स्वत:च्या हक्कासाठी आता प्रत्येकीनं बोलतं होण्याची गरज आहे!
अर्धेजग - कळीचे प्रश्न
राखी राजपूत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 25 March 2022
  • अर्धेजग कळीचे प्रश्न स्त्री-स्वातंत्र्य Women's Liberty स्त्री-मुक्ती Stree Mukti पुरुषसत्ता Masculinity

‘मर्द ने औरत के साथ अभी तक सोना ही सिखा हैं, जागना नहीं...’ हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांचं वाक्य. ते जेव्हा जेव्हा वाचनात येतं, तेव्हा तेव्हा ते कालातीत आहे, असंच वाटतं. कारण काळ बदलला असला तरी समाजाची बाईकडे बघण्याची दृष्टी मात्र बदलू शकलेली नाही. गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या विषयांवर काम करण्याची वेळ आली, तेव्हा याचा पुन्हा पुन्हा पडताळा जास्त आला. खरं तर माझा स्त्रीवादी विचारांचा पिंड नाही, कधीच नव्हता. पण आपल्या समाजात बाईला मिळणारी विरोधाभासी वागणूक ज्या वेळी समोर येत गेली, तेव्हा आपोआप स्त्रीवादी लिखाण घडत गेलं. त्यातही नुकताच स्त्रीत्वाचा अर्थ कळू लागलेल्या वयात गौरी देशपांडे, अमृता प्रीतम, नीरजा, तस्लिमा नासरीन, इस्मत चुगताई अशा विद्रोही, बंडखोर लेखिकांचं साहित्य वाचण्यात आल्यानं एका वेगळ्या स्त्रीवादी विचारधारेनं मनात घर केलं.

त्यातून या लेखिकांच्या साहित्यातील नायिका जगत असलेल्या आयुष्यापेक्षा वास्तवातल्या माझ्या आजूबाजूचं, खरं तर सगळ्याच बायांचं आयुष्य किती वेगळं आहे, हे जाणवायला लागलं. अर्थात विद्रोह, बंडखोरी सगळ्यांनाच बायांना जमते असं नाही. किंवा तिच्या या विद्रोही भूमिकेकडे तितकं लक्ष दिलं जातं, असंही नाही. त्यामुळे त्या गप्प राहणं अधिक पसंत करतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका लेखावर अनेक बायांनी फोन करून आपली प्रतिक्रिया दिली. त्या सगळ्याच मनातलं सांगण्यासाठी आसुसलेल्या, आयुष्याच्या कोणत्यातरी वळणावर स्वतःचं मन मारून जगलेल्या अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन वागणाऱ्या होत्या. त्यातल्या अनेकींना बोलण्यासाठी शब्द सुचत नव्हते, त्यामुळे त्यांची घुसमट त्यांच्या मौनातूनच कळत होती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

किती गृहीत धरतो आपण आपल्या आजूबाजूच्या सगळ्या बायांना. आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी, बायको, मुलगी... नात्यांची लेबलं बदलली तरी गृहीत धरणं बदललेलं नाही. तिने सगळ्यांना सांभाळावं, समजून घ्यावं, नवऱ्याचं ऑफिस, मुलांची शाळा, घरातली कामं... सगळं तिच्यावर टाकून घरातले पुरुष निवांत होतात! आपल्या सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं बाईवर टाकून बाहेरच्या जगात मोकळेपणानं वावरण्याची पुरुषांची ही सवय नवीन नाही. अमृता प्रीतम यांचं ‘स्त्रियां उतारी गई सिर्फ कागज़ और केनवास पर, नहीं उतारी गई तो बस रूह में...’ हे वाक्य किती खरं आहे!  

आजच्या काळात शहरी-निमशहरी भागात नवरा-बायको दोघं नोकरी करतात. दिवसभर ऑफिसमध्ये दोघांनाही तितकीच मेहनत करावी लागते. तरीही संध्याकाळी घराकडे परतताना फक्त बायांच्या डोक्यातच मुलांचा अभ्यास, रात्रीचा स्वयंपाक, वाण सामानाची यादी, अशा कितीतरी गोष्टी असतात. पुरुषांकडून घराचा रस्ता धरला जातो, तो फक्त आराम करण्यासाठीच.

घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये पुरुषांचा वाटा कितीसा असतो? एखाद्या दिवशी हौस म्हणून नवीन पदार्थ बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जाणाऱ्या पुरुषांची संख्या खूप असली, तरी रोज जबाबदारी म्हणून ऑफिसमधून आल्यावर स्वयंपाक घराकडे वळणारे किती पुरुष असतील! याउलट ‘आज भाजीत मीठ जास्त झालं’, म्हणत जेवताना चिडचिड करून दिवसभराचा ‘शिणवटा’ तिच्यावर काढणारेच अनेक भेटतील. अगदी मुलांच्या अभ्यासाची, त्यांना शिस्त लावण्याची जबाबदारीही बाईचीच समजली जाते. मूल वाया गेलं तर त्याचा दोष वडिलांना दिला जातो का? उलट मुलांवर संस्कार करण्यात आई कमी पडली, असेच बोल लावले जातात. पुरुष फक्त मुलांच्या प्रगती पुस्तकावर सही करून त्यांच्या संगोपनाच्या जबाबदारीपासून पळ काढताना दिसतात.

सगळेच पुरुष सारखे असतात, असं मी मुळीच म्हणणार नाही. पण जे पुरुष समाजानं आखून दिलेली पुरुषार्थाची चौकट मोडून घरातल्या कामांत लक्ष घालतात, त्यांचं ‘बायकोच्या ताटा खालचे मांजर’, ‘बैलोबा’ असे टोमणे मारून खच्चीकरण केलं जातं. बाई ही पुरुषाची संपत्ती असते, ज्यावर फक्त हक्क गाजवायचा असतो, असे संस्कार लहानपणापासूनच प्रत्येक पुरुषावर होतात, तेव्हा अमृता म्हणते तसं बाई फक्त कागदावर उतवण्यापुरतीच उरते. तिने हट्ट करावा तो दागिने, कपडेलत्ते, गाडी-बंगला वगैरेंसाठी. अगदी तिने वेगळी चूल मांडली तरी चालवून घेतलं जातं. पण त्याव्यतिरिक्त माणूस म्हणून तिने मागितलेलं स्वातंत्र्य, स्वत:च्या सुखाचा केलेला वेगळा विचार आजही समाजाकडून कधीच मान्य केला जात नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

यासाठी फक्त पुरुषी व्यवस्थेला दोष देऊन चालणार नाही. या सर्व परिस्थितीला स्वत: स्त्रियाही तितक्याच जबाबदार असतात. घर-संसारात पडती बाजू बाईनेच घ्यावी, स्वत:च्या भावनांना मुरड घालून त्यागमूर्ती बनण्यासाठीच बाईच्या जातीचा जन्म असतो, हे सर्व बाळकडू आपल्या आजीपासून आपल्याला मिळतं. त्यामुळे आपल्या आई-आजीने केलेल्या गोष्टींचं अनुकरण केलं जातं. तडजोड करत कमीपणा घेणं, हे बाईला आपलंच कर्तव्य वाटायला लागतं. एखादीनं चुकून या परिस्थितीविरोधात बंड पुकारलंच, तर तिच्यावर बहिष्कार टाकला जातो, तिच्या कुलीनतेवर प्रश्न उपस्थित केला जातो.

या परिस्थितीला अनुसरून मंटो यांनी त्यांच्या एका कथेत सुंदर लिहिलं आहे. ते म्हणतात, ‘‘सोसाइटी के उसूलों के मुताबिक़ मर्द मर्द रहता हैं, ख़ाह उस की किताब-ए-जिंदगी के हर वर्क पर गुनाहों की स्याही लिपि हो। मगर वो औरत जो सिर्फ एक मर्तबा जवानी के बेपनाह जज़बे के ज़ेर-ए-असर या किसी लालच में आकर, या किसी मर्द की ज़बरदस्ती का शिकार हो कर, एक लम्हे के लिए अपने रास्ते से हट जाये, औरत नहीं रहती। उसे हक़ारत-ओ-नफ़रत की निगाहों से देखा जाता हैं। सोसाइटी उस पर वो तमाम दरवाज़े बंद कर देती है जो एक स्याह पेशा मर्द के लिए खुले रहते हैं।’’

अशी अनेक उदाहरणं देता येतील. समाजानं बनवलेल्या चौकटी ओेलांडण्याचं धारिष्ट्य स्वत: बायाही करत नाहीत. पण जोवर त्यांना स्वत:ला या बंधनातून मुक्त होता येणार नाही, तोवर समाजाकडूनही त्यांच्या माणूस म्हणून जगण्याच्या हक्काचा गांभीर्यानं विचार केला जाणार नाही. त्यामुळे स्वत:च्या हक्कासाठी आता प्रत्येकीनं बोलतं होण्याची गरज आहे.  

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

शेवटी शरद कोकस यांच्या कवितेतील काही ओळी आवर्जून नमूद कराव्याशा वाटतात...

खेल में थी दो पर्चियाँ,

एक में लिखा था ‘कहो’,

एक में लिखा था ‘सुनो’।

अब यह नियति थी, या महज़ संयोग?

उसके हाथ लगती रही वही पर्ची

जिस पर लिखा था ‘सुनो’।

 

वह सुनती रही...

उसने सुने आदेश,

उसने सुने उपदेश,

बन्दिशें उसके लिए थीं।

उसके लिए थीं वर्जनाएँ,

वहा से निकली चीख,

कि जानती थी,

‘कहना-सुनना’ नहीं हैं केवल क्रियाएं।

 

घुटती रही उसकी फरियाद,

अटके रहे शब्द,

सिले रहे होंठ,

रुन्धा रहा गला।

उसके हाथ कभी नहीं लगी वह पर्ची,

जिस पर लिखा था, ‘कहो’।

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......