वटसावित्रीचं व्रत : झाडाचं बॉन्साय आणि महिलांच्या बुद्धीचंदेखील बॉन्साय
अर्धेजग - कळीचे प्रश्न
नरेंद्र दाभोलकर
  • ‘विवेकाचा आवाज’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि वडाचे एक झाड
  • Fri , 05 June 2020
  • अर्धेजग कळीचे प्रश्न नरेंद्र दाभोलकर Narendra Dabholkar विवेकाचा आवाज Vivekacha Awaj अंधश्रद्धा निर्मूलन Andhashraddha Nirmoolan वटसावित्री Vat Savitri

आज ५ जून. वटपौर्णिमा. त्यानिमित्ताने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ‘विवेकाचा आवाज’ (२०१९) या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

आपण जी अनेक व्रतवैकल्यं करतो, ती समजून न घेता. स्त्रिया वटसावित्रीचं व्रत दोन गोष्टींसाठी करतात.

एक गोष्ट म्हणजे, नवऱ्याला दीर्घ आयुरारोग्य मिळावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जन्मोजन्मी वा सात जन्मी हाच पती मिळावा. खरं म्हटलं तर ज्याप्रमाणे सावित्रीनं यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले, ही गोष्ट जर हे व्रत करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत होत असती, तर आम्हा डॉक्टरांची फार सोय झाली असती. आम्ही हॉस्पिटलच्या दारामध्ये वडाचं एक झाड लावलं असतं आणि ज्या वेळेला पेशंटला ऑपरेशनला घेतलं असतं, त्या वेळी त्याच्या बायकोच्या हातामध्ये सुताची एक गुंडी दिली असती आणि तिला सांगितलं असतं, ‘तू झाडाभोवती सूत गुंडाळ. तू हे व्रत कर. कारण त्याच्यामुळे दुहेरी फायदा आहे. एका बाजूला आमचं ऑपरेशन, दुसऱ्या बाजूला तुझं व्रत; डबल इंजीन लावू या. कशानं का होईना, पण निश्चित प्रकारे गुण येईल’. परंतु या सगळ्यातला फोलपणा कळत असतानादेखील आजही सुशिक्षित स्त्री वटसावित्रीचं व्रत करते.

आणि कसं करते? म्हणजे वडाची झाडं आता कुठेतरी गावाच्या बाहेर असणार. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये तर तीही सोय नाही. मग सर्रास वडाच्या फांद्या तोडल्या जातात, त्या विक्रीला आणल्या जातात आणि वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होते. कशाकरता? तर वटसावित्रीचा वट पुजायचंय म्हणून. म्हणजे बॉन्साय हा प्रकार आपल्याला माहीत असेल. मोठी मोठी झाडं छोटी छोटी करून ठेवण्याची ती एक जपानी कला आहे. त्यामुळे वडाचं झाड २० वर्षांचं असतं, तरी छोट्या कुंडीतच असतं. मला एकदा मुंबईच्या उच्चविद्याविभूषित विदुषी त्यांच्या घरचं बॉन्साय दाखवत होत्या. त्यांनी मला ते वडाचं कुंडीतलं झाड दाखवलं. म्हणाल्या, “डॉक्टर या वडाच्या झाडाचं वय २२ वर्षं आहे, पण त्याचा एक मोठा फायदा होतो. तो म्हणजे, आमच्या या बिल्डिंगमधल्या बायका वटसावित्रीच्या दिवशी दुसरीकडे कुठेही न जाता माझ्या घरी येतात आणि या वडाच्या झाडाची पूजा करतात’’. मी त्यांना म्हणालो, “याचा अर्थ एवढाच की, तुमच्या झाडाचं बॉन्साय तर आहेच, पण तुमच्या कॉलनीमधल्या किंवा बिल्डिंगमधल्या महिलांच्या बुद्धीचंदेखील बॉन्साय झालेलं आहे’’.

असं बोललेलं लोकांना आवडत नाही. कारण आपल्या रूढी-परंपरा आपण ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तपासाव्यात, असं लोकांना वाटतच नाही. वटसावित्रीची कथा किती जणांना माहिती आहे, असा प्रश्न मी ज्या वेळी विचारतो, त्या वेळी महिला समुदायामध्येदेखील कोणीही ती कथा नीट सांगू शकत नाही, माझा असा अनुभव आहे. कथा काय आहे?

अश्वपती नावाचा एक राजा नि:संतान असतो. मूल व्हावं म्हणून तो देवीची पूजा करतो. १८ वर्षं तप आणि व्रत केल्यानंतर त्याला एक सुरेख मुलगी होते. तिचं नाव असतं सावित्री. ही सावित्री म्हणे इतकी रूपवान असते, इतकी देखणी असते की, तिला वरायला, तिच्याशी लग्न करायला कुणी धजावत नसतं. शेवटी सावित्रीनं स्वत:चा वर स्वत:च निवडावा म्हणून एका वृद्ध अमात्याला बरोबर देऊन राजा तिला पाठवतो. सावित्री या राज्यातनं त्या राज्यात, या जंगलातनं त्या जंगलाकडे जात असते. कारण दोन राज्यांना जोडणारी जंगलंच त्या वेळेला असायची. एका जंगलामध्ये तिला सत्यवान दिसतो. तो राज्य गेल्यानं परागंदा झालेला राजा असतो. त्याचे वडील महाराज असतात. तेही त्या वेळी जंगलातच राहत असतात. ते आंधळे झालेले असतात; आणि राज्य गेल्यामुळे जंगलात राहण्याची वेळ, म्हणजे हा विजनवास त्यांच्या पदरी आलेला असतो. अशा वेळी मातीचे हत्ती आणि घोडे करून सत्यवान त्यांच्याशी खेळत असतो. त्याला बघितल्यानंतर सावित्री म्हणते, “मी याच्याशीच लग्न करणार’’. ज्या वेळेला तिच्या वडलांना हे कळतं, त्या वेळी तिच्या वडलांना आनंद होतो की, ‘चला, आपल्या मुलीनं आपला वर निवडला’. त्याच्यानंतर प्रत्यक्षात लग्न होण्याच्या आधी नारद येतो आणि नारद सावित्रीच्या वडलांना सांगतो की, “बाबा रे, तुझ्या मुलीनं जो वर निवडलेला आहे, तो एक वर्षानंतर निश्चितपणे मरणार आहे. एक वर्षानंतर तुझी मुलगी विधवा होणार आहे. तेव्हा हे लग्न तू करू नकोस’’. परंतु तरीदेखील जंगलामध्ये जाऊन अत्यंत आनंदानं, थाटामाटात अश्वपती आपल्या मुलीचं लग्न लावून देतो. त्याच्यानंतर एक वर्ष होतं. यम येतो. तो सत्यवानाला घेऊन जायला लागतो. त्याच्या मागोमाग सावित्री जाते. यम तिला परोपरीनं परत पाठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही बधत नाही. मग शेवटी यम तिला तीन वर मागायला सांगतो. पहिला वर ती मागते, “माझ्या सासऱ्यांना त्यांचं गेलेलं राज्य परत मिळू दे आणि परत मिळालेलं राज्य पाहण्याचं भाग्य लाभू दे’’. दुसरा वर मागते, “माझ्या नि:संतान पित्याला शंभर पुत्र होऊ देत’’. आणि तिसरा वर मागते, “आम्हा उभयतांना दीर्घ आयुरारोग्य लाभून माझा संसार सुखाचा होऊ दे’’. यम ‘तथास्तु’ म्हणतो.

आता ही सगळी कल्पना काय आहे, असा प्रश्न तुम्ही कधी विचारला का? समजा, आजच्या आधुनिक कालखंडामध्ये आपल्याला एक अत्यंत देखणी मुलगी आहे आणि तिच्या लग्नाला जर चटकन सांगून मुलं येत नाहीयेत, तर वडील स्वत: आणखी व्यापक प्रयत्न करतील की, एका वृद्ध अमात्याला घेऊन तिलाच देशोदेशी स्वत:च्या स्वयंवरासाठी पाठवतील? त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की, एक वर्षानं नवरा मरणार आहे, असं जर निश्चितपणे कळलं - ते आज कळू शकतं. उदाहरणार्थ, कुणी जर येऊन सांगितलं की, ‘अहो, तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय, पण तुम्हांला माहीत आहे का की, नवऱ्या मुलाच्या लिव्हरचं अमुक अमुक डॅमेज आहे. त्याला लिव्हरचा अमुक अमुक आजार आहे. तो एक वर्षाच्या वर जगणार नाहीये’. तर ते लग्न ती मुलगी करेल का? आणि तिचे आईवडील ते करू देतील का?

किंवा आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचं, तर धंद्यामध्ये पूर्ण संपत्ती गेलेली असल्यानं एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आणि त्याच्या आंधळ्या बापालाही भविष्यात सांभाळावं लागणार असणाऱ्या मुलाशी आजच्या काळातली एखादी मुलगी लग्न करेल का? आणि ती लग्न करते म्हणाली, तर तिचे आईबाप त्या लग्नाला होकार देतील का?

अश्वपती राजानेही आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न जंगलात का लावून दिलं? त्यानं ते लग्न राजधानीमध्ये का नाही लावलं? आणि ते लावल्यानंतर त्यानं आपल्या मुलीच्या सासरकडच्यांना मदत का केली नाही? त्यानं आपल्या जावयाला आणि आपल्या व्याह्यांना आणून राजधानीमध्ये का ठेवलं नाही? हे प्रश्नदेखील हे व्रत करणाऱ्या लोकांना पडत नाहीत.

या कथेत जे हे सगळं जे घडलं, याचं महत्त्वाचं कारण, ज्या मुलीला भाऊ नाही, तिचं लग्न त्या काळात होत नसे. ‘त्यामुळे एवीतेवी हिचं लग्न होणारच नव्हतं, पण कसं का असेना, आता एकदा हिचं लग्न तरी होतंय’, या भावनेनं अश्वपती सावित्रीचं लग्न लावून द्यायला उत्सुक होता. लग्न करायला कदाचित परंपरेच्या दडपणानं ती उत्सुक होती. परंपरेचं हे दडपण इतकं जास्त होतं की, तिनं यमाला काय मागितलं? पहिला वर स्वत:च्या सासऱ्यासाठी मागितला. दुसरा वर स्वत:च्या वडलांसाठी मागितला आणि तिसरा वर स्वत:च्या नवऱ्यासाठी मागितला. म्हणजे तिनं तीनही गोष्टी पुरुषांसाठी मागितल्या. त्यामुळे हे सबंध व्रत तुम्ही ज्या वेळी करता, त्या वेळी त्यातला गर्भितार्थ असा की, बाईनं आपल्या सगळ्या सुखाचं समर्पण पुरुष वर्गाशी संबंधित असलेल्या बाबींसाठी - मग कदाचित वडील असतील, कदाचित सासरे असतील किंवा नवरा असेल - केलं पाहिजे.

हे सगळंच्या सगळं आजच्या आधुनिक विचारांशी पूर्णपणे विसंगत आहे; आणि ही विसंगती अनेक वेळा किती हास्यास्पद ठरते! म्हणजे कोल्हापूरकडचं एक उदाहरण आहे. एका गावामध्ये वटसावित्रीच्या दिवशी गावातल्या बायका जमून वटसावित्रीची पूजा करत होत्या. वडाला सूत गुंडाळत होत्या. हळदी-कुंकू वाहून वडाची पूजा करत होत्या. लग्न होऊन दोन वर्षं झालेली एक बाई हे सगळं करत असताना अचानकपणे एक जीप आली. त्या जीपमधून एक माणूस उतरला. त्यानं या बाईचा हात धरला; ओढला; तिला जीपमध्ये बसवलं आणि जीप भरधाव वेगानं निघून गेली. यानं गावात एकच हलकल्लोळ माजला. सगळे म्हणायला लागले, ‘हा काय प्रकार आहे! आमच्या गावामध्ये देवाची पूजा करणाऱ्या, वडाची पूजा करून वटसावित्रीचं व्रत करणाऱ्या बाईला दिवसाढवळ्या कुणीतरी माणूस या पद्धतीनं घेऊन जातो! पळवून नेतो!’ मग या जीपचा पाठलाग करण्यात आला. गाडी काही भरधाव वेगानं चाललेली नव्हती. मग गाडी अडवण्यात आली. त्या माणसाला उतरवण्यात आलं. त्याला दमात घेऊन ‘हा सगळा काय प्रकार आहे! तू स्वत:ला कोण समजतोस? आमच्या गावातली मुलगी तू अशी पळवून का नेलीस?’ असं विचारण्यात आलं. त्यावर तो माणूस अत्यंत शांतपणे म्हणाला, “ती बाई कोण आहे, हे तुम्हांला माहिती आहे का?’’ त्यावर गावकरी म्हणाले, ‘कोण आहे ती? आमच्या गावची मुलगी आहे!’ तो म्हणाला, “बरोबर आहे, पण ती माझी बायको आहे. आमचं लग्नं होऊन दोन वर्षं झाली आहेत’’. आता आश्चर्यचकित होण्याची वेळ गावकऱ्यांवर आली होती. ते म्हणाले, ‘‘अरे भल्या गृहस्था, मग ती चांगली वटसावित्रीची पूजा करत होती; ‘जन्मोजन्मी सात जन्मी हाच पती पाहिजे’ असं म्हणत होती; आणि तू तिला पळवून नेण्याची काय गरज होती? तिची पूजा झाल्यानंतर तिला तू घेऊन जाऊ शकला असतास.” तो म्हणाला, “अहो, लग्न होऊन दोन वर्षं झाली. ही बाई सात दिवसदेखील नांदली नाही. आता ही म्हणतीये की, ‘सात जन्मी हाच पती पाहिजे’. मी दोन वर्षं असाच राहिलो. आता सात जन्मपण असाच राहू का?’’ आता ज्या बाईला माहेरीच राहावंसं वाटत होतं; संसार करावासा वाटत नव्हता, ती विनाकारण कशाकरता ते वटसावित्रीचं वट करत होती?

लक्षात घ्या, या सगळ्या प्रकारात एक प्रकारची सक्ती निर्माण होते. ज्या वेळेला आम्ही वटसावित्रीचं व्रत करणाऱ्या दीड हजार सुशिक्षित बायकांचं सर्वेक्षण केलं, त्या वेळेला त्यांच्यातल्या ७० टक्के बायका हे व्रत करणाऱ्या होत्या. आम्ही त्यांना विचारलं, ‘तुम्ही हे व्रत का करता? याच्यावर तुमचा विश्वास आहे का?’ त्या म्हणाल्या, ‘नाही, आमचा काही तसा विश्वास नाही’. आम्ही म्हणालो, ‘मग का करता?’ त्या म्हणाल्या, ‘पण समजा जर आम्ही एखाद्या वर्षी व्रत केलं नाही आणि नेमक्या त्याच वर्षी यांना काही गंभीर आजार झाला, तर घरचे लोक म्हणतील, ‘केलं असतं व्रत, तर काही बिघडलं असतं का?’ त्याच्यामुळे व्रत केलेलं बरं, म्हणून आम्ही व्रत करतो’.

रूढी-परंपरांची ही गुलामी किती खोलवर आपल्या मनामध्ये रुजलेली असते, यासाठी मी आपल्याला हा सगळा तपशील सांगितला. पुन्हा यामधून स्वत:चीच फसवणूक करण्याची एक प्रवृत्ती निर्माण होते. म्हणजे मी मागच्या वर्षी एका ठिकाणी गेलो होतो. ज्या घरी होतो, त्या ठिकाणची सुशिक्षित बाई वडाची सगळी व्यवस्थित पूजा करून आलेली होती. तिला तो सगळा प्रकार फारसा आवडलेला नसल्याचं मला कळत होतं, पण घरच्या दबाळामुळे तिच्यापुढे काही पर्याय नव्हता. म्हणून मी थोडं गमतीनं तिला म्हणालो, “काय वहिनी, वडाची पूजा केलीत की नाही? सात फेऱ्या घातल्यात की नाही? ‘जन्मोजन्मी सात जन्मी हाच पती मिळावा’, असं म्हणालात की नाही?’’ मी कुठल्या अर्थानं हे म्हणत होतो, ते त्या बाईला कळत होतं. त्या म्हणाल्या, “हो. वडाची यथास्थित पूजा केली; हळद-कुंकू वाहिलं; वडाला सात फेऱ्या घातल्या; त्याला सूत गुंडाळलं आणि म्हणाले, ‘जन्मोजन्मी सात जन्मी हाच पती मिळावा, पण हा त्याचा सातवा जन्म असावा’ ’’.

सूनेचा पायगुण आणि सासरची साडेसाती

याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की, आपण स्वत:ला फसवण्याचं निमित्त या निमित्तानं निर्माण करतोय. हे सगळं जर आपण लक्षात घेतलं, तर स्त्रीच्या अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये या सगळ्या रूढी-परंपरांचा किती मोठा वाटा आहे, हे आपल्याला कळू शकेल. म्हणजे मला एकदा एक जण येऊन म्हणाले, “दाभोलकर, तुम्ही काहीही म्हणा हो, पण शेवटी पायगुण नावाची काही गोष्ट असतेच. नवीन सून घरात आल्यानंतर काही घरांना ती लाभते; काही घरांना ती लाभत नाही. आता बघा, हे अमकं अमकं घर. त्यांच्या घरी लग्न होऊन नवीन सून आली. सहा महिन्यांच्या आत काय काय होऊ नये! तिच्या नवऱ्याची होणारी बढती थांबली; तिचा दीर नापास झाला; तिच्या नणंदेचं लग्न मोडलं; तिच्या सासऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली; तिच्या सासूला ब्लडप्रेशरचा त्रास सुरू झाला. आता नवीन सून घरात आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जर असं घडत असेल, तर तिला ‘पांढऱ्या पायाची’ नाही म्हणायचं, तर काय म्हणायचं!’’ मी त्यांना म्हणलो, “मला सांगा, नवऱ्याची नोकरीतली बढती नेमकी कशामुळे थांबली?’’ ते म्हणाले, “तसं काही नाही. बॅकलॉक डावलून त्याला बढती देणार होते, पण ऐन वेळी कुणीतरी बॅकलॉकचा मुद्दा काढला आणि त्याच्यामुळे त्याला बढती मिळाली नाही’’. मी म्हणालो, “बारावीला तिचा दीर नापास झाला, हे बरोबर आहे, पण दहावीला कितव्या वेळेला पास झाला होता?’’ ते म्हणाले, “दहावीला त्याला तीन अटेम्प्ट द्यायला लागले होते’’. आता दहावीला जो तीन अटेम्प्टला पास झाला, तो बारावीला पहिल्या अटेम्प्टला कसा काय पास होईल? मी म्हणालो, “नणंदेचं जे ठरत आलेलं लग्न मोडलं, ते का मोडलं?’’ ते म्हणाले, “ही काय पद्धत आहे का! ऐन लग्नाच्या वेळेला मुलाकडच्यांनी दहा तोळे सोनं मागितलं’’. मी म्हणालो, “म्हणजे लग्न कशावरनं मोडलं? सुनेच्या पायगुणानं मोडलं नाही; देण्याघेण्याच्या प्रकारावरनं मोडलं. आणि तिच्या सासऱ्यांना शिक्षा का झाली?’’ ते म्हणाले, “नाही, ते तसे पैसे खाणाऱ्यातलेच होते, त्यांच्यावर खटलाही चालू होता, पण त्या खटल्याचा निकाल लागायला आणि लग्न होऊन अवघे दोन महिने व्हायला एकच वेळ आली आणि तो निकाल त्यांच्या विरोधात लागला. तसा तो लागणारच होता; आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं’’. आता लक्षात घ्या, ज्या बाईच्या मुलाचं प्रमोशन थांबलंय, ज्या बाईचा एक मुलगा बारावीला नापास झालाय, जिच्या मुलीचं ठरत आलेलं लग्न मोडलंय, जिच्या नवऱ्याला तुरुंगात जावं लागलंय, त्या बाईला म्हणजे या मुलीच्या सासूला ब्लड प्रेशर होईल नाहीतर काय होईल!

म्हणजे यांपैकी ते गृहस्थ सांगत असलेल्या प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव आहे, परंतु तो तपासण्याची संधी मात्र या परंपरेनं स्त्रीला दिलेली नाहीये. याचं कारण, तिच्यावर एक जीवनव्यापी गौणत्व लादण्यात आलेलं आहे. म्हणजे स्त्रियांना मुळात शिक्षणाची संधी अगदी अलीकडे मिळाली. स्त्रियांच्या शिक्षणाचा या देशामधला इतिहास काही १५० वर्षांपेक्षा जास्त नाही आणि खरं बोलायचं तर तो स्वातंत्र्यानंतरच थोड्याअधिक प्रभावीपणे सुरू झाला. स्त्रियांचे म्हणून जे खास विषय आहेत, उदा. होम सायन्स हा शास्त्राचा विषय आहे आणि शिक्षणाचा अभ्यासक्रम आहे, हे विद्यापीठामध्ये अलीकडे, म्हणजे अवघ्या ५० वर्षांपूर्वी आलं. ज्या वेळेला स्त्रीला शिक्षणाची संधी मिळाली, मुली मोठ्या प्रमाणात शिकायला लागल्या. त्या वेळेला मग स्वाभाविकपणे त्या शिक्षणानं तिच्यामध्ये ‘चिकित्सा करण्याची प्रवृत्ती रुजण्या’ऐवजी ‘कुशल रोजगाराची संधी’ असं त्या शिक्षणाकडे बघण्यात आलं. त्यामुळे त्या सबंध शिक्षणामध्ये ती बाई जरी बी.एस्सी.बी.एड. झाली, तरी ‘आपण व्रत का करतो आणि त्या व्रताचा अर्थ काय असतो?’, याचा चिकित्सकपणे, डोळसपणे विचार करण्याची गरज तिला राहत नाही.

शब्दांकन : भाग्यश्री भागवत

..................................................................................................................................................................

डॉ. नरेंद्र दाभोळकर लिखित पुस्तके विकत घेण्यासाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/yxjo42wx

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......