पुणे जिल्हा ‘जटामुक्त’ करणाऱ्या नंदिनी जाधव
अर्धेजग - कळीचे प्रश्न
हिनाकौसर खान-पिंजार
  • नंदिनी जाधव जटा मुक्त करताना
  • Tue , 19 December 2017
  • अर्धे जग कळीचे प्रश्न जटा Jata अंनिस Andhashraddha Nirmoolan Samiti

बायकांच्या डोक्यातल्या जटा हा आजही सामाजिक प्रश्‍न आहे. जटांचा संबंध श्रद्धेशी, पाप-पुण्याशी जोडला जात असल्यानं जटांना हात लावायला कुणी धजावत नाही आणि म्हणून कित्येक जणी अशा नजरेस येत राहतात. मात्र हे काम करायला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव या नेहमीच तत्पर असतात. आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यातील ४० जणींना त्यांनी जटमुक्त केलं आहे. एकुण राज्यात पुणे जिल्ह्याचा हा आकडा मोठा आहे. वेगवेगळ्या स्तरातील आणि वेगवेगळ्या गटातील मुली/बायकांना त्यांनी जटाच्या ओझ्यातून मुक्ती दिली आहे. ही मुक्ती नुसती डोक्यावरच्या जटांचीच नसते, तर त्यासोबतीनं येणाऱ्या अनेकविध अंधश्रद्धातूनही बायका, त्यांचे कुटुंब आपसूकच बाहेर पडतात.

अर्थात ही किमया एका दिवसात घडत नाही. त्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो, अपमान गिळावा लागतो आणि प्रसंगी आवाजही चढवावा लागतो. नंदिनी जाधव हे सगळं मन लावून करतात.

मध्यमवर्गीय सुखवस्तू घरातल्या नंदिनी जाधव या खरं तर मेकअप आर्टिस्ट. ब्युटिशियन्ससाठी महत्त्वाचा असणाऱ्या लंडनच्या सिडास्कोमधून त्यांनी पार्लरसंबंधी सखोल प्रशिक्षण घेतलंय. कॉलेजवयात त्या व्हॉलिबॉल, भालाफेक या खेळात राष्ट्रीय खेळाडू राहिल्यात. व्हॉलिबॉलच्या सांघिक पातळीवर राष्ट्रीय खेळाडू म्हणून सलग पाच वर्षं खेळत होत्या. उंचपुऱ्या, शिडशिडीत बांध्याच्या, ‘रॉयल एनफिल्ड’वर रुबाबदारपणे वावरणार्‍या नंदिनी जाधव यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वावर खेळाडूपणाची छाप दिसतेच. त्यांचं एकूण व्यक्तीमत्त्वच धडाकेबाज असलं तरी त्या प्रचंड संवेदनशील आहेत. बी. ए.चं शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी स्त्री अभ्यास केंद्रातून शिक्षण घेतलं. त्यानंतर एमएसडब्ल्यू केलं. पहिल्यापासूनच त्यांना समाजकार्याची आवड होती. विधवा, परित्यक्त्या महिलांना फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस शिकव, शाळेत लाठीकाठीचे प्रशिक्षण घे, ग्रामीण महिलांना मोफत प्रशिक्षण दे, अशा प्रकारची कामं त्या करत होत्या. त्यांनी रेड लाईट एरियामध्ये दोन वर्षं काम केलं. तसेच अंध, अपंग, अनाथ आश्रममधील मुलांसाठी विविध क्राफ्टचं मोफत प्रशिक्षण शिबिर घेणं अशा विविध स्वरूपातील कामं त्या करत होत्या. मात्र २०१२ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी त्यांचा परिचय झाला आणि त्या तेव्हापासून  अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत जोडल्या गेल्या.

अंनिससोबत प्रवास सुरू केल्यावर त्यांना महिलांचे प्रश्न अधिक जवळून कळू लागले. त्यांच्यात उपजत असणाऱ्या कार्यकर्तेपणाला इथं दिशा मिळू लागली. आणि अगदी थोड्याच दिवसांत त्यांच्याकडे जटनिर्मूलनाची पहिली केस आली. जाधव सांगतात, “८ मार्च २०१३ रोजी पुण्यतल्या जनवाडी या भागात हा प्रसंग घडला. तिथल्या १६ वर्षाच्या मुलीच्या डोक्यात जट दिसली होती. त्यामुळे कुटुंबियांनी घाबरून तिला शाळेतून सोडवून घरी बसवलं होतं आणि ते तिला कर्नाटकातील सौंदती देवीच्या मंदिरात नेऊन देवदासी होण्यासाठी सोडणार होते. त्या मुलीच्या मैत्रिणींनी ही माहिती अंनिसपर्यंत पोहचवली. आम्ही लगेच तिच्या घरी पोहचलो. सुरुवातीला तिच्या कुटुंबियांनी आमच्या घराचा मामला आहे म्हणत हाकललं. पण आम्ही धीर सोडला नाही. दिवसभर बसून राहिलो, त्यांना जट कशी येते सांगू लागलो. देवीचा कोप होत नाही हे समजावलं बराच काथ्याकुट केला. मी जटा कापणार आहे; त्यामुळे जो काही कोप व्हायचा तो माझ्यावर होईल असं निर्वाणीचं सांगितलं. माध्यमातही ही बातमी पसरली. दबाव निर्माण झाल्याने शेवटी ते तयार झाले. १६ वर्षांची मुलगी पुढच्या भयंकर प्रतापातून वाचली.’’

खरंच होतं ते, देवदासी होऊन तिच्या आयुष्याचं मातेरंच झालं असतं. मुली/बायांच्या डोक्यात जट आली की अनेकदा कर्नाटकातील सौंदतीदेवीला सोडून देण्याचे प्रकार घडतात. पुढे त्यांना देवदासी करून उपभोगलं जातं. काहींची परवड वेश्यावस्तीत होते. काही जणींना देवत्व देऊन सांसारिक जगण्यातून मुक्त केलं जातं. तर काही जणी हळदी-कुंकवाचा टोपलं घेऊन रस्तोरस्ती फिरतात आणि दान मिळवत असतात. तो त्यांच्या उत्पन्नाचा भाग असतो. जबरदस्तीनं बायकांना हे करण्यासाठी भाग पाडलं जातं.

पण या जट निर्माण कशा होतात? हा प्रश्न सतावत होता. त्यावर नंदिनीताई म्हणाल्या, “जटा या बहुतेककरून मानेपासून सुरू होतात. तिथून नीट कंगव्यानं विंचरलं जात नाही. अनेकदा केसांना तेल लावलं जात नाही. मग त्यात धूळ, माती किंवा काहीतरी कचरा केसांत जाऊन अडकतो. केस नीट विंचरले जात नाहीत तसे स्वच्छ धुतले जात नाहीत. शॉम्पूने नीट न धुतल्यानं केसातली घाण तशीच राहते आणि त्याचा गुंता तयार होत जातो. तो मानेवरच्या केसांमध्ये अडकल्यानं वर चटकन दिसतही नाही. पुढे त्यात केस अडकत जातात आणि जट निर्माण झाली असं लोकांना वाटतं.’’

अशा जटा निर्माण होण्यामध्ये काही वेळा बायकांच्या कामाचं स्वरूपही कारणीभूत असतं. कचरा वेचणं, वाळू-मातीतलं काम करणं, शेतातलं काम करणं. त्यांच्या कामातून कचरा, माती किंवा शेतकरी बायांबाबत एखाद गवत केसात अडकतं आणि पुढे जटा तयार होतात. त्यांनी लगेच एक उदाहरण दिलं. एकदा तरुणीच्या केसात जटा निर्माण झाल्या होत्या. खोदून खोदून विचारल्यावर कळालं की, ती उडदाच्या पापड्या करण्याचा व्यवसाय करते. पापड लाटताना तिनं कधीतरी मानेवरचे केस मागे सारले, तेव्हा त्यात उडदाचं चिकट पीठ लागलं असणार. असं सतत होत गेलं आणि जट झाली.

थोडक्यात केसांची अस्वच्छता हा जटांना आमंत्रित करणारा प्रकार. आपले केस स्वच्छ धुणं, गुंता झाल्यास नीट सोडवणं, एक एक केस मोकळं करणं, वेळोवेळी तेल लावणं या गोष्टी केल्यास जटा होण्याचं कारणच नाही.

एखादी जट निर्माण झाली की, संपूर्ण केसांत कशी होत असतील? काही बायकांचे पूर्णच्या पूर्ण केस जटायुक्त दिसतात. तर त्याचं उत्तर पुन्हा अस्वच्छतेशीच निगडीत होतं. एकदा जट निर्माण झाली की, बायकांना लाज वाटते आणि त्या ते लपवून ठेवण्याचा प्रकार करतात. त्यासाठी डोक्यावरून पदर घेतात. त्यातून मग उर्वरित केसांमध्येही घाण साचायला लागते. आंघोळ केल्यानंतरही नीट न सुकवल्यानं त्यातली घाण निघत नाही. केस नीट वाळवले जात नाहीत. उलट पुन्हा लगेच ओलं असतानाच बांधून टाकलं जातात. यातून एका जटाची लागण सगळ्या केसांना व्हायला लागते. नंदिनीताई सांगतात, “काही बायकांच्या तर अगदी ८-१० किलो वजनाच्या जटा होत्या. अगदी पाच किलोपासून ते अकरा किलोपर्यंतच्या जटा सोडवल्या आहेत. अनेकदा या जटांमध्ये अळ्या, उवा, लिका असतात. प्रचंड वास येत असतो. बायका अंधश्रद्धेपोटी त्या आपल्या डोक्यावर घेऊन वावरत असतात. जटा कापताना इतर कोणी जवळ थांबूही शकणार नाही, इतका घाणेरडा वास येत असतो. जटा कापल्यानंतर बायकांना खूप हलकं हलकं वाटतं, असं बायकाच आनंदानं सांगतात. पण कापलेल्या जटा या घाण आहेत याविषयी तरीही त्यांच्या मनात शंका असते. म्हणूनच ते पुन्हा त्या जटा नदीत विसर्जित करू असं म्हणायला लागतात. पण शेवटी जटांमधली एकंदर घाण आणि कचरा दाखवल्यावर जटांची विल्हेवाट रीतसर कचऱ्यात लावली जाते. ’’

अनेकदा जट आलेल्या बायकांच्या अंगातही येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण अंगात येणं हा देखील एक मानसिक आजार असल्याचं नंदिनीताई सांगत होत्या. काही जणी तर चक्क सोंग करतात. याविषयी नंदिनीताई सांगतात, “अंगात येणं हा हिस्टेरियाचा प्रकार असतो. मानसिक तणाव असह्य झाला की, त्या अशा विचित्र वागतात. केसात जट झाली की, त्यांना अनेक शुभकार्यापासून दूर ठेवलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय सुरू होतात. यातून त्या मानसिक नैराश्यात जातात. ते कुठंतरी बाहेर काढण्याचं काम त्यांचं हे अंगात येणं करत असतं. त्यासाठीसुद्धा डॉक्टरांची मदत घेण्याची गरज असते. ’’

जटा आणि अंधश्रद्धेचाही संबंध आहे. जट झाली म्हणजे बाईनं काहीतरी पाप केलंय असा विचार कुटुंबातूनच व्हायला लागतो. त्यामुळे तिला वाळीत टाकण्याचा प्रकार सुरू होतो. मग देवीचा कोप घालवण्यासाठी बोकड कापायची युक्ती बुवाबाबा त्यांना देतात. यासाठी अनेक जण कर्ज काढतात. कारण याचा खर्च कमीत कमी लाखाच्या घरात सांगितलेला असतो. पण त्या जटेला घाबरून लोक अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना बळी पडतात. हा प्रकार अशिक्षितांमध्येच नव्हे, तर उच्चशिक्षितांमध्येही आढळत असल्याचं नंदिनीताई सांगतात. त्यांच्याकडे एका बँकेचा मॅनेजर आपल्या बायकोला घेऊन आला होता. बायकोच्या डोक्यात जट झाल्यानं सात वर्षांपासून त्यानं तिला स्पर्शही केला नव्हता. तिला कुठल्याही सण समारंभात घेऊन जात नसायचा. तो उच्चशिक्षित, उच्चपदस्थ असूनही त्याला जट सोडवण्याविषयी शंका वाटत होती. कुटुंबातील कोणी मरेल अशी त्याला भीती होती. अर्थात नंदिनीताईंनी सातत्यानं केलेल्या समुपदेशनानंतर त्या बाईची जट सोडवण्यात आली. परंतु इतक्या साध्या गोष्टीसाठी तो सात वर्ष बायकोशी धड बोलला नव्हता. एकप्रकारे स्त्रियांवर हाही अन्यायच!

जटनिर्मूलनाबाबत लोकांच्या मनात अंधश्रद्धांचं घर असल्यानं जट सोडवण्याआधी अंनिसच्या वतीनं एक अर्ज भरून घेतला जातो. याविषयी नंदिनीताई म्हणाल्य, “जट कशी येते, का येते असं सगळं नीट समजावून सांगितलेलं असतं. लोकांच्या मनातील शंका दूर होईपर्यंत आम्ही विवेकानं उत्तर देतो. ज्या बाईच्या डोक्यात जटा आहेत तिची आणि तिच्या कुटुंबियांची दोघांची तयारी करून घेतो. त्यांची इच्छा आणि परवानगी असेल तरच आम्ही जटा सोडवतो. कोणावर कसलीही जबरदस्ती करत नाही. फक्त त्यांना विवेकाचा मार्ग सांगत राहतो. एकदा का तयारी झाली की, त्यांच्याकडून एक परवानगीचा अर्ज भरून घेतला जातो. कारण जट निमूर्लनानंतर कोणतीही अनिष्ठ गोष्ट घडणार नसते, परंतु कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ झाली असा प्रसंग आल्यास त्यांची रीतसर परवानगी आपल्याकडे हवी म्हणून आम्ही हा उपदव्याप करतो. मी तर जट सोडवण्यासाठी मंगळवार आणि शुक्रवारचा दिवस निवडते. हे दोन्ही दिवस देवीचे मानले जातात. त्यामुळे त्याबाबतची भीतीही कमी होते. जट सोडवल्यानंतरही आम्ही त्यांच्याशी संपर्क ठेवतो. त्यांची विचारपूस करत राहतो. ’’

नंदिनीताईंनी पुणे शहर व जिल्ह्यातील एकूण ४० जणींना जटमुक्त केलं आहे. त्यांच्या कोणाच्याही घरात काही अनिष्ट घडलं नाही. उलट त्या बायकांच्या डोक्यावरची घाण कमी झाली आणि त्या मोकळ्या जगू लागल्या आहेत. या सगळ्यात नंदिनीताईंना माध्यमांची मदतही तितकीच महत्त्वाची वाटते, कारण काही जणींनी वर्तमानपत्रातील बातम्या वाचून जट सोडवण्याचा निर्णय घेणाऱ्याही महिला त्यांना भेटल्या. एका रिक्षावाल्याच्या बायकोच्या जटा सोडवल्यानंतर त्याला यातील अंधश्रद्धेचा फोलपणा इतका पटला. आता तो स्वत:हून अशी कोणी बाई दिसली की, तिची नंदिनीताईंना गाठ घालून देतो. हा सकारात्मक बदल दिसत आहे.

लवकरच संपूर्ण पुणे जिल्हा जटनिर्मूलन करण्याचा ध्यास नंदिनीताईंनी घेतला आहे. अंनिसशी २०१२ नंतर जोडल्या गेल्यानंतर नंदिनीताईंनी अल्पावधीतच कार्यकर्त्याची बांधीलकी स्वीकारली. आजवर त्यांनी ५० बाबाबुवा, बोगस डॉक्टरांना उघडं पाडलं आहे. चमत्कार, स्त्री व अंधश्रद्धा याविषयी २७ जिल्ह्यांत १२०० व्याख्यानं दिली आहेत. जादूटोणा कायद्याच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात २७ जिल्ह्यांत सलग ४९ दिवस फिरल्या आहेत. नेटानं काम करत आहेत.

आतापर्यंत नंदिनीताईंनी बुवाबाजी व जात पंचायत, बोगस डॉक्टर याबाबत जवळपास चाळीस प्रकरणं स्वतः हाताळली आहेत. जादूटोणा कायदा होण्यासाठी नागपूर येथील आंदोलनात सलग पंधरा दिवस उपस्थिती, नंतर कायदा समजावून सांगण्यासाठी काढलेल्या दौरात ४९ दिवसांत २७ जिल्ह्यांचा दौरा करून जादूटोणा कायद्याचा प्रचार व प्रसार यांविषयी १२००हून अधिक व्याख्यानं दिली आहेत. दोन वर्षांचा पुणे जिल्हा कार्याध्यक्ष कार्यकाल संपल्यानंतर यावर्षी पुन्हा त्यांची पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी फेरनिवड झाली आहे. जाधव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे, राज्य महिला आयोगाकडून मॅक्स महाराष्ट्र पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

नंदिनीताई म्हणतात, “ही प्रेरणा डॉक्टरांकडून मिळाली. २० ऑगस्ट २०१३ रोजी दाभोलकरांचा खून झाला. त्यावेळी मी खूप अस्वस्थ झाले. समाजासाठी काम करायचं असेल तर ते असं झोकून देऊन करायला हवं ही जाणीव प्रकर्षानं जाणवत राहिली.” नुसती अशी जाणीव होऊन उपयोग नव्हता, कृती आवश्यक होती.” पुण्यातील हडपसर येथील दोन हजार चौफुटातील दरमहा साधारण एक लाख उत्पन्न मिळवून देणारं स्वत:चं पार्लर त्यांनी २०१३ मध्ये बंद केलं. असं धाडस करायला खरंच जिगर लागते. स्त्रियांचं बाह्यसौंदर्य खुलवण्यापेक्षा त्यांचं वैचारिक सौंदर्य खुलवणं अधिक महत्त्वाचं असा मौलिक विचार त्यांनी केला आणि आता मागील साडेपाच वर्षांपासून त्या पूर्णवेळ कार्यकर्त्या म्हणून काम करत आहेत.   

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

लेखिका हिनाकौसर खान-पिंजार मुक्त पत्रकार आहेत.

greenheena@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 19 December 2017

स्वच्छतेचं दुसरं नाव परमेश्वर! जटामुक्तीच्या कार्याबद्दल नंदिनीताईंना विनम्र अभिवादन!! लेखाबद्दल हीनाताईंचे आभार. एकंदरीत देवीच्या नावावर मुलगी सोडणे ही घोर अंधश्रद्धा आहे. जटा वाढवण्याच्या विरुद्ध कायदा झालेला बघायला आवडेल. -गामा पैलवान