महिला क्रिकेटमधील मिताली ‘राज’
अर्धेजग - कळीचे प्रश्न
मिताली तवसाळकर
  • मिताली राज
  • Thu , 20 July 2017
  • अर्धे जग women world कळीचे प्रश्न मिताली राज Mithali Raj

भारतात क्रिकेट हा धर्म आहे. पण या धर्मात केवळ पुरुष क्रिकेटपटूंनाच मानाचं स्थान मिळालेलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांत पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्रिकेटच्या या धर्मात सर्वार्थानं वेगळं असं चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कप्तान मिताली राजची मैदानावरील कामगिरी यासाठी कारणीभूत ठरली. आपल्या दमदार फलंदाजीच्या बळावर मितालीच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघानं भल्या भल्या संघांना पाणी पाजलं. एवढंच नाही, तर एक दिवसीय सामन्यांत सहा हजार धावा करून विश्वविक्रम आपल्या नावे करणारी मिताली ही पहिला महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

क्रिकेटच्या मैदानावर तळपणाऱ्या मिताली राजचा नृत्यांगना ते क्रिकेटपटू हा प्रवास खरं तर एखाद्या कथेप्रमाणेच होता, असं म्हणता येईल. राजस्थानमधील जोधपूरमध्ये एका तमिळ कुटुंबात जन्माला आलेली मिताली लहानपणापासून भरतनाट्यमचे धडे गिरवत होती. तिचे वडील, दोराय राज हे भारतीय वायू दलात अधिकारी होते. सैन्याची पार्श्वभूमी असल्यामुळे राज कुटुंबीयांना शिस्तीचं बाळकडूच लाभलेलं, पण मिताली मात्र याला अपवाद. सकाळी उशिरा उठण्याची तिची सवय मोडण्यासाठी म्हणून आई-वडिलांनी मितालीला तिच्या थोरल्या भावासोबत क्रिकेटचे धडे गिरवायला पाठवलं. आठ वर्षं नृत्याची आराधना करणाऱ्या मितालीला क्रिकेटच्या बॅटने भुलवलं आणि मग पायातल्या घुंगरांची जागा पॅड आणि बॅटनं घेतली. भरतनाट्यम शिकून नृत्यांगना होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मितालीने मग क्रिकेटच्या प्रेमापायी शास्त्रीय नृत्याला रामराम ठोकला. दहाव्या वर्षी क्रिक्रेटचे धडे गिरवायला सुरुवात करणारी मिताली अवघ्या १७ व्या वर्षी भारतीय संघात दाखल झाली. भारतीय महिला संघामध्ये अष्टपैलू खेळाडूची भूमिका साकारणारी मिताली उजव्या हातानं फलंदाजी तसंच, लेग ब्रेक गोलंदाजीही (पार्ट टाइम) करते.

वायू दलातील सेवा पूर्ण झाल्यावर दोराय राज एका बँकेत नोकरी करू लागले. त्या वेळी हैदराबादमधील सेंट जॉन्स स्कूलमधील क्रिकेट शिबिरात मितालीला दाखल करण्यात आलं. या क्रिकेट शिबिरात फारशा मुली नसल्यामुळे अनेकदा तिने मुलांसोबतच नेटमध्ये सराव केला. मितालीच्या भावापेक्षा मितालीमध्ये क्रिकेटपटूचे गुण असल्याचं दोराय राज यांचे मित्र ज्योती प्रसाद यांनी ओळखलं. तिच्यातील ‘गेम’ लक्षात आल्यामुळे तिनं शास्त्रशुद्ध क्रिकेटचे धडे गिरवावे, असं ज्योती प्रसाद यांनी दोराय राज यांना सुचवलं. परिणामी, सेंट जॉन्समधून मितालीला सिकंदराबाद इथल्या कीज गर्ल्स हायस्कूलमध्ये पाठवण्यात आलं. तेथील प्रशिक्षक संपतकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मितालीनं क्रिकेटचे धडे गिरवले. संपतकुमार अतिशिय शिस्तप्रिय होते. मितालीला साधारण एक वर्ष प्रशिक्षण दिल्यावर त्यांनी दोराय यांना बोलावून मितालीच्या प्रगतीबद्दल सांगितलं. मिताली भारताकडून क्रिकेट तर खेळेलच, शिवाय ती विक्रमही करेल अशी भविष्यवाणी संपतकुमार यांनी तेव्हाच वर्तवली होती. संपतकुमार यांचे ते शब्द आज खरे झालेले आपण सगळेच पाहत आहोत.

१९९७ सालच्या संभाव्य भारतीय महिला क्रिकेट संघासाठी मितालीचं नाव जाहीर झालं, तरी अंतिम यादीत तिला स्थान मिळालं नाही. त्यावेळी तिचं वय होतं, केवळ १४ वर्षं. पण तेव्हापासून तिनं मागे वळून पाहिलेलं नाही. १९९९ मध्ये आर्यलंडच्या विरोधात मितालीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय सामन्यातून पदार्पण केलं. या सामन्यात नाबाद ११४ धावांची खेळी तिनं साकारली. मितालीनं हे शतक केलं तेव्हा तिचं वय १७ वर्ष पूर्णही नव्हतं. इतक्या कमी वयात शतक करणारी आणि पदार्पणातच शतक ठोकणारी ती पहिला महिला क्रिकेटपटू. तर २००१-०२ मध्ये लखनौधील द. आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातून तिनं कसोटीत पदार्पण केलं. पहिल्या कसोटीत ती शून्यावर बाद झाली, पण पुढे जाऊन तिनं कसोटीमध्ये द्विशतक ठोकलं. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी आपल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध २१४ धावांची खेळी तिनं साकारली. कसोटी सामन्यात सर्वोच्च धावसंख्या उभारणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या कॅरेन रोल्टनच्या २०९ धावांच्या खेळीला मागे सारत मितालीने हा पराक्रम आपल्या नावे केला. तिचा हा विक्रम पाकिस्तानच्या किरण बलुचने २४२ धावा करत मार्च २००४ मध्ये मोडला, तर २००६ साली ती पहिला टी-२० चा सामना खेळली.

वयाच्या २१ व्या वर्षी म्हणजे २००४ साली मितालीने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पहिल्यांदा आपल्या खांद्यावर घेतली. कर्णधार बनणारी ती सर्वांत युवा खेळाडू होती. तिच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये २००६ साली पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची किमया करून दाखवली. १०० हून अधिक सामन्यांमध्ये तिने भारतीय महिला संघाचं नेतृत्व केलं आहे. इतर खेळाडूंच्या आयुष्यात येतो तसा बॅड पॅच मितालीच्या आयुष्यातही आला होता. इंग्लंडच्या दौऱ्यात झालेल्या खराब कामगिरीमुळे महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व तिच्याकडून काढून घेण्यात आलं. २००८ ते २०१२ या काळात कप्तानपदापासून तिला लांब राहावं लागलं, पण आपल्या कामगिरीनं २०१२ साली मितालीनं पुन्हा एकदा कप्तानपद मिळवलं ते आजतागायत.

नुकत्याच झालेल्या महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या संघाला धूळ चारणाऱ्या मितालीच्या संघाचं सगळ्यांनीच कौतुक केलं. एकीकडे बहुचर्चित भारतीय पुरुष संघानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकपुढे अक्षरश: गुडघे टेकवले. त्याच वेळी भारतीय महिला संघानं वन डे वर्ल्ड कपमध्ये पाकचा ९५ धावांनी पराभव केला. पुरुष संघानं भारतीय क्रिकेटचाहत्यांना निराश केलेलं असताना त्याच वेळी कोणतीही अपेक्षा नसणाऱ्या, नपेक्षा फारशी दखल न घेतल्या जाणाऱ्या भारतीय महिला संघानं पाकला नमवण्याची कामगिरी करून दाखवली.

त्यानंतर सध्या सुरू असणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत मितालीच्या संघाचं आव्हान संपुष्टात येणार असं वाटत असतानाच त्यांनी न्यूझीलंडच्या संघाचा तब्बल १८६ धावांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघानं सात बाद २६५ एवढी धावसंख्या उभारली होती. यात मितालीनं १०९ धावांचं योगदान दिलं होतं. न्यूझीलंड संघावर विजय मिळवणाऱ्या भारताच्या या रणरागिणींचा सामना पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाशी आज (२० जुलै रोजी) पडणार आहे.

इंग्लंडमध्ये सुरू असणाऱ्या याच विश्वचषक स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात ६९ धावा करत एक दिवसीय सामन्यांत सहा हजारहून अधिक धावांचा टप्पा तिनं ओलांडला. इंग्लंडची माजी क्रिकेटपटू शार्लेट एडवर्डने १९१ सामने आणि १८० डावांमधून ५९९२ इतक्या सर्वाधिक धावांचा विक्रम केला होता. हा विक्रम १८३ सामने आणि १६४ डावांमधून मोडण्याची कामगिरी करून मितालीनं सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.

भारतातर्फे कसोटी, एक दिवसीय आणि टी-२० या तिन्ही प्रकारात सर्वाधिक धावसंख्या उभारणारी ती एकमेव क्रिकेटपटू आहे. फलंदाजीतील तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आणि नवनवीन विक्रमांमुळे ‘लेडी सचिन’ किंवा भारतीय महिला क्रिकेटमधील ‘तेंडुलकर’ अशी ओळख तिनं आज निर्माण केली आहे. मितालीच्या या कामगिरीचं कौतुक पुरुष खेळाडूंनीही केलं आहे. ‘तुला खेळताना पाहून खूप आनंद वाटतो’ या शब्दांत साक्षात क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने मितालीच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

.............................................................................................................................................

मितालीच्या नावावर असणारे विक्रम

- विश्वचषक सामन्यांमध्ये सर्वोच्च धावसंख्या (१०४ चेंडूत नाबाद ९१) उभारणारी ती पहिली भारतीय क्रिकेटपटू. २००५मध्ये महिला विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाविरोधात तिने ही कामगिरी केली होती. २०१३ च्या आयसीसी विमेन्स वर्ल्ड कपमध्ये हरमनप्रीत कौरने १०९ चेंडूत १०७ धावा करून मितालीचा हा विक्रम आपल्या नावे केला.

- कसोटी, एक दिवसीय आणि टी-20 अशा सर्व प्रकारांत धावा करून आपली दखल घ्यायला भाग पाडणारी मिताली भारतीय महिला क्रिकेटमधील ‘तेंडुलकर’ म्हणून ओळखली जाते.

- सलग सात अर्धशतकं आपल्या नावावर करणारी ती एकमेव क्रिकेटपटू आहे.

- विश्वचषक स्पर्धेत एक हजारहून अधिक धावा करणारी ती पहिली भारतीय आणि पाचवी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू आहे.

- एक दिवसीय सामन्यांमधून सहा हजार धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे.

- क्रिकेटमधील तिच्या कामगिरीची दखल घेत २००३ मध्ये भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देत तिचा सन्मान केला.

- २०१५ साली पद्मश्री हा सर्वोच्च मानापैकी एक पुरस्कार तिला प्रदान करण्यात आला.

- वन डे क्रिकेटमध्ये ६०२८ ही सर्वाधिक धावसंख्या मितालीच्या नावावर आहे.

- भारतीय संघाला विजय मिळवून देताना ७५.७२ ही मितालीची सरासरी आहे.

- भारतीय महिला क्रिकेटमध्ये एक दिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतके मितालीच्या नावावर आहेत.

- मितालीने विक्रमी २३ शतकी भागीदारी रचल्या आहेत.

- नुकत्याच झालेल्या न्यू्झीलंडविरुद्धच्या सामन्यात मितालीनं विक्रमी सहावं शतक केलं.

- विस्डेन इंडिया क्रिकेटर पुरस्कार जिंकणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे.

- २०१० साली आयसीसी वर्ल्ड रँकिंगमध्ये प्रथम स्थान.

- मितालीचा जन्म तीन तारखेला (डिसेंबर) झालेला असल्यामुळे तिचा जर्सी क्रमांक तीन आहे.

- आपल्या क्रिकेट कारकीर्दीत कसलाही अडथळा येऊ नये म्हणून ३४ वर्षीय मितालीनं अजूनपर्यंत लग्न केलेलं नाही.

- तिचे कुटुंबीय तिला प्रेमानं ‘मितू’ म्हणतात.

.............................................................................................................................................

लेखिका मुक्त पत्रकार आहेत.

mitalit@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......