त्यांची वेगळी ‘ओळख’ आपण सन्मानानं जपायला हवी! (उत्तरार्ध)
अर्धेजग - कळीचे प्रश्न
रेखा शहाणे
  • डावीकडून पहिल्या रांगेत गौरी सावंत, मानोबी बंदोपाध्याय, गौरी सावंत, दुसऱ्या रांगेत लक्ष्मी नारायण त्रिपाठी, जोयीता मंडल आणि गौरी सावंत
  • Mon , 10 September 2018
  • अर्धे जग कळीचे प्रश्न समलैंगिकता Homosexuality कलम ३७७ Section 377 एलजीबीटीक्यू समुदाय LGBTQ Community गौरी सावंत Gauri Sawant मानोबी बंदोपाध्याय Manobi Bandyopadhyay लक्ष्मी नारायण त्रिपाठी Laxmi Narayan Tripathi जोयीता मंडल Joyita Mondal

गौरी आज स्वतःचं घर करून राहते. गायत्री तिची मुलगी आहे. गौरी, तिचा पार्टनर, (त्यांच्या बरोबर गौरीचा लॅब्रोडर कुत्रा- मल्हार) असं त्यांचं एक सुखी कुटुंब आहे. पण असं सामान्य सुख कितीशा तृतीयपंथीयांना लाभत असेल?

गौरीच्या कामाबद्दल सांगायचं म्हटलं तर बरंच काही सांगता येईल. घर सोडल्यावर तिनं ‘हमसफर’ या संस्थेबरोबर काम केलं. हळूहळू काम वाढत गेलं. तृतीयपंथीयांना सन्मानानं जगता यावं म्हणून तिनं ‘स्वयंसिद्धा’ ही संस्था सुरू केली. तिथं साध्या कागदाच्या पिशव्या करायचं काम चालतं. प्रतिसाद कमी आहे. पण ‘सखी चारचौघी’ची सुरुवात तर एका चटईवरच झाली. आज मालवणीत ‘सखी चारचौघी’चं ऑफिस आहे. कर्मचारी आहेत. छोटीशी कम्युनिटी सेंटर म्हणावी अशी जागा आहे. तिथं गौरीचं काम चालतं. त्या भागात अंदाजे तीन हजार तृतीयपंथी राहतात. त्यातले बहुतेक सगळे रस्त्यावर, ट्रेनमध्ये भीक मागतात. ‘सेक्स वर्कर’ म्हणून काम करतात. तेव्हा त्यांना एचआयव्हीपासून वाचवणं हा गौरीच्या कामाचा एक मोठा भाग आहे. त्यांना व्यसनाधीनतेपासून रोखणं, शरीरविक्रय आणि भीक मागण्यापासून परावृत्त करण्याचं कामंही गौरी करते. पण त्यांच्यासाठी हे काम करणं वाटतं तेवढं सोपं नाही. तृतीयपंथीयांसंदर्भात आयोजित केलेल्या अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये गौरीला निमंत्रित केलं जातं. तिथं ती भारतीय तृतीयपंथीयांची बाजू मांडते. पण गौरीला त्यांच्या समाजात म्हणावं तसं सहज स्वीकारलं गेलेलं नाही. त्यांच्याप्रमाणे ती भीक मागत नव्हती. ‘सेक्स वर्कर’ म्हणून काम करत नव्हती. ते तिला ‘ऑफिसवाला हिजडा’ म्हणत. दरम्यान गौरीनं लिंगबदल शस्त्रक्रिया केली. हिजड्यांच्या रिवाजाप्रमाणे रीतसर गुरूही केला. त्यांच्याच समाजातही तिला तिची ‘हिजडा’ म्हणून ओळख निर्माण करावी लागली.

भरपूर काम करते गौरी. आता तर ती ज्यांना ‘आधार’ नाही अशांचा ती ‘आधार’ झालीय. वेश्यांच्या मुलांना माणूस म्हणून वाढवण्यासाठी तिला आज्जीचं घर अर्थात नानिका घर ही कल्पना सुचली. आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी ती कटिबद्ध आहे. ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये तिनं पंचवीस लाख जिंकले. ते पैसे तिचं स्वप्नं पुरं होण्यासाठी कारणी लागले, याचं सुख तिला वाटतं. काम मोठं आहे. आजही पैशाची गरज आहेच. पण गौरी हुन्नरी आणि आशादायी आहे. परिस्थितीनं गांजून न जाता तिचा जो उत्साह, आशा आणि काम करण्याची उमेद आहे ती वाखाणण्याजोगी आहे.

तिला ‘उंच माझा झोका’, ‘सावित्रीबाई फुले’, ‘हिरकणी’ यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तिचं काम नेहमीच्याच उत्साहात चालू आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

तृतीयपंथी समुदायाचा विचार करताना लक्ष्मीनारायण त्रिपाठी, मानोबी बंदोपाध्याय, गौरी सावंत इ. बरोबर जोयीता मंडल यांचंही नाव घ्यायला हवं. आज त्या सर्वोच्च न्यायालयातल्या पहिल्या तृतीयपंथीय न्यायाधीश आहेत. जोयिता मंडलही आधी पुरुषच होत्या. २००९ मध्ये त्यांनी घर सोडलं आणि किन्नर घरी दाखल झाल्या. त्या बधाई द्यायला लागल्या. आज त्या पांढऱ्या कारमधून फिरतात, पण एकेकाळी तृतीयपंथी म्हणून त्यांना राहायला जागा मिळाली नाही. खायला अन्नही नाही मिळालं.

या सगळ्यांनी जे भोगलं, सोसलं, आणि जे सोसतायात त्याची कल्पना आजही आपल्याला नाही. शबनम मौसी मध्य प्रदेशात आमदार असणं किंवा मधु किन्नर छत्तीसगढमध्ये रायगढ पालिकेत महापौर असणं हे सारे वानगीदाखलचे नमुने आहेत. हा त्या समाजाचा आरसा नाही.

समाजानं आपला प्रश्न त्यांना समाजाबाहेर टाकून त्यांच्यावरच ढकलला. जगण्यासाठी काय करणार ते? मुख्य प्रवाहाच्या बाहेरच ठेवल्यावर एक उपेक्षित आयुष्य जगताना ना उर्वरीत जगाशी संपर्क, ना पैसाअडका हातात, ना रहायला घर, ना शिक्षण, ना वैद्यकीय मदत, ना कोणाचा सहारा. संपूर्ण असुरक्षित परिस्थितीत ते एकत्र येतात. त्यात त्यांनी स्वतःचा समाज निर्माण केला. आणि म्हटलं तर तोच काय तो त्यांना एकमेकांना एकमेकांचा आधार. पण तरीही एक माणूस म्हणून जगायचा अधिकार त्यांना नाही. आणि याच हक्कांसाठी जगभर सगळीकडेच ते आजही झगडतायात. त्यांना यश मिळतंयही. पण खरी गरज आहे ती समाजानं निरोगी मनानं त्यांना आपलं म्हणण्याची.

समाजबाह्य केलेलं म्हणून त्यांना काही काम नाही. पोट भरण्यासाठी एकतर भीक मागा, दुवा द्या आणि ‘सेक्स वर्कर’ म्हणून काम करा. यापेक्षा त्यांना समाजात स्थान नाही. एरवी दिवसा ज्याचा विटाळ होतो, तो शेजेला चालतो ही गोष्ट समाजाच्या ढोंगीपणावर नेमकं बोट ठेवते. पण हे सगळं सहन करताना त्यांच्या मानसिक स्थितीचा, त्यांच्या भावभावनांचा, असुरक्षिततेचा विचार करावा असं समाजाला कधी वाटत नाही. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कागदोपत्री नाही, तर प्रत्यक्षात मिळावा लागतो. तो त्यांना कधी मिळणार हाच समाजापुढचा प्रश्न असायला हवा. पण समाजाची आजही ती मानसिकता नाही हे वास्तव आहे. यावर नेमकं बोट ‘समलैंगिकता हा गुन्हा नाही’ असा निकाल देताना न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनीही ठेवलं आहे. समलैंगिक आणि तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींना देशातील इतर नागरिकांच्या बरोबरीचे हक्क आहेत असा निर्वाळा पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं एकमतानं दिला आहे. आता प्रत्यक्षात त्यांना बरोबरीनी वागवायची पुढची पावलं समाजानं उचलायची आहेत. यासाठी आता आणखी काही हात पुढे येतीलही. पण एरवी आपलं त्यांच्याशी ना देणं ना घेणं!!

तरी एक आगंतुक सामान्य कुतूहल सर्वांच्या मनात असतंच. कसा चालतो यांचा समाज? बहिष्कृत स्थितीत कसे जगतात ते? राहतात कुठे? सगळ्याला तोंड कसे देतात?

मग एक गोष्ट मनात आली की, आपल्या जातीजमातीत मानवी समुदायांना एक वेड आहे. रामायण-महाभारतापासून वेदकथा-पुराणांपर्यंत पोहोचत त्याचे दाखले देत ते आपला संबंध आदिकाळाशी नेऊन जोडतात. या असल्या कथांना म्हटलं तर अर्थ नसतो. त्याला खरेपणा नसेलही पण रामायण-महाभारतातले, त्याच्या आधीचेही दाखले देतात खरे. यातून उगाउगीच उदात्तीकरण करण्याचं साध्यही साधता येतं. ही तर सर्वसामान्यांची कथा आहे, तर हिजड्यांचं काय? काय काय कथागोष्टी रूढ आहेत त्यांच्या समाजात? बादरायण संबंध आपण सोडून देऊ, तर पण सर्वांना हे सांगायला आणि लोकांना ऐकायलाही आवडतं.

मग सुरुवात ‘हिजडा’ या शब्दापासूनच सुरू झाली.

‘हिजडा’ हा उर्दू शब्द ‘हिजर’ या अरबी शब्दावरून आला. ‘हिजर’चा अर्थ (आपली जमात) सोडून आलेला. (महमदानं मक्केहून मदिनेला पलायन केलं, तेव्हापासून हिजरी सन सुरू झाला.) दुसरी एक व्युत्पत्ती वाचनात आली. ‘हीज’ म्हणजे पवित्र आणि ‘डा’ म्हणजे आत्मा. पवित्र आत्मा वास करतो तो ‘हिजडा’.

भारतात वेगवेगळ्या भाषांत त्यांना वेगळे शब्द वापरतात. उदा. उर्दूमध्ये ‘हिजडा’, ‘ख्वाजा सारा’, हिंदीमध्ये ‘किन्नर’, ‘हिजडा’, ‘मराठीत छक्का’, ‘हिजडा’ गुजरातीमध्ये ‘पावैया’ म्हणतात.

‘बहुचरा’ किंवा ‘भोचारा’ ही हिजड्यांची देवी गुजराथमध्ये मेहसाणा इथं आहे. तिचं वाहन कोंबडा आहे. म्हणून ‘मुर्गेवाली माता’ म्हणूनही ती ओळखली जाते. अजमेरमधील बाबा चिश्ती दर्ग्यातील ऊरूस हिजड्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. तिथं हिजड्यांना मान असतो. बहुतांश हिजडे दर वर्षी या उरुसात सामील होतात.

गोष्ट अरावणशी येऊन पोहोचली नि हिजडे देवाबरोबर लग्न करतात हे मला नव्यानंच माहीत झालं.

तर तामिळनाडूमध्ये कुवागम गावात हिजड्यांची जत्रा भरते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेशातील हिजडे इथं येतात. या गावात (इरावण) अरावणाचे मंदिर आहे. हा अरावण म्हणजे अर्जुनाचा मुलगा. सहदेवानं भविष्य सांगितलं की, महाभारताच्या लढाईत विजय आपलाच आहे, पण त्यासाठी कुरुक्षेत्रावर एका पूर्ण पुरुषाचा बळी द्यावा लागेल.

आता त्या काळात पूर्ण पुरुष तीनच होते. अर्जुन, श्रीकृष्ण आणि आरावण. अर्जुन आणि श्रीकृष्णाशिवाय लढाई होणं शक्यच नव्हतं.मग अरावणाचा बळी द्यावा असं ठरलं. अरावण बळी जायला तयार झाला. पण त्यानं एक अट घातली की, मरण्याआधी त्याचं लग्न व्हावं. आता बळी जाणाऱ्या अरावणशी लग्न करायला कोण मुलगी तयार होणार? तेव्हा विष्णूनं स्वतःच स्त्रीचं रूप घेतलं आणि त्यांचा विवाह झाला. अट पुरी झाली. दुसऱ्या दिवशी अरावणचा बळी दिला गेला. स्त्रीरूप धारिणी विष्णूनं पती निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि पुन्हा मूळ रूपात विष्णूदेव प्रकट झाले.

अरावणाशी लग्न केल्यानंतर काही काळ तरी स्त्री रूप मिळतं, या भावनेनं तृतीयपंथी अरावणच्या मूर्तीशी लग्न करतात. काही हिजडे वधू होऊन सजतात. पुजारी लग्नाची तयारी करतो. त्यांच्या मनगटावर हळकुंड बांधतात. विवाहसोहळा सुरू होतो. देवाशी लग्न लागलं की, हिजडे रात्रभर नाचतात, गातात. पहाट झाली की, हातातल्या बांगड्या, कपाळावरच कुंकू पुसून टाकतात. विधवा होतात. सगळे हिजडे पांढरी साडी परिधान करतात. आरावणची मिरवणूक निघते. त्याचं मुंडकं उडवलं जातं. अरावण मरण पावला की, सगळे हिजडे मोठमोठ्यानं शोक करतात, लग्न लागलेले हिजडे पांढरी साडी परिधान करून विधवा होतात. आयुष्यात आपलंही लग्न होऊ शकतं, ही भावना त्यामागे आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्रच्या सीमेवर सौदत्ती इथं एक मंदिर आहे. यल्लमा देवीच्या नावानं मुलींना- देवदासी-मुरळ्या म्हणून आणि मुलगा असेल तरजोग्या-जोगता  म्हणून सोडण्याची प्रथा फार पूर्वीपासूनची आहे. मुर्तीजापूर आंबेजोगाई इथंही किन्नरांचं देऊळ आहे. अर्थात आणखीही आहेतच.

थोडक्यात यांना फार मोठा इतिहास आहे. अगदी महाभारत, रामायण, पुराण काळापासून आणि त्याच्या आधीही यांच्या अस्तित्वाची दखल घेतलेली दिसते.

देवादिकांच्या काळापासून याचे संदर्भ सापडतात. यक्ष, किन्नर, गंधर्व यांचे उल्लेख पुराणात आहेत. फुलांचे ताटवे, वाहत्या पाण्याचे झरे, लताकुंज ही त्यांची आवडती ठिकाणं आहेत. नृत्य गायनात ते निपुण आहेत. संस्कृतमध्ये यांना ‘किंपुरुष’, ‘किन्नर’, ‘देवाची योनी’ म्हणून संबोधतात. महाभारतातल्या शिखंडीची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तसंच अज्ञातवासात अर्जुनाचं ‘बृहन्नडा’ होणंही माहीत आहे. शिवाच एक रूप अर्धनारी नटेश्वराचं आहे. रामायणातही त्यांची गोष्ट आहेच. तर त्यांच्या असण्याचे असे बरेच उल्लेख आपल्या वाचनात येत राहतात. आपल्याला माहीत असतात. पण समोर हिजडा दिसला की, कधी एकदाचा तो दूर होतोय म्हणून अंग चोरून बसलेल्या, झोपेचं सोंग घेतलेल्या किंवा ‘हो पुढे’ म्हणणाऱ्या बायका मुंबईत ट्रेनमध्ये हमखास दिसतात.

गौरीची मुलाखत संपली नि आम्ही चहा प्यायला निघालो. वाटेत एका बाईकजवळ विशीतली गोड मुलगी उभी होती. म्हणाली, “आपण गौरी सावंत ना? मी तुम्हाला ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये पाहिलंय. तुमच्याबरोबर एक सेल्फी काढू का प्लीज?” मला थोडं आश्चर्य आणि थोडं कौतुक वाटलं की, “अगं आधी इकडे ये बरं. जवळ जाऊ नकोस त्याच्या. हिजडा आहे तो,” अशी दटावणी करणारं तिच्या आसपास कुणीनव्हतं. तिनं सेल्फी घेतली. मनात आलं, काळ बदलतोय तर! 

एके काळी समाजात हिजड्यांना विशेष महत्त्व होतं. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात त्यांनी अंगरक्षक म्हणून त्यांची भरती केली होती. मुघल साम्राज्याच्या काळात तर पुरुषांची जनानांगं कापून त्यांना हिजडा बनवलं जात असे. आणि जनानखान्यावर स्त्रियांचं रक्षण करण्याचं काम त्यांना देण्यात येत असे. मुघल साम्राज्यात यांना ‘सराय ख्वाजा’ (म्हणजे अल्लाच्या वाटेवर, मार्गावर चालणारे) किताब मिळाला. राजवाडा आणि अन्तःपूर यामधला सुरक्षित दुआ म्हणून ते काम करत असत. मनोरंजन, गुप्त निरोप आणि वाटाघाटी या मध्ये निरोप्या म्हणून ते भूमिका वठवत.

त्या काळात त्यांना रोजगाराची संधी होती. मान होता. ब्रिटिश आले. राजेशाही लयाला गेली. त्यांची रोजीरोटी बंद झाली. त्यातच ब्रिटिशांनी हिजड्यांना गुन्हेगारी जमातीत ढकललं. संशयाच्या कारणावरूनही हिजड्यांना अटक होऊ लागली. त्यामुळे हलके हलके ते समाजाकडून अधिकच तुटत गेले. वेगळे राहायला लागले. समाजापासून दूर गेल्यामुळे त्यांच्याबद्दलचे समज-गैरसमज वाढीला लागले. त्यातूनच अपमान, अवहेलना, टिंगलटवाळी त्यांच्या वाट्याला आली. आणि ते अन्याय, अत्याचार आणि शोषणाला बळी पडले. माणूस म्हणून स्वतःच्या अस्तित्वासाठीचा झगडा आजही ते देत आहेत.

त्यांच्याबद्दल आणखी एक सांगायचं म्हटलं तर त्यांच्या टाळ्या म्हणजे त्यांची ओळखच आहे. तर या टाळ्यांचा संबध रामायणातल्या एका गोष्टीशी आहे. राम वनवासाला निघतो. त्यावेळी त्याला निरोप द्यायला सगळे अयोध्यावासी वेशीपर्यंत येतात. त्यांचा निरोप घेताना राम समस्त स्त्री-पुरुषांना आपापल्या घरी जाण्यास सांगतो आणि वनवासाला प्रस्थान करतो. चौदा वर्षांनी रामाचा वनवास संपतो. रावणाचा पराजय करून राम-लक्ष्मण आणि सीतेसह शरयू तीरावर परत येतो. तेव्हा त्याला तिथं केस वाढलेले, दाढीमिशा वाढलेले, विचित्र हावभाव असलेले काही लोक दिसतात. राम विचारतो, आपण कोण आहात? इथं काय करत आहात? तेव्हा त्यांनी सांगितलं की, “हे प्रभो, चौदा वर्षांपूर्वी अयोध्यावासी आपणाला निरोप द्यायला आलो, तेव्हा आपण समस्त स्त्री-पुरुषांना जाण्याची परवानगी दिली. परंतु आम्ही ना पूर्ण स्त्री आहोत, ना पूर्ण पुरुष. आपण आम्हाला कोणतीही आज्ञा दिली नाहीत. म्हणून आम्ही आपल्या आज्ञेची वाट पाहत इथेच थांबून आहोत.” रामाला त्याची चूक लक्षात आली. त्यांची अढळ निष्ठा पाहून रामानं त्यांना वर दिला की, यापुढे जन्म, विवाह आणि शुभकार्याची सुरुवात करताना, तसंच उत्सवात आशीर्वाद देण्याच्या शुभप्रसंगांचा अधिकार तुमचा राहील. रामराज्यात इतरांबरोबर तुम्हाला समान दर्जा देण्यात येईल. रामाच्या या आश्वासनाचं त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं.

पण रामराज्यातही त्यांना समान दर्जा मिळाला नाही. मग वचनपूर्तीच्या स्वागतासाठी वाजवलेल्या या टाळ्या थांबल्याच नाहीत. तेव्हापासून ‘हाय हाय’ करत निषेधाच्या टाळ्यांचा हा आवाज आजपर्यंत चालूच आहे. हा आवाज त्यांच्या दुःखाचा आहे. त्यांच्या वेदनेचा आहे. रामायण काळापासून त्यांचा आवाज कोणापर्यंतही पोहोचत नव्हता. पण आता तो हळूहळू योग्य ठिकाणी पोहोचतोय. रस्ता खूप लांबचा आहे. पण बदल होतोय.

भारतात १५ एप्रिल २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयानं तिसरं लिंग म्हणून तृतीयपंथीयांना मान्यता दिली. याचिकाकर्त्यामध्ये गौरीही एक होती. हा त्यांचा विजय होता. देश १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला, पण खरं स्वातंत्र्य आम्हांला आज मिळालं, त्यांची ही प्रतिक्रिया खूप बोलकी आहे.

तामीळनाडूमध्ये २०११ पासून पंधरा एप्रिल हा ‘किन्नर दिन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. कालच्या ६ सप्टेंबर २०१८ ला कलम ३७७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं एकमतानं सांगितलंय की, समलिंगी संबधांकडे पहाण्याची समाजाची मानसिकता बदलायला हवी. आता हळूहळू हा दबलेला आवाज मोकळा होतोय. पण तरीही माणूस म्हणून प्रत्यक्षात अधिकार मिळवण्याची त्यांची लढाई सोपी नाही, याची जाणीव त्यांना आहे. समाजाला याचं भान येईल तो सुदिन!

गौरी म्हणाली की, मुंबईत अंदाजे पाच साडेपाच लाख हिजडे आहेत. उद्या त्यातल्या काही लोकांनी कष्ट करून पोट भरायचं म्हटलं तरी त्यांना काम देणार कोण? ही आजच्या घडीची परिस्थिती आहे. एकंदरीत कायद्यानं मिळालेले हक्क प्रत्यक्षात आणण्यासाठी समाजाला हिजड्यांकडे पाहण्याची दृष्टी बदलावी लागेल. निरोगी निर्मळ मनानं त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या या समस्येकडे पहावं लागेल. त्याचबरोबर तृतीयपंथी समुदायालाही परखड आणि कठोरपणे आत्मपरीक्षण करावं लागेल. विरोध दोन्हीकडूनही होणारच. पण समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा आणि आणण्याच्या प्रयत्नांचा तो एक भाग आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. अपयशही येईल. पण दोघांपैकी कोणीही न खचता प्रयत्नातलं सातत्य कमी होणार नाही, हे पहावं लागेल. दोन्ही पक्षांनाही बाब सारखेपणानंच लागू आहे. अर्थात प्रयत्न तर तसे आजही चालू आहेतच. तरीही समाजानं अधिक सजगपणे त्यांच्या बाजूनं उभं राहून, त्यांना समानतेनं, बरोबरीच्या नात्यानं वागवायची नितांत गरज आहे. तो विश्वास समाजानं त्यांना द्यायला हवा. त्यांच्यात निर्माण करायला हवा. त्यांची वेगळी ओळख आपण सन्मानानं जपायला हवी. माणूसपणाचे सारे अधिकार, सारे हक्क त्यांनी न मागताही त्यांना देण्यासाठी संपूर्ण समजानं कटिबद्ध होणं ही खरं तर काळाची निकड आहे.

तोपर्यंत ते म्हणतात तसं ‘दिल्ली तो बहोत दूर है… चलो, बस्स, अभी तो शुरुवात हो चुकी है.’

.............................................................................................................................................

या लेखाच्या पूर्वार्धासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -

.............................................................................................................................................

लेखिका रेखा शहाणे या कवयित्री व पर्यावरण अभ्यासक आहेत.

rekhashahane@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......