अस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके
ग्रंथनामा - झलक
त्र्यं. वि. सरदेशमुख
  • राम गणेश गडकरी आणि त्यांची काही पुस्तके
  • Fri , 18 January 2019
  • ग्रंथनामा त्र्यं. वि. सरदेशमुख T. V. Sardeshmukh राम गणेश गडकरी Ram Ganesh Gadkari

२३ जानेवारी रोजी राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. त्यानिमित्तानं योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई इथं गडकऱ्यांच्या पन्नासाव्या स्मृतीवर्षानिमित्त झालेलं भाषण संपादित स्वरूपात. ‘संवाद’ या महाविद्यालयाच्या पत्रिकेतून…१ ऑक्टोबर १९६८.

.............................................................................................................................................

गडकऱ्यांची आठवण ५०  वर्षांनंतरही आपण का करतो? हा प्रश्न मला पुष्कळ दिवसांपासून पडला होता. गडकऱ्यांचे साहित्य तीन प्रकारचे आहे. ते त्यांनी गोविंदाग्रज, राम गणेश गडकरी आणि बाळकराम या तीन वेगवेगळ्या नावांनी लिहिले. साधारण १९०९ - १९१९ या दहा वर्षांतले हे लेखन पछाडून टाकणारे आहे. 

त्यांचे समकालीन

१८८५ मधली राष्ट्रीय सभेची स्थापना ते १९२० मधला टिळकांचा मृत्यू हा आपल्या सांस्कृतिक राजकीय जीवनातील एक महत्त्वाचा कालखंड. या काळातील वाङमयीन कर्तृत्व म्हणजे हरिभाऊ, केशवसुत, श्री. कृ. कोल्हटकर, कृ. प्र. खाडीलकर, शि. म. परांजपे, बालकवी आणि गडकरी. हरिभाऊंच्या कादंबऱ्या, श्रीकृंचा विनोद व गडकऱ्यांची नाटके अजून समोर आहेत. गडकऱ्यांचे शिक्षण अर्धवट झालेले. किर्लोस्कर कंपनीत दारावर उभे राहून त्यांनी नाटकाच्या जगात प्रवेश केला. खाडीलकर-कोल्हटकर या वाग्भटांनी नाटकक्षेत्र गाजवलेले होते. त्यांच्या- गडकऱ्यांतले वेगळेपण कशात आहे? ते शोधले पाहिजे. त्यांच्यावर समकालीनत्वाची छाप आहेच, पण त्यांची स्वतःची अशी प्रकृती आहे, जिच्यामुळे ते आजही तगून राहिले आहेत. नाटकाचे प्रयोग पाहणे आणि नाटक वाचणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. श्रीकृंची नाटके वाचवत नाहीत, त्यांच्या नाटकातील विनोदातही कृत्रिमता आहे. विषय घेऊन नाटके लिहिण्याची यातायात त्यात जाणवते. खाडीलकर नाटकांतून राजकीय घडामोडींचे पडसाद देत. टिळक त्यांचे पुरुषोत्तम. त्यांच्या मृत्यूनंतर कृप्रंची प्रतिभा थंड झाली.

भाषा

‘एकच प्याला’, ‘पुण्यप्रभाव’ व ‘राजसंन्यास’ ही तीन नाटके गडकरी १९१६-१७ या काळात एकाच वेळी लिहीत होते. विषय, तो हाताळण्याची रीत आणि भाषा या बाबतीत ही तीन नाटके, त्यांच्याकडे सूक्ष्मपणे पाहिले म्हणजे गडकरी भाषेवर काही वेगळे प्रयोग करताहेत असे वाटते. सिंधू, धुंडीराज, रामलाल, तळीराम इ. पात्राद्वारे गडकरी जीवनातील नाट्यात्मता प्रभावीपणे मांडतात. पण त्याच वेळी त्यांची भावित-अभावित भाषा कुठे न्यायचे तेथे घेऊन जाते. एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारे भाषा हाताळणे ही साधी गोष्ट नाही.  

प्रयोगशीलता

गडकऱ्यांच्या नाटकावरील समीक्षेची बरीच गफलत झालेली आहे. खांडेकर त्यांच्या जीवनदर्शनानेच मोहीत होतात, तर फडके त्यांच्या नाटकांना चमत्कृतीजनक घटनांची उतरंड म्हणतात. त्याचा भाषेचा झगमगाट प्रेक्षकांना बधिर करतो असे त्यांना वाटते. वस्तुतः गडकरी शब्दांनी नाट्य फुलवतात. ‘ऑब्जेक्टीव को रिलेटीव’चे तत्त्व त्यांच्या भाषावैशिष्ट्यात जाणवले पाहिजे. अनुप्रासाचा सुंदरपणा तोही अर्थ न बिघडवता उलट अर्थ वाढवणारा. हे मुद्दाम केलेले प्रयोग आहेत. प्रवेशांची पुनरावृत्ती वगैरे नवीन नाट्यप्रयोगांचा ब्रेख्तने सांगितले म्हणजे आपल्याला विचार करावा वाटतो, पण गडकऱ्यांनी केलेले प्रयोग आपण डोळसपणे पाहात नाही. पाल्हाळ, कृत्रिम प्रसंग, भलत्या ठिकाणी विनोद वगैरे गडकऱ्यांचे दोष आहेत खरे पण हे सर्व एका प्रयोगशीलतेतून येतात असे वाटते. विनोदाच्या ठिकाणी फार्सचाही उपयोग त्यांना करून बघायचा असतो. ’टॉमफुलरी ते ट्रॅजिक’ सर्व प्रकार ते वापरून पहातात. उदा. ‘भावबंधना’तील पहिला प्रवेश. मूळ गंभीर विषयाचा फार्स अवास्तव असेल. हे प्रयोग जमले असतील असेही नाही. पण प्रयोग करण्याची कुवत असलेला हा एकमेव नाटककार होय.

खलनायक

नायकात खलत्व आणि खलनायकात सत्-असत् संघर्ष, स्थिर-शांत जीवनाचा तवंग विस्कटलेला. जीव व वस्तुमान यांच्यातील अचाट गुंतागुंतीमध्ये व्यथेचे केंद्र - त्यावर उतारा कोणता? गडकऱ्यांच्या खलनायकांचा यादृष्टीने विचार करण्यासारखा आहे. कमलाकरापेक्षा जयंत स्वतःचा जास्त आत्मनाश करतो. कमलाकराच्या दुष्टपणाला प्रयोजनच नाही निदान या जन्मात तरी. वृंदावनही तसाच, घनश्यामचाही तोच नमुना. हे खलनायक नाहीत तर नायकच आहेत. या नाटकांचे विषय गडकऱ्यांच्या जीवनातून आलेलं आहेत असे वाटते.

लेखनामागे तीव्र वेदना. मनोभंगाची (प्रेम), अपमानशल्याची. त्यातून अस्मितादाहाचे प्रकटन. (The pain of existence) वैयक्तिक जीवनानुभवाच्या प्रतिक्रिया, कवितेत प्रेमभंगाची व्यथा तर नाटकात मानभंगाची. या दाहाने माणसाच्या मनोवृत्ती आडवाटा धरतात, फसगतीला जातात, आत्मघाताकडे नेतात, यातून खलप्रतिमांची निर्मिती. प्रेमभंग (जयंत), मानभंग (घनःश्याम, वृंदावन) त्यांनी अनुभवले आहेत. या सर्व पात्रांतून गडकरी स्वतःला पसरून ठेवतात. आपल्यात त्यांचे वा त्यांच्यात आपले रूप पाहतात. ही ‘मिररिंग’ची प्रक्रिया त्यांच्या नाटकांतून जाणवते. मराठी वाङमयात हा खेळ नवीन आहे. त्यासाठी वेगळी भाषा येते, अलंकारिकता, प्रतीकात्मकता इ. गोष्टी येतात.

मूल्यांची अग्निपरीक्षा

गडकऱ्यांची नाटकं पाहिली तर त्यांना पातिव्रत्याचे ऑब्सेशन आहे असे वाटते. पण त्याचे ते विडंबनही करतात. या मूल्यांचा गाभा राहतो की नाही हे पाहणे त्यामागे असावे. त्यांना निष्ठावंत प्रणय, इमानी मैत्री, पातिव्रत्य, संन्यास, त्याग, मातृभक्ती... अंतःशक्तींची मूल्ये महत्त्वाची वाटत, त्यातून येणारी अंतर्द्वंद्वे दाखवणे हे मराठी नाट्य साहित्यात प्रथमच होते. वृंदावनची प्रतिकात्मक भ्रष्टता आणि ‘माझी असहायता हीच माझी शक्ती आहे’ हे वसुंधरेचे उद्गार यातून गांधीवादाचेच पूर्वदर्शन जणू काही होते. एका परिने वसुंधरेचे काम सोपे होते, तिला फक्त वृंदावनशीच झुंजायचे होते. पातिव्रत्याप्रमाणेच मातृभक्ती हेही गडकऱ्यांचे आवडते तत्त्व. ‘तू आईसारखी आहेस’ असं नवऱ्यालाही वाटतं आणि वसुंधरा दिनार, भूपाळ व वृंदावन यांची आई होते. सुधाकरही रामलालला सिंधूविषयी म्हणतो, ‘माझी मानलेली आई गेली’. स्त्रीमध्ये ही जी सृजक, संरक्षक प्रेमळ मातृशक्ती आहे तिची श्रेष्ठता गडकरी अनेकदा दाखवतात.               

अस्तित्वविचार, दुःखसंवेदना

एकंदरच गडकऱ्यांच्या नाटकांमधुन मनुष्याच्या जीविताविषयी, दुःखाविषयी भान दिसते. मनुष्याला आपले अस्तित्व वेदनेने जाणवते. ‘आय सफर; देअरफोर आय अॅम’. दुःखानुभवाने जीवनाची जाणीव होते हा अस्तित्वाविषयीचा विचार गडकऱ्यांच्या नाटकांमधून दिसून येतो. व्यक्तिमूलक जाणीव, तिला आपण अस्मिता म्हणू, ही महत्त्वाची गोष्ट त्यांच्या नाटकांतून दिसते. व्यक्तीची जाणीव वस्तूजातानेही होते. मी आणि न मी यातून व्यक्तिमूल अस्तित्वाचे आणि नास्तित्वाचेही भान होते. गडकरी हे भान, ‘अवेअरनेस’ अनेकदा दाखवतात प्रेम आणि मरण इतक्यांदा, इतक्या वेगवेगळ्या प्रकारे येते त्यातून हे भान दिसून येते. ‘मरणाचे स्मरण असावे’ असे रामदास म्हणतात, ते जीवनाचा अर्थ लागावा म्हणून. दुःख हे एका अर्थाने मरणच असते. ‘क्षणाक्षणाला जनन मरण’ हा मराठी कवितेतही नवाच विचार होता. त्या जाणिवेमुळे जीविताला ‘पर्सेप्शन’ येईल. सुधाकर, वृंदावन, घनःश्याम या त्याच्या तऱ्हा आहेत, सिंधू त्यातून थोडी वेगळी. अस्तित्व तिने जसेच्या तसे घेतले आहे, काही टाळायचे नाही. ती बोलत नाही. अस्तित्वाचा अर्थ दुःखातूनच येत असतो हे गडकऱ्यांना दाखवायचे आहे. आजच्या नव्या जाणिवेला दुःखाचे भान असणे आवश्यक आहे. मूल्यांच्या मांडणीतून गडकरी काही वेगळ्याच विषयाला हात घालतात असे मला वाटते. यादृष्टीने गडकऱ्यांच्या नाटकाचा हा त्रोटक विचार मांडला आहे.

.............................................................................................................................................

'संपूर्ण गडकरी खंड १ ते २' या पुस्तकाची खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -

https://tinyurl.com/ycqo37j6

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......