‘पद्मश्री’ सुलोचनाताई चव्हाण : लावणीच्या मळ्यातील गोड गळा
संकीर्ण - श्रद्धांजली
गणेश चंदनशिवे
  • ‘पद्मश्री’ सुलोचनाताई चव्हाण (जन्म : मुंबई, १७ मार्च १९३३ - मृत्यु : १० डिसेंबर २०२२)
  • Thu , 19 January 2023
  • संकीर्ण श्रद्धांजली सुलोचनाताई चव्हाण Sulochana Chavan लावणी Lavani

‘लावणीसम्राज्ञी’ ‘पद्मश्री’ सुलोचनाताई चव्हाण यांचं १० डिसेंबर २०२२ रोजी वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईत निधन झालं. ‘सोळावं वरील धोक्याचं’, ‘पाडाला पिकल आंबा’, ‘मला हो म्हन्त्यात लवंगी मिरची’, ‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’ यांसारख्या त्यांच्या लावण्या गाजल्या असल्या आणि त्यांना लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखलं जात असलं तरी त्यांनी हिंदीसिनेमातही काही गाणी गायली होती. तसंच ग़ज़ल, भजन आणि इतर प्रकारची गाणीही गायली होती. त्यांच्याविषयीचा हा लेख…

.................................................................................................................................................................

सहा दशकांपासून रसिकजनांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मश्री सुलोचनाताई चव्हाण यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला केलेला हा सलाम. त्यांचा जन्म कोल्हापूर येथील कदम कुटुंबात १३ मार्च १९३३ रोजी झाला. दिसायला देखण्या असणाऱ्या ताई लहानपणापासूनच चुणचुणीत आणि हुशार होत्या. घराण्यात गायकीची कुठलीही परंपरा नसताना त्यांनी गायनक्षेत्र निवडलं. ताई सात वर्षांच्या असताना मुंबई येथील गिरगावच्या फणसवाडीमध्ये त्यांच्या कुटुंबानं आपलं बस्तान बसवलं. त्यांच्या आई भाजीपाल्याचा व्यवसाय करत असत.

त्याचदरम्यान मेळ्यामध्ये ताईंना अभिनय करण्याची संधी चालून आली. त्या वेळी ‘श्रीकृष्ण बालमेळा’ हा खूप प्रसिद्ध होता. त्या बालमेळ्यात त्यांना नाटकांमध्ये गायनाची संधीही चालून आली. १९४७च्या दरम्यान त्यांना चित्रपटात पार्श्वगायन करण्यासाठी निमंत्रित केलं. लौकिक अर्थानं कुठलंही गायनाचं प्रशिक्षण घेतलेलं नसतानासुद्धा त्यांना गोड गळ्याची देणगी मिळाली. लौकिक अर्थानं कुठलाही गुरू नसला तरी त्यांचे पती श्यामराव चव्हाण हे सतत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. गाणं कसं असावं? शब्दउच्चारण कसे असावेत? त्याचा स्वभाव कसा असावा? गाण्यातील हरकती कशा असाव्यात? या सगळ्या बारीकसारीक गोष्टी शामरावने त्यांना शिकवल्यामुळे आणि तेवढ्याच तत्परतेनं त्यांनी श्यामरावांना प्रतिसाद दिल्यामुळेच ‘सुलोचना चव्हाण’ हे नाव जगभर प्रसिद्ध झालं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

ज्या काळात त्यांचं कलाक्षेत्रात पदार्पण झालं, तेव्हापासून अगदी अलीकडच्या काळापर्यंत तमाशा, लावणी यासारख्या कलाप्रकाराकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन थोडा वेगळा होता. नाक-डोळे मोडून पाहणाऱ्या पांढरपेशा समाजाला सुलोचनाताई यांनी लावणीसारख्या कलाप्रकाराकडे सकारात्मकतेनं पाहण्या-ऐकण्यास भाग पाडलं. त्यांची लावणी घरंदाज आणि ऐश्वर्यवान होती. त्यांनी फडावरची लावणी माजघरात पोहोचवली. लावणीचं सौंदर्यस्थळ ओळखून, डोईवरचा पदर ढळू न देता लावणीला एक संस्कारक्षम बैठक दिली आणि लावणी जगभरात पोहोचवली. गाण्यातल्या शब्दांचं वैभव त्यांनी आपल्या आवाजानं खुलवलं. त्याचं गायन केवळ लावणीपुरतंच मर्यादित नव्हतं, तर हिंदी, गुजराती, पंजाबी, तमिळ अशा अनेक भाषांमध्ये त्यांचं मोलाचं सांगीतिक योगदान आहे.

वयाच्या चौदाव्या वर्षी कोणीतरी सुलोचनाताईंची गाठ मूळचे ग्वाल्हेरचे गायक-संगीतकार श्यामबाबू पाठक (त्यांना विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा आशीर्वाद लाभला होता) यांच्याशी घालून दिली आणि १९४७ साली बाईंना ‘कृष्ण सुदामा’ या चित्रपटासाठी गायची संधी मिळाली. त्यात बाईंनी दोन सोलो गाणी गायली. त्याच वर्षी संगीतकार रशीद अत्रा (‘पगली’, ‘पन्ना’, ‘शिरीन फरहाद’चं संगीत त्यांचंच) आणि नंदराम ओंकारजी (‘बहादूर जीवन’ वगैरे चित्रपटांचे संगीतकार) यांनी त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली.

१९४८मध्ये त्यावेळेचे प्रसिद्ध संगीतकार ज्ञानदत्त यांनी सुलोचनाताईंना बोलावलं. ‘दुखियारी’, ‘लाल दुपट्टा’, ‘नाँव’ आदी चित्रपटांत त्यांनी गाणी गायली. ज्ञानदत्त आणि शामसुंदर हे सुलोचनाताईंचे आवडते संगीतकार. श्यामसुंदर यांच्या संगीतामुळेच सुलोचनाताईंची हिंदी पार्श्वगायनक्षेत्रात ओळख निर्माण झाली. १९५१ सालच्या ‘ढोलक’ आणि ‘काले बादल’ या चित्रपटांत त्यांनी शामसुंदर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली कमाल करून दाखवली. ‘इस दुनिया में क्या होता’, ‘किसी मजबूर का जलता हुआ’ ही ‘काले बादल’मधील गाणी आणि ‘छलक रहा हैं’ आणि ‘चोरी चोरी’ ही ‘ढोलक’मधील गाणी तुफान लोकप्रिय झाली. रफीबरोबर ताईंनी ‘मगर ए हसीन, ऐ बेखबर’ हे अविस्मरणीय गीत गाऊन अक्षरशः धमाल केली. ‘दुश्मनी’, ‘बाबूजी’, ‘सागर’, ‘दामाद’ हे सुलोचनाताईंचे अन्य उल्लेखनीय चित्रपट.

सुलोचनाताई १९५३पर्यंत हिंदी चित्रपटांसाठी गात राहिल्या. १२ ऑगस्ट १९५३ रोजी त्या श्यामराव चव्हाण यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. १९५९ साली ‘नकाबपोश’ या चित्रपटात त्यांनी एक गाणं गायलं आणि नंतर त्या मराठी चित्रपटांसाठी गाऊ लागल्या. त्यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत नाव झालं होतं. ‘दुश्मनी’मधील ‘फिर लौट के आजा’ हे त्यांचे गीत ऐकल्यानंतर, त्यांनी आणखी काही वर्षं तरी हिंदी चित्रपटांसाठी गाणी का गायली नाहीत, असं वाटत राहायचं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अर्थात मराठी लावण्या आणि चित्रपटगीतं यामध्ये सुलोचनाताईंचा ठसका, जोरकसपणा आणि ढंगदारपणा हा कायम स्वरूपी लक्षात राहणारा आहे. १९२०पासून सुरू झालेला हा संस्कारक्षम वारसा आज २०२२मध्येसुद्धा जिवंत आहे आणि पुढेसुद्धा त्यांच्या गाण्याने जिवंत राहील.

‘दांगट मळ्याचा बाज गोड गळ्याचा साज’ असा कृष्णा-कोयनेचं मिलन झालेला सुलोचनाताईंचा आवाज. ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘यो यो पाहुणा’, ‘कसं काय पाटील बरं हाय का’, यांसारख्या अजरामर लावण्या त्यांनी गायल्या. चित्रपटातील पार्श्वगायनासोबत मराठी चित्रपटातील लावणीगायन ही सुलोचनाताईंची खरी ओळख झाली. त्यांना त्यासाठी ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब आचार्य अत्रे यांच्याकडून प्राप्त झाला.

फडावरची लावणी रुपेरी पडद्यावर आणि थेट माजघरात लोकप्रिय करण्याचं ऐतिहासिक कार्य सुलोचनाताईंनी केलं. त्यांनी लावणी सादरीकरणाचे हजारांवर प्रयोग केले. वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेल्या ‘सांभाळ गं, सांभाळ गं’, ‘दौलत लाखाची’ या लावणीनं सुलोचनाताई विलक्षण प्रभावित झाल्या. आचार्य अत्रे यांच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ या चित्रपटात त्यांनी मराठीतलं पहिलं पार्श्वगायन केलं. संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या सुलोचनाताईंनी गायलेल्या या गीताला रुपेरी पडद्यावर हंसा वाडकर यांनी साकार केलं होतं.

१९५२ साली ‘कलगीतुरा’ या चित्रपटासाठी त्यांनी लावणीगायन केलं. या चित्रपटाचे संगीतदिग्दर्शक होते श्यामराव चव्हाण. लावणीगायनात सुरांची नजाकत आणि शब्देक यांचं शिक्षण ताईंना श्यामराव चव्हाण यांनी दिलं. ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटातील त्यांच्या लावण्या खूपच गाजल्या. गीतकार जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेल्या लावण्यांपैकी ‘नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हन्त्यात लवंगी मिरची’ ही लावणी त्यांनी लावणीच्या मूळ ठसक्यात गाजवली.

मुळामध्ये सुलोचनाताई या नृत्यांगना नव्हत्या. त्या रंगमंचावर बसून गेय पद्धतीनं लावणी सादर करायच्या. कपाळावर ठसठशीत कुंकू, गव्हाळ वर्ण, डोईवरचा पदर ढळू न देता संस्कारक्षम लावणी त्यांनी समाजापुढे आणली. त्यांच्या गायकीची भुरळ ही फक्त भारतीयांनाच नव्हती तर श्रीलंका, सिलोन रेडिओ, आकाशवाणी दिल्ली, आकाशवाणी पाकिस्तान, यांनाही पाडलेली आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

ताईंनी गायनातले सर्व प्रकार म्हणजे भावसंगीत, भक्तिसंगीत, चित्रपटसंगीत आणि लोकसंगीत हाताळले. मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती अशा शेकडो चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं. ग.दि. माडगूळकर, जगदीश खेबूडकर, पी. सावळाराम, अशोकजी परांजपे, सी. रामचंद्र अशा ज्येष्ठ संगीतकारांच्या गीतांना आणि लावण्यांना ताईंनी आवाज दिला. त्यांच्या लावण्या ठसकेबाज असल्या तरी त्या शालीन होत्या.

सुलोचनाताई म्हणजे केवळ लावणी हा समजही चुकीचा असून लावणीबरोबरच अभंग आणि भावगीतंदेखील त्यांनी गायली. नेफा आघाडीवर त्यांनी जवानांचे मनोरंजन केले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर आपल्या गीतांच्या चाहत्या होत्या, असं त्या मोठ्या अभिमानानं सांगत. (लता मंगेशकर यांचा आवाज ही या पृथ्वीतलावर लाभलेली, देवादिकांनी दिलेली देणगी आहे, असंही त्या मोठ्या अभिमानानं सांगत.) वसंत पवार, वसंत देसाई, पी. सावळाराम, जगदीश खेबूडकर अशा अनेक गीतकार आणि संगीतकारांचे अनुभव सांगताना त्या प्रत्येक संगीतकाराच्या विशिष्ट लकबी सांगत. आपले पती शामराव चव्हाण आणि वसंत पवार यांचा लावणीच्या संगीतदिग्दर्शनामध्ये हातखंडा होता, असं त्यांनी अनेक मुलाखतींमधून सांगितलं आहे.

त्यांनी आपलं घरंदाजपण सातत्यानं टिकवलं होतं. त्यांनी लावणीला शृंगाराचा दर्जा दिला, पण त्यांची लावणी अभिजात लावणी होती. ती ठसकेबाज, कुरेबाज असली तरी त्यांच्या लावणीमध्ये वेगळी शालीनता होती आणि ती त्यांनी सातत्यानं जपली होती. त्यांच्या लावणी सादरीकरणात त्यांचे पती श्यामराव चव्हाण आणि पुत्र विजय चव्हाण यांची साथ असायची. श्यामराव चव्हाणांची पेटी आणि विजय चव्हाण यांची ढोलकी असली की मग त्यांच्या लावणीमध्ये वेगळाच रंग भरला जायचा. त्यांच्या प्रकट मुलाखती आणि लावणीचं सादरीकरण म्हणजे जणू दुधात मिसळलेली खडीसाखर.

सुलोचनाताई कलावंत म्हणून तर मोठ्या होत्याच, शिवाय एक दानशूर व्यक्ती म्हणूनसुद्धा त्या खूप मोठ्या मनाच्या होत्या. गोरगरीब, अंध-अपंग, अनाथ अशा मुलांना त्यांनी सढळ हातानं मदत केलेली आहे. खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशी चौफेर मुशाफिरी करून गायनाचे कार्यक्रम सादर केले. त्यातून मिळालेल्या बिदागीमधून देणग्या दिल्या. मंदिरं, शाळा, आश्रमशाळा, अगदी स्मशानभूमी उभारणीसाठी मोठ्या मनानं व सढळ हातानं मदत केली.

२०१९मध्ये करोना येण्याच्या अगोदर लोणावळ्यामध्ये एका अनाथाश्रमानं विजय चव्हाण आणि आमचा एक सांस्कृतिक कार्यक्रम वृद्धाश्रमासाठी आयोजित केला होता. तेथील आयोजकांनी आमच्या हातामध्ये मानधनाची रक्कम दिली. तेव्हा सुलोचना चव्हाण यांनी त्या गोरगरीब वृद्धांना ही मानधनाची रक्कम बक्षीस म्हणून द्या, अशा सूचना आम्हाला केल्या.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या महान कलावतीकडे दातृत्वाची आणि दानत्वाची श्रीमंती होती. त्या नेहमी म्हणायच्या की, एक उत्तम कलावंत होण्यापेक्षा एक माणूस होणं खूप गरजेचं आहे. ही मानवतावादाची जाणीव सुलोचना चव्हाण यांच्याकडून शिकण्यासारखी आहे.

सुलोचनाताई सुसंस्कारित होत्या, तसाच त्यांचा परिवारही संस्कारक्षम होता. मोठा मुलगा जय, छोटा विजय, सुना, नातवंडं असा हा परिवार. काही वर्षांपूर्वी जयचं अचानक निधन झालं. पुन्हा ताईंवर आणि परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण त्या डगमगल्या नाहीत. अनेक पारिवारिक संकटे आली तरी त्यांचं गाणं चालूच होतं. अलीकडच्या काळात करोनानंतर त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली होती. वार्धक्यान नव्वदी पार केली होती. असं म्हणतात वृद्धात्वात स्मृती जाते, परंतु ताईंची स्मृती शेवटच्या घटकेपर्यंत जागृत होती.

समोरून कोण आलंय याचं भान त्यांना होतं. आवाजातली हरकत आता पूर्वीसारखी नव्हती, तिची धार थोडी बोथट झाल्यासारखं होते, पण त्या एकदा गाणं म्हणायला लागल्या तर पूर्ण गाणं त्यांना मुखोद्गत असायचं. शरीर साथ देत नसलं तरी त्यांच्या गळ्यानं त्यांना शेवटपर्यंत साथ दिली.

विजयची रेकॉर्डिंगची कामं, परदेशातले दौरे थांबले होते तरी ‘लोककला अकादमी’तली नोकरी आणि पारिवारिक कर्तव्यं सांभाळून माईंसाठी पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. आता मात्र विजयची आणि परिवाराची तारेवरची कसरत सुरू झाली. विजयचा स्वभाव तसा मिश्कील. ताई आजारी होत्या तरी त्यांना काही ना काही कारणाने विजय हसवत असे. त्यांचं निधन होण्याअगोदर काही दिवसांपूर्वी अकादमीतील वादन सहकारी कृष्णा मुसळे माईंना भेटण्यासाठी फणसवाडीला त्यांच्या घरी गेले असता विजय चव्हाण यांनी ताईंना विचारलं, ‘माई, हे बघा तुम्हाला भेटायला कोण आलंय? हे गृहस्थ छान पद्धतीनं गिटार वाजवतात!’ तेव्हा ताईंनी विजयला सांगितलं, ‘तू काय माझी मस्करी करतोयस का? मी काय याला ओळखत नाही का? अरे, हा आपला पांडूबुवाचा मुलगा कृष्णा आहे. हा तुझ्याबरोबर असतो ना!’ हीच खरी पावती त्यांच्या स्मृतीची होती.

ताईंच्या गायिकीनं लोकांचं मनोरंजन तर केलंच, त्याबरोबर प्रबोधन, उदबोधनही केलं. त्यामुळेच त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्या प्रचंड स्वाभिमानी होत्या. त्या स्वतः साठी कधीच कुणाकडे काही मागण्यासाठी गेल्या नाहीत. त्यांना रसिकांनी भरभरून प्रेम दिलं. महाराष्ट्र शासनानं त्यांचा गौरव केला. भारत सरकारनं त्यांना ‘पद्मश्री’नं सन्मानित केलं. गायकीच्या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करणारी ही कलावंत १० डिसेंबर २०२२ रोजी काळाच्या पडद्याआड गेली. सुलोचनाताई शरीरानं आपल्यामध्ये नसल्या तरी गोड गळ्यातील सुरांच्या स्मृती कायम आपल्या सोबत राहतील. त्यांच्या स्मृतीस माझा मानाचा मुजरा.

ग्रंथालीच्या ‘शब्द रुची’ या मासिकाच्या जानेवारी २०२३च्या अंकातून साभार.

.................................................................................................................................................................

लेखक प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे ‘लोककला अकादमी’मध्ये कार्यरत आहेत.

ganesh.chandan20@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......