‘टोटल धमाल’मध्ये पूर्वार्धात दोन आणि उत्तरार्धात दोन, असे चार ‘विनोद’ विनोदी आहेत!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘टोटल धमाल’चं एक पोस्टर
  • Sat , 23 February 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie टोटल धमाल Total Dhamaal अजय देवगण Ajay Devgan माधुरी दीक्षित Madhuri Dixit अनिल कपूर Anil Kapoor

इंद्र कुमारच्या ‘टोटल धमाल’मध्ये पूर्वार्धात दोन आणि उत्तरार्धात दोन असे चार ‘विनोद’ विनोदी आहेत. आता ते विनोद कुठले हे मात्र विचारू नका. कारण व्हॉट्स्अॅपच्या काळात पुढे पाठवल्या जाणाऱ्या अश्मयुगीन काळातील विनोदांनी (अ)समृद्ध असलेल्या या चित्रपटात चांगले विनोद कुठले, हे लक्षात राहणं जरा अवघड आहे. ‘लुनी टून्स’ आणि तत्सम कार्टून्समध्ये अगदीच अचूकपणे काम करणाऱ्या, मात्र चालत्या-बोलत्या माणसांच्या विश्वात अतर्क्य ठरणाऱ्या विनोदांची इथं जंत्री आहे. अजय देवगणने मागे ‘टूनपुर का सुपरहिरो’नामक वैचित्र्यपूर्ण चित्रपटात काम केलं, हाही एक योगायोगच असावा. किंवा खरं तर नसावा. कदाचित देवगण वाईट सीजीआय असलेले चित्रपट बनवण्याच्या ध्येयानं पछाडला गेला असावा. बाकी काहीही असो, जर हेच त्याचं ध्येय असेल तर तो त्यात दिवसेंदिवस अधिकाधिक यशस्वी होतोय एवढं मात्र नक्की.

मूलभूत कथानकाच्या दृष्टीनं ‘धमाल’ (२००७) चित्रपट मालिकेतील हा तिसरा चित्रपट. हा पुन्हा पहिल्या चित्रपटाकडे जातो. ज्यात अवैध काम करणाऱ्या व्यक्तीचा अपघात होणं, चित्रपटातील विनोदी ठरण्याची अपेक्षा असलेल्या लोकांचे संच तिथं उपस्थित असणं, त्यांना सदर व्यक्तीनं कुठेतरी अमुक रक्कम लपवलेली आहे, हे सांगणं आणि त्यांच्यात वाद होऊन जो आधी त्या ठिकाणी पोचेल पैसे त्याला मिळतील, असं धोरण अशा घटनाक्रमांचा समावेश होतो.

इथं मूळ चित्रपटातील आदि-मानव (अर्शद वारसी, जावेद जाफरी) जोडी पुन्हा परत येते. घटस्फोट घेऊन आपल्या मुलाला भेटायला चाललेले पती-पत्नी, अविनाश (अनिल कपूर) आणि बिंदू (माधुरी दीक्षित), अग्निशामक दलातील दोन पूर्वाश्रमीचे कर्मचारी रितेश देशमुख आणि पितोबाश त्रिपाठी (‘शोर इन द सिटी’मधील अप्रतिम अभिनेता), अजय देवगण आणि संजय मिश्रा हे दोन चोर असे इतरही लोक आहेत. संजय दत्तची उणीव भरून काढणारा (किंवा खरं तर त्याची उणीव अधोरेखित करणारा) पोलीस कमिशनर बोमन इराणी आणि रोहित शेट्टी-अजय देवगण यांच्या एकमेकांना मानवंदना देणाऱ्या सिनेमॅटिक (!) विश्वात कायम पोलिसाच्या भूमिकेत दिसणारा त्याचा सहाय्यक विजय पाटकरही इथं आहे.

‘टोटल धमाल’विषयीची खरी समस्या म्हणजे मुळातच ‘इट्स अ मॅड, मॅड, मॅड, मॅड वर्ल्ड’ (१९६३) या चित्रपटातील, याआधीच्या ‘धमाल’मध्येही वापरून झालेलं कथानक नाहीये. त्याची समस्या अशी आहे की, तो एवढी विस्तृत कलाकारांची फळी समोर आणतो, मात्र त्यांना न्याय देतील असे म्हणावे तसे जमून आलेले विनोद देत नाही. शब्दच्छल करणाऱ्या चतुर संवादांची जागा इथं वर्णद्वेषी पात्रं, सेक्सिस्ट (विनोदी समजाव्यात अशा) टिप्पण्या आणि दृश्यं घेतात. ज्यामुळे चित्रपटाच्या आधीच कित्येकदा वापरून झालेल्या कथानकापेक्षाही त्यातील तथाकथित विनोदी संवाद अधिक त्रासदायक ठरतात. ‘रेस ३’मधील साकिब सलीम आणि डेझी शाहकडून प्रेरणा घेत दर वाक्यात एक ‘ब्रो’ घालू पाहणारा संजय मिश्रा किंवा हेलिकॉप्टरमध्ये ‘एकला चलो रे’ गाणारा जॉनी लिव्हर यांना विनोदाचे आणि कालसुसंगत राहण्याचे प्रयत्न करताना पाहणं अजिबातच विनोदी नाहीये. इतर लोकही बॉलिवुड चित्रपटांचे संदर्भ देणारे साजिद खान चित्रपटशाळेतील संवाद बोलताना पाहणं विनोदी नाहीये.

भट कॅम्पच्या भयपट-कम-सॉफ्ट कोअर पॉर्न चित्रपटांचा एक फॉर्म्युला असतो, ज्यात दर दुसऱ्या दृश्यानंतर एक उत्तेजक (किंवा त्यांच्या दृष्टीने रोमँटिक) गाणं येणं अपेक्षित असतं. इंद्र कुमारच्या विश्वात या बाबी काहीशा उलट असतात. इथं एखाद्या पॉर्न फिल्मची पॅरडी म्हणाव्याशा कपड्यांमध्ये मादक (वाटणं अपेक्षित असलेल्या) गाण्यानं चित्रपटाची सुरुवात होणं अपेक्षित असतं. ‘धमाल’ आणि ‘डबल धमाल’ (२०११) दोन्हींतही त्यानं हा अलिखित नियम पाळलेला आहे. (चला, म्हणजे एखाद्या गोष्टीत का होईना पण सातत्य आहे!) इथंही किशोर कुमारच्या ‘पैसा ये पैसा’ची वाट लावणाऱ्या रिमिक्सनं चित्रपटाला सुरुवात होते. तर सदर दिग्दर्शकाच्या विश्वात चित्रपटाचा शेवटही गाण्यानेच होणं अपेक्षित असतं. तेही इथं ‘स्पीकर फट जाए’ नामक गाण्यानं साध्य होतं. दरम्यान सोनाक्षी सिन्हाचं (पुन्हा एकदा मादक असणं अपेक्षित असलेलं. किती अपेक्षा ठेवतो हा इंद्र कुमार प्रेक्षकांकडून!) ‘मुंगडा’ हे आयटम साँग येऊन गेलेलं असतं. सेक्सिस्ट विनोद करणाऱ्या चित्रपटात उगाच येणाऱ्या आयटम साँगमधील अंगप्रदर्शनावर वेगळं काय लिहावं?

वृत्त्तपत्रीय समीक्षेत अशा चित्रपटांकडे ‘डोकं बाजूला ठेवून पहावा असा चित्रपट’ असं गोंडस प्रकरण असतं. दीडेक वर्षांपूर्वी आलेल्या ‘जुडवा २’बाबत मीही असा उल्लेख केल्याचं आठवतं. पण मुद्दा असा आहे की, तार्किक अंग आणि हायपोथेटिकली बोलायचं झाल्यास डोकं जरी बाजूला ठेवलं तरी हे चित्रपट आणि त्यांतील विनोद (चार अपवाद वगळता) चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवण्यास अपात्र ठरतात. त्यामुळे ‘ब्रेनलेस कॉमेडी’ या त्यातील निरागसतेमुळे गोड ठरणाऱ्या लेबलमधील ‘कॉमेडी’ या शब्दाला कुणी गंभीरपणे घेत असल्याचं दिसत नाही. एव्हाना ‘कॉमेडी इज अ सिरीयस बिझनेस’ हे या मोठ्या चित्रपट निर्मित्या कंपन्यांकडून निर्माण होणाऱ्या चित्रपटकर्त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, नसता या चित्रपटमालिकेतील ‘फुल व धमाल’ किंवा तत्सम नावाच्या चौथ्या प्रकरणाची निर्मितीही लवकरच होईल.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......