पण सरकारी पातळीवरही काही होत नाही.

करोना काळापासून मला व माझ्या समवयस्क मैत्रिणींना नोकरीच्या ठिकाणी वातावरण बदलल्याची तीव्र जाणीव होत आहे. याला अर्थातच स्त्रियांचं काम ‘चूल व मूल’ आहे, असं मानणारी पुरुष मंडळीच जबाबदार आहेत. भारतात करोना काळात स्त्रिया अत्यंत मोठ्या प्रमाणात ‘वर्क फोर्स’मधून बाहेर पडल्या, मात्र तेवढ्या संख्येनं त्या परत कामावर रुजू झालेल्या नाहीत. या काळात स्त्रियांवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले. स्त्रिया नेतृत्वाच्या पदावर कमी दिसतात. अगदी इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षातही स्त्रियांचं प्रतिनिधित्व कमी आहे, इतर पक्षांबाबत तर काय बोलावं!

मराठी साहित्यात, पत्रकारितेत पण तीच बोंब आहे. ज्या लोकप्रिय पत्रकार स्त्रिया आहेत, त्या किती लिहितात? महत्त्वाची पदं भूषवतात? स्त्रिया ‘शृंगार व ममता’ या दोन भावनांच्या पलीकडे जाऊन काही करू शकतात, याचा कसा विसर पडेल, याची पुरेपूर काळजी भारतीय माध्यमं घेतात. स्त्रिया भावनिक जरी असल्या (किंवा तशी समाजात त्यांची प्रतिमा असली) तरी बऱ्याचदा त्या काही भावना अनुभवूच शकत नाहीत, कारण त्या अवस्था त्यांच्या वाट्यालाच येत नाही. उदा. जिंकणं, सत्ता व त्यातून येणारं स्वातंत्र्य, मनमोकळेपणानं वागणं. इ.

सतत दुय्यम भूमिका घेणारी अचानक नेतृत्व कसं करणार? त्याची जोपासना आधीपासून करायला हवी. ज्या चवी चाखल्याच नाही, त्या कळणार कशा? अशा पद्धतीनं आयुष्य पुरुषकेंद्री न ठेवणार्‍या स्त्रियांना समाज हर प्रकारे बदनाम करतो. अगदी तिला समलैंगिक म्हणण्यापर्यंतसुद्धा मजल जाते.

‘damsel in distress’ पद्धतीने वागून पुरुषांकडून काम करून घेणाऱ्या स्त्रिया मात्र समाजाला पटतात. पुरुषांचा उदो उदो करण्यात धन्यता मानणाऱ्या स्त्रिया स्वत:च्या उपलब्धी कधी साजऱ्या करतात, हा प्रश्नच आहे. स्त्रियांचा लैंगिक स्वैराचार हा विनोदाचा विषय झालाय. सरकारी असो किंवा बिनसरकारी, कार्यालयात असणारी लफडी व त्यातून होणाऱ्या गुंतागुंती समाज स्वास्थ्य बिघडवत आहेत. पुरुष करतो म्हणून आम्ही पण करणार, असं म्हणत लफडी करणाऱ्या स्त्रिया इतर अनेक चांगल्या आघाड्यांवर पुरुषांपेक्षा मागे आहेत.

अशा वातावरणात चांगली स्त्री-पुरुष नाती कशी टिकतील? प्रत्येक नात्याकडे नर-मादी म्हणूनच बघितलं गेलं, तर आपण १८५७च्या दिशेनं, म्हणजे इतिहासाच्या दिशेनं, म्हणजे उलट प्रवास करत आहोत. आतापर्यंत पुरुषांनी अन्याय केले, आता सूड म्हणून आम्ही तसेच वागू, असं स्त्रिया म्हणत असतील, तर त्याला ‘विकास’ म्हणायचं की, विनाश?

सोशल मीडियावर लिहिताना अनेक वेळा माझ्या लक्षात आलं की, मोजक्या स्त्रिया मला फॉलो करतात आणि जे फक्त स्त्रियांसाठीच लिखाण असतं, तेच वाचतात. माझं काम मुख्यत्वे मानसिक आरोग्यावर असल्याने मला जास्त प्रमाणात स्त्रियांकडून प्रश्न येणं अपेक्षित आहे, दुर्दैवानं तसं होत नाही. मा‍झ्या आजूबाजूच्या अनेक स्त्रिया याला अपवाद नाहीत. त्यासुद्धा स्वत:ची काळजी ज्या पद्धतीनं घ्यायला हवी, तशी घेत नाहीत. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियामुळे वाढत्या वयातील मुलींची शारीरिक प्रतिमा व स्व-मूल्य संबंधित समस्या चिंताजनक झालेली आहे. अधिक माहितीसाठी पहा -

https://www.theguardian.com/technology/2021/sep/18/teenage-girls-body-image-and-instagrams-perfect-storm

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

नॉर्वे या देशात स्त्रियांचा बोर्डरूममधील टक्का हा पुरुषांइतकाच आहे. आयर्लंडमध्ये ‘जेण्डर पे गॅप’ नाहीशी होऊन बरेच वर्षं लोटली आहेत. फिनलँडसारखा सुखी देश हा एक ३७ वर्षांची स्त्री चालवते. भारत, श्रीलंका, बांगलादेश व पाकिस्तान या विकसनशील देशांत मात्र स्त्री पंतप्रधान होऊन स्त्रियांवर अशी वेळ का यावी, याचं उत्तर शोधण्याची नितांत निकडीची गरज आहे.

२००६मध्ये करिअर सुरू केलेल्या मला व माझ्या सोबतच्या अनेक मराठी-अमराठी मैत्रिणींना खूप चांगल्या संधी मिळत गेल्या. आम्ही मुली आहोत, म्हणून आम्हाला जबाबदारीची कामं मिळाली नाहीत, असं झालं नाही, मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत स्त्रियांचं ‘वर्क फोर्स’मधील प्रमाण घटलं आहे, नेतृत्वाच्या संधी अत्यंत कमी झाल्या आहेत. काम करणाऱ्या स्त्रिया नकोच, तर Cosmetic valueसाठी ४०च्या खालच्या स्त्रियांना कामात प्राधान्य मिळतंय, हे सत्य आहे.

‘World Economic Forum’नुसार लैंगिक समानता/Gender Parity यामध्ये १४६ देशांच्या यादीत भारताचा १३५वा क्रमांक आहे… म्हणजे आपण तळाशी आहोत. अधिक माहितीसाठी पहा -

https://thewire.in/women/india-ranks-135th-out-of-146-countries-for-gender-parity-worst-for-health-and-survival-report

इन्स्टाग्रामवरील प्रतिमा बघून आपण चांगले दिसत नाही, ही जाणीव चटकन वाढीस लागते, असं संशोधन सांगतं. वाढत्या वयातील मुलींचा ‘स्व’ डळमळीत असल्यानं त्यांच्यावर याचा वाईट परिणाम होतो.

‘टायटॅनिक’ या जगप्रसिद्ध सिनेमातून नावारूपाला आलेली केट विन्स्लेट स्त्रियांच्या शारीरिक ठेवणीबद्दल माध्यमांनी जे आराखडे तयार केले आहेत, त्यावर परखडपणे मत व्यक्त करते. एक अभिनेत्री म्हणून आपल्या शारीरिक ठेवणीवर झालेली टीका आणि त्यातून निर्माण झालेला मानसिक गुंता, यावर ती उघडपणे बोलते. अत्यंत कमी मेकअप करून कॅमेऱ्यासमोर येणारी म्हणून तिची ख्याती आहे. तिच्या स्वतःच्या मुलीवर फोनचा झालेला परिणाम एका डॉक्युमेंटरीद्वारे तिने सर्वांसमोर आणला आहे. एकेकाळी कमी मेकअप व सशक्त नैसर्गिक अभिनय यासाठी काजोल, मनीषा कोईराला प्रसिद्ध होत्या. त्या अगोदर स्मिता पाटील होती. आता काजोलही प्रचंड मेकअपमध्ये वावरत असते. तिच्यात हा बदल असेल, तर ज्यांची अभिनयाच्या नावानं मुदलातच बोंब आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? देशातल्या स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांवर उर्मिला मातोंडकर, स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा वगैरे मोजकी नावं सोडली, तर एकही अभिनेत्री ‘ब्र’सुद्धा काढत नाही.

एकंदरीत, भारतातील स्त्रियांची स्थिती चिंताजनक आहे. सर्व आघाड्यांवर त्यांची पीछेहाट सुरू आहे. यात अर्थात भारताचं बदललेलं राजकारण सर्वांत महत्त्वाचं कारण आहे. २०२३मधील स्त्रियांच्या दयनीय स्थितीची कारणं सर्वच वयोगटातील स्त्रियांनी शोधणं गरजेचं आहे, अन्यथा येणार्‍या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.

vrushali31@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......