मुनिश्री तरुण सागर : शांती व क्रांती यांना एकत्र आणणारा दुवा
दिवाळी २०१८ - माणसं : कालची, आजची, उद्याची
डॉ. संतोष कोटी
  • मुनि तरुण सागर महाराज
  • Tue , 30 October 2018
  • दिवाळी २०१८ माणसं : कालची आजची उद्याची मुनि तरुण सागर Tarun Sagar Maharaj

वयाच्या १३ व्या वर्षी गृहत्याग करून जैन संन्यास धारण करण्याचा इतिहास करणारे योगी मुनीश्री तरुण सागर आपल्या व्यापक, उदार आणि क्रांतिकारी चिंतनामुळे शांती व क्रांती यांना एकत्र आणणारा दुवा बनले आहेत.

मुनिश्रींचा जन्म २६ जून १९६७ रोजी मध्य प्रदेशातील दगोह जिल्ह्यात गुंहची या गावी श्रीमती शांतिबाई जैन व श्री प्रतापचंद्र जैन या माता-पित्याच्या पोटी झाला. लौकिक अर्थाने माध्यमिक शाळेचे शिक्षण त्यांनी स्वग्रामीच घेतले. माता-पित्यांनी त्यांचे नाव पवनकुमार असे ठेवले होते. १३ वर्षांचा असताना पवनकुमारने आपल्या भावाच्या दुकानात बसला असताना दूरवरून येणारा एक आवाज ऐकला. ‘प्रभू, तुला बोलवत आहेत, तू कुठे मग्न आहेस?,’ हा आवाज एका जैन साधूचा होता, जे बुंदेलखंडच्या त्या छोट्याशा गावात आलेले होते. ते उपदेश करत होते, धर्माचा प्रसार करत होते. मुनिश्रींच्या या धर्मसभेत उपस्थित असणार्‍या कोणत्याच भक्तांवर या उपदेशाचा प्रभाव पडला नाही. परंतु दुकानात बसलेल्या त्या छोट्या बालकाला वाटले की, हे उदबोधन फक्त त्याच्यासाठीच आहे. प्रभू दुसर्‍या कोणाला नसून, त्यालाच बोलवत आहेत.

घरी जाताच त्या बालकाने हट्ट धरला की, घर सोडून तो मुनींबरोबर विहार करणार. त्यागी व तपस्वी बनणार. घरच्यांनी खूप समजावले, परंतु बालक पवनकुमारवर त्यांच्या समजावण्याचा किंवा रागावण्याचा काहीच परिणाम झाला नाही. थकून शेवटी घरचे बालक पवनकुमारला आचार्य पुष्पदंत सागरजी यांच्याकडे घेऊन गेले. मुनीश्रींनी सांगितले की, हे बालक आता कोणाच्याच सांगण्याने थांबणार नाही.

अशा रीतीने बालक पवनकुमार वयाच्या १३ व्या वर्षी ब्रह्मचर्यव्रत धारण करून आपल्या घरचा, आप्तेष्ठांचा त्याग करून आचार्य पुष्पदंतांच्या शिष्यत्वात सामील झाले. वयाची १५ वर्षे पूर्ण होताच त्याने ऐलक दीक्षा घेतली व २१ वर्षे २५ दिवस या वयात म्हणजे २५ जुलै १९८८ या दिवशी दिगंबर मुनि दीक्षा घेतली.

मध्य प्रदेशच्या छोट्याशा गावात जन्मलेल्या बालक पवनकुमारला आज जैन-अजैन समाज, संपूर्ण जग ‘मुनि तरुण सागर’ या नावाने ओळखते. ज्यांच्या क्रांतिकारी कडव्या प्रवचनांनी संपूर्ण जगात शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी मानवजातीला जगण्यासोबत मरण्याचीसुद्धा कला बहाल केली.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://tinyurl.com/yajwg4nj

.............................................................................................................................................

संपूर्ण जगात शांती प्रस्थापित करण्याचे मुनिश्री तरुण सागरजींचे स्वप्न हे त्यांच्या शिकवणीतूनच पूर्ण होऊ शकते. ते आपल्या प्रवचनात म्हणतात, ‘‘मी महावीराला चौकात उभा करू इच्छितो, मी रामाला चौकात उभा करू इच्छितो. त्यामुळे मी आजकाल तुमच्या मंदिरात प्रवचन देणे बंद केले आहे. माझं लक्ष्य आहे, महावीरांना जैनांपासून मुक्त करणं. मी महावीराला मंदिरातून मुक्त होऊन चौकात उभे असलेला पाहू इच्छितो. आणि ज्या दिवशी महावीर चौकात उभे असतील, त्या दिवशी या समाजात, राष्ट्रात व विश्वात एक क्रांतिकारी परिवर्तन होईल. संपूर्ण जग वेगळं, बदललेलं दिसेल, संपूर्ण विश्वाचं परिदृश्य बदललेलं जाणवेल. आणि जग जे भ्रष्टाचार, गलिच्छ राजकारण, भाषावाद, चारित्र्यहनन, विघटनकारी जातिवाद आणि देशाला विभाजित करणार्‍या संप्रदायवादानं भरलेलं आहे, या सर्व गोष्टी आपोआप नष्ट होतील.”

मुनिश्री पुढे म्हणतात, “मी म्हणतो ते सत्य आहे. जेव्हा मी मंदिरात जातो, तेव्हा महावीर मला म्हणतात, ‘तरुण सागर! तू मला मुक्त कर, इथं माझा श्वास कोंडतो आहे. माझे प्राण मुक्त होण्यासाठी धडपडत आहेत.’ त्यामुळे मी संकल्प केला आहे महावीरांना जैनांपासून मुक्त करण्याचा. आणि मला पूर्ण विश्वास आहे की महावीर जैनांपासून मुक्त व्हावेत. त्यामुळे त्यांचा संदेश, त्यांची चर्चा सर्वांसमोर येईल. मी महावीरांना सार्वजनिक बनवू इच्छितो. मला वाटतं की, महावीर ही फक्त जैनांची संपत्ती बनून राहू नयेत. ते सर्वांचे व्हावेत. माझी मान्यता आहे की, महापुरुषांवर कोणत्याही जाति-वर्ग विशेषाचा शिक्का बसू नये. महापुरुष, तीर्थंकर व अवतार सर्वांचेच आहेत. ज्या प्रकारे आई कोणत्याही एका अपत्याची जहागिरी नसते. आईवर सगळ्या मुलांचा समान अधिकार असतो. त्याच प्रकारे महापुरुष संपूर्ण मानवजातीचा प्राण असतात. त्यांच्यावर एकाधिकार गाजवणे हे कुचेष्ठापूर्ण आहे.’’

‘‘माझ्यासाठी तो दिवस सौभाग्यशाली असेल सर्व वर्गातील सर्व स्तरांचे लोक म्हणतील की, महावीर आमचे आहेत. भगवान महावीरांनी जी वाट दाखवली आहे, ती सर्वोदय तीर्थ आहे. त्यांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या संकल्पनेची मांडणी न करता ‘सर्व जनहिताय, सर्व जन सुखाय’ या तत्त्वाची मांडणी केली. त्यांच्या उपदेशात एकेंद्रियापासून पंचेद्रियापर्यंतच्या रक्षणाचे सार सामावले आहे.’’ मुनिश्री महावीरांची ही भावना सामान्य जनांपर्यत पोहचवू इच्छितात.

मुनिश्रींचे चरित्र फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांचे सन्यस्त जीवन संपूर्ण जगासमोर आदर्श आहे. १९८२ ते २०१८ पर्यंतच्या संयमी जीवनप्रवासातून मुनिश्रींनी एक आदर्श समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या जीवनाबद्दल बोलताना ते म्हणतात, ‘‘माझ्या आयुष्यात मी उतार कमी चढ जास्त पाहिले. पुण्य प्रकृती इतकी प्रभावी होती की, ज्याचा विचार केला ते झाले, जे मागितले ते मिळाले, अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले. स्वतःच्या नशिबाबद्दलही काही तक्रार नाही. या जगात पुण्य खूप मोठी गोष्ट आहे. खर्‍या अर्थानं पुण्यच सर्वांत मोठा सुरक्षारक्षक आहे.’’

१८ जानेवारी १९८२ रोजी अकलतरा (छत्तीससगड) मध्ये आचार्य श्री पुष्पदंत सागरजी तरुण सागरांना मुनि दीक्षा देत होते. त्यावेळी अधिकांश जैन समाज व संघ या विरोधात होता. इंदौरचे देवकुमार सिंह कासलीवाल, कैलाशचंद चौधरी, नेमीचंद जैन ही सर्व मंडळी तिथे उपस्थित होती. त्यांचे म्हणणे होते की, छोट्याशा वयात साधू जीवनाची कठोर शिस्त हा मुलगा कसा निभावू शकेल? आणि उद्या काही अनिष्ट घडले तर या धर्म-अप्रभावनेस कोण जबाबदार असेल? लोकांच्या या प्रश्‍नांची उत्तरे देताना आचार्य श्रींनी समाज व संघाला संपूर्ण विश्वासाने आश्‍वासित केले की, ‘‘तरुण सागरजींच्या बाबतीत आपण पूर्ण निश्चिंत रहावे, त्यांना पारखून घेतले आहे आणि हे श्रमण-संस्कृतीचे नवीन आयाम प्रस्तुत करणार आहोत.’’ गुरु पारखी असतात हेच खरे. तरुण सागर यांच्या क्षमता आचार्यश्रींनी बरोबर ओळखल्या होत्या.

संघामध्ये तरुण सागर यांचे अध्ययन सुरू झाले. दररोज रत्नकरंड श्रावकाचार, द्रव्यसंग्रह, नाममाला, तत्त्वार्यसूत्रसारख्या ग्रंथातील १५-१५, २०-२० श्लोक कंठस्थ करावे लागत होते. लक्षात ठेवले नाही तर शिक्षा मिळत होती. संपूर्ण दिवस अध्ययन व लेखनातच जात होता. तिथे एकूण चार ब्रह्मचारी होते. जबलपूरवरून पं. मोहनलाल शास्त्री संस्कृत शिकवण्यासाठी येत होते. अभ्यासाच्या बाबतीत ते फारच कडक होते. संस्कृतचा धडा पाठ करायला सांगून भिंतीकडे तोंड करून उभे रहायला लावत. जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत बसायचे नाही. सलग दोन-तीन तास उभे राहणे. संघाची शिस्तही त्यावेळी फार कडक होती. ब्रह्मचारी असो की, साधू कोणासही श्रावकासोबत बोलण्याची परवानगी नसे.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/yaj8ppqa

.............................................................................................................................................

१९८८ मध्ये छिंदवाडा येथे चातुर्मास होता. चातुर्मासाच्या दुसर्‍याच दिवशी आचार्यजींनी तरुण सागर यांची पं. शरद बनारसींसोबत ओळख करून दिली आणि सकाळची पूजा व अभिषेक त्यांच्यासोबतच करण्यास सांगितले. त्यांच्याशिवाय इतर कोणासोबतही संपर्क ठेवू नये असे सांगितले. चातुर्मास संपला. तरुण सागर यांचा बनारसीजींशिवाय इतर कोणाशीही परिचय नव्हता. त्यांनी आपल्या गुरुंचा आदेश पाळला. कोणाशी संपर्क नाही, बोलणे नाही. भोजनासाठी मौनात जाणे, मौनात येणे, मौनातच भोजन ग्रहण करणे असा आदेश होता व त्याचे कठोर पालन त्यांनी केले. त्यांना आपली वस्त्रे स्वतःच धुवावी लागत. त्यासाठी आठवड्यातून एकच साबण असे. क्षुल्लक अवस्थेमध्ये आपले सामान/बॅग खांद्यावर टाकून निहार करावा लागे. गुरुच्या परवानगीशिवाय श्रावकाकडून आपल्यासाठी कोणतेही साहित्य मागता येत नसे. तेच अनुशासन, कठोर गुरुभक्ती ही पुढील जीवनात त्यांची चर्या बनली.

मुनिश्री जेव्हा संघापासून अलग झाले, तेव्हा त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते. त्यांनी ते स्वीकारले व यशस्वीही झाले. १९९२ मध्ये ते सिहोर (मध्य प्रदेश) मध्ये होते. तेथून भोपाळ ४० कि.मी. दूर होते. मुनिश्रींना समजले की, भोपाळमध्ये मुनिंच्या प्रवेशावर एक प्रकारे अघोषित निर्बंध आहेत. कारण भोपाळ हे एक मुस्लीमबहुल शहर आहे. मुनिश्रींना वाटले की, मध्य प्रदेश हा जैनांचा गढ आहे व त्याच्या राजधानीतच जैन मुनिंना प्रवेशास बंदी असावी हे योग्य नाही. ही गोष्ट त्यांच्या सहनशक्तींच्या पलीकडची होती. त्यांनी सिहोर समाजाला सांगितले की, त्यांना भोपाळला जायचे आहे. सिहोर समाजाने सांगितले की, आम्ही आपणास भोपाळला जाऊ देणार नाही. भोपाळ समाजाला आपण येणार असल्याचा निरोप मुनिश्रींनी पाठवला. भोपाळ समाजाने विनंती केली की, मुनिश्रींनी भोपाळला येऊ नये. जर येथे काही अनुचित घडले तर? परंतु मुनिश्रींनी कोणत्याही परिस्थितीत भोपाळला जायचेच याचा निश्‍चय केला व ते तिथे गेले. समाजाने घाबरलेल्या परंतु उत्साही मनाने मुनिश्रींचे स्वागत केले. संपूर्ण प्रशासन मुनिश्रींच्या व्यवस्थेत जुटला.

दुसर्‍या दिवसापासून मुनिश्रींनी भोपाळच्या प्रसिद्ध जामा मशिदीसमोर आपल्या प्रवचनांची श्रृंखला सुरू केली. या प्रभावाने संपूर्ण राजधानी जागृत झाली. यामध्ये जैन, वैष्णव व शिखांसोबतच संख्येने मुस्लिम समाज संमिलीत झाला. अशा प्रकारे भोपाळ शहरात जैन मुनिंच्या प्रवेशाचा एक नवा आध्याय रचला गेला. मुनिश्री म्हणतात, ‘‘ही माझ्या जीवनाची पहिली क्रांती होती व आज मी गर्वाने सांगू शकतो की, माझ्या क्रांतीकारी व्यक्तिमत्त्वाची सुरुवात भोपाळ शहरातून झाली.”

मुनिश्री सुरुवातीपासूनच आशावादी राहिले आहेत. आत्मविश्वास ही त्यांची सर्वांत मोठी ताकद आहे. नव्या शतकाच्या सुरुवातीला १ जानेवारी २००० रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मुनिश्रींची सभा होती. ज्यामध्ये संपूर्ण देशभरातून लाखो लोक उपस्थित राहतील असे अनुमान होते. आपणा माहीत असेल की, डिसेंबरचा शेवट ते जानेवारीची सुरुवात या काळात दिल्लीत दाट धुके असते. ज्यामुळे दुपारी १२ वाजतासुद्धा चार फुटांपलीकडचे काही दिसत नाही. ही अवस्था लक्षात घेता एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राच्या पत्रकाराने मुनिश्रींना प्रश्‍न केला की ‘‘या कडाक्याच्या थंडीत सकाळी आठ वाजता आपले प्रवचन ऐकण्यासाठी कोण येणार?’’ त्या वेळी मुनिश्री त्या पत्रकाराला म्हणाले, ‘‘कोणी येवो अथवा न येवो, तू मात्र नक्की येणार.’’ मुनिश्रींच्या या उत्तराने तो पत्रकार दंग राहिला. दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा मुनिश्री सभेला संबोधित करण्यासाठी लाल किल्ल्यावर पोहोचले, तेव्हा हजारो लोकांच्या समूहात तो पत्रकारही उपस्थित होता. मुनिश्रींनी नंतर भेटल्यावर त्याला विचारले की, तू इथे कसा? तो म्हणाला, ‘‘मी रात्रभर झोपू शकलो नाही. मला सतत वाटत होते की, आपण माझ्या उशाजवळ उभे आहात आणि मला म्हणत आहात, ‘चल उठ, तुला सभेला जायचे नाही?’ ’’ कडाक्याच्या थंडीतही लोक आपले विचार ऐकायला येतील हा मुनिश्रींचा आत्मविश्वास होता आणि झालेही तसेच. लाल किल्ला मैदानावर अहिंसा-महाकुंभ सभेला संबोधित करताना मुनिश्री म्हणाले, ‘‘मी तरुण सागर मुनि, आचार्य पुष्पदंताचा लाल (मानसपुत्र-हिरा) आहे. लालकृष्ण अडवाणी आणि लालबिहारी तिवारी या दोघांच्या मध्ये बसलो आहे. माझ्यासमोर लाल मंदिर आहे व माझ्या मागे लाल किल्ला आहे. लाल किल्ल्याच्या मैदानावरून मी सांगतोय की, गायीच्या ‘लाल’वर कृपा करा. तो तुमच्या-माझ्यासारखा ‘लाल’ असू दे, ‘हलाल’ न होवो.

मुनिश्री म्हणायचे की, “प्रत्येक साधक ही एक आगकाडी आहे. त्याच्यामध्ये आग आहे. मी फक्त त्याला रगडण्याचे काम करतो. कुरुक्षेत्रात श्रीकृष्णाने गीता सांगितली, तेव्हा तिथे एकमेव श्रोता होता- अर्जुन. ती गीता आज लाखो-करोडो श्रोते ऐकतात. माझ्या क्रांतिकारी विचारांना एकही श्रोता मिळाला तर पुरेसे आहे व माझ्या शोध त्याच दिशेने सुरू आहे.”

मुनिश्रींच्या ‘कडवे प्रवचन’च्या श्रृंखलेने संपूर्ण विश्वात जागृतीचे कार्य केले. अहिंसा, जैनाचार, राष्ट्रवाद, देशभक्ती, राजकारण, समाजकारण, शिक्षण, संस्कार, भक्ती असे अनेक विषय त्यांनी आपल्या प्रवचनातून हाताळले. सर्व विषयांमधून तरुण वर्गाचे प्रबोधन करणे, त्यांच्यामध्ये जागृती आणणे व भरकटलेल्या वाटेवरून त्यांना सन्मार्गावर आणणे हा त्यांचा मूळ हेतू होता. आपल्या प्रवचनात मुनिश्री म्हणतात, ‘‘एकदा माझ्याकडे एक सदगृहस्थ आले. त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होते. त्या व्यक्तीचा परिचय करून देताना सांगितले की, मुनिश्री हे फार मोठे व्यक्ती आहेत. मी त्यांना चोहोकडून न्याहाळले व म्हणालो, ‘अरे, कसले मोठे? तू पाच फूट सहा इंचाचा आहेस. हेसुद्धा पाच फूट सहा इंच आहेत. मग मोठे कसे?’ ते सज्जन म्हणाले, ‘मुनिश्री, हे असे मोठे नाही, तसे मोठे आहेत.’ ‘तसे म्हणजे कसे?’ तो म्हणाला, ‘हे पैशाने मोठे आहेत. खूप धनी आहेत. यांच्या घरी १५-२० नोकर काम करतात. सर्व काम नोकरच करतात हे गादीवर बसून असतात. पाण्याचा ग्लाससुद्धा यांना स्वतःला उचलावा लागत नाही.’’

मुनिश्री म्हणाले, “हा कसला मोठा माणूस? हा तर निकम्मा माणूस आहे. मोठा माणूस तो नव्हे ज्याच्या घरी चार-चार नोकर काम करतात. मोठा माणूस तर तो आहे, जो स्वतः चार-चार नोकरांचे काम एकटा करतो. मोठा तो आहे ज्याने श्रमाला प्रतिष्ठा दिली आहे. जो कष्टाची व परिश्रमाची भाकरी खातो. जो घामाची-कष्टाची कमाई खातो, तो मोठा; जो दुसर्‍यांचे कष्ट खातो तो निकम्मा.”

जीवन व मृत्यू यावर मुनिश्रींनी खूप चिंतनपूर्वक विधान केलेले आहे. मृत्यू जीवनाचे अंतिम सत्य आहे. परंतु माणूस त्या सत्यापासून सतत दूर जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्या एका प्रवचनात मुनिश्री म्हणतात, ‘‘मी ज्या ठिकाणी उतरलो आहे, तिथून काल रात्री एक वरात चालली होती. त्या वरातीत एक गाणे वाजवले जात होते- ‘डोली सजा के रखना...’ गाण्याच्या या ओळी मी जेव्हा ऐकल्या, तेव्हा माझे चिंतन सुरू झाले. ते चिंतनच आज मी आपल्यासमोर मांडणार आहे. जीवनामध्ये दोन प्रकारच्या डोली सजवल्या जातात. एक नववधूसाठीची व दुसरी प्रेतासाठीची. डोली सजवून ठेवणार्‍यांना मी तरुण सागर एकच सांगू इच्छितो, हे डोली सजवून ठेवणार्‍यांनो आपली अर्थीपण सजवून ठेवा. कोण सांगावे कधी मृत्यू येईल व अर्थीवर चढावे लागेल.

जे जिवंतपणी आपली अर्थी सजवतात केवळ त्यांनाच जीवनाचा अर्थ उमगतो व खर्‍या अर्थाने तेच जीवनाचा आनंद उपभोगू शकतात. बाकी सर्व तर जिवंत आहोत व श्‍वास चालतोय म्हणून जगत असतात. आज मनुष्याला डोली सजवून ठेवणे लक्षात आहे. परंतु अर्थी सजवण्यास तो विसरला आहे. हेच कारण आहे की आज समाजात, देशात व संपूर्ण विश्‍वात अफरातफरी माजली आहे, पाप-दंगे-खून व मारामार्‍या होत आहेत. भ्रष्टाचार, आतंक, हिंसा, हत्या आणि बर्बरता माजली आहे. तर मानवाने सजलेल्या डोलीत आपली सजलेली अर्थी पाहिली तर समाजात आमूलाग्र परिवर्तन होईल.”

याचे रूपकात्मक उदाहरण देताना मुनिश्री म्हणतात, समोरून एक डोली येत होती व इकडून एक अर्थी चालली होती. दोघींचा जेव्हा सामना झाला, तेव्हा अर्थी डोलीला म्हणाली -

डोली तुझी ही आहे, डोली माझीही आहे,

चार तुझ्याकडेही आहे, चार माझ्याकडेही आहेत,

फुल तुझ्यावरही आहेत, फुल माझ्यावरही आहेत,

रडणारे तुझ्याकडेही आहेत, रडणारे माझ्याकडेही आहेत

आपल्या दोघांमध्ये फरक इतकाच आहे

कि मी संसारातून जात आहे व तू संसारात येत आहेस.

डोलीत अर्थीमध्ये फक्त एवढेच अंतर आहे की, डोली ही या संसारात येणार्‍याची असते व अर्थी संसार सोडून जाणार्‍याची असते.

मुनिश्री सांगतात की, वृद्धांची संगती करा. कारण त्यांच्या एक-एक सुरकुत्यांवर हजारो अनुभव लिहिलेले असतात. त्यांचे कापते हात, हलती मान, लडखडते पाय, सुकलेला चेहरा संदेश देतो की, जे काही करायचे आहे ते आजच करून घ्या, उद्या काही करू शकणार नाही. वृद्ध माणूस या धरतीवरील सर्वांत मोठे विद्यालय आहे. त्यांच्याकडे पाहून उगवत्या सूर्याच्या मावळत्या कथेचा बोध होतो.

भ्रष्टाचारावर आपले विचार व्यक्त करताना मुनिश्री म्हणतात, “आज माणसाची भूक इतकी वाढली आहे की, तो आज संस्कृती, आदर्श व नैतिक मूल्येसुद्धा खाऊन टाकत आहे. पूर्वी जेव्हा मानव जंगली व आदिम होता, तेव्हा तो कंदमुळे खात होता. थोडा समजदार झाल्यानंतर त्याने अन्न खायला सुरुवात केली. आता सभ्य झाल्यानंतर तो पैसे खाऊ लागला आहे. लक्षात ठेवा, पोट पैशाने नाही भाकरीने भरते.”

ते पुढे म्हणतात, भाकरी बिघडली, काही नाही होणार, ठीक आहे, कामधंदा बिघडला ठीक आहे, मुलगा-सून बिघडले तरी जास्त चिंता करू नका, परंतु आपल्या मनाला बिघडू देऊ नका. कारण त्यातच परमात्म्याचा वास आहे. जर मन, हृदय बिघडलं तर मृत्यू निश्चित आहे, अंत निश्चित आहे.

आपल्या जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण असते. गुरुशिवाय आपले जीवन सन्मार्गी लागू शकत नाही. हे सांगताना मुनिश्री म्हणतात, ‘‘रावणाने विचार केला होता की, समुद्राचे पाणी गोड करीन, चंद्राचा कलंक काढून टाकीन, स्वर्गापर्यंत शिडी लावेन, पण काहीच करू शकला नाही. रावणाजवळ शक्ती, संपत्ती, बुद्धी सर्व काही होते, पण काय नव्हतं तर तो म्हणजे गुरु. गुरुविणा शक्ती, संपत्ती व बुद्धी किती अनर्थ करते याचं रावण प्रत्यक्ष उदाहरण आहे. आपल्या जीवनात गुरु निश्चित बनवा. भले तो मातीचा द्रोणाचार्य का असेना.’’

आणि त्यामुळेच आपल्या तपस्वी जीवनाचे सारे श्रेय मुनिश्री आपले गुरु आचार्य श्री पुष्पदंत सागर यांना देतात. ते म्हणतात, ‘‘आचार्य श्री पुष्पदंत सागरजींची सुरुवातीपासूनच माझ्यावर कृपादृष्टी राहिली आहे. आमच्या दोघांच्या विचारात व काम करण्याच्या पद्धतीत फरक आहे. परंतु त्यांच्याकडे एक गोष्ट आहे, जिच्याने मी सर्वाधिक प्रभावित झालो. ती म्हणजे त्यांची सरलता. त्यांच्या सरलतेला समजून घेणे हे काही सरळ काम नाही.’’

मुनिश्रींनी जे विचार मांडले, त्यांचे तंतोतंत पालन केले. मृत्यू हा त्यांच्या दृष्टीने मुक्ती महोत्सव होता. शरीर व्याधीग्रस्त झाल्यावर मुनिश्रींनी अनेकांनी विनवणी, आग्रह करूनसुद्धा उपचार करून घेण्यास नकार दिला. इतरांना सतत आपली अर्थी सजलेली आहे याचे भान ठेवा हे सांगणारे मुनिश्री स्वतःची अर्थी सजलेली पाहत होते. मृत्यूला न घाबरता त्याला सोबती म्हणून स्वीकारले. आपल्या गुरुंची परवानगी घेऊन त्यांनी सर्व प्रकारच्या आहाराचा त्याग केला. सर्वांची क्षमा मागितली व यमसल्लेखना धारण केली. १ सप्टेंबर २०१८ रोजी पहाटे ३.१८ मिनिटांनी राष्ट्रसंत मुनिश्री तरुण सागर महाराजांची दिल्ली येथे सल्लेखनापूर्वक समाधी झाली.

संपूर्ण विश्‍वात आपल्या विचारांच्या क्रांतीने शांती प्रस्थापित करू पाहणारे राष्ट्रसंत मुनिश्री तरुण सागर यांची खरेच समाज, राष्ट्र व विश्‍वाला गरज होती. परंतु जीवनापेक्षा तत्त्वांना महत्त्वाचे मानून त्यांनी मुक्तीमार्ग स्वीकारला. दिल्लीजवळ तरुण सागरम येथे महाराजांचा अंतिम संस्कार करण्यात आला. ते स्थान नेहमीच सर्वांना प्रेरणादायी तीर्थ म्हणून अस्तित्वात असेल. त्यांची शिकवण हेच आमच्या जीवनाचे ध्येय बनो ही प्रार्थना.

.............................................................................................................................................

लेखक डॉ. संतोष विजयकुमार कोटी वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स (सोलापूर)चे प्राचार्य आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 03 November 2018

ज्या माणसाने आयुष्यभर साधना केली त्याला वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी इतक्या तरुण वयात मृत्यू का यावा? याचं कारण असं की मुनीश्रींनी समष्टीचं पाप आपल्या अंगावर घेतलं. सत्पुरुषांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून समष्टी (म्हणजे अखिल सृष्टी) पुण्यवान करणे ही समाजातल्या सर्वांची जबाबदारी आहे. असो. मुनीश्रींच्या स्मृतीस अनेकवार वंदन. त्यांना अभिप्रेत असलेले महावीर व राम आपण आपल्या हृदयात जोपासणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. -गामा पैलवान


Prashant Khot

Tue , 30 October 2018

सूंदर लेख... क्रांतिकारक विचार


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख