निरीश्वरवादी असणे ही एक वास्तववादी आकांक्षा आहे. आणि त्यात धैर्य आहे; संतुलित, नैतिक असे बौद्धिक समाधान आहे.
ग्रंथनामा - आगामी
रिचर्ड डॉकिन्स
  • ‘द गॉड डिल्यूजन’चं मुखपृष्ठ आणि रिचर्ड डॉकिन्स
  • Tue , 12 February 2019
  • ग्रंथनामा आगामी द गॉड डिल्यूजन The God Delusion रिचर्ड डॉकिन्स Richard Dawkins

इंग्रजीतील प्रसिद्ध आणि बेस्टसेलर लेखक रिचर्ड डॉकिन्स यांचं ‘द गॉड डिल्यूजन’ हे प्रचंड लोकप्रिय झालेलं आणि जगभरातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेलं पुस्तक. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रा. मुग्धा कर्णिक यांनी केला असून मधुश्री पब्लिकेशन हे पुस्तक प्रकाशित करत आहे. १५ फेब्रुवारीपासून हे पु्स्तक उपलब्ध होईल. या पुस्तकाला रिचर्ड डॉकिन्स यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

लहानपणी माझ्या पत्नीला शाळेबद्दल भयंकर तिटकारा होता आणि तिला शाळा सोडून द्यावी असे वाटत असे. अनेक वर्षांनंतर, विशीत आल्यावर तिने हे आपले दुःख आई-वडिलांजवळ बोलून दाखवले आणि तिची आई चकित होऊन तिला म्हणाली, ‘पण बाळा, तू आम्हाला हे तेव्हाच का नाही सांगितलंस?’ लल्लाचं तेव्हाचं उत्तर हे आजची माझ्या लेखनाची सुरुवात असणार आहे- ती उत्तरलेली, ‘पण मी असं करू शकते हे मला माहीतच नव्हतं ना.’

मी असं करू शकते, हे मला माहीतच नव्हतं.

मला संशय आहे, छे- मला खात्रीच आहे की असे अनेक लोक असतील की, जे ज्या कोणत्या धर्मात वाढवले गेले ते त्या धर्माबाबत अगदीच वैतागलेले असतात, त्यांचा त्या धर्मावर विश्वास नसतो  किंवा निदान त्या धर्मात धर्माच्या नावाखाली चाललेल्या अनाचाराबद्दल त्यांना चिंता वाटत असते. किंवा आपल्या पालकांचा धर्म सोडता आला असता तर किती बरं झालं असतं असं वाटणारेही अनेक लोक असतील- पण त्यांना धर्मत्याग अस काही पर्याय असतो याचीच जाण नसते. तुम्ही अशा लोकांपैकी असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. याची जाणीवजागृती होण्यासाठीच हे मी लिहिले आहे. निरीश्वरवादी असणे ही एक वास्तववादी आकांक्षा आहे- आणि त्यात धैर्य आहे, संतुलित, नैतिक असे बौद्धिक समाधान आहे. हा माझा पहिला जाणीवा वाढवण्याचा संदेश आहे. मला आणखी तीन प्रकारे जाणीवा प्रखर करायच्या आहेत.

२००६मध्ये मी  ‘रूट ऑफ ऑल इव्हल’ (‘सर्व दुष्टत्वाचे मूळ) नावाची एक डॉक्युमेंटरी केली होती. मला त्याचे शीर्षक आवडले नव्हते. कारण दुष्टत्वाचे एकच असे मूळ असू शकत नाही. धर्म हे सर्व दुष्टत्वाचे मूळ नाही. पण ते शीर्षक चॅनेल फोरने दिले खरे. पण त्यांनी या लघुपटाची जी जाहिरात केली, ती मात्र मला खूप आवडली होती. त्यांनी मॅनहॅटनची क्षितिजरेखा दाखवणारे छायाचित्र टाकले होते... आणि ओळ होती- ‘इमॅजिन अ वर्ल्ड विदाऊट रिलिजन’ (धर्माविना जगाची कल्पना करून पहा.) त्या छायाचित्रात काय होतं? त्यात ट्विन टॉवर्स स्पष्ट दिसत होते.

इमॅजिन... जॉन लेनॉनची आठवण काढून मी म्हणतो- कल्पना करा- धर्माविना जगाची. कल्पना करा- आत्मघाती हल्ले नसतील, ९-११ घडणार नाही, ७-७ घडणार नाही, क्रूसेड्स नसतील, चेटकिणी ठरवून ठार करणे नसेल, गनपावडर प्लॉट नसेल, भारताची फाळणी नसेल, इस्त्राएली-पॅलेस्टिनी युद्धे नसतील, सर्ब-क्रोट-मुस्लिम कत्तली नसतील, ख्राइस्टचे मारेकरी म्हणून ज्यूंचे शिरकाण नसेल, उत्तर आयर्लंडमधील दंगली नसतील, ऑनर किलिंग्ज नसतील आणि चकचकीत कपड्यांतले, केसांचे फुगे काढलेले- चर्चसाठी मदत मागणारे टीव्ही एव्हांजेलिस्ट्स नसतील. कल्पना करा, प्राचीन पुतळे उडवून देणारे, ईशनिंदा केली म्हणून शिरच्छेद करणारे, इंचभर अंगप्रदर्शन केलं म्हणून स्त्रियांना चाबकाने फोडून काढणारे तालिबान नसतील.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4769/The-God-Delusion

.............................................................................................................................................

अज्ञेयवाद हा स्वीकारार्ह पर्याय आहे, आणि निरीश्वरवाद हा धार्मिक विश्वासाइतकाच ताठर भूमिका घेत असतो असे तुम्हाला वाटते आहे का? तसे असेल तर प्रकरण दोनमधील मांडणी तुम्हाला हे दाखवून देईल, की देव असण्याचे गृहीतक हे विश्वासंबंधीच्या शास्त्रीय गृहीतकाच्याच मांडणीचा भाग आहे. त्याकडे पाहताना, विश्लेषण करताना संशयात्म दृष्टीनेच पाहिले पाहिजे.

तत्त्वज्ञांनी आणि ईश्वरवाद्यांनी ईश्वरावर श्रद्धा ठेवण्यासाठी चांगली आणि पुरेशी कारणे दिली आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर प्रकरण तीनमधील देवाच्या अस्तित्वासंबंधी युक्तीवाद वाचायला तुम्हाला मजा येईल. ते सारे युक्तीवाद किती भयानक कच्चे आहेत हे तुम्हाला दिसेल. देव आहे हे अगदी स्पष्टच आहे- त्याविना सारे जग उत्पन्न कसे बरे होईल, इतक्या सजीवांच्या जातीप्रजाती, इतके वैविध्य कसे असेल, त्या सजीवांची रचना जणू कुणीतरी मुद्दाम रेखली आहे असेच कसे वाटेल- असे तुमच्या मनात असेल तर प्रकरण चारमधील देव जवळपास नाहीच याची खात्री का आहे, हे वाचून तुमच्या शंकांचे निराकरण होऊ शकेल. डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या तत्त्वाच्या आधारे सजीवसृष्टी कुणी निर्माण केलेली नसून ती अतिशय सावकाशीने कशी घडत गेली, याचे अतिशय नेमके विवरण आपल्याला मिळते. आणि केवळ सजीवसृष्टीच नव्हे तर याच प्रकारच्या क्रेनच्या मदतीने सारे विश्वच कसे घडत गेले याची स्पष्टीकरणे कशी असू शकतील हेही आपल्याला समजू शकते. नैसर्गिक निवडीच्या तत्त्वाची क्रेन किती शक्तीशाली आहे, हे दाखवून जाणीवा वाढवणे हा माझा दुसरा मुद्दा आहे.

जगभरात सश्रद्ध अशा संस्कृतींचाच प्रादुर्भाव अधिक आहे, हे आपल्याला मानववंशशास्त्रज्ञांनी आणि इतिहासकारांनी दाखवून दिले असल्यामुळे एक किंवा अनेक देव असणारच याची खात्री बाळगायला हरकत नाही असे कदाचित तुम्हाला वाटत असेल. तसे असेल तर पाचवे प्रकरण वाचा. धर्मांचे मूळ या भागात सर्व प्रकारच्या श्रद्धा सारख्याच पद्धतीने का उत्पन्न होतात हे त्यातून कळेल. नैतिक मूल्ये असण्यासाठी देवधर्मावर विश्वास असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतंय का? सज्जनपणासाठी देवाची गरज आहे असं वाटतंय का? मग प्रकरण सहा आणि सात पहा, असे नाही हे तुम्हाला नक्कीच कळेल. तुमचा स्वतःचा धर्मावर विश्वास नसला तरीही समाजासाठी धर्म आवश्यक आहे असा तुमचा ग्रह आहे कां? प्रकरण आठमध्ये धर्म जगाचे फार काही भले करत नाही, नुकसानच जास्त करतो हे पुरेसे स्पष्ट केले आहे.

ज्या धर्मात बालपणापासूनचे संस्कार झाले त्या धर्माच्या पिंजऱ्यात जखडले गेल्याची तुमची भावना असेल, तर असे का झाले हा प्रश्न स्वतःला जरूर विचारा. वेगवेगळ्या स्वरूपातील बालपणीची दीक्षा हेच त्याचे उत्तर सहसा असते. तुम्ही धार्मिक असलात तर बहुधा तुमचा धर्म हा तुमच्या पालकांचाच धर्म असतो. अमेरिकेत जन्मला असाल तर ख्रिश्चॅनिटी खरी, इश्लाम खोटा असे तुमचे ठाम मत असते, पण तुम्ही अफगाणिस्तानात जन्मला असतात तर तुमचे मत नेमके विरुद्ध असते. मूळ मुद्दा तोच- थोडेफार बदल होतील.

धर्म आणि बाल्य या विषयावर प्रकरण नऊमध्ये चर्चा आहे, यात माझा जाणीवजागृतीचा तिसरा मुद्दा आहे. स्त्रीवाद्यांना जसे मनुष्यप्राण्याबद्दल बोलताना फक्त पुरुषांच्या संदर्भात बोलले तर संतापजनक वाटते, तशीच तिडीक मुलांबद्दल बोलताना त्यांचा धर्म जोडून बोलणे आपणा सर्वांना संतापजनक वाटले पाहिजे. कॅथलिक मुले, मुस्लिम मुले, हिंदू मुले वगैरे वगैरे सर्व शब्दप्रयोग चुकीचे आहेत. कॅथलिक पालकांची, मुस्लिम पालकांची, हिंदू पालकांची मुले वगैरे म्हणू शकता. पण कुणी एखाद्या मुलाला त्याच्या पालकांच्या धर्माचा शिक्का मारत असेल तर आपण टोकायला हवे. अजूनही धर्म म्हणजे काय हे ज्यांना कळत नाही, त्यांना अशा प्रकारे लेबल चिकटवणे योग्य नाही. जशी त्यांची राजकारण, अर्थकारण याबाबतची समज कमी असते, तशीच धर्माबाबतचीही. हा माझा मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे मी त्याबद्दल अनेकवार बोलणार आहे. मुस्लिम मूल नव्हे तर मुस्लिम आई-बापांचे मूल, ख्रिश्चन मूल असे काही नसतेच- ते ख्रिश्चन आईबापांचे मूल असते.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4769/The-God-Delusion

.............................................................................................................................................

प्रकरण एक आणि दहा या दोन्हींमध्ये पुस्तकाच्या आरंभीस आणि अखेरीस मी हे दाखवून देतो की, या विश्वाचे महात्म्य समजून घेण्यासाठी योग्य प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेचे धर्मात रूपांतर होण्याची गरज नसते. धर्मातून काही प्रेरणा मिळते असा जो दावा असतो त्याची गरजच नाही, विश्वाची समज वाढवणे हीच प्रेरणादायक प्रक्रिया असते. धर्माने अशा प्रेरणेवर नाहक दावा सांगितला आहे.

जाणीवजागृतीसंदर्भातील माझा चौथा मुद्दा आहे तो निरीश्वरवाद्यांचा आपल्या भूमिकेसंबंधीचा अभिमान रुजवण्याचा. निरीश्वरवादी असण्यात झाकून ठेवण्यासारखे काहीही नाही. उलट ते गर्वास्पद आहे- कारण निरीश्वरवादी दृष्टी दूरच्या क्षितिजांचा निर्भय वेध घ्यायला सज्ज असते, निरीश्वरवाद मान्य असणे म्हणजेच निर्भय, स्वतंत्र बुद्धी असणे आणि निरोगी मन असणे. अनेक लोकांना अगदी अंतःकरणात माहीत असते की आपण निरीश्वरवादी आहोत, पण ते आपल्या कुटुंबियांत किंवा मित्रमंडळींत- कधीकधी स्वतःशीसुद्धा तसे उघड मान्य करीत नाहीत. कारण निरीश्वरवादी वा नास्तिक या शब्दावर हे काहीतरी भयानक असल्याचा रंग चढवण्यात आला आहे.

अमेरिकेत १९९९ साली एक गॅलप पोल घेण्यात आला होता. अगदी सर्व गुणवत्ता असलेली व्यक्ती जर अमुक असेल तर तुम्ही तिला मत द्याल का- यावर त्यांना मत द्यायली तयार असलेल्यांची आकडेवारी अशी आली-

स्त्री असेल तर – ९५ टक्के

रोमन कॅथलिक असेल तर- ९४ टक्के

ज्यू असेल तर- ९२ टक्के

काळी असेल तर- ९२ टक्के

मॉर्मॉन असेल तर- ७९ टक्के

समलिंगी असेल तर- ७९ टक्के

निरीश्वरवादीअसेल तर- ४९ टक्के

आपल्याला फार मोठा पल्ला गाठायचा आहे हे स्पष्टच आहे. पण तरीही सहजपणे दिसते त्यापेक्षा निरीश्वरवाद्यांची संख्या, विशेषतः शिक्षित प्रतिष्ठितांमध्ये खूप जास्त आहे. एकोणिसाव्या शतकातली हे चित्र होते. जॉन स्टुअर्ट मिल म्हणाला होता, “या जगातील  अलौकिक बुद्धिमत्तेच्या किती व्यक्ती धर्मासंबंधी पूर्णतः शंकित आहेत हे समजलं तर लोकांना फार मोठा धक्का बसेल.” हे आजही खरे आहे, आणि त्याबद्दलचे पुरावे मी प्रकरण तीनमध्ये दिले आहेत. लोकांच्या लक्षात निरीश्वरवाद्यांचे अस्तित्व येत नाही, कारण आपल्यातील अनेकजण आपली भूमिका उघड होऊ देत नाहीत. या पुस्तकामुळे अनेक लोकांना तसे करण्याचे धैर्य येईल हे माझे स्वप्न आहे. समलिंगी चळवळीमुळे जसे त्यातील अनेकांना उघड होण्याचे धैर्य लाभले तसेच ते आहे. एकमेकांचे पाहून असे धैर्य वाढत गेले तर आपली संख्या लक्षात घेण्याइतकी प्रभावी ठरेल.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4769/The-God-Delusion

.............................................................................................................................................

अमेरिकेत घेतल्या गेलेल्या पोल्सवरून असे दिसते की, निरीश्वरवादी आणि अज्ञेयवादी यांची संख्या मिळून धार्मिक ज्यूंच्या संख्येपेक्षा जास्त आहे, किंबहुना इतर धार्मिक गटांपेक्षाही ही संख्या अधिक आहे. अमेरिकेत प्रभावगट असलेले ज्यू लोक, त्यांच्यापेक्षाही अधिक शक्तीशाली एव्हॅन्जेलिस्ट ख्रिश्चन्स यांच्या तुलनेत निरीश्वरवादी किंवा अज्ञेयवादी अगदीच संघटित नाहीत आणि त्यामुळे ते प्रभावशून्य आहेत.

निरीश्वरवाद्यांना संघटित करणे म्हणजे मांजरींचा कळप बनवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे असे म्हटले जाते. कारण ते सारेच स्वतंत्र विचारांचे असतात आणि कुणा एक-दोघांचा अधिकार मान्य करणे त्यांना शक्यच नसते. पण निदान निरीश्वरवादी असल्याचं मान्य करणारे लोक एकत्र यावेत, इतर समविचारींना त्यातून प्रेरणा मिळावी एवढी सुरुवात करायला हरकत नाही. कळप झाला नाही, तरीही पुरेशा संख्येतल्या मांजरींचा आवाज पुरेसा लक्षणीय असेल आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष तर नक्कीच करता येणार नाही.

या पुस्तकाच्या शीर्षकातील ‘डिल्यूजन’ (‘भ्रम’) हा शब्द अनेक मानसोपचारतज्ज्ञांना अस्वस्थ करून गेला. कारण त्यांच्या मते ही एक पारिभाषिक संज्ञा आहे आणि तिचा असा वापर होता कामा नये. त्यातील तिघांनी मला पत्रेही लिहिली आणि ‘डिल्यूजन’ऐवजी ‘रिल्यूजन’ असा शब्द वापरण्याची सूचना केली. ‘रिलिजिअस’ हे ‘डिल्यूजन’चे रूप. कदाचित हा शब्द रुळेलही. पण सध्यातरी मी ‘डिल्यूजन’ हाच शब्द वापरण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे समर्थन देणे मला आवश्यक वाटते. पेंग्विन इंग्लिश शब्दकोषात डिल्यूजनची व्याख्या ‘चुकीचा विश्वास किंवा समज’ अशी आहे. आणि नवल म्हणजे याच संदर्भात शब्दकोषात फिलिप जॉन्सनचे एक उद्धरण दिले आहे- “मानवतेपेक्षा कोणी मोठी शक्ती आपली नियती ठरवते या डिल्यूजनपासून (भ्रमापासून)  मुक्ती देणारी गाथा म्हणजे डार्विनिझम.” याच फिलिप जॉन्सनने सृष्टीनिर्माणवादाच्या डार्विनिझमवरील हल्ल्याचे अमेरिकेत नेतृत्व केले होते. आणि त्याचे हे उद्धृत संदर्भ सोडून उचलण्यात आले होते ही एक गंमत.

हे मी इथे लिहिले आहे याची नोंद घेतली जाईल अशी मी आशा करतो. पण अशाच प्रकारे संदर्भ सोडून माझी वाक्ये उचलून हेतुपुरस्सर त्यांचा वापर करणाऱ्या सृष्टीनिर्माणवाद्यांकडून मात्र हे सौजन्य कधीच दाखवले जात नाही. जॉन्सनला काहीही सुचवायचे असो, पण येथे त्याच्या वाक्यातून जे काही ध्वनित होते त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे.

मायक्रोसॉफ्ट वर्डबरोबर येणाऱ्या शब्दकोषात ‘डिल्यूजन’ची व्याख्या अशी आहे- ‘विरुद्ध बाजूचे स्पष्ट पुरावे असूनही जपलेला एक खोटा दृढ विश्वास म्हणजे डिल्यूजन, हा विशेषत्वाने एक मानसशास्त्रीय विकारही असतो.’ या वाक्याच्या पूर्वार्धात धार्मिक श्रद्धांचे नेमके विवरण दिसते. हा मानसशास्त्रीय दृष्टीने विकार आहे का याबाबत मी ‘झेन अँड आर्ट ऑफ मोटरसायकल मेन्टेनन्स’चा लेखक रॉबर्ट पिर्सिगचे मत मान्य करतो. तो म्हणतो, ‘जेव्हा एखाद्या माणसाला भ्रम होतो त्याला मनोविकार म्हणतात, आणि जेव्हा बऱ्याच माणसांना भ्रम होतो तेव्हा त्याला धर्म म्हणतात.’

माझ्या मनाप्रमाणे या पुस्तकाचा प्रभाव पडला तर जे धार्मिक वाचक हे पुस्तक वाचतील ते पुस्तक वाचून खाली ठेवताना निरीश्वरवादी झालेले असतील. काय हा माझा आगाऊ आशावादीपणा! श्रद्धेचे घट्ट थर चढलेल्या श्रद्धाळूंच्या नेत्यांवर कुठल्याही युक्तिवादाचा काहीही परिणाम होत नसतो. शतकानुशतके घट्ट वीण बसलेल्या धर्मदीक्षांचे संस्कार बालपणापासून मनावर जमत गेले असल्यामुळे युक्तीवाद, तर्कशास्त्र यांना ते कडवा विरोध करतात. हे पुस्तक म्हणजे सैतानाचेच काम असल्यामुळे ते उघडूनही पाहू नये अशी एक धोक्याची कडक सूचना देण्याचा एक जबरा संसर्गविरोधी उपायही सुचवला जाईल. पण तरीही बरेच लोक खुल्या विचारांचे असतील अशी मी आशा करतो. बालपणीचे संस्कार बाजूला ठेवून खुल्या मनाने विचार करण्याची क्षमता शिल्लक असलेले, किंवा संस्कार पुरेसे आत्मसात न केलेले किंवा बुद्धिमत्ता पुरेशी तीक्ष्ण असल्यामुळे ते संस्कार बाजूला फेकून दिलेले असे लोक असतातच. अशा मुक्तात्म्यांना धर्माच्या दुष्टतेचा पुरता त्याग करण्यासाठी थोडेसेच उत्तेजन हवे असते. हे पुस्तक वाचून झाल्यावर निदान कुणी असे तरी म्हणू शकणार नाही- ‘असं करता येतं हे मला माहीतच नव्हतं.’

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4769/The-God-Delusion

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 13 February 2019

अहाहा मुग्धाताई! कसं अगदी डॉकिन्सबाबांच्या प्रवचनास बसल्यासारखं वाटतंय. 'जे धार्मिक वाचक हे पुस्तक वाचतील ते पुस्तक वाचून खाली ठेवताना निरीश्वरवादी झालेले असतील' हा डॉकिन्स यांचा आगाऊ आशावाद हीसुद्धा एक प्रकारची श्रद्धाच आहे. अगदी अंधश्रद्धा म्हणायलाही हरकत नाही. बाकी चालूद्या. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......