स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन
अर्धेजग - महिला दिन विशेष
नरेंद्र दाभोलकर
  • नरेंद्र दाभोलकर आणि वटसावित्री, हरतालिका, नवरात्र या व्रतांची प्रातिनिधिक चित्रं
  • Fri , 08 March 2019
  • अर्धे जग women world जागतिक महिला दिन International Women's Day नरेंद्र दाभोलकर Narendra Dabholkar अंधश्रद्धा निर्मूलन Andhashraddha Nirmoolan वटसावित्री Vat Savitri हरतालिका Hartalika नवरात्र Navaratri

“अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तयार होणारी भगिनी ही एक अधिक अवघड लढाई लढत असते. म्हणून निश्‍चितपणे तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्राधान्याचा आणि सहानुभूतीचा आणि शक्य असेल, ती सर्व मदत या कामामध्ये तिला देण्याचा विषय आहे, असं आम्ही मानतो. याच अंगानं आम्ही या प्रश्‍नाकडे पाहतोही आणि कृतीही करतो.” असं ठामपणे सांगणाऱ्या आणि त्यासाठी सतत कृतिशील प्रयत्न करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक (कै.) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचं हे अप्रकाशित भाषण. पहिल्यांदाच खास आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त.

.............................................................................................................................................

सगळीकडे अंधश्रद्धेच्या जास्तीत जास्त बळी स्त्रियाच असल्यामुळे, त्याचबरोबर त्या अंधश्रद्धेच्या वाहकही असल्यामुळे ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा’ हा विषय महत्त्वाचा आहे. सर्वसामान्यपणे असं दिसतं की, शोषणाचे बळी असलेल्यांना शोषणाबद्दल एक प्रकारचा राग असतो. परंतु महिला वर्गात मात्र याच्या उलट चित्र पाहायला मिळतं. ज्या अंधश्रद्धेच्या, ज्या शोषणाच्या त्या बळी असतात; त्या अंधश्रद्धा महिला अतिशय सन्मानानं, अभिमानानं मिरवत असतात. त्यामुळे ‘गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल’, असं जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, ती लढाई ‘स्त्री आणि अंधश्रद्धा’ या प्रश्नाबाबत आपल्याला सर्वाधिक दिसते. म्हणजे ज्या वेळेला हातापायामध्ये बेड्या घातलेल्या असतात, त्या वेळी ‘ऊठ वेड्या तोड बेड्या’ असं सांगता येतं, परंतु हातापायांमधल्या बेड्यांना जर माणसं फुलांचे गेरे समजायला लागली, तर जी पंचाईत निर्माण होते, ती आपल्याला ‘स्त्री आणि अंधश्रद्धा’ या प्रश्नाबाबत दिसते.

याची सुरुवात आपल्या दुटप्पी समाजापासून होते. म्हणजे मला शाळेमध्ये असलेली एक कविता आठवते. या कवितेमध्ये स्त्रीला अतिशय महान म्हटलेलं आहे. या कवयित्रीने म्हटलेलं आहे – ‘मी माता, मी कांता, शिक्षक मी, सेवक मी / कलावती शास्त्रज्ञा विविध गुणे नटते मी / मी विश्वाची प्रतिभा / मजमधी समृद्धी वसे / संस्कृती मी जणू समूर्त / स्त्री माझे नाव असे’. म्हणजे एका बाजूला म्हणायचं की, संस्कृतीचं साक्षात रूप म्हणजे स्त्री आणि दुसऱ्या बाजूला अनुभव मात्र असा की, पायातली वहाण ही पायातच बरी!

एका बाजूला म्हणायचं की, आता जग किती बदललंय! एके काळी भले स्त्रिया पिंजऱ्यामध्ये बंद असतील, परंतु आता पिंजऱ्याचं दार सताड उघडलेलं आहे. त्यांना बाहेर, आकाशामध्ये स्वैर मोकळीक घ्यायला काहीच हरकत नाही. आणि दुसऱ्या बाजूला मात्र पिंजऱ्याचं दार उघडलेलं असलं, तरी पंखांचं खच्चीकरण मात्र कधीच झालेलं असल्याकडे दुर्लक्ष करायचं. त्यामुळे बाहेर, आकाशामध्ये भरारी घेणं ही गोष्ट स्त्रियांसाठी अजूनही तेवढी सोपी नाही. म्हणजे एका बाजूला देशामधल्या सगळ्या मोठ्या नेत्या या स्त्रियाच असलेल्या दिसतील. मग त्या पश्चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जी असोत, उत्तर प्रदेशमधल्या मायवती असोत, तमिळनाडूमधल्या जयललिता असोत, लोकसभेच्या सभापती असलेल्या मीराकुमार असोत, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असोत किंवा सोनिया गांधी असोत.

दुसरीकडे, दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षेलादेखील नंबरामध्ये मोठ्या संख्येने येणाऱ्या मुलीच; आणि ही परिस्थिती असताना प्रत्यक्षामध्ये हुंड्यासाठी जाळून मारल्या जाणाऱ्या स्त्रियाच, नवऱ्यानं सोडून दिलेल्या असंख्य परित्यक्ता स्त्रियाच, अंगामध्ये येऊन घुमणाऱ्या आणि आपली मनोरुग्णता व्यक्त करणाऱ्याही स्त्रियाच... हा सगळा अंतर्विरोध आपण नीट समजून घ्यायला हवा.

स्त्रियांबाबत धर्मांचा कावेबाजपणा

एकाच वेळेला स्त्रीची जी दोन विदारक रूपं आपल्यासमोर येतात, त्यांच्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं बहुआयामित्व लक्षात येतं आणि स्त्री अजूनही वामांगीच, म्हणजे डाव्या बाजूला, कमअस्सल बाजूला, अपवित्र बाजूला बसलेलीच का मानण्यात आलेली आहे, हे आपण जर शोधायला लागलो, तर ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा’ या प्रश्नाचं व्यापकत्व आपल्या लक्षात येतं. म्हणजे कुठलीही स्त्री ‘कुमारी’ असते. तिचं लग्न उशिरा झालं, तर ती ‘प्रौढ कुमारी’ बनते. तीच लग्न ठरलं की, ‘सौभाग्यकांक्षिणी’ बनते; लग्नं झालं की, ‘सौभाग्यवती’ बनते; नवऱ्यानं घटस्फोट दिला, तर ‘घटस्फोटिता’ बनते; नवऱ्यानं टाकून दिलं, तर ‘परित्यक्ता’ बनते; नवरा मरण पावला, तर ‘विधवा’ बनते. म्हणजे प्रत्येक वेळेला ती पुरुषाच्या संदर्भातच असते; ती स्वत: कोणी नसतेच!

यांपैकी काही शब्दांना तर पर्यायी शब्ददेखील आपल्याकडे नाहीत. म्हणजे ‘परित्यक्ता’ या शब्दामध्ये ‘नवऱ्याने बायकोला टाकून देणं’ गृहीत आहे. ‘बायकोने नवऱ्याला टाकून देणं’ या कृतीला मराठीमध्ये शब्ददेखील नाही. याचा अर्थच असा की, स्त्रीचं सगळं जीवन हे पुरुषांशी संबंधित असतं. म्हणजे तिचा नवरा जिवंत आहे की नाही, याच्याशी तिचा थेट संबंध नसतो. कधी तो लढाईमध्ये मारला जातो, कधी तो अपघातामध्ये मरण पावतो, कधी दारू पिऊन तो स्वत:च्या तब्येतीची बरबादी करून घेतो आणि मरण पावतो. परंतु एकदा स्त्रीचा पती मरण पावला की, मग ना तिला कुठल्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलवलं जातं, घराची पायाभरणी वगैरे मंगल कार्यं ना तिच्या हातून केली जातात, ज्या मुलीला या स्त्रीनं स्वत:च्या पोटात नऊ महिने वाढवलेलं असतं, त्या मुलीच्या कन्यादानाचा अधिकारही या स्त्रीला मिळत नाही. आता कन्यादान करावं का करू नये, याचं साधं उत्तर असं आहे की, कन्या ही काही दान करण्याची वस्तू नाही. त्यामुळे दान करूच नये. ‘पण तू बाई आहेस आणि तुझा नवरा जिवंत नाही, म्हणून कन्यादान करण्याचा अधिकार तुला नाही’, असं म्हणणं, याचा अर्थ स्त्रीला सर्व बाजूंनी गौणत्व देण्यात आलेलं आहे. एवढं गौणत्व एवढं दीर्घ काळ कसं काय चाललं? या प्रश्नाचा शोध घेताना माझ्या असं लक्षात आलं की, हा स्त्रियांबाबत धर्मांचा कावेबाजपणा आहे. म्हणजे सगळ्याच धर्मांनी स्त्रीला दुय्यमत्व दिलं, याचं कारण सगळेच धर्म पुरुषांनी लिहिलेले आहेत.

यहुदी धर्मामध्ये म्हटलेलं आहे की, ‘भाकरी करताना करपली, तर बाईला घटस्फोट द्यावा’. आता न करपवता जन्मभर भाकरी करणारी बाई अजून जन्माला यायची आहे. किंवा इस्लाममध्ये म्हटलेलं आहे की, ‘नवऱ्यानं जर तीन वेळेला (फोनवरूनदेखील) आपल्या पत्नीला ‘तलाक दिया, तलाक दिया, तलाक दिया’ असं सांगितलं, तर तलाक दियाच’. म्हणजे बायकोचा काहीही दोष नसताना नवरा-बायकोचं नातं संपुष्टात येतं. आणि तिला जी पोटगी मिळण्याची तरतूद या धर्मात होती, तीही नंतर नाकारण्यात आली. कारण मुस्लीम मुल्ला-मौलवी असं म्हणाले की, ‘हिंदूंमध्ये लग्न हा संस्कार आहे. कसा का असे ना, दारू पिऊन लाथ का घालेना, परंतु जन्मोजन्मी तोच नवरा पाहिजे. मुसलमानांमध्ये लग्न हा करार आहे. घरमालक आणि भाडेकरूचा असतो तसा! घरमालक भाडेकरूला म्हणू शकतो की, मी तुला घराच्या बाहेर काढलं. भाडेकरू घरमालकाला म्हणू शकतो, मी तुझं घर सोडलं. घरमालक दुसरा भाडेकरू ठेवायला मोकळा असतो; भाडेकरू दुसरं घर बघायला मोकळा असतो. त्यामुळे आमच्या धर्माच्या आदेशाप्रमाणे आम्ही आमच्या मुस्लीम धर्मातल्या महिलांना तलाक दिल्यानंतर पोटगी देणं लागत नाही’.

ख्रिश्चन धर्माच्या सांगण्यानुसार, मुळातच जगाची निर्मिती कशी झालेली आहे? अ‍ॅडम आणि इव्हपासून झालेली आहे. पण अ‍ॅडम‘नंतर’ इव्हची निर्मिती झालेली आहे. लक्षात घ्या, ती अ‍ॅडमपासून; अ‍ॅडमच्या एका बरगडीपासून आणि अ‍ॅडमच्या नंतर झालेली आहे. म्हणजे, या धर्मानुसार स्त्री ही पुरुषाच्या ‘नंतर’ आली; पुरुषाच्या ‘साठी’ आली आणि पुरुषाच्या एका बरगडीपासून तिची निर्मिती होऊ शकेल, एवढीच तिची योग्यता आहे. आणि मग ते जे कोणतं स्वर्गामधलं अत्यंत सुंदर झाड होतं... आणि त्या झाडावरची फळं खायची नाहीत, अशी जी आकाशातल्या बापाची आज्ञा होती, ती आकाशातल्या बापाची आज्ञा मोडण्याचा मोह त्या बाईला झाला, म्हणजे इव्हला झाला, तिने अ‍ॅडमकडे तसा आग्रह धरला आणि ते जे ज्ञानाचं फळ खाण्याचा आग्रह तिनं धरला, त्याच्यानंतर त्या आद्य पापामुळे जगाची निर्मिती झाली. म्हणजे पुन्हा ख्रिश्चन धर्मामध्येदेखील स्त्रीला दुय्यमत्व आहे.

जैन धर्मामध्ये स्त्रीला मोक्षाचा अधिकार देण्यात आलेला नाही. पती कसा का असेना, दारू का पिईना, जुगार का खेळेना, वेश्येकडे का जाईना, पण हिंदू धर्मामध्ये ‘पती हाच परमेश्वर आहे’, असं एका बाजूला मानायला सांगितलं गेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुळशीदासांसारख्यांनीदेखील म्हटलेलं आहे – ‘गवार क्षुद्र पशु और नारी / ये सब ताडन के अधिकारी’. गवार, म्हणजे अडाणी माणूस. क्षुद्र, म्हणजे दलित. पशु, म्हणजे प्राणी आणि नारी, म्हणजे स्त्री. या सगळ्यांना काठीनं मारणं, ताडन करणं याच्यामध्ये धार्मिकदृष्ट्या काहीही चूक नाही, अशा स्वरूपाची एक स्पष्ट नोंद तुळशीदासानं केलेली आहे. ही सगळी मांडणी जर आपण बघितली, तर स्त्रीला अंधश्रद्धेमध्ये लोटणारं जे गौणत्व चालू होतं, त्याची धर्मापासून कशी सुरुवात होते, हे आपल्याला समजू शकेल.

स्त्रिया सगळे उपवास कशाकरता करतात?

त्याच्यानंतर एका वेगळ्या मुद्द्याकडे आपण वळू. आजही भारतामधल्या कुपोषित महिलांचं प्रमाण जवळजवळ ५७ टक्के आहे. या महिलांच्या अंगामध्ये पुरेसं रक्त नसतं. त्याला आपण अ‍ॅनिमिया म्हणतो. या अ‍ॅनिमिक स्त्रियांना स्वत:ची दैनंदिन कामं पार पाडत असताना अनेक प्रकारच्या थकव्यांना, आजारांना तोंड द्यावं लागतं. तेव्हा एका बाजूला ही स्त्री कुपोषित असते; घरामध्ये ती सगळ्यात शेवटी जेवते; जे शिल्लक असेल, उरलेलं-सुरलेलं असेल, तेच तिनं खायचं, असा नियम असतो. तिचं लग्न लवकर केलं जातं. आज लग्नाचं वयाचं अधिकृतपणे १८ असतानाही महाराष्ट्रातली जवळजवळ ३५ टक्के ते ४० टक्के लग्नं १६व्या आणि १७व्या वर्षीच होतात. त्याच्यानंतर ती स्त्री गरोदर राहते. तिच्या शरीराची पुरेशी वाढ झालेली नसते; गर्भाशयाची पुरेशी वाढ झालेली नसते; मनाची पुरेशी वाढ झालेली नसते. अशा वेळी तिच्या शरीरावर गरोदरपणाचा ताण येतो. त्याच्यानंतर ती प्रसूत होते.

आजही भारतामध्ये गरोदरपणात मृत पावणाऱ्या महिलांची संख्या शेजारच्या टीचभर बांग्लादेशापेक्षाही जास्त आहे आणि प्रसूत झाल्यानंतर जन्माला आलेल्या नवजात अर्भकांच्या मृत्यूची संख्या शून्य ते एक या वर्षाच्या कालावधीचा विचार करता, शेजारच्या टीचभर श्रीलंकेपेक्षा आजही जास्त आहे. हे सगळं सांगण्यामागचं कारण स्त्रीच्या आरोग्याचा पंचनामा करणं नसून, ज्या वेळेला अशा स्वरूपाची मानसिकता समाजात अस्तित्वात असते, त्या वेळेला वर सांगितलेल्यांपैकी प्रत्येक गोष्ट या स्त्रीला अंधश्रद्धेकडे ढकलत असते. म्हणजे स्त्रिया जे उपवास करतात, ते सगळे उपवास कशाकरता असतात? एकतर चांगला नवरा मिळावा म्हणून असतात किंवा मुलाचं कल्याण व्हावं म्हणून असतात.

त्यामुळे आपल्याला लवकर मूल व्हावं, त्या वेळी गरोदरपण झेपावं, मुलगाच जन्माला यावा हे सगळे तिच्या व्रतवैकल्याचे विषय असतात. कारण या सगळ्यामध्ये एक प्रचंड प्रकारची अस्थिरता आज अस्तित्वात आहे. त्यामुळे ही सर्व भौतिकता त्या अस्थिरतेकडे आणि त्याच्यामधनं अंधश्रद्धेकडे त्या बाईला ढकलत असते. म्हणजे आता विज्ञानानं हे सिद्ध केलेलं आहे की, मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे खरं म्हटलं तर पुरुषाच्यापासून जी रंगसूत्रं-गुणसूत्रं बाईला मिळतात, त्यांच्यावर अवलंबून असतं. पण तरीदेखील, बाई गरोदर राहिल्यानंतर ‘मुलगाच व्हायला पाहिजे’, या हट्टापायी अजूनही तिची सोनोग्राफी केली जाते आणि नंतर भ्रूणहत्या केली जाते. ही पुन्हा एकदा तिच्या दुय्यमत्वाची साक्ष आहे आणि ‘गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे, हे आम्हांला बघायचं आहे आणि जर मुलगी असेल, तर ती आम्हांला नको’ असा अनेक स्त्रियादेखील दुर्दैवाने आजही आग्रह धरतात.

आणि म्हणून, हे सगळं टळावं म्हणून त्यांचे उपासतापास चालू असतात. मात्र हे उपासतापास करताना नेमकं काय घडतंय, याचा कार्यकारण भाव आपण कधीच विसरलेला असतो. म्हणजे मला आठवतं की, एकदा माझ्या दवाखान्याचा जिना चढून एक बाई वर आली. ती घामानं डबडबलेली होती. तिला धाप लागलेली होती. तिला बराच मोठा आजार झाला असावा, असं तिच्या घरच्यांना वाटत होतं. माझ्या पत्नीनं तिला टेबलवर झोपवलं; तपासलं आणि माझ्या पत्नीच्या लक्षात आलं की, तिला कुठलाच आजार झाला नव्हता, तर तिच्या खाण्यापिण्याची दीर्घ काळ आबाळ झालेली होती. तिच्या अंगातलं रक्त खूप कमी झालेलं होतं आणि तिला होणार त्रास त्या अशक्तपणामुळे, रक्त कमी झाल्यामुळे होत होता. अशा रुग्णाला अर्थातच औषधं लिहून देण्याच्या आधी योग्य प्रकारचा आहार देण्याची गरज असते. त्याच्यामुळे तो आहार जर द्यायचा असेल, तर स्वाभाविकपणे एकतर त्या बाईच्या सासूला सांगावं लागतं; नाहीतर तिच्या ‘ह्यांना’ सांगावं लागतं. कारण आजही सासुरवाशीण स्वत:च्या हातांनी घरात चांगल्याचुंगल्या गोष्टी करून खाऊ शकेल, असं वास्तव नाही. त्याच्यामुळे मी तिच्या ‘ह्यांना’ बोलवलं आणि त्यांना सांगितलं की, “हे बघा, एक गोष्ट चांगली आहे की, तुमच्या पत्नीला कुठलाही आजार झालेला नाही; मात्र तिच्या खाण्यापिण्याची दीर्घ काळ आबाळ झालेली आहे. त्यामुळे यापुढे तीन महिने तरी तिला तुम्ही रोज घट्ट डाळीचं वरण द्यायचं. म्हणजे तिला प्रथिनं मिळतील. मोड आलेली कडधान्यं द्यायची. म्हणजे तिला अमायनो अ‍ॅसिड्स मिळतील. सकाळ-संध्याकाळ तिला एकेक कप दूध द्यायचं. म्हणजे तिला कॅल्शिअम मिळेल. सकाळ-संध्याकाळ एकेक अंड द्यायचं. म्हणजे फर्स्ट क्लास प्रोटिन्स मिळतील. आणि आठवड्यातनं दोनदा तरी तिला मांसाहार द्यायचा. आणि हे तुम्हांला परवडत नसलं, तरी तीन महिने तुमच्या पत्नीसाठी हा खर्च तुम्ही केला पाहिजे’’.

आता अनुभव असा की, असं काही सांगितलं की, रुग्णाचे नातेवाईक ऐकतात आणि मान डोलावतात. कारण ते डॉक्टरांचं ऐकायलाच डॉक्टरकडे आलेले असतात. इथं मात्र विपरीत अनुभव आला. तो नवरा उसळून म्हणाला, “डॉक्टर परवडण्याचा प्रश्नच नाही. आमच्याकडे मोप दूधदुभतं आहे. आमच्याकडे अंडी-कोंबड्या आहेत. आम्ही हिला रोज मांसाहार देऊ शकतो. पैसाअडक्याची काहीही अडचण नाही. पण हिचा सोमवारचा उपवास असणार; मंगळवारचा असणार; गुरुवारचा असणार; शुक्रवारचा असणार. हिचे आत्ता सोळा श्रावणी सोमवार संपले. त्याच्यानंतर मग नवरात्राचे नऊ उपवास झाले. आता हिचे सूर्यनारायणाचे उपवास येणार. हिचे उपवास संपणार कवा, ही जेवणार कवा आणि हिची तब्येत सुधारणार कवा!’’ म्हणजे, खायला मिळत नाही, म्हणून अशक्तपणा आहे, हे वाईटच आहे, पण खायला मिळण्याची शक्यता असूनदेखील कुठल्या ना कुठल्या चुकीच्या कल्पनेमुळे, अंधश्रद्धेच्या पोटी, सातत्यानं चालू असलेल्या उपवासांमुळे स्वत:च्या तब्येतीची बरबादी होणं, हे मानसिक गुलामगिरीचं लक्षण आहे, हे या प्रश्नामागचं व्यापकत्व आपण समजून घेतलं पाहिजे;

आणि हे व्यापकत्व स्त्रीला मूल होण्या-न होण्यापासून सुरू होतं. म्हणजे मला या संदर्भातली चळवळीतली एक घटना आठवते. नगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यामधला मालचौंडीचा डोह. त्या डोहाची प्रसिद्धी अशी की, संतती नसलेल्या बायकांनी जर त्यात अंघोळ केली, तर त्यांना मूल होतं. कृष्णा बाजीराव रेपाळे, म्हणजे बाजीराव रेपाळे यांची दुसरी बायको. त्यांच्या पहिल्या बायकोला १० वर्षं मूल नव्हतं. मग त्यांनी दुसरी बायको केली. दुसऱ्या बायकोलाही पुन्हा दोन वर्षं मूल झालं नाही. मग त्यांनी तिला मालचौंडीच्या डोहामध्ये आणायचं ठरवलं. जो डोह दिवसा बघतानादेखील आपल्याला भीती वाटते, त्या डोहाच्या जवळ ती बाई आली. ती बाई त्या डोहामध्ये अंघोळीला उतरली, परंतु पुढं ती असं म्हणाली की, “मी आता या डोहामध्येच सात दिवस राहणार आहे आणि सातव्या दिवशी तुम्ही मला न्यायला या’’ आणि त्याप्रमाणे बघता बघता त्या डोहामध्ये ती गरागरा फिरायला लागली. काही काळ गेला. त्याच्यानंतर ती पाण्यावर तरंगायला लागली आणि किनाऱ्यापासून एका बाजूला वीसेक फुटांवर पाण्यावर तरंगणारा तिचा देह दिसायला लागला. काय झालं असेल, हे आपण समजू शकता. परंतु लोकांनी असं मानलं की, जणू काही ही बाई पाण्यावर सात दिवस तप करणार आहे. मग बघता बघता त्या डोहाला धर्मस्थळाचं स्वरूप प्राप्त झालं. तिथं अनेक लोक बैलगाड्या करून, जीप करून, टॅक्सी करून यायला लागले आणि त्या उषा बाजीराव रेपाळेचं दर्शन घ्यायला लागले. तेव्हा आम्ही पोलिसांकडे गेलो. पोलीस म्हणाले, ‘तुम्हा लोकांचा कशावरच विश्वास नाही. बघा तुम्ही, सात दिवसांनी ती जिवंत होईल किंवा ती जिवंतच आहे आणि ती तप करतीये हे तुमच्या लक्षात येईल, त्या वेळी तुम्हांला कळेल’. त्याच्यानंतर हे प्रकरण फारच पेटलं. शेवटी आमच्या दबावामुळे डीएसपीला कारवाई करावी लागली. इंग्रजी वृत्तपत्रांनी हे प्रकरण उचलून धरलं. त्यामुळे डीएसपीची काहीशी बदनामी झाली. त्याच्यानंतर नगरच्या डीएसपीनं पोलिसांचं एक प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं. त्या प्रशिक्षण शिबिराला मी गेलो होतो. त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये ४००-५०० पोलिसांच्या समोर बोलताना मी असं म्हणालो की, “हे तुमच्या लक्षात आलं का की, उषा बाजीराव रेपाळेच्या मृत्यूला आपण जबाबदार आहोत?’’

तर ते पोलीस एकमेकांकडे पाहायला लागले की, ‘आपला संबंध काय! ती बाई अंधश्रद्धाळू होती आणि त्या अंधश्रद्धेपायी तिनं स्वत:चा जीव गमावला’. पण तिनं स्वत:चा जीव का गमावला? कारण तिला मूल नव्हतं. मूल होण्याची शक्यता नव्हती. नवरा तपासून घ्यायला तयार नव्हता; आणि मूल नसलेल्या वांझ बाईला समाजामध्ये ज्या स्वरूपाची मानहानीची वागणूक मिळते, ती सोसण्याची तिची तयारी नव्हती.

 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. नरेंद्र दाभोळकर लिखित पुस्तके विकत घेण्यासाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/yxjo42wx

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्यविषयक प्रश्नाकडून अंधश्रद्धेच्या मानसिक गुलामगिरीकडे

म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की, स्त्रीच्या आरोग्यविषयक प्रश्नाचे संबंध हे तिला कळत-नकळत, पण निश्चितपणे अंधश्रद्धेच्या मानसिक गुलामगिरीकडे ढकलत असतात. आणि हे तर झाले, शारीरिक आरोग्यव्यवस्थेचे प्रश्न; परंतु मानसिक आजाराची जी अभिव्यक्ती बायकांमध्ये होते, ते निश्चितपणे अंधश्रद्धेचेच प्रकार मानले जातात. म्हणजे अचानकपणे बाईची छाती धडधडायला लागते, अंग कापायला लागतं, अंग उडायला लागतं, गळा आवळल्यासारखा वाटायला लागतो; काही काळ हे चालतं आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी हे आपोआप बरं होतं किंवा काही वेळानं ते आपोआप बरं होतं. डॉक्टरकडे नेलं तरी बरं होतं; डॉक्टरकडे नेलं तरी ते परत परत उद्भवतं; मांत्रिकाकडे नेलं तरी ते बरं होतं; मांत्रिकाकडे नेलं तरी ते परत परत उद्भवतं. त्यामुळे अशी एक कल्पना निर्माण होते की, हे काहीतरी बाहेरचं आहे आणि हे अचानकपणे उद्भवलेलं आहे.

याच्याही पुढची गोष्ट म्हणजे, अनेकदा अचानकपणे स्त्रीची वाचा जाते; तिला दिसेनासं होतं; हातपाय लुळे पडतात आणि मग हे जे काही घडलेलं असतं, ते का घडलं, हे न कळल्यामुळे - ज्याला वैद्यकीय परिभाषेमध्ये ‘हिस्टेरिकल कॉन्व्हर्जन्स’ म्हणतात - पुन्हा एकदा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन उपाय केले जातात. म्हणजे मला आठवतं, मी ज्या वेळी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये होतो, त्या वेळी सहा-सहा बेड्सवरचे रुग्ण आम्हांला तपासायला दिलेले असायचे.

एकदा माझ्याकडे असलेल्या बेडवर एक १८-१९ वर्षांची सुस्वरूप तरुणी आली. तिला अर्धांगवायू झालेला होता. तिचं अर्धं अंग पूर्णपणे लुळं पडलेलं होतं. आता १८-१९ व्या वर्षी होण्यासारखा अर्धांगवायू हा आजार नाही. त्यामुळे तिला अर्धांगवायू का झाला, याच्याबद्दल आमच्या मनामध्ये फार कुतूहल होतं. तिच्या छातीमध्ये, हृदयामध्ये एक बारीक भोक होतं आणि मग असं निदान करण्यात आलं की, रक्ताची गुठळी निघाली, ती मेंदूमध्ये अडकली आणि त्याच्यामुळे तिला अर्धांगवायू झाला. अर्धांगवायू झाल्यावर काही दिवसांनंतर त्याच्यावर होण्यासारखे उपचार खूपच कमी असतात आणि त्या काळात तर ते आणखी कमी होते. आणि ज्या आजारावर उपचार शक्य नसतात, असा आजार झालेल्या रुग्णाला अ‍ॅडमिट करून ठेवण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे शेवटी तिला घरी पाठवायचं ठरलं. आम्हा तरुण मित्रांना असं वाटत होतं की, ‘अरे, या बाईचं उभं आयुष्य कसं जाईल!’ म्हणून त्या वेळेचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. देप सिकदार यांना म्हणालो, “सर तिचं सायकोनार्कोसिस करा किंवा नार्कोअ‍ॅनालिसिस करा’’. सायकोनार्कोसिस किंवा नार्कोअ‍ॅनालिसिस करताना सोडियल पेंटथॉल नावाचं एक विशिष्ट द्रव्य रुग्णाला दिलं जातं. ते दिल्यानंतर रुग्णाच्या बाह्य मनावरचा ताण कमी होतो आणि अंतर्मनामध्ये लपलेल्या गोष्टी रुग्ण बोलायला लागतात. ज्या वेळी या मुलीचं नार्कोसिस केलं, त्या वेळी काय लक्षात आलं?

तिला हे लग्न अजिबात करायचं नव्हतं. तिचं एका दुसऱ्या तरुणावर प्रेम होतं. घरच्यांच्या दबावाखाली तिचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर तिचा नवरा तिचा कायदेशीर पती बनला. कायदेशीर पती बनल्यामुळे तिचा त्याच्याशी शरीरसंबंध आला. हा शरीरसंबंध नाकारण्याची कोणतीच योजना तिच्याकडे नव्हती, पण तिला तो शरीरसंबंध इतका नकोसा वाटत होता की, तिच्या शरीरानं तो नाकारला आणि तिच्या शरीराची अर्धी बाजू लुळी पडली. म्हणजे आजार होता मानसिक; त्याचं दृश्य चित्र झालं शारीरिक. त्यामुळे उपचार या मुलीच्या मनावर करायला हवा होता. त्याप्रमाणे मनावर उपचार केल्यानंतर अर्धांगवायू झालेली ती मुलगी पुढच्या आठ दिवसांमध्ये खडखडीत बरी झाली. पण जर हीच बाई बाहेर एखाद्या मांत्रिकाकडे, भगताकडे, देवऋषिकडे, बाबाबुवाकडे गेली असती आणि त्याच्या औषधानं आणि अंगाऱ्यानंदेखील बरी होऊ शकली असती, कारण तिच्या तुटलेल्या मनाला त्यानं योग्य तो आधार दिला असता. तेव्हा आपण असं म्हणालो असतो की, ‘बाहेरची बाधा असते आणि ती बाधा मांत्रिकाला, देवऋषाला दूर करता येते. डॉक्टरांचा काही फायदा नाही’.

हे सगळं जे मी आपल्याला सांगतोय, याचा अर्थ असा की, बाईचं मन आजारी पडतं. आपण असा विचार केला पाहिजे की, अंधश्रद्धेची जास्त बळी बाईच का? बाईच्या अंगामध्येच का येतं? भानामतीचे जे वेगवेगळे प्रकार असतात, त्यांच्यामध्ये बहुधा बाईच एजंट कशी सापडते? म्हणजे आपोआप कपडे फाटणं, अंगावर बिब्ब्याचे डाग उठणं, आपोआप कपडे जळणं, घरावर दगडं येणं, अन्नामध्ये विष्ठा मिसळणं या भानामतीच्या बहुसंख्य प्रकारांमध्ये बहुधा स्त्रीच असते, असं आपल्याला दिसतं. या ज्या सगळ्या गोष्टी घडतात, त्या बाईच्या संदर्भात घडतात.

याचं साधं कारण असं की, आपल्या समाजामध्ये बाईला जे गौणत्व आलेलं आहे, त्यामुळे बाईच्या मनातलं दु:खाचं धरण लवकर भरतं. पाण्यानं धरण भरल्यानंतर जर धरणाचे दरवाजे उघडले नाहीत आणि पाण्याचा निचरा झाला नाही, तर पाण्याच्या दबावानं धरणाची भिंत कोसळते. त्याच पद्धतीनं, अनेकविध सामाजिक कारणांनी बाईच्या मनातलं दु:खाचं धरण लवकर भरतं आणि त्याच्यानंतर तिच्यासाठी दोनच मार्ग शिल्लक असतात. एकतर स्वत:चं व्यक्तिमत्त्व छिन्नविछिन्न करून घेणं किंवा त्या दबावानं स्वत:च्या अंतर्मनाचे दरवाजे उघडणं - मग कधी ‘हिस्टेरिकल कॉनव्हर्जन्स’, कधी मगाशी सांगितलेलं अंग उडण्याचं लक्षण, कधी भानामतीचे प्रकार - आणि स्वत:चा ताण कमी करणं.

त्यामुळे स्त्रिया आणि अंधश्रद्धा याचा ज्या वेळी आपण विचार करतो, त्या वेळी धर्मानं तिला अंधश्रद्धेकडे किती लोटलेलं आहे, तिच्या शारीरिक भौतिकतेच्या असलेल्या दुर्लक्षामुळे ती अंधश्रद्धेकडे किती लोटली गेली आहे, तिच्या मानसिकतेमुळे ती अंधश्रद्धेकडे किती लोटली गेली आहे आणि या सगळ्यामध्ये पुन्हा एक मानसिक गुलामगिरी निर्माण करून तिला पावित्र्य मानायला कसं शिकवलेलं आहे, असा सगळा नीट विचार आपण करायला पाहिजे. याचं अतिशय चांगलं उदाहरण, म्हणजे आपल्याकडची व्रतवैकल्यं. व्रतवैकल्यं तरी कशाला, आपण सतीसारखी प्रथा घेऊ या.

स्वत:च्या पतीच्या निधनानंतर स्वत:च्या पतीचं शव मांडीवर घेऊन सती जाण्याची एक घटना १९८७ साली राजस्थानमध्ये देवराळाला घडली. त्याच्यानंतर या जागी सतिस्थळ उभारणार होते. मात्र त्या कार्यक्रमावर त्या वेळच्या केंद्र सरकारनं बंदी घातली आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की, ती बंदी झुगारून हजारो स्त्री-पुरुषांच्या झुंडीच्या झुंडी ‘सती माता की जय’ म्हणत त्या स्थळाकडे गेल्या. म्हणजे ती सती गेली, नवऱ्याच्या शवाबरोबर ती जाळली गेली, याच्यामध्ये अन्याय वाटण्याऐवजी ती अभिमानाची गोष्ट असल्याचं मानलं गेलं. याच पद्धतीनं आपण जी अनेक व्रतवैकल्यं करतो, तीही माणसं अभिमानाची बाब समजतात; समजून न घेता. म्हणजे आपल्याकडे स्त्रिया वटसावित्रीचं व्रत दोन गोष्टींसाठी करतात.

वटसावित्रीचं व्रत : झाडाचं बॉन्साय आणि महिलांच्या बुद्धीचंदेखील बॉन्साय

एक गोष्ट म्हणजे, नवऱ्याला दीर्घ आयुरारोग्य मिळावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जन्मोजन्मी वा सात जन्मी हाच पती मिळावा. खरं म्हटलं तर ज्याप्रमाणे सावित्रीनं यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले, ही गोष्ट जर हे व्रत करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत होत असती, तर आम्हा डॉक्टरांची फार सोय झाली असती. आम्ही हॉस्पिटलच्या दारामध्ये वडाचं एक झाड लावलं असतं आणि ज्या वेळेला पेशंटला ऑपरेशनला घेतलं असतं, त्या वेळी त्याच्या बायकोच्या हातामध्ये सुताची एक गुंडी दिली असती आणि तिला सांगितलं असतं, ‘तू झाडाभोवती सूत गुंडाळ. तू हे व्रत कर. कारण त्याच्यामुळे दुहेरी फायदा आहे. एका बाजूला आमचं ऑपरेशन, दुसऱ्या बाजूला तुझं व्रत; डबल इंजीन लावू या. कशानं का होईना, पण निश्चित प्रकारे गुण येईल’. परंतु या सगळ्यातला फोलपणा कळत असतानादेखील आजही सुशिक्षित स्त्री वटसावित्रीचं व्रत करते.

आणि कसं करते? म्हणजे वडाची झाडं आता कुठेतरी गावाच्या बाहेर असणार. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये तर तीही सोय नाही. मग सर्रास वडाच्या फांद्या तोडल्या जातात, त्या विक्रीला आणल्या जातात आणि वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होते. कशाकरता? तर वटसावित्रीचा वट पुजायचंय म्हणून. म्हणजे बॉन्साय हा प्रकार आपल्याला माहीत असेल. मोठी मोठी झाडं छोटी छोटी करून ठेवण्याची ती एक जपानी कला आहे. त्यामुळे वडाचं झाड २० वर्षांचं असतं, तरी छोट्या कुंडीतच असतं. मला एकदा मुंबईच्या उच्चविद्याविभूषित विदुषी त्यांच्या घरचं बॉन्साय दाखवत होत्या. त्यांनी मला ते वडाचं कुंडीतलं झाड दाखवलं. म्हणाल्या, “डॉक्टर या वडाच्या झाडाचं वय २२ वर्षं आहे, पण त्याचा एक मोठा फायदा होतो. तो म्हणजे, आमच्या या बिल्डिंगमधल्या बायका वटसावित्रीच्या दिवशी दुसरीकडे कुठेही न जाता माझ्या घरी येतात आणि या वडाच्या झाडाची पूजा करतात’’. मी त्यांना म्हणालो, “याचा अर्थ एवढाच की, तुमच्या झाडाचं बॉन्साय तर आहेच, पण तुमच्या कॉलनीमधल्या किंवा बिल्डिंगमधल्या महिलांच्या बुद्धीचंदेखील बॉन्साय झालेलं आहे’’.

असं बोललेलं लोकांना आवडत नाही. कारण आपल्या रूढी-परंपरा आपण ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तपासाव्यात, असं लोकांना वाटतच नाही. वटसावित्रीची कथा किती जणांना माहिती आहे, असा प्रश्न मी ज्या वेळी विचारतो, त्या वेळी महिला समुदायामध्येदेखील कोणीही ती कथा नीट सांगू शकत नाही, माझा असा अनुभव आहे. कथा काय आहे?

अश्वपती नावाचा एक राजा नि:संतान असतो. मूल व्हावं म्हणून तो देवीची पूजा करतो. १८ वर्षं तप आणि व्रत केल्यानंतर त्याला एक सुरेख मुलगी होते. तिचं नाव असतं सावित्री. ही सावित्री म्हणे इतकी रूपवान असते, इतकी देखणी असते की, तिला वरायला, तिच्याशी लग्न करायला कुणी धजावत नसतं. शेवटी सावित्रीनं स्वत:चा वर स्वत:च निवडावा म्हणून एका वृद्ध अमात्याला बरोबर देऊन राजा तिला पाठवतो. सावित्री या राज्यातनं त्या राज्यात, या जंगलातनं त्या जंगलाकडे जात असते. कारण दोन राज्यांना जोडणारी जंगलंच त्या वेळेला असायची. एका जंगलामध्ये तिला सत्यवान दिसतो. तो राज्य गेल्यानं परागंदा झालेला राजा असतो. त्याचे वडील महाराज असतात. तेही त्या वेळी जंगलातच राहत असतात. ते आंधळे झालेले असतात; आणि राज्य गेल्यामुळे जंगलात राहण्याची वेळ, म्हणजे हा विजनवास त्यांच्या पदरी आलेला असतो. अशा वेळी मातीचे हत्ती आणि घोडे करून सत्यवान त्यांच्याशी खेळत असतो. त्याला बघितल्यानंतर सावित्री म्हणते, “मी याच्याशीच लग्न करणार’’. ज्या वेळेला तिच्या वडलांना हे कळतं, त्या वेळी तिच्या वडलांना आनंद होतो की, ‘चला, आपल्या मुलीनं आपला वर निवडला’. त्याच्यानंतर प्रत्यक्षात लग्न होण्याच्या आधी नारद येतो आणि नारद सावित्रीच्या वडलांना सांगतो की, “बाबा रे, तुझ्या मुलीनं जो वर निवडलेला आहे, तो एक वर्षानंतर निश्चितपणे मरणार आहे. एक वर्षानंतर तुझी मुलगी विधवा होणार आहे. तेव्हा हे लग्न तू करू नकोस’’. परंतु तरीदेखील जंगलामध्ये जाऊन अत्यंत आनंदानं, थाटामाटात अश्वपती आपल्या मुलीचं लग्न लावून देतो. त्याच्यानंतर एक वर्ष होतं. यम येतो. तो सत्यवानाला घेऊन जायला लागतो. त्याच्या मागोमाग सावित्री जाते. यम तिला परोपरीनं परत पाठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही बधत नाही. मग शेवटी यम तिला तीन वर मागायला सांगतो. पहिला वर ती मागते, “माझ्या सासऱ्यांना त्यांचं गेलेलं राज्य परत मिळू दे आणि परत मिळालेलं राज्य पाहण्याचं भाग्य लाभू दे’’. दुसरा वर मागते, “माझ्या नि:संतान पित्याला शंभर पुत्र होऊ देत’’. आणि तिसरा वर मागते, “आम्हा उभयतांना दीर्घ आयुरारोग्य लाभून माझा संसार सुखाचा होऊ दे’’. यम ‘तथास्तु’ म्हणतो.

आता ही सगळी कल्पना काय आहे, असा प्रश्न तुम्ही कधी विचारला का? समजा, आजच्या आधुनिक कालखंडामध्ये आपल्याला एक अत्यंत देखणी मुलगी आहे आणि तिच्या लग्नाला जर चटकन सांगून मुलं येत नाहीयेत, तर वडील स्वत: आणखी व्यापक प्रयत्न करतील की, एका वृद्ध अमात्याला घेऊन तिलाच देशोदेशी स्वत:च्या स्वयंवरासाठी पाठवतील? त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की, एक वर्षानं नवरा मरणार आहे, असं जर निश्चितपणे कळलं - ते आज कळू शकतं. उदाहरणार्थ, कुणी जर येऊन सांगितलं की, ‘अहो, तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय, पण तुम्हांला माहीत आहे का की, नवऱ्या मुलाच्या लिव्हरचं अमुक अमुक डॅमेज आहे. त्याला लिव्हरचा अमुक अमुक आजार आहे. तो एक वर्षाच्या वर जगणार नाहीये’. तर ते लग्न ती मुलगी करेल का? आणि तिचे आईवडील ते करू देतील का?

किंवा आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचं, तर धंद्यामध्ये पूर्ण संपत्ती गेलेली असल्यानं एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आणि त्याच्या आंधळ्या बापालाही भविष्यात सांभाळावं लागणार असणाऱ्या मुलाशी आजच्या काळातली एखादी मुलगी लग्न करेल का? आणि ती लग्न करते म्हणाली, तर तिचे आईबाप त्या लग्नाला होकार देतील का?

अश्वपती राजानेही आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न जंगलात का लावून दिलं? त्यानं ते लग्न राजधानीमध्ये का नाही लावलं? आणि ते लावल्यानंतर त्यानं आपल्या मुलीच्या सासरकडच्यांना मदत का केली नाही? त्यानं आपल्या जावयाला आणि आपल्या व्याह्यांना आणून राजधानीमध्ये का ठेवलं नाही? हे प्रश्नदेखील हे व्रत करणाऱ्या लोकांना पडत नाहीत.

या कथेत जे हे सगळं जे घडलं, याचं महत्त्वाचं कारण, ज्या मुलीला भाऊ नाही, तिचं लग्न त्या काळात होत नसे. ‘त्यामुळे एवीतेवी हिचं लग्न होणारच नव्हतं, पण कसं का असेना, आता एकदा हिचं लग्न तरी होतंय’, या भावनेनं अश्वपती सावित्रीचं लग्न लावून द्यायला उत्सुक होता. लग्न करायला कदाचित परंपरेच्या दडपणानं ती उत्सुक होती. परंपरेचं हे दडपण इतकं जास्त होतं की, तिनं यमाला काय मागितलं? पहिला वर स्वत:च्या सासऱ्यासाठी मागितला. दुसरा वर स्वत:च्या वडलांसाठी मागितला आणि तिसरा वर स्वत:च्या नवऱ्यासाठी मागितला. म्हणजे तिनं तीनही गोष्टी पुरुषांसाठी मागितल्या. त्यामुळे हे सबंध व्रत तुम्ही ज्या वेळी करता, त्या वेळी त्यातला गर्भितार्थ असा की, बाईनं आपल्या सगळ्या सुखाचं समर्पण पुरुष वर्गाशी संबंधित असलेल्या बाबींसाठी - मग कदाचित वडील असतील, कदाचित सासरे असतील किंवा नवरा असेल - केलं पाहिजे.

हे सगळंच्या सगळं आजच्या आधुनिक विचारांशी पूर्णपणे विसंगत आहे; आणि ही विसंगती अनेक वेळा किती हास्यास्पद ठरते! म्हणजे कोल्हापूरकडचं एक उदाहरण आहे. एका गावामध्ये वटसावित्रीच्या दिवशी गावातल्या बायका जमून वटसावित्रीची पूजा करत होत्या. वडाला सूत गुंडाळत होत्या. हळदी-कुंकू वाहून वडाची पूजा करत होत्या. लग्न होऊन दोन वर्षं झालेली एक बाई हे सगळं करत असताना अचानकपणे एक जीप आली. त्या जीपमधून एक माणूस उतरला. त्यानं या बाईचा हात धरला; ओढला; तिला जीपमध्ये बसवलं आणि जीप भरधाव वेगानं निघून गेली. यानं गावात एकच हलकल्लोळ माजला. सगळे म्हणायला लागले, ‘हा काय प्रकार आहे! आमच्या गावामध्ये देवाची पूजा करणाऱ्या, वडाची पूजा करून वटसावित्रीचं व्रत करणाऱ्या बाईला दिवसाढवळ्या कुणीतरी माणूस या पद्धतीनं घेऊन जातो! पळवून नेतो!’ मग या जीपचा पाठलाग करण्यात आला. गाडी काही भरधाव वेगानं चाललेली नव्हती. मग गाडी अडवण्यात आली. त्या माणसाला उतरवण्यात आलं. त्याला दमात घेऊन ‘हा सगळा काय प्रकार आहे! तू स्वत:ला कोण समजतोस? आमच्या गावातली मुलगी तू अशी पळवून का नेलीस?’ असं विचारण्यात आलं. त्यावर तो माणूस अत्यंत शांतपणे म्हणाला, “ती बाई कोण आहे, हे तुम्हांला माहिती आहे का?’’ त्यावर गावकरी म्हणाले, ‘कोण आहे ती? आमच्या गावची मुलगी आहे!’ तो म्हणाला, “बरोबर आहे, पण ती माझी बायको आहे. आमचं लग्नं होऊन दोन वर्षं झाली आहेत’’. आता आश्चर्यचकित होण्याची वेळ गावकऱ्यांवर आली होती. ते म्हणाले, ‘‘अरे भल्या गृहस्था, मग ती चांगली वटसावित्रीची पूजा करत होती; ‘जन्मोजन्मी सात जन्मी हाच पती पाहिजे’ असं म्हणत होती; आणि तू तिला पळवून नेण्याची काय गरज होती? तिची पूजा झाल्यानंतर तिला तू घेऊन जाऊ शकला असतास.” तो म्हणाला, “अहो, लग्न होऊन दोन वर्षं झाली. ही बाई सात दिवसदेखील नांदली नाही. आता ही म्हणतीये की, ‘सात जन्मी हाच पती पाहिजे’. मी दोन वर्षं असाच राहिलो. आता सात जन्मपण असाच राहू का?’’ आता ज्या बाईला माहेरीच राहावंसं वाटत होतं; संसार करावासा वाटत नव्हता, ती विनाकारण कशाकरता ते वटसावित्रीचं वट करत होती?

लक्षात घ्या, या सगळ्या प्रकारात एक प्रकारची सक्ती निर्माण होते. ज्या वेळेला आम्ही वटसावित्रीचं व्रत करणाऱ्या दीड हजार सुशिक्षित बायकांचं सर्वेक्षण केलं, त्या वेळेला त्यांच्यातल्या ७० टक्के बायका हे व्रत करणाऱ्या होत्या. आम्ही त्यांना विचारलं, ‘तुम्ही हे व्रत का करता? याच्यावर तुमचा विश्वास आहे का?’ त्या म्हणाल्या, ‘नाही, आमचा काही तसा विश्वास नाही’. आम्ही म्हणालो, ‘मग का करता?’ त्या म्हणाल्या, ‘पण समजा जर आम्ही एखाद्या वर्षी व्रत केलं नाही आणि नेमक्या त्याच वर्षी यांना काही गंभीर आजार झाला, तर घरचे लोक म्हणतील, ‘केलं असतं व्रत, तर काही बिघडलं असतं का?’ त्याच्यामुळे व्रत केलेलं बरं, म्हणून आम्ही व्रत करतो’.

रूढी-परंपरांची ही गुलामी किती खोलवर आपल्या मनामध्ये रुजलेली असते, यासाठी मी आपल्याला हा सगळा तपशील सांगितला. पुन्हा यामधून स्वत:चीच फसवणूक करण्याची एक प्रवृत्ती निर्माण होते. म्हणजे मी मागच्या वर्षी एका ठिकाणी गेलो होतो. ज्या घरी होतो, त्या ठिकाणची सुशिक्षित बाई वडाची सगळी व्यवस्थित पूजा करून आलेली होती. तिला तो सगळा प्रकार फारसा आवडलेला नसल्याचं मला कळत होतं, पण घरच्या दबाळामुळे तिच्यापुढे काही पर्याय नव्हता. म्हणून मी थोडं गमतीनं तिला म्हणालो, “काय वहिनी, वडाची पूजा केलीत की नाही? सात फेऱ्या घातल्यात की नाही? ‘जन्मोजन्मी सात जन्मी हाच पती मिळावा’, असं म्हणालात की नाही?’’ मी कुठल्या अर्थानं हे म्हणत होतो, ते त्या बाईला कळत होतं. त्या म्हणाल्या, “हो. वडाची यथास्थित पूजा केली; हळद-कुंकू वाहिलं; वडाला सात फेऱ्या घातल्या; त्याला सूत गुंडाळलं आणि म्हणाले, ‘जन्मोजन्मी सात जन्मी हाच पती मिळावा, पण हा त्याचा सातवा जन्म असावा’ ’’.

सूनेचा पायगुण आणि सासरची साडेसाती

याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की, आपण स्वत:ला फसवण्याचं निमित्त या निमित्तानं निर्माण करतोय. हे सगळं जर आपण लक्षात घेतलं, तर स्त्रीच्या अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये या सगळ्या रूढी-परंपरांचा किती मोठा वाटा आहे, हे आपल्याला कळू शकेल. म्हणजे मला एकदा एक जण येऊन म्हणाले, “दाभोलकर, तुम्ही काहीही म्हणा हो, पण शेवटी पायगुण नावाची काही गोष्ट असतेच. नवीन सून घरात आल्यानंतर काही घरांना ती लाभते; काही घरांना ती लाभत नाही. आता बघा, हे अमकं अमकं घर. त्यांच्या घरी लग्न होऊन नवीन सून आली. सहा महिन्यांच्या आत काय काय होऊ नये! तिच्या नवऱ्याची होणारी बढती थांबली; तिचा दीर नापास झाला; तिच्या नणंदेचं लग्न मोडलं; तिच्या सासऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली; तिच्या सासूला ब्लडप्रेशरचा त्रास सुरू झाला. आता नवीन सून घरात आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जर असं घडत असेल, तर तिला ‘पांढऱ्या पायाची’ नाही म्हणायचं, तर काय म्हणायचं!’’ मी त्यांना म्हणलो, “मला सांगा, नवऱ्याची नोकरीतली बढती नेमकी कशामुळे थांबली?’’ ते म्हणाले, “तसं काही नाही. बॅकलॉक डावलून त्याला बढती देणार होते, पण ऐन वेळी कुणीतरी बॅकलॉकचा मुद्दा काढला आणि त्याच्यामुळे त्याला बढती मिळाली नाही’’. मी म्हणालो, “बारावीला तिचा दीर नापास झाला, हे बरोबर आहे, पण दहावीला कितव्या वेळेला पास झाला होता?’’ ते म्हणाले, “दहावीला त्याला तीन अटेम्प्ट द्यायला लागले होते’’. आता दहावीला जो तीन अटेम्प्टला पास झाला, तो बारावीला पहिल्या अटेम्प्टला कसा काय पास होईल? मी म्हणालो, “नणंदेचं जे ठरत आलेलं लग्न मोडलं, ते का मोडलं?’’ ते म्हणाले, “ही काय पद्धत आहे का! ऐन लग्नाच्या वेळेला मुलाकडच्यांनी दहा तोळे सोनं मागितलं’’. मी म्हणालो, “म्हणजे लग्न कशावरनं मोडलं? सुनेच्या पायगुणानं मोडलं नाही; देण्याघेण्याच्या प्रकारावरनं मोडलं. आणि तिच्या सासऱ्यांना शिक्षा का झाली?’’ ते म्हणाले, “नाही, ते तसे पैसे खाणाऱ्यातलेच होते, त्यांच्यावर खटलाही चालू होता, पण त्या खटल्याचा निकाल लागायला आणि लग्न होऊन अवघे दोन महिने व्हायला एकच वेळ आली आणि तो निकाल त्यांच्या विरोधात लागला. तसा तो लागणारच होता; आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं’’. आता लक्षात घ्या, ज्या बाईच्या मुलाचं प्रमोशन थांबलंय, ज्या बाईचा एक मुलगा बारावीला नापास झालाय, जिच्या मुलीचं ठरत आलेलं लग्न मोडलंय, जिच्या नवऱ्याला तुरुंगात जावं लागलंय, त्या बाईला म्हणजे या मुलीच्या सासूला ब्लड प्रेशर होईल नाहीतर काय होईल!

म्हणजे यांपैकी ते गृहस्थ सांगत असलेल्या प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव आहे, परंतु तो तपासण्याची संधी मात्र या परंपरेनं स्त्रीला दिलेली नाहीये. याचं कारण, तिच्यावर एक जीवनव्यापी गौणत्व लादण्यात आलेलं आहे. म्हणजे स्त्रियांना मुळात शिक्षणाची संधी अगदी अलीकडे मिळाली. स्त्रियांच्या शिक्षणाचा या देशामधला इतिहास काही १५० वर्षांपेक्षा जास्त नाही आणि खरं बोलायचं तर तो स्वातंत्र्यानंतरच थोड्याअधिक प्रभावीपणे सुरू झाला. स्त्रियांचे म्हणून जे खास विषय आहेत, उदा. होम सायन्स हा शास्त्राचा विषय आहे आणि शिक्षणाचा अभ्यासक्रम आहे, हे विद्यापीठामध्ये अलीकडे, म्हणजे अवघ्या ५० वर्षांपूर्वी आलं. ज्या वेळेला स्त्रीला शिक्षणाची संधी मिळाली, मुली मोठ्या प्रमाणात शिकायला लागल्या. त्या वेळेला मग स्वाभाविकपणे त्या शिक्षणानं तिच्यामध्ये ‘चिकित्सा करण्याची प्रवृत्ती रुजण्या’ऐवजी ‘कुशल रोजगाराची संधी’ असं त्या शिक्षणाकडे बघण्यात आलं. त्यामुळे त्या सबंध शिक्षणामध्ये ती बाई जरी बी.एस्सी.बी.एड. झाली, तरी ‘आपण व्रत का करतो आणि त्या व्रताचा अर्थ काय असतो?’, याचा चिकित्सकपणे, डोळसपणे विचार करण्याची गरज तिला राहत नाही.

हरितालिकेचं व्रत तितकंसं अयोग्य नाही

एके ठिकाणी बोलत असताना मी असं म्हणालो की, “तसा माझा व्रतवैकल्यांना विरोधच आहे, पण हरितालिकेचं व्रत जर मुलींनी केलं, तर मला ते तितकंसं अयोग्य वाटत नाही’’. मग अर्थातच लोकांना आश्‍चर्य वाटलं. मी म्हणालो, “हरितालिकेच्या व्रताची कथा कुणाला माहिती आहे सांगा?’’ पुन्हा तीच गोष्ट की, चांगला नवरा मिळण्यासाठी आपल्या लग्नाच्या मुलीला सगळ्या बायका हरितालिकेचं व्रत करायला लावतात. पण व्रत काय आहे?

व्रत असं आहे की, प्रजापिता ब्रह्माची मुलगी पार्वती उपवर झाली. तिला लग्न करायचं होतं शंकराशी. तो होता कैलासावर. लग्न करायला तो अजिबात तयार नव्हता. त्यामुळे तिनं स्वत:ला जाळून घेतलं आणि जीव दिला. पुन्हा दुसर्‍या जन्मी ती प्रजापिता ब्रह्माच्या पोटीच जन्माला आली. पुन्हा उपवर झाली. ती अतिशय सुंदर होती. एकदा त्रिखंडात संचार करणारा नारद ब्रह्माकडे आला, त्या वेळी ब्रह्मानं नारदाला विचारलं, “नारदा, माझी मुलगी अतिशय सुंदर आहे; उपवर आहे. तिला एक चांगला नवरा सुचव’’. नारदानं सुचवलं, “तुझ्या मुलीला त्रिखंडामध्ये एकच नवरा आहे आणि तो म्हणजे, शेषशायी विष्णू भगवान’’. त्याप्रमाणे ब्रह्मानं पार्वतीचं लग्न शेषशायी विष्णू भगवानाशी करायचं ठरवलं. हे लग्न ठरवलेलं पार्वतीला ज्या वेळी कळलं, त्या वेळी पार्वती स्वत:च्या मैत्रिणीला घेऊन घरातून निघून गेली. जंगलामध्ये नदीच्या काठी गेली. तिने वाळूचं शिवलिंग केलं. शिवाची आराधना सुरू केली. मग जो शंकर कैलासावर होता, त्याला करंट गेला की, ‘आता काही खरं नाही!’ शंकर आला. शंकर आणि पार्वती यांचं मीलन झालं. हरितालिका - हरित म्हणजे वन आणि आलि म्हणजे सखी. सखीला घेऊन वनात जाऊन केलेलं व्रत, ते हरितालिका व्रत.

आता हे सगळं चांगला नवरा मिळण्यासाठी लग्नापूर्वी करावं, असं जर या उपवर मुलींना घरी सांगितलं जात असेल, तर हे व्रत असं सांगतं की, मुलीला ज्याच्याशी लग्न करावंसं वाटेल, त्याच्याशी लग्न करायला जर घरच्यांनी विरोध केला, तर स्वत:च्या मैत्रिणीला घेऊन त्यांनी घरातून निघून जावं आणि ज्याच्याशी त्यांना लग्न करावंसं वाटतंय, त्याच्याशीच लग्न करावं. असं नुसतं म्हटलं, तरी शास्त्र महाविद्यालयातल्या मुलीदेखील अवाक होऊन किंवा हसून पाहत राहतात. याचं कारण, शिक्षणाचं जे मुख्य प्रयोजन आहे, तुमच्या जाणिवा प्रगल्भ, उन्नत आणि चिकित्सक झाल्या पाहिजेत, त्याची संधी स्त्री वर्गाला फार कमी मिळालेली आहे. म्हणजे, आपल्याला माहिती आहे की, आजही कितीही सुशिक्षित असलेली स्त्री मासिक पाळीमध्ये देवाची पूजा करण्यासाठी स्वत:ला योग्य समजत नाही.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. नरेंद्र दाभोळकर लिखित पुस्तके विकत घेण्यासाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/yxjo42wx

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मासिक पाळीमध्ये ती स्वत:ला अपवित्र का मानते?

आता खरं म्हटलं तर जसे डोळ्यातले अश्रू, जशी तोंडामधली लाळ, तसाच स्त्रीच्या गर्भाशयामधून येणारा रक्ताचा स्राव. हा रक्ताचा स्रावच स्त्रीला मातृत्वाच्या मांगल्याकडे नेणारी बाब आहे. जर एका विशिष्ट कालावधीमध्ये गर्भधारणा झाली, तर त्या गर्भाचं पालनपोषण करण्यासाठी गर्भाशयाची आतली त्वचा तयार होते. मात्र जर त्या विशिष्ट कालावधीमध्ये गर्भधारणा झाली नाही, तर निसर्गक्रमानं ती त्वचा बाहेर टाकली जाते. याला ‘मासिक पाळी’ म्हणतात. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काहीही अपवित्र नाही.

विनोबांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की, ‘माणसाची शरीरं ही मलमूत्राची गटारं आहेत. आपण रोज मलमूत्र विसर्जन करतो’. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की, ‘ज्याच्या शरीरात ही गटारं अहोरात्र वाहतात, तो पुजारी मात्र अंघोळ करतो आणि असं मानतो की, ‘आता मी देवाची पूजा करायला पवित्र झालो आहे. मग जी बाई स्वत: मुलांना जन्म देते, ते मातृत्वाचं मांगल्य तिला ज्या निसर्गक्रमानं प्राप्त होतं, त्या मासिक पाळीमध्ये ती स्वत:ला अपवित्र का मानते?’ असं एकदा माझं सगळं प्रतिपादन ऐकल्यानंतर तीन बायकांनी ठरवलं की, ‘आपण मासिक पाळीमध्ये देवळामध्ये जायचं’. तिघी जणींनी हिंमत बांधली. त्या जायला निघाल्या; परंतु एकीचा निर्धार देवळात पोचेपर्यंत गळून पडला आणि त्याच्यामुळे ती परत फिरली. दुसर्‍या दोघी जणी गाभार्‍यापर्यंत पोचल्या, पण त्यांच्यातल्या एकीला गाभार्‍यात गेल्यानंतर भीती वाटायला लागली; चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं आणि तीही परत वळली. तिसरीनं गाभार्‍यात जाऊन देवाचं दर्शन घेतलं. त्याची पूजा करायचं ठरवलं. पूजा केलीही, पण तिला असं वाटलं की, ‘नेहमी देवाची मूर्ती ज्या प्रेमळ नजरेनं तिच्याकडे पाहायची, त्याऐवजी अत्यंत क्रोधित नजरेनं ती मूर्ती तिच्याकडे पाहत होती’. म्हणजे, आजदेखील या विषयावर बोललं, तर जणू काही संस्कृतीवर आघात झाला, धर्म भ्रष्ट केला या पद्धतीनं विचार केला जातो आणि त्याला समर्थन मात्र दिलं जातं की, ‘श्रद्धेनं मन:स्वास्थ्य लाभतं; बुद्धीनं उदध्वस्त व्हायला होतं’.

म्हणजे खरं पाहता, जे मन:स्वास्थ्य लाभतं, ते एक गुंगी आणलेलं मन:स्वास्थ्य आहे का, याचा विचार करायला पाहिजे. खरं म्हटलं तर गुलामीची जाणीव करून दिल्यानंतर गुलामाची, म्हणजे समस्त स्त्री वर्गाची या गुलामीतून मुक्तता करायची असेल, तर केवळ धर्मानं लाभलेलं गौणत्व, केवळ तिची शारीरिकता, तिची मानसिकता, रूढी-परंपरा एवढ्याच गोष्टींमधून तिची मुक्तता करणं पुरेसं नाही, असं आम्हाला वाटतं. तर ज्याचा मगाशी मी जीवनव्यापी गौणत्व म्हणून उल्लेख केला, त्या समाजातल्या सर्व ठिकाणी बाई आज गौणच आहे.

राजकारणामध्ये तिला ५० टक्के जागा द्याव्यात, याची नुसतीच चर्चा चालू आहे आणि आजही विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये महिलांची संख्या ५० टक्के असताना खासदार आणि आमदार महिला पाच टक्केदेखील नाहीत. अर्थकारणाच्या दृष्टीनं विचार केला, तर लग्न करून बाई सासर्‍याच्या घरी गेली की, ना त्या घरावर तिचं नाव लागतं, ना त्या शेतावर तिचं नाव लागतं. आजही भरभरून वाहणार्‍या ज्या जाहिराती आहेत, त्यांमध्ये बाईचा ‘देहच’ ‘वापरला’ जातो. आजही ‘भ्रूणहत्येमुळे घसरणारी लोकसंख्या’ हा देशापुढचा एक अत्यंत गंभीर प्रश्‍न बनलेला आहे. आणि धार्मिकतेचा विचार करता, विधवा असलेली बाई आजही अपवित्रच मानली जाते. हे सगळं एका व्यापक सामाजिक परिवर्तनाकडे अंगुलीनिर्देश करतं.

या सगळ्यामध्ये बदल होण्याची गरज निश्‍चितपणे आहे; पण त्यासाठी पहिल्यांदा ‘स्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ हा विषय नीटपणे समजून घेण्याची गरज आहे. त्यातही अधिक अवघड गोष्ट अशी की, ज्या स्त्रीला या अंधश्रद्धेमधून बाहेर काढायचंय, ती असुरक्षित आहे. तिला बहुधा कायमची आर्थिक विवंचना आहे. तिला एका बाजूला सासरची मानसिकता जोपासावी लागते. वडीलधार्‍यांचा आदर करावा लागतो. कौटुंबिक प्रेम आणि जिव्हाळा कायम ठेवण्याचं कामही तिलाच करावं लागतं; आणि ही सगळी तारेवरची कसरत करत असताना पुन्हा तिला स्वत:च्या विवेकाचंही स्वत्व जपावं लागतं. त्यामुळे स्वाभाविकपणे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तयार होणारी भगिनी ही एक अधिक अवघड लढाई लढत असते. म्हणून निश्‍चितपणे तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्राधान्याचा आणि सहानुभूतीचा आणि शक्य असेल, ती सर्व मदत या कामामध्ये तिला देण्याचा विषय आहे, असं आम्ही मानतो. याच अंगानं आम्ही या प्रश्‍नाकडे पाहतोही आणि कृतीही करतो.

शब्दांकन : भाग्यश्री भागवत

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. नरेंद्र दाभोळकर लिखित पुस्तके विकत घेण्यासाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/yxjo42wx

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

RAJESH MOHITE

Mon , 11 March 2019

उत्तम लेख


Nivedita Deo

Sun , 10 March 2019

स्त्रियांना स्वतःला अंर्तमुख करायला लावणारा अतिशय उत्तम विचार


Gamma Pailvan

Sun , 10 March 2019

दाभोलकरांना हिंदू धर्मातली नेमकी वैगुण्यच कशी दिसतात? हिंदू धर्मात यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता: असंही म्हंटलंय. ते बरं दिसंत नाही? शिवाय, सावित्रीच्या व्रताने कुणाचं कसलं घोडं मारलं जात नाही. असो. सतीच्या नावाखाली बाई जाळणं हा गुन्हा आहे. १९८९ साली राजस्थानातल्या देवराला गावात रूपकुंवरचा खून झाला होता. तिचा सतीशी कसलाही संबंध नाही. सती ही प्रथा म्हणून कधीच नव्हती. सती जाणं हा स्त्रीचा वैयक्तिक निर्णय असे. खुद्द जिजाबाई सती न जाता शिवरायांच्या कार्यास हातभार लावत्या झाल्या होत्या. स्वत: फ्रॉड करायचा आणि हिंदू धर्माच्या नावाने बोंबलायचं अशी दाभोलकरांची रीत होती. धर्मादाय आयुक्तांकडे साधना व परिवर्तन या दाभोलकरांच्या दोन न्यासांच्या चौकश्या पेंडिंग आहेत. असो. दाभोलकर म्हणतात की बाईने स्वत:साठी न मागता पुरुषासाठी वर मागणं हे आधुनिक काळाशी विसंगत आहे. पण हे असं ठरवणारे दाभोलकर कोण? बाईला जर इतरांच्या सुखात आपलं सुख शोधायचं असेल तर दाभोलकरांना खटकायचं कारणंच काय मुळातून? त्यांना नको तिकडे नाकं खुपसायची खोड होती, असंच म्हणावं लागतं. कोण जाणे, फ्रॉड करतांना अशीच नको त्या प्रकरणी नको तिकडे नको तशी दखल घेतल्यानेही त्यांची हत्या झालेली असू शकते. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......