सिनेमाचा पडदा आणि प्रचार, अपप्रचार आणि बायोपिकच्या युद्धात हरवतेय ‘गोष्ट’!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Mon , 21 January 2019
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar मोदी सरकार नरेंद्र मोदी Narendra Modi उरी : द सर्जिकल स्ट्राइक URI द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर The Accidental Prime Minister

गेल्या साडेचार वर्षांत राष्ट्रभक्तीचा जो महापूर आला, त्यानं चित्रपटांचा पडदाही व्यापून टाकला. राष्ट्रभक्तीचा सर्वांत सोपा आणि काळजाला हात घालणारा प्रकार म्हणजे युद्धपट!

लष्कर, सीमा, सीमेवरचे सैनिक म्हणजे देशभक्तीचं अत्युच्च शिखर. त्यात पाकिस्तान म्हणजे भळभळती जखम, जी काश्मीर खोऱ्यामुळे उत्तरोत्तर अधिकच खोल आणि हाय डायबेटिसवाल्याप्रमाणे लवकर बरी न होणारी. एक प्रकारचं गँगरीनचं (नवदेशभक्तांना कदाचित ही उपमा आवडणार नाही!).

स्वतंत्र भारतानं पहिलं युद्ध पाहिलं १९६२ साली चीननं केलेल्या आक्रमणानंतर. हे युद्ध म्हणजे स्वतंत्र भारतातलं ‘पानिपत’! पण पानिपतचे आजही गोडवे गायले जातात. ‘तो पराभव नव्हेच’ असंही सांगितलं जातं आणि प्रत्यक्ष पानिपतात आज, त्या सरदारांचे वंशज राहताहेत. मात्र चीन युद्धाबाबत सगळं खापर फोडलं जातं ते पं. नेहरूंवर. त्यांची ‘हिंदी चिनी भाई भाई’ या घोषणेची खिल्ली उडवली गेली, तसेच शांततेचं प्रतीक म्हणून कबुतरं (पांढरी) उडवण्याच्या त्यांच्या कृतीवरही फिदी फिदी हसणारे माजघर वीर आहेत.

तो काळ सर्वच क्षेत्रांत ‘संवेदन’ जपण्याचा होता. काँग्रेसच्या राक्षसी बहुमतासह सत्तेत असूनही चीनची ही दगाबाजी आणि भारताची झालेली नाचक्की पं. नेहरूंना सोसवली नाही. त्या ताणाचा परिणाम २७ मे १९६४ ला झालेलं त्यांचं निधन. पण या युद्धादरम्यान नेहरूंवर लोकांचा विश्वास होता. लोकांनी घरातले दागदागिने निधी म्हणून त्यांना दिले होते. सिनेमासृष्टीपासून, उद्योग जगापर्यंत सर्वांनी आपआपल्यापरीनं त्यात योगदान दिलं होतं.

त्यानंतर भारतंने दोन युद्धं अनुभवली- १९६५ आणि १९७१ची. १९६५चं पाकिस्तानसमवेत पश्चिम-उत्तर सीमेवर; तर १९७१२चं त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानसह आजच्या बांगलादेशात. त्या सीमेवर दोन्ही युद्धं भारतानं जिंकली. १९७१ साली तर भारतानं बांगलादेश निर्मितीत हातभार लावून ‘पूर्व पाकिस्तान’ जागतिक नकाशावरून पुसून टाकला. इंदिरा गांधी यामुळे जागतिक नकाशावर आल्या आणि श्रीमंत राष्ट्रांच्या रडावरही.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4511/Brahmeghotala

.............................................................................................................................................

१९६५च्या युद्धाच्या वेळी लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते. ते युद्धही आपण जिंकलं आणि पाकिस्तानला ताश्कंद करारावर शास्त्रींनी ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा दिली. ज्यात पुढे वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी ‘जय’ विज्ञान जोडलं. शास्त्री आणि वाजपेयींच्या दुर्दैवानं २०१४ ते २०१८मध्ये डार्विन सिद्धान्त खोटा, गणपती म्हणजे पहिली प्लास्टिक सर्जरी असे म्हणणारे उत्तराधिकारी निपजले. असो.

६२ आणि ६५च्या युद्धजन्य परिस्थितीवर ‘हकिकत’, ‘उपकार’ यासारखे चित्रपट निघाले. ‘हकीकत’ला चीन युद्धाची पार्श्वभूमी होती. त्यातील ‘अब तुम्हारे हवाले वतन साथीयों’ किंवा ‘मेरा रंग दे बसंती चोला’ (शहीद), ‘सरफरोशी की तमन्ना अब दिल में है’ या गाण्यांनी जो एक अभिमान, गहिवर आणला होता, त्यात आजचा कृतक राष्ट्रवाद नव्हता. एक सहजता होती. सैनिकांप्रती आदरभाव होता. पण उठसूठ कुणी सीमेवर जवान अमुक करताहेत अशी दमबाजी करत नव्हतं. याच काळातलं ‘ए मेरे वतन के लोगों’ ऐका. त्याची संयमी चाल, शब्द आणि गांभीर्य वेगळाच माहोल उभा करतं. यानंतर खूप वर्षांनी ‘बॉर्डर’ सिनेमानं अशा प्रकारच्या संयत युद्धपटाचा अनुभव दिला. नागरिक आणि सैनिक यांना विभाजित करणं सुरू झालं मागच्या चार वर्षांत.

माझ्या स्मृतीप्रमाणे ६२ किंवा ६५च्या युद्धात जे जवान शहीद झाले, त्यापैकी एखाददुसऱ्याचे अंत्यसंस्कार लष्करी इतमामात झाले. कॅप्टन दिलीप गुप्ते हे आजही लक्षात राहिलेलं नाव. ६२, ६५, ७१ साली प्रत्यक्ष युद्धं झाली. त्यात जे जवान धारातिर्थी पडले, ते खरे शहीद. नियंत्रणरेषा  उल्लंघन, सीमेवरच्या चकमकी या लष्कराच्या नियमित सेवेचा भाग. ८० नंतर जगभर उन्माद पसरवणारा इस्लामी दहशदवाद किंवा आपल्याकडे तयार झालेले खलिस्तानी किंवा तमीळ टायगर यांच्याबरोबर लष्कराला लढावे लागले, ते आपातकालीन परिस्थितीत. खलिस्तानची चळवळ मोडीत काढली जे. एफ. रिबेरोंनी पंजाब पोलिसांना सोबत घेऊन. पण ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ हे देशविरोधी पुकारल्या गेलेल्या अंतर्गत युद्धाच्या विरोधातलं पाऊल होतं. तमीळ टायगरांचा प्रश्न तमिळनाडू आणि पुढे प्रत्यक्ष श्रीलंकेत जाऊन सोडवताना असंच आव्हान होतं. ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटात ते कुठल्याही अभिनिवेशासह मांडलंय. राजीव गांधींच्या हत्येचा कट हा विषय आहे त्या चित्रपटाचा. पण आजच्या ‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’सारखा बाजारुपणा त्यात नाही की, ‘उरी’सारखा ढोलबडवेपणा. तो चित्रपट सामान्य चित्रपटासारखा आला आणि गेला. आणि इकडे किरण खेरसारखी चांगली अभिनेत्री पक्षीय अभिनिवेशात म्हणते, “अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ ऑस्करला पाठवा”

आज जवानांबद्दल गळा काढणाऱ्यांना कदाचित आठवत नसेल पण वाजपेयी मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री असलेल्या जॉर्ज फर्नांडिसांवर शवपेटिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. त्यांनी राजीनामाही दिला, पण चौकशी पूर्ण होण्याआधीच ते मंत्रीमंडळात परतले. काँग्रेस किंवा अन्य कुणाच्या राजवटीत शहिदांच्या शवपेटीत भ्रष्टाचार झाला असता तर भाजपनं कुठल्या थराला आरोप केले असते याची कल्पनाच करता येईल. असो.

मुद्दा असा आहे की, देशभक्तीच्या भाजप, संघपुरस्कृत नव्या वातावरणात प्रचारपटांनी जो सपाटा लावला तो विशेष उल्लेखनीय आहे. यात मग अक्षय कुमार, अनुपम खेर, परेश रावल, प्रसून जोशी, मधुर भांडारकर एकदम सक्रिय होतात.

अनिल शर्माचा ‘गदर’ आणि आशुतोष गोवारीकरचा ‘लगान’ एकाच काळात आले. ‘गदर’मध्ये काश्मीर, चीर, खीर वगैरे शब्द वापरून संवाद होते, तर हिंदी सिनेमासारखी ढोबळ गोष्टही होती. ‘लगान’ तर ब्रिटिशांविरोधातलं बंड क्रिकेटखेळातून असं काही मांडून गेला की, त्याला ऑस्करमध्ये परदेशी भाषा विभागातल्या पाच अंतिम चित्रपटात स्थान मिळालं. ‘गदर’ भडक असूनही त्यावेळी आजच्यासारखा उन्माद नव्हता की कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांचा राग दरबारी होती. राजवट कुणाचीही असो या कलाकारांना, निर्माते-दिग्दर्शकांना चित्रपट म्हणून ते विषय हाताळायचे होते. ते त्यांनी तसेच हाताळले.

गेल्या साडेचार वर्षांत मात्र मोदी सरकारच्या ‘गुड बुक्स’मध्ये जायची स्पर्धाच लागली. एक गोष्ट रचून सरकारी योजनेचा प्रचारपट करण्याची अहमहमिका लागली. शिवाय हे करत असताना मोदी माहात्म्य ऑफ स्क्रिन गातानाही भाटाच्या पलीकडे काही लोक गेले. काँग्रेसचे भाट नव्हते? होते. प्रत्येक राजवटीत असतात. पण मोदी सरकारच्या काळात सत्ताधाधारी पक्षाचा अजेंडा घेऊन कलेच्या नावाखाली जे काही घडवलं गेलं, त्यात कला कमी प्रचार जास्त झाला. याशिवाय यातल्या काही कलाकृतींना नकळत कृतक राष्ट्रवाद आणि सोशल मीडिया ट्रोलिंगला प्रोत्साहन दिलं.

‘टॉयलेट - एक प्रेमकथा’, ‘परमाणू’, ‘अय्यारी’, ‘राझी’, ‘३१ ऑक्टोबर १९८४’, ‘उरी’, ‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ ही काही उदाहरणं. तर ‘गोल्ड’, ‘पटियाला हाऊस’, ‘रुस्तम’ यातूनही कृतक राष्ट्रवादाची फोडणी होती. ‘इंदू सरकार’ उघड उघड कशावर होता हे माहीत होतंच. पण मधुर भांडारकरांनी आणीबाणीसारखा गंभीर विषय ‘फॅशन’, ‘कॉर्पोरेट’सारखा उथळपणे हाताळला. निवडणुका होईपर्यंत या पद्धतीच्या आणखी जिलब्या पाडल्या जातील!

यापैकी कुणालाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गोरक्षकांची दंडेली, नोटबंदीत जीव गमावलेले शंभरावर लोक, काश्मीर खोऱ्यातील दगडफेक आणि लष्करानं जिवंत माणसाला जीपला बांधणं यात नाट्य दिसलं नाही. त्या जीपला अरुंधती रायला बांधायला हवं होतं, अशी निर्लज्ज प्रतिक्रिया परेश रावल यांची होती. यांना ‘कलाकार’ का म्हणावं? प्रकाश राजने अशा विषयांवर आवाज उठवला तर बॉलिवुडनं त्याच्यावर अघोषित बंदी घातली.

कलाकारांना जावी, उजवी, कुठलीही मतं, विचारसरणी असावी. राजकीय पक्षाबद्दलची निष्ठा असावी. पण तुमच्यातला कलाकार माणूसपण विसरून, झुंडीत सामील होतो किंवा हुकूमशहाला ‘फकीर’ म्हणत लाळ गाळतो, तेव्हा कलाकार ‘कलाकार’ राहत नाही.

या प्रचार-अपप्रचाराच्या युद्धात अचानक बायोपिकचंही प्रचंड पीक आलं. यातले काही बायोपिक ‘बायोपिक’ म्हणून उत्तम झाले, पण बहुसंख्य नीरस झाले. ‘मेरी कोम’, ‘मिल्खासिंग’ व काही प्रमाणात ए‘मएस धोनी’, ‘मंटो’ बरे होते. बायोपिकची अशी घाऊक निर्मिती बघता असं वाटतं लेखक, दिग्दर्शक, निर्माता यांना नव्यानं गोष्ट रचायचा कंटाळा आलाय किंवा ती तिकीटबारीवर चालेल का याचा आत्मविश्वास नसल्यानं आधीच प्रसिद्ध व्यक्तीचा जीवनपट आयता मिळतो, तो फक्त (त्यातल्या त्यात) नीट रचायचा. बजेट असल्यास उत्तम निर्मिती करायची आणि किमान गल्ला पदरात पाडून घ्यायचा!

या सर्व वातावरणात आता निर्माते स्त्री-पुरुषांच्या आत्मकथा, गौरव अथवा विक्रमकथा खणून काढताहेत. याशिवाय राष्ट्रपुरुष, स्त्रिया आहेतच. आता कुणाला गोष्ट नकोय. ट्राईड अँड टेस्टेड किंवा पॉपकॉर्नसारखं चटपटीत, स्मार्ट काहीतरी हवंय.

याचा परिणाम म्हणून कथेसोबत गाणंही हरवलंय. मागे जावेद अख्तर म्हणाले की, हल्ली चित्रपटातून साँग पिक्चरायझेशन गायब आहे! तुकडे तुकडे जोडायचे आणि पार्श्वसंगीतासारखं गाणं वाजवायचं. द्वंदगीत तर गायबच झालीत. त्यामुळे लिप सिंकही!

एकच बरी गोष्ट झालीय हिंदी सिनेमातला हिरो सेंट्रिकपणा कमी होऊन छोट्या गावातल्या, छोट्या माणसांच्या आयुष्याच्या गोष्टी येऊ लागल्यात. नायक-नायिका ग्लॅमर उतरवून मातीत उतरू लागलेत. पूर्वी हे भाषिक चित्रपटात होई, आता ते मुख्य हिंदी सिनेमातही होऊ लागलंय.

मात्र कृतक राष्ट्रवादाचा राजकीय रोग जितक्या लवकर या क्षेत्रातून बाहेर जाईल किंवा त्याचं समूळ उच्चाटन होईल तेवढं कलाविश्व ‘कला’ म्हणून निष्पक्ष, निर्मळ राहील. त्याला कसल्याच युद्धभूमीचं स्वरूप येणार नाही.

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................