मणिशंकर अय्यर : दैव देते आणि वाचा घालवते!
दिवाळी २०१८ - माणसं : कालची, आजची, उद्याची
देवेंद्र शिरुरकर
  • मणिशंकर अय्यर
  • Tue , 30 October 2018
  • दिवाळी २०१८ माणसं : कालची आजची उद्याची मणिशंकर अय्यर Mani Shankar Aiyar

काही लोक बहुधा निव्वळ वादग्रस्त विधानांसाठीच जन्माला आलेले असतात! वादग्रस्त विधाने करण्यातच त्यांचे इतिकर्तव्य सिद्धीस जाते अथवा त्यांच्या ‘साठा उत्तराची कहाणी’ सुफळ ठरते, असा त्यांचा बाणा असतो. ही त्यांची सवय जनतेलाही एवढी रुचायला लागते की, नंतर त्यांनी काही बाष्कळ विधाने केली नाहीत तर करमेनासे होते. वादग्रस्त वक्तव्ये आणि अशी व्यक्तिमत्त्वे यांचे एक अतूट नाते तयार होते. मात्र या वाचीवीरांच्या बेधुंद वर्तनव्यवहारात लोक त्यांची मूळ ओळख विसरून जातात. सर्वसामान्यांकडून अशा लोकांची मूळ ओळख विसरून जाणे स्वाभाविक व साहजिक मानावे लागेल. पण या वाचाळवीरांसाठी अशी परिस्थिती ओढवून घेणे निश्चितच भूषणावह नाही.

सत्ताधाऱ्यांच्या कृपाप्रसादामुळे अथवा त्यांच्याशी कधीकाळी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळालेल्यांनी याचे विस्मरण होऊ देणे धोकादायक असते. आपल्या वाट्याला आलेली वाट्टेल ती भूमिका उपजत अभिनयकौशल्याने तारून नेत रसिकप्रेक्षकांची वाहवा मिळवणारा तो कसदार अभिनेता प्रदीर्घ काळ स्मरणात राहत असतो. मात्र असे विशेष गुण अंगी नसणारे लोक त्या-त्या काळात कोणाच्या तरी कृपाप्रसादामुळे काही काळ पडद्यावर झळकतात. हा कृपेवर तरून जायचा काळ संपला की, पडद्यावर अस्तित्व राखण्यासाठी म्हणून या मंडळींकडून जी काही सोंगे वठवली जातात, तीच पुढे त्यांच्या अस्तित्वाचा अविभाज्य घटक समजली जातात. काळाच्या ओघात या सोंगाड्यांना स्वत:च्या कुवतीचा विसर पडतो. कधीकाळी आपण या रंगभूमीवरील दखलपात्र असे मोठे नट होतो, याबद्दल त्यांना स्वत:लाही विश्वास वाटेनासा होतो. तिथून पुढे रसिकांची चार घटका करमणूक करण्यापलीकडे त्यांचे अस्तित्त्व उरत नाही. लोक म्हणायला लागतात की, अमूक व्यक्तीचा काळ संपला आता. यात आश्चर्यजनक काही नसते. पण या सगळ्या प्रवासात अशा व्यक्तिमत्त्वांमधील थोडेफार सदगुणही मारले जातात, ही खेदाची गोष्ट असते. 

काँग्रेसच्या ताफ्यात एकेकाळी सन्मानपूर्वक वागवले जाणारे अन सध्या ‘उरलो केवळ करमणुकीपुरता’ असा भाव असणारे मणिशंकर अय्यर यांची गत राजकीय पटलावरच्या सोंगाड्यासारखीच झाली आहे. कधी काळी सार्वजनिक आयुष्यात आपण महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्यांपैकी एक होतो, याचा त्यांना बहुदा विसर पडलेला आहे अथवा संधी मिळूनही आपण फार काही चमकदार कामगिरी करू शकलेलो नाही, याचे वैषम्य त्यांना सतावत असते. यातले खरे-खोटे तेच सांगू शकतील.

मणिशंकर अय्यर आणि माध्यमातल्या स्नेहीजनांचे लाडके ‘मणि’ हा खरे तर माध्यमांसाठी काँग्रेस आणि गांधी कुटुंबियांबद्दल खात्रीशीर माहितीचा स्त्रोत होता. तत्कालीन घडामोडींबद्दल आणि धोरणात्मक बाजूंवर अधिकारवाणीने भाष्य करणारे हे सदगृहस्थ, आज माध्यमांतल्या त्यांच्या स्नेहीजनांनाही सनसनी निर्माण करण्यासाठीच आठवावेत, असा अय्यर यांचा आजवरचा प्रवास आहे. अय्यर यांचा इतिहास ज्ञात नसलेल्या अनेकांना हा नेता दिग्विजय सिंग यांच्याएवढाच उथळ विधाने करणारा वाटण्याची शक्यता आहे. नाहीतरी वादग्रस्त वक्तव्ये सम्राटांच्या स्पर्धेत अय्यर हे मुख्य स्पर्धक असल्याची भावना आजच्या पिढीत दृढ झालेलीच आहे.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://tinyurl.com/yajwg4nj

.............................................................................................................................................

अय्यर यांची वादग्रस्त विधानांची खोड ही अगदी पहिल्यापासूनची आहे. केवळ कधीकाळी ती निश्चित अशी भूमिका मांडण्यासाठी वापरली जात असे, हे लक्षात घ्यावे लागते. सध्या काँग्रेसची जी बरी-वाईट अवस्था आहे, त्यातून पक्षाला ‘अच्छे दिन’ यायला हवे असतील, तर त्यासाठी जे परखड चिंतन गरजेचे आहे, ते करू शकणाऱ्या व भीडभाड न ठेवता अभिव्यक्त करू शकणाऱ्यांत अय्यर यांचा क्रमांक लागतो. ही त्यांची उपयुक्तता लक्षात घेण्यासारखी आहे.

अय्यर या व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेताना त्यांच्या आजवरील वाटचालीकडे नजर टाकण्यापेक्षा  त्यांच्या वादग्रस्त विधानांवर कटाक्ष टाकण्याचा मोह अधिक होणे स्वाभाविक आहे. त्याचे कारण अय्यर आपल्या  वक्तव्यामुळे आपल्या पक्षाला असे काही अडचणीत आणतात की, नंतर त्याची सारवासारव करायलाही तेवढ्या क्षमतेची व्यक्ती पक्षात नसते. अशा वेळी वेळ मारून नेण्याची जबाबदारीही नकळतपणे अय्यर यांच्याकडेच सोपवली जाते.

अय्यर मूळचे तामिळनाडूचे म्हणजे द्रविडी परंपरेचा जाज्वल्य अहंकार असणारे. त्यातच त्यांची मुळे ब्रिटिश इंडियाचा भाग असलेल्या लाहोरची. फाळणीमुळे जी कुटुंबे विस्थापित म्हणून भारतात आली, त्यांच्यात एक निसर्गत:च चीड, राग, द्वेषभाव निर्माण झालेला आढळतो. कधी तो द्विराष्ट्रवादाची कल्पना मांडणाऱ्यांबद्दल असतो वा उजव्या  परंपरावाद्यांप्रमाणे महात्मा गांधींबद्दल असतो. द्रविडी बाणा असलेल्या अय्यर यांचा राग हिंदुधर्मपरंपरेविरोधात दिसून येतो. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून ते सेक्युलॅरिझमचे समर्थक असल्याचे जाणवते. त्यांचे तसे असणे आक्षेपार्ह नसते. पण मुळे पाकिस्तानातील, प्रशासकीय सेवेदरम्यान वास्तव्य पाकिस्तानमध्ये असणारे अय्यर या देशातील हिंदु-मुस्लिम ऐक्याचे गोडवे गाताना द्रविडी अहंभावातून निर्माण झालेल्या हिंदुद्वेषाचे पाईक होतात आणि काँग्रेसच्या व्यासपीठावर त्यांच्या या सुरास आपोआपच तुसडेपणाचा रंग  चढतो. त्यामुळेच अय्यर यांच्यावर टीका करताना त्यांच्या कल्पनाशक्तीला स्फुरण चढत जाते.

मूळच्या संतुलित वृत्तीच्या अय्यर यांची विधाने आक्रस्ताळी बनण्यामागे कदाचित हे मिश्रण अधिक कारणीभूत ठरावे. त्यात ते काँग्रेसमधील प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेल्या काही प्रमुख तमिळ ब्राम्हण कुटुंबियांपैकी एक. तिरुअनंतपूरचे खासदार शशी थरुर यांच्याप्रमाणेच अय्यर हेसुद्धा भारतीय परराष्ट्र सेवेतून भारतीय राजकीय अखाड्यात पदार्पण केलेले नेते.

पेरियार यांच्या आर्यविरोधाची धार अय्यर यांच्यातही टोकदारपणे उतरलेली. अय्यर ही दक्षिण भारतातील तमिळ ब्राह्मणांची एक प्रमुख पोटजात. आडवे गंध लावणाऱ्या अय्यरांमध्ये उच्चशिक्षण आणि ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या भारतीय सनदी सेवेत चाकरी ही वहिवाटच चालत आलेली.

१० एप्रिल १९४१ साली अशाच अय्यर या तमिळ ब्राह्मण कुटुंबात मणिशंकर यांचा जन्म झाला. वडील सनदी लेखापाल आणि आई गृहिणी. दिल्ली विद्यापीठातल्या सेंट स्टीफन्स कॉलेजात अर्थशास्त्रात पदवीधर झालेल्या अय्यर यांनी केंब्रिजच्या ट्रीनिटी हॉल महाविद्यालयामधून एम. ए. केलेले आहे. पत्रकारितेची आवड असलेल्या अय्यर यांनी शालेय जीवनात डुन स्कूलमध्ये असताना एका साप्ताहिकाचे संपादन केलेले आहे. केंब्रिज विद्यापीठात विद्यार्थी निवडणुकात रस घेणारे अय्यर त्यांच्या मागे दोन-चार इयत्ता असणाऱ्या राजीव गांधी यांच्या नजरेत भरले. डुन स्कूलमध्ये ते राजीव यांचे सिनिअर होते.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/yaj8ppqa

.............................................................................................................................................

अय्यर यांची शैक्षणिक वाटचाल मात्र तशी सुखद झालेली नाही. ते अवघ्या १२ वर्षांचे असताना वडील स्वामिनाथन अय्यर हे एका विमान अपघातात मृत्युमुखी पडले. त्यामुळे साहजिकच त्यांची शैक्षणिक वाटचाल  स्वत:वरील आर्थिक जबाबदारीचे भान आलेल्या पोक्तपणाने झालेली आहे. शिक्षणानंतर सनदी सेवेत रुजू होण्याची परंपरा जपत अय्यर १९६३ साली भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाले. भारत सरकारच्या सह-सचिवपदापर्यंत मजल मारलेल्या अय्यर यांनी १९८९ साली या सेवेतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.

पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवनात रस घ्यायला लागलेल्या अय्यर यांना १९९१ साली मैलादुथुराई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी काँग्रेसने दिली. या कालात त्यांचे वाग्बाण तर्कसंगत होते. तत्कालीन विरोधकांच्या युक्तीवादाला अभ्यासपूर्वक परतावून लावण्यासाठी  काँग्रेसला अशा तिखट माऱ्याची गरज होती आणि अय्यर त्यात अव्वल होते. तेव्हा विरोधकांवर तुटून पडण्याचे काम अय्यर यांनीही मनापासून सर्वशक्तीनिशी केले. त्याचे फळ म्हणून त्यांना केंद्रात मंत्रिपदेही देण्यात आली. पण त्यांचा वाचाळपणा बेताल व्हायला लागला अन तेव्हापासून त्यांचे पक्षांतर्गत वजनही घटायला लागले. राजीवजींचे निकटवर्तीय अशी ओळख असणाऱ्यांत त्यांची गणना होत असे, पण ही ओळख किती काळ पुरणार? पक्षाच्या बदलत्या वहिवाटीत ही ओळख अगदीच तोकडी पडायला लागली.

अय्यर यांच्या विधानांतील आक्षेपार्हता वाढण्यामागे ही अस्वस्थता अधिक असावी. एकतर आता असे वाचीवीर पोसण्याची काँग्रेसची क्षमता राहिलेली नाही आणि त्यांच्या आक्रस्ताळेपणामुळे पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नाही. मग निव्वळ राजीवसमर्थक या ओळखीवर पक्षात वजन राखणे अय्यर यांना आणखी किती काळ झेपणार?  

पक्षाचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांना आता असे बोलबच्चन सांभाळणे परवडणारे नाहीत. याचा दाखला अगदी अलीकडील काळात राहुल यांनी अय्यर यांना दिलेला आहे. गुजरात विधानसभा प्रचार मोहिमांचा झंझावात सुरू असताना हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतल्याची बोच राहुल यांना जाणवली आहे. यामागे अय्यर कारणीभूत ठरल्याचे वास्तव कोणीच नाकारू शकत नाही.

अय्यर नरेंद्र मोदींचे कट्टर विरोधक व टीकाकार असणे साहजिक आहे, पण पक्षप्रमुखांनी मोठ्या कष्टाने जमवून आणलेला डाव त्यांनी त्यांच्या ‘निच किसम का आदमी’ या विधानाने उधळून लावला. प्रस्थापितविरोधी लाट, पटेल-मुस्लिम-दलित समीकरणे आणि राहुल यांचे व्यक्तिगत प्रयत्न मातीत मिसळल्याची भावना प्रबळ झाली. कारण मोदींच्या घरच्या मैदानावर त्यांना असे संबोधने गुजरातवासियांना सहन होणे शक्यच नव्हते. अय्यर यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टी होण्याची वेळ आली. धुरळा शांत झाल्यावर त्यांची ‘घरवापसी’ झाली.

अय्यर यांची मोदींवरील टीका गांधी कुटुंबियांना सुखावणारी असली तरी त्यांनी अवेळी केलेले संबोधन पक्षाला चांगलेच महागात पडले. त्यानंतरच्या कारवाईच्या नाट्यानेही अय्यर यांची पत गेली ती गेलीच. या कारवाईनंतर शांत बसतील ते अय्यर कसले? त्यांचे पाकिस्तानप्रेम उफाळून आले. त्यामुळे सत्ताधारी भाजपमधील वाचाळवीरांना गांधी कुटुंबियांवर शरसंधाण करण्याची संधीच मिळाली. पाकिस्तानच्या दूरवस्थेबद्दल भारताला जबाबदार ठरवताना अय्यर यांना आपण कधी काळी परराष्ट्र सेवेत होतो, याचा विसर पडला. भारतात सत्तांतर झाल्यावरही भारताच्या पाकिस्तानबाबतच्या धोरणात काहीही बदल झालेला नाही, याची तमा न बाळगता अय्यर यांनी पाकिस्तानची री ओढली आणि पुन्हा स्वपक्षियांची नाराजी ओढवून घेतली.

वादग्रस्त विधानांचे सम्राट पदरी बाळगणे अशक्यप्राय झालेल्या राहुल यांनी मध्य प्रदेशात ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंहांना प्रचारमोहिमेपासून दूर राहण्याची तंबी दिलेली आहे, तशीच तंबी त्यांनी अय्यर यांना दिली आहे किंवा नाही, हे कळण्यास मार्ग नाही. पण पक्षातील त्यांचे वजन घतले, हे मात्र निश्चित. कारण अय्यर सुचवत असलेल्या पक्षांतर्गत रचनात्मक सुधारणांबाबत ना सोनियांनी फारशी उत्सुकता दाखवली, ना राहुल यांना त्यात स्वारस्य वाटले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्ते घडवण्याची अय्यर यांची सूचना खरेतर अंमलात आणण्यासारखी आहे. त्यामुळे काँग्रेसला उभारी देता येणार आहे. पण आता आपला सल्ला गांभीर्याने घेण्याएवढी पत राहिली नसल्याचे वास्तव कदाचित त्यांच्याही लक्षात आले असावे.

अय्यर यांना कुवतीनुसार पक्षाने आजवर संधी दिलेल्या आहेत! अखिल भारतीय काँग्रेस समितीत एकेकाळी त्यांचा शब्द महत्त्वाचा मानला जात असे. पंचायती राज, पेट्रोलियम, युवक कल्याण व क्रीडा, इशान्येकडील राज्यांचा विकास अशी केंद्रातील महत्त्वाची खाती अय्यर यांच्याकडे देण्यात आली होती. ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ या उक्तीखालोखाल ‘दैव देतं आणि वाचा घालवते’ असेच काहीतरी अय्यर यांचे झालेले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे विशेष निमंत्रित असलेल्या अय्यर यांच्यावर पक्षाने कधी काळी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची व धोरणात्मक नीती व समन्वयाची धुरा सोपवलेली होती! परराष्ट्र धोरण, पंचायती राज, स्थानिक स्वराज्य संस्था असे जिव्हाळ्याचे विषय असलेल्या अय्यर यांनी स्फोटक विधानांनी हे कर्तृत्व झाकोळून टाकले आहे.

उपजत तैलबुद्धीच्या अय्यर यांची विधाने स्फोटक तर असतातच, पण परस्परविरोधीही असतात. मोदी नाचिज आहेत, अडाणी आहेत, त्यांना या देशाचा इतिहास-भूगोल ज्ञात नाही, त्यांना अर्थशास्त्र कळत नाही, अशी विधाने करणारे अय्यर त्यानंतर ‘आदमी बडा चतुर है’ असे वक्तव्य करतात. मोदी पंतप्रधान होण्याच्या आधीपासूनच अय्यर त्यांचे टीकाकार आहेत. आणि अय्यरांसारख्या वाचाळवीरांची दर्पोक्ती पदरात पाडून घेण्याएवढे मोदी निश्चितच चतुर आहेत.

अगदी अखिल भारतीय काँग्रेसच्या २०१४ सालच्या कार्यकारिणीत अय्यर यांनी मोदींना चहाविक्रीसाठी स्टॉल देऊ करताना ते पंतप्रधान बनू शकणार नसल्याचे भाकित केले होते. त्यांची ही दर्पोक्ती व्यक्तिगत पिंड, शैक्षणिक अर्हता, राजकीय पार्श्वभूमीत असावी. कारण हे नसताना एखादी व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकते, ही बाब पचवण्यापासून त्यांना हा पिंडच परावृत्त करत असेल.

मंत्रीपदी असताना घेतलेल्या धोरणात्मक निर्णयापेक्षा अय्यर वादग्रस्त विधानांमुळेच प्रकाशझोतात आलेले आहेत. २००० साली मुलायम सिंग यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका करताना त्यांनी पातळी सोडली होती. मुलायम आपल्यासारखे का दिसतात? याचे अय्यर यांनी दिलेले कारण आजही काँग्रेसला आवडलेले असेल असे वाटत नाही. 

२००४ साली अंदमानातील सावरकरांच्या कवितेच्या ओळी काढून टाकण्याचे अय्यर यांचे आदेश असेच वादळ निर्माण करणारे ठरले होते. विनाकारण वाद निर्माण करण्याची त्यांची शैली, क्षमता वाखाणण्याजोगी असली तरी काँग्रेस अशा नेत्यांना सांभाळणारी राहिलेली नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. अलीकडेच माध्यमांशी बोलताना अय्यर यांनी केलेले परखड वक्तव्य राहुल गांधी यांनीही गांभीर्याने घ्यावे असेच आहे. ‘केवळ एकाच व्यक्तिमत्त्वावर यश मिळवण्याचे दिवस संपले आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या दावेदारीचा मुद्दा निरर्थक आहे. केवळ राहुल गांधींच्या करिष्म्यावर पक्ष निवडणुकीस सामोरे जाऊ शकत नसल्याचे’, त्यांचे विधान कितीही वास्तववादी असले तरी ते गांधी कुटुंबियांना पटणारे नाही.

काँग्रेसची सत्ता असताना मंत्रिपदे उपभोगलेले बरेच मान्यवर नेते आता वृद्धापकाळी वा निवृत्तीनंतर सत्याचा विलाप करताना दिसत आहेत. अय्यर त्यांच्यापैकी नक्कीच नाहीत. पण तरीही पक्षाला आता त्यांचा फारसा उपयोग नाही. उलट झाला तर २०१९ च्या लोकसभेपूर्वी तोटाच होणार आहे. त्यामुळे अय्यर यांचे तोंड बंद ठेवणे हे राहुल यांच्यासमोरील आव्हान असणार आहे. तर ते खुले राहावे ही मोदींची अंतरिक तळमळ असणार!

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Vividh Vachak

Sat , 19 January 2019

अय्यर यांचे आपण केलेले मनोवैज्ञानिक विश्लेषण (पाकिस्तानबद्दल प्रेम आणि हिंदू धर्माबद्दलचा तिरस्कार कारण त्यांची द्रविड मुळे) हे पटले नाही. कदाचित द्रविडांना आर्यसंस्कृतीबद्दल द्वेष असेलही, पण माझ्या माहितीत असे अनेक अय्यर आहेत की जे पक्के हिंदुत्ववादी आहेत. खरोखरच मणीशंकरांचा द्वेष हा चक्रावून टाकणारा आहे. आणि खरे बोलायचे तर मणीशंकराच्याच जातकुळीच्या सगळ्याच पुरोगाम्यांची वागणूक चक्रावणारी आहे, कारण स्वतःच्याच धर्मावर उखडणे आणि उलटणे, हे क्वालिफिकेशन, स्वतःची निधर्मी वृत्ती सिद्ध करायला जगात दुसऱ्या कुठल्याच लोकशाहीत लागत नाही. अगदी अमेरिकेचे पूर्वीचे प्रेसिडेंट बराक ओबामा यांनीसुद्धा जाहीर सांगितले होते की ते कॅथॉलिक धर्म मानतात आणि त्यावर त्यांची श्रद्धा आहे. म्हणून त्यांच्यावर कुणी संशय घेतला नव्हता. (आणि आता डोनाल्ड ट्रम्प हे जाहीर सांगतात की ते ख्रिश्चन असून धर्म पाळत नाहीत पण त्यामुळे कोणीही त्यांच्या सेक्युलर म्हणून आरत्या करत नाही). हिंदू असताना, स्वतःची स्वतंत्र निधर्मी वृत्ती सिद्ध करण्यासाठी आपण कसे हिंदुद्वेष्टे आहोत, हे सांगायचे दडपण (आणि श्रद्धा कबूल केली रे केली की मिळणारे "मनुवादी", "संघी" इत्यादी लेबल) केवळ भारतीय लोकशाहीतच पाहायला मिळते. दुसरे असे, की फाळणीबद्दल दुःख बाळगणारे अनेक लोक भारतात आहेत. परंतु भारतातील आपल्या राजकीय विरोधकांचे, लोकशाही प्रक्रियेतून आलेले सरकार उखडून टाकावे असे साकडे शत्रूराष्ट्राला घालणे हा तर हलकटपणाचा कळस.


Gamma Pailvan

Fri , 02 November 2018

मोदींकडे निर्देश करून "इन्हे हटाईये. हमें लाईये!" हे पाकिस्तानात जाऊन बोलणारा मणिशंकर अय्यर देशद्रोही आणि देशद्रोहीच असतो. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख