कविता – एक
अर्धेजग - कळीचे प्रश्न
भाग्यश्री भागवत
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 22 October 2016
  • बाई मूल जन्म कविता Kavita

रोजच्याच बसमध्ये चढल्यावर

तोच तोच भरून राहिलेला

कुबट्ट अंधार

त्यात पडलेली चिखलाच्या पायांची भर

गळक्या खिडक्या

थुंकलेले प्रवाह वाहून आणणाऱ्या

आणि यावर साज चढवणारा

माणसांच्या घामाचा वास

एकत्रित

तरीही आपला श्वासोच्छवास चालू?

मला वाटलं

बस ड्रायव्हरचा तळतळाट घेऊन

कशाला हा प्रवास करायचा आपण?

एक स्टेअरिंग, अडकणारे गिअर्स, क्लच, अ‍ॅक्सिलरेटर

आणि आलाच पाऊस तर

पाणी पुसायला वायपर

बुड टेकवता येईल

इतकाच तुकडा स्पंजचा

याशिवाय

एक डबा

आणि अनेक सचेतन जिवांना ओढणारं

एक ड्रायव्हरसकटचं यंत्र

वीग घातलेला, तिरप्या डोळ्यांनी बघणारा

म्हातारा

माझ्यापाशी येऊन बसला

नेहमीचाच

मला ओकारी व्हावी

इतकी किळस आली

का असतात माणसं

जन्माची बुभुक्षित?

हाच का

समृद्धीचा शाप?

किंवा

वयाचा बुरखा म्हणूया हवं तर

आहाहा!

किती प्रसन्न वाटलं

पाणी दिसलं

गढूळ होतं

झाडावर लटकल्या होत्या

प्लॅस्टिकच्या पिशव्या

पण वाहतं होतं

पाणी

मला होता येईल?

पाणी?

पण नको

मग वाढतील

बुभुक्षित नजरा

निदान आज

जीव तरी देता येईल मला

पाणी झाल्यावर

तोही पर्याय खलास!

आजूबाजूला नटव्या स्त्रिया

स्वत:च्याच नादात गुंग

बेधुंद

बेफिकीर

कशासाठी आपला हा

तत्त्वांचा अट्टाहास?

चांगलं जगता यावं

म्हणून?

पण चांगलं म्हणजे काय?

का जगता येत नाही बेफिकीर

म्हणून पाण्याला कवच

करवंटीचं?

बंद

आणि अजून कमीच

म्हणून वरती शेंडीची मोहर?

पण पुरुषांनीच का राखावा

घेरा आणि शेंडी?

स्त्रियांनी का नाही?

‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई’

म्हणे!

हलवाई कसला?

हिंदी पिक्चरमधला मुनीम नुसता

तसाच दिसतो

हुबेहूब

पण काहीही म्हणा

हत्तीचा चेहरा गोड

अगदी आत्ता उतरून

गालगुच्चा घ्यावासा वाटतोय

बंब्याचा घ्यावा तसा

‘बंब्या’

काळाकुट्ट, केसाळ

गहिऱ्या डोळ्यांचा

प्रेमात पडावा असा

त्याच्या डोळ्यात

दोनच गोष्टी दिसायच्या

कायम मला

एक

पैशासारखा गोल, ढब्बू

आडमुठा

चंद्र

आणि भरगच्च मेंदी

पण मेंदीचा वास

फार उग्र

पण वास धुता का येत नाहीत?

चालणाऱ्यांचे चेहरे

इतके बापुडवाणे का असतात?

आता अर्ध्या तासात

मुंबई-पुणे अंतर कापणाऱ्या

‘स्पीड ट्रेन्स’ म्हणे

मग वर्षं-वर्षं प्रवास करून

जमीन शोधून काढणारा

कोलंबस?

जाईना का समुद्रात!

आपल्या बापाचं काय गेलं?

पत्र लिहावं वाटतंय

कोणालातरी

पण कोण वाट बघेल

माझ्या पत्राची?

मॅडम?

नको

एकटी माणसं

वाट बघत नाहीत

किंवा तसं दाखवत नाहीत

मग सर?

नको

कायम कोयीलाय लागलेला

कीडा

कधी ही माणसं मागे टाकून

जाता येईल घरी?

आज धुतलीच नाहीत भांडी

स्वच्छ

मुद्दाम

म्हणूनच की काय

सतत

अतृप्त आत्म्यांसारखी

फिरत राहिलीयेत

डोळ्यांभोवती

साली जिंदगी खराब केली

‘सवय’

या एकाच शब्दाने

का इतक्या बारीक गोष्टींवरून

चिडचिड होते माझी?

त्यात भर म्हणून

ही झाडं

यांच्या पायाशी साचलेलं

ढीगभर पाणी

त्यातच सिमेंट, खडी

पानांवरचा हिरवेपणा पुसला जावा

इतकी धूळ

आणि हा फरारा धूर!

पण यांची मुळं

जातच राहतात

खोल खोल

आणि ही

सग्गळं

निमूट

सहन करतात

ही कशी जाऊ शकतात इतकी

घडण्याला शरण?

हा शाप की वरदान?

चितळे ‘बंधू’ म्हणे!

‘बंधू’ कसले?

मिल्क पावडरचे पेढे खाऊ घालतात

‘ढंपू’

माझे सगळे लागेबांधे

त्याने

एका हिंगाच्या

मोकळ्या डबीत

जतन केले

जग नसतानाही

कदाचित

हिंगरूपाने जिवंत राहील

तेवढी ही एकच गोष्टी

‘दगडी पाटीवाला’

अपवादात्मक

तो

आणि

त्याचा धंदा

मला का नाही जमत असं?

सगळं उमटवून

इतकं निरागस, कोरं

गुडुप्प राहायला?

का लग्न करायचं मुलींनी

निदान चोवीसाव्या वर्षी?

शास्त्रीयदृष्ट्या

योग्य वेळी

कूस उजवली जावी म्हणून?

न जन्मलेल्या बाळाचं

नाव ठरवाचं

राहूनच गेलं

पण ‘केशर’

छान वाटलं असतं

पेठेबाईंच्या कथेतल्या

त्या छक्क्यासारखं

निर्लिंग!

का मारतात फटके?

त्यांच्या पायावर

मेल्यावर

का घेऊ ने त्यांनी?

हा जन्म

परत

कारण ते बहुमतात नाहीत?

का त्यांना उजवता येत नाही कूस

म्हणून?

हा नाही का

साहित्यिकांच्या भाषेत

‘निर्मिती’चा अपमान?

पण मग मला चालेल?

माझ्या नशिबी

असं काही

पण नशीब कुठे असतं?

आपल्या हातात

ही एक पळवाट!

नशीब

घर आलं

आता झोपलं

तरच प्रश्न मागे पडतील

झोपेतही

का आठवतायंत?

सारख्या याच ओंळी

‘आतमा मोठा बयमन

ग्येला कुडीला सोडून’

निदान या क्षणासाठी तरी

आई

तू कुशीत घेणारी

हवी होतीस.