अतिशय गांभीर्याने आणि पोटतिडकीने लिहिलेल्या वाचनीय दीर्घकथांचा संग्रह
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
वंदना बोकील कुलकर्णी
  • ‘मनेर मानुषेर इंद्रजाल’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 19 April 2019
  • ग्रंथनामा शिफारस मनेर मानुषेर इंद्रजाल Maner Manusher Indrajaal संतोष शिंत्रे Santosh Shintre

पर्यावरण पत्रकारितेमध्ये गेली २० वर्षं कार्यरत असलेले संतोष शिंत्रे सातत्याने पर्यावरणविषयक जाणीवजागृतीचं काम करत आले आहेत. अभ्यासलेख, चर्चा - परिषदा - परिसंवाद आणि पुस्तकलेखन अशा विविध मार्गांनी त्यांचं ‘जागल्या’चं काम चालू आहे. त्यामुळे ‘मनेर मानुषेर इंद्रजाल’ या त्यांच्या नव्या कथासंग्रहातील सहापैकी चार दीर्घकथा पर्यावरणाशी संबंधित असाव्यात हा काही योगायोग नव्हे. पर्यावरणाच्या प्रश्नांमधली आर्थिक, सामाजिक व राजकीय गुंतागुंत, विकासाची पर्यावरणविन्मुख वाट, उद्योगपती, सरकार आणि वन्यजीव तस्कर यांची अभद्र युती यामुळे व्यथित झालेला हा लेखक त्याच्या कथांमधूनही पर्यावरणविषयक प्रश्न सातत्याने मांडतो आहे.

‘गुलाबी सिर : द पिंक हेडेड डक’ या त्यांच्या २०१२ साली आलेल्या संग्रहानंतरचा हा दुसरा संग्रह! तब्बल सात वर्षांनी प्रसिद्ध झालेला. या वर्षांत सहा कथा ही निर्मितीची गती संथ खरीच पण या कथांचा ऐवज पाहाता हा संथपणा क्षम्य मानावा लागेल, कारण शिंत्रे यांचे कथाविषय अगदी अनवट असतात आणि ते विषय भरपूर अभ्यास आणि संशोधन यांची मागणी करतात. तपशिलांची अचूकता आणि विश्वासार्हता एरवीही गरजेची असतेच पण शिंत्रे यांच्या कथाविषयात ती विशेषच गरजेची असते.

काही सत्ये, काही तथ्ये आणि काही कल्पिते यांच्या एकमेळातून या कथा आकाराला आल्या आहेत. ‘नारकोंडम, रडार आणि निळावंती’, ‘खेळ तोवरी हा चालेल’, ‘द ग्रेट इंडियन डोप ट्रीक’ आणि ‘मनेर मानुषेर इंद्रजाल’ या चार कथांची आशयसूत्रे थेटपणे पर्यावरणाशी संबंधित आहेत. ‘हिज इम्पोस्टर्स व्हॉइस’ ही कथा बालगंधर्वांच्या तोतयाच्या शोधाची आहे आणि ‘फेथ इज द बर्ड’ ही कथा पुरंदर किल्ल्यावरून ब्रिटिशांच्या स्थानबद्धतेतून तीन जर्मन नागरिकांनी केलेल्या असफल पलायनाची आहे.

अंदमान द्वीपसमुहाजवळच्या नारकोंडम या छोट्याशा बेटावर भारतीय तटरक्षकदल आणि सैन्यदल यांना सुरक्षेच्या कारणासाठी रडार बसवायचे आहे. तशी शिफारस तिथे असलेल्या तटरक्षकदलाचा डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल सेल्वराज याने केली आहे. हे रडार बसवल्यामुळे तेथील हॉर्नबिल पक्ष्यांची अत्यंत दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याचा व त्यांचा अधिवास उदध्वस्त होण्याचा धोका उद्भवला आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट झाले आहे. सव्यसाची मोहापात्रा या तज्ज्ञ पर्यावरण अभ्यासकावर सर्वमान्य उपाय सुचवण्याची जबाबदारी न्यायालयाने सोपवली आहे. सव्यसाची व त्याचा तरुण सहाय्यक भार्गव शेलाट नारकोंडमला पोहोचतात. पुढच्या दोन दिवसांत त्या छोट्या बेटावर जे घडतं, माणसांचं आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षांचं आणि त्यांच्या गाभ्यातील विवेकाच्या झऱ्याचं जे ओलं दर्शन घडतं त्याची ही कथा आहे. कथेची सुरुवात सव्यसाची आणि भार्गव यांच्या अनेक प्रश्नांच्या ओझ्यांसह नारकोंडमकडे जाणाऱ्या प्रवासाने होते. ‘याच माणसाला नारकोंडमवर रडार उभं करण्याची अवदसा आठवली’, हा सेल्वराजविषयीचा सव्यसाचीचा पूर्वग्रह आणि ‘आपल्याकडे एखादी गोष्ट राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न बनली की ती थेट देव्हाऱ्यात जाऊन बसते... तिला तिथून बाहेर काढून ती सन्मानानं विसर्जित करण्याची जबाबदारी न्यायालयानं आपल्यावर टाकलीय’ हा सव्यसाचीच्या मनातला विचार यामधून पुढे काय होणार याची धूसर कल्पना वाचकाला येते. आणि तरीही पुढे कसं आणि काय घडणार याचं कुतूहल टिकून राहतं.

भार्गवसारखा तरुण व उत्साही निसर्गअभ्यासक, सव्यसाचीसारखा मुरब्बी व मुत्सद्दी पॅनल एक्स्पर्ट एका बाजूला आणि सेल्वराजसारखा महत्त्वाकांक्षीपण नेक सरकारी अधिकारी दुसऱ्या बाजूला. अटीतटीच्या सामन्याची पार्श्वभूमी तयार होते. कोणत्याही गोष्टीचा, विषयाचा पर्यावरणीय अँगल राज्यकर्ते व धोरणकर्ते कधीच पाहात नाहीत. पर्यायांचा विचारही करत नाहीत याचा राग सव्यसाचीच्या मनात आहे. तर एखादी चमकदार योजना मांडून वरिष्ठांच्या नजरेत भरण्याची महत्त्वाकांक्षा प्रामाणिक सेल्वराजच्या मनात आहे. माणूस म्हणून तिघेही त्यांच्या कामावर प्रेम करणारे आणि संवेदनशील आहेत. त्यामुळे चर्चा संवादाच्या पातळीवर येतात. आणि दोन्ही पक्षातले भिडू सगळ्यांच प्रश्नांचा विचार ‘आपले प्रश्न’ म्हणून करायचं मान्य करतात.

‘खेळ तोवरी हा चालेल’ आणि ‘मनेर मानुषेर इंद्रजाल’ या कथा वन्यजीव आणि त्यांचे अवयव यांच्या तस्करीशी संबंधित आहेत. वन्यजीवांची तस्करी करणारं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक मोठं जाळं बारीकसारीक धागे जुळवत उघडकीला कसं आणलं याची हकीकत म्हणजे ‘खेळ तोवरी हा चालेल’. वन्यजीव संरक्षण आणि त्यांच्या अवैध अवयवव्यापाराला रोखणाऱ्या एका संस्थेची संचालक वीणा, तिला मदत करणारा एथिकल हॅकर, उत्तरांचलमधल्या छोट्या गावात जाऊन प्रत्यक्ष माहिती गोळा करणारा धाडसी ललित सूरी, तस्कर पिनाकीन ठाकूर आणि ताऊजी ही या कथेतली मुख्य पात्रं. इंटरपोलचा अधिकारी रॉलिन्स, रिसॉर्टचा मालक कुमावत आणि चहावाला ही अन्य पात्रं. तस्करांच्या जाळ्यामधले असंख्य बारीकसारीक दुवे आणि त्यांच्यातील हितसंबंध आणि देवाणघेवाणीच्या गुंत्यातून ही कथा आकाराला आली आहे. रूढ रहस्यकथेच्या वाटेनं सहज जाऊ शकणारी पण लेखकाला त्या वाटेने जाऊन सनसनाटी निर्माण करण्यात रस नाही. धक्कादायक प्रसंगांपेक्षा त्यामागचा विचार आणि कृती त्याला अधोरेखित करायची आहे. त्यामुळे कथेतला खलनायक ताऊजी याला सापळ्यात अडकवून अटक करण्याचा प्रसंग उगाचंच भडकपणे चितारण्याचा मोह त्याने टाळला आहे.

‘द ग्रेट इंडियन डोप ट्रीक’ या कथेत बेसुमार जंगलतोड, विस्थापित वनजीवन आणि त्यावर आधारलेला आभासी विकास यांमुळे व्यथित झालेला एक सच्चा पर्यावरणवादी खंतावलेल्या मनःस्थितीतून मनुष्यवधासारख्या कृत्याला प्रवृत्त होतो. ‘मिस्को’ या प्रचंड मोठ्या उद्योगसमूहाचे मालक मेहरोत्रासाहेब ओडिशामधील जगतसिंहपूर येथे पोलाद प्रकल्प उभारू इच्छितात. त्यासाठी हजारो एकर जंगल साफ करण्याची परवानगी अवैध मार्गाने मिळवतातही. या प्रकल्पाविरुद्ध स्थानिक जनता अमल साहूच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडते. मेहरोत्रांचा तरुण मुलगा नलीन भारतात असा प्रकल्प उभारण्याच्या विरोधात असतो. मेहेरोत्रांचा खाजगी डॉक्टर सरनकुमार ‘मिस्को’ची मालकी नलीनकडे यावी म्हणून मेहरोत्रासाहेबांवर विषप्रयोग करतो. त्यासाठी त्याचे वनस्पतीशास्त्राचे ज्ञान तो उपयोगात आणतो. ही गोष्ट फ्लॅशबॅक पद्धतीने उलगडत जाते. अखेरीस सरनकुमार त्याचे गुरु गौरकिशोर बंदोपाध्याय यांचेही समर्थन मिळवतो आणि काही काळापुरता तरी पर्यावरणाचा विनाश रोखून धरतो. (अशाप्रकारे प्रश्नाची सोडवणूक करणे हे काहीसे कल्पनारंजित आणि मानवतावादी दृष्टिकोनातून अनैतिकसुद्धा आहे. त्यादृष्टीने ही ‘द ग्रेट इंडियन डोप ट्रीक’ समर्थनीय मानता येईल का असा प्रश्न पडतो.)

‘मनेर मानुषेर इंद्रजाल’ ही कथाही रहस्यकथेचा ऐवज पोटात बाळगणारी आहे. चकोर घटक हा मूळचा सुंदरबनचा रहिवासी! रस्त्यावर जादूचे खेळ करून पोट भरणारा. त्याला अचानक वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या किट्टू बहेलियाकडून डिलिव्हरी पॉईंट म्हणून काम करण्याची आणि त्या कामातून भरपूर कमाई करण्याची संधी येते. येऊ घातलेल्या या संपत्तीचा मोह त्याला काही वेळ पडतोदेखील. पण त्याचा ‘मनेर मानुष’ म्हणजे मनातला माणूस जागा असतो. तो त्याला अशा मार्गाने श्रीमंत होण्यापासून परावृत्त करतो आणि किट्टू बहेलियाला पकडून देण्यासाठी तो सहाय्य्य करतो.सर्वसामान्य माणूस प्रसंगी लौकिकातून चार अंगुळे उठून अ-लौकिकाची कास धरतो त्यामधून होणारी व्यापक जीवनमूल्यांची निगराणी इथे लेखकाने मांडली आहे.

‘फेथ इज द बॅर्ड’ ही दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरची पुरंदर किल्ल्यावर घडलेल्या एका घटनेवर आधारित कथा. महायुद्ध सुरु झाल्यावर भारतात असलेल्या जर्मन नागरिकांना ब्रिटिश सरकारनं जर्मनीला जायला अटकाव केला. त्यांचे पासपोर्ट काढून घेऊन इंटर्नीज (मार्गस्थ) असं गोंडस नाव देऊन त्यांना पुण्यानजीक पुरंदर किल्ल्यावर स्थानबद्धतेत ठेवलं. मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा पल्लवित होऊन त्यापैकी तीनजण पलायनाचा प्रयत्न करतात. त्यांच्या दुर्दैवाने हे पलायन असफल ठरते. ज्या तऱ्हेनं हा पलायनाचा प्रसंग व त्याची पार्श्वभूमी लेखक रंगवतो त्यातून माणसाच्या मूलभूत स्वभावविशेषांवर तो प्रकाश टाकतो. अँथनी हॉलंड या ब्रिटिश अधिकाऱ्याचे डावपेच, जर्मन आणि ज्यू यांच्यात भेद निर्माण करण्याची त्याची ‘ब्रिटिश’ नीती, गोएझचं जर्मनीचा पितृभूमी असा उल्लेख करणं, त्याचं शिट्टीवर जर्मन राष्ट्रगीत वाजवणं, स्थानबध्दांच्या लहान मुलांनी नाझी - ज्यू असा खेळ खेळणं इत्यादी अनेक बारकाव्यांमुळे कथार्थ भरीव होतो आणि ही कथा केवळ एका असफल पलायनाची राहात नाही. विचारवंत, बुद्धिमंत आणि संशोधक अशी ही तीन माणसं हे वेडं धाडस करायला प्रवृत्त होतात, त्यामागच्या प्रेरणेचाही आदर वाटावा, अशी या कथेची रचना आहे.

साक्षात बालगंधर्वांच्या नावानं गाणारा कुणी एक अनंत बडोदेकर नावाचा तोतया होऊन गेला या घटनेवर आधारित ‘हिज इम्पोस्टर्स व्हॉइस’ ही एक आगळी वेगळी कथा. हा इम्पोस्टर कसा शोधला जातो, या शोधातले धागेदोरे पार लंडनपर्यंत कसे जाऊन पोहोचतात आणि अखेरीस तोतयाचा लागलेला शोध हे अस्सल तपशीलांची जुळणी करत रचलेलं कथानक. या शोधाची सुरुवात ज्यांच्यापासून झाली ते बालगंधर्वांच्या नातसुनेचं पात्र, दयार्णव दिघे या भारतीय गुप्तचर संस्था - रॉ मधील निवृत्त अधिकाऱ्याची मदत घेण्याची चतुराई, म्युझिक कंपनी चालवणारा सोली ठानावाला हा पारशी हे सारंच दाद द्यावी असं.बालगंधर्वांच्या तोतयाचे माफीपत्र मिळवण्यापर्यंत दयार्णव दिघे ज्या पद्धतीने तर्क लढवतात, त्याची मांडणी कथेमध्ये अत्यंत नेटकेपणाने लेखकाने केली आहे. शिंत्रे उत्तम वाचक आहेत. संवेदनशील रसिक आहेत. त्यामुळे या कथेतील गाण्यासंबंधीच्या चर्चाही रसपूर्ण झाल्या आहेत.

अनवट विषयांच्याबरोबरच वातावरणनिर्मिती हे शिंत्रे यांच्या कथांचं बलस्थान आहे. वनस्पती - प्राणी - पक्षी सृष्टी, भौगोलिक वैशिष्ट्ये, जादू - भारतीय इंद्रजाल विद्या, भारतीय गुप्तचर संस्थेची कार्यपद्धती, स्वातंत्र्यपूर्व भारतातील रेकॉर्डिंग कंपन्यांचा कारभार, महायुद्ध काळातील घटना आणि त्यांचे अस्सल तपशील, वन्यजीव आणि अवयव तस्करीसंबंधीचे कायदे... किती म्हणून क्षेत्रांचा अभ्यास या कथांमध्ये मुरवला गेला आहे. तांत्रिक माहिती अशा खुबीने निवेदनात व संवादात गुंफली आहे की ती रुक्ष माहिती राहत नाही. वाचकाला आपण कंटाळवाणी तांत्रिक माहिती वाचतोय असं वाटू न देण्याची दक्षता कसोशीनं घेतली आहे.

या सर्वच कथांमध्ये खलनायक आहे. कधी व्यक्ती. कधी परिस्थिती. कधी सरकार. तर कधी स्वतःचाच स्वार्थ, मोह. परंतु कोणत्याही कथेत खलनायकाच्या कारवाया रंगून जाऊन मांडण्यापेक्षा सकारात्मक कृती आणि त्या कृतीसाठी आवश्यक अशी पात्रांची मनोभूमी तयार करत नेणं हे लेखकाला महत्त्वाचं वाटतं. ही त्याची निवड कथेला एका उंचीवर नेते.

शिंत्रे यांच्या कथारचना हे एक बांधकाम आहे. चुस्तपणे व एका निश्चित उद्देशाने होणारे. पण म्हणून ते कृत्रिम नाही. कथाबीजाचं स्फुरण हे प्रतिभेचं काम आहे, परंतु त्यानंतरची उभारणीवरचना अभ्यासातून आणि अभ्यासातून आणि संशोधनातून सिद्ध झालेली आहे. कथेच्या पहिल्या वाक्यापासून जे मांडलं जातंय त्याची अटळ परिणती शेवटात झाली की कथा जमली. काही कथांचे शेवट बेतलेले वाटतात तरी, ‘अशी ही शक्यता आहे बरं का’, असा दिलासा ते देतात. कारण त्यामध्ये गुंतलेला माणूस लेखकाला महत्त्वाचा वाटतो. या माणसानं त्याच्या अंतिम कल्याणाकडे बघावं अशी तळमळ त्यामागे आहे. पर्यावरणाचा विचार हा लेखकाचा निदीध्यास आहे. तोच त्याच्या कथारचनांमधून प्रभावीपणे मांडला जातो. पण म्हणून त्याची कथा ढोबळ बोधवादी होत नाही.

सहसा तृतीयपुरुषी निवेदकाची योजना लेखकाने केली आहे आणि हा निवेदक मुख्य पात्राशी समरस झालेला आहे. त्यामुळे निवेदनाच्या ओघात तो त्या पात्राचे विचार व भावना व्यक्त करत जातो. कथनाचा प्रवाह यामुळे अखंडित राहतो व त्याला एक दिशाही राहते. क्वचित कधी दोन ठिकाणी व दोन भिन्न काळात घडणारे प्रसंग एकाआड एक गुंफत त्यांची रचना साकारते (हिज इम्पोस्टर्स व्हॉइस, मनेर मानुषेर इंद्रजाल इ.) किंवा कथानक फ्लॅशबॅक पद्धतीने (द ग्रेट इंडियन डोप ट्रीक) उलगडत जाते.

रेम्याडोक्या, चपडगंजू, उटंटळपणा असे बोलभाषेतले शब्द जसे ते वापरतात, तशाच ज्ञानशांत डोळे किंवा आनंददायी नैष्कर्म्य अशा शब्दसंहति सहजपणे आणि पुरेशा कमी वेळा वापरतात. त्यामुळे त्या लक्ष वेधून घेतात. भाषेचे फुलोरे काढण्याची या लेखकाला सवय नाही. त्याचा तो पिंडही नाही पण क्वचित कधी प्रतिमांचे उपयोजन मात्र त्याने केले आहे.

या लेखकाला कथेची शीर्षकं समर्पक आणि कधीकधी काव्यात्मक अशी सापडतात. शिवाय त्याची एक विशिष्ट लेखनलकब आहे. कथेच्या शेवटी हे शीर्षक जसंच्या तसं एखाद्या संवादातून, एखाद्या उद्गारातून तो समोर ठेवतो. उदा. ‘हिज इम्पोस्टर्स व्हॉइस’, ‘मनेर मानुषेर इंद्रजाल’, ‘द ग्रेट इंडियन डोप ट्रीक’ आणि ‘फेथ इज द बर्ड’. त्यामानानं ‘नारकोंडम, रडार आणि निळावंती’ हेच एक शीर्षक नाईलाजानं ठेवलेल्या नावासारखं कोरडं आणि सावत्र वाटतं. बाकीची शीर्षकं अगदी चपखल, अर्थघन आणि सूचक आहेत. (मात्र ६ पैकी ३ इंग्रजी आणि एक बंगाली!)

संग्रहाचं मुखपृष्ठ हिरव्या रंगाचा मनमुराद वापर असलेलं माणसासह प्राणी - पक्षी सृष्टीचा प्रत्यय देणारं आणि आशयाचा तोल राखणारं. अभिजित प्रकाशनाची ही निर्मिती अत्यंत देखणी आहे.

एवढंच काय तर, अतिशय गांभीर्याने आणि खऱ्याखुऱ्या पोटतिडकीने पर्यावरणसंबंधाने लिहिलेल्या वेगळ्या विषयावरच्या अत्यंत वाचनीय अशा दीर्घकथांचा हा संग्रह आहे. संग्रही ठेवून पुन्हापुन्हा वाचावा असा.

.............................................................................................................................................

‘मनेर मानुषेर इंद्रजाल’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4804/Maner-Manuper-Indrajal

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Jayant Raleraskar

Wed , 05 June 2019

संतोष शिंत्रे यांचे लिखाण पोटतिडकीतूनच निर्माण होते..हे अगदी नेमके. पुस्तक अजून हाती लागले नाही पण मिळवेन.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......