‘वाघूर’ : राजकारणी आणि धोरणकर्त्यांसाठी अंक
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास हेमाडे
  • ‘वाघूर’चं मुखपृष्ठ
  • Wed , 12 December 2018
  • पडघम सांस्कृतिक दिवाळी अंक २०१८ Diwali ank 2018 वाघूर Vaghur

‘वाघूर’चा चौथा दिवाळी अंक २०१८ हा ‘नदी’ विशेषांक आहे. पहिल्या अंकापासून वाचकांना आणि मराठी सारस्वताला विशेष बौद्धिक खाद्य देणारा म्हणून ‘वाघूर’ वाचकप्रिय आहे.

संपादक नामदेव कोळी यांचे नाव प्रयोगशील आणि ‘वाघूर’ चळवळीचे उद्घोषक-प्रवर्तक म्हणून वाचकांना परिचित आहे. त्यांना ‘नदी’ विषयाची प्रेरणा मिळाली ती प्रसिद्ध सनदी अधिकारी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘एक नदी वाहत असते कायम माझ्यातून’ या कवितेने आणि नद्या, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन कार्यकर्त्या परिणीता दांडेकर यांच्या ‘आपल्या नदीच्या गोष्टी’ या फेसबुक ग्रुपवरील लेखनाने. सामाजिक माध्यमे विधायक भर कशी टाकू शकतात, याचा हा एक सज्जड पुरावा. 

नद म्हणजे प्रवाह. त्यापासून ‘नदी’ हे स्त्रीलिंगी रूप बनते. सतत वाहते ती नदी. मूळ ‘नद’चा अर्थ मोठी नदी. जेव्हा फक्त ‘नदी’ असा शब्द वापरला जातो, तेव्हा त्याचा अर्थ समुद्र असा होतो आणि नदीका म्हणजे छोटी नदी. अनुषंगाने नदीष्ण म्हणजे नदीतज्ज्ञ किंवा (कुठेही असला तरी वेगवेगळ्या) नदीत स्नान करणारा (म्हणून नद्यांचा माहीतगार). या अंकातील गणेश दिघे यांच्या ‘सवित सखी’ या लेखात नर्मदा ही अर्धी नदी आणि अर्धी नद आहे, असा एक आणि कश्यपऋषीच्या ‘नदस्तोत्रम्’चा दुसरा ‘नद’चा समर्पक उल्लेख याच अर्थाने येतो. संक्षेपात, नदी म्हणजे सतत वाहत असणे, जिवंत असणे.       

‘सतत प्रवाहीत असणे’ या अर्थाने ‘You cannot step into the same river twice’ (नदीत तुम्ही दुसरे पाउल टाकू शकत नाही) या हेराक्लीटस (इ.स.पू. ५३५ अंदाजे) या ग्रीक तत्त्ववेत्त्याच्या इंग्लिशमधील वचनाने या अंकाच्या वाचनाचा प्रवाह उसळी घेतो आणि वाचकाला त्या प्रवाहात खेचून नेत राहातो.

माणसाच्या विचार जीवनात आणि भावजीवनात नदीने मिळवलेले उच्च स्थान साऱ्या लेखनातून व्यक्त होते. साहित्य, संगीत, कला, सामाजिक व नैसर्गिक विज्ञान, त्याचे सहसोबती असलेले तंत्रज्ञान अशा विविध अंगाने हे लेखन ही मराठी सारस्वतात मोलाची भर टाकणारे ठरते. ते ताजे आहे, म्हणूनच समकालीन आहे, त्यामुळे आधुनिक दृष्टीने अंकाकडे पाहता येते.

१०३ लेखक, कवी यांचा अंक

अंकातील लेखनाचे गद्य आणि पद्य असे दोन विभाग आहेत. गद्यात ललित, कथा, निबंध आणि मुलाखत अशी वर्गवारी आहे, तर गद्यात नदीच्या कविता आहेत. दोन्ही मूळ मराठी साहित्य आणि अनुवाद सरिता अशा उपविभागल्या आहेत. बारा ललित लेखन, सहा कथा, पंधरा निबंध आणि एक मुलाखत, अशा चौतीस गद्य लेखनातून ‘नदीचे अंतरंग’ (अनुक्रमणिका) खुलून आले आहे. कविता विभागात एकोणचाळीस मराठी कविता आणि वीस अनुवादीत कविता आहेत. अशा एकूण १०३ लेखक, कवी यांनी हा अंक भरगच्च झाला आहे. लेखक, कवी आणि अनुवादक यांची श्रेयनामावली वाचकांना अनुक्रमणिकेच्या छायाचित्रातून कळेलच.     

गद्य विभागात संपादकांनी ललित, कथा, निबंध आणि मुलाखत असे प्रकार केले आहेत, पण त्यांच्यात तसा काटेकोर फरक करणे अवघड आहे. त्यांच्या रचना, लेखनशैली आणि भाषा यांचा तोंडवळा इतका सारखा आहे की, त्यांच्या वर्गवारीत फारसा फरक करता येत नाही. येथे ललित म्हणजे पूर्णपणे काल्पनिक रूपबंधात सत्याचे आविष्करण असे स्वरूप नाही. ललित भाषेचा बाज कथनाला आला म्हणून त्याला ललित म्हणायचे. त्यातही ‘मी आणि माझी नदी’ असा एक मुख्य प्रकार करता येईल, एवढे लेखन या अंकात आहे. त्यात ‘माझं नदीपण’ आणि नदीनं दिलेलं ‘मीपण’ ही भिन्न नैसर्गिक अस्मिता प्रत्ययास येते.

महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या, राज्याचा परिसर म्हणून शेजारी राज्यातील नद्या आणि एकूण भारतातील बहुतेक साऱ्या नद्यांचे उल्लेख, पुढे जाऊन शेजारी देशातून येणाऱ्या नद्यांचेही उल्लेख येतात. खेरीज नद्यांचे विविध दृष्टिकोनातून केलेले विविध प्रकार, उपप्रकार यांचीही माहिती मिळते. सारा संदर्भ भारतीय नद्यांचा असल्यामुळे वेदकालीन, पौराणिक आणि मध्ययुगीन कालखंडातील, तसेच विद्यमान काळातील नद्यांची नावे, त्यांच्याशी जोडलेल्या बहुरंगी, बहुंगी कथा, कथने यांची माहिती वाचकाला थक्क करते, यात शंका नाही. अर्थात महाराष्ट्रातील किंवा देशातील सर्वच नद्यांची माहिती मिळते, असे नाही. प्रत्येक जिल्ह्यानुसार नद्यांचा विचार केला असता तर कदाचित साऱ्या नद्या कवेत आल्या असत्या. ‘नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ विचारू नये’ हे वाक्य बहुतेक लेखनात असले असल्याने ते अंकाची ‘पंचलाईन’ ठरणे हे मात्र साहजिकच आहे.  

डॉ. आंबेडकरांचे योगदान 

सर्वांत महत्त्वाचा आणि दुर्लक्षित विषय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या संदर्भातील योगदान. नद्या आणि धरणे यातून होणारा भारतीय लोकांचा ‘जलआरोग्य’ पैलू थोडक्यात विशद करणारा हरि नरके यांचा ‘भारतीय नद्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा लेख या योगदानाची माहिती आणि समकालीन मूल्य यांचा पुनर्जागर करतो. नदीजोड प्रकल्प, पाण्याची गरज आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयीचा इशारा असे विषय प्रथम मांडण्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे जाते, याची जाणीव हा लेख करून देतो. मात्र ते श्रेय बाबासाहेबांना दिले जात नाही, ही खंत लेखक व्यक्त करतो. त्याचप्रमाणे राजकीय व सामाजिक पटलावर या मुद्द्यांच्या अंमलबजावणीची अनिवार्यता करणे अतिशय तातडीचे आहे, असे मुद्दे हा लेख उपस्थित करतो.

दोन स्त्रीवादी निबंध

या अंकात दोन स्त्रीवादी महत्त्वाचे निबंध आहेत. अॅन फेल्डहाउस या अमेरिकन संशोधिकेच्या ‘Water and Womanhood’ या पुस्तकाचा विजया देव यांनी ‘नदी आणि स्त्रीत्व’ या नावाने अनुवाद (पद्मगंधा प्रकाशन) केला. जुई कुलकर्णी यांनी त्याच नावाने परिचय लेख लिहिला आहे. दुसरा निबंध ‘नदी, बाई आणि भाषा’ हा समाधान पाटील यांनी लिहिलेला लेख. ‘नदी आणि स्त्रीत्व’ या लेखात नदी असणे हा शाप आहे आणि स्त्री असणे हाही पुरुषी शाप आहे. ‘कृष्णा’ हा शब्द स्त्रीलिंगी असली तरी नदी मात्र मूळ पुरुषी आणि विष्णुरूप आहे आणि ‘कृष्णाबाई’चा उत्सव प्रामुख्याने ब्राह्मण समाजाचा (म्हणजे जातीचा) उत्सव आहे, ही वेगळी माहिती येते. नदी आणि भाषा व नदी आणि बाई यांच्यातील साम्यभेद स्थळे यांची निरीक्षणे नदी, बाई आणि भाषा या तिन्ही जीवनाचे आधार कसे पुरुषी वर्चस्वाने दूषित झाल्या आहेत, याची जाणीव करून देतात. कविता विभागात याच विषयावर श्रीधर अंभोरे यांची ‘नदी आणि बाई (काही टिपणं)’ ही कविता आहे, तिला ते नवे नाव देतात ‘टिपणंकविता’. ती स्त्रीवादाचे वेगळे दर्शन देते.  

मुलाखत              

‘नदी वाहते’ या चित्रपटाशी संबंधित दोन लेखांपैकी एक मुलाखत आहे, तर दुसरा संदीप सावंत यांच्या चित्रपट निर्मितीच्या उर्जास्त्रोताचे आणि चित्रपटाच्या नेमका संदेशाविषयी आहे. निर्माते-दिग्दर्शक संदीप सावंत यांची संतोष पाठारे यांनी घेतलेली मुलाखत मौलिक दृष्टी देते. चित्रपट निर्मितीची प्रेरणा आणि प्रक्रिया यात स्पष्ट होते. हा चित्रपट राज्यातीलच काय पण देशातील प्रत्येक गावात पोहोचणे गरजेचे आहे.

‘नदी नांगरणारा माणूस’ हे विचित्र शीर्षक रवीप्रकाश कुलकर्णी यांच्या लेखाचे आहे. ही मोतीलाल पाटील उर्फ तात्या यांची सत्यकथा आहे. कोरडी नदी नांगरणे, असले विचित्र काम त्यांनी का केले? तात्यांनी कोरडी नदी नांगरून आजूबाजूच्या विहिरी भरगच्च करण्याचे विकसित केलेले तंत्रज्ञान हे जैवतंत्रज्ञानाइतकेच मौलिक आहे. समाज बहुधा अशा विचित्र माणसांमुळेच नदीसारखा प्रवाहित राहतो, याची ही गोष्ट आहे. एका चित्रपटाचा हा संपृक्त आशय आहे हा!     

या अंकाचा परिचय म्हणजे एक पुस्तकच होईल आणि ते पुस्तकच या दिवाळी अंकाची प्रस्तावना होईल, इतका हा अंक समृद्ध आहे. अंकातील प्रत्येक लेख, निबंध, ललित, कथा, काव्य, सारं काही नदीप्रमाणेच उसळतं आहे.

या अंकातील ललित, कथा, निबंध, मुलाखत आणि कविता असे विषय वेगवेगळे केले तर त्या प्रत्येकाचे उत्तम दर्जाचे, विषयानुसारी स्वतंत्र मूल्यवान संदर्भग्रंथ बनू शकतील, इतका हा अंक आशयघन आहे. हे सारे लेखन एकमेकांशी जोडणारे प्रवाही व ललित स्वरूपाचे आहे. हा अंक म्हणजे जणू ‘नदी’ विषयक लेखनातील नदीजोड प्रकल्पच झाला आहे.

एकाद्याच्या आयुष्यात समुद्र नसला तरी काही बिघडत नाही, तो दूर किनारी असतो. पण नदी, ओढा नसेल तर ते जीवन रुक्ष असते. कदाचित मनाची रचना आणि नदी, नदी आणि जीवनाचे मानसिक स्वरूप, नदी आणि ज्ञान अथवा नदी आणि तत्त्वज्ञान असा एखादा लेख आवश्यक होता. तत्त्ववेत्त्याच्या उद्धरणाने अंक सुरू होतो, तर असा विषय लेख नक्कीच वेगळी भर घालणारा ठरला असता.

सरदार सरोवर आंदोलन आणि मेधा पाटकर, चिपको आंदोलन आणि सुंदरलाल बहुगुणा यांच्यावरही लेखन हवे होते. खानदेशातील जगप्रसिद्ध लेखक कॉ. शरद् पाटील यांनी केलेलं नदी, स्त्री आणि गुलामी अशाही विषयाची गरज होती. त्यांचा ‘निऋती’ चा शोध विलक्षण आहे.

या अंकातील चित्रकारापासून लेखक-संपादकापर्यंत जवळपास प्रत्येक जण प्रत्यक्ष त्या त्या जागेवर जावून भटकून आलेला ‘ज्ञानभटका’ आहे. समर्थ रामदासांनी त्यांच्या महंतांना ‘राहावे दुर्बळाचेथे | देवालयी कां नदीतीरी’ अशी भटकण्याची आज्ञा दिली आहे. महर्षीं विश्वामित्रांच्या आज्ञेनुसार त्यांच्या बरोबर रानावनात शिक्षणासाठी भटकणारा राम ते छत्रपती शिवराय यांच्यापर्यंत असे भटके रामदास स्वामींसमोर होते. सामान्य लोकांची सुखदुःखे जाणून घ्यायची तर संन्याशाला आणि राज्यकारभारी मंडळीना श्रीमंत, शक्तिशाली लोकांबरोबर राहायचे नाही तर दुर्बल लोक असतात तेथे म्हणजे देवालयात आणि नदीतीरी सामान्यांमध्ये मिसळून राहायचे आहे. रामदास स्वामींचा आदेश तात्कालिक नसून चिरकालिक आहे. तो ‘आदर्श रामराज्याची’ आणि ‘आदर्श शिवराज्याची’ आठवण करून देतो. सांप्रतकालीन सर्वपक्षीय राज्यकर्ते लोकांत मिसळत नसल्यामुळेच आज नदीचे प्रश्न उग्र बनले आहेत, त्याचीच साक्ष हा अंक देतो.

विद्यमान आरेसेस, भाजप आणि शिवसेना हे राष्ट्रीय, महाराष्ट्रीय सत्ताधिकारी तर ‘आदर्श रामराज्याची’ आणि ‘आदर्श शिवराज्याची’ शपथेचे मक्तेदार आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तर ‘गंगानिर्मालीकरण’ घोषणा आहे. दोन्ही, एक प्राचीन आणि एका मध्ययुगीन कालखंडातील आदर्श राज्याची पुन्हा गरज कशी आहे, याची सैद्धान्तिक बैठक करून देण्याचे महत्त्वाचे तात्त्विक काम राष्ट्रीय पातळीवर अनेकांनी केले आहेच. महाराष्ट्रीय पातळीवर असे ताजेतवाने काम या अंकातील लेखक-संपादकांनी केले आहे.

आता, हा अंक कुणासाठी आहे? उघडच तो वाचकांसाठी आहे! पण विशेषांक कुणासाठी असतो? तर तो विशेष वाचकांसाठी असतो. विशेष वाचक कोण? अंक ज्या विषयावर असतो, त्या विषयाचे वाचक म्हणजे विशेष वाचक. विशेष वाचक ही सर्वसामान्य वाचकांमधून उत्क्रांत होणारी विशेष घटना आहे. हा ‘विशेष वाचक’ अभ्यासक, समीक्षक, तज्ज्ञ, आणि विद्यार्थी अशा व्यापक स्वरूपाचा असतो. संबंधित विशेष लेखन करणारा लेखक हा मूलभूतरित्या त्या विषयाचा विशेष वाचक असतोच; त्याने आधीच काहीएक निश्चित विशेष वाचन करून, विशेष विचार-चिंतन करून हे विशेष लेखन केलेले असते. लेखनच विशेष असते म्हणून वाचकही विशेष असतो. जो सर्वसामान्य वाचक असे विशेष लेखन वाचन करतो, त्यावर चिंतनाची प्रक्रिया करतो तो विशेष वाचक होऊ शकतो. ती त्याची उत्क्रांती असते. हा सर्वसामान्य वाचकवर्ग विशेष वाचकवर्गाचा पुरवठादार असतो किंवा मूलभूत ऊर्जास्रोत असतो. विशेष व्हायचे की नाही, हा वाचकाचा खासगी निर्णय असतो, ते एका अर्थाने त्याचे ‘खाउजा’ धोरण असते. उदार अंतःकरण करण्याचा खासगी निर्णय घेतला आणि विशेषत्वाकडे गेला तर त्याचेच ज्ञानात्मक जागतिकीकरण होते. (अन्यथा सामान्य वाचकाचे ‘घकोकरण’ = घरकोंबडीकरण होते!)

पण याहीपेक्षा दोन वेगळे वाचकवर्ग असतात, ज्यांच्याकडे विशेष निर्णय घेण्याची नैतिक आणि कायदेशीर तरतूद असते. नैतिक निर्णय घेण्याची तरतूद धोरणकर्त्यांकडे असते. हा विषयतज्ज्ञ आणि शासकीय नोकरशाहीचा वर्ग असतो. ते धोरण निर्माण करतात. आता, त्यानुसार निर्णय घेण्याचा आणि अंमलबजावणीसाठी नोकरशाहीला आदेश देण्याचा अधिकार शासकांचा असतो. त्यांनी निर्णय घेतला तरच धोरणे अमलात येतात, अन्यथा बासनात जातात. सामान्य वाचकवर्ग आणि इतर विशेष वाचकवर्ग हा शासकांचा आणि नोकरशाहीवर दबाव आणणारा दबावगट असतो.

...म्हणून या अंकाचा (आणि अशा तऱ्हेच्या विशेष अंकाचा) खरा वाचकवर्ग शासकांचा आणि नोकरशाही हा आहे.     

.............................................................................................................................................              

संपादक : नामदेव कोळी, कडगाव, जिल्हा. जळगाव, संवाद : ९४०४० ५१५४३, ९७६६० ८९६५३, ई-मेल : waghur@gmail.com.

प्रकाशक – मुद्रक : प्रदीप पाटील/ अॅकेडेमीक बुक पब्लिकेशन्स्, ३, प्रतापनगर, श्री संत ज्ञानेश्वर मंदिर रोड, नूतन मराठा महाविद्यालयाजवळ, जळगाव ४२५ ००१.  दूरध्वनी ०२५७ – २२३ ५५२०, ९६६ ५६ २६ ७१७.

व्यवस्थापक : प्रमोद वंदना दिनकर,    

मुखपृष्ठ : संदीप सावंत (दिग्दर्शक ‘नदी वाहते’)

मुखपृष्ठ मांडणी : विकास मल्हारा.

सुलेखन : मोहन सराफ, डोंबिवली, ९८२०९ ८५६९८.

वाघूर सुलेखन : जितेंद्र साळुंके.

मुद्रितशोधन : प्रकाश सपकाळे, समाधान पाटील.

रेखाटने : श्रीधर अंभोरे, कविता महाजन, अन्वर हुसेन, प्रदीप म्हापसेकर, विजय जैन, सीरज सक्सेना,सुनील यावलीकर, रामदास खरे,सुनील सर्वज्ञ, जितेंद्र साळुंके, अमर काळे, कमलाकर पाटील, विजय बोधनकर. 

स्वागत मूल्य :  २५० रुपये.

.............................................................................................................................................

लेखक श्रीनिवास हेमाडे संगमनेर महाविद्यालय, संगमनेर इथं तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

shriniwas.sh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................