जेव्हा अहिल्या, सीता आणि द्रौपदीला ‘#MeToo’ म्हणायचं होतं...
अर्धेजग - कळीचे प्रश्न
अनुज घाणेकर
  • अहिल्या (राजा रविवर्मा), सीता आणि द्रौपदी यांची प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 16 October 2018
  • अर्धेजग कळीचे प्रश्न मी टू #MeToo महाभारत Mahabharata द्रौपदी Draupadi अहिल्या Ahalya रामायण Ramayana सीता Sita

कथा पहिली

अहिल्येच्या सौंदर्यानं भूललेला इंद्र तिचे पती गौतम ऋषीचं रूप घेऊन आला आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये अहिल्येबरोबर रत झाला. घरी परतल्यावर ऋषींना प्रकार कळला. क्रोधित होऊन त्यांनी अहिल्येला शाप दिला- ‘तू शिळा होशील’. रडून माफी मागणाऱ्या अहिल्येला ‘रामाच्या स्पर्शानं तू पुन्हा स्त्री होशील’ असा उ:शाप मिळाला.

कथा दुसरी

वासनेच्या आहारी जाऊन रावणानं फसवून सीतेला पळवून नेलं. पण तो सीतेला स्पर्श करू शकला नाही (किंवा त्यानं केला नाही). रामानं सीतेची सुटका केली. अयोध्येला परतल्यावर एका धोब्याच्या शंकेचं निरसन करण्यासाठी, आपलं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी सीतेनं अग्निपरीक्षा दिली (किंवा तिला द्यावी लागली).

कथा तिसरी

द्यूतात सर्व काही हरलेल्या पांडवांनी द्रौपदीलाही पणास लावलं. मासिक धर्म म्हणून आतल्या महालात बसलेल्या द्रौपदीला दु:शासनानं केस धरून ओढत आणलं, अपशब्द आणि कुत्सित हास्याच्या माऱ्यासोबत भर दरबारात तिचं वस्त्र फेडलं गेलं. आपल्या मांडीकडे निर्देश करून ‘तुझी जागा इथं आहे’ असं दुर्योधनानं चिथावलं, तर कौरवांनी हसून तिची विटंबना केली. संतापानं उद्रेक झालेल्या द्रौपदीनं पांडवांना, भीष्म-द्रोणांना खडे बोल सुनावले. पण या घटनेनंतर ‘महाभारताला जबाबदार कोण? तर द्रौपदी!’ हा शिक्का तिच्या माथी बसला.

रामायण-महाभारताच्या अनेक आवृत्त्यांमधल्या या काही प्रचलित कथा. तत्कालीन घटनांचा वेध घेणाऱ्या. कोणत्याही काळातलं साहित्य हेजे त्या काळातील सामाजिक घडामोडींचा आणि मानसिकतेचा आरसा असतं. आपला समाज कसा वागतो, बोलतो, प्रतिक्रिया देतो, हे नकळतपणे या कथांतून मांडलं जातं.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

सध्या वेग घेतलेली लैंगिक अत्याचारांविरुद्ध वाचा फोडणारी ‘#MeToo’ ही चळवळ न्यायपूर्ण समाजाच्या दिशेनं पडलेलं पुढचं पाऊल आहे यात शंका नाही. त्याचबरोबर घटनांचं, प्रतिक्रियांचं बारकाईनं निरीक्षण केल्यास रामायण-महाभारताचा काळाची छाप आजही आपल्या समाजमनावर किती घट्ट आहे, हे दिसून येतं.

वरील कथा आणि सध्याच्या घटना मानसिकतेचे कोणते पैलू दर्शवतात?

अधिकार गाजवणारे पुरुष आणि अधिकाराचा गैरवापर

‘#MeToo’ ही चळवळ प्रत्येक पुरुषासाठी धोका आहे, अशा प्रकारचा एक समज समाजमाध्यमांतून उमटणाऱ्या प्रतिक्रियांमधून दिसतोय. परंतु ही चळवळ, अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या, अत्याचार करणाऱ्या पुरुषांविरोधात आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

वरील कथांमधील अत्याचार करणारे आणि बघणारे सर्व पुरुष हे राजे, ऋषी किंवा वयस्कर होते. म्हणजे समाजात बडे प्रस्थ असलेले. मुळात पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये स्त्रीवर अधिकार पुरुषाचा, त्यातून त्या पुरुषांचा सामाजिक अधिकारही मोठा. अत्याचार सहन करणाऱ्या व्यक्तीचं तोंड अदृश्यपणे दाबलं जाणारच. सद्य ‘#MeToo’ घटनांमध्येसुद्धा ‘तो तर मोठा अभिनेता आहे’, ‘त्याचं समाजकार्य मोठं आहे’, ‘त्याचं व्यवस्थेतलं नाव मोठं आहे’, अशा उत्स्फूर्त सामाजिक प्रतिक्रियांमागचं कारणही हेच आहे.

याशिवाय त्या पुरुषाची सामाजिक प्रतिमा, त्याचा जातिधर्म, त्याचा कबुलीजबाब याद्वारे समाजाची सहानुभूती प्रत्यक्ष घटनेकडे कानाडोळा करते. म्हणजेच ‘ते तर ऋषी होते आणि त्यांनी मोठ्या मनानं अहिल्येला उ:शाप दिलाच की’ ही प्रतिक्रिया आणि ‘तो तर मोठा लेखक आहे आणि त्यानं कबुली दिलीय ना’ ही दोन्ही विधानं एकाच साच्यातली आहेत.

वस्तुत: अत्याचार करणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावातल्या इतर सर्व गोष्टींचा जरी स्तुतिपाठ वाचला तरी त्या व्यक्तीचा दोष आणि गंभीरता पुसली जाऊ शकत नाही.

अत्याचारात बळी ठरलेल्या स्त्रीला दोषी मानणं

अहिल्येला मिळालेला शाप असो किंवा सीतेची अग्निपरीक्षा किंवा द्रौपदीवर फोडलं गेलेलं महाभारताचं खापर, अत्याचार झालेल्या स्त्रीवर विश्वास न ठेवणं, तिच्या चारित्र्यावर शंका घेणं, ‘ती तसलीच आहे’ याचे पुरावे सादर करणं, तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करणं, हे आपल्या मानसिकतेतून पुसलं गेलेलं नाही. उदाहरणार्थ, सद्य घटनेच्या वर्तमानपत्रांतील बातम्यांवर उमटलेल्या या दोन प्रातिनिधिक प्रतिक्रिया पहा-

‘पीडित व्यक्तीला दोषी मानणं’ हा आपल्या सामाजिक मानसिकतेचा एक भीषण दु:खद कोपरा आहे. ‘ही झोपडपट्टीमधली लोकं अशीच असतात’पासून ‘आजकालच्या दारू पिणाऱ्या मुली तसल्याच’ या सर्व विधानांमध्ये एक पूर्वग्रह असतो, जो अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडण्यास आणि गुन्हेगारास शिक्षा देण्यास मारक ठरतो. ‘लोक काय म्हणतील?’ या भीतीचा बागुलबुवा पीडित व्यक्तीच्या मनात इतका मोठा असतो की, विरोधातलं पाहिलं पाऊल उचलणं हेसुद्धा महाकठीण होऊन बसतं.

वस्तुत: समाज जर संपूर्ण आधार देणारा असेल तर झालेल्या प्रत्येकच गुन्ह्यास वाचा फुटेल.

‘#MeToo’ म्हणजे ‘हो! तुझ्यासारखाच माझ्यावर अन्याय झालाय. आपण दोघी मिळून उभ्या राहू!’

अहिल्येसोबत कुणीच स्त्री नव्हती जी ‘#MeToo’ म्हणू शकली असती. धोब्यानं शंका घेतली, पण धोब्याच्या बायकोमध्ये ती शक्ती नव्हती जी सीतेसह ‘#MeToo’ म्हणू शकली असती. द्रौपदीच्या संतापग्रस्त हाकांना कोणत्याच राजस्त्रियांचा ‘#MeToo’ हा प्रतिसाद लाभला नाही.

समाजातील प्रत्येक यंत्रणा, कुटुंब, वस्ती, पोलीस किंवा न्यायव्यवस्था पुरुषसत्ताक व्यवस्थेत लहानाची मोठी झाली आहे. अशा अवस्थेत पीडित व्यक्तीला ‘आपल्याला समजून घेतलं जाईल’ हा विश्वास वाटेलच कसा? आणि हेच ‘#MeToo’सारख्या चळवळीचं यश म्हणावं लागेल. जेव्हा एक पीडित व्यक्ती आवाज उठवते, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीमध्ये हिंमत निर्माण होते आणि मग तिसऱ्या व्यक्तीमध्ये...!

आपल्या सामाजिक मानसिकतेमध्ये जशा विकृत गोष्टी फैलावतात, तशा सकारात्मक गोष्टीसुद्धा पसरू शकतात, हे चित्र आशावादी आहे.

पतिव्रतेच्या भूमिकेत शिरलेल्या अहिल्येला आपला संताप जाणवलाच नसावा...

सीतेनं स्वत:ला सिद्ध करण्याच्या आवेशात संतापाला वाट करून दिली असावी...

द्रौपदीचा संताप तिच्या शिव्याशापांतून प्रकटला असावा...

आता काही हजार वर्षांनी त्या संतापाच्या ठिणग्या एकमेकींसोबत उभ्या रहात आहेत, हेही नसे थोडके. त्याला आधार देणं, हे एक समाज म्हणून आपलं कर्तव्यच आहे.

.............................................................................................................................................

लेखक अनुज घाणेकर मानववंशशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.

anujghanekar2@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 18 October 2018

अनुज घाणेकर, तुमची तिन्ही उदाहरणं गंडली आहेत. कारण ती वस्तुस्थितीला धरून नाहीत. कशी ते पाहूया. १. मूळ वाल्मिकेय रामायणानुसार अहल्या पुण्यवती होती. इंद्र जरी गौतमांचं रूप घेऊन आला तरी तिने त्याचं मूळ रूप ओळखलेलं होतं. कारण की ती पुण्यवती होती. मात्र इंद्राचा मोह पडल्याने ती त्याच्याशी रत झाली. हा व्यभिचार आहे. म्हणून गौतम ऋषींनी अहल्येस शाप दिला. शाप पण असा की त्यासोबत उ:शापही अंतर्भूत होता. तिला मिळेल ते खाऊन गुजराण करायची अज्ञ दिली व स्वत: हिमालयात निघून गेले. विष्णूचा अवतार राम जेव्हा तुला भेटेल तेव्हा तुझा उद्धार होईल असा दिलासाही देऊन गेले. अहल्येचं व्यभिचाराचं पाप धुतलं जाण्यासाठी इतकं प्रायश्चित्त पुरेसं ठरावं. त्याप्रमाणे ती कालक्रमणा करू लागली. गौतम ऋषींनी अंतर्ज्ञानाने ताडल्याप्रमाणे राम तिच्या आश्रमात आला. विश्वामित्रांनी तिची कथा सांगितल्यावर त्यानेच तिला प्रथम वंदन केलं. यावरून तिची योग्यता ध्यानी यावी. तुम्ही गौतामांवर केलेले ‘ते तर ऋषी होते आणि त्यांनी मोठ्या मनानं अहिल्येला उ:शाप दिलाच की’ वगैरे आरोप तद्दन मेकॉलेछाप बकवास आहे. अगा जे घडलेची नाही. कुठल्याशा भिकारखोट संकल्पना पुढे रेटण्यासाठी गौतम ऋषींवर नसलेले गुन्हे थापटण्यात येताहेत. असो. २. दुसऱ्या कथेत रामाने धोब्याच्या शंकेवरून सीतात्याग केला असा आरोप आहे. मुळात उत्तरकांड प्रक्षिप्त आहे. त्यात लिहिलेलं खरं मानायचं अजिबात कारण नाही. शिवाय ती अग्निपरीक्षा सीतेने लंकेतंच दिली होती. अयोध्येशी अग्निपरीक्षेचा काहीही संबंध नाही. असो. ३. तिसऱ्या कथेत द्रौपदीस युद्धासाठी जबाबदार धरण्यात आलंय. हे नक्की कोणी धरलंय? मी तरी नाही. मी दुर्योधनाला जबाबदार धरतो. द्रौपदीस नाही. गांधारी श्रीकृष्णास जबाबदार धरते. ते एका अर्थी खरंही आहे. पण दुर्योधनाची जबाबदारी सर्वात मोठी आहे. त्याच्या अट्टाहासामुळेच युद्ध भडकलं. पांडवांना सुईच्या टोकावर मावेल इतकीही जमीन त्याला द्यायची नव्हती. सबब तो एकमेव युद्धास जबाबदार आहे. आणि हो, द्रौपदीने वस्त्रहरणाच्या वेळेस कोणालाही खडे बोल वगैरे सुनावले नाहीत. तिने फक्त प्रश्न उपस्थित केले आणि तिच्या आक्षेपांना भीष्माने उचलून धरलं. भीष्मांची आज्ञा डावलून दुर्योधन व दु:शासन यांनी तिच्या अब्रूस हात घातला. तेव्हा उगीच खयाली पुलाव पकवून लोकांच्या श्रद्धास्थानांचा उपहास करू नये म्हणून सुचवेन. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......