‘द वाईफ’ : अप्रतिम दिग्दर्शनातून आणि सशक्त अभिनयातून क्लासिक्सच्या पंक्तीत पोहोचला सिनेमा
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
जयश्री इंगळे
  • ‘द वाईफ’ची पोस्टर्स
  • Sat , 16 March 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा English Movie द वाईफ The Wife ग्लेन क्लोज Glenn Close जोनाथन प्राईस Jonathan Pryce

‘द वाईफ’ हा सिनेमा  मेग व्हॉलितझरच्या २००३ मधील कादंबरीचं नाट्यमय रूपांतरण आहे. २०१९ च्या ऑस्कर नॉमिनेशनसह डझनभर विविध प्रतिष्ठित जागतिक पुरस्कार मिळवलेला हा सिनेमा आहे.

कथा ४० वर्षांपासून विवाहित असलेल्या ज्योअन आणि जोसेफ या लेखक जोडप्याभोवती फिरते. चित्रपटाची सुरुवात जोसेफला वाङ्ममयासाठी नोबेल परितोषिक जाहीर झालं, अशा फोन कॉलपासून होते. वैवाहिक आयुष्यातील प्रदीर्घ सहवासामुळे एकमेकांविषयी कम्फर्ट झोनमध्ये असलेले आणि एकरूप झालेल्या त्यांच्या नात्याचे पदर लहानसहान प्रसंगातून उलगडायला लागतात.

नोबेल पुरस्कार घ्यायला स्टोकहोमला ते दोघं डेव्हिड या त्यांच्या तरुण मुलासह प्रयाण करतात. कथा हळूहळू फ्लॅशबॅकमध्ये जाते १९५८, १९६०, १९६५ दरम्यान घडलेल्या प्रसंगांच्या तुकड्यात जोअन आणि जोसेफचं तरुणपण, जोसेफचं पहिलं असफल वैवाहिक जीवन, जोचा विद्यार्थिनी म्हणून त्याच्या जीवनात प्रवेश, त्यांचं प्रेम, लग्न, दोन मुलं, जोसेफचं लेखक म्हणून करिअर घडत जाणं, त्याच वेळेला प्रतिभावंत लेखिका म्हणून उदयास येत असतानादेखील जोअनचा स्वतःचं करिअर थांबवण्याचा निर्णय आणि जोसेफच्या करिअरला सपोर्ट करणं इत्यादी घटना थोडक्यात प्रेक्षकाला त्यांच्या जीवन प्रवासाची झलक दाखवतात.

ज्योची जोसेफच्या प्रेमापोटी अगतिकता, १९६० च्या दशकात जागतिक लेखन क्षेत्रात महिला लेखकांना मिळणारी दुय्यम वागणूक, त्यांना कमी लेखण्याचा दृष्टिकोन, त्यातून ज्योची लेखिका म्हणून पुढे येण्याची उदासीनता, पण त्याचवेळेला नवरा सुमार लेखक असून त्याच्या लिखाणाला प्रोत्साहन देणं, त्याकरिता स्वतःच्या करिअरचा त्याग करणं, जोसेफचा रंगेलपणा, त्याची अनेक महिलांबरोबरची लफडी, ज्योअननं त्याकडे संयमीपणे केलेलं दुर्लक्ष इत्यादी घटना लहान-मोठ्या प्रसंगातून हळूहळू उलगडत जातात. 

अनेक दृष्यांमध्ये कॅमेरा ज्योच्या (ग्लेन क्लोजच्या) चेहऱ्यावर स्थिर असतो आणि केवळ तीच्या चेहऱ्यावरील अभिव्यक्तीनं तो प्रसंग प्रेक्षकाला उलगडतो. तिचा चेहरा विविध भाव छटा रंगवलेल्या  कॅनव्हासप्रमाणे भासतो आणि तिचे डोळे प्रत्येक प्रसंगात तिच्या अंतरंगातील भाव चेहऱ्यावर जिवंत करतात.

नथनेल (ख्रिस्तीन स्लेटर) हा एक प्रस्थापित लेखक असून त्याला जोसेफ कासलमनच्या जीवनावर पुस्तक लिहायचं असतं. त्याकरिता परवानगी घेण्याकरिता तो स्कॉकहोमला ज्योअनला भेटून तिच्या वैवाहिक जीवनातील भूतकालीन घटना सांगण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या जीवनातील काही गुप्त आणि मसालेवाईक घटनांबद्दल जाणून घेऊन पुस्तकात लिहिण्याचा त्याचा हेतू असतो. त्याकरिता तो त्यांच्या डेव्हिड या उदयोन्मुख लेखक मुलालादेखील डिवचण्याचा प्रयत्न करतो. 

नथनेल ज्योअनच्या लेखनाचा प्रशंसक असतो आणि आणि त्याला अपेक्षित असलेली गुप्त माहिती तिनं उघड करावी म्हणून तिच्या मनाचा ठाव घेत राहतो.

जोसेफला नोबेल मिळाल्यानंतर त्या रात्री अचानकपणे ज्योच्या चेहऱ्यावरील चित्रपटाच्या सुरुवातीपासून धारण केलेल्या थिजलेल्या थंड रहस्यमयी स्मिहास्याचा अर्थ उमगायला लागतो. कथेला नाट्यमय वळण मिळतं. ज्योच्या भावनांचा उद्रेक होतो. सनीसनीखेज तथ्य बाहेर येतं. मुखवटे गळून पडतात.

वरवर संथ भासणारी ही कलाकृती प्रत्येक प्रसंगात मानवी जीवनाचे अनेक कंगोरे दाखवते, शेवटी अनपेक्षित वळणं घेते आणि अचानक थांबते.

ज्योअनचे (ग्लेन क्लोजचे) काही डायलॉग्ज अतिशय लक्षवेधक आहेत. ज्योअनची ओळख करून देताना जोसेफ दरवेळेला ती त्याची ‘बेटर हाफ’ आहे आणि त्याशिवाय ती इतर काही करत नाही म्हणून सर्वांना सांगतो, तेव्हा जोअन अत्यंत निग्रहानं त्याला म्हणते- ‘don't paint me as a victim, i am much more interesting than that.’

दुसऱ्या एका प्रसंगात कुणीतरी ज्योअनला तुम्ही काय काम करता असं विचारल्यावर ती म्हणते- ‘I am the kingmaker.’

असे अनेक प्रसंग सिनेमाला रहस्यमय टच देतात. मोजक्याच पण अतिशय परिणामकारक आणि प्रगल्भ व्यक्तिरेखा या सिनेमात आहेत. जोनाथन प्राईस या वेल्श अभिनेत्यानं अतिशय सहजतेनं वयोवृद्ध जोसेफ कासलमन साकारला आहे. कौटुंबिक जीवनात सर्व काही भरभरून मिळालेला एक सफल पती, पिता आणि जागतिक पातळीवर नावलौकिक मिळालेली लेखकाची कारकीर्द… त्यामुळे वयोमानानुसार चेहऱ्यावर आलेलं प्रेमळपण, समाधानाचे भाव आणि त्याचबरोबर सार्वजनिक जीवनात आत्मप्रौढी मिरवणारा स्वमग्न लेखक प्राईझ यांनी अप्रतिमच वठवला आहे. 

या जोडप्याच्या तरुण मुलाची, डेविडची भूमिका मॅक्स आयर्ननं लक्षणीयरित्या साकारली आहे. डेव्हिड एक प्रातिभावंत आणि उदयोन्मुख तरुण लेखक आहे. स्वतःच्या लिखाणाकरिता त्याला पित्याचं प्रोत्साहन अपेक्षित असतं, पण त्या छायेखाली आणि दडपणाखाली वावरणं त्याला मंजूर नाही. ख्रिस्तीन स्लेटरनं साकारलेल्या नथनेल या चिकित्सक आणि गल्लेभरू प्रॅक्टिकल अँप्रोच असलेल्या लेखकाची भूमिकाही लक्षात राहते.

एनी स्टार्क, हॅरी लॉइड या जोडगोळीनं जोअन आणि जोसेफचं तरुणपण साकारलं आहे. एनीनं जोअनचा तरुणपणापासूनच असलेला संयमशील स्वभाव आणि प्रगल्भता, लिखाणाद्दलचा तटस्थ दृष्टिकोण इत्यादी बारकावे परिणामकारकपणे साकारले आहेत. १९६०-७० च्या दशकादरम्यान जागतिक स्तरावर पुरुषी वर्चस्व असलेल्या लेखनक्षेत्रात महिला लेखिकांकडे बघण्याचा कलुषित दृष्टिकोन, त्यातून जोअनमध्ये बळावलेला न्यूनगंड आणि हतबलता. त्या अगतिकतेतून तिने घेतलेले निर्णय, आणि तडजोडी सगळं वयस्कर जोअनच्या चेहऱ्यावरील प्रत्येक रेषेत, प्रत्येक सुरकुतीमध्ये बोलकं होत जातं.

हॅरी लॉइडनं साकारलेला तरुणपणीचा देखणा, बेदरकार, रंगेल, थोडासा उथळ आणि स्वार्थीपणाची स्वभाव छटा असलेला प्रोफेसर लेखक जोसेफच्या भूमिकेला योग्य न्याय देतो. पटकथा लेखक जेन अँडरसननं एका सरळ साध्या कथेला नाट्यमय आणि मनोवेधक कथनामध्ये रूपांतरित केलं आहे. बियोंन रुंगा या स्वीडिश दिग्दर्शकाच्या अप्रतिम दिग्दर्शनातून आणि सर्वच अभिनेत्यांच्या सशक्त अभिनयातून ही कलाकृती क्लासिक्सच्या पंक्तीत पोहोचली आहे.

.............................................................................................................................................

जयश्री इंगळे

ijayashree11@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......