‘द बॉडी’ : स्पॅनिश चित्रपटकर्त्यांनी आपल्या कलाकृतींना बॉलिवुडपासून वाचवण्याचे दिवस आले आहेत!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘द बॉडी’चं पोस्टर
  • Sat , 14 December 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie द बॉडी The Body ऋषी कपूर Rishi Kapoor इम्रान हाश्मी Emraan Hashmi सोभिता धुलीपला Sobhita Dhulipala वेदिका कुमार Vedhika Kumar

‘द बॉडी’ हा २०१२ मध्ये आलेल्या याच नावाच्या स्पॅनिश चित्रपटाचा अधिकृत रिमेक असला तरी तो एका रंजक कथानकाचं बॉलिवुडीकरण करण्यातच धन्यता मानतो. योगायोग म्हणजे याच वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या ‘बदला’ने मूळ स्पॅनिश दिग्दर्शक ओरिओल पाउलोच्या आणखी एका चित्रपटाचं, (इंग्रजी शीर्षक-) ‘द इनव्हिजिबल गेस्ट’चं (२०१६) प्रभावहीन रूप समोर आणलं होतं. हे दोन्ही चित्रपट रहस्य-थरारपटाला कंटाळवाणा बनवण्यात यशस्वी होतात. एकुणात स्पॅनिश चित्रपटकर्त्यांनी आपल्या कलाकृतींना हिंदी दिग्दर्शक-निर्मात्यांपासून वाचवण्याचे दिवस आले आहेत, असं म्हणायला हरकत नाही! 

कथा तशी साधीसोपी आहे. चित्रपटाचं कथानक एका दिवसात, अधिक अचूकपणे बोलायचं झाल्यास आठेक तासांच्या कालावधीत घडतं. माया वर्मा (सोभिता धुलीपला) या उच्चभ्रू व्यावसायिकेचा सकाळी हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झालेला असतो. रात्री मात्र मॉरिशसमधील पोर्ट लुईसमधील एका फॉरेन्सिक लॅबमध्ये असलेल्या शवागृहातील तिचा मृतदेह गायब झालेला असतो. वॉचमनच्या म्हणण्यानुसार आतून कसला तरी आवाज आला, त्याने पाहिलं तेव्हा शवागृहातील मृतदेह असलेली पेटी रिकामी असते नि त्याला समोरच्या लिफ्टमधून तो मृतदेह बाहेर जाताना दिसलेला असतो. एसपी जयराज रावलची (ऋषी कपूर) टीम सदर प्रकरणाचा तपास लावण्याचा प्रयत्न करत असते. तर, मायाचा पती, अजय पुरीनेच (इमरान हाश्मी) मायाचा खून करून आता आपलं पितळ उघडं पडेल, या भीतीपोटी तिचं शव गायब केलं असल्याची जयराजची खात्री असते. 

आता या मूलभूत कथानकासोबतच अजयच्या रितूसोबत (वेदिका कुमार) असलेल्या विवाहबाह्य संबंधांच्या अनुषंगाने तीदेखील वेळोवेळी इथे दिसत राहते. सोबतच वेळोवेळी बरेचसे फ्लॅशबॅक्स दिसत राहतात. आता ही फ्लॅशबॅकची दृश्यं अनेकदा अजयच्या या दोन्ही स्त्रियांसोबत असलेल्या प्रेमसंबंधांनी (आणि साहजिकच शरीरसंबंधांनी) व्यापलेली असतात. बाकी दिग्दर्शकाला आपल्याला यांच्यातील तणावही दाखवायचा आहे, हे आठवल्यास काही वेळा त्यांच्यातील तणावही दिसतो. 

वास्तविक पाहता दिग्दर्शक जीतू जोसेफने यापूर्वी इतरही बऱ्याच चित्रपटांसोबत ‘दृश्यम’ (२०१३) हा मल्याळम रहस्य-थरारपट दिग्दर्शित केलेला असल्याने त्याचा हा बॉलिवुडमधील दिग्दर्शकीय पदार्पण असलेला चित्रपट काही प्रमाणात खिळवून ठेवणारा असणं अपेक्षित होतं. मात्र तसं काहीच न घडता दर शुक्रवारी समोर येणाऱ्या चित्रपटांमध्ये आणखी एका रटाळ, प्रभावहीन नि कंटाळवाण्या चित्रपटाची भर पडते. रहस्य-थरारपटातही अनावश्यक गाण्यांचा समावेश करत त्यांना एखाद्या म्युजिक व्हिडिओच्या धर्तीवरील दृश्यपातळीवर सादर केलं जातं. 

‘द बॉडी’बाबत होतं असं की, तो नुसता या चित्रपटप्रकारातून त्या चित्रपटप्रकारात उड्या मारत राहतो. एकीकडे त्याला थरारपट बनत रहस्य सोडवायचं असतं, तर दुसरीकडे मानसशास्त्रीय थरारपट बनत त्यातील पात्राला (नि न जाणो कुठल्या प्रेक्षकाला) समोरील दृश्यं खरंच घडत आहेत की नाहीत, असे प्रश्न पाडायचे असतात. हे करत असताना जम्प स्केअर्स, वऱ्हांड्यात फिरणारा मृतदेह वापरून घाबरवायचंदेखील असतं. मध्येच तो भट कॅम्पच्या चित्रपटांप्रमाणे उफाड्याच्या नायिका दाखवत गाणीही दाखवायची असतात. दरम्यान अर्धाअधिक कथाभाग उरकला तरी नेमकं काय करायचं आहे हेही ठरत नाही, आणि चित्रपट काही प्रभाव पाडत नाही. नि शेवटाकडे जात येणारा ट्विस्टदेखील आधीच गोंधळलेल्या आणि खिळवून ठेवण्यात अपयशी ठरलेल्या या चित्रपटाला वाचवू शकत नाही. चित्रपटाला एक श्रेय नक्कीच द्यावं लागेल, ते म्हणजे रावलचं पात्र काही चांगले विनोद करतं. 

सोभिता धुलीपला चित्रपटभर कमी-अधिक फरकाने, मख्ख चेहऱ्याने वावरत राहते. ऋषी कपूर नि इमरान हाश्मी कंटाळवाण्या चित्रपटातही बऱ्यापैकी प्रभावी कामगिरी करतात. वेदिका कुमार फक्त अधूनमधून दिसत राहते. क्लिंटन सिरेजोचं पार्श्वसंगीत चित्रपटातील गाण्यांपेक्षा उत्तम नि एखाद्या थरारपटात शोभावंसं आहे. मात्र ते ज्या दृश्यांना साथ देतं, ती दृश्यंच इथे अपेक्षित तो परिणाम साधत नसल्याचं वारंवार दिसतं. 

बाकी या रटाळ रहस्य उकलीत ना फारसं रहस्य आहे, ना फारशी उकल. कारण, चित्रपटकर्त्यांच्या सोयीनुसार सगळं काही घडत राहतं. सदर चित्रपट नक्कीच अधिक चांगला होऊ शकला असता, मात्र त्यासाठी व्यावसायिक गणितांच्या पलीकडे जातात थिल्लरपणा न करता कथानक समोर मांडावं लागलं असतं नि सदर चित्रपटकर्ते तरी हा धोका पत्करण्यास तयार नसल्याचं दिसतं. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......