सरकारचा युद्धज्वर कमी झाला असेल, तर आमच्या जगण्याकडे लक्ष द्याल का?
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
प्रशांत शिंदे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 11 March 2019
  • पडघम कोमविप शेतकरी आत्महत्या Farmer Suicide दुष्काळ Drought देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis जवान Javan

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

महोदय,

दुष्काळानं होरपळलेला शेतकरी गळ्याला फास लावून स्वतःची या दृष्टचक्रातून सुटका करून घेतोय. तुम्ही मुंबईत बसून केलेल्या बेरजेच्या गणितांचं उत्तर शेतकऱ्यांना वजाबाकीत मिळतं. आम्हीदेखील भारत भूमीचे नागरिक आहोत. आमचा जगण्याचा हक्क मान्य कराल काय?

कृषिप्रधान देश म्हणून आपण सारे नेहमी छाती बडवत असतो. शेतकऱ्याला ‘बळीराजा’ म्हणतो, पण ‘बळी’ त्याचा जातो आणि राजा दुसराच होतो. आपल्याला शेतकऱ्यांची आठवण स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनी ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणेनं येते. १३० कोटी लोकसंख्येचा पोशिंदा आत्महत्या करतो, तेव्हा बातमी वाचून आग्यामोहळ चावल्यासारखी पोटात आग पडते. शेतकरी आत्महत्या करत नाही, तर इथल्या व्यवस्थेनं त्याची सामूहिक हत्या केलेली असते. दुष्काळात होरपळणाऱ्या कुटुंबाचं छत्र हरवल्यावर पोरकेपणाचं दुःख सरकारच्या कुठल्याही मलमपट्टीनं कमी होणारं नसतं.

माझ्यासारखी अनेक शेतकऱ्यांची मुलं-मुली रोज कुढत जगत आहेत. वृत्तपत्रांमध्ये आलेल्या शेतकरी आत्महत्येच्या बातमीत आपल्या वडिलांचं नाव येऊ नये म्हणून प्रार्थना करतात. पंढरपूरची वारी करणारा बाप जेव्हा गळ्याला फास लावतो, तेव्हा त्या विठ्ठलावरचा विश्वास उडतो. शेतातलं पीक जगवण्यासाठी सरकार दरबाराचे उंबरे झिजून थकल्यावर मंत्रालयाच्या छतावरून उडी मारून शेतकरी आत्महत्या करतो. मात्र यापुढे तशी उडी मारून कुणी आत्महत्या करू नये म्हणून छताला जाळी बांधली जाते, पण ज्यासाठी त्यानं आत्महत्या केली त्या मागणीला (‘शेतमालाला हमीभाव’) केराची टोपली दाखवली जाते.

वृत्तपत्रांत शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची आकडेवारी जाहीर होते. त्याच वृत्तपत्राची हेडलाईन खासदार, आमदारांच्या भरमसाठ पगारवाढीची असते. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सातवा वेतन आयोगाच्या फरकानं बातमी रंगलेली असते. वेतन आयोगाच्या फरकाबरोबर शेतकरी आत्महत्येच्या आकडा वाढतच राहतो. विश्वास कसा ठेवायचा, आमचा बाप कृषिप्रधान देशातल्या शेतकरी असल्याचा? प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी शेतकऱ्यांचं जीवन ‘बाप’ नावाच्या कवितेतून मांडलं आहे.

शेतामधी माझी खोप

तिला बोराटीची झाप

तिथं राबतो, कष्टतो

माझा शेतकरी बाप

लेतो अंगावर चिंध्या

खातो मिरची भाकर

काढी उसाची पाचट

जगा मिळाया साखर

काटा त्याच्याच का पायी

त्यानं काय केलं पाप?

माझा बाप शेतकरी

उभ्या जगाचा पोशिंदा

त्याच्या भाळी लिहिलेला

रातदिस कामधंदा

कष्ट सारे त्याच्या हाती

दुसऱ्याच्या हाती माप

बाप फोडतो लाकडं

माय पेटविते चुल्हा

पिठामागल्या घामाची

काय चव सांगू तुला

आम्ही कष्टाचंच खातो

जग करी हापाहाप!

पण या शेतकऱ्याच्या कष्टाचं मूल्य काय, याचं उत्तर कोणी देत नाही.

मुख्यमंत्री महोदय, तुमच्या चार वर्षांच्या काळात महाराष्ट्रात ११, २४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक म्हणजे ४०९७ एवढ्या आत्महत्या अमरावती विभागात झाल्या आहेत. त्या खालोखाल औरंगाबाद विभागात ३८५१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, तर नाशिक विभागात १७२० आत्महत्या, नागपूर विभागात १२३२ आत्महत्या आणि कोकणमधील १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यांत राज्यात २८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्यात २००१ पासून २०१७ पर्यंत २६ हजार ९६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर २०१८ मध्ये १ हजार ९६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. (संदर्भ - सकाळ वृत्तपत्र)

प्रसिद्ध पत्रकार पी. साईनाथ यांनी ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ या पुस्तकात दुष्काळाचं वास्तवचित्र मांडलं आहे. दुष्काळ पडल्यावर माफियांचा सुकाळ सुरू होतो. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. आता टँकरमाफिया सक्रिय झाले असून आठ दिवस खेपा टाकायच्या आणि महिन्याचे पैसे उचलायचे. दुसरे माफिया छावणीवाले. शंभर जनावरांच्या छावणीत पाचशे जनावरं दाखवायची. निवडणुका लढवण्यासाठी चारा, खुराक, शेणात काळाबाजार करून पैसे उभे करायचे आणि जनतेसमोर समाजसेवेचं ढोंग करायचं. महोदय, मुंबईत बसून गावखेड्यातील गणितं कशी ठरवता, कधीतरी आमच्या गोठ्यात येऊन बघा. चारापाण्यासाठी गोठ्यातील हंबरड्यामुळे तुमच्याही कानठळ्या बसतील.

सीमेवर तैनात असलेल्या जवानांचं कुटुंब आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांचं कुटुंब कधीच सुखानं झोप घेत नाही. अभिनंदन भारतात परतल्यानं सरकार ५६ इंच छाती फुगवतं. पण रोज शहीद होणारे जवान आणि गळफास घेऊन आत्महत्या करणारा शेतकरी यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? विधवा स्त्रियांचा आणि बापाचं छत्र हरवलेल्या मुलांचा टाहो तुम्हाला का ऐकू येत नाही? तुमच्या सरकारला चार वर्षं सरून गेली. पुन्हा निवडणूका आल्या, पण आमचे जगण्याचे प्रश्न सुटलेच नाहीत.

सरकारमधील युद्धज्वर कमी झाला असेल तर आमच्या जगण्याकडे लक्ष द्याल का?

कळावे.

.............................................................................................................................................

लेखक प्रशांत शिंदे पत्रकारितेचं शिक्षण घेत असून वडील शेती करतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर आहे.

shindeprashant798@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 11 March 2019

युद्धज्वर बालाकोट नंतर सुरू झाला आहे. त्याचा शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी कसलाही संबंध नाही. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......