बॉब डिलन : वाहत्या काळाचा तटस्थ साक्षीदार (उत्तरार्ध)
दिवाळी २०१७ - व्यक्तिचित्रे
चैताली भोगले
  • बॉब डिलनचे अल्बम
  • Tue , 01 November 2016
  • बॉब डिलन ‌Dylan चैताली भोगले Chaitali Bhogle

जोन बाएझ नागरी हक्क चळवळीत हिरीरीने सहभागी झाली होती. डिलन तिथं तिच्या साथीला होताच. पण अज्ञात डफलीवाल्याच्या सावलीमागून नाचत नाचत निघण्याची इच्छा अंतर्यामी ज्याने जपली, त्याला अशा कप्प्यांमध्ये बंद होऊन राहणं अशक्यच होतं. जोन बाएझचा प्राधान्यक्रम स्पष्ट होता. त्यात चळवळीला अग्रस्थान होतं, पण चळवळी तात्कालिक असतात, त्या संपून जातात, काळ बदलत राहतो आणि संदर्भहीनता पदरी येते हे सारं डिलनला टाळायचं होतं. त्याला भूमिका घ्यायची नव्हती, तर जे काही दिसतंय ते तटस्थपणे मांडायचं होतं. मग ती मोठी क्रांती किंवा युद्ध असोत, नाहीतर सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातल्या राग लोभ, प्रेम-द्वेषासारख्या छोट्या छोट्या भावना असोत. त्याच्यालेखी हा साराच समग्र जगण्याचा भाग राहिला. याच दरम्यान प्रसिद्ध झालेलं ‘इट्स ऑल राइट मा, आयॅम ओन्ली ब्लिडिंग’ हे अप्रतिम गाणं आहे. तब्बल दहा मिनिटं ते चालतं.

Disillusioned words like bullets bark
As human gods aim for their marks
Made everything from toy guns that sparks
To flesh-colored Christs that glow in the dark
It's easy to see without looking too far
That not much
Is really sacred

शब्द एकामागून एक धडधडत येतात. प्रत्येक अंतऱ्याच्या शेवटच्या शब्दाला दिलेला किंचितसा कोस, त्याला लगटून येणारी हार्मोनिकाची आर्त लकेर आणि गिटारवरची आवर्ती सुरावट. ते सारं प्रकरण अंगावर काटा आणणारं आहे.

Advertising signs that con you
Into thinking you're the one
That can do what's never been done
That can win what's never been won
Meantime life outside goes on
All around you.

हे तर आजच्या काळाचंच वर्णन वाटतं. ‘माझे विचार-स्वप्नं मी उघड्यावर बोलून दाखवली तर ते लोक बहुतेक माझं डोक गिलोटीनखाली ठेवतील’ असं या गाण्याच्या शेवटी तो सांगतो. पण ‘But don’t worry ma, its life and life only’ असंही समंजसपणे म्हणतो. ही सर्वंकष दृष्टी त्याला गटागटांच्या राजकारणातून वेगळं पाडणारी ठरली नसती तरच नवल. पण डिलनने त्याआधीच आपणहूनच आपली वेगळी वाट पकडली होती. सगळे जण त्याच्या गाण्यातल्या आवेशात स्वत:साठी स्फूर्ती शोधत होते, तेव्हा आपलं गाणं सगळ्या अभिनिवेशांना बाजूला करून, अलंकारांची झूल उतरवून खरंखुरं आणि अधिक थेट कसं बनेल याची चिंता हा तरुण गीतकार वाहत होता. ही किमया त्याला लवकरच साधली.

१९६५ साली या बदलांचा पुकारा त्याने ‘डंके की चोट पर’ म्हणाव्या तशा पद्धतीने केला. त्यावर्षी तो न्यू पोर्ट फोल्क फेस्टिव्हलमध्ये पोल्का डॉट्सचं शर्ट आणि हातात इलेक्ट्रिक गिटार अशा नव्या अवतारात प्रेक्षकांना सामोरा गेला. अकॉस्टिक गिटारवर बोटांनी छेडलेल्या मृदू- नक्षीदार सुरावटींना सरावलेल्या चाहत्यांना हा बदल पचवणं जड गेलं, पण डिलनला दूरचं दिसत असणारच. त्याच्या त्या प्रयोगांनीच अमेरिकेतल्या रॉक आणि रॅप संगीताचा पाया घातला असं म्हटलं जातं. शिवाय त्याची गाणी अधिक वैयक्तिक, त्याला हवी होती तशी थेट बनली. इथं व्यवस्था ही त्याची शत्रू होती, पण दुश्मन झालेल्या सख्ख्या सोबत्यांवर झणाणत्या इलेक्ट्रिक गिटारच्या साथीनं केलेली आगपाखडही होती. या काळातल्या सबटेरेनियन होमसिक ब्लूजची रचना गमतीदार आहे. हे गाणं काहींना आद्य रॅपसाँग वाटतं. अक्षरश: एकामागून एक सूचनांचा भडिमार करणारं हे गाणं आधुनिक अमेरिकेची मनोवृत्ती, व्यवस्थेतला गोंधळ यावर नेमकं बोट ठेवतं आणि सांभाळून राहण्याचा सल्ला मोठ्या खुसखुशीतपणे देतं.

get born, keep warm
Short pants, romance, learn to dance
Get dressed, get blessed
Try to be a success
Please her, please him, buy gifts
Don't steal, don't lift
Twenty years of schoolin'
And they put you on the day shift
Look out kid
They keep it all hid
Better jump down a manhole
Light yourself a candle
Don't wear sandals
Try to avoid the scandals
Don't wanna be a bum
You better chew gum
The pump don't work
'Cause the vandals took the handles.

‘मॅगीज फार्म’ हे सुद्धा असं व्यवस्थेविरोधात बंडाची इच्छा धरणाऱ्यांसाठीचं गमतीदार गाणं आहे.

I wake up every morning

Fold my hands and pray for rain

I ve got a headful of ideas

That are driving me insane

It’s a shame the way she makes me scrub the floor…

अख्ख्या गाण्यात अस्सा वैताग भरलेला आहे (पुढे ८०च्या दशकात या मॅगीमध्ये लोकांना इंग्लंडमधल्या मार्गारेट थॅचरबाईंच्या कडव्या राजवटीचाही भास झाला.) आपल्या कमालीच्या तुच्छतेने भरलेल्या स्वरात

How does it feel to be without home

With no direction home

Completely on your own

Like a rolling stone…

असं म्हणणारा डिलन मग तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनायला किती वेळ लागणार होता! पण लोकप्रियतेच्या अशा कळसावर असताना सततचे दौरे, ध्वनिमुद्रणं यात अडकल्यामुळे स्वत:शी फारकत होऊ लागली होती. त्या सगळ्याला जबरदस्त ब्रेक मिळाला, त्याच्या गाडीला त्याच्याच गावाजवळ झालेल्या गंभीर अपघातामुळे. ही गोष्ट १९६६ सालची. पण तो अपघात खरंच इतका गंभीर होता की, डिलनला साऱ्या गर्दीपासून दूर जाण्याची निकड भागवण्याचं ते निमित्त होतं याबद्दल संभ्रम आहे. प्रसिद्धीच्या झोतात आपल्या आतल्या गाण्यापासून तुटल्याची भावना त्याला सतावत होती. या अपघातामुळे त्याला तो हक्काचा एकांत मिळवून दिला.

५.

एकांताचं संचित घेऊन १९७५ साली आपला ‘ब्लड ऑन द ट्रॅक्स’ हा अल्बम घेऊन डिलन परतला, तेव्हा त्याचा नूर सर्वस्वी वेगळा होता. त्याचं गाणं अधिक आत्मचिंतनपर बनलेलं होतं आणि गूढतेकडेही वळलं. या अल्बमला सुरुवातीला मिळालेला प्रतिसाद संमिश्र होता. पण काळानुरूप त्यातली गाणी उत्तम वाइनसारखी मुरली आणि आज डिलनच्या सर्वश्रेष्ठ अल्बम्समध्ये ‘ब्लड ऑन द टॅक्स’चा उल्लेख आवर्जून केला जातो. मधल्या काळात सारा लाउंड्सशी थाटलेला अनेक वर्षांचा संसार अडचणीत आला होता. नात्यातलं बिनसलेपण या अल्बममध्ये जागोजागी सांडलेलं दिसतं. ‘बकेट्स ऑफ रेन’, ‘यू आर अ बिग गर्ल नाऊ’, ‘इडियट विंड’ ही सगळीच गाणी आत्मकथनपर, ‘कन्फेशनल’ आहेत, असा निष्कर्ष समीक्षकांनी काढला.

You're gonna make me wonder what I'm doing,
Staying far behind without you.
You're gonna make me wonder what I'm saying,
You're gonna make me give myself a good talking to.

या अल्बममधल्या ‘यू आर गोईंग टू मेक मी लोनसम वेन यू गो’ या गाण्यातल्या या उत्कट ओळी. त्याची प्रेमाची गाणी हे खरंतर एक स्वतंत्र प्रकरण होऊ शकेल. ती प्रेयसीसाठी विव्हळणारी, गोड गुलाबी कधीच नसतात. उलट त्यातलं फोलपण, अपरिहार्य वियोग असेच मुद्दे त्यात फिरून फिरून येत राहतात. ती काव्यात्म अभिव्यक्ती आहे. त्यामुळे ती गाणी कोणासाठी रचली ही बाब तिथं फारशी महत्त्वाची उरत नाही, असं सांगत त्याला वैयक्तिक आयुष्याशी जोडण्याला डिलनने सतत नकार दिला. शांत सुरावटीच्या ‘टू फॉल इन लव्ह’मधली ‘ती’ त्याची पत्नी साराच आहे का, ‘बॅलाड इन प्लेन डी’ हे त्याने आपली पहिली प्रेयसी सुझ रोटोलोसाठी लिहिलं का, ‘इमेज ऑफ जोआना’मधील प्रतिमा जोन बाएझचं वर्णन करतात का?

She takes just like a woman, yes she does
She makes love just like a woman, yes she does
And she aches just like a woman
But she breaks just like a little girl.

मध्ये व्यक्त होणारी करुणामयी घृणा एडी सेजविकबद्दलची आहे का याचा अंदाज बांधता येत नाही. या प्रेमगीतांमध्ये आत्मभान जपण्याचीही असोशी दिसते. ‘डोंट थिंक ट्वाइस’, ‘इट्स ऑल राइट’, ‘इट एंट मी बेब’, ‘इट्स ऑल ओव्हर नाऊ बेबी ब्लू’ अशा गाण्यांतून ती वेळोवेळी प्रकट होते. त्यातला अलविदा केवळ प्रेयसीला नाही, तर एकूणच प्रेमातल्या भाबडेपणाला आहे, बंधनांना आहे.

प्रत्येक वेळी अशा बंधनांना राम राम ठोकत, प्रत्येक नव्या वळणावर जुन्या गोष्टींना धीटाईनं अलविदा करत आज चोपन्न वर्षं डिलन स्वत:च तयार केलेली वाट चालतो आहे. ऐंशी-नव्वदच्या दशकांपासून पार अलीकडे अलीकडेपर्यंत त्याचे नवनवे अल्बम्स सातत्याने येत राहिले आहेत. ब्लाँड ऑन ब्लाँड, डिझायर, टाइम आऊट ऑफ माइंड, मॉडर्न टाइम्स इथपासून ते नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फॉलन एंजल्ससारख्या अल्बम्समधून तो पुन्हा पुन्हा भेटत आला आहे. त्याखेरीज आपलीच जुनी गाणी नव्यानं मांडण्याचे प्रयोगही तो सातत्याने करत राहिला आहे. हे प्रयोग आजही चालू आहेत. २००१ साली वंडर बॉइज नावाच्या सिनेमासाठी त्याने गायलेलं गाणं थिंग्ज हॅव चेंज्ड ने त्याला ऑस्करही मिळवून दिलं.

People are crazy and times are strange

I’m locked in tight, I’m out of range

I used to care, but things have changed

असं आजच्या काळाबद्दल बेफिकीरीनं म्हणत मायकल डग्लसबरोबर थिरकणारा, म्हातारपणाकडे झुकलेला डिलन पाहून आश्चर्य वाटतं. त्याचा हा सगळाच अचाट सांगीतिक प्रवास थक्क करणारा आहे. यात चढ-उतार आलेच नाहीत असं नाही. वादविवादही भरपूर झाले. आपल्या शैलीमध्ये काही बदल करण्याचा प्रयोग त्याने जेव्हा जेव्हा केला, तेव्हा तेव्हा अस्वस्थ चाहत्यांनी त्याची हुर्योही उडवली. त्यातच डिलनचं आपल्या गाण्यांबद्दल त्रोटक, दिशाभूल करणारं बोलणं, मीडियाबद्दलचा अनादर, त्याचा त्रासदायक आत्मकेंद्रीपणा, विक्षिप्तपणा या साऱ्यामुळे तो टीकेचा आणि रोषाचा विषयही बरेचदा बनला. पण तरीही ‘अमेरिकन पॉप्युलर संगीतातला बापमाणूस’ म्हणून निर्विवादपणे त्याचंच नाव पुढे येतं. डिलनने दाखवलेल्या वाटेवरून पुढे गेलेले कलाकार त्याचं हे बापपण मान्य करतात. त्याची गाणी यातल्या अनेकांनी आपल्या आपल्या पद्धतीनं गायली. (जिमी हेंड्रीक्सने त्याच्या ‘ऑल अलाँग दे वॉचटॉवर’ या गूढरम्य गाण्याचं केलेलं सादरीकरणं प्रचंड गाजलं. खुद्द डिलनलाही ते आशयाच्या अधिक जवळ जाणारं वाटलं. जिमी हँड्रीक्सच्या निधनानंतर आपल्या कॉन्सर्ट्समध्ये त्याने कित्येकदा त्याच्या शैलीत गाऊन या प्रयोगाला मानवंदना दिली आहे.) त्याच्या गाण्याची कव्हर व्हर्जन्सही तुफान लोकप्रिय झाली. त्याच्या गाण्यांमधले शब्द उचलून अनेक रॉक बँड्सची बारशी झाली. आपल्या आतल्या गाण्याशी इमान राखत पुढची वाटचाल करण्याचा त्याने दिलेला अवघड वसा, आजची तरुण प्रयोगशील पिढी असोशीने जपते आहे.

अमेरिकन संगीताच्या परंपरेत डिलनचं योगदान नेमकं काय हे समजून घ्यायचं तर ज्या पिढ्यानपिढ्यांच्या सांगीतिक वारशातून डिलनचं गाणं उभं राहिलं, तो पुढे नेण्यासाठी डिलननं नेमकं काय केलं हे पाहावं लागेल. टीकाकर एलेन विलिस हिनं एके ठिकाणी म्हटलंय, ‘डिलनने लोककलेची चौकट त्याच्या श्रीमंत, प्रतिमांनी समृद्ध अशा भाषेनं सजवली. निषेधाच्या प्रचारकी गाण्यांमध्ये तत्त्वज्ञानातील गूढता आणि सूक्ष्मता आणली. तोपर्यंतच्या लोकगीतांमध्ये दिसणारी कष्टकरी, ग्रामीण जनतेच्या हळव्या भावनाशीलतेला त्याने नाकारलं आणि त्यात नवे प्राण फुंकले. आणि मग निव्वळ लोककलांचा ढाचाच उदध्वस्त करून तो प्रवाह अधिक समकालीन अशा पॉप संगीताशी नेऊन जोडला.’ त्याच्या या कृतीनं एरवी जे लोकसंगीत कालबाह्य होऊन विस्मृतीत गेलं असतं, ते प्रवाही झालं. डिलनचं अमेरिकन लोकसंगीतावरचं हे ऋण न फिटणारं आहे. त्याचवेळी प्रत्येकाला निवडीचं, नकाराचं बळ देणारी, आत्मभान जपण्याची साद देणारी त्याची अवीट गाणी हा साऱ्या जगभरातल्या चाहत्यांसाठीचा अमोल ठेवा बनून राहिला आहे. त्याच्या या आपल्यावरच्या ऋणाची परतफेडही कठीणच. त्याला मिळालेल्या नोबेलबद्दल मनातल्या मनात खूश होणं आणि त्यानिमित्तानं पुन्हा त्याच्या गाण्यांची पारायणं करणं इतकं मात्र करता येईल.

(समाप्त)

लेखिका मुक्त पत्रकार आहेत.

chaitalib6@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख