आता माघार घेण्यात अर्थ नाही, सैन्य थेट कराचीत घुसवलं पाह्यजे, शास्त्री ग्रेट माणूस आहे.
ग्रंथनामा - झलक
भालचंद्र नेमाडे
  • ‘जरीला’ या कादंबरीचे मुखपृष्ठ आणि ६५च्या भारत-पाक युद्धाचे एक छायाचित्र
  • Mon , 04 March 2019
  • ग्रंथनामा झलक भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade जरीला Jarila ६५चे भारत-पाक युद्ध Indo-Pakistani War of 1965

प्रसिद्ध कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांची ‘जरीला’ ही कादंबरी १९७७ साली प्रकाशित झाली. ही एकाच वेळी समाजाच्या व तरुण पिढीच्या विस्कळीत झालेल्या जीवनाची कादंबरी आहे, असे म्हटले जाते. या कादंबरीत नेमाडे यांनी अतिशय सामान्य प्रसंग, घटना, निरीक्षणे मांडली आहेत. पण त्यांच्या पोटातील जीवनदर्शनाची अमाप शक्ती प्रकट करून त्यांना अर्थपूर्णता आणि आशयघनता दिली आहे. १९६५ सालच्या भारत-पाक युद्धाबाबतचा या कादंबरीतील पुढील संपादित मजकूर त्यापैकीच. २६ फेब्रुवारीच्या पहाटे भारताची काही विमानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसली आणि बॉम्बफेक करून परतली. त्याचं कवित्व सध्या देशभर सुरू आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या गोष्टी पुन्हा मध्यमवर्गाच्या चर्चेच्या झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘जरीला’मधील हा मजकूर मनोरंजक ठरावा.

.............................................................................................................................................

अचानक पाकिस्तानी फौजा पंजाबमधे घुसल्याच्याही बातम्या वर्तमानपत्रात आल्या. रेडिओत दर तासाला युद्धाच्या खास बातम्या यायला लागल्या. सगळीकडे घबराहट उडाली. गावातले रिटायर्ड सैनिक आर्मीचे अधिकारीही बोलावण्यात आले. प्राध्यापकांना बंदूक कशी चालवावी हे शिकवायला होमगार्ड येणार होते. सगळ्यांनी नावं दिली. वर्गात मुलंही युद्धाच्या बातम्या विचारून तावातावानं बोलायचे. त्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणं आणि नंतर काहीतरी इंग्रजी कविता शिकवत रहाणं विनोदी वाटायला लागलं. वर्तमानपत्रांतही मुसलमानांसंबंधी वाईट मजकूर नेमानं छापून यायला लागला. पाकिस्तान मिटा देव – असा घोषणा करत एक प्रचंड मोर्चा दुपारी गावातून निघाला. त्याला सगळे विद्यार्थी गेले म्हणून कॉलेज ओस पडले. त्या मोर्च्यात कॉलेजातल्या मुलीही मुठी वळवून ओरडतांना दिसल्या. आपणही पुरुषांबरोबर काहीतरी करू शकतो ही जाणीव त्यातल्या त्यात ज्यास्त होती. विद्यार्थ्यांनी मुसलमानांच्या वस्तीत अयूबखानाची बाहुली करून हिरव्या चांदताऱ्याच्या झेंड्यासकट जाळली. मुसलमानांच्या तर तोंडचं पाणी पळालंच पण खिडक्यांतून बाहेर पहाणारे हिंदूही भेदरले. गावात जिथेतिथे मुसलमानांचा विषय चर्चेला होता.

चांगदेवकडे रेडिओ असल्यानं आता रोज दुपारपासून रात्रीपर्यंत तिथे प्राध्यापक मित्र जमायला लागले. बी.बी.सी. किंवा पाकिस्तान रेडिओ लावून तिकडच्या बातम्या ऐकण्यात सगळ्यांना ज्यास्त उत्साह होता, कारण नेमकं काय चाललं आहे ह्या बाबतीत ऑल इंडिया रेडिओवर विश्वास बसेना. नकाशात पाहून पाहून नामजोशी आणि माळी कुठे काय चाललं असावं याचा अंदाज घेऊन पुन्हा बातम्या ऐकून चर्चा करायचे. एवढा मोठा देश असून किरकोळ पाकिस्ताननं अमेरिकन युद्धसामग्रीच्या जोरावर आपल्यावर ही पाळी आणावी याचा चर्चेत ऊहापोह व्हायचा. गावातून कोणी कोणी अफवा आणायचे : पाण्याच्या टाकीजवळ एक पाकिस्तानी हेर सापडला, पोलिसांना त्याच्याजवळ विषाच्या पुड्या सापडल्या, रेल्वेच्या पुलाखाली कोणीतरी बॉम्ब पुरताना सापडला. दैनिक क्रांतिकारकमध्ये एक पत्रही प्रसिद्ध झालं की आपल्या गावातून अमुक वाजता एक ट्रान्समिटर चालू होतो, पोलिसांनी नोंद घ्यावी. शहरात पाकिस्तानी हेरांची टोळी आलेली असावी वगैरे.

ह्या गडबडीत नखवी आणि शेख कॉलेजमध्ये फारसे दिसत नव्हते. सही करून एखादा तास घेऊन ते निघून जायचे. शेख तर अलीकडे कित्येक दिवस चांगदेवच्या घराकडे फिरकला नव्हता. म्हणून चांगदेवच एकदा दुपारी त्याच्या घरी गेला. तो झोपलेला होता.

क्यों शेखभू, आजकल बाहर नही निकलते क्या?

शेख म्हणाला, हाँ परसो थोडा टेन्शन था हमारेपर. मालकका छोकरा बोल रहा था कि गलीमे कुछ लोगाँ मेरे खिलाफ कुठ बाते कर रहे थे. किसीने बंडल मार दिया कि मै चुपचाप रेडिओ पाकिस्तान सुनता रहता हूँ. रातमे यहाँ खिडकीके नीचे एक दो बच्चे बैठे रहते चुपचाप मै पाकिस्तान लगाता क्या देखनेके लिये.

चांगदेव म्हणाला, कमाल आहे! आम्हीसुद्धा पाकिस्तान लावून बातम्या ऐकत असतो! रोज! लढाईची क्युरिऑसिटी असते उगीच. त्यात काय विशेष आहे?

लेकिन मैने सचमुच कभी पाकिस्तान नही लगाया. दिलेमे भी कभी आया तो मै घबराके नही लगाता. खाली बंबईसे खबरे सुन लेता. मुझे बहुत बुरा लगा. परसो घरमे हम सब डरके बैठे रहे रातभर. सिस्टर बहुतही डर गयी थी. बोली, अपने अपने मुहल्लेमे रहते तो ये मुसीबत नही आती. लेकिन मै बोला, होने दो जो होनेवाला है वो. मर जायेंगे कोई आया मारनेको तो. और क्या? जला डालेंगे घर तो जल जायेंगे अंदर!

चांगदेव म्हणाला, नही यार ऐसा नही होता. सब लोग ऐसे पागल थोडेही है. आते जाना तुम मेरे कमरेपर, अच्छा रहता मिले दोस्त तो.

शेख म्हणाला, आजकल तो ऐसा हुआ है कि घरके बाहर जानेको दिल नही चाहता. जैसे पराये देशमे आये हुए है. कोई भी बच्चा कुछ चिल्लाता है तो अच्छा नही लगता. टेन्शन आ जाता. उधर मारवाडी गल्लीमे तो मुझे देखतेही छोकरे पाकिस्तान जिंदाबाद चिल्लाते!

चांगदेव म्हणाला, ये मादरचोद पाकिस्तान रेडिओ गलत प्रोपगंडा करता रहता. और हमारे लोग इतने बुद्दू है की उसपर भरोसा कर लेते. वही तो पाकिस्तानका परपज है. चलो जरा घूमके आयेंगे.

 

ते दोघे बाहेर पडले. गावाबाहेर ए.टी. स्टेशन ओलांडतांना रस्त्यातल्या गर्दीकडे संशयानं पाहत शेख म्हणाला, मुझे आजकल गावमे कुछ नये नये चेहरे दिखाई दे रहे है वॉर टाइममे. क्यों?

चांगदेव म्हणाला, नेहमीच नवे लोक भेटत असतात. हे वर्तमानपत्रवाले साले काहीतरी उठवून देतात की गावात पाकिस्तानी हेर सुटले आहेत. काजीपुऱ्यात काल रात्री पाकिस्तान जिंदाबाद म्हणत काही पोरं सायकलवरनं गेली अशी आज बातमी दिलीय! हेरांच्या तर रोजच! मोठमोठी शहरं सोडून ह्या चिल्लर गावात हेर पाठवायला पाकिस्तानला माणसं तरी मिळतील का? नामजोशीसुद्धा काल म्हणत होता की निश्चित गावातून ट्रान्समिटरचे सिग्नल्स पाठवले जातात! दोनतीन मुसलमानांच्या घरात झडत्याही घेतल्या वाटतं. किती विचित्र वाटलं असेल त्या सज्जन मुसलमानांना? निघालं तर काहीच नाही. तरी कोणी अफवा उठवली एकाकडे ट्रान्समिटर मिळाला म्हणून.

शेख म्हणाला, सालं हे वातावरणच घाण झालं आहे. अशा वातावरणात जो पहावा तो चेहरा संशयितच दिसणार.

सुतलानच्या फलाटीत आज कोणीही बसलेलं नव्हतं. सुतारकामही बंदच होतं. गॅरेजला कुलूप होतं. हेही चांगदेवला फार विचित्र वाटलं. आणखी थोडं पुढे जाऊन ते समोरच्या पेट्रोलपंपाजवळच्या सिंध्याच्या टपरीत चहा पीत बसले.

जरा वेळानं पंपावरून मळकट काळे कपडे घातलेला नेहमीचा सलीम नावाचा माणूस आत आला. सुलतानच्या फलाटीत गॅरेजमध्ये हा सलीम नेहमी येऊन बसायचा. त्यानं त्या दोघांना सलाम केला. चांगदेव म्हणाला, क्यों सलीमभू, सुलतानभौ दिखाई नही दिये? कोई नही है फलाटमे. किधर गये सब लोक?

सलीम म्हणाला, आजकल गडबडके वजहसे आ नही रहे वो. रातमे कर्प्यूभी रहता.

नंतर खुशीत सिंधी मालकाला तो म्हणाला, मालिक, चाय मत देव. चाय बहुत हुई आज. सोडा लाव भौ. एकदम स्ट्राँग. ऐसा सोडा लाव की दिल जल जावे. हाँ.

सिंधी बसल्या बसल्या दोन बोटांनी लांब पिंक मारून म्हणाला, क्यो बे पाकिस्ताणी? आज सोडा चाहिये क्या? उधर गांड मार दी तुम लोगोंकी! लाहोरमे घुसं रहे है हमारे लोंग, लाहेर इस्टेशण कल रात मै लगा थोडी देर. तबसे बिलकूल बंद! देखो, इधर लाहोर लगता तुम्हारा. मेडियमपर. हमेशा बकवास चलती थी उर्दूमे. अब बिलकूल गायब. है कोई तुम्हारा लाहौर अब? अँ?

सलीम खोटं हसत उगाच त्या सिंधी मालकाची मर्जी सांभाळत पडतं घेत होता. पाकिस्तान हमारा कायकू? वो तुम सिंधी लोगोंकाच है- असं म्हणत होता. पण सिंधी मात्र रानटी केसाळ भुवया ताणून ताणून ज्यास्त ज्यास्त क्रूर बोलत होता. सलीम विनोदानं म्हणाला, सच बोले तो तुम सिंधी लोग असलमे पाकिस्तानी है! हिंदुस्थानी हम है! ये हमारा वतन है.

सिंधी वर्मावर घाव बसल्यामुळे सूड म्हणून चवताळून म्हणाला, तुम्हारा वतणं? अबे जावे. दिखावेंगे एक दिण तुम लोगको तुम्हारा वतण. इधर तुम लोग इतनीभी गडबड किये नं, तो तबा कर देंगे भांचोद सबके सबको हाँ! ओर सिंध तो हमारा हैच. देखो अब लाहोरके बाद कराची लेंगे! फिर देखना बेटे हमरा वतण! भेणचोदं.

मग बातम्या लागल्या. चांगदेव त्या सिंध्याला काही म्हणणार तेवढ्यात शेख उठून घड्याळ पहात चला म्हणाला.

जातांनासुद्धा सारखा घड्याळाकडे पहात शेख आठ वाजता कर्फ्यू सुरू होतो – असं म्हणत होता. तुमभी सीधे घर चले जाना असं चांगदेवलाही सुचवत होता. पण चांगदेव त्याला त्याच्या घरी सोडून थोडा वेळ बसून मग आरामात नऊपर्यंत खोलीवर परत आला. आज सगळे मित्र वरती माळीकडे त्याचीच वाट पहात बसले होते. नंतर सगळे खाली आले. नऊच्या बातम्यांत लाहोर काबीज केल्याचं ऐकून आपण अत्यंत शूर लोक आहोत अशा थाटात ते सगळे जेवायला निघाले. नामजोशींनी तर खालच्या मजल्यावरच्या नुकतंच लग्न झालेल्या आणि लग्न होऊन बरीच वर्षं झालेल्या अशा दोन्ही कुटुंबांना उठवून लाहोर सर केल्याचं सांगून टाकलं! तेही आनंदानं म्हणाले, आम्हीही ऐकलं!

दामलेही त्यांची वाट पाहत ताटं वाढून बसले होतेच. नामजोशींनी दामल्यांना पटवून दिलं की आता माघार घेण्यात अर्थ नाही, सैन्य थेट कराचीत घुसवलं पाह्यजे, शास्त्री ग्रेट माणूस आहे. शिवाय शास्त्रीनं इंग्लंडच्या धमकीला भीक घालू नये. आणि सरळ पाकिस्तान नेस्तनाबूतच करणं कसं आवश्यक आहे वगैरे राजनीतीही माळी आणि भाव्यांबरोबर चालली. महायुद्ध जरी सुरू झालं तरी आता पाकिस्तान नकाशातून पुसून टाकल्याशिवाय राहू नये असं त्या सगळ्यांचं ठरलं.

नामजोशी म्हणाला, इकडे हिंदुस्थानात आम्ही दहा कोटी मुसलमानांना पोसतो तेव्हा वेगळ्या मुस्लिम पाकिस्तानची गरजच काय? बोला.

फेगडेही म्हणाला, की ह्या उपखंडाची भौगोलिक परिस्थितीच अशी आहे की इथे दोन सत्ता कधीच समबळ राहू शकणार नाहीत. हिंदुस्थाननं नेपाळ, भूतान, सिक्कीम, पूर्व बंगाल, पाकिस्तान आणि खाली सिलोन हे सगळं जिंकून सार्वभौम शक्ती प्रस्थापित केली पाहिजे.

माळी म्हणाला, म्हणजे अफगाणिस्तान आणि ब्रह्मदेश तेवढे कशाला ठेवता? तिबेटही राह्यलाच! घ्या सगळंच त्याच्या आयला.

चांगदेव म्हणाला, इथे काझीपुऱ्यातले मुसलमान सांभाळता येत नाहीत तुम्हाला? कुठं एवढं कट्टर पाकिस्तान सांभाळणार साल्यांनो तुम्ही! त्याला फार मोठे रोमन लोकांसारखे लोक लागतात. लोहिया बरोबर म्हणतात की आपण मुसलमानांना प्रेमानं वागवलं पाह्यजे आधी, तेव्हा पाकिस्तानातले मुसलमान आपण होऊन म्हणतील की भारतात विलीन होतो.

नामजोशी तलवारीसारखा हात उभा नाचवत म्हणाला, तुमच्या हातात शस्त्र असलं की सगळे शरण येतात. तेच आपण कधी करत नाही. परवा आयूबखानाची बाहुली जाळली, चांदतारा जाळला तेव्हा झाली अडवायची हिंमत एका तरी मुसलमानाची? एरवी नुसती टुरटुर करत असतात साले. माँकी च्यूत अशी प्रत्येक वाक्याची सुरुवात करतात यांची एवढी एवढी पोरंसुद्धा. मुसलमानांत अशी म्हण आहे की बच्चा कमजोर हो लेकीन मुजोर जरूर हो. आपण असं शिकवतो कधी पोरांना? तसं शिकवलं पाह्यजे आता. सुरे बाळगले पाह्यजेत जवळ. ओम् भद्रम पुरे झालं!

चांगदेव म्हणाला, पण नामजोशा, तू साल्या साधं आमलेटसुद्धा खात नाहीस अजून. तू काय मुसलमानांना भोसकणार?

मग सगळे हसले.

 

दुसऱ्याच दिवशी युद्ध संपल्याच्या घोषणा झाल्या. शास्त्रींचे फोटोही आधीच बाजारात आले होते. नंतर शास्त्री ताश्कंदलाही गेले आणि वारल्याचीही बातमी आली. शास्त्रींनी काय विशेष केलं असं विचारलं तर कोणालाही सांगता येईना. नंतर गावात सगळेजण घासतेलासाठी टीप घेऊन हिंडायला लागले. काळ्या बाजारानंसुद्धा घासतेल मिळेना तेव्हा सगळेजण पुन्हा सरकारला शिव्या द्यायला लागले. मध्ये गहूच मिळेना म्हणून दामल्यांनी मक्याच्या भाकरी दोन-चार दिवस पुरवल्या. त्यामुळे नामजोशींना सर्वांआधी सपाटून हगवण लागली आणि ते पुन्हा रजेवर गेले! त्याचे तास पुन्हा सगळ्यांना वाटून घ्यावे लागले. एकदा त्याची तब्येत कशी काय आहे हे पहायला सगळेजण गेले तेव्हा तो अंथरुणावर पडल्यापडल्या म्हणाला, थकवा फार आहे. काहीच पचत नाही. दामलेकडे भातसुद्धा नसतो. घरी काही करावं तर घासतेलसुद्धा नाही. वगैरे.

चांगदेव म्हणाला, पण तुझे पोर्शन कोण आटपणार रे? फुकट ढोंग करून पडलाहेस की काय?

नामजोशी हसून म्हणाला, साल्या उठून बसवतसुद्धा नाही इतकी गांड दुखते आहे. असं वाटतं आहे की कोणी मारलीच हू हू हू हू.

माळी म्हणाला, अखंड हिंदुस्थान केला केला असता तर याच्यापेक्षा मारली गेली असती. बरं झालं लाहोरवरच आटपलं. आता अमेरिकेनं पुन्हा गहू सुरू केला आहे. लवकर बरा हो त्या पोळ्या खायला! तांदूळही येतोय ब्रह्मदेशातून. हिंदुस्थान अमर रहे!

.............................................................................................................................................

नेमाडे यांच्या ‘जरीला’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/3284/Jarila-

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 04 March 2019

भालचंद्र नेमाडे, युद्धामुळे टंचाई उत्पन्न होते हे अगदी खरंय. आणि त्याची झळ सामान्य माणसाला जास्त जाणवते हेही तितकंच खरंय. म्हणूनंच मोदींनी ४ वर्षं कळ काढली आणि पाचव्या वर्षात युद्धाचा पवित्रा घेतला. भारत मोठा देश असल्याने युद्धामुळे टंचाई भासू नये. पण अर्थात आर्थिक नियोजन हवंच. ते मोदींनी बरोब्बर साधलंय. आपला नम्र, -गामा पैलवान जाताजाता : इ.स. १६६६ साली आगऱ्याहून सुटून आल्यावर शिवाजीमहाराजांनी लगेच औरंग्याशी भांडण मांडलं नाही. अफझल्याच्या वेळेपासून म्हणजे १६५९ पासनं सततच्या मोहिमांमुळे साताठ सालं स्वराज्यातल्या जनतेची हालत लई बेक्कार झाली होती. म्हणून जरा उसंत मिळून जनता ताजीतवानी होण्यासाठी महाराजांनी १६७० पर्यंत काहीच हालचाल केली नाही. नंतर डायरेक्ट सुरतच मारली. बघा ४ वर्षांचा कालखंड अगदी जुळतो नाही?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

रॉय किणीकर आध्यात्मिक होते की नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे ते गेले होते की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण त्यांना अध्यात्म बुद्धीच्या पातळीवर तरी चांगलेच उमगले होते, ह्यात शंका नाही!

किणीकर चार ओळी लिहितात आणि आपल्याला केवढा प्रवास घडतो! कला आणि निसर्ग हा संवेदनशील लोकांचा विसावा असतो. हे रुबाई लिहिणारे लोक मूळचे आध्यात्मिक. किणीकर आध्यात्मिक होते ह्या विषयी कुणाच्या मनात काही शंका असायचे कारण नाही. आता पर्यंत ते अनेक रुबायांमध्ये दिसलेलेच आहे. पुढेही ते दिसत राहीलच. स्वतः उमर खय्याम सूफी होता. पण ह्या लोकांना अध्यात्माच्या अलीकडे जे आहे ते जगून घ्यायचे आहे.......

जागतिकीकरणाच्या परिणामांच्या परिप्रेक्ष्यात १९९०नंतरचा महाराष्ट्र, जनजीवन आणि जनआंदोलने, हे या पुस्तकाचे मध्यवर्ती सूत्र आहे...

नव्वदच्या दशकात जागतिकीकरण आणि आर्थिक नवउदारमतवादी धोरणे राबवण्याच्या प्रक्रियेतून जगभर प्रचंड बदल झाले. महाराष्ट्रातल्या बदलांचा मागोवा या घेतला असून तो वाचकांना एक व्यापक दृष्टी देऊ शकतो. यात महाराष्ट्रातले विविध प्रश्न समजून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी वैचारिक भूमिका स्पष्ट करणारे महत्त्वाचे लेख आहेत. सर्व प्रत्यक्ष चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनात वैचारिक स्पष्टता दिसते.......