‘दमवणारी दमू’ आणि ‘दमात घेणारी दमा’ असा काहीसा तिच्या (लघुरूप) नावांचा अनुभव येतो!
पडघम - बालदिन विशेष
ममता क्षेमकल्याणी
  • ममता क्षेमकल्याणी आणि त्यांची मुलं - दमंयती व राघव
  • Wed , 14 November 2018
  • पडघम बालदिन Children's Day १४ नोव्हेंबर 14 November ममता क्षेमकल्याणी mamata kshemkalyani 

मी एक पालक आहे, याबरोबरच मी एक माणूस आहे, हे स्वतःशी कबूल करून माझ्यातल्या अधिक-वजा गोष्टींसह मी जमेल तसं पालकत्व निभावते आहे. त्यातून मलाही अनेक गोष्टी नव्याने उमगतायत. दोन भिन्न स्वभावाच्या मुलांबरोबर स्वतः वाढत आणि घडत जाण्याचा अनुभव खरंच संपन्न करणारा आहे.   

माझ्या लहानपणाच्या, एकूण जडणघडणीच्या आणि आयुष्यातल्या भल्या-बुऱ्या अनुभवांचं प्रतिबिंब माझ्या पालकत्वात उतरणं अगदीच नैसर्गिक वाटतं. मुलांसाठीच्या चांगल्या-वाईट गोष्टींचे ठोकताळे यातून तयार होतात खरे, पण प्रत्येक वेळी ते योग्य असतातच, असंही नाही. एकाच घरातली दोन मुलं जेव्हा खूप वेगळ्या स्वभावाची, काही जन्मजात वेगळ्या सवयींची असतात, तेव्हा मात्र माझ्यासारखीचा गोंधळ उडतो. 

‘आई होणं’ ही जशी एक वेगळी अनुभूती देणारी भावना असते, तशीच किंवा त्याहीपुढे जाऊन स्वत:च्याच प्रतिमेचा सुंदर अनुभव देणारी भावना म्हणजे, ‘मुलीची आई होणं’. नऊ वर्षांचा राघव आणि पावणेतीन वर्षांची दमयंती या दोन अपत्यांची आई म्हणून वावरताना मला बरेचदा वेगवेगळे फंडे वापरावे लागतात. याचं मुख्य कारण म्हणजे, या दोघांच्याही स्वभावात असलेली प्रचंड तफावत! मूल म्हणून असणाऱ्या काही बेसिक गोष्टी त्यांच्यात कॉमन असल्या, तरी आपलंच नाक सतत उंच ठेवण्याचा लेकीचा प्रयत्न मला त्यांच्या बरोबरच्या वागणुकीत फरक करायला भाग पाडतो. कारण ‘घरातली धाकटी मुलगी’ या तीन शब्दांमध्ये बरंच काही सामावलेलं आहे. 

खरंतर ‘आपण एकच अपत्य होऊ द्यायचं’, असं राघवच्या जन्मापूर्वीच आम्ही ठरवलं होतं. त्या वेळी ‘आपल्याला मुलगी व्हावी’, अशी आमची खूप इच्छा होती; पण शांत, समंजस आणि तितक्याच रसिक स्वभावाच्या राघवने कधीच आमच्यातल्या पालकत्वाची परीक्षा घेतली नाही. कामानिमित्त त्याला बरोबर घेऊन केलेला प्रवास असो, लहान वयातली आजारपणं असोत, शाळेमध्ये रुळणं असो की, बालभवनमध्ये खेळणं असो, या मुलाने आम्हाला कधीच कोणत्याच प्रकारचा त्रास दिला नाही. आमच्या व्यवसायाच्या, वैयक्तिक अडीअडचणीच्या सगळ्या टप्प्यांवर अगदी लहान वयापासून त्याने आम्हाला खूप मोलाची साथ दिली. आमच्या आयुष्यतल्या अनेक भल्याबुऱ्या क्षणांचा तो केवळ साक्षीदार नाही, तर आमचा सोबती होऊन त्याने आम्हाला बळ दिलं.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

राघव छोट्या गटात गेला, तेव्हा वर्गातल्या काही मित्रमैत्रिणींना लहान भावंड होणार असल्याची खबर त्याला मिळाली. त्यावरून ‘आपल्या घरी कधी बाळ येणार?’ हा प्रश्न त्याला सतावू लागला, पण आम्ही दोघं मात्र वेगळीच गणितं मांडत होतो. ‘पहिलीपासून राघवची शाळा पूर्ण वेळ सुरू होईल आणि मग माझ्या कामाची गाडी पुन्हा रुळावर येऊन वेग घेईल’, असं काहीसं आमच्या मनात होतं. राघव आठ-नऊ महिन्यांचा झाला, तेव्हापासूनच पाळणाघराच्या जोरावर मी माझी दुसरी इनिंग सुरू केलीच होती. मात्र, सुरुवातीच्या वयातलं लसीकरण, सर्दी-खोकला-तापासारखी ऋतूबदलाने येणारी छोटी आजारपणं आणि एवढ्या लहान मुलाला पाळणाघरात ठेवून कामासाठी सुरू असलेल्या धडपडीमुळे येणारा गिल्ट या सगळ्याचा माझ्या कामाच्या व्याप्तीवर परिणाम होणं स्वाभाविक होतं. त्यामुळे पूर्ण वेळ सुरू होणाऱ्या त्याच्या शाळेची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो.

दरम्यान, ‘मला बाळ पाहिजे’, हा राघवचा आग्रह पिंगा घालत असतानाच आमच्या फॅमिली डॉक्टर, आयुर्वेदाचार्य देविका गोखलेंनीदेखील दुसऱ्या अपत्याविषयी  आमच्याशी खूप जिव्हाळ्याने चर्चा केली, मोलाचा सल्ला दिला आणि आम्ही सेकंड चान्सचा निर्णय घेतला. मुलगी होण्याची आशा पुन्हा पल्लवीत झाली. वयाच्या पस्तीशीनंतरच्या गर्भारपणाचा सुरुवातीचा बराच काळ बेड रेस्टमध्ये गेला. 

गर्भारपण आणि बाळंतपण या दोन्ही बाबतीतही दोन्ही मुलांच्या वेळचे अनुभव पूर्णपणे वेगळे होते. पहिल्या वेळी नऊ महिन्यांच्या काळात बार्शी, जव्हार अशा गावांना जाऊन मी काम करत होते, तर दुसऱ्या वेळी घराबाहेर पडणंही मुश्कील झालं होतं. दोन्ही डिलीवरी नॉर्मल झाल्या असल्या, तरी पहिल्या वेळी शेवटच्या दोन महिन्यांत वाढलेली शुगर आणि डिलीवरीनंतर झालेल्या अतिरक्तस्रावाने काहीसं चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.

याउलट दुसऱ्या वेळी पेनलेसचा आधार घेत मी बाळंतपण एन्जॉय केलं. लेकीची हौस पूर्ण झाली. ‘मला बहीणच पाहिजे होती’, असं म्हणत राघवनेही हा आनंदाचा क्षण उपभोगला. आठ मार्च, अर्थात जागतिक महिला दिनाचा मुहूर्त  चुकला खरा, पण सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यतिथीला, म्हणजे १० मार्चला माझ्या पोटी मुलीने जन्म घेतला, हे माझं भाग्यच!

पहिल्या वेळी बाळाला मांडीवर घ्यायलाही घाबरणारा बाबा लेकीला सराईतपणे उचलून घ्यायला लागला. बाबाने मोठ्या हौसेने लेकीचं नाव दमयंती ठेवलं. इतक्या सुंदर, पण चार अक्षरी नावाची (सध्याच्या काळात अनेकांना हे नाव फारच मोठं वाटतं) ‘दमू’ आणि ‘दमा’ अशी दोन छोटी नावं जो-तो आपापल्या सोयीने वापरतो आहे, पण ‘दमवणारी दमू’ आणि ‘दमात घेणारी दमा’ असा काहीसा तिच्या या लघुरूप नावांचा अनुभव येतो’, असं आम्ही गमतीने म्हणतो. तिच्यात असलेल्या प्रचंड एनर्जीमुळे ती सतत अॅक्टिव्ह राहते आणि मोठ्या हट्टाने ती आम्हालाही तिच्याबरोबर सामील करून घेते. तिच्याबरोबर खेळून आम्ही दमून जातो, पण ती मात्र सदासर्वकाळ उत्साही असते. 

याशिवाय इतरांना दमात घेणं, हा जणू आपला कॉपीराईट असल्याप्रमाणे ती वागत असते. अगदी भाजी घेताना चुकूनही कोणाचा धक्का लागला, तरी तिचा नूर बदलतो आणि जळजळीत कटाक्ष टाकून आपल्या खणखणीत आवाजात ती स्वतःची नापसंती व्यक्त करते. या सगळ्याविषयी योग्य वेळी तिला योग्य समज देताना मला फारच मजा येते. कारण बहुतांश वेळा ती स्वतःच्या म्हणण्यावर खूप ठाम असते. तिचा हा ठामपणा त्या-त्या ठिकाणी जपायचा की, प्रसंगी त्याला मोल्ड करायचं हे ठरवून मला माझी भूमिका घ्यावी लागते. अर्थात, त्याची कारणमीमांसादेखील तिला समजेल अशा भाषेत करण्याचा माझा प्रयत्न असतो. कारण स्थळ, काळ, व्यक्ती आणि प्रसंग यांच्या अनुरूप अनेक गोष्टींचे संदर्भ बदलत असतात, हे मुलांना कळलं पाहिजे आणि त्यानुसार योग्य बदल करून त्यांना वागता आलं पाहिजे,  असं मला वाटतं. योग्य-अयोग्याचं तारतम्य मुलांना येता-जाता सांगणंही आवश्यक असतं. 

स्वतःचं मत मांडणं, त्यावर ठाम राहणं आणि प्रसंगी त्याचा आग्रह धरणं यात बाईसाहेब माहीर आहेत. पण या आग्रहाचा दुराग्रह झाला की, मग आमचं प्रकरण हाताबाहेर जातं. स्वतः वर प्रेम करणं, स्वतः विषयी आदर बाळगणं या फार आवश्यक गोष्टी असतात आणि दमयंती अगदी तशीच आहे. आपल्या आजूबाजूच्या आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींकडून आपलं कौतुक करून घेणं, लाड पुरवून घेणं तिला फार छान जमतं. आपल्या वागण्या-बोलण्यातून दुसऱ्यांवर हक्क गाजवण्याचं तिचं कसब अफाट आहे; पण नवीन लोकांशीही बेधडकपणे जाऊन बोलणं, त्यांना बोलतं करणं हा तिच्यातला गुण सध्याच्या काहीशा असुरक्षित जगात मला आई म्हणून अस्वस्थ करतो. चांगल्या-वाईट स्पर्शांचे धडे देण्याच्या बाबतीतला दोन्ही मुलांचा अनुभवही खूप वेगळा आहे. दमयंतीच्या स्वभावातच काहीसा बेधडकपणा आहे, जो तिने योग्य ठिकाणीच वापरावा, अशी पालक म्हणून माझी अपेक्षा असते. अशा वेळी पुन्हापुन्हा कन्फ्यूज झालेली मी नव्याने उत्तरं शोधत राहते. 

राघवप्रमाणेच दमयंतीलाही आठव्या-नवव्या महिन्यापासूनच मी पाळणाघरात ठेवायला सुरुवात केली. मी वर्क फ्रॉम होम करत असले, तरी कामाच्या अनिश्चित वेळा आणि कोणत्याही क्षणी फील्ड वर्कसाठी सज्ज राहावं लागण्याच्या अपरिहार्यतेतून माझ्या दोन्ही मुलांसाठी मला पाळणाघराचाच आधार घ्यावा लागला. राघवच्या एकूण शांत आणि सहाकार्य करण्याच्या स्वभावामुळे सुरुवातीच्या काही महिन्यांनंतर मी त्याचं पाळणाघर बंद केलं होतं, पण पाळणाघर सुरू करून जवळपास दोन वर्षं होत आली, तरी दमयंतीच्या बाबतीत  मला हा निर्णय घेता आलेला नाही. तिला सगळ्याच अर्थांनी अटेन्डन्स लागतो. लहानग्या राघवला घेऊन मी अनेक कार्यक्रमांनाही जात असे. इतकंच काय, पण क्लायंट्सबरोबरच्या मिटिंग्जनाही काही वेळा तो बरोबर असे. खाऊचा डबा, पाण्याची बाटली, चित्रं काढण्यासाठी एखादी छोटी वही, पेन किंवा पेन्सिल आणि आवाज न करणारं खेळणं एवढं बरोबर घेतलं की, एक-दोन तास तो सहज माझ्याबरोबर मिटिंग्जला थांबायचा.

दमयंतीच्या बाबतीत एक-दोन वेळा मी हा प्रयोग करून पाहिला, पण तो पुरता फसला. फारसं बोलता येत नव्हतं, त्या वेळी तिला नको असलेल्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी जोरजोरात रडून किंवा आरडाओरडा करून ती आम्हाला हैराण करून सोडत असे. आता सगळं बोलता यायला लागल्यामुळे आणि समज वाढल्यामुळे (खरं तर ती वयापेक्षा जास्तच वाढली आहे) नको असलेल्या गोष्टींवर नेमक्या वेळी कोणती शस्त्रं बाहेर काढायची, हे तिला आता पक्कं माहीत झालं आहे. त्यामुळे एक-दोन प्रयोगांनंतर माझ्या कामांच्या ठिकाणी तिला घेऊन जाण्याची हिंमत मी करू शकलेले नाही. कारण अशा ऐन मोक्याच्या वेळी शी लागणं, खूप भूक लागणं, उलटी होतेय असं वाटणं अशा एक ना अनेक सबबी ती सांगत राहते. अर्थात, या सगळ्याला अधूनमधून रडण्याचीही जोड असते. माझं लक्ष वेधून घेण्यासाठी ती हरप्रकारे जे प्रयत्न करते, त्यातला आणखी एक म्हणजे, मला सतत ‘ममता’, ‘ममता’ म्हणून हाका मारणं. 

सुरुवातीला मला या सगळ्या प्रकाराचा खूप त्रास झाला, कारण आधी म्हटल्याप्रमाणे राघवच्या बाबतीत मला अशा कोणत्याच गोष्टींचा अनुभव नव्हता. आधी अनेकदा इतरांची अशी ‘लक्षवेधी’ मुलं पाहून मी चक्रावून जायचे. अशा मुलांविषयी मला फार आश्चर्य वाटायचं. त्यामुळे तिच्या या वागण्याशी जुळवून घ्यायला मला बराच वेळ लागला. तिला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून समजून घेताना अनेकदा माझा पेशन्स संपून जायचा, चिडचिड व्हायची, पण हळूहळू ‘मी नाही, तर कोण समजून घेणार तिला’ ही खूणगाठ मी मनाशी बांधून घेतली. या सगळ्यात माझ्या डॉक्टर देविका गोखले यांच्याबरोबरच्या संवादातून अनेक मु्द्दे क्लिअर होत गेले, प्रसंगी पुष्पौषधींचाही आधार घेतला. 

खरं तर दमयंतीच्या जन्मापूर्वी यांपैकी कशाचीच मी कल्पनादेखील केलेली नव्हती, पण आता हळूहळू तिच्या स्वभावाची नस मला कळायला लागली आहे, असं वाटतंय. कधी प्रेमाने, कधी रागावून, तर कधी थोडी भीती दाखवून आमच्या नात्याची गाडी पुढे सरकते आहे. तिचा कल समजून घेणं आणि तिच्या कलानं घेणं आता मला काहीसं जमायला लागलंय, असं वाटतंय. तिच्याबरोबरचं खेळणं,  मस्ती, भातुकली यात आता रंगत यायला लागली आहे. ‘ममता, तुझं ते कंटुपर बंद कर आणि शिरा कर, मला अजिबात आवडत नाही तुझं काम!’, असं ती अधिकारवाणीने सांगते, तेव्हा मला फारच भारी वाटतं. बाबाचा लाडोबा असलेली दमयंती ‘आऊ.. आऊ’ म्हणून माझ्या मागेमागे करते, तेव्हा फारच सुखावते मी. आमचं मेतकूट आता चांगलंच जमलं आहे. 

अलीकडे रुसणं हा नवीन फंडापण ती वापरायला शिकली आहे. केसांची बारीक कटिंग केलेली गोबऱ्या गालांची दमयंती रुसली की, मग हातातली कामं सोडून आम्हा तिघांनाही तिच्यापुढे हजर व्हावं लागतं. तिघांपैकी कोणी तिला जवळ घ्यायचं, याचं फर्मान निघतं, तेव्हा उरलेल्या दोघांनी गुपचूप अबाऊट टर्न घ्यायचा. यामध्ये दादू आणि बाबूला जास्त प्राधान्य असतं, तर आई स्टॅण्ड बाय म्हणून बरी असते. 

अखंड बडबड आणि प्रचंड भोचकपणाच्या जोडीला दांडग्या स्मरणशक्तीचं वरदान तिला मिळालं आहे. दिवसागणिक तिच्या शब्दकोशात नवीन भर पडत असते आणि नेमकेपणाने त्यांचा वापरही होतो. कोण, कधी काय बोललं, कसं बोललं हे तिच्या चांगलंच लक्षात असतं. घरातल्याच काय, पण इतरांच्याही गोष्टीतला तिचा हा भोचकपणा अनेकांना आपलासा वाटतो. म्हणजे, घरकामासाठी येणाऱ्या मावशींशी बोलताना ‘‘तुम्हांला ताप आला होती का?’’, म्हणून त्यांची चौकशी करणं; ‘‘छान आहे गं तुझा ड्रेस, कोणी आणला तुला?’’, असं म्हणून शेजारच्या काकूशी गट्टी करणं; मित्राच्या वाढदिवसाला निघालेल्या दादूला, ‘‘नीट खा, मजा कर. कोणाला चिमटे काढू नको’’, अशा सूचना करणं हे सगळं ती खूप नॅचरली करते. 

घरात मुलगी असेल, तर घराला परिपूर्णता येते, याचा प्रत्यय दमयंतीमुळे येतो आहे. यंदाच्या दिवाळीत हट्टानं माझ्याकडे साडीची मागणी करून पाडव्याला आणि भाऊबीजेला तिने छानच मटकून घेतलं आहे. ‘भेदाभेद अमंगळ’ यावर माझा विश्वास असला, तरी मुलगी म्हणून तिच्या हौशी पुरवताना मुलावर थोडासा अन्याय होणार, याची जाणीव पालक म्हणून मला सतावते आहे, पण मोठा भाऊ म्हणून राघवही तिच्या या कोडकौतुकात उत्साहानंदाने भाग घेतो, हे निश्चितच दिलासादायक आहे. 

खूप लाजरं-बुजरं असलेलं माझं बालपण आणि अनेक वर्षं स्वतःच्या आवडीचा रंगही माहीत नसलेलं माझं लहानपण मला माझ्या लेकीमुळे पुन्हापुन्हा आठवत राहतं. तिचा ठामपणा, तिचा कणखरपणा जपत मी रोजच माझ्याच बालपणात डोकावत असते. 

.............................................................................................................................................

‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

लेखिका ममता क्षेमकल्याणी या मुक्त पत्रकार आहेत.

mamatakshem@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......