‘सेपिअन्स’ : मानवी इतिहासाची रंजक सफर घडवून आणणारं पुस्तक
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
उत्पल व. बा.
  • ‘सेपिअन्स’चं मुखपृष्ठ
  • Fri , 14 December 2018
  • ग्रंथनामाGranthnama शिफारस सेपिअन्स Sapiens युव्हाल नोआ हरारी Yuval Noah Harari

युव्हाल नोआ हरारी या सध्या चर्चेत असणाऱ्या अभ्यासकानं आपल्या पहिल्या पुस्तकाला दिलेलं ‘सेपिअन्स’ हे नाव लक्षणीय आहे. माणूस हा भावनिक-बौद्धिकदृष्ट्या व वर्तनदृष्ट्या एक ‘गुंतागुंतीचा प्रकार’ असला तरी ज्या एका अंशतः आकलनीय-अंशतः अनाकलनीय, निरंतर चालणाऱ्या ‘वैश्विक प्रक्रिये’चा तो एक हिस्सा आहे, त्या प्रक्रियेच्या दृष्टीनं त्याची ओळख, त्याचं स्थान ‘सेपिअन्स’ हेच आहे. हे नामाभिधान माणसाला ‘पृथ्वीवरील विशेष महत्त्वाची, बुद्धिमान प्रजाती’ या श्रेणीतून काढून ‘जीवशास्त्रीय जमिनी’वर आणते. हरारीचं ‘सेपिअन्स’ हे पहिलंच पुस्तक. २०११ साली हिब्रू भाषेत लिहिलेलं हे पुस्तक २०१४ साली इंग्लिशमध्ये प्रसिद्ध झालं. पुढे त्याचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला. मराठीत वासंती फडके यांनी केलेला अनुवाद डायमंड प्रकाशनानं प्रसिद्ध केला आहे. 

मराठीत विज्ञानविषयक लेखन होत असलं तरी विज्ञानाच्या विविध क्षेत्रातील (भौतिक-रसायन-जीवशास्त्र, मेंदूविज्ञान, मानसशास्त्र, मानवी उत्क्रांती व इतर आनुषंगिक क्षेत्रं) घडामोडींचा, संशोधनाचा जो धांडोळा इंग्लिशमध्ये सातत्यानं घेतला जातो, त्यामानाने मराठीत हे प्रमाण तसं कमी आहे. जयंत नारळीकर, नंदा खरे, सुबोध जावडेकर, बाळ फोंडके, आनंद जोशी, मिलिंद वाटवे, रविंद्र रू. पं. आणि इतर लेखकांनी आपल्या लेखनातून विज्ञानाची विचारदृष्टी रुजवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आहे आणि मराठी वाचकांनी त्याबद्दल त्यांचं ऋणी असायला हवं. परंतु असे अपवाद वगळता मराठीत या विषयांबाबत आवर्जून चर्चा होत असल्याचं दिसत नाही. या क्षेत्रातील मूलगामी संशोधनही आपल्याकडे फारसं होत नाही हे त्यामागचं एक कारण आहेच, परंतु स्पष्टपणे सांगायचं झालं तर समाजमनाची चिकित्सक, शोधक अशी घडणही झालेली नाही. त्यामुळे हे विषय मोठ्या संख्येनं वाचकांचं कुतूहल जागं करत नाहीत. या पार्श्वभूमीवर ‘सेपिअन्स’चा मराठी अनुवाद प्रकाशित होणं ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे. अनुवादक व प्रकाशक यांचं त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करावंसं वाटतं. या पुस्तकाला वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे, हीदेखील उत्साहवर्धक गोष्ट आहे.  

एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करणं हे जिकिरीचं काम आहेच, पण त्या अनुवादाविषयी काही टिप्पणी करणं हेदेखील तसं जिकिरीचंच आहे. अनुवाद करताना अनुवादकाच्या भाषिक क्षमतांची कसोटी लागत असते. याशिवाय पुस्तकाच्या विषयवस्तूबाबतचं प्राथमिक ज्ञान, दोन्ही भाषांची समज आणि वाच्यार्थाबरोबरच ध्वन्यार्थही नेमकेपणानं लक्षात घेऊन अनुवाद अधिकाधिक सहज, सेंद्रिय करण्याचं कसब यासह उत्तम अनुवाद साध्य करणं ही तारेवरची कसरत ठरू शकते. विशेषतः ‘सेपिअन्स’सारख्या पुस्तकाला तर ते अधिकच लागू होतं. त्यामुळे अनुवादासाठी लागणारी मेहनत लक्षात घेता अनुवाद जर परिणामकारक उतरला नाही तर वाचक म्हणून माझ्यासारख्याला हळहळ  वाटते. त्यामुळे ‘सेपिअन्स’ मराठीतून वाचताना कुठेही रसभंग होऊ नये अशी माझी आंतरिक इच्छा होती आणि ती पुरी झाली! मूळ पुस्तकातील ‘कथन’ मराठीत प्रभावीपणे आणण्यात हा अनुवाद यशस्वी झाला आहे आणि त्याबद्दल वासंती फडके यांचं अभिनंदन करायला हवं. एक गोष्ट खरी की कुठलाही अनुवाद कितीही चांगला झाला तरी अखेरीस तो अनुवाद असतो आणि मूळ भाषेत लिहिताना जी ‘समतानता’ साधली गेलेली असते तिला किंचित धक्का लागूच शकतो. ‘सेपिअन्स’ही त्याला अपवाद नाही, पण एकूणात विचार करता अनुवाद चांगला झाला आहे हे नक्की. 

मूळ पुस्तकाची शैली बरीचशी कथनात्मक आहे. पुस्तक मानवजातीचा इतिहास मांडतं, पण मुखपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे ‘संक्षिप्तपणे’. (मराठी अनुवादात मुखपृष्ठावर हा शब्द असायला हवा होता.) पुस्तकाचं स्वरूप मानवजातीच्या इतिहासाकडे ‘बर्डस आय व्ह्यू’नं पाहण्याचं आहे. मानवी उत्क्रांतीविषयीचं एखादं पुस्तक ज्या तपशीलात विशिष्ट घटनांचा कार्यकारणभाव शोधतं, तसा कार्यकारणभाव तपशीलात शोधणं, हा या पुस्तकाचा उद्देश नाही. वाचकांचं बोट धरून त्याला मानवी इतिहासाची रंजक सफर घडवून आणणं आणि काही लक्षणीय पैलूंकडे त्याचं लक्ष वेधणं हे पुस्तकाचं उद्दिष्ट आहे आणि ते साध्य झालेलं आहे.

‘सेपिअन्स’ लोकप्रिय होण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे. सेपिअन्सनं निअँडरथालांना नामोहरम करणं, प्राणिसृष्टी मोठ्या प्रमाणात नष्ट करत स्वतःचा जम बसवणं, कृषीक्रांतीमुळे स्थैर्य येणं, परंतु या स्थैर्यामुळेच पुढचे अनेक प्रश्न निर्माण होणं, पैशाचा उपयुक्त शोध लागणं, धर्माचा उदय, साम्राज्यांचा जन्म आणि परिपोष, भांडवलशाहीचं आगमन  अशा अनेक महत्त्वाच्या टप्प्यांना पुस्तक स्पर्श करतं आणि या वाटचालीत वाचकाला गुंगवून ठेवतं.

सेपिअन्स स्थिरावत जाण्याची चर्चा संक्षिप्तपणे केलेली असल्यानं वाचनीयता कमी होत नसली तरी काही ठिकाणी प्रश्न अनुत्तरित राहतात. मराठी आवृत्तीत हे फार प्रकर्षानं जाणवतं त्याला तसं कारण आहे आणि मराठी आवृत्तीतील ती एक प्रमुख कमतरता आहे. मूळ पुस्तकात प्रत्येक प्रकरणात तळटीपा दिल्या आहेत आणि सर्व प्रकरणांच्या तळटीपा पुस्तकाच्या अखेरीस एकत्रितपणे दिल्या आहेत. या तळटीपा पाहिल्या की, लेखकानं आपली मांडणी करताना किती प्रचंड वाचन केलं आहे, संदर्भ धुंडाळले आहेत हे लक्षात येतं. त्यामुळे लेखकाच्या विधानांना, निष्कर्षांना आधार मिळतो. मराठी आवृत्तीत या तळटीपा दिल्या गेलेल्या नाहीत. त्यामागे काही तांत्रिक वा अन्य कारण असल्यास माहीत नाही, पण तळटीपा नसल्यानं वाचताना वाचकाला काही प्रश्न पडले आणि लेखकानं तळटीपेच्या रूपात काही संदर्भ दिले असतील तर ते वाचकाला उपलब्ध होत नाहीत. वैज्ञानिक, समाजशास्त्रीय, राजकीय अशा अभ्यासक्षेत्रांसाठी तळटीपा महत्त्वाच्या असतात कारण पुस्तकाच्या मर्यादेत जे सांगता येत नाही, ते पुरवणी वाचनाच्या स्वरूपात नोंदवायचं काम त्या करत असतात.

‘सेपिअन्स’ ही माणसाची ऐतिहासिक कथा असली तरी ती सांगताना युव्हाल हरारीनं अधूनमधून वर्तमान व भविष्याचाही आधार घेतला आहे. त्यामुळे वाचकाला ‘धागा जुळल्याचा’ अनुभव येतो आणि मुद्दाही नेमकेपणानं पोचतो. ‘सेपिअन्स’ हे कथा रचणारे प्राणी आहेत आणि या त्यांच्या वैशिष्ट्यानं त्यांना कायमच मदत केली आहे, हे सांगताना दुसऱ्याच प्रकरणात युव्हाल हरारीनं ‘प्युजो’ कंपनीचं उदाहरण देऊन काल्पनिक संकल्पनांवर श्रद्धा ठेवल्यानं व्यवस्था निर्माण होते, त्या व्यवस्थेचा भाग म्हणून इतर पूरक व्यवस्था उभ्या राहतात आणि माणसाची वाटचाल सुरू राहते, हा मुद्दा प्रभावीपणे पोचवला आहे. (यातील ‘प्युजो’ ही कंपनी उदाहरणादाखल घेतली आहे, हे उघड आहे. त्या जागी दुसरीही कंपनी चालू शकेल.)

इतर मुद्द्यांवर विवेचन करतानाही तो हे करतो. पैशाचं सार्वत्रिकीकरण कसं होत गेलं हे सांगताना त्यानं याचा खुबीनं वापर केला आहे. परंतु पैशाबाबत वाचत असताना एक प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. भटका माणूस जेव्हा शेती करायला लागला, तेव्हा तो एका जागी स्थिरावला. त्यातून अतिरिक्त उत्पादन वाढलं, संचय वाढला आणि माणसापुढील प्रश्नही वाढले, असं युव्हाल हरारीचं प्रतिपादन आहे. (हे इतरही अभ्यासकांचं प्रतिपादन आहे.) कृषीक्रांती झाली आणि आपण हळूहळू ‘चैनीच्या सापळ्यात’ अडकलो असं तो म्हणतो. पैशाबाबत मात्र तो लिहितो की, तत्त्वज्ञ, विचारवंतांनी पैशाला नावं ठेवली तरी कायदा, भाषा, संस्कृती, धर्मश्रद्धा यापेक्षा पैसा अधिक ‘खुल्या मनाचा’ आहे. ही एकमेव मानवनिर्मित व्यवस्था आहे जी ‘सर्व प्रकारची सांस्कृतिक दरी सांधू शकते’. आता ही दोन्ही प्रतिपादनं पहिली तर असं दिसेल की, त्यात ‘आजच्या संदर्भात’ तथ्य आहे. गतकालात जे घडलं त्यावर आज विचार करून त्या घटनांचं मूल्यनिर्णयन करणं ही एका अर्थी सोपी गोष्ट म्हणावी लागेल.

आणखी एक नोंदवण्याजोगी गोष्ट म्हणजे कृषीक्रांतीबाबत लेखकानंच एक शक्यता अशी वर्तवली आहे की, आयुष्य सुलभ व्हावं म्हणून कृषीक्रांती घडलीच नसेल. कदाचित सेपिअन्सच्या इतर काही आकांक्षा असतील आणि त्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी जाणीवपूर्वक स्वतःचं आयुष्य खडतर करून घेतलं असेल. मग असं असेल तर कृषीक्रांतीला ‘फ्रॉड’ म्हणता येईल का असा प्रश्न पडतो. (कृषीक्रांतीला लेखकानं ‘हिस्टरीज बिगेस्ट फ्रॉड’ म्हटलं आहे). ‘फ्रॉड’ या शब्दाबाबत मी जरा साशंक आहे. (मराठी अनुवाद ‘इतिहासातील सर्वात मोठी फसवेगिरी’ असा आहे जो योग्य वाटतो.) दुसऱ्या बाजूला पैशाचा शोध लागल्यानं व्यवहार सुलभ झाले हे अगदीच सरळ असलं, स्वीकारार्ह असलं तरी पैशामुळे ‘क्रयशक्ती’ हीच माणसाची प्रमुख शक्ती बनली आणि त्याच्या इतर शक्तींना किंमत उरली नाही हेही दिसतंय. मग पैशाच्या शोधालाही ‘फसवेगिरी’ म्हणायचं का? पुस्तक वाचत असताना या दोन मुद्द्यांसंदर्भात प्रश्न पडले म्हणून ते नोंदवले इतकंच. एखाद्या अतिशय अभ्यासू मांडणीत काही कच्चे दुवे विशेषत्वानं लक्षात येतात. त्याचं उदाहरण म्हणूनच त्याकडे बघावं. युव्हाल हरारीची अभ्यास क्षमता वादातीत आहेच. 

बऱ्याचदा असं होतं की, मराठी अनुवादापुढे कंसात मूळ इंग्लिश शब्द देणं श्रेयस्कर ठरतं. अनेक शब्द इंग्लिशमधून रूळलेले असल्यानं त्यांचा उल्लेख केल्यानं वाचन सुलभ होतं. पुस्तकात ते बऱ्याच ठिकाणी केलं आहे. उदा. पृष्ठ १६० वर ‘वायुगतिकदृष्ट्या’च्या पुढे कंसात ‘एअरोडायनॅमिक’ असं म्हटलं आहे. (शब्दार्थदृष्ट्या ते ‘एरोडायनॅमिकली’ असायला हवं किंवा ‘वायुगतिक’ नंतर लगेच कंसात ‘एरोडायनॅमिक’ असं लिहून कंस पुरा करून नंतर ‘दृष्ट्या’ असं हवं.) याच पानावर ‘सौर – तापक’च्या पुढे कंसात ‘सोलर हीटर’ म्हटलं आहे. पृष्ठ १६१ वर ‘लिंग’ आणि ‘लिंगभाव’ या शब्दांपुढे अनुक्रमे ‘सेक्स’ आणि ‘जेंडर’ हे शब्द कंसात आले आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे.  

दुसऱ्या बाजूला काही कच्चे दुवे जरा खटकतातदेखील. वानगीदाखल काही उदाहरणं देता येतील.  पृष्ठ १६२ वरील तक्त्यात ‘टेस्टोस्टेरॉन’ व ‘एस्ट्रोजेन’ या अनुक्रमे पुरुष व स्त्रीविशिष्ट संप्रेरकांचा उल्लेख करताना ही नावंच गाळली गेली आहेत. पृष्ठ १७० वर ‘common assumptions’ साठी ‘गृहीत धरलेल्या सर्वसामान्य समजुती’ याऐवजी ‘सामान्य गृहीतके’ हा शब्द अधिक समर्पक झाला असता. पृष्ठ १७२ वर ‘ideology’साठी ‘मतप्रणाली’ऐवजी ‘विचारधारा’ हा शब्द अधिक योग्य झाला असता. काही इंग्लिश शब्दांना समर्पक, रुळलेले मराठी प्रतिशब्द नाहीत हे खरं आहे. त्यामुळे ते आहेत तसेच वापरणं ठीक वाटतं. पृष्ठ ४०३ वर एके ठिकाणी ‘romantic’साठी ‘अद्भुतरम्यवादी’ असा शब्द वापरला आहे. तिथं देवनागरीत ‘रोमँटिक’ लिहिणंच अधिक योग्य झालं असतं. 

अनुवादामध्ये काही ठिकाणी शब्दयोजना खटकत असली तरी वाक्यरचना मात्र निर्दोष आहे. त्यामुळे आशयाला धक्का लागत नाही आणि सलग वाचनात अडथळा येत नाही. दुसरं असंही आहे की, अनुवाद करताना एखाद्या शब्दाचा वापर हा अर्थनिर्णयनासाठी (इंटरप्रिटेशनसाठी) खुला असू शकतोच. त्यामुळे शब्दाच्या उपयोजनाबाबत चूक-बरोबर ठरवणं थोडं अवघडही होतं. 

एकूणात ‘सेपिअन्स’ मराठीतून वाचणं हा सुखद अनुभव आहे. वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचावं. युव्हाल हरारीच्या ‘होमो डेउस’ या ‘सेपिअन्स’नंतरच्या पुस्तकाचा मराठी अनुवादही नुकताच प्रकाशित झाला आहे. मराठीत अशी पुस्तकं येत आहेत हे अतिशय आनंददायक आहे. युव्हाल हरारीच्या पुस्तकांनी हा एक शुभारंभ केला आहे असं म्हणायला हरकत नाही. इंग्लिशमध्ये विविध ज्ञानशाखांशी संबंधित जी उत्तमोत्तम पुस्तकं आहेत, ती मोठ्या प्रमाणात मराठीत यावीत आणि त्यांनी मराठी अनुवादाचं दालन समृद्ध करावं असं मनोमन वाटतं.  

.............................................................................................................................................

युव्हाल नोआ हरारीच्या ‘सेपिअन्स’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

युव्हाल नोआ हरारीच्या ‘सेपिअन्स’ आणि ‘होमो डेउस’ या दोन्ही पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................    

लेखक उत्पल व. बा. मुक्त पत्रकार व लेखक आहेत.

utpalvb@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Rajesh Thakur

Sat , 15 December 2018

उत्पल व. बा. यांना मूळ विषयाचे व अनुवादप्रक्रियेचेही आकलन नाही, असे खेदाने नमूद करावेसे वाटते. श्री. उत्पल यांनी केवळ दोन परिच्छेद मूळ पुस्तकातील विवेचनाविषयी काही अर्धेमुर्धे मुद्दे मांडले आहेत. प्रस्तुत पुस्तकाची याहून सखोल चिकित्सा वाचकांना आंतरजालावर वाचायला मिळते. श्री. उत्पल यांच्या लेखातील सर्वांत सदोष भाग म्हणजे अनुवादाविषयी त्यांनी तोडलेले तारे होत: "पृष्ठ १७० वर ‘common assumptions’ साठी ‘गृहीत धरलेल्या सर्वसामान्य समजुती’ याऐवजी ‘सामान्य गृहीतके’ हा शब्द अधिक समर्पक झाला असता. पृष्ठ १७२ वर ‘ideology’साठी ‘मतप्रणाली’ऐवजी ‘विचारधारा’ हा शब्द अधिक योग्य झाला असता. काही इंग्लिश शब्दांना समर्पक, रुळलेले मराठी प्रतिशब्द नाहीत हे खरं आहे. त्यामुळे ते आहेत तसेच वापरणं ठीक वाटतं. पृष्ठ ४०३ वर एके ठिकाणी ‘romantic’साठी ‘अद्भुतरम्यवादी’ असा शब्द वापरला आहे. तिथं देवनागरीत ‘रोमँटिक’ लिहिणंच अधिक योग्य झालं असतं." यात अनुवादातील त्रुटी कमी आणि उत्पल यांचे अपुरे आकलन जास्त दिसते. आयडिऑलॉजीला मतप्रणाली हाही तितकाच रास्त शब्दप्रयोग आहे. रॉमँटिकसाठी कोणी मराठी प्रतिशब्द योजण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यातील त्रुटी दाखवणे चालले असते, परंतु हे महाशय मराठी प्रतिशब्दाविषयी मतप्रदर्शन न करता मूळ इंग्रजी शब्दच वापरायचा आग्रह धरतात. असो. अशा बनावट विचारवंतांमुळे मराठी भाषेचे जास्त नुकसान होते.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......