नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस : खट्टा आणि मिठा!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी
  • Mon , 05 November 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis नरेंद्र मोदी Narendra Modi काँग्रेस Congress राष्ट्रवादी काँग्रेस NCP मनसे MNS भाजप BJP

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या दोघांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीतील चार वर्षे नुकतीच पूर्ण केलीत आणि दोघेही शेवटचे, निवडणुकीआधीचे वर्ष पार करायला सज्ज झालेत.

या दोघांत काही समान गोष्टी आहेत. मोदी या आधी कधीही खासदार नव्हते, ना केंद्रीय मंत्री. ते आमदारही झाले मुख्यमंत्री झाल्यावर! मुख्यमंत्री पदावरून थेट पंतप्रधानपदी गेले.

फडणवीस आमदार होते, विरोधी पक्षनेते होते, पण यापूर्वीच्या युती सरकारात ना मंत्री होते, ना कुठल्या महामंडळावर! त्यामुळे आमदार ते थेट मुख्यमंत्री असा त्यांचाही प्रवास मोदींना समांतर आहे. मात्र मोदी हे पक्षाने निवडणुकीआधीच जाहीर केलेले पंतप्रदान पदाचे उमेदवार होते. स्वत:च प्रचारप्रमुख होते.

फडणवीसांना अशी कुठलीही पोषक, निर्णायक पार्श्वभूमी\परिस्थिती नव्हती. उलट सेना-भाजपची २५ वर्षे अभेद्य असलेली युती, जी २०१४च्या लोकसभा निवडणुकीतही होती आणि तिने ४८ पैकी ४४ जागा जिंकून ऐतिहासिक विजय नोंदवला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत ही युती अगदी शेवटच्या क्षणी तुटली. आश्चर्य म्हणजे त्याच वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचीही आघाडी प्रतिक्षिप्त क्रियेसारखी तुटली! (की तोडली?) मनसेसह पाच प्रमुख पक्ष स्वतंत्र लढले. भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला व बहुमताला आठ-दहा आमदार कमी पडले. लोकसभेच्या तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली. मनसेने केलेल्या अपेक्षाभंगामुळे, मनसेची मते थेट सेनेला मिळाली, अन्यथा सेना कदाचित तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर गेली असती.

निकाल लागताच राष्ट्रवादीने नाट्यपूर्ण रीतीने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला, पण सरकारात गेले नाहीत. सेनेने विरोधी पक्षनेता म्हणून शपथ घेतली खरी, पण आमदार-खासदारांच्या दबावामुळे सेनेला विरोधी पक्षाची शपथ सोडून गिन्याचुन्या मंत्रीपदांची शपत घेत पुन्हा सरकारी युती करावी लागली.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://tinyurl.com/yajwg4nj

.............................................................................................................................................

भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरतील असे नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे हे खासदार व केंद्रात मंत्री झालेल्या गडकरींना आवडते खाते मिळाले, तर गोपीनाथरावांना शेवटच्या क्षणी मंत्रिपद लाभले. आपल्या या मंत्रीपदाचा विजयोत्सव साजरा करायला दिल्लीहून बीड\परळीला येतानाच त्यांचा दुर्दैवी अपघातात अंत झाला.

महाराष्ट्रात आता गडकरी परतणार की मुंडेना पर्याय असा एकनाथ खडसेंचा ‘बहुजन मुख्यमंत्री’ येणार यावर खलबतं सुरू झाली होती. याचर्चेत कडकडेने विनोद तावडेंनी ‘मराठा कार्ड’ सरकवून पाहिले, तर पंकजा मुंडेंना सहानुभूतीतून महाराष्ट्राची ‘पहिली महिला मुख्यमंत्री’ अशी स्वप्ने पडू लागली. दरम्यान भाजप अध्यक्षपदी अमित शहा आले होतेच. विधानसभा प्रचारादरम्यान (बहुधा) नागपुरात एका सभेत पंतप्रधान मोदींनी फडणवीसांची इतकी तारीफ केली होती की, तो संकेत समजून ‘दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ ही घोषणा रात्रीत फुटली. सेना-भाजप युतीच्या पहिल्या सरकाराचा, पहिला मुख्यमंत्री हा ब्राह्मणच होता. त्यामुळे गडकरी समर्थक सुधीरभाऊ मुनगंटीवार प्रभूतींनी गडकरी वाड्यावर मोर्चेबांधणी केली. मोदी-शहांनी तोवर राज्याराज्यातले संकेत मोडले होते. महाराष्ट्रातला ‘मराठा मुख्यमंत्री’ हा संकेत मोडत त्यांनी थेट ब्राह्मणच निवडला, फक्त गडकरी नव्हे तर फडणवीस!

खुद्द फडणवीसांसहित राज्य भाजपलाही हा ‘जोरका झटका धीरेसे’ होता. विरोधी पक्षनेतेपदी असताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या- विशेषत: राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची लक्तरे काढत, तेच फडणवीस राष्ट्रवादीच्या बिनशर्त पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले! या राजकीय गोचीवर फडणवीसांनी ‘आपादधर्म आणि शाश्वतधर्म’ अशा जवळपास भगवान श्रीकृष्णाला शोभेलशा भाषेत उत्तर दिले आणि त्यांनी मैदानावर पाय रोवले!

पंतप्रधान मोदींना पूर्ण बहुमतासह पंतप्रधानपदाचा जो केक वॉक मिळाला, तो फडणवीसांना मिळाला नाही. या पोरसवदा मुख्यमंत्र्यांचा अभिमन्यू करायचे प्रयत्न भाजपमधूनच शिजू लागले. गोपीनाथरावांच्या अनुपस्थितीत आणि मोदींच्या मॉनिटरगिरीत गुदमरू लागलेले रावसाहेब दानवे राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन थेट राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी आले. याचा अर्थ ते ‘वन डाऊन’ची वाट बघत पॅड बांधूनच आले होते. तोवर गडकरांनी ‘गड्या रे आपली दिल्ली बरी’ म्हणत महाराष्ट्रातले ‘लक्ष’ काढून घेतले. पण दानवे, खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे हा बहुजन मेळा अधूनमधून रंग दाखवू लागला. त्यात सेनेने (मिळाली ती) मंत्रिपदे राज्य व केंद्रात स्वीकारली. प्रशासन, पक्षांतर्गत विरोधक, स्थैर्याचा चौथा कोन फडणवीस शोधत होते. तो त्यांना मिळाला मोदी व शहा यांच्या भरभक्कम पाठिंब्याने. त्याची आपल्या परीने खात्री करून घेऊन मग फडणवीसांनी आपल्यातला ‘नाना’ कार्यरत केला. आतले बाहेरचे तगडे विरोधक अंगावर घेताना सुरुवातीला डगमगणाऱ्या फडणवीसांनी पहिला मोहरा टिपला खडसेंच्या रूपात आणि आतली खुडबूड पार बंदच केली. पुढच्या टप्प्यात थेट छगन भुजबळांना तुरुंग दाखवत विरोधी बाकावर योग्य तो मॅसेज दिला!

रेखाचित्र - संजय पवार

फडणवीसांच्या तुलनेत मोदींना मैदान मोकळं होत आहे. पाचोळा विरोधी पक्ष, दोन तृतीयांश बहुमत, राज्यामागून राज्ये जिंकत चाललेला अश्वमेघ, पुढे राज्यसभेतलं विरोधकांचं बहुमत, प्रसंगी अध्यादेश काढत धोरणं पुढे रेटत लोकशाही संसदीय संकेतांना ठोकरण्याचे मोदी सरकारचे पवित्रे म्हणजे बहुमताचा दुरुपयोगच.

पण स्वत:च्या सरकारचेच ‘मोदी सरकार’ अशा स्वत:च्या नावाने ब्रँडिंग केलेल्या सरकारचे स्वरूप हे लोकशाहीवादी मंत्रीगणांत सरकार न राहता ते कुणा एका मोदीनामक हुकूमशहाचे सरंजामी सरकार असावे असे त्याचे रूप आणि स्वरूप होत गेले.

मोदींची पहिली तीन वर्षे ही काँग्रेस, गांधी-नेहरू परिवार यांनी ७० सालांत देशाची कशी वाट लावली, हे घसा खरवडून सांगण्यात गेली. याच जोडीला अखंड परदेश दौरे आणि तिथल्या अनिवासी भारतीयांसमोर स्वकारभाराच्या आरत्या गात, त्यांच्याकडून ‘मोदी मोदी’चा गजर ऐकण्यात मोदी इतके मश्गुल होत गेले की, निवडणूक प्रचारसभा वातावरणातून ते आजतागायत बाहेर आलेले नाहीत. मोदींच्या आधीचे पंतप्रधान मौनी पंतप्रधान, तर मोदी म्हणजे निव्वळ बोलके पंतप्रधान. रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्र यातून दिवसाला किमान चार ते पाच जाहिरातींचा रतीब पडू लागला. एक घोषणा विरते नाही तोच दुसरी घोषणा. प्रकल्पांचे कोटींचे आकडे तर हाताची बोटेच काय महासंगणकही मोजू शकणार नाहीत असे चढत्या भाजणीतले.

मोदी-शहा जोडीने दिल्लीच्या सत्तावर्तुळात व विशेषत: पक्षांतर्गत मंत्रीमंडळात, प्रशासनात शिस्तीच्या नावाखाली अनामिक दहशत पसरवली. संसदीय मंडळाची\खासदारांची बैठक म्हणजे (केवळ) ‘राजा बोले, दल (मुकाट) हाले’ अशी करून टाकलेली. गडकरींसारखा अपवाद वगळता, जेटलींसह सर्व मंत्रिमंडळ म्हणजे कठपुतळ्या. मोदी बोलणार नाहीत. बोलले तर ‘ते बोलणार, तुम्ही ऐकायचे’. मोदी कुणाला म्हणजे कुणालाच उत्तरदायी नाहीत इतके स्वयंभू.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/yaj8ppqa

.............................................................................................................................................

मोदींचा अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडणारा नोटबंदीचा निर्णय असो अथवा घिसाडघाईने जीएसटीसारख्या प्रणालीचे उडवलेले तीन तेरा असोत, निर्णय जाहीर करायला, त्याचा घोषणा सोहळा करायला, एखाद्या प्रकल्पाचे भूमीपूजन अथवा लोकापर्णाला मोदी आणि फक्त मोदी. बाकी या दरम्यान काही बिघडले, फसले, हाताबाहेर गेले, ठपका बसला तर मग तोंड द्यायला जेटली, रविशंकर प्रसाद, निर्मला सितारामन, जावडेकर किंवा मग उद्धट, उर्मट संबित पात्रा.

मोदींइतका एकांडा, हेकेखोर, पराकोटीचा अहंमन्य आणि प्रसिद्धीचा सोस असलेला पंतप्रधानच नव्हे तर साधा एखादा नेताही स्वतंत्र भारताने गेल्या ७० वर्षांत पाहिला नसेल!

गेल्या चार वर्षांत मोदींच्या नावावर लक्षणीय असे योगदान राहिलेच तर ते असेल ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’चा संपूर्ण प्रकल्प. जगन्मान्य ठरावा, विक्रमी वेळात चांगल्या पद्धतीने आरेखित व निर्मित हा प्रकल्प मानदंड ठरणार यात वाद नाही. पण त्यासाठी सरदार सरोवर परिसरातील शेतकऱ्यांवर केलेली दांडगाई जशी विसरता येणार नाही, त्यापेक्षाही अशोभनीय होते या निमित्ताने केले जाणारे सरदार पटेलांचे केले गेलेले अनैतिहासिक उदात्तीकरण. मुस्लीम विरोधक व हिंदुत्वभारित आणि नेहरूंपेक्षा अधिक योग्य पंतप्रधान हा दुष्प्रचार. आपल्या प्रिय नेत्याचे स्मारक करताना इतकी अश्लाघ्य, खोटी विधाने आणि दंतकथा प्रसारित कशाला करायला हव्या होत्या? पण मोदी ज्या संघ परिवाराचे अपत्य आहेत, त्या संघालाच अशा खोड्या करून ‘कशी केली मज्जा’ म्हणत टाळ्या पिटण्याचा कुटील उत्साह असतो. त्यामुळे मोदी पितृ-मातू संस्थेला साजेसेच वागलेत!

या पार्श्वभूमीवर फडणवीसांची कारकीर्द मोदींसारखीच एकचालकानुवर्ती असली तरी ते कायम संवादी राहिलेत. त्यांनी प्रचारकी भाषणे फक्त विविध निवडणुका व पक्ष मेळाव्यातच केली. बाकी मग ते संवादात कुठेही कमी पडले नाहीत. त्यांनी ‘कर्जमाफी देणार नाही’ या आपल्या निश्चयास मुरड घालून शेवटी कर्जमाफी जाहीर केली. त्यांना लाखोंच्या शांततामय मराठा मोर्चांना संयमाने हाताळले. त्यांनी शेतकरी मोर्चाही सहृदयतेने हाताळला. मराठा, धनगर आरक्षणासाठी कायदेशीर पाठपुरावा केला. त्यांनी मोठ्या दुर्घटना, अपघात यात स्वत: लक्ष घालून नियंत्रण आणले. त्यांनी पाणीवाटप, दुष्काळ यावर सरकार खिंडींत गाठले जाणार नाही हे पाहिले. मुख्य म्हणजे मोदींसारखा हेकेखोर अहंमन्य किंवा प्रसिद्धी सोस बाळगला नाही. मोदींसारखे ‘मी बोलतो, तुम्ही ऐका’ असे न करता ते बाईटस ते स्वतंत्र मुलाखती ते वाहिन्यांच्या आढावा कार्यक्रमात सर्व प्रश्नांना सामोरे जातात. तेही न चिडता, त्रागा करता, जीभ न घसरवता.

पण मोदींप्रमाणेच फडणवीस हेही स्वयंसेवक आहेत. त्यामुळे त्या विचारांचा अजेंडा त्यांनी सनातनच्या अटका, त्याला अर्बन नक्षलींचा उतारा आणि एकबोटेंना शोधून काढताना संभाजी भिडेंना राजाश्रय, या गोष्टी चलाखीने केल्या. त्याचप्रमाणे सदाभाऊंना आपल्या घरात घेताना खानदेशात महाजनांना प्रस्थापित करत खडसेंचं विस्थापन अधिक गडद केलं. मोदींकडे ल्यूटन्स जेटली आहेत, तर फडणवीसांकडे कोल्हापुरी चंद्रकांतदादा!

एकुणात चार वर्षानंतर आधी मधुर वाटलेले मोदी ‘खट्टा’ निघाले, तर ‘कोवळे’ वाटलेले फडणवीस परिपक्व ‘मिठे’ निघाले!

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

ADITYA KORDE

Mon , 05 November 2018

माझ्या माहिती प्रमाणे गडकरी आडनावाचे लोक ckp (चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ) असतात , म्हणजे ते ब्राह्मण नसतात ते स्वत:ला ब्राह्मण मानतही नाहीत , त्यांची आडनावं युनिक असतात ती इतर जातीत सापडत नाहीत उदा. प्रधान, गुप्ते, कारखानीस, चिटणीस, गडकरी वगैरे , अर्थात ही माझी माहिती झाली , ती चूक किंवा अपूर्ण असू शकते ...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......