उदय प्रकाश याचं जगणं आणि लेखन यांची फारकत करता येत नाही!
ग्रंथनामा - झलक
शरणकुमार लिंबाळे 
  • ‘हे कारागिरा’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि उदय प्रकाश
  • Fri , 21 December 2018
  • ग्रंथनामा झलक उदय प्रकाश Uday prakash हे कारागिरा He Karagira

हिंदीतील मान्यवर कवी-कथाकार उदय प्रकाश यांच्या ‘सुनो कारीगर’ या कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद नुकताच ऋग्वेदाज लँग्वेज स्टुडिओतर्फे प्रकाशित झाला आहे. या अनुवादाला ज्येष्ठ साहित्यिक लिंबाळे यांनी लिहिलेली प्रस्तावना.

.............................................................................................................................................

उदय प्रकाश यांच्या कवितासंग्रहाला मी कधी प्रस्तावना लिहीन असं कधी स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. त्यांचं सुपरिचित नाव मला माहीत होतं. त्यांच्या साहित्याचा दबदबा जाणून होतो. एकदा-दोनदा आमची भेट साहित्यिक कार्यक्रमांमधून झाली होती. किरकोळ ओळख एवढं त्यांचं महत्त्व होतं. आमची घनिष्ट मैत्री ऑस्ट्रेलियाच्या कार्यक्रमांमधून झाली. त्यांची-माझी भेट भल्या सकाळी सिंगापूरच्या चांगी विमानतळावर झाली. तिथून आम्ही एकाच विमानातून मेलबोर्नला गेलो. मेलबोर्नमध्ये एकाच हॉटेलमध्ये राहिलो. तिथं आमच्या खूप गप्पा झाल्या. मेलबोर्नवरून आम्ही सिडनीला गेलो. तिथंही एकाच हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था होती. कार्यक्रमाच्या बऱ्याच वेळेला एकत्र असायचो. एकाच पॅनेलवर असायचो. त्यामुळे आमच्या चर्चा व्हायच्या. यातूनच आमची मैत्री घनिष्ठ होत गेली.

भारतभर आणि भारताबाहेर उदयकाश यांचं नाव आदरानं घेतलं जातं. ते सतत कार्यक्रमाच्या निमित्तानं देशात आणि देशाबाहेर जात असतात. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार आणि वाचक वर्ग मोठा आहे. भारताबाहेर ज्या काही भारतीय लेखकांना ओळखलं जातं, त्यामध्ये उदय प्रकाश यांचं नाव मोठं आहे. त्यांची शैली, जीवन आणि जगाकडे बघण्याची दृष्टी आणि त्यांची बांधीलकी याचमुळे त्यांचं लेखन नेहमीच लक्षात राहिलं आहे. त्यांच्या प्रांजळ जगण्याच्या भट्टीतून त्यांची कविता जन्मली आहे. त्यामुळे त्यांची कविता वाचून विसरली जात नाही. ती मनात घर करून राहते. उदय प्रकाश याचं जगणं आणि लेखन यांची फारकत करता येत नाही. मुळात त्याचं लेखन हे त्यांच्या जगण्याचं दुसरं रूप आहे असं म्हणावंसं वाटतं.

‘तुझ्या हाळीचं बोट धरून

चालत येईन

तुझ्या मागं मागं’

उदय प्रकाश कधीच एकट्यासाठी स्वान्तसुखाय कविता लिहिताना दिसत नाहीत. समूहाचा चेहरा असलेली ही कविता आहे. त्यांच्या कविता या उद्देशिका आहेत, असंच वाटत राहतं. कारण त्यांची कविता कोणाला तरी उद्देशूनच व्यक्त होताना दिसते. ही कविता सहज आकलन होण्यासारखी असली, तरी तिचा आशय, संदर्भ, आणि अर्थ हा खोलवर रुजलेल्या मुळांसासारखा जखडलेला दिसेल.

‘सुताराची लेक

तुझ्या स्वप्नात कोण असेल?

कोणतं झाड’

उदय प्रकाश यांच्या कवितेचा अनन्यसाधारण असं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कवितेतून विचारलेले प्रश्न. त्यामुळे ही कविता प्रश्नांची वाटते. समाजातल्या दैन्य, दारिद्र्य आणि दास्याविरुद्ध तीव्र धार असलेले हे प्रश्न आहेत. कवीचं मन सामान्य माणसाच्या अस्तित्वानं व्यापलेलं आहे. या कवितेतील सामाजिक वीण मनाला अस्वस्थ करते. असं असलं तरी ही कविता प्रचारकी थाटाची वाटत नाही. अनेक वेळा बांधीलकी व्यक्त करणारी कविता बटबटीतपणे व्यक्त झालेली दिसते, पण उदय प्रकाशच्या कवितेत तसं जाणवत नाही. त्यांचं चिंतन, त्यांच्या कवितेतील आशयघनता आणि कवितेला लाभलेली खोली, यामुळे उदय प्रकाश त्यांच्या अभिव्यक्तीइतकेच ठसठशीतपणे वाचकाला जाणवत राहतात.

त्यांची कविता ही अनेक वेळा जातक कथांसम वाटत राहते. त्यांच्या कवितांना एक कथापण आहे. कवितेतील कथाबीजांमुळे काव्याचं महत्त्व कमी होत नाही. उलट कथा आणि कवितेच्या सरमिसळीतूनही कविता वाचकाला थक्क करते. ही आर्ट गॅलरी आहे. कष्टकऱ्यांची अनेक रूपं या कवितेत भेटतील. या कवितेला कष्टकऱ्यांच्या घामाचा वास आहे. सामान्य माणसाच्या जगण्याची धग पकडणारी, त्यांच्या नाना तऱ्हा हेरणारी ही कविता आहे. त्यांच्या जगण्यातील सूक्ष्म तपशील तरल संवेदना होऊन या कवितेत व्यक्त झालेले आहेत. जीवनात हरलेल्या उदासी माणसाच्या मनासी संवाद साधणारी, त्याच्या दु:खाविषयी अपार कणव असणारी आणि त्याला थोपटून उमेद देणारी ही भव्य जाणीव आहे.

‘भाल्याच्या टोकावर लागलेले रक्त

तुमच्या शत्रूचे रक्त नव्हते

तुमच्या आपल्या तांड्याचे रक्त होते

तुम्ही तुमच्याच शत्रूंचे

प्रामाणिक सैनिक होतात…’

उदय प्रकाश यांच्या कवितेत डाव्या विचारांची प्रखर जाणीव व्यक्त होते. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तर, तो बंड करून उठतो, या विश्वासानं कवी भरडलेल्या दडपलेल्यांना त्यांची यातना आणि पीडा समजावून सांगताना दिसतो. कथा आणि त्यांचं एकजीव रसायन म्हणजे ही कविता आहे. कवी पीडित नाही किंवा पीडकही नाही. तो पीडितांच्या बाजूनं उभा असलेला कर्दनकाळ आहे.

‘जर सरकार आहात तर

प्रजेचं दु:ख समजून घ्या

पाऊस पाडा

शेतात पेरणी करून पीक आणा

अहो, हे कसलं सरकार?

राक्षसासारखं येता

उद्ध्वस्त करता

सारं गोळा करून घेऊन जाता’

उदय प्रकाश यांची कविता विधानांची कविता आहे. ही विधानं शिलालेखांसारखी आहेत. ही अभिव्यक्ती कृत्रिम वाटत नाही. अकृत्रिमरित्या व्यक्त झालेल्या प्रांजळ मनाची ही कबुली आहे. प्रत्येक कवितेत भाष्य आहे. या कवितेची भाषा आणि त्वचा पूर्णपणे राजकीय आहे. राजकीय प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठीच या कवितेचा अट्टाहास आहे. या कविता संविधानातल्या सरनाम्यासारख्या आहेत. कवितेत व्यक्त झालेली राजकीय भूमिका ही या कवितेचा प्राण आहे.

‘अखेर वारं काही किसनीया मोलकरीण तर नाही ना मालक

जी उसासे भरत

धुणीभांडी करील आपली

बादली भरभरून पाणी

गच्चीवर नेईल’

उदय प्रकाश अनेक वेळा कवितेची मोडतोड करतात. त्यांना कवितेपेक्षा भरभरून व्यक्त होणं महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे त्यांची कविताही दीर्घ कविता होताना दिसते. या दीर्घकवितेला बोलण्याची ढब लाभली आहे. कोणीतरी आपलं विश्वासानं ऐकतंय याभावनेतून व्यक्त झालेला हा संवाद आहे. त्यामुळे या कवितांना संवादाची लय प्राप्त झालेली दिसते. त्यांच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी निसर्गाच्या अनेक रूपांना मानवी रूपात पाहिलं आहे. निसर्गाची हालचाल आणि तपशीलानं ही कविता व्यापलेली आहे. या कवितेतील निसर्गाचा चेहरा मानवी सुखदु:खाचा आहे. कवीनं निसर्गाला आपल्या कवितेसाठी खुबीनं वापरलं आहे.

‘वडील पर्वताप्रमाणे

गर्दीतून चालत असत

त्यांच्या खांद्यावर मी

जंगली पोपटासारखा बसून राही’

उदय प्रकाश यांची कविता जितकी समूहाची आहे, तितकीच ती व्यक्तीचीही आहे.माणसाच्या जीवनमरणाचा विचार करणारी ही कविता आहे. त्यांची ‘मरण’ ही कविता सर्वपरिचित आहे. अत्यंत कमी शब्दांत ती व्यक्त होते, पण शब्दांतला आशय हा डोहासारखा आहे. ही कविता त्यांच्या ओळखपत्रासारखी आहे. ती मूळातून वाचली पाहिजे.

‘काहीच विचार न केल्याने

आणि काहीच न बोलल्याने

माणूस

मरण पावतो’

‘माणूस जागा राहावा’ म्हणून सतत पहारा देणारी ही जागल्याची कविता आहे. ही कविता नाही, एका जिवंत मनाचं शब्दांतून भेटणं आहे. हिंदीतल्या मूळ कविता तितक्याच अलगदपणे आणि स्वाभाविकपणे मराठीत आणण्याचं बिकट काम भाषांतरकारांनी केलं आहे. भाषांतरामुळे ही कविता कुठेच शुष्क झालेली नाही. उदय प्रकाश यांची शैली आणि काव्य मराठीत आणण्याचं श्रेय भाषांतरकारांचं आहे. त्यांनी ते लीलया पेललं आहे. हिंदीतली कविता जितकी भिडते किंवा स्वाभाविक वाटते, तितका जिवंतपणा या भाषांतरामध्ये ओतलेला दिसतो. हिंदीतून उदय प्रकाश वाचणं जमलं नसतं, ते या अनुवादामुळं जमलं आहे. त्यांनी मला प्रस्तावना लिहिण्याचा आग्रह केला, त्यामुळं उदय प्रकाश यांच्या सान्निध्यात चार क्षण जगण्याचं भाग्य मिळालं. मी अनुवादकांचा आभारी आहे.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

mangesh kulkarni

Fri , 21 December 2018

धन्यवाद, टीम अक्षरनामा


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......