संपवून टाकावं स्वतःला असे दिवस कमी नसतात कवीच्या आयुष्यात…
संकीर्ण - श्रद्धांजली
विकास पालवे
  • सतीश काळसेकर - डावीकडे ज्येष्ठ हिंदी साहित्यिक भीष्म साहनी यांच्यासह आणि उजवीकडे कविवर्य नारायण सुर्वे यांच्यासह
  • Wed , 28 July 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली सतीश काळसेकर Satish Kalsekar लोकवाङ्मय गृह Lokvangmaya Griha प्रकाश विश्वासराव Prakash Vishwasrao वाचणाऱ्याची रोजनिशी Vachanaryachi Rojanishee

१९६०नंतरच्या काळात अनेक क्षेत्रांत काही महत्त्वाचे बदल घडून आले. हे दशक आणि त्यानंतरची काही वर्षं आधीचं नाकारून नवीन काहीतरी करू पाहणाऱ्यांनी भारलेली होती. ‘स्वातंत्र्यानंतर काहीतरी चांगला बदल घडून येईल’ हे स्वप्न पूर्ण होताना दिसत नव्हतं. भ्रष्टाचार, धर्मांधता, जातीयवाद, प्रादेशिकवाद, वशिलेबाजी यांमुळे समाजातल्या सर्वच थरांत असंतोष होता. ‘ही परिस्थिती बदलली पाहिजे’ या जाणिवेतून कलेच्या क्षेत्रांतही अभिव्यक्तीचे नवे मार्ग चोखाळले जात होते. मराठी साहित्य विश्वातही याच काळात नवी घुसळण सुरू झाली होती. ‘लघुनियतकालिकांची चळवळ’ ही त्या काळात नव्याने लिहू लागलेल्या तरुणांच्या बंडखोरीचा आविष्कार होती. प्रस्थापित वाङ्मयीन व्यवस्थेला या लघुनियतकालिकांनी जोरदार धडक दिली. त्या बंडखोर लेखकांपैकीच एक असलेल्या सतीश काळसेकर यांचे नुकतेच (२४ जुलै २०२१) निधन झाले.

साठ-सत्तरच्या दशकांतील सगळा काळ हा त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठेवा होता. ते अनेकदा त्या धगधगत्या काळाविषयी बोलून त्याची सांगड आजच्या काळातल्या घटनांशी घालत असत. “तारिक अली या लेखकाचं ‘Street Fighting Years : An Autobiography ofthe Sixties’ हे पुस्तक मी कायम स्वतःसोबत ठेवत असतो’’ असं ते म्हणत. ‘हे पुस्तक म्हणजे जवळजवळ आमच्या पिढीच्या वर्तनाचे चरित्रच आहे’ असा उल्लेख त्यांच्या लेखनातही आलेला आहे. त्या काळातील सामाजिक-राजकीय लढे, मार्क्सवादावरच्या चर्चा, समकालीन मित्रांसोबतच्या आठवणी या साऱ्यांतून काळसेकर वेळोवेळी ऊर्जा प्राप्त करून घेत आणि त्यांविषयी बोलून समोरच्यालाही उमेद देण्याचा प्रयत्न करत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

सर्वसामान्य माणसांच्या सुख-दुःखांविषयीची आस्था, निसर्गाविषयी वाटणारं ममत्व, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयीचं तीव्र सामाजिक भान, जगताना येणारे काही वेदनादायी अनुभव, एकाकीपण असे काही धागे वारंवार त्यांच्या कवितांतून आपल्या हाती लागतात. जे त्यांनी पाहिलं, सोसलं, अनुभवलं त्यालाच त्यांनी शब्दरूप दिलं आहे. त्यांच्या काही कवितांमध्ये काळीज पिळवटून टाकणारं दुःख असलं आणि वेदना असली, तरी त्या ऊरबडव्या किंवा ओढूनताणून जुळवाजुळव केलेल्या वाटत नाहीत. कोणताही चांगला लेखक स्वतःच्याच निर्मितीत वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहत असतो, स्वतःसोबत स्वतःच्या निर्मितीलाही अधिकाधिक विकसित करत जातो आणि विविधांगी अनुभवांना सामोरे जाऊन त्यांची प्रामाणिकपणे अभिव्यक्तीही करत असतो. दांभिकता आणि खोटारडेपणा हे सामान्य माणसाला माणूसपण बहाल करण्यातले अडथळे ठरतात. याच न्यायाने, ज्या क्षणी एखाद्या कवीमध्ये हे दुर्गुण प्रवेश करतात, तत्क्षणी त्या कवीचा कारकून झालेला असतो, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. काळसेकर निःसंशयपणे या सर्वांना अपवाद होते.

मुलगा, ऋत्विज काळसेकरची आत्महत्या ही नंतरच्या काळात त्यांच्यासाठी कायमची भळभळणारी जखम होती, पण त्यांचं थोरपण असं की, ते जसे ऋत्विजच्या आत्महत्येवर हळहळायचे, तसेच ते समाजातल्या कोणत्याही घटकाच्या अशा प्रकारे जाण्याने व्यथित होत असत. ‘समाजाचा घटक म्हणून या सगळ्याला आपणही जबाबदार आहोत’ ही त्यांच्यातली भावना शेवटपर्यंत कायम होती. अशा प्रसंगी साधारणतः माणसांची जबाबदारी झटकण्याची वृत्ती असते किंवा सगळं खापर इतरांच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न तरी चाललेला असतो. काळसेकर म्हणायचे, ‘अशी दुसऱ्यांकडे बोटं दाखवून स्वतःची दुःखं नाही तपासता येत.’ कवीला तर स्वतःचं वर्तन कायम तपासत राहावं लागतं. व्यक्तिगत आणि सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवर होणाऱ्या स्वतःच्या आणि इतरांच्याही पडझडीला सामोरं जावं लागतं. त्यातून काळजावर दुःखांचे जे दंश होतात, ते निमूट सहन करावे लागतात. अशाच सगळ्या अनुभवांतून गेल्यानंतर काळसेकरांनी लिहिलं असेल- ‘संपवून टाकावं स्वतःला असे दिवस कमी नसतात कवीच्या आयुष्यात.’ पण त्यांनी व्यक्त केलेली ही भावस्थिती हे सार्वत्रिक आणि सार्वकालिक सत्य आहे. अन्यथा, ‘नैसर्गिक मरण येईपर्यंत प्रत्येकाने चिवटपणे लढत राहायला हवं’ हे त्यांच्या जीवनाचं ब्रीदवाक्य होतं आणि ‘जी परिस्थिती समोर आहे, ती बदलून अधिक चांगल्या दिवसांकडे वाटचाल करायला हवी’ असंही त्यांना वाटायचं. या संदर्भात ते श्रेष्ठ भारतीय कवी ग. मा. मुक्तिबोध यांच्या, ‘इसलिए कि जो हैं उससे बेहतर चाहिए’ या ओळीचा सतत उच्चार करत असत.

काळसेकरांना जशी आपल्या व्यक्तिमत्त्वातील ताकदीच्या बाबींची जाणीव होती, तशीच आपल्या मर्यादांचीही स्पष्ट कल्पना होती. एक किस्सा त्यांनीच सांगितलेला. एकदा मनोहर ओक चिक्कार प्यायलेल्या अवस्थेत त्यांना भेटला आणि आक्रमकपणे बोलता बोलता म्हणाला, ‘‘आपल्यापैकी एकाने तरी लिहिल्यायत का कविता तुकारामासारख्या. तुकारामाच्या जवळ तरी गेलोय का आपण?’’ यावर काळसेकर त्यांना म्हणाले, ‘‘तुकाराम तुकारामाच्या जागेवर, आपण आपल्या. सगळ्यांनाच तुकारामासारख्या कविता लिहिता येतीलच, असं नाही. आपण आपल्या वकुबानुसार सर्जनशील निर्मिती करत राहायची.’’

काळसेकर ‘एक संवेदनशील कवी’ म्हणून जसे परिचित होते, तसेच एक ‘पट्टीचे’ वाचक म्हणूनही ख्यात होते. त्यांनी पुस्तकांचा केवळ संग्रहच केला नाही, तर त्यांच्यावर पोटच्या पोरासारखं प्रेम केलं. हवं असणारं एखादं पुस्तक कधी अनपेक्षितपणे मिळालं की, ते प्रचंड उत्साहाने बोलायचे, तर कधी एखादं पुस्तक काही कारणांनी खराब झालेलं आढळलं की, जणू काही ‘आपल्या आतड्याचं माणूसच समोर मरून पडलंय’ अशा भावनेने बोलता बोलता सुन्न होऊन जायचे. ‘पगार होणार आहे म्हणून आणि पगार झालाय म्हणूनही नोकरीच्या वर्षांत पुस्तकं विकत घेत राहायचो’ असं ते सांगायचे. ‘माझ्यातील वाचक कायम जिवंत असतो. तोच लेखकाला जन्म देत असतो. म्हणूनच माझ्यातील वाचक आणि लेखक एकाच वेळी जिवंत राहू शकले’ हे त्यांचं विधान वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाचलेलं केवळ स्वतःच्या जगण्याच्या आधारासाठी किंवा निर्मितीसाठी राखून न ठेवता ते इतरांपर्यंत पोहोचवण्याच्या अनावर ओढीने त्यांनी ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ हे सदर लिहिलं. नंतर हे लेखन याच शीर्षकानिशी ग्रंथबद्ध झालं. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. ज्या ग्रंथांनी त्यांना झपाटून टाकलं, खूप अस्वस्थ केलं, अंतर्यामी सलत असलेल्या वेदनेला झंकारलं त्या ग्रंथांचा तितक्याच आत्मीयतेने, अगदी सुबोध शैलीत या पुस्तकात परिचय करून दिलेला आहे. महाराष्ट्रातल्या ग्रंथवेड्यांचा इतिहास एकत्रित स्वरूपात पुढे कधी ग्रंथबद्ध करायचं ठरलं, तर काळसेकरांना वगळून तो पूर्णच करता येणार नाही.

या ग्रंथसंग्रह करण्याच्या व्यसनाला, वाचनवेडाला त्यांच्या पत्नीने शेवटपर्यंत सांभाळून घेतलं. तरुणपणाच्या काळात ते कितीतरी वेळा रात्रीबेरात्री मित्रांना घरी घेऊन यायचे. त्याही वेळा त्यांच्या पत्नीने नीट निभावून नेल्या. त्यांना वाचनासाठीचा अवकाश त्या उपलब्ध करून देत राहिल्या. ‘तिच्यामुळेच आपल्याला हे मित्रसंबंध जपता आले, ग्रंथप्रेम टिकवून धरता आलं’ असं म्हणून आपल्या पत्नीविषयीची कृतज्ञता ते अनेकवार व्यक्त करत असत. आपल्या नवऱ्याची बाजू घेत त्या माहेरच्या मंडळींशी भांडायच्या, हेही नमूद करण्यासारखं आहे. पेणच्या त्यांच्या आसपासच्या गावांत ते ‘शंकर-पार्वतीचा जोडा’ म्हणून प्रसिद्ध होते!

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

‘लोकवाङ्मय गृह’ आणि ‘पीपल्स बुक हाऊस’ यांच्या जडणघडणीत काळसेकरांचं अमूल्य योगदान आहे. लोकवाङ्मय गृहातर्फे होणारे अनोखे उपक्रम, पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम, कविसंमेलने यांच्या आयोजनात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असे. त्यांनी अनेक नव्या लेखकांचं लेखन खूप आपुलकीने, दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता नुसतंच छापलं नाही, तर ते लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून सर्वतोपरी कष्ट उपसले. त्यांच्या पुढल्या लेखनासाठी प्रोत्साहन देत राहिले. प्रामाणिकपणाने आणि सचोटीने व्यवहार करत जगण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी अनेक चांगली माणसं या कामात जोडून घेतली. त्यांना हे सगळं करण्याची संधी दोन माणसांमुळे प्राप्त झाली आणि त्यांचा उल्लेख ते स्वतःही प्रसंगोपात करत असत. त्या दोन व्यक्ती म्हणजे, ‘नारायण सुर्वे’ आणि ‘कॉ. गोविंद पानसरे’. “नारायण सुर्वे यांनी माझ्यातल्या कवीला आणि कार्यकर्त्याला बरोबर ओळखलं आणि काम करण्याची संधी दिली’’ असं ते म्हणत.

गोविंद पानसरे यांच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या पत्ररूपातील लेखात काळसेकर लिहितात, ‘गेल्या काही वर्षांत लोकवाङ्मय गृहाच्या प्रकाशन व्यवहारात आम्ही लक्षणीय बदल करू शकलो, यातले खरे कारण तुमचा आमच्या पाठीवरला हात होता. स्थूलमानाने डाव्या विचारसरणीच्या प्रकाशन गृहाला शक्य झाली नसती, अशी अनेक कामे आम्ही उदारपणे तडीस नेली, याचे एकमेव कारण अशा सर्वांनाच सोबत घेऊन पुढे जाण्याच्या तुमच्या उदार मनस्कतेचा आधार आमच्या पाठीशी होता.’

‘पानसरेंची ‘शत्रूमित्रविवेक’ ही संकल्पना डाव्या चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अंगी बाणवायला हवी’ अशी काळसेकरांची कळकळीची इच्छा होती. आजच्या छुप्या आणीबाणीच्या काळात ही अत्यंत निकडीची गोष्ट आहे.

ते सध्याच्या सामाजिक-राजकीय घटनांनी फार अस्वस्थ होत असत. सर्वसामान्य माणसाला चिरडून टाकणाऱ्या व्यवस्थेवर चिडत असत. २०१४नंतरच्या बदललेल्या राजकीय संस्कृतीवर तर ते कमालीचे संतापत असत. “पुन्हा सत्तेत आले तर हे लोक सिव्हिल वॉर घडवतील काही वर्षांनी आपल्या देशात!” असं म्हणून विषण्ण होत असत.

पाच-सहा वर्षांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या ठाण्यातील कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त करताना आपल्या देशातल्या प्रवासाविषयीचे अनुभव सांगता सांगता ते देशातील सामाजिक-राजकीय घटनांविषयी बोलू लागले. ‘जे कोणी माझ्या या सुंदर देशाला बिघडवण्याचं काम करतायत त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही’ असं एक विधान त्यांनी केलं. ते बोलणं इतकं उत्स्फूर्त आणि कळकळीचं होतं की, ‘आपला वाढदिवस साजरा करण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे’ याचं त्यांना भान राहिलं नाही. शेवटी त्यांच्या मागे बसलेल्या त्यांच्या पत्नीला त्यांचा सदरा ओढून त्यांना खुणवावं लागलं. तेव्हा त्यांनी तो विषय आवरता घेतला. अवतीभवती घडणाऱ्या घटनांपासून ते कधीही अलिप्त राहिले नाहीत आणि या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं जगणं कायम त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी होतं, हे सांगण्यासाठी या घटनेचा उल्लेख केला.  

मी लोकवाङ्मय गृहात नोकरीला असताना तत्कालीन प्रकाशक प्रकाश विश्वासराव यांना पुस्तक प्रकाशन, कविता संमेलन, लोकोत्सव वार्षिक कार्यक्रम अशा कोणत्याही कार्यक्रमांत सामील झालेलं पाहिलं नाही. इतर सहकाऱ्यांकडून हेही कळालं होतं की, ते याआधीही कुठल्याच कार्यक्रमाला उपस्थित राहत नसत. एकदा भालचंद्र मुणगेकर त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाआधी अर्जुन डांगळे यांना “विश्वासराव कुठे आहेत?” असं विचारत होते, तर डांगळे त्यांना म्हणाले, “प्रकाश घरी गेला. चार वाजता तो निघतो म्हणजे निघतोच” विश्वासरावांचं हे ‘चार वाजता निघणं’ जगजाहीर होतं. याला अपवाद फक्त एकदाच घडताना पाहिला आणि तो अर्थात सतीश काळसेकरांच्या पुस्तक प्रकाशनावेळी! काळसेकर एखाद्या व्यक्तीवर मायेची अशी पखरण करत असत की, त्या व्यक्तीला आपले सगळे अग्रक्रम, आग्रह बाजूला ठेवून त्यांच्या हाकेला प्रतिसाद द्यावासा वाटे.

सार्वजनिक क्षेत्रात वावरताना अनेकदा काही गोष्टी जुळवून आणण्यासाठी आणि इतरही तात्कालिक कारणांसाठी राजकारण करणं अपरिहार्य होऊन जातं. सतीश काळसेकर यांनी राजकारण केलं नाही असं नाही, पण त्या राजकारणाचा रोख समोरच्याला नेस्तनाबूत करण्याचा कधीच नसे. त्या व्यक्तीशी संघर्ष करण्याची वेळही ते येऊ देत नसत. त्या व्यक्तीशी संवाद साधून, तिला स्वतःचं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न ते करत असत आणि त्यांच्या आत्मीय संवाद साधण्याच्या हातोटीमुळे त्यात बऱ्याचदा यशस्वीही होत असत. “जीवनाच्या इतर क्षेत्रांत जसं राजकारण अपरिहार्यपणे कार्यरत असतं, तसं ते साहित्याच्या क्षेत्रातही असतं. त्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानवतावादी, जीवनवादी भूमिकेपासून दूर जाणार नाही, यासाठी आपण फक्त लढत राहायचं” असं ते एकदा म्हणाले होते.

त्यांच्या जाण्याने आपण निव्वळ एक चांगला कवी गमावून बसलो नाही, तर अत्यंत उमद्या मनाच्या माणसाला कायमचे पारखे झालो आहोत. त्यांच्या संपर्कात आलेल्या कोणाचाही मदतीसाठी ते नेहमी तत्पर असायचे. ते मित्र जोडून थांबायचे नाहीत, तर त्या मैत्रीला जपायचे आणि त्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची त्यांची  तयारी असायची. ज्या-ज्या गोष्टी करण्यातून त्यांना आनंद मिळायचा, तो इतरांनाही अनुभवता यावा, यासाठी ते प्रयत्न करायचे. त्यांना वाचनाची आवड होती, तशी इतरांना वाचायला लावायचीही आवड होती, भटकंतीचा नाद होता. त्यामुळे ते केवळ आपल्या कुटुंबालाच घेऊन फिरायचे नाहीत, तर मित्रमंडळींनाही आग्रह करून, कधी त्यांचे पैसे स्वतः भरून का होईना, पण त्यांना घेऊन जायचेच. सिनेमे पाहण्यासाठी फिल्म फेस्टिवलला ते एकटे कधीच गेले नसावेत. ‘पाब्लो नेरुदा’ आणि ‘महमूद दरवेश’ हे त्यांचे आवडते कवी, त्यांच्यामुळे आणखी किती जणांचे आवडते कवी होऊन बसले असतील, याचा काही हिशोबच नाही! एकदा लोकवाङ्मय गृहात बसलेलो असताना त्यांच्या एका मित्राचा फोन आला. तो मित्र दोघांचाही सामायिक मित्र असलेल्या मित्राबद्दल सांगत होता. त्या मित्राने कॉलेजच्या दिवसांत आपल्याला कसा त्रास दिला वगैरे जुनं काही तरी उकरून काढत होता. काळसेकरांनी शांतपणे ऐकून घेऊन त्याची समजूत काढली. फोन ठेवल्यावर म्हणाले, ‘काही लोकांना खूप कधी कधीचा कचरा मनात साठवून ठेवायची सवय असते. कठीण आहे अशा लोकांचं.’ त्यांच्याविषयी कधी प्रतिकूल मत नोंदवायचं असेल, तर तिसऱ्या माणसाकडे जाण्याची गरजच नसे. थेट त्यांनाच बोलता येईल, इतकं पारदर्शी आणि उदार व्यक्तिमत्त्व होतं त्यांचं!

त्यांनी कधीच कोणाही विषयी मनात कडवटपणा धरला नाही. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर एका नियतकालिकातून वरवरची शेरेबाजी करणारा लेख प्रकाशित झाला होता. त्या वेळी ते खाजगी गप्पांत म्हणाले होते, “माझं लेखन कदाचित कमी दर्जाचं असूही शकेल, पण कुणाचं तरी खच्चीकरण करण्यासाठी मी आयुष्यात कधीही लेखणी उचलली नाही”. त्याच काळात त्यांच्या पेणच्या घरी गेलो होतो, त्या वेळी गप्पांच्या ओघात विप्लव (त्यांचा मुलगा) त्यांना म्हणाले, “का हो बाबा, त्यांनी टीका केली तुमच्यावर? तुमचे मित्रच होते ना ते?” यावर काळसेकर म्हणाले, “ठीक आहे रे! मित्राने काय टीका करू नये का आपल्यावर?” खूप क्षुल्लक गोष्टींवरून होणाऱ्या वादांतून निर्माण होणारी अढी माणसं मरेपर्यंत कायम ठेवतात, अशा काळात मनाचा इतका मोठेपणा दाखवणारे काळसेकर खूप उंच असल्यासारखे वाटतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

त्यांनी कायम सगळ्यांचं कौतुकच केलं असंही नाही. पण समोरचा पूर्णपणे नाउमेद होऊन कोलमडून जाईल, अशा भाषेत कधीच त्यांनी आपले मतभेद नोंदवले नाहीत. म्हणूनच एखाद्या नवख्या लेखकालाही त्यांचा खूप आधार वाटायचा.

त्यांच्या समकालीन मित्रांचे ग्रंथसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर रद्दीत जाऊ नयेत, म्हणून व्यक्तिगत पातळीवर जे काही करता येणे शक्य होते, ते काळसेकरांनी केले. आता खुद्द त्यांच्या संग्रहाची नीट व्यवस्था लागणे गरजेचे आहे. त्यांच्या छोट्या डायरीत अर्धवट लिहिलेल्या अनेक कविता असण्याची शक्यता आहे. त्यांचा व्यक्तिगत पत्रसंग्रह म्हणजे लघुनियतकालिकांच्या चळवळीचा महत्वपूर्ण दस्तऐवज आहे. त्यांचं अप्रकाशित गद्य लेखनही मोठ्या संख्येने असण्याची शक्यता आहे. ‘पॅलेस्टाईन’ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे अनेक पॅलेस्टाईन कवींच्या कवितांचा अनुवाद त्यांच्याकडून झाला. तसेच इतरही काही अनुवाद आहेत. लवकरात लवकर हा वाङ्मयीन ठेवा वाचकांसमोर यावा, अशी आपण प्रार्थना करू!

..................................................................................................................................................................

लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......