‘अशी ही आशिकी’ : मराठी सिनेसृष्टीत ऊर्जा निर्माण करणारा नवीन प्रयोग
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘अशी ही आशिकी’ची पोस्टर्स
  • Sat , 02 March 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie अशी ही आशिकी Ashi Hi Aashiqui अभिनय बेर्डे Abhinay Berde हेमल इंगळे Hemal Ingle सचिन पिळगावकर Sachin Pilgaonkar

मराठी सिनेमांमध्ये ‘लव स्टोरी’ची एक विशिष्ट पद्धत ठरलेली असते. मात्र बदलत्या काळाची पावलं ओळखून त्यात काही नवीन प्रयोग केले जात आहेत. मराठी सिनेमा काहीतरी नवीन मांडू पाहत आहे. त्याचाच एक प्रयोग सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ या सिनेमाद्वारे पाहायला मिळतो.

अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे या तरुण जोडीला घेऊन तयार केलेला हा सिनेमा शेवटपर्यंत खिळून ठेवतो. अभिनय बेर्डेचा ‘ती सध्या काय करते?’ या सिनेमानंतर पुन्हा एकदा चांगला अभिनय पाहायला मिळतो. त्याने खोडकर, जबाबदार ‘स्वयंम’ची भूमिका चांगली रंगवली आहे. हेमल इंगळे हा नवा चेहरा आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर भुरळ घालतो. तिच्या भूमिकेला साजेशी ‘अम्रजा’ची भूमिका तिने साकारली आहे. सिनेमातल्या किरकोळ तांत्रिक चुकांकडे दुर्लक्ष करायला तिचा अभिनय भाग पाडतो. त्याचबरोबर या सिनेमात सुनिल बर्वे, निर्मिती सावंत, संदीप पाठक यांच्या भूमिकादेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

संगीत, संवाद, कॅमेरा, अभिनय याबाबतीत सिनेमा चांगला प्रभाव पाडतो. कथा पूर्वार्धात लयबद्ध चालते, मात्र उत्तरार्धात थोडी डगमगते. मात्र कलाकारांचा चांगला ‘अभिनय’ कथेला सावरतो. त्यामुळे सिनेमा कंटाळवाणा होत नाही. अधूनमधून येणारे विनोदी संवाद प्रसन्नता निर्माण करतात. संगीत नवीन पिढीच्या काळजाचा ठाव घेणारं आहे. गाणीही कथानकाला पुढे घेऊन जातात. प्रवीण दवणे यांनी शब्दबद्ध केलेली आणि सोनू निगम, प्रियंका बर्वे, जानव्ही अरोरा यांनी ही गाणी गायली आहेत.

काही गोष्टी सिनेमात अत्यंत प्रभावीपणे मांडल्या असून बदलत्या काळानुसार नातेसंबंधाची परिभाषा बदलत आहे. त्याची सुरुवात शहरी भागात होताना दिसते. पालक आणि पाल्य यांच्यातलं नातं, आदर, जिव्हाळा, प्रेमाबरोबर ‘मैत्री’च्या टप्प्यावर आलं आहे. त्यामुळे कुटुंब या संकल्पनेला नवचेतना नक्कीच प्राप्त झाली आहे. नात्यातला संवाद घट्ट असेल तर नाती बहरत जातात, त्यासाठी ‘संवाद’ हीच पूर्वअट असते. यासाठी दोन पिढीतलं अंतर कमी होतं जाणं गरजेचं असतं. हे ठासून सांगण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न नक्कीच वाखण्याजोगा आहे.   

प्रेमाची व्याख्या व्यक्तीसापेक्ष असते. मुळात प्रेम ही एक भावना आहे. त्यामुळे साचेबद्ध चौकटीत प्रेमाची व्याख्या करता येत नाही. एखाद्याला प्रेम म्हणजे स्वर्ग वाटतं, तर एखाद्याला प्रेम म्हणजे स्वार्थ, परावलंबन, निर्रथक भावना वाटते, तर एखाद्याला प्रेम म्हणजे निव्वळ ‘टाइमपास’ वाटतो. म्हणून अमूक अमूक कृती म्हणजे प्रेम असं ठामपणे सांगता येत नाही. मात्र असं असलं तरी मानवी मनाचा एक कप्पा प्रेमाचा चांगला-वाईट अनुभव घेण्यासाठी आतूर असतो. प्रत्येकाला ते कितपत अनुभवता येतं, हा पुन्हा व्यक्ती सापेक्षतेचा प्रश्न आहेच.

अनेकदा दोन व्यक्तीच्या मनामध्ये एकमेकांबद्दल प्रेमाची भावना असते. मात्र प्रेमाची जाणीव नसल्यामुळे एकमेकांपासून थोडं अंतर राखलं जातं. एका टप्प्यानंतर प्रेमाची जाणीव झाली की, माणसं त्यात मुक्तपणे वाहत जातात. इथं सुरुवात आणि शेवट नसतो. सगळं काही नकळत घडत जातं, ठरवावं लागत नाही. आणि मग एक प्रेमाचं नवीन जग तयार होतं. ज्यामध्ये कुठली चालढकल करण्याची गरज नाही. अशा प्रेमळ जगात एकमेकांकडून अपेक्षा नसतानादेखील त्या पूर्ण होण्याची वेगळीच मजा असते. प्रेमात माणसं जोडण्याची आणि त्रास सहन करण्याची ताकद असते. ‘अशी ही आशिकी’ या सिनेमाची ‘लव स्टोरी’ याच वर्तुळाभोवती फिरत राहते.

प्रेमयुगलांनी एकत्र येऊन बघितलेली गोड स्वप्नं पूर्ण होणार की नाही, असा प्रश्न अपघाताने घडलेल्या घटनांमुळे त्यांच्या आयुष्यात निर्माण होतो. अशा वेळी ठाम भूमिका घेण्याची गरज असते. कदाचित ही भूमिका भावनेची कड ओढणारी असेलही, मात्र समस्यांना तोंड देत वर्तमानात एकत्र येण्याची इच्छा असेल तर भावनादेखील प्रभावी ठरतात. त्यातून भविष्यातील आव्हानं पेलण्याची नवीन ऊर्जा मिळते. वर्तुळ पूर्णत्वास पोहचताना मागे काय राहतं, याचा विचार करायचा नसतो. ‘अशी ही आशिकी’ या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी हेच मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. थोडक्यात हा सिनेमा नवीन काहीतरी मांडू पाहतो. मात्र त्याच्यावर असलेला ‘बॉलिवुड’चा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.

तब्बल आठ वर्षानंतर सचिन पिळगावकर दिग्दर्शनाकडे वळाले आहेत. संवादलेखन आणि पटकथालेखनही त्यांनीच केलं आहे. हा सिनेमा एकाच पातळीवर दोन वेगवेगळे प्रयोग करू पाहतो. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीत ‘अशी ही आशिकी’चा नवीन प्रयोग ऊर्जा निर्माण करणारा ठरू शकतो.

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......