‘रेखा’ अर्थात ‘भानुरेखा गणेशन’च्या जीवनाबद्दलचं कुतूहल शमवणारं पुस्तक
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
तृप्ती कुलकर्णी
  • रेखा आणि तिच्या चरित्राच्या मराठी अनुवादाचं मुखपृष्ठ
  • Fri , 21 December 2018
  • ग्रथनामा शिफार रेखा Rekha रेखा - द अनटोल्ड स्टोरी Rekha - The Untold Story यासीर उस्मान Yasser Usman

तिनं पडद्यावर असंख्य भूमिका साकारल्या, पण तिची पडद्यामागची ‘ही’ दडलेली भूमिका मात्र कुणीतरी साकार करायला हवी. होय! तिची कथा वाचताना असं वाटू शकतं. निदान एक वाचक आणि तिची चाहती म्हणून मला तरी तसं वाटलं. ती म्हणजे ‘भानुरेखा गणेशन’! हे नाव पटकन समजायला जरा कठीणच जातं. पण त्याऐवजी ‘रेखा’ असं म्हटलं की, मात्र डोळ्यापुढे पटकन तिच्या चित्रपटांच्या नावांची लांबलचक यादी येते. ‘खुबसुरत’, ‘उमरावजान’, ‘घर’, ‘इजाजत’ अशा अनेक समांतर आणि व्यावसायिक चित्रपटांची नावं आणि त्यातला रेखाचा दर्जेदार अभिनय आठवतो.   

चित्रपटसृष्टी म्हणजे मायावीनगरी. अनेकांची स्वप्नं फुलवणारी आणि अनेकांना स्वप्नं दाखवणारी. झगमगती, झळाळती अशी ही दुनिया. प्रसिद्धी आणि पैसा या दोन्ही गोष्टी अफाट मिळवून देऊ शकणारी. अक्षरशः एका रात्रीत नशीब बदलवणारी. पण तिच्या आश्रयाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सहजासहजी या गोष्टी मिळतात का? आणि तिच्या आश्रयाला येणारी प्रत्येक व्यक्ती ही अगदी राजीखुशीनं आलेली असते का? या झळाळीमागे असणाऱ्या काजळीचं काय? असे अनेक प्रश्न ‘रेखा - द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकामुळे माझ्या मनात निर्माण झाले.

हे पुस्तक आपल्याला फक्त रेखाचं जीवन चरित्र सांगत नसून ते त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीचं स्वरूप कसं होतं तेही सांगतं. झळाळीमागे असणाऱ्या काजळीचं दर्शन घडवतं. लेखक आणि सिनेपत्रकार यासीर उस्मान यांनी पुस्तकाच्या लेखन प्रेरणेचा हा उद्देश आपल्या मनोगतात स्पष्टपणे सांगितला आहे. हे पुस्तक लिहिताना त्यांना येणारे संमिश्र अनुभव वाचले की, रेखाच्या जीवनाबद्दलचं कुतूहल अधिकाधिक वाढत जातं.

चित्रपटाच्या रंगीबेरंगी दुनियेत सातत्यानं वावरणाऱ्या रेखाचं वास्तवातलं आयुष्य मात्र अगदीच कृष्णधवल होतं. स्वतःच्या नावाचा आणि आडनावाचाही त्याग करायला लागण्यापासून तिच्या संघर्षाला सुरुवात झाली होती. अगदी लहानवयात, मनाविरुद्ध, घरच्यांच्या दबावाला बळी पडून तिनं चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. ऑक्टोबर १९५४ सालची रेखा वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी म्हणजे १९६६ साली ‘रंगूला रत्नम’ या तमीळ चित्रपटात काम करत होती. जात्याच उत्तम बुद्धिमत्ता लाभलेल्या रेखाला शालेय शिक्षण मात्र मनाविरुद्ध अर्धवट सोडावं लागलं. रेखाची आई पुष्पवल्ली ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक उत्तम नावाजलेली अभिनेत्री होती आणि वडील दाक्षिणात्य चित्रपटातील नावाजलेले चित्रपटनिर्माता होते. त्यामुळे रेखानं चित्रपटात काम करून नाव कमवावं, अशी रेखाच्या आईची खूप इच्छा होती. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती खालावलेली असल्यानं तेव्हा दुसरा काही पर्यायही नव्हता.

त्यादृष्टीनं पाहता चित्रपटसृष्टी ही रेखासाठी तशी अज्ञात आणि त्रासदायक ठरायचं कारण नव्हतं, पण दुर्दैवानं रेखाला ना तिच्या आईच्या ओळखीचा फारसा फायदा झाला, ना वडिलांच्या नावाचा फायदा झाला. अनौरस संबंधातून जन्माला आलेली मुलगी अशा बातमीमुळे रेखाला समाजाच्या रोषाला कायमच तोंड द्यावं लागलं. सुरुवातीला अगदी वडिलांनीही आपली मुलगी म्हणून तिचा स्वीकार केला नव्हता. या गोष्टीचं शल्य रेखाच्या आईच्या मनात शेवटपर्यंत तसंच राहिलं. पुढं बऱ्याच कालावधीनंतर जेव्हा रेखाचा त्यांनी स्वीकार केला, तेव्हाचा घडलेला प्रसंग मोठा मजेशीर म्हणावा असा आहे. फिल्मफेअरनं तिच्या वडिलांना म्हणजे जेमिनी गणेशन यांना रेखाच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार दिला. त्या प्रसंगी त्यांनी आपली कन्या म्हणून रेखाचा जाहिररीत्या स्वीकार केला. जेमिनी गणेशन तेव्हा म्हणाले, “त्यांना त्यांच्या मुंबईस्थित कन्येकडून हा पुरस्कार मिळाल्याबद्दल फार फार आनंद झाला आहे.”

याच वेळी रेखानंही “माझ्या जीवनातील हा सर्वांत अभिमानास्पद क्षण आहे आणि तो म्हणजे मला आज माझ्या हातानं खुद्द माझ्या वडिलांना हा पुरस्कार प्रदान करण्याची संधी मिळाली आहे,” असे उद्गार काढले होते. अवघं बालपण वडिलांविना गेलं होतं. समाजाकडून तिरस्कारानं, अपमानानं वागवलं गेलं होतं. आई-वडील हयात असतानाही स्वतःच्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी झगडावं लागलं होतं. त्या रेखाचे हे उद्गार तिच्या व्यक्तिमत्त्वाचं वेगळेपण अधोरेखित करतात. चित्रपटसृष्टीत हिंदीसारख्या परभाषेशी जुळवून घेत, चुकतमाकत, स्वतःमध्ये बदल घडवून आणत, अखेरीस तिनं या मायावी दुनियेत स्वतःचं असं स्थान निर्माण केलं. पण या सगळ्या संघर्षात तिनं खूप काही गमावलं. तेही बऱ्याचदा अनवधानानं.

पूर्वार्धात आणि उत्तरार्धात पूर्णतः भिन्न चेहरा असलेल्या रेखाचा हा व्यक्तिगत जीवन प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेसा आहे. रेखानं आजपावेतो दीडशेपेक्षा जास्त चित्रपटांत काम केलं आहे. नियमितपणे योग साधना करणारी, काळाची पुढची पावलं ओळखून वागणारी अभिनेत्री रेखा ही गुलजार, मुझफ्फर अली, श्याम बेनेगल, हृषीकेश मुखर्जी, सावन कुमार यांसारख्या दिग्दर्शकांव्यतिरिक्त खऱ्या अर्थानं फारशी कुणाला कळलीच नाही असं म्हणावं लागेल. गुलजार आणि रेखा यांच्यातलं नातं हे फक्त व्यावसायिक पातळीवरचं नव्हतं तर गुलजारांची पत्नी राखी ही रेखाची चाहती असल्यामुळे रेखाचं त्यांच्या घरीही जाणं-येणं असायचं. ‘घर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या रेखाबरोबरच्या आठवणींनी गुलजार यांचे डोळे काही क्षण ओलावतात. ते सांगतात, “ही एक अस्सल कलावंताची अशी गुणवत्ता आहे. वो उस किरदार को लिबास की तरह पहेन लेती है.”

हृषीकेश मुखर्जींच्या ‘खूबसूरत’ चित्रपटाच्या बाबतीतला रेखाच्या आणि त्यांच्या संवादातूनही त्या दोघांमधलं बाप-लेकीचं नातं दिसून येतं. त्यांनी अगदी हक्कानं रेखाला सांगितलं की, “हा चित्रपट अतिशय अल्पखर्चात करण्यात येणार आहे. त्यामुळे तूच मला तुझे स्वतःचे असे साधारण पंचवीस कपडे दे. तसंच तुला आता चित्रपटाची पटकथासुद्धा माहीत झालीय. त्यामुळे अशा प्रसंगात तुला कोणते कपडे शोभून दिसतील, हेसुद्धा तुला माहीत आहेच. माझी अशी इच्छा आहे की, या सिनेमात तुझी जी वास्तवातली नैसर्गिक प्रतिमा आहे, तसंच तू दिसावंस. त्यामुळे चित्रीकरणाला येताना तुझ्या आवडीनुसार तू कपडे घालून ये आणि आपला सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत माझ्याकडेच तुझे ते कपडे सोपव.” याला रेखाही आनंदानं राजी झाली.                     

चित्रपटसृष्टीशी रेखाचं प्रदीर्घ नातं असलं तरी रेखाला तिथं कधीही चांगल्या प्रकारे वागवलं गेलं  नाही. एक कलाकार म्हणून इतरांना जो मानसन्मान सहज मिळाला, तसा तो रेखाच्या वाटेला फारसा आला नाही. अर्थात याला काही प्रमाणात का होईना खुद्द रेखाही जबाबदार आहे. सुरुवातीच्या काळात आपल्या अभिनयाकडे लक्ष देण्यापेक्षा इतर अनेक गोष्टींकडे लक्ष दिल्यानं, वेळेची कदर न केल्यानं रेखानं स्वतःचं अपरिमित नुकसान करून घेतलं.

आपल्या वैयक्तिक जीवनात समाजाला किती हस्तक्षेप करू द्यावा? कौटुंबिक गोष्टी किती चव्हाट्यावर आणाव्यात? आणि त्या किती काळ चवीनं रवंथ कराव्यात? याबाबतीत रेखानं निश्चितच काही मर्यादा आखायला हवी होती. सुरुवातीला निरनिराळ्या पत्रकार परिषदांमध्ये बिनधास्तपणे आपल्या जीवनाबद्दल बोलणाऱ्या रेखानं पत्रकारांच्या हातात जणू कोलीतच दिलं होतं. नंतर तिला त्याचे गंभीर परिणाम भोगायला लागल्यावर ती त्यापासून दूर होऊ लागली. सुरुवातीला काहीसं अल्लड, अपरिपक्व आणि बेफिकीर असणाऱ्या रेखाचं रूप अमिताभ बच्चन यांच्या प्रभावामुळे मात्र बदललं आणि एका सुंदर परिपक्व, दर्जेदार अभिनय करणाऱ्या सामर्थ्यवान, गुणी अभिनेत्री रेखाचं दर्शन सर्वांना घडलं. सुरवंटाचं फुलपाखरू होण्याच्या या काळात रेखाला आलेले व्यामिश्र अनुभव वाचताना तत्कालीन समाजाची मानसिकता ही आपल्याला अंतर्मुख करते.

हिंदी चित्रपटसृष्टीतलं तत्कालीन वातावरण, भारतीय समाजाची मानसिकता, कलाकारांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन, कलाकारातले आपापसांतले संबंध, चित्रपटसृष्टीशी संबंधित असणारी निरनिराळी मासिकं, नियतकालिकं, त्यातल्या तिखटमीठ लावून चघळल्या जाणाऱ्या सनसनाटी बातम्या, चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हेतुपूर्वक उठवल्या जाणाऱ्या अफवा, अशा अनेक गोष्टींवर हे पुस्तक प्रकाश टाकतं.  

कानफाट्या म्हणून नाव झाल्यानं रेखाच्या इतर चांगल्या गुणांकडे न पाहता तिच्या ठराविक चुकांचंच माप तिच्या पदरात कायम टाकलं गेलं. तिची असफल प्रेमप्रकरणं, तिचे अयशस्वी विवाह, तिच्या नवऱ्याची आत्महत्या अशा अनेक गोष्टींसाठी केवळ रेखालाच जबाबदार धरलं गेलं. तिच्यासोबत काम करणाऱ्या प्रथितयश कलाकारांनीही खऱ्या-खोट्याची चाड न बाळगता केलेली विधानं आणि तिच्या बरोबरचं त्याचं वर्तन वाचून आपल्याला अचंबित व्हायला होतं. नीतीमत्ता, पाप-पुण्य, प्रेम, त्याग यांना महत्त्व देणाऱ्या आपल्या हिंदी चित्रपटसंस्कृतीचा दांभिकतेचा बुरखा फाडण्याचं आणि वास्तवातला चेहरा दाखवण्याचं काम हे पुस्तक अगदी सहजतेनं करतं.  

या पुस्तकाचा मराठी अनुवाद केल्यानं मराठी वाचकाला आणि प्रेक्षकाला ही ‘द अनटोल्ड स्टोरी’ समजायला अधिक सोपी झाली आहे. चैतन्य डुम्बरे यांनी अतिशय प्रभावी अनुवाद केला आहे. आपण अनुवादित पुस्तक वाचत आहोत असं न वाटता हे स्वतंत्र पुस्तक आहे असं वाटतं. ओघवती भाषा असल्यानं प्रत्येक कथेगणिक रेखाला जाणण्याची उत्कंठा वाढत जाते.

‘रेखा’ हे हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक वादळी व्यक्तिमत्त्व आहे! तिच्यावरच्या सर्व आरोप-प्रत्यारोपांसह आपल्यापुढं सच्चेपणानं उभं राहतं. आयुष्यात घडणाऱ्या प्रतिकूल घटनांना कायमच झुंज देणाऱ्या वास्तवातल्या नायिकेचं हे शब्दबद्ध झालेलं रूपही तितकंच भावतं. रेखाबद्दल मनात आत्मीयता निर्माण करतं.

.............................................................................................................................................

‘रेखा - द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

तृप्ती कुलकर्णी

truptiamolkul@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

swapnil mangaale

Fri , 21 December 2018

सायन पब्लिकेशन्स


swapnil mangaale

Fri , 21 December 2018

कायतरी भानगड दिसते लका या वेबसायटची. कायकाय प्रकाशनांची नावं सुरुवातीलाच भडक ठशात झळकावतात, न् कायकाय प्रकाशनांची नावं इथं देतच नायत. आता बुक्सनामाच्या लिंकवर जावा, मग शोधा, असला खेळ हाय यांचा. बरं, सगळ्यांना एकच न्याव का नाय बरं. कायतरी भानगड दिसतेय लका.


swapnil mangaale

Fri , 21 December 2018

प्रकाशन कोणते


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......