‘डोंबिवली रिटर्न’ : ‘रहस्यमय’ नव्हे गोंधळ निर्माण करणारा सिनेमा
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘डोंबिवली रिटर्न’ची पोस्टर्स
  • Sat , 23 February 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie डोंबिवली रिटर्न Dombivli Return संदीप कुलकर्णी Sandeep Kulkarni राजेश्वरी सचदेव Rajeshwari Sachdev

मध्यमवर्गातील माणसाचं दैनंदिन आयुष्य चढ-उतारानं भरलेलं असतं. कधी त्याच्या आयुष्यात गगनात मावणार नाही इतका आनंद असतो, तर कधी आयुष्य संपून टाकावं इतकं दुःख. या परिस्थितीला टक्कर देत जगण्याची आव्हानं स्वीकारणारी माणसं आजुबाजूला असतात. व्यक्तिगत आयुष्यातील अडचणीला तोंड देत असतानाच, मध्येच सार्वजनिक आयुष्याला कलाटणी देणारी एखादी घटना घडते. त्यात सगळं नकळत आरपार बदलून गेल्याची जाणीव होते. मग तिथून पुढे सुरू होतो, तो बिघडलेल्या गोष्टीची सावरासावर करण्याचा प्रवास. या प्रवासात हाती काय लागतं, हे नीट उलगडत नाही, मात्र त्यातून स्वतःत डोकावून बघताना एक समाधान लाभतं ते समाधान शोधण्यासाठी स्थित्यंतराच्या भ्रामक कल्पनादेखील पुरेशा ठरू शकतात. ‘डोंबिवली रिटर्न’ या सिनेमाचा हा गाभा आहे.

२००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘डोंबिवली फास्ट’ या सिनेमाचा हा ‘सिक्वेल’ नाही. ‘डोंबिवली रिटर्न’ ही डोंबिवलीत राहणाऱ्या अनंत वेलणकर (संदीप कुलकर्णी) या शहरी मध्यमवर्गीय आयुष्य जगणाऱ्या माणसाची कथा आहे. वेलणकर हे नोकरीनिमित्त कुटुंबाला घेऊन मुंबईला आलेले असतात. त्यांची पत्नी उज्ज्वला वेलणकर (राजेश्वरी सचदेव), भाऊ श्रीधर वेलणकर (अमोल पराशर) आणि छोटी मुलगी अंतरा. असं छोटं आणि सुखी कुटुंब. अनंत वेलणकर मंत्रालयात जनसंपर्क अधिकारी या पदावर असतात. नागपूरवरून नोकरीसाठी मुंबईला आलेलं हे कुटुंब डोंबिवलीत स्थिर झालेलं. सकाळी झोपेतून उठून सगळं आवरून ऑफिसला जाण्यासाठी ९:२०ची लोकल ट्रेन पकडायची आणि रात्री परत लोकलचा प्रवास करत घरी यायचं. हेच काय ते अनंत वेलणकरांचं आयुष्य.

अनंतचा लहान भाऊ श्रीधर बँकेत असतो, त्याची बायको गृहिणी. अनंत हा सर्वसाधारण मध्यमवर्गातला गृहस्थ. नाकासमोर चालणारा. गरजा थोड्या असणारा आदर्शवादी माणूस. त्याची काही तत्त्वं असतात, ती तो व्यक्तिगत आयुष्यात पाळतो. तसा तो मितभाषी, पण त्याच्या एकूण स्वभावाला त्याच्याच वर्तुळातील माणसं समजून घेत नाहीत. त्यामुळे शेवटी तो सगळी तत्त्वं, भूमिका गुंडाळून मोठा पैशावाला होण्याचं स्वप्न बघतो. त्यासाठी तत्त्वं, मूल्य, आदर्श सगळं सोडतो. त्यातून त्याला येणारे अनुभव खूप काही शिकवून जातात. संपूर्ण कथा या अनुभवावरून पुढे सरकत जाते.

मध्यमवर्गातील आयुष्य जगणारा माणूस दैनंदिन अडचणीला तोंड देत-देत शेवटी वैतागतो. त्याला मिळणाऱ्या पगारात त्याची स्वप्नपूर्ण होत नाहीत आणि कुटुंबाची जबाबदारी त्याला शांत जगू देत नाही. अशा वेळी माणसं सैरभैर होतात. रोजच्या दगदगीनं मानसिक स्वास्थ्य गमावून बसतात. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. ‘डोंबिवली रिटर्न’च्या माध्यमातून नेमकं हेच दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांनी केला आहे.

या सिनेमात दीर्घकालावधीनंतर मोठ्या पडद्यावर संदीप कुलकर्णी यांचा अभिनय बघायला मिळतो. मध्यमवर्गातील व्यक्तीची भूमिका त्यांनी प्रभावीपणे रंगवली आहे. राजेश्वरी सचदेव आणि अमोल पराशर यांच्या भूमिकादेखील सिनेमात सलगता निर्माण करतात. ऋषिकेश जोशी यांची भूमिका महत्त्वाची असली तरी त्यांचा अभिनय प्रेक्षकवर्गाला खिळून ठेवत नाही. एकूण मराठी प्रेक्षकवर्गाच्या ‘रसिकत्वाला’ आजमावून पाहणारा हा सिनेमा आहे.

मध्यांतरापर्यंत लयबद्ध चालणारी कथा मध्यांतरानंतर काहीशी ‘ब्रेक’ होते. कथा दमदार नसली तरी कलाकारांचा अभिनय त्यात थोडा जीव ओततो. संगीत अत्यंत गडद म्हणावं आहे. त्यामुळे गाणी मनात रेंगाळत नाहीत. संवादच्या बाबतीतही फारशी वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे सिनेमा संगीत आणि संवाद यांच्या कमतरतेमुळे अपयशी ठरतो. मात्र तरी संदीप, अमोल, राजेश्वरी यांच्या अभिनयासाठी हा सिनेमा नक्की बघावा.

थोडक्यात शहरी मध्यमवर्गाच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न मांडू पाहणाऱ्या दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांनी कथेला एकाच बाजूनं रेटलं आहे, असं जाणवतं. कथेत आणखी एक कथा सुरू असल्यामुळे प्रेक्षकवर्ग गोंधळात पडतो. त्यामुळे रहस्यमय असं ‘लेबल’ चिटकवण्यापेक्षा गोंधळ निर्माण करणारा सिनेमा वाटतो. एकूणच कथा, संवाद, संगीत यांसारखी छिद्रं पडलेलं जहाज केवळ अभिनयाच्या जोरावर फार दूर जाऊ शकत नाही. मात्र तरीदेखील सर्वसामान्य माणसाचं आयुष्य, प्रामाणिकपणा, सचोटी, मूल्य, तत्त्वं यांची आजच्या परिस्थितीत होत असलेली कुचंबणा निर्भीडपणे मांडण्याचा चांगला प्रयत्न दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांनी केला आहे.

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......