पाकिस्तान आणि इस्लाम व्हाया पुस्तकं -२ : पुस्तकं संपली नाहीत, संपणारही नाहीत, तसाच शोधही
दिवाळी २०१८ - संकीर्ण
नीतीन वैद्य
  • लेखात उल्लेख आलेल्या काही पुस्तकांची मुखपृष्ठं
  • Wed , 31 October 2018
  • दिवाळी २०१८ संकीर्ण इस्लामविषयीची पुस्तकं Books About Islam पाकिस्तान Pakistan इस्लाम Islam

‘अक्षरनामा’च्या पहिल्या दिवाळी अंकात (२०१६) ‘पाकिस्तान आणि इस्लाम व्हाया पुस्तकं’ असा लेख लिहिला होता. भारताची दीर्घकाळ ठसठसणारी जखम पाकिस्तान आणि ज्याच्या आधारावर तो निर्माण झाला तो इस्लाम, हे जमेल तेवढं - फार खोलात न जाता आलं तरी - समजून घ्यावं या हेतूनं केलेल्या या प्रवासात रमलो… इतका की लेखानंतरही वाचन चालू राहिलं. फार आटापिटा करून काही शोधलं असं नाही, एरवीच्या शोधाशोधीत ते लक्षात होतं इतकंच.

१.

कॅनडास्थित पत्रकार इरशाद मंजी यांचं ‘तिढा आजच्या इस्लामचा’ (‘दि ट्रबल विथ इस्लाम टुडे’,   २००३, अनु. रेखा देशपांडे, अक्षर प्रकाशन, प्रथमावृत्ती जाने. २०११ ) हा या शोधात हाती लागलेला महत्त्वाचा ऐवज. सततच्या वाईट अनुभवातून गेल्यावरही, किंबहुना त्यापोटीच झालेली - काही सूर कडवट लागले तरी अजिबात नकारात्मक न झालेली - ही धर्मचिकित्सा. इरशाद रिचमंड इथं राहणारी महिला, जगभर फिरणारी पत्रकार, घोषित समलिंगी (लेस्बियन)... कुठल्याही धर्मासाठी डेडली कॉम्बिनेशन!

‘तुम्ही एकाच वेळी मुस्लिम आणि लेस्बियन कशा असू शकता?’, या तिला सर्वाधिक विचारल्या गेलेल्या प्रश्नावर ती सहज म्हणते, ‘हा धर्म आहे आणि तो आनंद, कशाची गरज केव्हा जास्त, हे माहीत आहे मला...’ लहानपणापासून नकार, दहशत, तिरस्कार, शाब्दिक-शारिरीक धमक्या-हल्ले या सततच्या अनुभवांतून येणारी असुरक्षितता, कडवटपणा तिच्या पुढच्या अभ्यासाला काही दिशा देतो असं वाटलं तरी हा अभ्यास तिला नकारात्मक होऊ देत नाही. ‘श्रद्धावंतांनो, न्यायापासून ढळू नका. अल्लाहला स्मरून साक्ष द्या, मग ती स्वतः, मातापिता- सगेसोयरे यांच्या विरोधात गेली तरी...’ (कुराण ४:१३५) हे वचन सुरुवातीलाच येतं.

इस्लामच्या उदयापासून, त्याचा इ.स. ७५० ते १२५० या पाच शतकातला सर्वार्थानं सुवर्णकाळ (या काळात  कोर्डोबा या स्पेनमधील इस्लामी शहरात ७० ग्रंथालये उभी राहिली ही नोंद करताना इरशाद आज शहीदांना मरणोत्तर जेवढ्या कोवळ्या कुमारिकांचे आश्वासन दिलेय, जवळपास तितकीच ही संख्या आहे, आठशे वर्षांत आपले प्राधान्यक्रम कसे बदलले पाहा, अशी मल्लिनाथीही करते) पुढे तिथूनचं ऱ्हासपर्व असा शेकडो ग्रंथांचे वाचन, जगभरच्या प्रवासातले अनुभव, विविध बुद्धिवंतांशी चर्चा यातून आकाराला आलेला ‘धर्माला आजचे कुलुपबंद सनातनी स्वरूप वाळवंटातल्या अरबी हुकूमशाहीमुळे आले आहे’ या निष्कर्षाप्रत येणारा प्रवास. बदलांचा हा उलटा प्रवास कसा झाला याचा सविस्तार नकाशा ती तपशीलांनिशी, ते गोळा करताना आलेल्या अनुभवांसह सादर करते, तसेच आता काळानुरूप काय, कसे बदलता येईल (इथे तिच्या मते बदल म्हणजे इस्लामच्या अब्जावधी अनुयायांना - स्वतंत्र - विचार करायची कायमची अनुमती देणे) याचाही आराखडा मांडते. मुळातला धर्म काय सांगू पाहतोय याचा शोध तिला नव्या वळणावर घेऊन जातो. एकाएकी अविचारानं धर्मत्याग करू नये, या निर्णयाला येतानाच ‘सर्व धर्म तर्काशी फारकत घेतात’ या समजाच्या पार्श्वभूमीवर ‘पूर्ण तर्कनिष्ठता हीही तितकीच कट्टरपंथी होऊ शकते’, याचेही भान तिला येते. धर्म त्याच्या मूळ स्वरूपात जी मूल्यं बहाल करतो, त्यातून या वेगवान, चंगळवादी भौतिक जीवनशैलीच्या स्पर्धेत उभे राहण्याचे बळ मिळते, धर्म केवळ आणि केवळ माझ्याच अस्वस्थ विवेकात वसलेल्या ईश्वरापुढे झुकायला लावतो, हे कौशल्य आजच्या युगात सोपे नाही,  हेही या वाटेवर जमा झालेले संचित तर ईश्वरावर आपण फारच भार टाकताना आपली जबाबदारी मात्र टाळतो, हेही भान. कर्मकांडांना फाटा देऊन जगभरातील मुस्लिमांना भय-भूक-निरक्षरता मुक्त करण्याच्या दिशेनं आपण काही विचार करणार आहोत का? या तिच्या शेवटच्या प्रश्नात कुठल्याही धर्मापलिकडचं आवाहन आहे.

शेवटी तिनं सलमान रश्दींचा अनुभव सांगितला आहे. पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा रश्दी तिला यासाठी प्रोत्साहन देतात. ती विचारते, ‘जीवे मारण्याच्या धमकीचा एवढा दीर्घ अनुभव असताना एका तरुण मुलीला त्यांनी (ते सगळे सोसण्यासाठीच) का प्रोत्साहन द्यावं?’, ते तात्काळ उत्तरले, ‘कारण पुस्तक जीवनापेक्षा महत्त्वाचं आहे...’. यावर काही भाष्याची गरज नाही. (रश्दींबरोबरच्या तिच्या बातचितीचा दीड तासांचा व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहे.) इरशाद मंजीच्या या पुस्तकाबद्दल तपशीलानं सांगायचं तर दुसरं पुस्तकच लिहावं लागेल इतके तपशील, संदर्भ आणि युक्तिवाद यात आहेत. यातले काही असे…

‘मशिदीत कॅमेरा वापरायचा नाही कारण आत्मा असलेल्या कुठल्याही सजीवाचा फोटो काढणं म्हणजे मूर्तीपूजेला उत्तेजन देणं. प्रत्यक्षात इस्लामच्या सुवर्णयुगात मुस्लिमांनीच ऑप्टिकल इमेजरीचा शोध लावला, ज्यातून एकोणिसाव्या शतकात फोटोग्राफीचे तंत्र विकसित झाले.’

‘हिटलरने केलेल्या ज्यूंच्या शिरकाणास मुस्लिमांनीही हातभार लावला. पुढे हिटलर जिंकणारच मग या वाचलेल्या ज्यूंचे लोंढे पॅलेस्टाईन या आपल्या मातृभूमीकडे येऊ नयेत म्हणून जेरुसलेमचे तत्कालिन मुफ्ती हज अमीन हिटलरला खास भेटले. त्याच्या सैन्यात मुस्लिम स्वयंसेवकांची खास भरती व्हावी यासाठी. इतकंच नव्हे तर १९४३ मध्ये नाझींसाठी लढणाऱ्या बोस्नियन मुस्लिम फौजांपुढे त्यांनी इस्लाम आणि नाझीवाद यातले समान दूवे उलगडून सांगितले.

मुळातून वाचावं असं धर्माबद्दल (एकुणच) एक अंतर्दृष्टी (इनसाईट) देणारं हे पुस्तक आहे.

इरशादचं हे पुस्तक जगभरचा वाचक डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं असलं तरी तिच्या मांडणीत ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यातलाच (त्यांना ती ‘आध्यात्मिक भावंडं’ म्हणते) तुलनात्मक आलेख येतो. हिंदू, बौद्ध वा अन्य धर्मांचे उल्लेख वा दखल अपवादानेच येते.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://tinyurl.com/yajwg4nj

.............................................................................................................................................

२.

या पार्श्वभूमीवर असगर अली इंजिनिअर यांचं ‘आधुनिक जगाचा इस्लाम’ हे पुस्तक (अनु. नंदिनी चव्हाण, अक्षर प्रकाशन, प्रथमावृत्ती फेब्रुवारी २०१२) वाचलं. भारतीय भाषांमधील इस्लामवरील उपलब्ध लेखन हे इस्लामविरोधी धारणेतून वा संकुचित दृष्टिकोनातून झालं आहे, किंवा इस्लामी धर्मशास्त्रात कुठल्याही स्वरूपाचा बदल, सुधार वा पुनर्निर्मिती संभवतच नाही, अशा एकरेषीय विचारधारेतून झालं आहे, अशी लेखकाची भूमिका मनोगतात सुरुवातीलाच येते. त्यामुळे या लेखनाला आपोआपच काहीसं प्रतिक्रियात्मक रूप येतं. सद्यकाळातल्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी कुराणाची कशी मदत होते, हे मांडणं हा मुख्य हेतू. सूफीपरंपरा, तलाक आणि बहुपत्नीत्व, स्त्रीवाद आणि लिंगभाव, इतर धर्मांबरोबरील संबंध, मुळातली इस्लामी शिकवण आणि मुस्लिमांचं प्रत्यक्षातलं आचरण यातल्या विसंगती, जिहाद, शरियत कायदा, बुरख्याची प्रथा अशा मुस्लिम आणि इतरांतही कुतूहलाच्या, वादाच्याही विषयांत कुराण काय सांगतं, हे स्पष्ट करणारे लेख यात आहेत.

अर्थात हे वाचल्यावरही कुराणातल्या आयतींचा अर्थ आजच्या संदर्भात कसा लावायचा हाच वादाचा मुद्दा आहे, हे जाणवत राहते. ‘कुराणातील वचनांचा अर्थ प्रत्येक जण आपापली आकलनकुवत आणि प्रवृत्तींप्रमाणे लावतोच, पण अल्लाहला काय अभिप्रेत आहे, हे अजूनही कळलेलं नाही, कारण विरोधाभास इतके की आपापल्या सोयीच्या आयती निवडाव्यात, गैरसोयीच्या असतील त्याकडे दुर्लक्ष करावं हेच उदारमतवादी आणि दहशतवादी दोघंही करतात’, असं इरशाद मंजी उदाहरणांनिशी स्पष्ट करते, तेव्हा बुचकळ्यात पडायला होतं. सर्व धर्मांत हेच तर घडत असतं. उदाहरण द्यायचं तर ‘इज्तेहाद’ या महत्त्वाच्या संकल्पनेचं देता येईल. 

असगरअली  इंजिनिअर यांच्या मते इज्तेहाद म्हणजे वेळोवेळी निर्माण होणाऱ्या नवनवीन समस्यांची बौद्धिक तसंच आध्यात्मिक अंगानं मांडणी करणं, तर इरशाद मंजी म्हणते, ‘ही एक स्वतंत्र विचारांची इस्लामी परंपरा होती (सुवर्णयुगात) त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला (पुरुष वा स्त्री, लैंगिक व्यवहारातही सामान्य असो वा नसो) आपल्या समकालीन परिस्थितीनुसार आपल्या धार्मिक आचरणात बदल करण्याची मुभा असे.’ अर्थात अशा मर्यादांसह हे पुस्तक भारतीय मुस्लिमांच्या संदर्भात इस्लामशी संबंधित सर्व बाबींसंदर्भातले गैरसमज कुराणातला आधार देत काढून टाकतं हे महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, इस्लाममधील मूर्तीपूजेची निर्भत्सना ही इस्लामपूर्व अरबांच्या मूर्तीपूजेशी संबंधित असून हिंदूंसाठी हे देवापर्यंत पोचण्याचं साधन असल्यानं तिच्याशी याचा संबंध नाही, असं सांगतानाच उलट हिंदू ईश्वराला निर्गुण निराकार मानतात, ते ‘तौहीद’चं उच्चतम रूप आहे असंही स्पष्ट करतात.

३.

इस्लामचे भारतीय चित्र’ हे हमीद दलवाईंचं छत्तीस वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं (प्रथमावृत्ती श्रीविद्या प्रकाशन, १९८२) छोटंसं पुस्तक (मनोगत, प्रस्तावनादि भाग वगळता पृष्ठसंख्या ५६ फक्त.) हे यातलं सगळ्यात पारदर्शक चित्र आहे. बरीच वर्षं आऊट ऑफ प्रिंट असलेल्या या पुस्तकाची नवी आवृत्ती ‘साधना’नं अलिकडेच (मे २०१६) प्रकाशित करून मोलाचं काम केलं आहे. दलवाईंच्या अकाली मृत्यूनंतर नरहर कुरुंदकरांनी लिहिलेल्या लेखातील (जून १९७७) त्यांचं कालातीत महत्त्व अधोरेखित करणारा पानभर मजकूर यात सुरुवातीला आहे. ‘समाजाने अश्रद्ध वा नास्तिक व्हावं असा त्यांचा आग्रह नव्हता, पण यावरील चर्चा बाजूला सारून सामाजिक प्रश्नांना भिडले पाहिजे असे त्यांना वाटे’ असं सांगतानाच ‘बलवान तटबंद्या कोसळतील, मुस्लिमही बदलतील, जळमटलेली मने कायमची गुलाम राहणार नाहीत’ असा आशावादही कुरुंदकर व्यक्त करतात.

आज चार दशकानंतर सर्वच धर्म जणू मिळून त्याला पराभूत करताहेत असं चित्र असताना जवळपास पन्नास वर्षांपूर्वीचं दलवाईंचं हे लेखन अधिकाधिक समकालीन वाटत राहतं. पाकिस्तानशी झालेल्या १९६५ आणि ७१ अशा दोन युद्धानंतर बंगाल आणि आसाममधील सीमाप्रदेशात एका फेलोशिपअंतर्गत केलेल्या भटकंतीचा, तिथं भेटलेल्या सामान्य मुस्लिमांबरोबरच राजकीय  नेते, विचारवंत यांच्याशी केलेल्या बातचितीचा हा वृत्तांत.

एकसंध समजल्या जाणाऱ्या मुस्लिमांतही भारताचा अविभाज्य भाग असलेल्या विविधतेइतकेच विसंवाद, विसंगती आणि विरोधाभास आहेत हे इतरांनी समजून घ्यावे, तर मुस्लिमांनीही आपली या मातीतली मूळं ओळखावीत जेणेकरून दोहोंत सुसंवादाची वाट तयार करणं शक्य होईल, असा हेतूही दिसतो. अर्थात यापलीकडे कुठलीही पोज नसलेल्या या रिपोर्ताज स्वरूपाच्या लेखनातली लोभस व्यक्तिचित्रं दीर्घकाळ लक्षात राहतील अशी आहेत.

४.

ज्येष्ठ हिंदी लेखक कमलेश्वर या प्रवासात भेटले ते त्यांच्या विविध निमित्तानं झालेल्या काश्मिरवासीयांच्या वृत्तांताच्या ‘कश्मीर रात के बाद’ निमित्तानं (किताबघर प्रकाशन, आवृत्ती २०१४).

“यह (आजाद कश्मीर) सपना देखनेवालोंसे लडने के लिये ही मैंने गन उठाई... मुझे पता था इंडिया के ताकतपर फुदकनेवाले चीफ मिनीस्टर्ससे ज्यादा ताकत इस्लाम की तहरीक और नाममें है, इसलिये हमने पाकिस्तान का साथ देना बेहतर और जरुरी समझा... कम से कम उनके साथ हमारे मुसलमान होने का संबंध तो बनता है…”

“हम क्रॉसफायर में फस गये है... गन रखे तो आर्मी (बीएसएफ) के हाथों मारे जाते है, न रखे तो मिलिटेंट्स की ज्यादतियोंके शिकार होते है…”

१९९३ मध्ये दूरदर्शनच्या नोकरीत असताना काश्मीरमधला दहशतवाद टोकाला पोचला असताना, कमलेश्वर यांना (पचानवे फीसदी होटल बंद है, वे ही खुले है जिन्हे आतंकियोंकी सरपरस्ती हासिल है. शराबघर, क्लब, रेस्तराँ और सिनेमाघर सब बंद है...)  स्वतंत्र भारतीय पत्रकार म्हणून या जळत्या परिस्थितीत दहशतवाद्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांची भूमिका जाणून घेणं, ती पुढे पोचवण्यासाठी प्रयत्न करणं या धोकादायक कामगिरीवर जावं लागलं, त्याच्या वृत्तांतात झालेल्या असंख्य संवादातले हे दोन संवाद...

स्वतंत्र पाकिस्तानसाठी ज्यांनी द्विराष्ट्रवादाचे राजकारण उभं केलं, त्यांच्या योजनेत मुस्लिमबहुल काश्मीरचा समावेश कधीच नव्हता. त्यांनी मुस्लिमबहुल प्रांत म्हणून उत्तर पश्चिम सीमा प्रांत, पंजाब, सिंध, बंगाल, बलुचिस्तान आणि आसाम या सहा प्रांतांचीच मागणी केली होती. कारण स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचं आवाहन काश्मीरमध्ये चालणार नाही याची जाणीव त्यांना होती, फक्त गरज पडली तर इस्लाम नावाचा हुकुमाचा पत्ता (भारताला कोंडीत पकडण्यासाठी) ते वापरत आलेत, आजही. एका तऱ्हेनं पाकिस्तानसाठी इस्लाम हा धर्म नव्हे तर राजकिय सिद्धांत आहे... काश्मीरचा स्वातंत्र्याआधीचा, नंतरचा इतिहास, आजचे (१९९३ मधले) उजाड झालेले नंदनवन... यात इस्लाम हा धागा धरुन काश्मीरच्या तंबूत शिरू पाहणारा पाकिस्तान नावाचा उंट, भारतीय सैन्याकडून होत असलेले तथाकथित अत्याचार… (कमलेश्वर शेवटी म्हणतात, मैं यहाँ आकर अब सरकारी आतंकवाद का पक्षधर बन गया हूं. यहाँ का आतंकवादी और उनकी नृशंस हरकतें देखकर, कोई भी कदम उठाना मुझे अनुचित नहीं लगता’) अशा सगळ्या संदर्भात अतिरेक्यांपासून, राजकीय - धार्मिक नेते, सरकारी  अधिकारी, सामान्य नागरिक असे सगळ्यांशी पूर्वग्रहाविना बोलतात, त्याचा हा चित्रदर्शी रिपोर्ताज…

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात (खण्डित यात्राएं) १९५६ पासून विविध निमित्तानं केलेल्या काश्मीर सफरींबद्दलचे लेख आहेत, (सुखद स्मृतीयों का इतिहास) यात लेखक कमलेश्वरांची प्रतिभा फुलून आली आहे... पहिल्या भागातला जलता सवाल ‘पाहताना भीती आणि चिंतेनं काळवंडून गेलेलं मन इथे त्याआधी कैक वेळा किती मुक्त विहरले होते’ हे वाचताना मनावर मळभ दाटून येते…

हमीद दलवाईंनीही नोंदवलेला ६५ च्या युद्धादरम्यान काश्मीरमधल्या हॉटेलमधला अनुभवही कमी तीव्रतेचा तरी याला समांतर असाच आहे.

कमलेश्वर यांच्याच भाषेत ‘मानवीय चिंताओं और दायित्व का यह दस्तावेज’ वाचावा, अनुभवावा असाच...

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/yaj8ppqa

.............................................................................................................................................

५.

ही बृहतचित्रं वाचताना कथा-कादंबऱ्यांसारखी मिनीएचर्सही दिसली... त्यात साहित्य अकादमीनं पुरस्कृत केलेले विविध भाषी कथासंग्रह होते. सलाम बिन रज्जाक यांचा उर्दू कथासंग्रह ‘भग्न मूर्तींच्या सानिध्यात’ (शिकस्ता बूतों के दरमियाँ, २००४ मध्ये अकादमी पुरस्कार - अनु. मनीषा पटवर्धन, साहित्य अकादमी, प्रथमावृत्ती  २०१७) मध्ये ‘रामलीलेची नाटकं याच ठिकाणी होत, होळी इथेच पेटवली जाई, गणपतीही इथेच बसत, मुहर्रमचे ताजिये इथूनच निघुन इथेच थंड होत, ईद-ए-मिलादच्या मिरवणुका इथूनच निघत...’ (कामधेनू) हे वाक्य परवलीचं असावं तसं येतं... ‘जमीन’मधला दामू जिवलग मित्र शेखूला आपली जमीन दबावामुळे विकता येत नाही या विषादानं भरल्या आवाजात म्हणतो, “आपले जात-धर्म कदाचित वेगळे असतील मित्रा, पण आपल्या नात्यांच्या दोऱ्या कोणत्याही धर्माच्या खुंटीवर टांगलेल्या नाहीत, आपल्यालाच त्या घट्ट  धरून ठेवायच्या आहेत. ज्यादिवशी त्या आपल्या हातातून निसटतील त्यादिवशी काळाच्या वावटळीत पाचोळ्यासारखे उडून जाऊ...” लंबक किती दुसऱ्या टोकाला गेला आहे याचे धार्मिक सहजीवन विस्कटल्याचे दुखरं भान या उद्गारात आहे...

या संग्रहातल्या ‘रोने की आवाज’, ‘आंधी में चिराग’, ‘खबर’, ‘आशंका’, ‘जमीन’, ‘परस्पर’, ‘चादर’, इब्राहिम भिश्तीसारख्या कथा या दोन टोकांदरम्यानच्या पडझडीच्या कथा आहेत. बदलते मुस्लिम जीवन, धार्मिक रीतीरिवाज हेही तपशीलानं येते.

६.

ज्ञानपीठविजेत्या कुर्रतुल ऐन हैदर यांचा १९८५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला कथासंग्रह ‘पतझड की आवाज’. ‘पानगळीची सळसळ’ हा द. प. जोशी यांनी केलेला त्याचा मराठी अनुवाद‌. (साहित्य अकादमी, तृतीयावृत्ती २०१६ ) हैदरबाईंचे अवघं भावविश्व फाळणी आणि तिच्या आगेमागे जणू गोठून राहिलेलं. मागच्या गंगाजमनी संस्कृतीतलं सौहार्द आणि मोकळेपणही असेच फाळणीनंतर गोठून गेले कायमसाठी. त्याच्या सुखद स्मृती आणि हे फक्त स्मृतीतच उरल्याची विषण्णता या संग्रहात जागोजागी दिसते. पाकिस्तान फाळणीआधी जणू स्वप्नप्रदेश होता. ‘फारुखने मला मेरठला पत्र लिहिले की, मी ताबडतोब पाकिस्तानला निघून जावे. मुसलमान सभ्य मुलींची अब्रू इथे सुरक्षित नाही. पाकिस्तानची गोष्ट वेगळी, ते इस्लामी राज्य होते... फाळणीनंतरच्या रक्तरंजित रात्री अखेर संपल्या… परिस्थिती फार लवकर बदलली. कुठे त्या अखंड हिंदुस्थानातील मनाला हरवून टाकणारी ती रंगीबेरंगी दुनिया आणि कुठे अठ्ठेचाळीस नंतरचे हे लाहोरचे अरुंद बोळकांडीतील गरीबीच्या छायेत वावरणारे अंधारे घर… देवा! मनाला भूरळ घालणारी कसली दुनिया मी पाहिली होती…” (‘पानगळीची सळसळ’) इस्मत चुगताईंच्या ‘कागजी है पैरहन’ या आत्मवृत्तातही लहानपणच्या, तारुण्याच्या नोंदीत अखंड भारतातले सौहार्द कायम असलेले मोकळे, संधींनी भरलेले वातावरण येते.

७.

‘सात संगर’ या अख्तर मुहिउद्दीन यांचा १९५८ साली अकादमी पुरस्कार मिळालेला सात काश्मिरी कथांचा छोटा संग्रह... ‘सात शिखरे’ हा त्याचा दत्ता भगत यांनी केलेला मराठी अनुवाद (साहित्य अकादमी, आवृत्ती २०१६ ) या कथांत धर्म - भाषेपलीकडे मानवी आयुष्यातल्या जटीलतेबरोबरच, नैसर्गिक - परिस्थितीजन्य अशा सगळ्या अडचणीतही मार्ग काढण्याच्या, तगून राहण्याच्या ऊर्जेचं दर्शन होतं.

८.

कानडी लेखक फकिर मुहम्मद कटपाडींचे (अनुवादक उमा कुलकर्णी त्यांना सत्तरीच्या दशकातले कानडी साहित्यपरंपरेतले आधुनिक बंडाय लेखक म्हणतात.) वडील कटपाडी इथल्याच मशिदीत मौलवी होते. त्यामुळे मशिदी - घराबाहेरच्या गैरइस्लामी जगात इस्लाम बद्दल असलेले गैरसमज खोडुन काढण्यासाठी मी, माझा धर्म याबद्दल आपणच सांगितले पाहिजे या स्पष्ट हेतूनंच त्यांनी लेखणी हाती घेतली. ‘व्रत आणि इतर कथा’ (अनु. उमा कुलकर्णी, शब्द पब्लिकेशन्स, प्रथमावृत्ती सप्टें. २०१४) हा त्यांचा कानडीतून मराठीत आलेला कथासंग्रह.

कुठेही प्रचारकी थाट न येता कथापण शाबूत राखत हे घडवण्याची कसरत या संग्रहात त्यांना चांगली जमली आहे. या संग्रहातल्या एकुण तेरा‌ कथांपैकी पहिल्या सात कथांमधून पौगंडावस्थेतील मुलाच्या निरागस, उत्सुक, चौकस नजरेतून (त्यातून पडणाऱ्या छोट्या छोट्या प्रश्नातून) बरेच माहीत नसलेले तपशील येतात. मुलांच्या वाढत्या कुतूहलानं भरलेलं घर-आसपास न्याहाळताना  पडणाऱ्या प्रश्नांचं भावविश्व येतं. इतर कथांत धर्म, चालीरिती, इतर धर्माबरोबर - साधारण सहानुभाव असला तरी - येणारे ताणतणाव येतात तसे मौलवी‌ (खतीब‌) असण्यातून येणारा आदर आणि त्याचा दबावही, धर्मापलीकडे असणारी गरिबी, त्यामुळं होणारी अवहेलना, हातातोंडाशी घासाची मिळवणी करेतो होणारी कासाविशीही येते. त्यामुळे त्याला चौकटीपलीकडचं मूल्य प्राप्त होतं.

आवर्जून वाचावा असा हा केवळ इस्लाम आणि मुस्लिमांबद्दलच नव्हे तर एकुणच आयुष्याबद्दल सहानुभवी भान देणारा हा संग्रह आहे. ‘घुसमट’, ‘द्वीप’सारख्या काही कथांमधून वेगळा, काहीसा बंडखोर आवाज येतो (या आवाजालाच माल कादंबरीत पुढे व्यापक रूप येते) तरी रूढ अर्थानं तो विद्रोही नाही, व्यवस्थेतल्या दुर्दशेचं, सामाजिक दबावाचं भान देणं एवढाच हेतू दिसतो. कटपाडी कर्नाटकच्या दक्षिण किनारपट्टी भागातले ब्यारी मुस्लिम, उर्दूशी नव्हे तर तुळूशी जवळीक असणारी ब्यारी कानडी बोलणारा (यात रामायणाची रचनाही झाली आहे हे ते आवर्जून सांगतात), कुराणाला पाचवा वेद मानणारा हा समाज. त्यामुळे स्वजनांना आपल्या इथल्या मुळांची जाणीव करून देणं हेही दिसतं.

९.

धर्माचं मूलभूत तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्षातले धार्मिक (म्हणवले जाणारे) वर्तन यातली वाढती तफावत हा आपल्या चिंतेचा, आस्थेचा आणि अभ्यासाचा विषय आहे, असं कटपाडी म्हणतात. (कुराणातली शिकवण आणि मुस्लिमांचे प्रत्यक्षातलं आचरण यातल्या विसंगती हा सुधारणावादी विचारवंत असगरअली इंजिनिअर यांनाही चिंतेचा विषय वाटतो.)  कटपाडींची ‘माल’ ही कादंबरी वाचली (सरकुगळू… अनु. मीरा शिराली, शब्द पब्लिकेशन, प्रथमावृत्ती डिसेंबर २०१७) तेव्हा याची आठवण झाली. मौलवींच्या घराण्यातल्या कटपाडींना याचा त्रास झाला, धमक्या मिळाल्या. १९८३ मध्ये केलेला हा अनुवाद बासनात गुंडाळून ठेवण्याआधी १४ वर्षं प्रकाशकांमधून फिरत राहिला, त्यालाही हेच कारण असावं असं अनुवादक मीरा शिरालींना वाटतं. आधी नकारांमधला न् मग बासनातला असे प्रत्येकी चौदा वर्षांचे दोन वनवास भोगल्यावर तो उमा कुलकर्णींच्या मदतीनं आणि ‘शब्द’कृपेनं प्रकाशात आला.

स्त्रीच्या परमावधीच्या असहायतेची, हतबलतेची ही तितकीच वादग्रस्त कथा. कुट्टीचिरा या कर्नाटकातल्या दक्षिण किनारपट्टीवरच्या गावात दरवर्षी ठराविक काळात बोटींमधून आखातातले अरब येतात, गावातल्या तरुण मुली दलालांनी हेरून तयार ठेवलेल्याच असतात, त्यांच्याशी हॉटेलात तात्पुरता पण रितसर निकाह लावतात. काही दिवसांनी हातावर काही पैसे टिकवून आले तसे परत जातात. ते नव्या सावजाच्या शोधात पुढील वर्षी येण्यासाठीच. या अभागी स्त्रिया, त्यांची या अशा संबंधातून निर्माण झालेली संतती, त्यात दरवर्षी नव्या मुलींची पडणारी भर, यातून त्यांची वस्तीच तयार होते. श्रमाच्या कामांव्यतिरिक्त गावानं वाळीत टाकलेली वस्ती. लग्नानंतर मुलानं फक्त रात्रीपुरतं बायकोकडे मुक्कामाला जाण्यासारख्या विचित्र प्रथा, या वस्तीत जन्माला येणाऱ्या मुलांची होणारी कुचंबणा, प्रतिष्ठेच्या नावाखाली गावानं वस्तीची केलेली कोंडी, दलालांचं स्वतंत्र विश्व या असह्य तणावाच्या पार्श्वभूमीवर कटपाडी तरल प्रेमकथेचा घाट घालतात. ती बऱ्यापैकी ‘प्रेडिक्टेड’ वाटेनं काही अतर्क्य योगायोगांना धरून सुखान्ताच्या वळणावर जाते तरी यावर हाच एक उतारा आहे असंच वाटत राहतं, हे त्यांचं यश.

गावातली मुलं बदनामीच्या नावाखाली वस्तीनं हा धंदा बंद करावा म्हणून मोर्चा काढतात, भुकेच्या कोंडीनं हैराण झालेली शरीफम्मा त्वेषानं ओरडते, ‘अरबांशी लग्न करणं सोडून देऊ, पण पोटाला तुमच्यासारखीच भूक लागते, तिचं काय करायचं? आमच्या मुली व्यभिचारातून जन्मलेल्या म्हणून तुच्छतेनं तुम्ही लांब राहता, तुमच्यातले किती जण लग्न करायला तयार आहेत त्यांच्याशी? नसाल तर जगायचं कसं आम्ही?’ शरिफम्माचे सवाल साधेच, पण ‘फॅण्ड्री’तल्या जब्याच्या दगडासारखे अंगावर येतात...

१०.

अब्दुल बिस्मिल्लाह यांच्या ‘अपवित्र आख्यान’ कादंबरीला या प्रवासाच्या मागच्या टप्प्यात भिडलो होतो, यावेळी झिनी बिनी चदरिया, जहरबाद, समर शेष है, रावी लिखता है अशी साखळीच भेटली…

‘समर शेष है’ (राजकमल पेपरबॅक्स, द्वितीयावृत्ती २०१६) ही त्यातली छोटीशी आत्मकथनात्मक कादंबरी...कळायला लागतं, आठवतं तेव्हापासूनच्या फरफटीची कथा. आईवेगळं, वडिलांबरोबरचं सर्व अभावांनी ग्रासलेलं बालपण, पुढे लवकरच वडिलांच्या अनपेक्षित निधनानं आलेलं एकाकीपण, कसलीच स्वप्नं मनातही उमलू नयेत असे अपमान, अवहेलना यावर मात करत ज्यामुळे जीवनाकडे परतता येते, तो वादळी प्रेमानुभव...यातून आलेलं वास्तवाचं भान...

“उस दिन पहलीबार एक ऐसी दुनिया से मेरा परिचय हुआ जिसमें प्यार करनेवाले, प्यार में टुटनेवाले, प्यार में मरनेवाले और प्यारमें (ही) जीनेवाले ऐसे तमाम लोग थे जो अपनी अपनी पीठपर अपनी अपनी रामकथा बांधे घुम रहे थे” असं लेखक पुस्तकाच्या पाठराखणीत म्हणतो त्याची होणारी लख्ख जाणीव ही या प्रवासातली रुक्ष, कोरड्या तथ्यं - तपशीलांसोबतची कमाई.

११.

‘रावी लिखता है’ (राजकमल प्रथमावृत्ती २०१०) ग्रामीण भारतातल्या छोट्याशा खेड्यातून जगभरच्या महानगरांपर्यंत पसरलेली चार पिढ्यांची गोष्ट आहे. ‘उनके लिये नहीं जो इस किताबमें किसी बडी फिलॉसॉफीकी खोज करेंगे’, असं अर्पणपत्रिकेत लेखक म्हणतो. ‘अंग्रेजी बोलो, अंग्रेजी ढंग के कपडे पहनो, कांटे छूरी से खाओ मगर अंग्रेज बिल्कुल मत बनो’ असं म्हणणारा बाप शहरातली चकचकाटी आधुनिकता आणि गावाकडच्या स्मरणकातर करणाऱ्या आठवणी यांच्या कात्रीत अडकला आहे. म्हणतो, ‘हर आदमी अपनी जिंदगीमें चारो युग देखता है…’ रावीला वाटतं ‘‘जीवन को समझने के लिये ये भारतीय परिकल्पना वाकई अद्भूत है... चार युग... सत, त्रेता, द्वापार और कलि... दीन मुहम्मद, वली मुहम्मद, डैडी और हम...

दीन मुहम्मद… सतयुग… सबकुछ सहज… सुख भी दुख भी

वली मुहम्मद… त्रेतायुग… भगवान राम का युग… असत्य और अन्याय से संघर्ष का, उसपर विजय का युग

डॅडी... द्वापार भगवान कृष्ण का यानी प्रेम का युग

हम.. कलियुग जिसके बारे में डॅडी के तुलसीदास न जाने क्या क्या कह गये है…”

अशीच कच देवयानी शुक्राचार्यांची  कथा येते. शुक्राचार्यांनी शिकवलेली संजीवनी विद्या वापरून कच त्यांना जिवंत करतो. पित्याला पुन्हा जिवंत झालेलं पाहून देवयानीच्या डोळ्यात आनंदाश्रु येतात, मलाही डॅडींच्या आठवणीने साता समुद्रापार असेच रडू आले होते, मी देवयानी आहे? नाही देवयानी आहे इच्छा... डॅडी, आजोबा, पणजोबा  असं करत आपल्या सगळ्या वारशाला जाणून घेण्याची इच्छा… काळ आहे कच, शुक्राचार्यांचं पोट आहे हा साता समुद्रापार पसरलेला अनंत अंतराळ... इच्छेमुळे काळाने अंतराळाला फाडले आणि या सगळ्यांना समोर आणले आहे... रावीचं हे असं आपला वारसा समजून घेणं हे तत्कालीन भारतातली स्वतंत्र तरी एकमेकांत मिसळून गेलेली गंगाजमनी संस्कृती समजून घेणं आहे...

१२.

‘जेहाद’ हा कानडी लेखक बोळुवारु मुहम्मद कुञि यांचा धर्माच्या कचाट्यात अडकलेल्या प्रेमाचा शोध आहे‌. (अनु. डॉ. अ.रा.यार्दी, पद्मगंधा प्रकाशन, प्रथमावृत्ती डिसेंबर २००८) आई गेल्यावर पौगंडावस्थेत पाठच्या बहिणीसह पोरका झालेल्या रशिदला सलोनी टीचर आपल्या घरी घेऊन जातात. त्याच्या धार्मिक स्वातंत्र्याला धक्का न लावता त्याचं शिक्षण पुरं होऊन बहिणीचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी त्यानं लवकरात लवकर पायावर उभं रहावं यासाठी झटत राहतात. निस्वार्थ चांगुलपणावरचा आपला विश्वास उडून गेला आहे... छोट्या गावात धर्माच्या तटबंदी अभेद्य असतात... त्यातली कुजबूज असहायपणे डोळ्याकानाआड करत तो दिवस ढकलत राहतो. धर्माच्याच नावाखाली माणसं स्वार्थी होतात, त्याच्या शिकवणीशी विसंगत होतात याबद्दल मनात अस्वस्थ करणारे प्रश्न घेऊन पुढे शिकण्यासाठी बहिणीला मागे ठेवून गाव सोडतो. गावात टीचरच्या घरी राहिला तरी आजूबाजूला जात-धर्मवाले आहेत, ख्रिश्चन घरी राहणाऱ्या रशीदकडे  त्यांचं जरा अधिकच लक्ष आहे. पण बेंगळुरूत तो सलोनी टीचरच्या बहिणीकडे राहतो. तिथं घरी, कॉलेजात सगळीकडे ख्रिश्चन वातावरण आहे. गावात असताना ‘देव मशिदीत नाही तर मनात असतो’ असं रहिम सावकाराला ठणकाऊन सांगणाऱ्या रशिदला इथं काहीशा असुरक्षिततेमुळे, कदाचित उपरेपणामुळेही, धर्माबद्दल आधी फारशी न वाटलेली जवळीक वाटू लागते. तिथंच आपल्यातल्या धार्मिकतेची, त्याआडच्या निखळ माणूसपणाची कसोटी पाहणारं प्रेमाचं वादळ त्याच्या आयुष्यात येतं. धर्माचं मूळ तत्त्वज्ञान आणि त्याचा आधार घेत माणसं करतात ते आचरण यातली विसंगती इथं रशिदच्याही मनात प्रश्नचिन्हं उभी करतं, तरी आतला आवाज ऐकण्याचं बळ गोळा करताकरता तो थकून जातो…

१३.

‘पाकिस्तानी कहानियाँ’ (पाकिस्तानी कहानी के पचास साल) हा या शोधात सापडलेला मौलिक ऐवज (साहित्य अकादमी, पाचवी आवृत्ती, २०१६). ज्येष्ठ कथाकार इंतजार हुसेन आणि समीक्षक असिफ फर्रुखी यांचं हे संकलन अब्दुल बिस्मिल्लाह यांनी हिंदीत अनुवादलं आहे. दोन्ही संपादकांनी कथांच्या निवडीमागची भूमिका थोडक्यात तरी ठोस नेमकेपणानं मांडली आहे.  इंतजार हुसेन मांडतात ते (थोडे स्वैरपणे) असं सांगता येईल-

“पाकिस्तानच्या निर्मितीनंतर काही दिवसांतच ‘पाकिस्तानी साहित्याची ओळख कशात आहे?’ असा प्रश्न निर्माण झाला. एक वेगळा धर्म असलेला स्वतंत्र देश अस्तित्वात आल्यावर त्यातल्या साहित्यालाही त्याची अशी ओळख हवी हा विचार त्यामागे होता. उर्दू साहित्यातील प्रगतीशील आंदोलनात (सामाजिक संदर्भात) साहित्यात हे हवे - ते नको, हे असे पण इथे हे धर्माच्या संदर्भात होत होते. या ‘हवे’ शब्दाला साहित्यात काही स्थान नाही-नको असे मला वाटते. त्याचा हेतू आणि दखल याने सृजन डागाळते. त्यामुळे धर्माच्या (कौम) दृष्टिकोनातून साहित्यात काय हवे-नको यापासून लांब राहत आम्ही पाकिस्तानी कथेकडे पाहिले.

फाळणीनंतर अस्तित्वात आलेला आणि गेल्या अर्धशतकात विकसित झालेला  समाज हा त्याआधीचा एकत्रित समाज नव्हता-नाही. इथे मुस्लिम बहुसंख्य आहेत, त्यामुळे तो वेगळ्या चालीत चालणार. लष्करी कायद्याच्या उपस्थितीने इथल्या लोकशाहीलाही वारंवार खण्डीत केले, त्याचाही काही परिणाम झाला असणार. इथे लिहिणाऱ्यांपुढचे प्रश्न पाकिस्तानशी संबंधित, त्यामुळे वेगळे होते. हिंदुस्थानात फाळणीनंतरही इतिहास आणि परंपरेतले सातत्य कायम राहीले, इथे ते खंडीत झाले होते - नव्याने जोडावे - निर्माण करावे लागणार होते. आम्ही एक नव्यानं निर्माण झालेला स्वतंत्र समुदाय आहोत तर आमची ओळख काय-कशात आहे? आमचा इतिहास कुठुन सुरू होतो? मध्यपूर्वेत (उपमहाद्वीप में) मुसलमानांनी ऐतिहासिक व्यवस्थेला सुरुवात केली हे ठीक, पण त्या प्रदेशाचा इतिहास आमचाही इतिहास आहे का? मग हिंदुस्थानात पसरून राहिलेल्या इतिहासाशी आमचे आता काय नाते आहे? अखेर आमची मुळं कुठं आहेत? या आणि अशा सतत झडणाऱ्या चर्चांचा आमच्या कथेवर बराच प्रभाव राहिला… अर्थात साहित्य सर्व बाजूंनी बंद घर असत नाही. एक अशी इमारत असते, जिला बाहेर उघडणारे झरोके आहेत. आजची पाकिस्तानी कथा पाहिलीत तर लक्षात येईल की बाहेरून हवा आत येत आहे, तिचा परिणामही दिसत आहे. तिला धार्मिक दिशा आहे तशा अन्य दिशाही आहेत...”

या भूमिकेतून निखळ साहित्यमूल्य ध्यानात घेऊन (परिवर्तनातील सातत्य  आणि अंतर्विरोध, शक्तिशालींचे प्रभुत्व आणि शोषितांची दुर्दशा, प्रत्येक माणसाच्या आतल्या गोष्टींची कथा... असं असिफ फर्रुखी म्हणतात) निवडलेल्या पन्नास वर्षांतील बत्तीस कथा या संग्रहात आहेत. ज्यातल्या २३ उर्दू आहेत तर अन्य सिंधी, पंजाबी, सराईकी, बलुची आणि पुश्तू.

भारतीय वाचक (साहित्य अकादमीसाठी) डोळ्यासमोर ठेवून ही निवड केली असली तरी मुळातल्या गोष्टी पाकिस्तानी वाचकांसाठी लिहिलेल्या. त्यामुळे त्यात धार्मिक रितीरिवाज कथेला आवश्यक तेवढेच येतात. (मंटोच्या ‘खोल दो’चा अपवाद वगळता फाळणीही डोकावत नाही.) त्यामुळे ही मुस्लिम माणसाची वेगळी कथा न होता त्यापलिकडच्या माणसाची, त्याच्या तितक्याच सामान्य सुखदुःखांची, नात्यांमधल्या पडझडींची होते. वाचताना आपण पाकिस्तानी अभिव्यक्ती वाचत आहोत ही वेगळी जाणीव होत नाही, हे फार छान होते.

इथं थोडं विषयांतर करून एक अनुभव आवर्जून सांगावासा वाटतो. ‘आशय’च्या २००९ च्या अंकात पाकिस्तानी कथाकार एम. अतहर ताहिर यांची एक कथा (शाळा‌ तपासनीस, अनु. संतोष वरधावे) घेतली होती. प्रसिद्ध झाल्यावर अंकाची प्रत त्यांना लाहोरच्या पत्त्यावर पाठवली. वरधावे म्हणाले ‘अंकात, अनुक्रमाणिकेत कथेवर खूण करायला हवी होती. त्यांना देवनागरी कळणार कसं?’ पण आठवडाभरातच ताहीर यांची मेल आली. त्यात कथा भारतीय वाचकांपर्यंत पोचली याचा आनंद त्यांनी व्यक्त केला होता. कथेसाठी काढलेल्या रेखाटनावरून (शिरीष घाटे) कथा ओळखली असं लिहिलं होतं. त्याच आठवड्यात होणाऱ्या त्यांच्या नव्या पुस्तकाच्या प्रकाशनाचं आमंत्रणही होतं. हा अनुभव बोलका आहे असं वाटतं.

१४.

पुस्तकं संपली नाहीत, संपणारही नाहीत, तसाच शोधही. कारण समजून घेण्याच्या या प्रवासाला कुठलंच गंतव्यस्थान नाही. कुठल्या निष्कर्षाला पोचावं इतका हा काटेकोर अभ्यास नाही. तरी विषय बहुतेकांचा समज असतो तसा एकरेषीय नाही, त्याला  अनेक मिती आहेत (केवळ पाकिस्तान आणि इस्लामशी संबंधित नाही तर आपल्या माणूस असण्याशी संबंधितही), याचं येत गेलेलं भान हे यातले संचित. वाट पुढेही अनंत योजनं पसरलेलीच आहे आणि पायात बळ आहेतो चालायचं तर आहेच…

............................................................................................................................................

‘पाकिस्तान ते इस्लाम व्हाया पुस्तकं १’ या दिवाळी २०१६मधल्या लेखासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................

लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Jayant Raleraskar

Thu , 01 November 2018

छान. या विषयाचा धांडोळा घेताना आज पर्यंत आपण राजकीय अभिनिवेश किंवा राजकारणी व्यक्तींची मते पाहत राहिलो. साह्त्यिक अंगाने, कलाविषयक प्रगल्भ जाणीवा या विषयाच्या संदर्भात निर्माण झाल्याच नाहीत, हे मला नव्याने लक्षात आले. संदर्भ इतके आहेत की त्यांचे परस्पर नाते विचारात घेऊन पुनर्वाचन झाले पाहिजे. ललित साहित्याचे हे मोठेपण तुझ्या लेखामुळे अधोरेखित झाले.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख