‘नाट्यगृहां’च्या नामकरणातून ‘कलावंत’च गायब!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Thu , 03 January 2019
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar नाट्यगृहे बाळासाहेब ठाकरे यशवंतराव चव्हाण मंगेश तेंडुलकर

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणेकर, पर्यायाने महाराष्ट्रातील रसिकांस एक आनंददायी बातमी वाचायला मिळाली. बातमी काय? तर नव्या वर्षात पुणेकरांना चार नव्या नाट्यगृहांची भेट! पूर्वी काही पेठांमध्ये सामावलेले पुणे आता मेट्रो, स्मार्ट सिटी झाल्याने नाट्यगृहांची चणचण भासतच होती. मॉलसंस्कृतीने सिनेसृष्टीला बहुपडदा सिनेगृहांची सोय केल्याने सिनेमांसाठी आता स्वतंत्रपणे थिएटर बांधण्याचा प्रघात संपला. आहेत ती एकपडदा थिएटर्सही हळूहळू अस्तंगत होत आहेत. पण आजपर्यंत ‘संकुल’ हा शब्द वापरणाऱ्या नाट्यमंदिरात एकच नाट्यगृह असते, ही वस्तुस्थिती आहे.

पुण्यात जी चार नवीन नाट्यगृहे होणार आहेत, त्यापैकी दोन नाट्यगृहे असलेल्याच नाट्य\कला गृहाच्या पोटात होणार आहेत. उरलेल्या दोनपैकी एक सिंहगड रस्त्यावर व एक हडपसर येथे होणार आहे. ही चारही नाट्यगृहे महापालिकेतर्फे उभारली जात आहेत. ती या वर्षभरात विविध महिन्यांत लोकार्पण केली जातील.

एका वर्षात चार नवीन नाट्यगृहे म्हटल्यावर निर्माते, कलाकार, प्रेक्षक यापेक्षा नाट्यव्यवस्थापक अधिक आनंदी झाले असतील. कारण नाट्यगृहांच्या ‘तारखा वाटप’ हा बोफोर्स, राफेल, ऑगस्टापेक्षा अधिक चर्चेचा विषय, पार नाट्यसंमेलन ते सांस्कृतिकमंत्री यांच्यापर्यंत गेलाय. विद्यमान सांस्कृतिक मंत्र्यांनीच ‘तारीख माफिया’ ही संज्ञा प्रथम वापरली होती. यावरून त्याचे गांभीर्य लक्षात येते. ते असो.

यावेळी एक गोष्ट विशेषत्वाने जाणवली. ती म्हणजे सर्वसाधारणपणे मनपा अथवा शासनाने नाट्यगृह उभारले आणि ते लोकार्पणाला मुहूर्ताजवळ आले की, त्याच्या नामकरणाचा वाद रंगतो. मात्र यावेळी पुणे मनपाने प्रस्तावित नाट्यगृहे नामकरणासहच निर्माण केलीत!

या नाट्यगृह उभारणीचे प्रस्ताव कधी आले, मंजुरी कधी मिळाली, त्याच्या नामकरणाचा प्रस्ताव\ठराव\अध्यादेश याबाबतची माहिती यथावकाश मिळेलच (हवी असल्यास माहितीच्या अधिकारात!) पण यात सर्वपक्षीय राजकीय समाधान दिसते. सर्वसामान्यांच्या अथवा कलाजगताच्या अपेक्षांचा अजिबातच विचार केलेला दिसत नाही. आणि ही बाब रसिक व कलाजगतासाठी खेदजनक आहे.

या चार नाट्यगृहांपैकी एक नाट्यगृह ३०० आसन क्षमतेचे हे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आवारातच उभारले जातेय ‘बाळासाहेब ठाकरे कलामंदिर’ म्हणून!

दुसरे नाट्यगृह बाजीराव रस्त्यावरील ‘हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन’ (दमलात? वाचूनच? मग जाहिरातीत हिं.शि.बा.ठा.व्यं. कलादालन असं टाकूया?), यातच २५० आसन क्षमतेचे नाट्यगृह बांधले जातेय. त्याचे वेगळे नामकरण होणार का? की ते मूळ कलादालनाचे नावच धारण करणार? नव्याने नामकरण झाल्यास व सध्या युतीचे सरकार असताना प्रबोधनकार ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा दिनदयाळ उपाध्याय अशा कुणाचे तरी भाग्य फळफळेल.

तिसरे नाट्यगृह सिंहगड रस्त्यावर होत असून त्याचे नामकरण ‘छत्रपती शिवाजीराजे भोसले नाट्यगृह’ असे झालेय.

चौथ्या हडपसर येथील नाट्यगृहाचे नामकरण ‘विठ्ठल तुपे नाट्यगृह’ असे असणार आहे. विठ्ठल तुपे हे समाजवादी चळवळीतून राजकारणात आलेले मोठे नाव. हडपसर व तुपे हे समीकरणही जुने. पुढे ते काँग्रेसमधून खासदार झाले. अंधूक स्मृतीप्रमाणे त्यांना नाट्यक्षेत्रात गती होती व कधी काळी त्यांनी अभिनयही केला होता. (चूकभूल द्यावी घ्यावी) पण नाट्यगृहाला त्यांचे नाव ही ‘राजकीय कृती’ जास्त आहे.

अशा प्रकारे निर्माणाधिन अवस्थेतच नामकरण झाले असल्याने आणि जी नावे दिली आहेत ती पाहता, त्याचा पुनर्विचार अशक्यच! आश्चर्य याचे वाटते नाट्यइतिहासात पुण्याचे नाव, योगदान, कलावंत, लेखक, दिग्दर्शक यांचे जन्म, वास्तव अथवा कारकीर्द पाहता यापैकी कुणाचीही आठवण पालिका कारभाऱ्यांना येऊ नये? बाळासाहेब ठाकरे, छ. शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण यांच्या कर्तृत्वाबद्दल वादच नाही. पण त्यांची नाममुद्रा किती वेळी? किती ठिकाणी?

जर पुण्यातच एका बाजूला बाळासाहेबांच्या नावे कलादालन आणि त्यातच आता नाट्यगृह होणार आहे, तर पुन्हा कोथरूडच्या नव्या छोटेखानी नाट्यगृहास त्यांचे नाव कशाला? त्याला व्यंगचित्रकार, नाट्यसमीक्षक व जागरूक स्वयंसेवी कार्यकर्ते मंगेश तेंडुलकर यांचे नाव अधिक उचित झाले नसते का? बाजीराव रस्त्यावरच्या नव्या छोटेखानी नाट्यगृहास राजा नातू यांच्याइतके समर्पक स्मरण नाही. ‘पुरुषोत्तम’च्या संयोजनाने पुण्याची, पर्यायाने महाराष्ट्राची नाट्यप्रयोग शाळा साध्या पायजमा, सदरा व शबनमवर उभी केली त्यांनी.

ही झाली अलीकडची नावे. पण शरद तळवलकर, चिंतामणराव कोल्हटकर, राम नगरकर, निळू फुले, पं. भास्कर चंदावरकर, कृष्णदेव मूळगुंद, विजय तेंडुलकर, पु.ल.देशपांडे, यशवंत दत्त, प्रशांत सुभेदार, लालन सारंग (गेली अनेक वर्षं त्या पुणेकरच झाल्या होत्या), स्मिता तळवलकर, संजय सूरकर, सुधीर मोघे, आनंद मोडक, टिळेकर याशिवाय अगदी तरुण रंगकर्मी सुहास कुलकर्णी, राजीव-संजीव खंडागळे, वि. भा. देशपांडे अशी कितीतरी नावे. यातली सगळीच नामकरण-स्मरण करण्यायोग्य वाटरणारही नाहीत कदाचित, पण त्यांच्या स्मृती विविध प्रकारे जपता येतात\येतील.

संपूर्ण भारतात आणि नंतर जगभरात जी आजही अभ्यासली जाते, त्या दलित रंगभूमीची स्थापना पुण्यात झाली. तिचे संस्थापक सदस्य भि.शि. शिंदे (आबा) एक उत्तम लेखक, संघटक व समन्वयक होते. ते खडकवासल्याच्या अलीकडे उत्तमनगरला राहत. सिंहगड रस्त्यावरील नाट्यगृहास त्यांचे नाव देता आले नसते? का त्यासाठी येरवडा किंवा खडकीला नाट्यगृह उभारायला हवे?

पुण्यात अगदी बालगंधर्व, गडकरी कालखंडापासून आताच्या उपेंद्र लिमये, अनिरुद्ध खुटवडपर्यंत लाखोंनी प्रेक्षक\दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ निपजलेत, व्हाया डॉ. लागू, जब्बार पटेल, सतीश आळेकर, मोहन आगाशे, विक्रम भोसले, अखंड अविरत यादी होईल. याशिवाय चित्रकार, गीतकार, संगीतकार, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, निर्माते, व्यवस्थापक या सगळ्यांना वगळून तीच ती नावे आम्ही का वापरतो?

बरे या ऐतिहासिक, राजकीय वंदनीय व्यक्तींचे स्मरण आम्हाला कुठेही चालते! भाजीमंडई, एसटी- रेल्वे स्थानक, विमानतळ, इस्तिपतळ, भुयारीमार्ग, महामार्ग कुठेही! शिवाजी महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नावे नाट्यगृहे असताना पुन्हा त्यांचीच नावे का?

अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे माटुंगा येथे जे नाट्यसंकुल आहे, त्याला यशवंतराव चव्हाणांचे नाव दिले गेले. बहुधा अंतिम टप्प्यात आघाडी सरकारने, विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थमंत्र्यांनी भरघोस मदत केल्याने (शरद पवारसाहेब सुरुवातीपासून होतेच) यशवंतरावांचे नाव दिले असावे. शिवाय यशवंतराव राज्याचे पहिले मुख्यमंत्री, ‘मंगल कलश’ स्थापणारे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नाटक करमुक्त करणारे! त्यांच्यासारखा सुसंस्कृत, बहुश्रुत राजकारणी आता अशक्य पण-

या संकुलासाठी ज्यांनी भरपूर परिश्रम घेतले, वाद अंगावर घेतले, शत्रू तयार केले, अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागलेल्या मच्छिंद्र कांबळी यांचे नाव या संकुलास देणे अगदीच अनाठायी झाले नसते. गिरणी व कामगार रंगमंच ते व्यावसायिक रंगभूमी असा झपाटलेला प्रवास, अभिनयात बावनकशी, यशस्वी निर्माता आणि मालवणी बोलीभाषेला जगभर नेणारा हा अवलिया आपण वादविवादापलीकडे निर्लेप मनाने पाहू शकलो नाही. गिरणगावाला जोडून असणाऱ्या दादरमध्ये त्यांचे स्मारक यथोचित ठरले असते.

मच्छिंद्र कांबळी विवादास्पद, पण शिवाजी पार्कातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढलेल्या सेनापतींपैकी एक, दै. ‘मराठा’चे संस्थापक संपादक, नाट्य-चित्रपट लेखक, ‘श्यामची आई’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या आचार्य अत्र्यांचे नाव का दिले नाही?

अत्र्यांची हयात वरळीत गेली. अत्र्यांच्या नाटकांनी त्यांच्या काळात धुमाकूळ घातलाच, पण मरणोत्तर ८०-९०च्या दशकातही त्यांनी मराठी रंगभूमी गाजवली. विजय चव्हाण, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, वर्षा उसगावकर यासह विजय केंकरे, प्रकाश बुद्धिसागर ते सुधीर भटांची ‘सुयोग’ हे सगळे अत्र्यांचे देणे. यशवंतरावांना ‘च’चे महत्त्व विशद करणारे अत्र्यांचे नामस्मरण आम्ही कुठे केले? तर कल्याणमध्ये! (जे बऱ्याचदा बंद असते!)

अलीकडेच नूतनीकरण केलेल्या मुंबईतल्या विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात गेलो होतो. पायऱ्या चढून वर जाताच समोर भव्य तैलचित्र मा. बाळासाहेब ठाकरे यांचे! नाट्यगृहात प्रवेश करण्याच्या दाराजवळच्या भिंतीवर पं. दीनानाथांचे तैलचित्र दुर्लक्षित राहावे असे.

भविष्यात कुणी बा‌‌ळासाहेबांनाच दीनानाथ मंगेशकर समजले तर त्याला आपला इलाज नाही! ठाकरेंचा मान राखताना कळत-नकळत दीनानाथांचा अपमान तोही ठाकरे-मंगेशकर ऋणानुबंध असताना?

आमच्या मते यापुढे धोरण म्हणून शासन, महापालिका ते ग्रामपंचायची यांना एक अध्यादेश द्यावा. क्रीडा\कलासंकुले, नाट्य\सिने कलादालने यांना त्या क्षेत्रातील व्यक्तींचेच नाव द्यावे. ऐतिहासिक पुरुष\स्त्री, राजकीय नेते यांची नावे देऊ नयेत.

शिवाय ज्या नावाने आधीच महाराष्ट्रात कुठे नामकरण, तशाच कला\नाट्यगृहाला झाले असेल तर त्याची पुनरावृत्ती टाळावी. व्यक्तीची थोरवी कुठेही लादू नये. उदा. पनवेलच्या नाट्यगृहाला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंचे नाव हा क्रांतिकारत्वाचाच अपमान आहे. असाच प्रकार जळगावात घडला आहे. तिथल्या नव्या ‘नाट्यगृहास संभाजी महाराज नाट्यगृह’ असे नाव देऊन झालेय! (पुढेमागे जळगावचे प्रायोगिक रंगकर्मी शंभू पाटील यांचेच तर हे नाव नाही ना? असेही वाटू शकते!)

महाराष्ट्रातले रंगकर्मी, नाट्यपरिषद, चित्रपट महामंडळ व रसिक प्रेक्षकांनी या ठोक सरकारी नामकरणावर व्यक्त होऊन या पुढील काळात नामकरणातून कलाकारच वगळला जाणार नाही, याची काळजी घ्यावी. येत्या नाट्यसंमेलनात संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी आणि परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी, महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी जाहीरपणे हा विषय धसास लावावा. त्यासाठी त्यांना नवीन वर्षासह शुभेच्छा!

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......