त्या म्लान बकुळफुलांचा उदास सौरभ मराठी काव्यप्रांतात दरवळत आहे...
पडघम - साहित्यिक
त्र्यं. वि. सरदेशमुख
  • राम गणेश गडकरी
  • Wed , 23 January 2019
  • पडघम साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख T. V. Sardeshmukh राम गणेश गडकरी Ram Ganesh Gadkari

आज, २३ जानेवारी रोजी राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. त्यानिमित्तानं ‘वाग्वैजयंतीचा उदास सौरभ’ हा सरदेशमुखांनी लिहिलेला पहिला समीक्षालेख, संपादित स्वरूपात. गडकऱ्यांच्या पंचविसाव्या स्मृतीवर्षाच्या निमित्तानं ‘समीक्षक’च्या गडकरी विशेषांकात हा लेख फेब्रुवारी १९४४ प्रसिद्ध झाला होता..

.............................................................................................................................................

कितीतरी दिवसांनी ‘वाग्वैजयंती’ पुन्हा वाचली. एकच विचार मनात साकळून राहिला. केवढी उदासीनता, कसली विषण्णता! पानोपानी  अंतरिच्या दुःखाचे कढत उसासे ऐकू येतात. नाहीतरी अत्यंत भावनोत्कट स्वभावाला हा शापच आहे, त्याची प्रखर धार वेळोवेळी उलटते, आपल्याच मनाची शकले करून त्याला विकलता आणते. अशा स्वभावामुळे सुखक्षणही सुक्ष्मतेने टिपून घेता येतात खरे, पण सर्वसामान्यांच्या जीवितांत ते येतात कितीसे वाट्याला?

आमुचा प्याला दुःखाचा

डोळे मिटूनी प्यायाचा.

असं म्हणत केशवसुतांनी इहलोक सोडला. त्यांच्या चेल्याच्या नशिबीही तसलेच जीवन होते. केशवसुतांहून अधिक प्रतिभाशाली, अधिक संवेदनशील अंतःकरण घेऊन गोविंदाग्रज जन्माला आले आणि केशवसुतांनी अनुभवला त्याहून अधिक वृद्धिंगत व प्रखर मानसिक दंश त्यांनी सोसला. बालपणी पितृवियोग झाला,  प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण अर्धवट सुटले, संसाराचे ओझे शिरावर आले. उच्च शिक्षण, मान, कीर्ती व लाभाचा आशावाद कोलमडला. ऐन तारुण्यात मनोभंग झाला. दिवसेंदिवस प्रतिभाशाली मन खचू लागले, जिथे तिथे दारुण निराशा दिसू लागली. त्याचे पडसाद काव्यांतून उमटू लागले. डफावर स्वैर थाप देऊन स्वच्छंद दिलाने आवाज चढवायचा त्या कलगीच्या बेहोष गाण्यात गोविंदाग्रज हिरमुसल्या मनाने गाऊ लागले -

विरमेना रव भवतीचा

खेदही माझ्या चित्तीचा.

सहज गवाक्षातून झाडावर हलत असलेले एखादे पिंपळपान पाहून देखील त्यांचे मनांत विचार येतो-

मम करी कपाळी दुर्देवाच्या रेषा .

झाडावर पाखरू चिवचिवत असलेले पाहून त्यांच्या खिन्न मनाला आनंद होतो. ते त्याला सांगतात -

विषण्ण मानस उदास जीवन पीत निराशागरा

हृदय तडफडे दुःखाग्नीने मुकले सुखसागरा .

ढगाआडचे चांदणे पाहून त्यांनी ज्या ओळी गायल्या त्यांना आधुनिक मराठी काव्यवाङमयात तरी तोड नाही. 

खिन्न चांदणे ढगाआडचे,

भग्न मनोरथ झाले ज्याचे,

हंसे जणू तें अशा मनाचे!

व्यवहाराच्या आणि संसाराच्या पुष्कळ निरनिराळ्या तापांनी तरुणपणीच मनात अशा प्रकारे औदासीन्याचे, विषण्णतेचे, खिन्नतेचे डोंगर साचले. ते वितळवण्याचे सामर्थ्य एकाच वस्तूत आता उरले होते, प्रेमलाभ. तो झाला असता तर गोविंदाग्रजांनी औदासीन्याचे हलाहल पचवले असते. ‘पुनर्जात प्रेमाला’ उद्देशून ते म्हणतातच -

तुडवूं पायी चल खेदाला,

टाकूं जाळूनी नैराश्याला,

दुःख सब झूट - चल उघड झाकली मूठ

पण ते व्हायचे नव्हते, प्रेमाच्या बाबतीत निराशाच वाट्याला आली, मानसिक उलाढालीतील परिवर्तनाची आशा संपली. विषण्णता गाढ झाली, औदासीन्य खोल जिव्हारी गेले. मनाच्या गाभाऱ्यांत प्रेममूर्तीने अधिष्ठान मांडले, पण तिच्यापासून हवा तो कौल मिळेना, तिची अनुकृपा लाभेना.

प्रीतीचीं पाऊलें उमटली जीं या हृदयात

जीवस्वामिनी , किती दिवस वद बसूं तीच गांत!

अशी हूरहूर लागून राहिली. प्रिय व्यक्तीविषयी मनांत ज्या भावना-वासना कल्लोळित होतात, त्या तशा व्यक्त केल्या तर जग काही त्यांना सुधेपणाने पत्करीत नाही.

जनिं जे दिसते, मनिं जे वसते, हृदयी जे सलते,

ते बोलावे तंव ते वठते भलत्याचे - सलते.

अशा उफराट्या वृत्तीच्या जगांत प्रेयसीची गाठ पडण्याची चिन्हे दिसेनात... प्रीती हा अनंत भावनांचा संवाद आहे, जणू सहस्त्र पाकळ्यांचे कमलपुष्प. ते जसे कर्दमातून निर्माण होते तशी तीही यातनांच्या कल्लोळांतून उपजते की काय, नकळे. अजून काही जगाची निपजशक्ती व सौंदर्यभावना इतकी संपन्न, परिणत झालेली नाही कीं पाहता पाहता एखाद्या शुभ्र संगमरवरातून कमलिनीचा जन्म व्हावा वा मेघांतल्या पाण्यांतच कमलकंद रुजावेत आणि पावसाच्या सरींनिशी पृथ्वीवर कमळांची बरसात व्हावी.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4598/Dene-Praneshache

.............................................................................................................................................

गोविंदाग्रजांना ‘प्रेमाचे शाहीर’ म्हणण्यात येते. त्यांच्या कवितांमधुन प्रेमविषयक भावनांना प्रामुख्याने उभारी दिलेली दिसून येते, तरी प्रेमाच्या सर्व अंगोपांगांना त्यांच्या कवितेत थारा मिळालेला दिसत नाही, प्रेमाचे आपले म्हणून  स्वतंत्र असे तत्त्वज्ञान त्यांनी प्रतिपादलेले नाही. प्रेमभंगामुळे एका प्रतिभावंत मनाला वेळोवेळी जे दुःखद हेलकावे मिळाले त्याची दखल मात्र त्यांनी अत्यंत प्रभावी शब्दांच्या सहाय्याने नोंदवून ठेवली आहे. ते चित्र करुण आहे. त्यांचे अंतर्विश्व प्रीतीच्या तेजाविना सुकून गेले होते, अश्रुधारांचा कितीही वर्षाव झाला तरी त्याला टवटवी आली नाही -

सुकले फुल न देत वास जरि अश्रूंनी भिजले !

गोविंदाग्रजांनी प्रेमाचा जो पाईक निर्माण केला आहे, त्याचे गाऱ्हाणे विशेषतः मानवी मनाचे शाश्वत सौंदर्य न जाणणाऱ्या चंचल प्रेयसीविरुद्व दिसते.

केल्या ज्याच्या पायघड्या मी तुझ्या पावलांसाठी,

त्या हृदयाला तुडवून गेलीस नटव्या थाटापाठी!

बाह्यात्कारी भुलवणीला बळी पडून पुरुषाच्या प्रीतीकक्षेंतून स्त्री निसटली म्हणजे जे दुःख पुरुषाला होते त्याचा हा आविष्कार. सौंदर्य आपल्या स्वार्थासाठी ‘विश्रब्ध प्रणयाची’ वंचना करते, तेव्हा त्यांचे मन खिन्न होते -

मैना भटके वनांत , वेडा राघू झुरतो मनांत,

विस्कळले पर, पिसें विखुरली, गळले दोन्ही पांख

अखंड झुरणी झुळझुळ लाविती अरधे उघडे

आंख!

जगाच्या विपरीत चक्रनेमिक्रमांत पुष्कळांच्या बाबतीत प्रीती हा विविध सुरांचा भयानक विसंवाद ठरतो. गोविंदाग्रजांची कोमल भावना निराशामय वेदनांनी पार कोळपून गेली, प्रतिवसंती फुलणारा नवा नवा मोहोर तिच्याभाळी उरला नाही.. गोविंदाग्रजांच्या प्रेमगीतांत त्यामुळे एकांगीपणा आला.

गोविंदाग्रजांची प्रेमगीते वाचली म्हणजे सरितेच्या क्षीण पण चपल, गतिमान प्रवाहाकाठी कोणी अंधगायक एकतारीवर तेच तेच करूण सूर आळवीत असल्याचा भास होतो. त्याकडे पाहून, त्याच्या वाद्यांतून अविरत ओसंडणारा विव्हल सूर ऐकून आपलेही मन नकळत पण हळूहळू त्याच मनोयातनेने व्याप्त होऊ लागते. गोविंदाग्रजांचे घायाळ अंतःकरण, प्रेमनिराशेने जी अपूर्णता व असफलता त्यांच्या जीवनांत निर्माण करून ठेवली त्या जखमेंतून कायमचे ठिपकत राहिले, तो झिरप अखेरपर्यंत आटला नाही.

दिक्कालांनी, अज्ञातांनी बांधितांचि पाय,

एकलकोंडे अनंत कविमन रडे धायधाय!

असे गातां गातां शेवटी -

अखेर झाली , आता घे हा प्रणाम जातां जातां..

दिला तिलांजली अश्रूंचा हा त्या प्रेमाच्या नावा ,

परतायाचे नाही आता त्या प्रेमाच्या गांवा.

होईल होईल वाटत होते तेंच अखेरीस झालें ,

नांव घेतल्यावाचून आता मनांत झुरणें आलें .

गोविंदाग्रजांनी अनुभवलेली असफलता, असहायता, निराशाच जगात फारांच्या वाट्याला येते म्हणूनच -

भेटवी मजला

जीविच्या जिवाची बाला - एकदां ,

यातील आर्तता तुमच्या-माझ्या अंतःकरणाला कळते , आणि -

ओठांशी भिडते रहस्य मनिंचें - सांगू कुणाला परी?

अश्रू हे नयनींहि - माळ करूनी घालू कुणाच्या गळां?

यातल्या वेदनेची शाश्वतता आणि व्यापकता मनाला व्याकूळ करते.

एखाद्या विरही जीवाला चैत्रातल्या रात्री योगायोगाने बकुळीखाली निजण्याचा प्रसंग यावा, पहाटें जाग यावी. चंद्र क्षितिजाकडे गेलेला असावा. फुलांचा सडा सभोवार पडावा, फिकट चांदण्यात बकुळीचा सुगंध तरंगत असावा, त्या प्रभातकाळीच्या उदास कातरतेचा अनुभव गोविदाग्रजांची कविता वाचून येतो. गेली पंचवीस वर्षे त्या म्लान बकुळफुलांचा उदास सौरभ मराठी काव्यप्रांतात दरवळत आहे.

.............................................................................................................................................

'संपूर्ण गडकरी खंड १ ते २' या पुस्तकाची खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -

https://tinyurl.com/ycqo37j6

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......