‘डिजिटल युगा’तले कौटुंबिक सहजीवन ‘सही’ जीवन होईल?
अर्धेजग - कळीचे प्रश्न
विवेक सावंत
  • ‘उद्याचा मराठवाडा’ या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ आणि भारतीय कुटुंबाचे एक प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 10 November 2022
  • अर्धेजग कळीचे प्रश्न कुटुंब Family सहजीवन Symbiosis नातेसंबंध Relationship फ्रीलान्सर्स Freelancers वर्क फ्रॉम होम Work from Home

नांदेडहून प्रकाशित होणाऱ्या ‘उद्याचा मराठवाडा’ या दैनिकाचा दिवाळी अंक गेल्या काही वर्षांपासून लक्षवेधी, वैशिष्ट्यपूर्ण आणि कल्पकता या तीन वैशिष्ट्यांमुळे वाचनीयता आणि संग्राह्यता या बिरुदांचा धनी होतो आहे. गेल्या दोन वर्षांचीच उदाहरणे पहा. २०२०मध्ये करोनाकहर जोरावर होता. सबंध जग करोना महामारीच्या फेऱ्यात अडकलेलं होतं. तेव्हा करोनाने निर्माण केलेल्या समस्यांचे स्वरूप आणि त्यावरील चिंतन या अनुषंगाने ‘पुनर्निर्माण पर्व’ या विषयावर ‘उद्याचा मराठवाडा’चा २०२०चा दिवाळी अंक होता.

२०२१मध्ये करोनाकहर काहीसा ओसरला होता, पण भीती कायम होती. चीन, अमेरिका, लंडन, रशिया यांसारख्या देशांतून करोनाच्या तिसऱ्या, चौथ्या लाटेच्या बातम्या येत होत्या. तेव्हा ‘उद्याचा मराठवाडा’चा २०२१चा दिवाळी अंक ‘नवे पर्व’ या विषयावर होता. यंदाची दिवाळी मात्र पूर्णपणे करोनामुक्त आहे. त्यामुळे यंदाचा या दिवाळी अंकाचा विषय आहे - ‘मुक्तपर्व’. 

यंदाचे या अंकाचे अतिथी संपादक आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर. त्यांच्या साक्षेपी संपादनातून या अंकातला ‘मुक्तपर्व’ हा मुख्य विभाग आकाराला आला आहे. हेमंत देसाई (ठाकरे फोर-जी), अतुल देऊळगावकर (नरकपुरीतून निसर्गरम्यतेकडे), मधुकर धर्मापुरीकर (व्यंगचित्रातील चिंतनशीलता), प्रवीण बर्दापूरकर (कोरोनोनुभव), श्रीकांत उमरीकर (लळा बारवांचा), राजेश भिसे (ड्रायपोर्ट - मराठवाड्यासह राज्याच्या विकासाचे नवे पर्व), निशिकांत भालेराव (असा लढा होणे नाही), अशा मान्यवर लेखकांचा या विभागात समावेश आहे.

अजेय गंपावार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांची घेतलेली सविस्तर मुलाखत हे या अंकाचे विशेष आकर्षण आहे. या मुलाखतीचे शीर्षक आहे - ‘अनावश्यक गोष्टींवर वाद घालण्याची आपल्याला जरा जास्तच आवड आहे...’. हिंदी सिनेमा, अभिनेते यांच्याबद्दल आणि स्वत:बद्दलही नसीरुद्दीन शाह यांनी अतिशय रोखठोकपणे आपली मतं मांडली आहेत. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ असा सध्याचा काळ आहे. नसीरुद्दीन शाह यांच्यासारखे काही मोजके कलावंत ‘खरं सांगेन आणि तेही ठासून सांगेन’ या पंथातले आहेत. त्यामुळे ही मुलाखत वाचायलाच हवी.

याशिवाय या अंकात कथा, कविता, बालसाहित्य, व्यंगचित्रे यांचाही प्रथापार समावेश आहेच.

या अंकातला हा एक लेख... संपादकांच्या पूर्वपरवानगीसह...

.................................................................................................................................................................

२०२० सालच्या सुरुवातीपासून जगाला करोना महामारीने ग्रासले. तेव्हापासून ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पना पुस्तकात न राहता, सुशिक्षित घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर मूळ धरत आहे आणि त्याबरोबरच कौटुंबिक सहजीवनात लक्षणीय बदल होताना दिसत आहेत. भारतातील सुमारे ५८ टक्के ज्ञानकर्मी आता कार्यालयात येत नाहीत, ते घरूनच काम करतात. ते आता एकतर ‘दूरस्थ कर्मचारी’ झाले आहेत किंवा ‘फ्रीलान्सर्स’ झाले आहेत. वीज, संगणक, स्मार्टफोन व इंटरनेटची खात्रीशीर सुविधा असेल, अशा ग्रामीण भागातूनही आता ते काम करू लागले आहेत.

कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांबरोबरच फ्रीलान्सर्सच्या बुद्धिमत्तेचा वापर करण्याकडे भारतीय कंपन्यांचा कल आता झपाट्याने वाढत आहे. २०१८ साली भारतातील ७० टक्के कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्या जोखमीच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये घरून काम करणाऱ्या फ्रीलान्सर्सच्या सेवा वापरल्या आहेत. करोनापश्चात यात विक्रमी वाढ झाली आहे. घरून काम करण्याचे फायदे विचारात घेऊन काही कायमस्वरूपी कर्मचारी फ्रीलान्सर होण्याकडे संधी म्हणून बघत आहेत. त्यासाठी व्यवस्थित नियोजन करत आहेत. करोनापश्चात तीव्र झालेल्या आर्थिक मंदीच्या वास्तवात कंपन्यांना त्यांच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील वाढता कायमस्वरूपी खर्च परवडेनासा होत आहे. त्यामुळे आपल्या घरून काम करणाऱ्या फ्रीलान्सर्सच्या सेवा काही प्रमाणात घेण्यावाचून त्यांना गत्यंतर नाही.

ग्रामीण भागातील घरातून किंवा शिवारवस्तीतूनही काम करता येण्याचे स्वातंत्र्य, शेती व गाईगुरे सांभाळून कार्यालयीन काम किंवा डिजिटल फ्रीलान्सिंगचा जोडधंदा करण्याचे स्वातंत्र्य, ग्लोबल व्यावसायिक जीवनाचा व लोकल सांस्कृतिक जीवनाचा एकाचवेळी अनुभव व आनंद, चकचकीत, वातानुकूलित, बहुमजली, गजबजलेल्या व गर्दीच्या प्रदूषित वस्तीतील महागड्या कार्यालयाची गरज नाही. दूरवर प्रवास करावा लागत नसल्याने वाहने, रस्त्यांचे क्षेत्र, वेळ व इंधन यांची बचत, अपघाताच्या जोखमीपासून सुटका, कामाचे तास, वेळा व दिवस यातील लवचीकता, परगावी किंवा परदेशात बदलीची संभाव्यता व त्यामुळे येणारी कौटुंबिक अनिश्चितता नाही, ‘ड्रेस कोड’ किंवा ‘शो ऑफ’ नाही. साधी राहणी, घरचे अन्न, योग्य वेळी विश्रांती, घरकामात मदत, सहजीवनासाठी अधिक वेळ, कौटुंबिक व व्यावसायिक जीवनातील समतोल, स्थानिक परिसरातील सामुदायिक उपक्रमात सक्रिय सहभाग, सामाजिक स्नेह, जिव्हाळा, इ. अनेक नवे आयाम दैनंदिन जीवनाला प्राप्त होण्याच्या शक्यता वाढत आहेत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या पार्श्वभूमीवर गतकाळात चरितार्थासाठी करावे लागणारे काम आणि त्याचे कौटुंबिक सहजीवनावर होणारे परिणाम यात कसकसे बदल होत गेले, हे पाहणे मनोरंजक व उदबोधक ठरेल.

ऐंशीचे दशक सरता सरता शीतयुद्ध संपले. बर्लिनची भित जमीनदोस्त करण्यात आली. त्या पाठोपाठ खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरणाचे (‘खाउजा’चे) वारे जगभर जसे वाहू लागले, तसा व्यक्तिवाद फोफावू लागला आणि सामाजिकता, सामूहिकता, सामुदायिकता यांचा अवकाश संकोच पावू लागला. मी, माझे, माझ्यासाठी अशी आत्मकेंद्री वती वाढू लागली. शहरांमध्ये ती वेगाने बोकाळली. ‘We are, therefore, lam’ या धारणेला तडे जाऊ लागले.

‘खाउजा’मुळे आधीच अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतीवर बाजारपेठीय अरिष्ट आले. ग्रामीण भागातील सामाजिक व कौटुंबिक सहजीवनालाही तडे जाऊ लागले. ग्रामीण भागातील लक्षावधी लोकांचे शहरांकडे सक्तीचे स्थलांतर वाढू लागले. शेतीतून बाहेर फेकले गेलेले बहुसंख्य स्त्री-पुरुष शहरात बांधकाम मजूर किंवा बांधकाम कामगार बनले आणि स्थिर कौटुंबिक सहजीवनाऐवजी भटके व अस्थिर आयुष्य त्यांच्या वाट्याला आले.

कृषीक्षेत्रातून शहराकडे होणाऱ्या अशिक्षितांच्या आणि अल्पशिक्षितांच्या सक्तीच्या स्थलांतराबरोबरच ‘खाउजा’मुळे विस्तारणाऱ्या सेवाक्षेत्रातील रोजगारसंधींचा लाभ घेण्यासाठी शहराकडे होणाऱ्या सुशिक्षितांच्या ऐच्छिक स्थलांतरामुळे शहरीकरणाने अफाट वेग घेतला आणि कौटुंबिक सहजीवनाचा परीघ अधिकच आकुंचित झाला. कारण एकाच जीवशास्त्रीय कुटुंबातील व्यक्ती निरनिराळ्या शहरात किंवा देशात कामासाठी स्थायिक व्हायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. वाढत्या व नियोजनशून्य शहरीकरणाने शहरे कितीही बकाल झाली असली, तरी वाढत्या व्यक्तिवादाच्या प्रभावामुळे त्यांच्या प्रचंड अनोळखी गर्दीत जी प्रायव्हसी मिळू लागली, तिचे आकर्षण ग्रामीण युवांमध्येही वाढू लागले. स्पर्धा परीक्षांच्या कोचिंगसाठी लक्षावधी युवा शहरात आले.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

या संपूर्ण वातावरणाचा परिणाम ग्रामीण व शहरी कौटुंबिक सहजीवनावर होणे अपरिहार्य होते. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस वाढीस लागलेल्या व्यक्तिवादी जीवनशैलीला अधिक व्यक्तिकेंद्री बनवणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञानाची पुढल्या तीन दशकांत भर पडत गेली. ऐंशीच्या दशकाअखेरीस समुदायाने मिळून परस्पर सहकार्याने सामाईकपणे वापरण्याच्या ‘टाईम शेअरिंग’ संगणकांचा अस्त सुरू झाला आणि त्याऐवजी पूर्णपणे एकाच व्यक्तीच्या खासगी वापरासाठी बनवण्यात आलेल्या ‘व्यक्तिगत संगणकां’चा जमाना सुरू झाला.

एका दशकानंतर त्यात ‘व्यक्तिगत सेलफोन’ची भर पडली आणि त्यानंतरच्या दशकात त्या सेलफोनची जागा इंटरनेट-रेडी ‘व्यक्तिगत स्मार्टफोन’ने घेतली. पुढल्या दशकात अक्षरश: कोट्यवधी लोकांच्या हातात हे स्मार्टफोन आले. त्यावर उपलब्ध झालेली हजारो अ‍ॅप्स, इंटरनेटवर रोजच्या रोज भूमिती श्रेणीने वाढणारा मल्टीमीडिया स्वरूपातील कंटेंट (माहिती/आशय) आणि आता बहुपरिचित झालेला समाजमाध्यमांचा क्लाउडवरील २४x७ माहोल, यामुळे जगात डिजिटल युगाचा महाप्रवाह अवतरला. व्यक्तिवादाच्या वाढत्या प्रभावाला तंत्रज्ञान आणि मुक्त बाजारपेठ यांनी अधिक चालना दिली. त्या तंत्रज्ञानाचे सर्वसामान्यांना विलक्षण फायदे झाले, हे कोणीही मान्य करेल, पण त्या तंत्रज्ञानाच्या अवाजवी वापरामुळे व्यक्तिकेंद्री व आभासी वास्तवातील जीवनशैलीचा अतिरेक सुरू झाला. हेही नजरेआड करता येणार नाही.

पूर्वी पोस्टमनने घरात टाकलेली पत्रे हा अख्ख्या कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा विषय असायचा. घरी येणाऱ्या वर्तमानपत्राचे सहवाचन ही नित्याचीच बाब असायची. रेडिओ व टेपरेकॉर्डरचेही सहश्रवण, घरी कॅमेरा असलाच तर तो व त्याच्या साहाय्याने काढलेले फोटो, ही वर्षानुवर्षे जपून ठेवण्याची व मधूनमधून अख्ख्या कुटुंबाने आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांनी कौतकाने बघन नॉस्टॅल्जिक होण्याची गोष्ट असायची. लँडलाईनचा फोन (व क्वचित त्यावरील संवादसुद्धा!), तसेच टीव्ही ही तर केवळ कौटुंबिक नव्हे तर जण काही अख्ख्या चाळीची/ वाड्याची किंवा छोट्या सोसायटीचीच मालमत्ता असायची!

घरी आणलेली पुस्तके व नियतकालिकांचेही तेच. सिनेमा, नाटक किंवा गाण्याची मैफल ही तर कुटुंब किंवा मित्र-मंडळींनी सहआनंद घेण्याची पर्वणी. मनीऑर्डरचे पैसे स्वीकारणे किंवा बँकेतून पैसे काढून आणणे, हे तर घरातच नव्हे, तर वाड्यातही सर्वज्ञात. कौटुंबिक व सामुदायिक सहजीवनात रंग भरण्यासाठी निमित्त ठरणाऱ्या, कटूगोड प्रसंगांनी नातेसंबंधांची वीण घट्ट करणाऱ्या, परस्पर ओळख, समज, सहकार्य व सहभाव वाढवण्याची संधी देणाऱ्या या आणि अशा कितीतरी वरकरणी साध्या वाटणाऱ्या गोष्टी आता स्मार्टफोननामक बहुगुणी यंत्राने पूर्णपणे खासगी/व्यक्तिगत, अतिजलद व सोयीस्कर पण म्हणूनच कदाचित निरस करून टाकल्या आहेत, असे वाटते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

पूर्वी परस्परांच्या प्रत्यक्ष भेटीत (अर्थात सिंक्रोनस मोडमध्ये) संवाद घडायचे. आता त्यांची जागा ज्याला त्याला वेळ आणि मूड असेल तेव्हा मिळणाऱ्या सिंक्रोनस प्रतिसादांनी घेतली आणि त्यातला जिवंतपणाच हरपला. आता तर सिंक्रोनस प्रतिसाद हीच जणू संवादाची एकमेव शिष्टसंमत पद्धत आहे, असा समज दृढ झाला आहे. त्यामुळे एकमेकांसमोर बसलेल्या व्यक्तीही परस्परांशी व दूरस्थ असलेल्या इतरांशी सर्रास व्हॉट्सअ‍ॅपवर मूक चॅट करताना दिसतात आणि त्यात त्यांना काहीच अनैसर्गिक वाटत नाही! यात एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या युगुलांचाही समावेश आहे!! कालाय तस्मै नमः!!!

परस्परांच्या भावभावनांविषयी संवेदनशील असणे, परस्परांना समजून घेणे, त्यांच्याशी मनापासून जुळवून घेणे, तडजोड करणे, परस्परांना खास वेळ देणे, परस्परांचा वेळ हक्काने मागणे, परस्परांचे सहकार्य/सहभाग गृहीत धरणे, इतरांच्या आनंदासाठी त्याग करणे, त्यांची काळजी घेणे किंवा करणे, मन मोकळे करणे, ‘सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती दु:खे डोळा पाणी’ अशा बोरकरी अनुभूतीने सहज जगणे, या कौटुंबिक जीवनात अध्याहृत गोष्टी दिवसेंदिवस दुरापास्त होत चालल्या आहेत. ज्यांच्याशी सर्व काही शेअर करता येईल, असे ते चार जिवाभावाचे मित्र/मैत्रिणी आणि ती मैत्रीही दुर्मीळ होत आहे. कौटुंबिक आणि मैत्रीमधील सहजीवनाचा डिजिटल युगातला संकोच कधीकधी विषण्ण करणारा आहे.

परस्परसंवाद, गप्पा, चेष्टा-मस्करी, टाईमपास, रुसवे-फुगवे, सुखदुःखाच्या गोष्टी, परिसरातल्या लोकांचे एकमेकांच्या घरी जाणेयेणे, अशा घरी आलेल्या लोकांशी कुटुंबातील सर्वांनी मिळून संवाद साधणे, कुटुंबातील व्यक्तींमधील माहितीचे/भावनांचे निआदान-प्रदान, एकत्र येऊन उपयुक्त आणि अर्थपूर्ण काम नवीन गोष्टी शिकणे-शिकवणे, मनोरजन, समरसून अनुभवी मनमोकळेपणाने व्यक्त होणे, अशा दैनंदिन जीवनातल्या किती गोष्टींमधला कौटुंबिक संदर्भ नष्ट होत आहे.

इंटरनेट आणि सार फोनमुळे अवतरलेल्या डिजिटल युगात आणि क्लाउडच्या जगात किंवा आभासी ढगात आता त्या गोष्टी पार व्यक्तिगत होत आहेत. कुटुंबातील इतरांचा त्या गोष्टींमधला सहभाग अनावश्यकच नव्हे, तर अडचणीचा वाटू लागला आहे. प्रत्येक जण दिवसातला बराच काळ आपापल्या स्मार्ट फोनवरचे आभासी जगातले क्षणभंगुर अनुभव घेण्यात व्यस्त, ग्रस्त किंवा क्वचित मस्त आहे. तो आणि त्याच्या भोवतीचा समाज वयाचे भान विसरून ‘टीनएजर’ आणि ‘स्क्रीनएजर’ होत आहे. त्याचे कुटुंब-विरहित असे स्मार्ट फोनच्या स्क्रीनवरचे वेगळे विश्वच तयार झाले आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

एकेकाळी विभक्त कुटुंबे जन्माला आली, आता विभक्त व्यक्तीचा उदय होत आहे. आपण आत्ता ज्या स्थानी आहोत, तिथे नसावे आणि ज्या स्थानी या क्षणी असू शकत नाही, तिथे असायलाच पाहिजे, ही आर्त इच्छा सर्वांना ग्रासते आहे. घरात आजारी आईशी चार प्रेमाचे शब्द बोलण्याऐवजी आणि तिला आश्वासक स्पर्शाचा आधार देण्याऐवजी दूर आफ्रिकेतील कुपोषित मुलांच्या समाजमाध्यमातील केविलवाण्या प्रतिमेवर ‘कोरडी इमोजी दया’ तत्क्षणी व्यक्त करून पुढच्या क्षणी पुढच्या (बहुधा विनोदी) पोस्टवर जाणे, हे संवेदनशीलतेचे समाजमान्य लक्षण ठरत आहे.

वर सांगितलेल्या दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या गोष्टींमधील हरवलेल्या कौटुंबिक सहभागाची आणि सहभावाची जागा तितक्याच प्रभावीपणे घेऊ शकतील, परस्परसंबंधातील ओलावा आणि ऊब टिकवू शकतील, वाढवू शकतील, असे नवे अवकाश मात्र निर्माण होताना दिसत नाहीत. त्यामुळे सहजीवनाचा संकोच होऊन माणसे यंत्रवत व एकाकी होत आहेत.

डिजिटल युगामुळे अर्थातच काही स्वागतार्ह बदलही होत आहेत. अनेक शहरांत किंवा देशांत कामानिमित्त गेलेल्या किंवा स्थायिक झालेल्या एकाच कुटुंबातील व्यक्तींना एकमेकांशी सहज संपर्क आणि संवाद साधता येत आहे. ते सतत एकमेकांशी जोडलेले असतात. याला डिजिटल विश्वात ‘रिमोट टुगेदरनेस’ (दूरस्थ एकोपा) असे संबोधले जाते. तसेच सामान्यत: सर्वांना व विशेषत: स्त्रियांना दुर्मीळ असे व्यक्तिस्वातंत्र्य, खासगीपण व स्वत:साठी हक्काचा वेळ अधिक मिळत आहे; माहितीच्या सर्वदूर उपलब्धतेमुळे निवड कशाची करावी, निर्णय काय घ्यावा, याबाबत स्त्रिया व मुलांनादेखील वाढता वाव मिळत आहे; बाह्य जगाशी संपर्काची व्यापक संधी मिळणाऱ्या पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आली असून, तुलनेने अधिक काळ घरात व्यतीत करणाऱ्या स्त्रिया व मुलांनादेखील निवडीचे आणि निर्णयाचे तसेच व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे.

असे असले तरी दुसरीकडे मात्र कुटुंबातील व परिसर किंवा स्थानिक समुदायातील इतरांना आपल्यासाठी वेळ नसल्याची, आपल्याला महत्त्व नसल्याची भावना. कोरडेपणा, नैराश्य, वैफल्य, इ. अनिष्ट परिणामही पुरुष, स्त्रिया व मले यांच्यावर वाढत्या प्रमाणात हात आहेत. तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या खोलवरच्या प्रभावामुळे व दबावामुळे कुटुंबातील व्यक्तींमधील परस्परसंबंधांचे, संवादांचे संकेत बदलत आहेत. आता घरात समोर असलेल्या व्यक्तीला हाक मारली, तर प्रतिसाद येईलच, याची खात्री नाही. कारण ती शरीराने समोर असली, तरी मनाने स्मार्टफोनवरील तिच्या आवडत्या ‘दूरदेशी’ असू शकते!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या आणि अशा तंत्रज्ञानामुळे डिजिटल युगातील सहजीवनात मूलभूत बदल होत आहेत. ‘सुखी कुटुंब’ किंवा फार तर ‘सुखी कुटुंबातील व्यक्ती’ या उद्दिष्टाकडून ‘कुटुंबातील सुखी व्यक्ती’ अशा व्यक्तिकेंद्री उद्दिष्टाकडे आपला प्रवास वेगाने होत आहे. व्यक्तीची कुटुंबाच्या वैशिष्ट्यपूर्ण संदर्भातील ओळख पुसट होत आहे. कुटुंबाची म्हणून असणारी संस्कृती, संस्कार, मूल्ये नामशेष होत आहेत. कुटुंब या घटकाचा झपाट्याने ऱ्हास होत आहे, कारण त्याची उपयुक्तता व अर्थपूर्णता घटत आहे. कुटुंबाने एकत्र राहण्यातला भावनिक आशय लोप पावत असून, केवळ भौतिक किंवा ऐहिक गरज त्याची जागा व्यापत आहे. प्रेमळ सहवास देणाऱ्या ‘होम’चे सहअस्तित्वाची जबरदस्ती असलेल्या ‘हाऊस’मध्ये क्षुल्लकीकरण होत आहे.

डिजिटल युगाने आता ‘शेअरिंग’चे बाह्य पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, पण कुटुंबात मिळणारे ‘केअरिंग’ बाहेर कसे मिळणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. कुटुंबातील चार जणांची तोंडे त्यांच्या त्यांच्या स्मार्ट फोनवरील चार भिन्न जगांच्या चार दिशांना असतील, तर कुटुंबाच्या सांस्कृतिक ओळखीच्या केवळ बाह्य आणि तकलादू आवरणाखालची परस्पर-असंबद्ध या अर्थाने ‘स्व-तंत्र’ व्यक्तिमत्त्वे ही त्यांची नवी ओळख आहे. अर्थात, त्यामुळे कुटुंबातील प्रस्थापित पितृ अथवा मातृसत्ता लोप पावत असून, तेथे या ‘स्व-तंत्र’ व्यक्तिमत्त्वांची ‘मिली-जुली’ सत्ता तयार होत आहे, हे मात्र कुटुंबाच्या लोकशाहीकरणासाठी उपयुक्तच आहे. कुटुंब प्रमुखाची ‘मेलडी’ अस्त पावत आहे, पण कुटुंबियांच्या ‘हार्मनी’चा उदय अजून दृष्टिपथात यायचा आहे!

तसेच आता नातेसंबंधांमध्ये नव्या ‘निवडीच्या स्वातंत्र्या’चा आविष्कार रूढ होत आहे. आपल्या सोयीच्या निवडक वेळेला, निवडक व्यक्तीविषयी, तिच्या निवडक बाबींविषयी, निवडक वेळेपुरते प्रेम जागृत किंवा व्यक्त करायचे! व्यक्ती घरात व कुटुंबात जो वेळ व्यतीत करते, तेव्हा ती नक्की काय करते, हे कुटुंबातील इतरांना कळेनासे झाले आहे. व्यक्तींचे खासगी आयुष्य दुभंगते आहे. व्यक्तीचे खासगी जीवन आणि तिचे कौटुंबिक खासगी जीवन, या दोन भिन्न वास्तवता आता साकारत आहेत. त्यामुळे परस्परविश्वासाची जागा अविश्वासाने घेतली आहे. कुटुंबातील व्यक्ती परस्परांचे चारित्र्यपरीक्षण आता समाजमाध्यमांच्या साहाय्याने करत आहेत. कुटुंबाची एकात्मता आणि अखंडता कशी राखायची, हा चिंतेचा विषय बनत आहे.

डिजिटल युगाच्या झंझावातात यावर दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी कुटुंब किंवा सुखी कौटुंबिक सहजीवनाचा पाया कशात आहे, हे नेमके शोधून तो बळकट करण्याची नितांत आवश्यकता आहे. विविध संस्कृती, देश-प्रदेश, वंश, धर्म, पंथ, जाती, व्यवसाय यामध्ये कुटुंब या नातेसंबंधांचा आशय जरी बराचसा सारखा असला, तरी त्याचा आविष्कार नानाविध रूपात झालेला दिसतो. विभक्त कुटुंब हे कुटुंबाच्या विविध समाजमान्य अशा बहुविध रूपांपैकी केवळ एक रूप आहे. एकमेव नव्हे, पण इतिहासात कुटुंबाचे स्वरूप हे कुठल्या स्वरूपाला समाजमान्यता आहे, यावरून ठरते असे दिसत नाही, तर तो समाज उपजीविकेचे, रोजगाराचे, कामाचे, निर्मितीचे किंवा सर्जनशील अभिव्यक्तींचे कुठल्या प्रकारचे आकृतिबंध स्वीकारतो किंवा त्याला स्वीकारावे लागतात आणि त्यासाठी तो कुठली तंत्रे किंवा तंत्रज्ञाने स्वीकारतो, यावरून ठरताना दिसते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

ऑल्विन टॉफ्लर यांनी आपल्या ‘दि थर्ड वेव्ह’ या ग्रंथात अनेक ऐतिहासिक संदर्भातून हे दाखवून दिले आहे की, सामाजिक संवादांचे आकृतिबंध, स्त्रियांचे समाजातील स्थान व त्यांनी मिळवलेले स्वातंत्र्य, मूल्यव्यवस्था, युद्धे, पूर, दुष्काळ, महासाथी, इ.मुळे ओढवलेले लोकसंख्येतील चढ-उतार, धार्मिक परिवर्तने, पर्यावरणीय बदल, इ. अनेक कारणांनी जरी कुटुंबाचे ढाचे बदलत गेले असले, तरी त्यांचे स्वरूप निश्चित करण्यात ‘कामाचे स्वरूप/आकृतिबंध’ हा सर्वांत प्रभावी घटक आहे. एकत्र कुटुंब ते विभक्त कुटुंब हा प्रवास समाज कृषिप्रधान सभ्यतेकडून उद्योगप्रधान सभ्यतेमध्ये संक्रमित झाल्याचा परिपाक आहे. आजही दोहोंना समाजमान्यता आहे, पण पहिला लोप पावत आहे आणि दुसरा अजून कसाबसा टिकून आहे.

कामाच्या ठिकाणांचा व कामाच्या स्वरूपाचा आदिम काळापासून आधुनिक काळापर्यंतचा इतिहासक्रम दाखवणारे ‘एफ’ हे आद्याक्षर असलेले इंग्रजी शब्द पाहूया - Forest, Farm, Fishery, Fairground, Forces, Field, Foundry, Firm, Factory, Fleets, Facility, Flat, Freelancing Portals, (योगायोग असा की, एका अर्थाने ‘बिनकामा’च्या जागेच्या शब्दाचे आद्याक्षरही F, F for Facebook!!) जंगल, शेत/शिवार, मासेमारी, व्यापार-विनिमय-खरेदी-विक्रीच्या जत्रांची मैदाने, सैन्य, युद्धक्षेत्र/खाणक्षेत्र/कार्यक्षेत्र, धातूकामाचे वर्कशॉप, कंपनी, कारखाना, व्यापारी किंवा व्यावसायिक वाहने / जहाजे/विमाने यांचे तांडे, कार्यालये, इस्पितळे, संशोधनसंस्था, उपहारगृहे, शाळा, दुकाने, विमानतळ, बँका, इ. नानाविध सेवाक्षेत्रातील कामाच्या जागा (facilities), घर (flat) आणि घरबसल्या कार्यालयाचे काम (वर्क फ्रॉम होम) किंवा घरबसल्या कमाई करण्यासाठी ऑनलाईन फ्रीलान्सिंग पोर्टल्स. यापैकी काही व विशेषतः शेवटची दोन डिजिटल युगातील सुखी आणि समंजस अशा कौटुंबिक सहजीवनाला सहाय्यभूत ठरू शकतात.

या कामांच्या जागा व स्वरूपे यातील संक्रमणानुसार कुटुंबाचे केवळ ढाचेच बदलले असे नाही, तर कौटुंबिक सहजीवनाचे स्वरूपही बदलले; पण कुटुंबाचा पाया मात्र एका घरात एकत्र राहण्यात नसून जगण्यासाठी, जीवनाच्या अर्थपूर्णतेसाठी एका ठिकाणी एकत्र काम करण्यात, निर्मिती करण्यात आहे, ही गोष्ट इतिहासक्रमात निरपवादपणे टिकून राहिलेली आहे. ‘को-लिव्हिंग’ हा सहजीवनाचा पाया नसून ‘को-वर्किंग’ किंवा ‘को-क्रिएटिंग’ हा पाया आहे. ‘को-वर्किंग’ या साध्याचे ‘को-लिव्हिंग’ हे साधन आहे.

सहवास किंवा सहअस्तित्वातून केवळ शारीरिक व मानसिक गरजांची परिपूर्ती करणारी व्यवस्था, अशी कुटुंबाची आदर्शवादी स्थिती किंवा संकल्पना केवळ काल्पनिक आहे. ती फार काळ टिकू शकत नाही. बाह्यतः जरी अशी कुटुंबे टिकून असल्याचे दिसले, तरी त्यातील सहजीवन शुष्क, निरस आणि निर्जीव होत जाते. नात्यांमधल्या रसरशीतपणाचा अभाव व अर्थातच त्यात वाढत जाणारा थंडपणा हाच त्यांचा स्थायीभाव बनतो. केवळ सहवास, साथसंगत, मानसिक आधार, केअरिंग-शेअरिंग, प्रेम, प्रणयरम्यता (romance), लैंगिक समागम, संततिप्राप्ती यावर आधारलेले भावनिक एकक (इमोशनल युनिट) म्हणून उभे राहिलेले कुटुंब, खऱ्या अर्थाने दीर्घकालीन सुखी सहजीवनाची हमी देऊ शकत नाही.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

या सर्व भावनिक आशयांसह ते एक सहनिर्मिती करणाऱ्या लोकांचे आर्थिक एककही (इकॉनोमिक युनिटही) असावे लागते. डिजिटल युगापूर्वी अस्तित्वात आलेल्या उद्योगप्रधान समाजातले उत्पादक काम शेतावरून कारखान्यात व कार्यालयात जसे हलले, तसे कुटुंबाचे को-वर्किग थांबले आणि त्यात ताण-तणाव वाढायला सुरुवात झाली. घटस्फोटांचे प्रमाण कमालीचे वाढले. यावरून या लेखाच्या सुरुवातीला वर्णन केल्याप्रमाणे डिजिटल युगात पारंपरिक कौटुंबिक सहजीवन का भंग पावत आहे, हे लक्षात येईल.

त्याचबरोबर घरी असतानाही अनेकांना फोन किंवा समाजमाध्यमांद्वारे कार्यालयातील (इकॉनॉमिक यनिटमधील) सहकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहावेसे का वाटते, कार्यालयात किंवा कार्यालयीन वेळेनंतरही त्यांच्याबरोबर अधिक काळ व्यतीत करावेसे का वाटते, त्यांच्याविषयी भावनिक जवळीक का वाढते, ‘ऑफिस-स्पाउज’सारख्या संकल्पना का निर्माण होतात, हेही लक्षात येईल. ‘को-वर्किंग’साठी ‘को-लिव्हिंग’कडे प्रवास का होतो, हे दिसेल.

कृषक समाज हा ‘को-वर्किंग’च्या भक्कम पायावर आजही उभा आहे, पण त्यात कष्टप्रद कामातल्या सहकार्यावरील भर केंद्रस्थानी असल्याने विशेषतः स्त्रियांना मानसिक आधार, संवेदनशीलता, स्वातंत्र्य, खासगीपण, प्रणयरम्यता, इ. अभावाने मिळाले. त्यामुळे त्या समाजातल्या नवरा-बायकोच्या नातेसंबंधांमध्ये परस्परप्रेमाचा अंश कमी राहिला. उद्योगप्रधान व सेवाप्रधान समाजाला तर ‘को-वर्किंग’ शक्य नसल्याने नातेसंबंध आणि सहजीवन खुरटण्याच्या दुष्टचक्रातून सुटका नव्हती. कारण कारखाना किंवा कार्यालय घरात आणता येत नव्हते. पती-पत्नी जणू दोन भिन्न ग्रहांवर राहत होते! त्यांची कामे, त्यांचे भावविश्व, विचारविश्व पूर्णपणे भिन्न. पैसे मिळवण्याची मक्तेदारी पुरुषांची आणि स्त्रियांच्या घरकामाला औपचारिक कामाचा दर्जा व प्रतिष्ठा नाही. त्यामुळे त्यांना दुय्यम स्थान. स्त्रियांना स्वातंत्र्य आणि विकासाच्या संधींचा अभाव. त्यांच्याकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याची सर्वदूर आढळणारी विकृत मनोवृत्ती. त्यांना ‘इक्वल पार्टनर’चे स्थान द्यायला सर्वत्र नकार. पण आता एकीकडे अधिकाधिक कार्यालयीन काम घरून करता येईल आणि हळूहळू कारखान्यातील माणसांचे काम रोबोंकडे हस्तांतरित होत जाईल, पुरुषमाणसेही सेवा क्षेत्रातील कामांकडे अधिकाधिक वळू लागतील आणि त्यातील बरीचशी कामेही ‘दूरस्थ’ किंवा ‘घरस्थ’ होऊ लागतील!

डिजिटल युगात माहिती व ज्ञानप्रधान व्यवस्थेमधील, तसेच कल्पकता व नवोन्मेषप्रधान व्यवस्थेमधील सेवाक्षेत्रात, कुटुंबातील व्यक्तींना येत्या काळात अधिकाधिक काम, शहरापासून दूरवरच्या व प्रदूषणमुक्त शिवारवस्तीतील घरात आणि घरून करणे शक्य होणार आहे. संगणक, इंटरनेट, थ्रीडी प्रिंटींग, यांच्या साहाय्याने या शक्यता विस्तारणार आहेत. सेवाक्षेत्रातील या ऑनलाईन फ्रीलान्सिंग स्वरूपाच्या कामाच्या जोडीने ते घरालगतच्या शेतातही काम करू शकतील. ‘Decent, Delightful and Dignified work in low carbon world’ असे या कामाचे नवे स्वरूप तयार होण्याच्या शक्यता वाढतील.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

कदाचित एका ‘ग्रीनएजर’ समाजाची ही सुरुवात असेल. त्यामुळे स्त्रियांनाही औपचारिक क्षेत्रातील बौद्धिक स्वरूपाच्या उत्पादक आणि सर्जनशील कामाच्या समान संधी बहुधा घरबसल्या मिळू शकतील. नवऱ्यांना असे काम त्यांच्या बायकांबरोवर परस्पर सहकार्याने करण्याच्या नव्या संहिता शोधाव्या लागतील. सहवासाचा उपयोग करून एकमेकांच्या कामात ती दोघे सर्जनशील सहभाग घेऊ शकतील. त्यांची मुलेही त्यात काही प्रमाणात सहभागी होऊ शकतील. ‘लिव्हिंग’ आणि ‘वर्किंग’ भिन्न जागी असल्यामुळे मुलांना औपचारिक काम काय असते, याचा आज अजिबात न होणारा परिचय घरीच होऊ शकेल व पुढे बेकारीपासून बचाव करता येईल.

स्त्री-पुरुष परस्परांत अधिकाधिक गुंतागुंतीच्या बौद्धिक देवाण-घेवाणीत रमू शकतील. त्यातून त्यांच्यातील परस्परांविषयीची संवेदनशीलता वाढेल. भावनिक जवळीकही वाढेल. घरात व्यतीत होणाऱ्या परस्परांच्या वेळेची पारदर्शकता वाढेल व विश्वासाचे वातावरण तयार होऊ शकेल. सहनिर्मितीत रममाण झाल्यामुळे त्यांची सुख-दु:खे एकरूप होतील, म्हणजेच विशिष्ट वेळी ते दोघेही एक तर समसुखी किंवा समदुःखी असतील! एकाच दिवशी नवऱ्याच्या कंपनीने त्याला कामावरून कमी केले आहे, पण बायकोच्या कंपनीने तिला बढती दिली आहे, अशी विसंगती संभवणार नाही. त्यांच्या संबंधातील ताण-तणाव कमी होण्यास मदत होईल. जीवनातील अर्थपूर्णतेचा त्यांना सातत्याने सहप्रत्यय येण्यास मदत होईल. आणि सहजीवनाला तडा घालवू पाहणारे डिजिटल तंत्रज्ञान सहजीवनातल्या सहनिर्मितीचा आनंद व समाधान निर्माण करण्याचे साधन बनू शकेल.

ज्या कुटुंबांना हे जमणार नाही, त्यांना सुखी सहजीवनासाठी सहनिर्मितीचे इतर आयाम शोधावे लागतील. सहजीवनातील विसंवाद डिजिटल तंत्रज्ञानामुळे नसून ‘को-वर्किंग’विरहित ‘को-लिव्हिंग’मुळे आहे, हे समजून घेऊन स्वत:त दुरुस्ती करावी लागेल. घराघरांतील स्त्री-पुरुषांमधील कामाची नव्याने विभागणी करावी लागेल आणि स्त्रियांना केवळ शारीरिक व मानसिक गरजा भागवणारे यंत्र म्हणून न वागवता उत्पादक व सर्जनशील कामातील भावनिक, बौद्धिक व क्रिएटिव्ह भागीदाराची प्रतिष्ठा द्यावी लागेल.

...असा सहवास, सहप्रवास, सहभाव, सहअध्ययन, सहविचार, सहकार्य, सहनिर्मिती, सहअनुभव, सहअनुभूती, सहआनंद, समप्रतिष्ठा यातून फुलते, तेच खरे सहजीवन, सुसह्य जीवन आणि सर्वांना हवेहवेसे वाटणारे ‘सही’ जीवन!

‘उद्याचा मराठवाडा’ दिवाळी २०२२मधून साभार

............................

‘उद्याचा मराठवाडा’ – अतिथी संपादक – प्रवीण बर्दापूरकर

पाने – २१६

मूल्य – २०० रुपये

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......