कल्लूळाचं पाणी ढवळीलंच पाहिजे
अर्धेजग - कळीचे प्रश्न
शर्मिष्ठा भोसले
  • या लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत
  • Tue , 13 December 2016
  • अर्धे जग women world मानवी हक्क Human Rights महिला हक्क Women rights हिंसाचार Violence

आमच्या गावाकडं सुगीचा हंगाम चालला होता. अशा वेळी बाया उडदामुगाच्या शेंगा तोडताना एकमेकांची फिरकी घेत राहतात. एका मैतरणीचा काळानिळा पडलेला ओठ पाहून बाजूची म्हणली, ‘‘काय गं, हे असं झालं ते प्रेमाचं म्हणावं की रागाचं?’’ मैत्रीण लाजली. नुसतीच खाली पाहून गोड हसली. प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं, पण मी दुसऱ्याच प्रश्नांमध्ये अडकले.

स्त्री-पुरुषाच्या वेगवेगळ्या नात्यांमध्ये हिंसा कुठकुठली रूपं घेऊन वावरत राहते? ती सगळ्या वेळी बाईला नकोशी आणि पुरुषाला हवीशी असते का? हिंसेच्या उगमाजवळ क्रोधच असतो की अजून कायकाय? कोण कधी पोचलंय का त्या उगमापर्यंत?

माझ्या नात्यातल्या एका आजीचं लग्न तिच्या अजाणत्या वयात झालं. लग्नानंतर तिला दोन मुलं झाली. वयाच्या एका टप्प्यावर तिला अचानक कोड फुटलं. आजीला वाटलं, 'हे आपलं गेल्या जन्मीचं पाप'. ती एकदा करकरीत संध्याकाळी कुणाजवळतरी सांगत होती, ‘‘अंगावर डाग पडले, तसं त्यांनी टाकलं मला. नंतर कधी मारहाण करायलाही हात लावला नाही.’’ असा उभा जन्म स्पर्शाविना, कोरा घालायची सक्ती बाईवर करण्याच्या हिंसेसाठी कोण कुणाला अन कुठली शिक्षा देणाराय?

बाया पुरुषाकडून होणाऱ्या हिंसेला बऱ्याचदा गृहीत धरूनच चालतात. या हिंसेशी त्या सहज, कम्फर्टेबल असतात अनेकदा. एक कुणीतरी म्हणते, ‘‘नवऱ्यानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर कुणाला सांगायचं.’’ सोबतच्या सगळ्या मग तोच जप करत वाट चालतात.

पुरुषात तरी हिंसा कुठून येते? मला दिसतं ते म्हणजे त्याला आतल्या भावभावनांचं व्यवस्थापन करण्याची, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गानं वाट करून देण्याचं कसबच कुणी शिकवत नाही. जन्मापासून सामोऱ्या आलेल्या कुटुंबसंस्था, शिक्षणसंस्था त्याला सतत ‘पुरुष’ म्हणून घडवतात, व्यक्ती म्हणून नाही. मग नंतरच्या समाजाचा एक भाग होताना तो ‘पुरुष’ असण्याची आयडेन्टीटी ओलांडून पुढं जात ‘मर्द’ बनत जातो.

माझी एक मैत्रीण एका समंजस, हुशार मुलाच्या प्रेमात होती. दोघंही लहान गावातून शहरात शिकायला आले होते. घरची परिस्थिती हलाखीची होती. दोघंही कष्ट करून मोठं व्हायची स्वप्नं पाहणारे होते. आम्ही दोघी एकाच गावातल्या असल्याने मी या मुलीचा संघर्ष जवळून पाहत आले होते. तिच्या प्रेमाबाबत जेव्हा तिच्या मोठ्या भावाला कळालं तेव्हा त्यानं तिला विचारलं. तिनं कबुली दिल्यावर प्रचंड मारहाण केली. तिचं शिक्षण बंद करण्याची धमकी दिली. अनेक दिवस तिला सक्तीनं घरी बसवलं. तिच्या प्रियकरानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखत हस्तक्षेप केला. यापुढे त्या मुलीशी असलेलं नातं संपवण्याचं वचन दिलं आणि ते निभावलंही. घरच्यांनी आणलेल्या मुलीशी त्याचं पुढं लग्न झालं. ही मैत्रीण आज शिक्षण संपवून उच्च पदावर आहे; अविवाहित राहिलीय. या मैत्रीणीचा भाऊही एका मुलीच्या प्रेमात होता. मोठा विरोध पत्करून त्यानं तिच्यासोबत प्रेमविवाह केला. जेमतेम शिक्षण घेऊन तो ड्रायव्हर म्हणून काम करतो.

‘भाऊ’ या नात्यातला पुरुष अनेकदा असा दुहेरी भूमिका घेऊन वागतो. कारण त्याच्यावर सतत बहिणीचा 'संरक्षक' असण्याची जबाबदारी लादली जाते. तो ती निभावू शकतो का नाही, यावरून त्याची ‘मर्दानगी’ ठरवली जाते. त्याच्या ‘मर्दानगी’ सिद्ध करत राहण्याच्या हतबलतेतून कदाचित हिंसेचा जन्म होतो.

एक कविता आहे. मुलगी ‘शहाणी’ होते तेव्हा तिला कोणकोण कायकाय म्हणतं ते सांगितलंय. ‘आलं नहान पहिला ऋतू, माईचं दूध चाललं उतू, वाहिनी म्हणते न्हाऊ घालते, साय साखर खाऊ घालते.’ पुढं आहे, ‘झाला नाराज लहाना भाऊ, तुलाच कसा शिवतो काऊ’ मग मोठ्या भावाबाबत लिहिलंय, ‘भाऊ म्हणे तो बहिणाबाई, घराबाहेर जायाचं नाही’. म्हणजे पुरुष लहान असताना नात्यातल्या बहीण असलेल्या स्त्रीसोबत खेळता येणार नाही म्हणून हिरमुसतो, तर त्याच स्त्रीचा मोठा भाऊ म्हणून भूमिकेत असलेला पुरुष तिच्यावर लगोलग निर्बंध घालणारी भाषा बोलू पाहतो. ही भाषा बोलणाऱ्या पुरुषाला या भाषेचा अर्थ खरोखर कितपत कळतो? तो खरोखर सत्तेत असतो का? की एका मोठ्या सत्तेच्या हातचं तो कळसूत्री बाहुलं असतो फक्त? तो सत्ता गाजवतो की ती राबवण्याचं नुसतं माध्यम बनतो?           

मी गावाकडच्या हिंसेला बळी पडणाऱ्या बायांना पाहते, तेव्हा वाटतं, 'स्त्री असणं हेच त्यांच्यासोबत होणाऱ्या हिंसेचं कारण आहे की काय?' कारण ती स्त्री विवाहित असताना हिंसामुक्त नाही आणि अविवाहित असतानाही नाही; ‘चारित्र्यवान’ असताना नाही आणि कथितपणे ‘चारित्र्यहीन’ असतानाही नाही; कुमारी असताना नाही आणि तथाकथित वांझ किंवा विधवा असताना तर नाहीच!

एका लग्नात हळद लावायचा प्रसंग होता. सगळ्या चढाओढीनं नव्या नवरीला हळदीनं माखत होत्या. सतत राबणारी माझी एक काकू हा समारंभ सुरू झाला तशी  मात्र हळुवार मागं सरकत आतल्या खोलीत जाऊन बसली. तेव्हा अडनिड्या वयात असलेली मी आईला म्हणाले, ‘‘आई, काकू का येत नाहीत इकडं?’’ आई म्हणली, ‘‘त्या विधवा आहेत. त्यांना नसतंय चालत.’’ मी म्हणाले, ‘‘मला नाही आवडत गं हे. मी आणते त्यांना इथं.’’ आई म्हणाली, ‘‘तू विचार त्यांना, पण त्या येणार नाहीत. त्यांनाही नको असणार इथं येणं.’’ नवरा नावाच्या एका नात्यातला पुरुष बाईच्या आयुष्यात असताना तिच्यासोबत होणारी हिंसा दृश्य असते, पण तो नसताना होणारी ही अदृश्य हिंसा... तिचं काय करायचं? या वगळलेपणाच्या जखमा कशा भरायच्या? 

मी आसपास पाहते तेव्हाही जाणवतं की, ही समाजव्यवस्था, रादर इथला समाजपुरुषच स्त्रीची आयडेंटिटी ठरवतो. त्यापेक्षाही बहुतेकदा आयडेंटिटी लादतो. स्त्री नुसती स्त्री असल्याचं कळून समोरच्याच्या संवादातलं कुतूहल शमलं, असं होत नाही. ती कुमारी, सौभाग्यवती, वांझ, लेकुरवाळी, वेश्या, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता किंवा अजून काही तरी असावी लागते. तिच्या नावामागे वा नावापुढे ते तसं असण्याचं बिरूद तिला वागवावं लागतं. मग ते बिरूद तिचं कथित सामाजिक, सांस्कृतिक स्थान ठरवण्यासाठी वापरलं जातं. प्रतिष्ठा आणि प्रतिमेच्या उतरंडीत कुठल्या स्थानावर असायचं यावर तिचं स्वत:चं नियंत्रण राहतच नाही. शिवाय या प्रतिमेला जोडून येणारी चिन्हं, अलंकार आणि प्रतीकं देहावर धारण करण्याचे अदृश्य प्रोटोकॉल कार्यरत असतात. सौभाग्यवती असण्याच्या वा नसण्याच्या खुणा तुम्ही वागावल्या नाहीत, तर व्यवस्थेच्या रांगेत तुम्ही ‘ऑड मॅन आऊट’ या वाक्प्रचाराप्रमाणं ‘ऑड वुमन आऊट’ ठरता. समाजपुरुषानं स्त्रीसोबत केलेल्या या अदृश्य हिंसेचं काय करायचं?

ओशो म्हणतात, ‘संभोग समाधीपर्यंत घेऊन जाऊ शकतो.’ पण लैंगिक संबंधांमध्ये आड येणारं मर्दानगीचं ओझं पुरुषाला मधल्याच कुठल्यातरी मुक्कामावर अडवून ठेवतं. तो सतत स्वत:ला ‘सिद्ध’ करण्याच्या ओझ्यानं पछाडलेला राहतो. समसमान आनंदाऐवजी 'बाईला चीत करणं' हेच त्याचं ध्येय उरतं. यादरम्यानची हिंसा पुरुषाला फसवं सुख आणि बाईला वास्तवातली वेदना देते. हा पुरुष हिंसेलाच सुख समजून बसतो. मृगजळाच्या मागं उरस्फोड करताना दमून जातो; संपतो. यामुळे पुरुषाचा जसा राग येतो, तशीच त्याच्याबद्दल करुणाही वाटते.  

इथली कुटुंबव्यवस्था आणि स्त्रिया यांच्यातला दैनंदिन व्यवहार अशा काही पद्धतीनं होतो की जन्मल्यापासून मरेपर्यंत स्त्री असण्याचा एक गिल्टच या बायांच्या देहमनावर ठळक गोंदवला जातो. या व्यवस्थेत स्त्रीलाच काय, पण पुरुषालाही अनेकदा स्वत:साठी काही निवडण्याचा हक्क नाही.

‘मेन विल बी मेन’ नावाची एक सो कोल्ड मिश्किली करणारी जाहिरात तुम्ही पाहिली असेल. ती सांगते, 'पुरुष स्त्रियांना न्याहाळणार, फ्लर्ट करणार, एकनिष्ठ नसणार. साहजिक आहे, मेन विल बी मेन!' ही जाहिरात पुरुषाला ‘पुरुष’ रादर ‘मर्द’ असण्याच्या एका सनातन चौकटीत घट्ट बसवून टाकते. आपल्याला प्रेक्षक म्हणून त्या जाहिरातीत वावगं काहीच वाटत नाही; पण मग त्याच चालीवर त्यालाच जोडून तुमच्या-आमच्या भवतालची व्यवस्था सांगत राहते, ‘सो वुमन शुड बी वुमन’. बहुतेक स्त्रिया ही ‘स्त्री’ असण्याची, ते स्त्रीत्व पारंपरिक निकषांनीच वागवण्याची आयडेंटिटी निमूटपणे सहन करतात. त्यालाच नियती आणि नाइलाज मानतात. काही जणींना त्यांच्या सोसण्याचं मूळ उमगतं. ते त्या बोलूनही दाखवतात. त्या सोसण्याशी विद्रोह करताना पुन्हा नव्या हिंसेला सामोऱ्या जातात.

ही व्यवस्था पुरुषसत्ताक आहे. त्यामुळे इथला पुरुष बहुतेक वेळा लाभार्थी असेलही, पण अनेकदा त्यालाही सोसावं भोगावं-लागतंच. पुरुष असण्याचे दृश्य-अदृश्य काच कमी नाहीत. काही दिवसांपूर्वी ‘पुरुष हक्क अधिकार दिन' साजरा झाला. त्या दिवशी औरंगाबादमध्ये ‘पत्नीपिडीत’ पुरुषांचा मोर्चा निघाला. एवढंच काय, शहराजवळ पत्नीपिडीत पुरुषांसाठी एक आश्रम उभा करण्यात आला. जो लौकिकार्थानं ‘शोषित’ आहे, तो ‘पिडीत’ बनत असेल तर स्त्री-पुरुष नात्यातल्या ‘पॉवर प्ले’चं राजकारणच पुन्हा एकदा तपासून पाहण्याची गरज आहे. स्त्री वा पुरुष म्हणून एकमेकांबाबतचे अनुभव खुलेपणाने परस्परांशी बोलता येतील का? हिंसेला नकार देताना काही काळ तरी ‘स्त्री’ वा ‘पुरुष’ असणं बाजूला ठेवत ‘माणूस’ म्हणून उभं राहता येईल का?

मी जिथे लिहीत बसले आहे, तिथं बाजूला एका उत्सवात डीजे वाजतोय. वाजणाऱ्या गाण्याचा नायक पुन्हापुन्हा विचारायलाय, ‘कल्लूळाचं पाणी कशाला ढवळीलं? नागाच्या पिलाला तू का गं खवळीलं?’ मी म्हणते, ‘ढवळलंय नं पाणी, तर पाहा की, किती गढूळ झालंय, साचलंय. आता जरा वाहतं होऊ दे त्याला. खवळलास नं तू, तर बोल, मोकळा हो, सगळी कोंडी सुटू दे! मग वाहत राहा माझ्यासोबत नुसता...’

लेखिका मुक्त पत्रकार आहेत.

sharmishtha.2011@gmail.com

Post Comment

Pravin Khunte

Tue , 20 December 2016

सुंदर लेख... पुरुषाला कालांतराने फक्त पुरुष न राहता मर्द बनन्याच्या दिशेने करावा लागणारा प्रवास किती अनैसर्गिक, अमानवी आहे. त्यामुळे पिडीत स्त्री बरोबरच पिडीत पुरुषाच्या मानसिकतेवर भाष्य करणाऱ्या अशा नव्या मांडणीची खुपच गरज आहे.


Sushma Zore

Wed , 14 December 2016

Say no to violence against womens


Bhagyashree Bhagwat

Tue , 13 December 2016

आवर्जून वाचावा असा अंतर्मुख करणारा लेख!


Rohit Deo

Tue , 13 December 2016

Sundar lekh...