आपलं माणूसपण मिळावं, अशी आस असलेली आजच्या पिढीतली ही कवयित्री स्वतःशी ओळख करून घेते आहे!
ग्रंथनामा - आगामी
नीरजा
  • ‘फक्त सैल झालाय दोर’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 19 April 2019
  • ग्रंथनामा आगामी फक्त सैल झालाय दोर Fakt Sail Jahalay Dor पद्मरेखा धनकर Padmarekha Dhankar

कवयित्री पद्मरेखा धनकर यांचा ‘फक्त सैल झालाय दोर’ हा दुसरा कवितासंग्रह लवकरच ग्रंथालीतर्फे प्रकाशित होतो आहे. या संग्रहाला प्रसिद्ध कवयित्री व कथाकार नीरजा यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तीच इथे देत आहोत...

.............................................................................................................................................

मराठी कवितेत स्त्रियांच्या लेखनाची परंपरा पुरुषांएवढी खूप मोठी नसली तरी दखल घेण्यासारखी नक्कीच आहे. अगदी १९व्या शतकापासून स्त्रिया थोडंबहुत लिहीत होत्या. निसर्ग, प्रेम, जीवन, दुःख, वेदना, आनंद, समाधान त्यांच्या कवितेतून व्यक्त करत होत्या. जगण्याविषयीचं भानही कधी कधी व्यक्त करत होत्या. थोडं कृतक, थोडं रोमँटिक असलं तरी त्यांना हव्या त्या मूल्यव्यवस्थेबद्दल बोलत होत्या. वास्तवात क्वचितच सापडणारा मनात वसलेला पुरुष त्यांच्या कवितेतून वारंवार डोकावत होता. त्याच्या भोवताली सारं आयुष्य घालवण्याची त्यांची तयारीही होती. त्यामुळे कधी त्याच्यावरील प्रेमात रंगून गेलेल्या तर कधी त्यानं दिलेल्या वेदनेविषयी किंवा त्याच्या गैरहजेरीत जाणवणार्‍या विरहाविषयी तक्रार करणाऱ्या भावना त्यांच्या कवितेतून व्यक्त केली जात होती. पण ही परिस्थिती लवकरच बदलली. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षित झालेल्या व विचार करू लागलेल्या स्त्रियांना हळूहळू आपणही एक व्यक्ती आहोत, स्वतःचं असं आपलंही आयुष्य असू शकतं याचं भान यायला लागलं होतं. स्वातंत्र्योत्तर काळात हे भान विस्तारत गेलं. आणि स्त्री स्वतःच्या जगण्याचा, स्वतःच्या स्वत्त्वाचाही विचार करायला लागली. त्यातून अनेकजणी आपल्याला परंपरेनं दिलेलं जगणं नाकारून स्वतःचं अवकाश शोधायचा प्रयत्न करायला लागल्या. ऐंशीच्या दशकात हे भान टोकदार झालं. आत्मभान आलेल्या स्त्रिया थोड्या आक्रमक झाल्या आणि व्यवस्थेला जाब विचारायला लागल्या. या काळात एकीकडे काही कवयित्रींच्या कवितेतून हा आक्रमकपणा व्यक्त होत होता, तर दुसरीकडे बऱ्याचशा कवयित्री अतिशय संयत सुरात आपली सल व्यक्त करत होत्या. हे चित्र पुढच्या काळात ही फारसं बदललं असं दिसत नाही.

नव्वदनंतर लिहायला लागलेल्या स्त्रिया गेल्या दोन अडीच दशकात नेमकं काय लिहीत आहेत, याचा विचार केला तर जाणवतं की आजही त्या बाईचं जगणं, तिचं शोषण, तिचं दुय्यमत्व, तिच्या आशाआकांक्षा, तिला असलेली स्वतंत्र अवकाशाची गरज याविषयीच लिहिताहेत. एकविसाव्या शतकात प्रवेश केल्यानंतरही आपल्या समाजात स्त्रियांचं स्थान आणि त्यांचे प्रश्न विशेष न बदलल्याने आजही कवितेतून तेच प्रश्न पुन्हापुन्हा मांडले जाताहेत. स्त्रिया ज्या चौकटीत रहात होत्या त्या चौकटीत रहाणं त्यांना मान्य नव्हतंच. विभावरी शिरूरकरांपासूनच त्याला वाचा फुटायला सुरुवात झाली होती. पण आजही तेच प्रश्न आणि तेच निश्वास या कळ्या सोडताहेत. आत्मभान आलं आहे आणि परंपरांगत चौकट सुटत नाही अशा अवस्थेत रहाणाऱ्या स्त्रिया जगण्यातली ही विसंगती, हा विरोधाभास दाखवून खरं तर दमून गेल्या आहेत. पण तरीही निष्ठेनं त्या हे मांडताहेत.

शहरातील स्त्रियांना ह्या द्वंद्वाला खूप आधी सामोरं जावं लागलं होतं. पण ग्रामीण भागात नव्वदच्या दशकातही स्त्रीच्या जगण्यात विशेष फरक पडला नव्हता आणि आजही तो पडला आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळेच शिक्षणानं स्वभान आलेल्या आणि विविध चळवळी व वाचनामुळे प्रगल्भ झालेल्या या ग्रामीण भागातील स्त्रियांना आपल्या शोषणाची जाणीव व्हायला लागली आणि त्या आपली वेदना थेट मांडू लागल्या. गेल्या वीस वर्षांत अशा ग्रामीण आणि निमशहरी भागातील स्त्रिया लिहू लागल्या आहेत.

पद्मरेखा धनकर हे त्यांच्यातलं महत्त्वाचं नाव. चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात राहून स्वतःची ओळख स्वतःशी करून घेण्याचं धाडस दाखवणाऱ्या स्त्रियांपैकी त्या एक आहेत. त्यामुळेच त्या आता सहज म्हणू शकतात की, ‘मी नाकारलीय ठरीव सही.. /होऊ दे वाट्टेल ते/ आता करायचे नाही तेच ते घोटीव/ उमटवायची रोज दिगंताच्या भाळी/ नव्या शाईच्या सौंदर्याची स्वाक्षरी’ (‘नवीनच रोग जडलाय आताशा’) एका ठरावीक साच्यात रहाणं नाकारणारी ही कवयित्री स्त्री आणि पुरुष या जैविक आणि सामाजिक ओळखीपलीकडे जाऊन आपल्याला माणूस म्हणून जगायचं आहे असं ठासून सांगते आहे.

पद्मरेखा धनकर यांचा ‘शलाका’ या काव्यसंग्रहानंतर ‘फक्त सैल झालाय दोर’ हा दुसरा कवितासंग्रह. पहिल्या संग्रहानंतर त्यांच्या कवितेत आलेली प्रगल्भता हा संग्रह वाचताना जाणवत राहते. स्वातंत्र्यानंतर जे संविधान आपल्याला मिळालं त्यात जात, धर्म आणि वंश यांवर आधारित समानतेबरोबरच स्त्रीपुरुष समानतेचा वारसा आपल्याला मिळाला असला तरी प्रत्यक्षात मात्र स्त्रीच्या जगण्यात विशेष फरक पडला नाही.

कोणत्या अदृष्य शृंखला

अडकून आहेत पायात

की शृंखला तुटल्याच नाहीत कधी

फक्त सैल झालाय दोर

पावलोपावली  नव्या

संदर्भाचे खुंट

मुक्तीचा आभास की सत्य

 

सोहळ्यांना भूलून चालणार नाही आता

रेशमी वस्त्र सोडले पाहिजे

दृश्य अदृष्य

साऱ्याच शृंखला

तोडल्या पाहिजेत.

आजच्या स्त्रीला भान आलं असलं तरी आजही त्याच पारंपरिक भूमिकेत तिनं रहावं अशी अपेक्षा केली जाते. आपलं बाईपण घेऊन जगणार्‍या बायका मग आपलं हे प्राक्तन एक वारसा म्हणून पुढच्या पिढीतील मुलींच्या पदरात घालतात आणि तो स्वीकारून पुढील पिढीतील मुलीही त्याच साच्यात घडत जातात. पण आता भान आलेली ही कवयित्री आपल्याला आजीआईकडून मिळालेला हा वारसा आपल्या मुलीच्या पदरात घालायला नकार द्यायला लागली आहे. ती म्हणते,

हळूहळू कळत गेलं

व्रताने फुलत नाही संसार

देहातलं अंतर मिटलं तरी

मनातलं भगदाड भरत नाही

हस्तांतरित होतो फक्त वारसा

दृष्टीहीन डोळ्यांचा

आज मात्र ठरवलंय

मी पेरणार नाही गौर

देणार नाही कधीच परडी

माझ्या मुलीच्या हातात. (‘आजी पेरायची गौर’)

आपल्या स्त्रीत्वापलीकडे जाण्याचा प्रयत्न ही कवयित्री करते आहे. आज स्त्रीवादाची टिंगल या समाजात उडवली जाते आहे. बायका जास्तच फटकळ झाल्यात, पुरुष होऊ पहाताहेत असं म्हणून पुन्हा त्यांना त्या जुन्याच चौकटीत कोंबण्याचा प्रयत्न होतो आहे. अशा काळात  तिला मात्र काढायचं आहे मोडून शोषणाचं रिंगण आणि व्हायचं आहे माणूस. आपलं माणूसपण मिळावं अशी आस असलेली आजच्या पिढीतली ही कवयित्री स्वतःशी ओळख करून घेते आहे. आपल्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडू पहाते आहे. ज्या नव्या स्त्रीची तिची ओळख झाली आहे ती स्त्री अखंड बडबड करणारी आहे. त्यामुळे जुन्या पारंपरिक चौकटीत रहाणाऱ्या स्त्रीशी आता ती बोलत नाही तर तिचा या नव्यानं भेटलेल्या स्त्रीबरोबर संवाद सुरू झाला आहे.

तिची ओळख झाली

तेव्हापासून

कायम तिच्याशी संवाद

ती येते सुसाट

अंगावर वादळ लेवून

तिचं असं येणं ही प्रसवपीडा असल्यासारखं वाटतं कवयित्रीला. कारण एका देहातून, एका मनातून दुसर्‍या देहामनात जाण्याचा हा प्रवास आहे. हा प्रवास तसा सोपा नाही. परंपरांची जळमटं मनावरून दूर करून नवा प्रकाश ओंजळीत घ्यायचा असेल तर या अशा वेदनांतून जावं लागतं. तसं गेलं तरच आपलाही नवा जन्म होतो. मग अशा वेळी या नदीला आलेला पूर अडवता येत नाही कोणतंही धरण बांधून. कवयित्री म्हणते,

आता कितीही बांधल्यास तू

डोळ्यांवर कभिन्न पट्ट्या

दृष्टी आल्यावर

लपवता येत नाहीत

आत्मभानाचे धुमारे

जेव्हा हे असे आत्मभानाचे धुमारे येतात तेव्हा मग या समाजातील पुरुषाचं सत्ताकारण लक्षात यायला लागतं आणि मग या सत्तेला शह देण्याची तयारीही करावी लागते. आज आत्मभान आलेल्या स्त्रियांनी त्यांच्या मनाची तयारी केलेली आहे हे पद्मरेखाच्या कविता वाचल्या तर लक्षात येतं. ती म्हणते, ‘तू परत आलाच तर मी दार उघडेनच /अशा भ्रमात राहू नकोस.’

असं जरी ती म्हणत असली तरी ज्याप्रमाणे प्रत्येक पुरुषाच्या मनात एक स्त्री असते, तसाच प्रत्येक स्त्रीच्या मनात एक पुरुष जपलेला असतो. आणि तो समजूतदार, उत्कट प्रेम करणारा असावा असं स्त्रीला वाटतं असतं. आपल्याकडे लिहिल्या गेलेल्या अनेक प्रेमकविता या वास्तवात हाती न लागणारं पण हवंसं वाटणारं स्त्रीपुरुषातील अलवार नातं व्यक्त करणार्‍या असतात. मनात जपलेला पुरुष हा व्यवस्थेतील आडदांड पुरुष नसतो, मर्दपणाच्या कोशात मग्न नसतो, तर तो उधळतो पांढराशुभ्र चाफा तिच्यावरून आणि मग त्याचा गंध दरवळत राहतो मनाशरीरात. लदबदलेल्या झाडासारखा येणाऱ्या त्याच्यातून मग कवयित्रीला वाहत रहावंसं वाटतं अखंड.

स्त्री-पुरुषातील आदिम प्रेमाचं हे नातं व्यक्त करणार्‍या ‘तो यायचा लदबदलेल्या झाडासारखा’, ‘चाफा’, ‘अत्तराची कुपी’, ‘माझ्या देहाच्या वस्तीत’ अशा काही कविता या संग्रहात आहेत. एकमेकांवर जीव ओवाळून टाकावा असं प्रेमाचं, विश्‍वासाचं नातं असतानाच एकमेकांसाठी कायम अनाकलनीय राहिल्याची सलही या कवितांतून व्यक्त झाली आहे.

या संग्रहातील अनेक कवितांत ही कवयित्री बाईपणाची वेदना व्यक्त करतानाच आपण आता व्यवस्थेशी लढायला तयार आहोत हे सांगत रहाते. आपण स्वतः बदलू पहात असलो तरी समाज बदललेला नाही पण तरी आपल्यात होणारा बदल पुढच्या आशेची नांदी असणार आहेत याची तिला कल्पना आहे.

आजची कवयित्री आपल्या स्त्रीत्वाच्या पलीकडे पोचली आहे का? असा प्रश्‍न पडण्याच्या या काळात पद्मरेखाची कविता आपल्यासमोर एक आशादायी चित्र समोर ठेवते. ही कवयित्री जेव्हा आपल्या स्त्रीत्वापलीकडे पोचण्याचा प्रयत्न करते आणि माणूस म्हणून जगायला मिळायला हवं असं म्हणते तेव्हा तिच्या जगण्याचा अवकाश विस्तारत जातो. केवळ स्वतःच्या जगण्यातच ती रमत नाही तर आजूबाजूचं जगणं ती समजावून घेत रहाते. आजचं वास्तव, आजूबाजूला वाढणारी हिंसेची झाडं, राष्ट्रवादाच्या नव्या व्याख्या, गावाशहरांचं बदलेलं रूप या कवयित्रीच्या कवितेत येत रहातात.

माणसेही झाली आहेत काळीकुट्ट

मोर्चे निघताहेत काळ्या ढगात

छुपी आणीबाणी काळ्या वस्त्रात

काळा अ‍ॅसिडिक पाऊस

उभ्या पिकावर

राष्ट्रवादाचे काळे उन्माद

कितीही राबवले स्वच्छता अभियान

धुवून निघत नाहीय

मनाची काजळी अन्

अविवेकाच्या गर्भारवेणा.

कवयित्री म्हणते आहे की ‘ही विवेकशून्य काळी पैदास थांबवायची असेल तर ओझेनच्या स्वच्छ कापसाचे/ अलवार सूत/ पुन्हा एकदा कातले पाहिजे.’

आजच्या हवेत एक प्रकारचं भय भरून राहिलं आहे. माणसं जगायलाही घाबरू लागली आहेत. बाहेरचे हजारो डोळे आपल्यावर रोखले गेले आहेत. आपण काय खातो, काय पितो, कुठं रहातो, काय बोलतो यावर लोक लक्ष ठेवून आहेत. अशा काळात ‘जरासा गलका झाला की आताशा चर्र होतं मन’ असं कवयित्रीला वाटतं. आज ‘आपला अखलाख होऊ नये म्हणून’ धडपडताहेत माणसं हे आजच्या धार्मिक उन्मादानं ओसंडणाऱ्या समाजातील कटू वास्तव ती आपल्या ‘जरासा गलका झाला की’ या कवितेत मांडते.

‘आपलंही बोनसाय’ किंवा ‘कॅनव्हास’सारख्या कवितांतून कवयित्री आज ग्रामीण भागात पोचलेलं जागतिकीकरण आणि त्यातून हळूहळू आपल्याला आलेलं वस्तूरूप दाखवून देण्याचा प्रयत्न करते.

फुफ्फुसाचे एकेक पापुद्रे बाजूला सारून

आत कोंडून पडलेले विषारी श्‍वास

मनाच्या बधीर धुरकांड्यातून

मीही देतेय सोडून हवेत हळूवार

विकासासाठी कॉम्प्रमाइझ

विकासासाठी केलेली पर्यावरणाशी तडजोड आपल्याला एका भकास वाटेवर घेऊन चालली आहे. आज निसर्गाला ओरबाडून जगणारे आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देणार आहोत हा प्रश्न न विचारता आपण या आधुनिक जगात जगतो आहोत. पण कवयित्री विचारते आहे-

माझ्या गोबऱ्या बाळा

तुला आता कुठला

कॅनव्हास देऊ? (‘कॅनव्हास’)

जिथं उधळता येतील मनोसोक्त रंग आणि काढता येईल मनात हवं तसं चित्र असा काळ अवकाश उरला नाही कुठंच. अशा काळात आपण हरवत चाललो आहोत. सापडत नाही स्वतःलाच अशी काहीशी अवस्था आज सर्वाचीच झाली आहे. आणि संवेदनशील मनाला ही अवस्था अस्वस्थ करत असते हे या संग्रहातील काही कविता वाचल्यावर लक्षात येतं.

या निष्पर्ण झाडांच्या प्रदेशात

निर्मनुष्य भकास शहरात

शोधूनही कुठं सापडतोय

आपण स्वतःला? (आपलंही बोनसाय)

आज आपण अनेक तुकड्यात विभागलो जातो आहोत. स्वतःलाच स्वतः कळेनासे झालो आहोत. अशा काळात माणसाला आलेलं कोरडेपण आणि हरवत चाललेल्या संवेदनाही या कवयित्रीला अस्वस्थ करतात.

जाणवत नाही हाताना

संवेदनांच्या तीव्र लहरी

विरक्तीचा शाप उपाशी

फुटत नाही पालवी. (‘आपलं कातळ होणं’)

आजच्या काळात रहाणारी आणि त्या काळाला समजून घेण्याचा प्रयत्न करतानाच स्वतःतील शक्यतांना भिडणारी ही कवयित्री आपल्या दुसऱ्या संग्रहात स्वतःच्याच अधिकाधिक वाढण्याच्या आणि प्रगल्भ होण्याच्या शक्यतांना तपासून पहाते. कविता अधिकाधिक काव्यात्म कशी होईल आणि प्रतिमा प्रतिकांतूनच कशी बोलेल याचा विचार केला तर पद्मरेखाच्या कवितेला नवा आयाम लाभेल. येणाऱ्या काळात या कवयित्रीकडून  मराठी वाचकांच्या खूप अपेक्षा असणार आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तिला खूप शुभेच्छा.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 21 April 2019

नीरजा, तुमचं हे विधान रोचक वाटलं : >> ज्या नव्या स्त्रीची तिची ओळख झाली आहे ती स्त्री अखंड बडबड करणारी आहे. >> आयशप्पत, जाम हसलो हे वाचून. ही जुनीच ओळख आहे हो! नवीनबिवीन काही नाही. बाकी, ते अखलक वगैरे जर पद्मरेखाबाईंनी टाळलं असतं तर बरं पडलं असतं. एव्हढी फाटली असेल तर त्याने/तिने कवी होऊच नये. वास्तवाला भिडायची ताकद हवी ना! आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......