टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अनुपम खेर, जुन्या नोटा, गॅस सिलेंडर, डोनाल्ड ट्रम्प आणि एटीएम
  • Thu , 02 March 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अनुपम खेर Anupam Kher जुन्या नोटा Old notes गॅस सिलेंडर Gas Cylinder डोनाल्ड ट्रम्प Donald Trump एटीएम ATM

१. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आणि गुरमेहेर कौरची सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवरून सुरू झालेल्या वादात आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी उडी घेतली आहे. ‘असहिष्णुतांची टोळी परत आली आहे. त्यांच्या घोषणा वेगळ्या असल्या तरी चेहरे मात्र तेच आहेत,’ असे अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अरे, अनुपम अंकल आले, टाळ्या वाजवा! किती मिस करत होते सगळे अंकलना! मुलांनो, शांत बसा. अनुपम अंकल आता सगळ्यांना द्वेषभक्ती… सॉरी, देशभक्ती शिकवतील. त्यांनी आरशात पाहूनच ट्वीट केलेलं दिसतंय. असहिष्णू टोळीचे डॉन डॉ. डेंग यांचं स्वागत असो. हेल अनुपम!!!

…………………………………………………………………………

२. चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाळगणाऱ्यांवर आता दंड आकारला जाणार आहे. पाचशे आणि हजाराच्या १० पेक्षा जास्त नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचा कायदा केंद्र सरकारने मंजूर केला आहे. या नव्या नियमानुसार दोषींवर किमान १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. रद्द करण्यात आलेल्या नोटांच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था चालवली जाऊ नये, यासाठी संसदेने हा कायदा पारित केला आहे.

या सरकारचं आणि त्याची बटीक झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या एकंदर धोरणकोलांट्या अदभुत आहेत. यांनी दिलेल्या मुदतीत नोटा भरणाऱ्यांना संशयाच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा एक प्रयोग करून पाहिला. ३१ डिसेंबरनंतर ३१ मार्चपर्यंत विशिष्ट कागदपत्रांची पूर्तता करून, सबळ पुरावा देऊन या नोटा भरता येतील, असं सांगणाऱ्या रिझर्व्ह बँकेने आता 'वरून आदेश आल्या'मुळे या नोटा, कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही स्वीकारायला नकार दिला आहे. जो मुळात बेकायदा आहे. त्यानंतर हे त्या नोटा बाळगणाऱ्यांवरही दंड लावणार? यांना सर्वोच्च न्यायालयाकडून गालगुच्चाची गरज आहे.

…………………………………………………………………………

३. काही बँकांनी एक मार्चपासून नवीन नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी काही खासगी बँकांकडून बचत खात्यांमधून होणाऱ्या रोकड व्यवहारांवर शुल्क आकारण्यात येणार आहे. सध्या खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकेने नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांतील व्यवहारांबरोबरच एटीएममधून होणाऱ्या व्यवहारांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत.

एकंदर तळागाळातल्या लोकांना बँकिंग व्यवस्थेतून बहिष्कृत करण्याचीच ही व्यवस्था सुरू आहे. ‘आपलीच मोरी आणि लघुशंकेची चोरी’ अशी अवस्था यांनी आपल्याच बँक खात्यातल्या आपल्याच पैशांबद्दल आणायला सुरुवात केली आहे. या आचरटपणाला कंटाळून लोकांनी या बँकांवर सामुदायिक बहिष्कार घालायला सुरुवात केली की, यांचा राजापेक्षा राजनिष्ठ उद्दामपणा आटोक्यात येईल बहुतेक.

…………………………………………………………………………

४. तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आल्याने विना-अनुदानित सिलिंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एक मार्च २०१७ पासून विना अनुदानित १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ८६ रुपयांनी वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर एलजीपी संबंधित उत्पादनांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

जागतिक स्तरावर या दरांमध्ये घट झाली, ते कोसळले तेव्हा कसले कसले अधिभार जोडून ग्राहकांची लुबाडणूक करण्यात आली, त्याचे निर्णय जाहीर होत नाहीत वाटतं. आताही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमधून सरकार इतर ठिकाणच्या लयलुटीची तूट भरून काढण्याची चतुराई करतं आणि वर ‘अच्छे दिन’ आणल्याच्या बाता मारतं.

…………………………………………………………………………

५. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील प्रवेशाच्या धोरणांमध्ये बदल केल्यानंतर रविवारी नायजेरियाहून अमेरिकेला जाणाऱ्या एका अभियंत्याला जॉन एफ. केनेडी विमानतळावर आपण अभियंता असल्याचं सिद्ध करण्यास सांगितलं गेलं. ओमिनला अमेरिकेच्या दौऱ्यासाठी अत्यंत कमी मुदतीचा व्हिसा देण्यात आला.

प्रत्येक भस्मासुर आपल्याच कर्माने मरतो, हा सृष्टीचा नियमच आहे. अमेरिकेच्या बाबतीत काही वेगळं घडणार नाही. मात्र, जगातल्या एकमात्र महासत्तेच्या या भस्मासुराने आपल्याच डोक्यावर हात ठेवून राख बनून जाण्यासाठी ट्रम्पतात्यांसारखी अत्यंत गद्य आणि अंतर्बाह्य कुरूप मोहिनी शोधावी, हे आश्चर्यकारक आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ती अशी!

…………………………………………………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......