स्वये श्रीकृष्ण लढतात, हंस-डिंभक जलसमाधी घेतात!
कला-संस्कृती - कृष्णकथांजली
श्रीकृष्ण तनया
  • श्रीकृष्णाचं एक चित्र
  • Sat , 23 February 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti कृष्णकथांजली कृष्ण Krishna हंस डिंभक

भारतीय पुराणांतील मिथककथांची ओळख करून देणारं हे साप्ताहिक सदर. ‘Myth’ या मूळ इंग्रजी शब्दावरून मराठीत ‘मिथ’, ‘मिथक’ हे शब्द रूढ झाले. या मिथकालाच ‘प्राक्कथा’ किंवा ‘पुराणकथा’ असंही म्हटलं जातं. एक ज्येष्ठ समीक्षक मिथककथांना ‘व्याजविज्ञान’ म्हणतात. म्हणजे कार्यकारणभावरिहत, केवळ कल्पनेतून निर्माण झालेलं. मात्र या कथा अदभुत, अविश्वसनीय, सुरस आणि चमत्कारिक असतात. रंजकता हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य असतं. आणि तेच या सदराचंही प्रयोजन आहे.

.............................................................................................................................................

प्राचीन काळी शाल्वनगरीत ब्रह्मदत्त नामक राजा राज्य करत होता. ‘राजा’ या सर्वनामाला ब्रह्मदत्त अतिशय पात्र होता. अत्यंत शूर, क्षमाशील, कृपाळू, धार्मिक व शत्रुचा कर्दनकाळ असणारा राजा प्रजेचा जीव की प्राण होता. राज्यात सुखसमृद्धी नांदत असल्यानं प्रजा समाधानी होती. राजकर्तव्य व यज्ञकर्म करणाऱ्या त्या राजाला दोन रूपगुणसंपन्न राण्या होत्या. सर्व सुखं हात जोडून उभी असताना राजा-राणींना अंतर्यामी एकच दुःख सलत होतं. त्यांची संसारवेल फुलांविना सुकत चालली होती. निपुत्रिकाला स्वर्गात प्रवेश नाही व भूलोकीही सुख नाही.

ब्रह्मदत्ताला मित्रसह नामक ब्राह्मण मित्र होता. त्यालाही मूलबाळ नसल्यानं दोघंही समदुःखी होते. राजानं पु­त्रप्राप्तीसाठी दहा वर्षं शिवव्रत केलं, तर मित्रसहानं विष्णुव्रत केलं. राजानं व मित्रसहानं या काळात खूप दानधर्म व यात्राही केल्या. राजाला शंकरानं स्वप्नांत दर्शन देऊन वर मागण्यास सांगितलं असता त्यानं दोन पुत्र मागितले. विष्णूनं मित्रसहालाही त्याच्या इच्छेप्रमाणे एक पुत्र होईल असा वर दिला.

कालांतरानं वरप्रसाद फळाला येण्याची चिन्हं दिसू लागली. राजराण्या व मित्राची पत्नी, तिघीजणींना अपत्यजन्माची चाहूल लागली आणि नऊ मास नऊ दिवसांनी तिघींनी एक एक पुत्राला जन्म दिला. त्यांचा जात कर्मादी संस्कार करून राजपुत्रांची नावं हंस व डिंभक अशी ठेवली. विष्णूनं पुत्र दिला म्हणून मित्रानं जनार्दन असं नाव ठेवलं. दोन राजपुत्रांच्या सहवासांत जनार्दनही लहानाचा मोठा होऊ लागला. तिघांनीही धनुर्वेद व अस्त्रशस्त्र विद्या व शास्त्र संपादन केलं. राजानंही शिक्षण देण्यात दुजाभाव न ठेवता जनार्दनाला सहकार्य केलं. तिघेजण जिवश्च कंठश्च मित्र बनले.

बालपण व कुमारवय सरून तिघांनीही तारुण्यात पदार्पण केलं. ऐश्वर्य, सत्ता व सुखसमृद्धी यांत रममाण होण्याऐवजी हंस व डिंभक ईश्वराची आराधना, जपजाप्य, दानधर्म करण्यात आनंद मानू लागले. राजाराणींना आपल्या पुत्रांची वृत्ती व आचरण पाहून समाधान झालं. काही काळानंतर दोघांनी कैलासावर शिवोपासना करण्याचा मनोदय पित्याजवळ प्रगट केला. भरजरी वस्त्रालंकार त्यागून वल्कलं-अक्षमाला धारण करून मातापित्याचा आशीर्वाद घेऊन दोघे बंधू हिमालयात गेले. मन एकाग्र करून व शरीराला कष्ट देऊन दोघं तप करू लागले. फळं, पानं, जल व वायू भक्षण करून मनोविकारावर त्यांनी विजय मिळवला. अशी पाच वर्षं झाल्यावर शंकर प्रसन्न झाले व वर मागण्यास सांगितलं. हंसानं समस्त चराचर सृष्टीकडून अभय मागितलं व डिंभकानं ब्रह्म, रौद्र, अग्नी आदी सर्व दिव्य अस्त्रं, संरक्षक कवच, परशु, धनुर्बाण, खङ्ग ही शस्त्रं मागितली. शिवाय अंगरक्षक म्हणून दोन भूतांची मागणी केली. दोघांना ‘तथास्तु’ म्हणून शंकर गुप्त झाला. भृंगी व रटी ही दोन भूतंही त्यांच्या दिमतीस दिली.

त्यानंतर कृतकृत्य होऊन दोघांनी देवदत्त कवच व सर्व शस्त्रं धारण केली. दिव्यास्त्रं ग्रहण केली. आता ते जवळजवळ अजिंक्यच झाले होते. नाही म्हटलं तरी त्यांना त्याचा गर्वही झाला. देवानं सर्व दिलं तरी शंकराची नित्य पूजा करण्याचा परिपाठ त्यांनी सोडला नाही. वरप्रसाद मिळाल्यावर त्यांनी मातापित्याची व मित्रसह ब्राह्मणाचीही भेट घेतली.

मित्रसहाचा पुत्रही ज्ञानसंपन्न, सदाचरणी असा मोठा देखणा युवक झाला होता. तो नित्य विष्णूची पूजा करी व मातापित्याच्या आज्ञेत राही. त्यानंतरही तिघांची मैत्री कायम राहिली व योग्य समयी त्यांचा विवाह होऊन ते गृहस्थाश्रमांत प्रवेश करते झाले. सुदैवानं त्यांना सुलक्षणी व सुंदर भार्या मिळाल्या.

नऊ नवलाईचे दिवस सरल्यावर एकदा तिघं मित्र मृगयेच्या निमित्तानं निबिड अरण्यात गेले. वाघ-सिंह, हत्ती, वराह, लांडगे, आदी क्रूर पशुसह त्यांनी हरणं, नीलगाई व ससे यांचीही शिकार केली. बरोबर भरपूर सेवक वर्ग असल्यानं त्यांनी भराभर मारलेल्या पशुंची वर्गवारी करून काही कातडी शोभेसाठी व रुचकर मांसाचे पशु खाण्यासाठी ठेवले. दिवसभर शिकारीमागे पळून पळून सर्व थकले. सैन्याला विश्रांती व भोजनासाठी मोकळीक दिली. तिघं एका सरोवरात स्नान करून भोजन करून वृक्षांच्या सावलीत इथं-तिथं पहुडले. मांसाहाराचा खुमासदार दरवळ साऱ्या वनांत कितीतरी वेळ रेंगाळत होता. त्या सरोवराचं नाव पुष्कर असून त्यांत उमललेल्या विविध कमळांनी ते नाव सार्थ केलं होतं.

थोडा वेळ विश्रांतीसाठी व्यतीत झाल्यावर ब्रह्मस्तोत्राच्या ऋचा व श्लोक कानांवर पडले. त्या अरण्यांत वास करणारे ऋषीमुनी सतत कोणते ना कोणते तरी धर्मकृत्य करत असत. त्याचाच हा आवाज होता. श्लोक ऐकून तिघांचा शिणवटा दूर झाला. स्तवनाच्या अनुरोधानं तिघेजण सेवकांना तिथंच सोडून एका मोठ्या मंगलमय व सदाहरीत आश्रमांत येऊन पोहोचले. तो आश्रम महर्षी कश्यपांचा होता. मुनींनी स्वतः तिघा अभ्यागतांचं स्वागत केलं. हंस त्यांना ओळख करून देताना म्हणाला, ‘‘मुनीश्रेष्ठ, आमचा पिता ब्रह्मदत्त लौकरच राजसूय करणार आहे. त्यावेळी आपण आपल्या शिष्यांसह शाल्वनगरीत येऊन आपल्या दर्शनाचा लाभ आम्हाला द्या. आम्हा दोघा बंधूंना शिवाचा व या मित्राला विष्णूचा आशीर्वाद मिळाला आहे. आम्हावर धनश्री व यशश्री प्रसन्न आहे.’’ कश्यपांसह सर्वांनी हंसाची व डिंभकाची विनंती मान्य केली.

तिथला पाहुणचार स्वीकारून ते त्याच अरण्यातील दुसऱ्या आश्रमांत आले. हा आश्रम पुष्कराच्या उत्तर तीरावर होता. निसर्गाचं सदाहरीत लेणं प्यायलेल्या आश्रमात पशुपक्षी वैरभाव विसरून वर्तन करताना पाहून तिघेजण नवल करू लागले. त्या आश्रमातील मुनी निःसंग होऊन ब्रह्मपदाचा अर्थ जाणण्यास उत्सुक होते. अव्यक्ती अनादी अनंत ईश्वरचिंतन हेच त्यांचं अंतिम ध्येय होतं. तो आश्रम दुर्वासमुनींचा आहे, याची तिघांनाही कल्पना नव्हती. दुर्वासांना त्यांनी ओळखलं सुद्धा नाही. काषाय वस्त्रं व भस्मरुद्राक्ष धारण करणारा एक वृद्ध तपस्वी यज्ञकुंडाभोवती असलेल्या हवनाच्या वस्तूंची मांडणी करत होता. तेच दुर्वास होते. त्यांना पाहून दोघा बंधूंना त्यांच्या वैराग्याविषयी शंका निर्माण झाली. ते हुकमी आवाजात गर्वानं म्हणाले, ‘‘हे अज्ञानी ब्राह्मणा, ही दरिद्री वस्त्रं लेऊन विरागीवृत्तीचा आभास निर्माण करण्यामागे तुझा काय हेतू आहे? स्वतः तपःसाधनेचं ढोंग करून या सर्वांनाही तू साधनेच्या कष्टप्रद गर्तेत ढकलत आहेस. तेव्हा तुही गृहस्थ हो व यांनाही तशी परवानगी दे. ध्यान, तप, वैराग्य सर्व मिथ्या आहे. समजलं?’’

दोघांचं बोलणं जनार्दनाला आवडलं नाही. ते असं काही बोलतील याची त्याला कल्पनाही नव्हती. दुर्वास हा क्रोधाचा ज्वालामुखी आहे हे ठाऊक असल्यानं त्यांची टिंगलटवाळी करणाऱ्या दोघांना त्यानं समज दिली. तो किंचित रागानं म्हणाला, ‘‘हंसा, या वेदशास्त्रसंपन्न दुर्वासांना बोल लाऊन तुम्ही पापाचे धनी होऊ नका. राखेखालच्या अग्नीला चेतवून नाशाला दुर्वास मुनी पवित्र व शुद्ध असून ईश्वरांत विलीन होऊ इच्छित आहेत. पूर्वी जे चार आश्रम निर्मिले त्यांत संन्यासाश्रम प्रमुख आहे. फक्त बुद्धिमानच त्याचा आश्रय घेतात. तुमचा मात्र अंतःकाळ समीप आला आहे असं मला वाटतं. देवाने दिलेल्या वरदानामुळे हे धाडस करत असाल तर वेळीच सावध व्हा. मित्र म्हणून मी हे सांगतो आहे.’’

दुर्वासांची क्रोधाची पातळी वरवर चढत होती. काही अघटित घडण्यापूर्वी त्यांनी इथून निघून जावं असा इशारा त्यांनी केला. स्वतःही तिथून निघून जाण्यास प्रवृत्त झाला. पण डिंभक व हंस अमूलाग्र बदलले होते. त्यांच्या मानेवर सत्तेचं भूत स्वार झालं होतं. शिवाय सोबत दोन ईश्वरदत्त भूतं होतीच. हंसानं मागचा-पुढचा विचार न करता बिकट हास्य करत दुर्वासांची कौपिन ओढून फाडली. जनार्दननं त्याला प्रतिकार केला, पण डिंभकानं त्याला धरून ठेवून हंसाला जास्तच प्रोत्साहित केलं. मुनींचा जटाभार व रुद्राक्षमाला यांनाही त्यानं हात घातला. मनावर संयम ठेवून दुर्वास त्यांना म्हणाले, ‘‘मी तुमचे भस्म करू शकतो, परंतु त्यामुळे माझं तप व्यर्थ जाईल याचं भय वाटतं. तो जगन्नाथच तुम्हाला शासन करील. जनार्दना, तुझ्या मित्रांना जायला सांग. तुला मात्र श्रीकृष्ण आज दर्शन देईल कारण तू वृत्तीनं साधु आहेस.’’

दुर्वासांचं वचन ऐकून दोघांना अधिकच चेव आला. त्यांनी तिथं असलेली भिक्षापात्र, कमंडलू व आसनं तोडून फोडून टाकली. गोशाळेत जाऊन गुरांची दावी तोडली. जितकं नुकसान करता येईल तितकं केलं. एवढंच नव्हे तर यज्ञकुंडांत प्राण्याचं मांस भाजून खाल्लं. जे कर्म तिथं निषिद्ध मानलं गेलं होतं. विजयोन्मादानं हसत, मुनीगणांना चिडवत, त्यांच्या पत्नी व कन्यांची खिल्ली उडवत दोघं बंधू शाल्वनगरीत परतले. जनार्दनाचं मन विषण्ण झालं. यापुढे त्यांच्याशी मैत्री ठेवायची नाही असा निश्चय करून तोही स्वगृही परतला. त्यानं हा क्लेशकारक वृत्तांत आपल्या परिवाराला सांगितला.

तिघं आश्रमातून निघून गेल्यावर दुर्वास मुनी द्वारकेला निघाले. बरोबर फाटकी वस्त्रं, फुटकी भांडी घेऊन सुमारे चार-पाच हजारांचा जथा द्वारकेची वाट चालू लागला.

त्या वेळी श्रीकृष्ण आपल्या समवयस्क मित्र व बंधूंसह हास्यविनोद व अक्षक्रीडा (सारीपाट) खेळत होता. खेळ अगदी रंगात आला होता, तेवढ्यात प्रवेशद्वारी प्रचंड कोलाहल चाललेला ऐकून कृष्णानं खेळ थांबवला. तो फासे टाकून उठणार इतक्यात द्वाररक्षकांच्या मनाईला झुगारून दुर्वासांनी सभेत प्रवेश केला. दुर्वासांची अशी हीनदीन अवस्था पाहून अक्रूर, उग्रसेन व उद्धव चकित झाले. कारण सर्वांनाच त्याच्या दरारा व कोप याविषयी माहिती होती. श्रीकृष्णासह अवघे उपस्थित दुर्वासांच्या चरणी लीन झाले. साक्षात् विश्वनियंता जगन्नाथ आपल्याला प्रणाम करत असल्याचं पाहून ते अंमळ शांत झाले. श्रीकृष्णानं सर्वांना आसनं दिली. समोर गोरस, फळं, कंदमुळे ठेवली. काही मुनींचा असा समज झाला की, कृष्णाला दिव्यदृष्टी असल्यामुळे त्याला हंसाचं अश्लाघ्य वर्तन ठाऊक असावं. पण तो मुद्दाम खवचटपणे आपलं स्वागत करत आहे. आडून आडून तो आपली मानहानी करत आहे. दुर्वासांनाही असंच वाटलं.

कृष्णाच्या मानभावीपणाचं वैषम्य वाटून ते म्हणाले, ‘‘श्रीकृष्णा, शंकरकृपेनं उन्मत्त झालेल्या शाल्वनरेश कुमारांचं गैरवर्तन मी तुला सांगावे अशी का तुझी अपेक्षा आहे? त्या उन्मत्तांनी आम्हा तपस्वीजनांचं जे वैभव उधळून टाकलं त्याचे हे अवशेष आणलेत ते पाहा. आमचा मान ठेवला नाही त्याचं दुःख नाही, पण अवमान केला त्याचा सल दुःखप्रद आहे, हे सर्व तुझ्यापासून थोडंच लपून राहिलं असेल? तू क्षत्रिय आम्हा ब्राह्मणांचा रक्षणकर्ता असताना त्या क्षुद्र चिलटांनी असं धारिष्ट्य करावं? आम्ही कुणाला शरण जावं? वर प्रसादामुळे भीष्म, जरासंध, बाल्हिकही त्यांचं निर्दालन करू शकणार नाहीत. केवळ तूच हे करण्यास समर्थ आहेस. तरी आम्हाला न्याय दे.’’

दुर्वासांच्या वचनावरून शाल्वनरेशाच्या दोन पुत्रांनी दुर्वासादी मुनींचा छळ केल्याचं कृष्णाला कळल्यावर दोघांनाही देहांत शासन देईन असं सांगून त्यांना शांत केलं. श्रीकृष्णाची प्रेमळ भावमुद्रा, मधुर वचन पाहून व ऐकून मुनी सद्गदित होऊन म्हणाले, ‘‘कृष्णा, तुझं कल्याण असो. तुला असाध्य असं काहीच नाही. मी काही रागानं बोललो त्याबद्दल क्षमा कर. तू क्षमाशील साधू आहेस.’’

नंतर कृष्णानं सर्वांच्या स्नानसंध्येची व भोजन विश्रांतीची नीट व्यवस्था केली. त्यांना कमंडलू, पात्रं, वस्त्रं, खडावा, आसनं जे जे हवं ते ते सर्व देऊन संतुष्ट केलं. काही दिवस पाहुणचार घेऊन दुर्वासाव्यतिरिक्त सर्व आपापल्या आश्रमांत गेले. दुर्वास नारदासह द्वारकेत राहून परब्रह्माचं चिंतन करू लागले.

इकडे दुर्वासांच्या आश्रमांत मोडतोड करून संतुष्ट झालेले दोघे बंधू आपल्या पित्याजवळ फुशारकी मारू लागले. राजसूय करा असा त्यांनी राजामागे लकडा लावला. यज्ञाच्या निमित्तानं सर्व जगाला आपलं वैभव व सत्ता बघायला मिळेल आणि आमच्या शौर्य कर्तृत्वाची त्यांना प्रचीती येईल. राजानं त्यांना होकार दिला. जनार्दन मात्र दोघांच्या कर्तृत्वावर व वक्तव्यावर नाराज होता. जंगलातल्या प्रसंगापासून त्यानं त्यांच्याशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवला होता. त्यानं राजसूय करू इच्छिणाऱ्या दोघांना सावध केलं. कारण दुर्वास कृष्णाला भेटल्याचं त्याला कळलं होतं. पण कावीळ झालेल्याला सर्व पिवळं दिसतं आणि आजाऱ्याला अन्न कडू लागतं तसं झालं. आमच्या पुढे तो मग्रूर जरासंध व वृद्ध भीष्म काय टिकाव धरणार? सात्यकी, अक्रुर तर किस झाडकी पत्ती, असं ते गर्वानं बोलू लागले. कृष्णालाच स्वतःचा बचाव करायला सांग असं ते जनार्दनला उपहासानं म्हणून ‘‘तोसुद्धा जनार्दन व तूसुद्धा जनार्दन | दोघांचंही करू या मर्दन |’ असं टाळ्या वाजवत म्हणू लागले. जनार्दन ‘गाढवापुढे वाचली गीता |’ असं म्हणून तिथून निघून आला.

मित्रांचं अधःपतन पाहून इथं राहण्यांत अर्थ नाही असा विचार करून जनार्दन अश्वारूढ होऊन द्वारकेला निघाला. नावाचा जनार्दन विश्वनियंत्या जनार्दनाला भेटायला निघाला. मनात श्रीकृष्णाचं रूप, गुण, दातृत्व आणि कर्तृत्व आठवत तो नगरीच्या सुवर्णवेशीवर कधी येऊन उभा ठाकला ते त्याचं त्याला कळलंही नाही. द्वारपालांच्या संमत्तीनं त्यानं एका सेवकाला आपल्या येण्याची वर्दी देण्यास पाठवलं. काही वेळातच तो राजसभा सुधर्मा या वास्तुजवळ आला. त्या सभेपासून थोड्या दूर अंतरावर ऐश्वर्यसंपन्न लावण्यानं निथळणारे आठ प्रासाद पाहून ते कृष्णाच्या अष्ट नायिकांचे असावेत असा त्यानं तर्क केला. तो खराच होता. जनार्दननं राजसभेत प्रवेश केला. ही सभा इंद्रसभेसारखीच मनोहर होती. त्यावेळेस मान्यवर लोक सभेत बसले होते.

बलराम, उद्धव, सात्यकी, उग्रसेन, वसुदेव व इतर यादववीरांच्या समुदायामध्ये उच्च सुवर्णरत्नजडीत आसनावर विराजमान झालेला तो कृष्णमेघवर्णिय यदुनंदन पाहून जनार्दन मनोमन सुखावला. त्याचं अवघे शरीर रोमांचांनी पुलकित झालं. कृष्णाच्या चरणकमलावर मस्तक ठेवून त्यानं प्रणाम केला. इतर वृद्ध व तरुण व्यक्तींनाही त्यानं वंदन केलं व आपला परिचय करून दिला. सात्यकीनं निर्देश केलेल्या आसनावर तो विनयानं स्थानापन्न झाला. त्याला हंसाचा संदेश आठवला, ‘‘ए जनार्दन, त्या कृष्णाला म्हणावं, मुकाट्याने कर दे. कर देण्याचे टाळलंस तर आम्हा बंधूंशी गाठ आहे.’’ असा तो संदेश होता. जनार्दन म्हणाला, ‘‘प्रभो यदुराया, शाल्व नगरीचा राजा ब्रह्मदत्त राजसूय करणार आहे. तेव्हा तू त्याला मीठ आणि उचित कर द्यावास. हंस-डिंभकांनी मला हा संदेश तुला देण्याची आज्ञा केली आहे. हे कृष्णा, मला त्यांची कृत्यं आवडत नाहीत, पण केवळ तुझ्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मी येण्याचं धाडस केलं.’’ कृष्णानं जनार्दनला अभय दिलं.

जे राजे सामना करण्यास असमर्थ असतात त्यानं कर व मीठ या पराभवाचं द्योतक म्हणून द्यायचा असा संकेत आहे. क्षुद्रांनी प्रत्यक्ष देवाला आव्हान द्यावं याचं कृष्णाला नवल तर वाटलंच, पण त्यांची किवही आली. कृष्णानं सभेत दोन शाल्वकुमारांचा संदेश ऐकवला, तेव्हा सर्वांचीच छान करमणूक झाली. कृष्ण जनार्दनाला म्हणाला, ‘‘तुझे हे मित्र विद्वान असले तरी मूर्ख आहेत. त्यांना एवढंच सांग की कृष्ण कर द्यायला तयार आहे, पण तुम्हाला तो पेलता येणं शक्य नाही. शस्त्रास्त्रांच्या  वारांच्या रूपांत तुम्हाला कर स्वीकारावा लागेल. त्यांना वर देणाऱ्या रुद्रालाही मी जिंकेन. तुम्हाला कर हवा, तो घेण्यासाठी प्रयाग, पुष्कर वा मथुरा इथं तुम्हाला जातीनं यावं लागेल. युद्धच होईल.’’

श्रीकृष्णाच्या सभेत त्याला ऐश्वर्यापेक्षाही हृदयाच्या श्रीमंतीचा साक्षात्कार झाला. तिथून जावंसं वाटेना. पण नाईलाजानं कृष्णप्रभृतींचा पाहुणचार घेऊन तृप्त मनानं तो निघाला, तेव्हा स्वतः सात्यकीनं त्याला शाल्वनगरीपर्यंत सोबत केली. जनार्दनसह सात्यकीनं हंस-डिंभकाच्या सभेत गेला. परिचय व ख्यालीखुशाली करून झाल्यावर हंस आपली थोरवी आढ्यतेनं गाऊ लागला. कटु वचनांची ओंजळ कृष्णचरणी वाहिली. सात्यकीलाही थोडी फुलं मिळाली. सात्यकीला आता गप्प राहवेना. त्यानं शांतपणे कृष्णाचा संदेश सांगितला. तेव्हा ‘‘तसंच होईल. एकदा तरी तुमच्या राजाला धडा शिकवावाच लागेल.’’ असं म्हणून त्यांनी सात्यकींची बोळवण केली. आपल्या क्रोधावर अंकुश ठेवून सात्यकीनं जनार्दनला अलिंगन देऊन प्रेमानं त्याचा निरोप घेतला. पाहुणचार करणं दूरच, पण अतिथी वा दूताचा अवमान केला त्याचं दुःख दोघा बंधूंना झालं नाही. सात्यकी निघून गेला तरी कृष्णाच्या संदेशाची नक्कल वारंवार करून त्यांनी सभाजनांची करमणूक केली.

कृष्णाला सर्व वृत्तांत सांगितल्यावर यादवांनी युद्धाची तयारी केली. सर्वोनुमते पुष्करतीर्थाची युद्धभूमी म्हणून निवड झाली. तसा संदेश शाल्वनगरीत गेला व शुभमुहूर्तावर श्रीकृष्ण ससैन्य निघाला. हंसादी वीरांना मुहूर्त वगैरेची जरुरी भासली नाही. साक्षात् शिवानं दिलेलं शस्त्रं, अस्त्रं व कवच धारण करून कृष्णाच्या अगोदरच पुष्करला हजर झाले. सोबत भूतं होतीच. अदृश्यपणे दोघा बंधूंनी आपल्या भालप्रदेशावर त्रिपुंड रेखून रुद्राक्षमाला धारण केल्या. विचक्र नामक बलाढ्य दानव त्यांना ससैन्य मिळाला होता. जरासंधानं त्याला नकार कळवला होता. कारण श्रीकृष्णाची शक्ती तो ओळखून होता. इतरांनी मात्र वाहत्या गंगेत हात धुवायचे; नव्हे सचैल स्नान करायचं ठरवलं होतं. पुष्कर तीर्थ जे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होतं, तिथं धारातिर्थी पडण्यासाठी सर्वजण एकत्र जमले.

आपल्या चारी हातात शंख, चक्र, गदा व पद्म धारण करून चंदनादी सुवासिक उटी सर्वांगाला लावून अष्टनायिकांनी सर्वार्थानं पूजिलेला तो पितांबरधारी श्रीकृष्ण रत्नालंकाराचं तेजस्वी आभूषण धारण केल्यामुळे नवग्रहांत शोभणाऱ्या सूर्याप्रमाणे दिसत होता. दुसरा मातलीच अशा दारुकानं शस्त्रसज्ज केलेल्या व ज्याला सूर्यचंद्रादी व स्वस्तिक, नागादी शुभचिन्हांनी सुशोभीत केलं आहे, अशा चार अश्व जोडलेल्या रथांतून पुष्कराकडे चाललेला श्रीकृष्ण नेत्रांना व मनाला आनंद देणाऱ्या अमृतमय चंद्राप्रमाणे भासत होता.

युद्ध सुरू होण्यापूर्वी ढोल-ताशे-नगारे, शिंग व दुंदुभी इत्यादी रणवाद्यांचा गगनभेदी गजर झाला. दोघा बंधूंनी आपापले शंख फुंकल्यावर श्रीकृष्णानं आपला दिव्य शंख पंचजन्य फुंकून प्रत्युत्तर दिलं. युद्धाला तोंड फुटलं. जो तो कृष्णाशीच युद्ध करण्याच्या इर्ष्येनं त्याच्याच दिशेनं सरकू लागला. बाण, भाले, गदा तोमर, परिघ याची तीव्र खणाखणी सुरू झाली. हत्तींचे चित्कार, अश्वांचं खिंकाळणं व घायाळ वीरांचे आर्त स्वर यांनी पुष्करचा परिसर दुमदुमुन गेला. रक्ताचे ओघळ वाहून सरोवर दूषित झाले. दिव्य अस्त्रामुळे आकाश झाकोळून गेलं. हंस-डिंभकाची भूतं शत्रुसैन्याला पछाडू लागली. कृष्णाभोवती तेजस्वी अग्नीवलय असल्यानं त्याच्यापर्यंत ती भूतं पोहोचू शकत नव्हती. मुख्य मोहरे मारण्याऐवजी किरकोळ व मेलेली प्यादी खाण्यांतच दोघं शौर्य दाखवत होते. एकूण तीस कोटी सैनिक व पशु कामी आले. वृद्ध उग्रसेन व वासुदेव यांनीही पराक्रमाची शर्थ केली. युद्धाचा उर्वरित भाग गोवर्धन पर्वतासाठी मुक्रर झाला.

यमुनाकाठी चाललेल्या युद्धामुळे नदीचं पाणी गडद काळं झालं, कारण यमुना मुळात काळी. त्यात रक्ताचा लाल रंग मिसळला गेला. पाण्यात रक्तलांच्छित कलेवरं धडाधड कोसळून प्रवाहाबरोबर वाहत होती. कृष्णानं टाकलेली दिव्य अस्त्रंही निष्प्रभ ठरत होती. अखेर ते प्रभावी अस्त्र कृष्णाजवळ होतं. ते त्यानं हुकमी एक्क्याप्रमाणे वापरलं. त्यानं वैष्णव नामक अस्त्राची बाणावर योजना करून हंसाच्या व डिंभकाच्या दिशेनं सोडलं. ते अंगावर येऊन आदळण्यापूर्वीच ‘शूर’ हंसानं भयानं यमुनेच्या अथांग डोहात उडी मारली. कृष्णानंही त्याच्या पाठोपाठ उडी मारून एका लत्ताप्रहारांत त्याला पाणी पाजलं. हंस जो नाहीसा झाला तो झालाच. तो किंवा त्याचं शवही वर आलं नाही. जणू यमुनेनं गिळला किंवा नागांनी भक्ष्य बनवला.

हंस नाहीसा झालेला पाहून डिंभक वेडापिसा झाला. त्यानं संपूर्ण डोह ढवळून काढला, पण हंसाचा पत्ता लागला नाही. डिंभकाला हंसाचा विरह सहन झाला नाही. श्रीकृष्णाला शिव्याशाप देत देत डिंभकानं डोहातच उडी मारली.

पुनः वर न येण्यासाठी.

ती दोन भूतं शंकराकडे परतली.

पराभवाचा झेंडा घेऊन.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......