व्हॅटिकनच्या क्षमायाचना आणि हिंदू समाजाचा नकारधर्म
पडघम - सांस्कृतिक
अलका गाडगीळ
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 22 January 2019
  • पडघम सांस्कृतिक ख्रिश्चन धर्म Christians Religion हिंदू धर्म Hindu Religion दलित Dalit डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar महात्मा फुले Mahatma Phoole

साल होतं १६३०. कॅथलिक चर्चनं गॅलिलिओंना वाळीत टाकलं होतं. कारण होतं त्यांचं अंतरिक्षातील ग्रहांचं निरीक्षण आणि चंद्र पृथ्वीभोवती भ्रमण करतो हा निष्कर्ष. कोपर्निकसनं मांडलेल्या सौरमंडलाच्या थिअरीशी गॅलिलियोंचं निरीक्षण जुळणारं होतं. पृथ्वी स्थिर नाही, ती विश्वाच्या केंद्रस्थानी नाही, तसंच ती सूर्याभोवती फिरते अशी नोंद त्यांनी केली. अवकाशाचं निरीक्षण करणंच चर्चला मान्य नव्हतं. गॅलिलिओची थिअरी ‘बायबल’च्या मांडणीला छेद देणारी होती. शिवाय आपला ग्रंथ त्यांनी लॅटिनमध्ये न छापता इटालियन भाषेत छापला होता. चर्चला ‘बायबल’ आणि लॅटिन भाषेचा अपमान सहन होण्यासारखा नव्हता. धर्मसंसदेनं त्यांना धार्मिक न्यायालयात ओढलं आणि त्यांच्यावर ब्लास्फेमी-धर्मनिंदेचा दावा लावण्यात आला. आरोप ठेवणं, खटला चालवणं आणि न्यायनिवाडा करण्याचे अधिकार व्हॅटिकनकडेच होते.

मध्ययुगात अनेक स्त्रियांना पाखंडी आणि डाकीण (विच) ठरवून जिवंत जाळण्यात आलं. हे ‘विच हंट’ प्रकरण, धर्मव्यवस्थेतील स्त्रियांचा दुय्यम दर्जा, स्त्रियांना धर्मप्रमुखपद, पोपद्ध न देण्याचं तत्त्व, आणि कॅथलिक परंपरेतला एकूणच ‘स्त्री तिरस्कार’ चर्चला अजून छळतोय.

पंधराव्या शतकात फ्रान्सला इंग्लिश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी जोन ऑफ आर्कनं पुढाकार घेतला. तिच्या नेतृत्वाखाली अनेक फ्रेंच नागरिक लढ्यात सामील झाले. पण अखेरीस ती पकडली गेली. इंग्लडमध्ये चाललेल्या धार्मिक खटल्यात तिला विच् ठरवण्यात आलं आणि जिवंत जाळण्याचा निवाडा देण्यात आला.

दुसऱ्या महायुद्धातील नरसंहाराबद्दल जर्मन चर्चनं निषेधाचा शब्द काढला नव्हता. हे युद्ध प्रामुख्यानं कॅथलिक धर्मिय युरोपिय देशांमध्ये झालं होतं. अर्थात या देशांमध्ये प्रोटेस्टंट धर्मियही राहतात. छळवणूक झालेल्या ज्यूंसोबत येशूच्या मानवतेच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून चर्चनं उभं राहायला हवं होतं. पण तसं झालं नाही. लक्षावधी ज्यू स्त्री-पुरुष आणि मुलं नाझी जर्मनीच्या यातना छावण्यात मरून गेली, पण व्हॅटिकननं एकही पत्रक काढलं नाही. आपल्या ‘संडे मास’मध्ये ज्यूंवर होणाऱ्या हिंसेचा उल्लेख केला नाही, उलट स्थानिक प्रीस्ट आणि प्रार्थना मंदिरं नाझी सैन्याला उघड उघड पाठिंबा देत आहेत याकडे दुर्लक्ष केलं.

गेल्या दशकांत पोप असणारे बेनिडिक्ट सोळावे तरुणपणी ‘हिटलर युथ’ गटाचे सदस्य होते. या आपल्या भूतकाळाबद्दल पोप बेनिडिक्टनी आपली गुपचिळी सोडलेली नाही. व्हॅटिकनही यासंबंधात काहीही बोलत नाही. समता, बंधुता, दया, क्षमा आणि शांतीचे संदेश देणाऱ्या धर्माचे पोप हिटलरचे समर्थक असणं, त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांनी भाष्य न करणं आणि माफी न मागणं यावरून सतत टीका होते.

येशू ख्रिस्ताचा छळ आणि मुत्यूदंडाची शिक्षा ज्यू धर्मपीठानं दिली आणि अमलात आणली. त्यामुळे ज्यूंबद्दलचा सुप्त राग ख्रिश्चन जगतातील काही गटांना आजही आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4511/Brahmeghotala

.............................................................................................................................................

वसाहत काळात कॅथलिक चर्चच्या धर्मगुरूंनी सक्तीनं धर्मांतरं केली आणि धर्मांतरितांनी आपल्या मूळ संस्कृती-रीतीरिवाजांकडे परत फिरू नये म्हणून ‘इन्क्विझिशन प्रोजेक्ट’ हाती घेण्यात आला. सक्तीनं धर्मांतर झालेला समाज आपल्या मूळ धर्माकडे वळण्याची शक्यता असते, म्हणून नवख्रिस्तींवर पाळत ठेवली, क्षुल्लक कारणांवरून लोकांना अटक करून यातना छावण्यांत ठेवलं, फाशी दिलं. कॅथलिक चर्चचा हा काळा इतिहास आहे.

पण तो मागे पडून व्हॅटिकननं आपल्या चुकांचं परिमार्जन करण्याचं ठरवलं आहे. पोप जॉन पॉल दुसरे यांनी विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकांत अनेक माफीनामे जारी केले.

अगदी अलिकडे पोप फ्रान्सिसनी समलिगीं-एलजीबीटी समुदायाची क्षमा मागितली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस १८९५ साली नामवंत नाटककार ऑस्कर वाईल्ड यांना समलिगीं संबंधांबद्दल तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. इंग्लंडमध्ये समलैंगिकत्व गुन्हा होता. अशी असंख्य उदाहरणं आहेत. युरोपमध्ये एलजीबीटी व्यक्तींना समाजाच्या रोषाचा सामना करावा लागायचा. ‘बायबल’मध्येच समलैंकिता गैर मानली गेली आहे, पण धर्मातील अनेक अन्यायकारक गोष्टींवर सार्वजनिक चर्चा होताना दिसते आहे.  

व्हॅटिकननं गॅलिलिओसहित वाळीत टाकण्याची वा मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या शास्त्रज्ञ, लेखक, विचारवंतांची माफी मागितली, तसंच जिवंत जाळण्यात आलेल्या स्त्रियांची, इन्क्विझिशमधल्या अतिरेकांबद्दलची, दुसऱ्या महायुद्धात ज्यूंना मदत न करण्याबद्दलही माफी मागितली आहे.

पोप फ्रान्सिस यांनी शस्त्रास्त्रांना मूक होकार दिल्याबद्दलसुद्धा क्षमा मागितली. याचं फारसं स्पष्टीकरण व्हॅटिकननं केलेलं नाही. पण अमेरिकेच्या इराक, इतर आखाती देश, व्हिएतनाम, अफगाणिस्तान, आणि अन्य अनेक देशांमधील युद्धांचा धिक्कार न केल्याबद्दल माफी मागितली आहे, अशी मांडणी केली जातेय.

भारतीय समाजानेही अनेक समाजगटांचा छळ केला, त्यांचे हक्क नाकारले, विचार पटले नाहीत म्हणून खून करण्यात आले आणि जमावानेही हत्या केल्या.

महानुभाव पंथाची स्थापना करणाऱ्या स्वामी चक्रधरांनी वेदिक परंपरेला आव्हान दिलं, जातीव्यवस्था नाकारली आणि स्त्रियांनाही समान मानलं. प्रथेनुसार मासिक पाळी अपवित्र मानली जात असे. पण मासिक पाळीचा स्त्राव हा शरीरातून निघणाऱ्या अनेक स्त्रावांपैकीच, त्याचा विटाळ पाळू नये अशी भूमिका त्यांनी घेतली-

‘सवज्ञे म्हणीतले: वाइ ये नवद्वारे: जैसी नाकी सेंबूड: डोळ्यों चिपूड: काना मळ: गुदद्वारस मळ एति: ऐसी हे एकि धातू स्त्रवे: मग निवतें: याचा वीटाळ धरू नये: जरि धरिजे प्रेतदेह होए.’

चक्रधर स्वामींचा खून केला गेला असं म्हटलं जातं. अर्थात मौखिक इतिहास असं सांगतो. महानुभावपंथाच्या स्त्री-पुरुष समानतेमुळे आणि इतर पुरोगामी विचारांमुळे त्यांचा आवाज दडपला गेला, त्यांचा छळ झाला, नंतर त्यांनीही लोकवस्तीपासून दूर कडेकपारीत वास्तव्य करणं पसंत केलं.

गोव्यातील सक्तीच्या धर्मांतरांनतर अनेक नवधर्मांतरितांना आपल्या जातीत परत यायचं होतं. बाप्तिस्मा घ्यायला लागल्यानंतर ते रानात लपून राहात आणि पाठलाग होणार नाही याची खात्री झाल्यानंतर रात्री लपतछपत गावात परत येत. पण सगेसोयरे आणि गावकरी त्यांना दारही उघडत नसत, गावात थारा देत नसत.

नवधर्मांतरित ख्रिश्चन रीतीरिवाजांचं पालन करताहेत का? आपल्या जुन्या धर्माकडे ते पुन्हा वळताहेत का? हे तपासण्यासाठी ‘इन्क्विझिशन’ धर्मगुरू गावागावतून संचार करत. ख्रिश्चन रीतींचं तंतोतंत पालन न करणाऱ्या नवख्रिश्चनांना धार्मिक कारागृहात पाठवलं जायचं. त्यांचा अन्वनित छळ झाला. त्यापैकी अनेकांना फासावर चढवलं गेलं. स्वधर्मियांनी नाकारणं आणि नव धर्मामुळे झालेला छळ. गोव्यातील ख्रिश्चन बहुलतेवर टीका करणाऱ्यांना या काळ्या इतिहासाची माहिती नसते.

काश्मीरमधील धर्मांतर झालेल्या मुस्लिम पंडितांना पुन्हा जातीत परतायचं होतं. दीडशे वर्षांपूर्वी हिंदू पंडिंतांकडे आपली विनंती घेऊन ते गेले होते. पण जातीनेच त्यांना परत घ्यायचं नाकारलं. हिंदू समाजाने अशा अनेक आप्तधर्मिंयांचा छळ केला आहे, त्यांना दूर लोटलं आहे. हिंदू धर्मकारण वजाबाकीचं आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4712/Streevad-Sahitya-ani-samiksha

.............................................................................................................................................

शिवाजी महाराजांच्या राज्यारोहण सोहळ्यात महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी त्यांना राज्याभिषेक करणं नाकारलं. राज्यसत्ता असूनही ब्राह्मणांनी छत्रपतींना जुमानलं नाही.

उत्तर पेशवाई काळातील जातआधारित छळानं परिसीमा गाठली होती. दलितांना अमानूष वागणूक मिळत होती. त्यांची सावलीही पडलेली चालायची नाही.

स्त्रियांचाही, विशेषत: ब्राह्मण स्त्रियांचा अनन्वित छळ केला गेला. सतीप्रथा, केशवपन, विधवाविवाह बंदी, विधवांचं लैंगिक शोषण, त्यातून निपजणारी संतती असे अनेक भीषण अत्याचार झाले. महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाईंनी अडचणीत आलेल्या स्त्रियांसाठी गृह सुरू केले. त्याच्या लाभार्थी मुख्यत: ब्राह्मण स्त्रिया होत्या.

त्याच काळात ब्राह्मणेतर स्त्रियांना मात्र संचार स्वातंत्र्य होतं. त्या शेती करत होत्या, इतर रोजगारांमध्ये त्या कार्यरत होत्या. नवरा गेल्यानंतर पुनर्विवाह करण्याची मुभाही त्यांना होती.

ब्राह्मण सुधारकांनी ब्राह्मण स्त्रियांच्या प्रश्नाला वाचा फोडली, पण मूलभूत प्रश्नांना त्यांनी हात घातला नाही. डॉ. आनंदीबाई जोशींच्या पतीनं त्यांना शिकवलं, परदेशी पाठवलं, पण घरेलू अत्याचारही केले.

पेशव्यांनी कुणबी शेतकऱ्यांवर आसूड ओढला. ‘इशारा’ या आपल्या लेखात जोतीबा म्हणतात- ‘‘दुसऱ्या बाजीरावाच्या आमदनीत शेतकऱ्याने सारा वेळेवर भरला नाही की, त्याला अघोरी शिक्षा दिली जायची. भर उन्हात त्याला ओणवं उभं केलं जायचं. त्याच्या गळ्यात दगड बांधलेला असायचा, पाठीवर पत्नीला बसवलं जायचं आणि नाकाखाली मिरच्यांची धुरीही पेटवली जायची. आपल्या रयतेला पेशव्यांनी जनावरासारखी वागणूक दिली. शासकांच्या आणि त्यांच्या जातबांधवांच्या ऐषोआरामासाठी रयतेने उन्हा-पावसात राबावं, अन्नधान्य पिकवावं अशी जुलमी व्यवस्था होती.’’

१८४८ साली जोतीबा आपल्या ब्राह्मण मित्राच्या कुटुंबातील एका लग्नसमारंभाला गेले होते. तिथं त्यांची अवहेलना झाली. त्यानंतर जातीवस्थेतील अन्यायाची त्यांना तीव्रपणे जाणीव झाली.

जोतीबा-सावित्रीबाई अशा अनेक पुरोगामी उपक्रमांत गुंतले असताना त्यांच्या मानवी कार्यावर टीका करण्याच्या कामात कृष्णशास्त्री चिपळूणकर गुंतले होते.

फुले जोडप्याच्या सामाजिक कार्यासाठी काही ब्राह्मणांनी त्यांना मदत केली, पण कर्मठ ब्राह्मण समाजानं जोतीबांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्या काळातली सार्वजनिक चर्चेची व्यासपीठं ब्राह्मणांकडे होती. आजही उच्चवर्णीय अनेक संस्थांवर पकड ठेवून आहेत.

सावित्रीबाई चालू लागल्या की, त्यांच्यावर शेण फेकलं जायचं. अन्यायी परंपरांना विरोध करणं, दलित, कष्टकरी जातींवर होणाऱ्या अत्याचाराचं विश्लेषण करणं आणि स्त्रियांच्या हक्कांची मांडणी करणं याचा परिपाक जोतिबांच्या खुनाची सुपारी देण्यामध्ये झाला. या हल्ल्यातून जोतीबा वाचले आणि त्यांना मारायला आलेल्या व्यक्तीचंही मनपरिवर्तन त्यांनी घडवून आणलं.

या सगळ्या इतिहासाची समीक्षा करण्याचं काम ब्राह्मण समाजानं केलेलं दिसत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सावरकर आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी गांधींचा सतत द्वेष केला. टीका करणं, विरोधी मत व्यक करण्याला आक्षेप असण्याचं कारण नाही. पण हिंसेला चिथावणी देऊन याच शक्तींनी त्यांचा घात केला. द्वेषाची ही मालिका खून करून थांबली नाही. गांधींच्या हत्येला गांधी‘वध’ असं आवर्जून म्हटलं जातं. त्याला आक्षेप घेतला तर ‘हत्या तुम्ही म्हणा’ असं उत्तर मिळतं.

संत तुकारामांचा छळ केल्याबद्दल, त्यांची गाथा नदीत बुडवण्याबद्दल या समाजानं दिलगिरी व्यक्त केली आहे का? ‘हे दुष्कर्म कोण्या मंबाजीने केलं, त्यासाठी सर्व ब्राह्मण समाजाला का दोष द्यायचा?’ असा युक्तीवाद केला जातो. पण प्रश्न फक्त माफीचा नसतो. प्रश्न असतो जातीवर आधारलेली उच्चनीचता समजून घेणं, जातीमुळे आपल्याला मिळालेले विशेषाधिकार ओळखणं, त्यांची समीक्षा करणं, त्या अधिकारांमुळे समाजातील काही गटांच्या मानवी हक्काचं हनन होतं, हे समजून घेणं आणि बदल घडवून आणणं.

काही अपवाद वगळता बहुजन समाजानेही आपला जातीवाद सोडला नाही. त्यांनीसुद्धा दलितांवर आणि स्त्रियांवर अन्याय आणि अत्याचार केले.

दलितांवर होणाऱ्या हिंसेची उजळणी करणं हे दु:ख देणारं काम आहे. दलितांना सरकारी अखत्यारीतील सर्व सार्वजनिक ठिकाणं, पाणवठे, धर्मशाळांमध्ये प्रवेश दिला जावा असा ठराव ४ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात एस. के. बोले यांनी मांडला आणि तो पारित झाला. महाड तेव्हा मुंबई प्रांताचा भाग होते.

प्रत्यक्षात कोणतीही सार्वजनिक सेवा दलितांना उपलब्ध झाली नाही म्हणून ४ ऑगस्ट १९२३ रोजी डॉ. आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यासहित महाड येथील चवदार तळ्याकडे कूच केलं आणि तळ्याचं पाणी प्राशन केलं.

या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली. स्थानिक ब्राह्मणांनी शेण घालून तळ्याचं ‘शुद्धीकरण’ केलं. खरं तर पाण्यामध्ये विष्ठा टाकून ते प्रदूषित करण्याबद्दल त्यांना अटक करायला पाहिजे होती. शेण पवित्र, पण मानवी स्पर्श अपवित्र असा हा जातधर्म आहे.

२ मार्च १९३० रोजी काळाराम मंदिर प्रवेशाचं आंदोलन सुरू झालं. आंदोलनात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पत्नी गीताबाई, त्यांच्या भगिनी सीताबाई व रमाबाई आघाडीवर होत्या. त्यांनी निदर्शनं केली, पोलिसांचं कडं तोडलं आणि त्याबद्दल तीन महिन्यांचा सश्रम कारावासही भोगला. काहीशा नाखुशीनेच डॉ. बाबासाहेबांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. जातीभेद आणि कर्मकांड दूर करण्याचं आवाहन त्यांनी हिंदू समाजाला केलं. आपल्या लढ्याच्या अगदी सुरुवातीला गांधी आणि हिंदू समाजातील काही धुरीणांशी जातीअंतासंबंधीची चर्चा त्यांनी केली होती. त्यातील वैफल्य लौकरच आंबेडकरांच्या लक्षात आलं होतं.

“दलितांनी देवतांच्या मूर्तींचे पूजक व्हावं यासाठी मी मंदिर प्रवेश आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही. मंदिरात प्रवेश मिळाल्यामुळे हिंदू धर्मात दलित समाजाला समान स्थान वा हक्क मिळतील असेही मला वाटत नाही. किंबहुना हिंदू परंपरेत सामील होण्यापूर्वी हिंदू तत्वज्ञान आणि हिंदू समाजात संपूर्ण परिवर्तन घडवून आणण्याचा आग्रह आपण धरला पाहिजे’’ असा विचार डॉ. आंबेडकरांनी मांडला होता.

काळाराम मंदिर आंदोनलनाच्या अनेक दशकांनंतर, २००५ मध्ये, डॉ. आंबेडकरांना मंदिर प्रवेश नाकारणाऱ्या रामदासबुवा पुजारी यांचे नातू महंत सुधीर पुजारी यांनी माफी मागीतली. “डॉ आंबेडकरांना प्रवेश न देणं ही घोडचूक होती. त्यामुळेच त्यांनी धर्मत्याग केला’’ असा कबुलीजबाब त्यांनी दिला. घटनेनेच जातीव्यवस्थेतील अन्याय दूर केला, पण हिंदू समाजाच्या आडमूठेपणामुळे आजही जात आणि जातअधारित भेदाचं सातत्य टिकून आहे. काळाराम मंदिरांच्या महंतांचा पश्चाताप म्हणूनच कामी येत नाही.

वैयक्तिक पातळीवर धर्म आणि कर्मकांडांची समीक्षा केली जाते, पण समाज मात्र स्थितीशील राहतो. कधीकधी तो प्रतिगामी होतो. त्याचं झुंडीमध्ये रूपांतर होतं. झुंडीतील व्यक्तींची स्वत:ची विचाशक्ती नाहीशी होते. जातींचच्या पंचायती असतात. ब्राह्मण संमेलनं भरवली जातात. ‘ब्राह्मण खतरे में’ असा आक्रोश केला जातो. आरक्षणामुळे ब्राह्मणांवर अन्याय होतो अशी मांडणी केली जाते. पण सरकारी उच्चपदावरील नोकऱ्यांमधील ब्राह्मण आणि इतर उच्च जातींचं अती प्रातिनिधित्व, शिक्षण आणि प्रसारमाध्यमांतील मक्तेदारी यांची समीक्षा होत नाही. बुद्धीमुळेच अग्रेसर आहोत, जातीच्या विशेषाधिकारामुळे नाही हे मिथक आळवलं जातं. बुद्धीची जातीनिहाय वाटणी होत नसते, या शास्त्रीय सत्याकडे कानाडोळा केला जातो. एवढंच काय आपल्याच जातीच्या पुरोगामी व्यक्तींचा निषेध केला जातो. मंचावर आईचा खून करणाऱ्या परशुरामाची प्रतिमा असते.

ब्राह्मण समाजाने केलेल्या सामाजिक छळाची चर्चा ब्राह्मण समाज करत नाही. डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चवदार तळ्यातील पाणी प्यायलानंतर ‘शुद्धीकरण’ करणं अयोग्य होतं, असा ठराव ब्राह्मण सभेमध्ये होत नाही. १९३२ साली काळाराम मंदिरात प्रवेश नाकारणं गैर होतं अशी चर्चा होत नाही. गांधींच्या हत्येचा धिक्कार केला जात नाही. असे प्रश्न ब्राह्मण समाजातील पुरोगामी मंडळींनी पुन्हा पुन्हा विचारले पाहिजेत. सध्या लेखक विचावंतांच्या हत्यांमागचे मास्टरमाईंड तथाकथित उच्चवर्णीय आहेत हे सर्वांना माहीत असलेलं सत्य आहे. बहुजन समाजातील तरुणांना त्यांनी वेठीला धरलं आहे. संकुचित हिंदुत्वाची मांडणी मान्य नसलेल्यांची संख्याही मोठी आहे. पण त्यांच्या मौनामुळे हिंसक शक्तींना जोर येतो.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4598/Dene-Praneshache

.............................................................................................................................................

मराठा मोर्चात महिला पुढे होत्या ही चांगली गोष्ट घडली. पण मराठा स्त्रियांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातील अधिकाधिक सहभागासाठी कोणती पावलं उचलली जातील यासंबंधी फारसं विवेचन झालं नाही. ऐकू आला तो आक्रोश, जो सयुक्तिक होता. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं समर्थन होउू शकत नाही, कौटुंबिक हिंसेचंही नाही. पण या चर्चा घडल्या नाहीत. पण अॅट्रोसिटी अ‍ॅक्ट रद्द करण्याची मागणी मात्र पुढे आली. गावोगावी दलितांवर होणाऱ्या अत्याचारांचा विचार झाला नाही. नगर जिल्ह्यातील नितीन आगे या किशोरवयीन मुलाच्या खुनाचा उल्लेख झाला नाही.

समाजमाध्यमांवर या मुद्यांसंबंधी चिंतन होताना दिसतं, पण हे आवाज अल्प असतात. तिथं झुंडींचा थयथयाटच अधिक दिसून येतो. गोरक्षकांनी खून आणि धमक्यांचं सत्र सुरू केलं आहे. त्याला राजकीय पाठबळ मिळतं. खुनी गोरक्षक मोकाट सुटतात आणि बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना न्यायासाठी फिरावं लागतं. आपल्याकडून झालेल्या अन्यायाची समीक्षा होण्यापेक्षा अत्याचारित व्यक्तीवर ठपका ठेवला जातोय.

जाती-जातपंचायती/संघटनांनी विचार करणं, माफी मागणं आणि बदल घडवून आणणं आपल्याकडे अगदी क्वचितच घडतं. अन्यायात सतत भरही पडतेय. धार्मिक सुधारणा होताना दिसत नाही. अगदी ताजं उदाहरण म्हणजे शबरीमाला मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशाला होणारा विरोध आणि दोन महिलांच्या छुप्या पद्धतीनं केलेल्या प्रवेशानंतर देवाळाचं शुद्धीकरण केलं जाणं. एवढंच नव्हे तर या कृत्यांचं समर्थही केलं जाणं भूषणास्पद नाही. प्रतिगामी शक्तींमागे बहुसंख्य जनता उभी राहते इतपत आपली मजल गेली आहे.

शिवाय निव्वळ माफी मागितल्याने धर्म अधिक मानवतावादी होत नाही. पोपनी असंख्य चुकांची माफी मागितली असली तरी लगेच अन्याय दूर झाले नाहीत. कॅथलिक नन्सना आपल्या हक्कांसाठी सतत लढा द्यावा लागतो, त्यांची दखल घेतली जात नाही. काही महिन्यांपूर्वी केरळमधील भिक्षुणीवर एका प्रीस्टनं सतत लैंगिक अत्याचार केले. तिने चर्चकडे तक्रार केली, पण न्याय मिळाला नाही. दरम्यान पत्रकारांना या बातमीचा सुगावा लागल्यानं माध्यमांमध्ये ही बातमी झळकली. पीडित नननं या संबंधीचे निवेदन पोप यांच्या कार्यालयात पाठवलं. पण तिकडून उत्तर आलेलं नाही. अत्याचार करणाऱ्या प्रीस्टला अटक झाली, पण काही कालावधीतच त्यांची सुटकाही झाली आणि ते आपल्या कामावर रुजू झाले. व्हॅटिकनच्या पाठबळाशिवाय हे शक्य होणार नाही.

पीडित ननच्या पाठी तिच्या सहकारी नन्स खंबीरपणे उभ्या आहेत. पण त्यांच्यांवरही दबाव येतोय. पीडितेसोबत असणाऱ्या या नन्सची बदली करण्यात आली आहे. केरळच्या न्यायालयात चालणारा बलात्कार खटला खिळखिळा करण्याचा हा डाव आहे.

निव्वळ क्षमायाचनेनं अन्याय दूर होतील हा भाबडा विचार आहे. पण त्यामुळे पीडित समाज/व्यक्तींना दिलासा मिळू शकतो म्हणूनच ती आवश्यक असते. आपण केलेल्या अतिरेकांची जाणीव होणं, त्यावर विचार करणं आणि बदलासाठी वातावरण निर्माण करणं हेच पुढे टाकलेलं मानवतेचं पाऊल असतं.

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

लेखातील मते लेखकाची वैयक्तिक असून त्याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 26 January 2019

मोदी २००२ च्या गुजरात दंगलींची माफी का मागंत नाहीत याचं विश्लेषण भाऊ तोरसेकरांच्या या लेखातनं घेतलेलं आहे : http://bhautorsekar.blogspot.com/2013/02/blog-post_11.html . या लेखात लॉर्ड मेघनाद देसाई यांचं स्पष्टीकरण मी ब्राह्मणांच्या बाजूने युक्तीवादार्थ उचललं आहे. -गामा पैलवान


Aditya Apte

Fri , 25 January 2019

लेखिकेच्या पूर्वग्रहदूषित मतांमुळे असेल बहुधा पण त्यांच्याकडून हिंदुंची ( ब्राह्मणांसह ) एक वैशिष्ट्यपूर्ण वस्तुस्थिती बेदखल झालेली दिसते. रोजच्या जगण्यावर परिणाम करणारे धार्मिक आदेश संघटन हिंदू धर्मामध्ये नाही. बहुसंख्य हिंदू आपलं जीवनमान किंवा रोजचे निर्णय हे भगवद्गीतेत किंवा वेद पुराणांमध्ये बघून घेत नाही. किंवा खुद्द शंकराचार्यांना ही त्यात फारशी जागा नसते. त्यामुळेच हिंदू धर्मात एवढे वैविध्य दिसून येते. बहुसंख्य हिंदू लोकांना ( ब्राह्मणांसह ) अभ्यासक्रमातील सुभाषितांपलिकडे संस्कृतचे ज्ञान जाऊदे, साधे आकलनही नसते. अर्थात यात भूषण मानावं की नाही हा परत वेगळा वैयक्तिक प्रश्न आहे. पण या वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करून मध्य व पाश्चिमात्य पोथीनिष्ठ धर्माचरणाची गल्लत करून हिंदूंना बदनाम करण्याचं कारस्थान अनेक कथित पुरोगामी करत आहेत. "लोकांकडे बघू नका तर पोथ्यांकडे बघा," असा आचरट प्रचार करणाऱ्या जाकिर नाईक याच्याशी सदर लेखिकेचं साम्य दिसतं


Gamma Pailvan

Wed , 23 January 2019

अलकाताई, पहिली गोष्ट म्हणजे नथुरामने गांधींचा जो वध केला त्याचा ब्राह्मणजातीशी कसलाही संबंध नाही. गांधीवधाच्या माफीची ब्राह्मणांकडून अपेक्षा करणे हे न केलेल्या अपराधांची धोंड गळ्यात मारणे आहे. तसंच तुकारामाच्या गाथा पाण्यात बुडवण्याबद्दल. कालौघात ब्राह्मणांकडून चुका झाल्या असतील, पण त्याची जबाबदारी आजच्या ब्राह्मणांवर ढकलणं कितपत योग्य? इतरेजनांचा छळ करणे हे काही ब्राह्मणांचं धोरण नव्हतं. तत्कालीन रुढीच तशा होत्या. त्या रूढींचा विश्वस्त म्हणून नाममात्र दोष ब्राह्मणांच्या माथी येतो. यापलीकडे काहीही नाही. असो. तुमच्या हिंदूंना व विशेषत: ब्राह्मणांना लक्ष्य करण्याच्या मतांवरून वाटलं की हे अस्संच कुठेतरी आगोदर घडलंय. मेंदूला जरा ताण दिल्यावर आठवलं. त्याचं काय आहे की मोदींच्या नावाने सेक्युलर कंपू नेहमी ओरडंत असे की त्यांनी २००२ च्या दंगलींपायी माफी मागितली पाहिजे. पण मोदींना हा डाव बरोब्बर ठाऊक होता. जर त्यांनी माफी मागितली असती तर हेच सेक्युलर मग मोदींवर तुटून पडले असते की बघा आम्ही म्हणंत होतो तसे मोदी अपराधी आहेतंच. माफी राहिली एकीकडे, उलट अपराधगंड निर्माण केला असता. मोदी आजीबात बधले नाहीत. मग याच धर्तीवर आज जर कुण्या ब्राह्मणाने पूर्वजांच्या चुकांबद्दल माफी मागितली, तर कशावरून हे सेक्युलर अपराधगंड उत्पन्न करणार नाहीत? एकंदरीत सेक्युलर कंपूची बौद्धिक खाज शमावी म्हणून हिंदूंनी ( विशेषत: ब्राह्मणांनी ) पडतं घ्यायची आजिबात गरज नाही. वाटल्यास पोपला गोव्याच्या इन्क्विझिशन साठी माफी मागायला सांगा. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......