बाबासाहेबांचा धम्मविषयक विचार आणि त्यांच्या अनुयायांचा व्यवहार
पडघम - सांस्कृतिक
विश्वांभर धर्मा गायकवाड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध
  • Tue , 23 October 2018
  • पडघम सांस्कृतिक धम्मचक्र प्रवर्तन दिन Dhamma Chakra Pravartan Din डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar गौतम बुद्ध Gautama Buddha

६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टो. १९५६ रोजी जे धर्मांतर केले, त्यामागची बाबासाहेबांची धारणा व अपेक्षा आणि आजची बौद्ध अनुयायांची स्थिती याविषयीचा हा लेख.

.............................................................................................................................................

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना धर्माबद्दल आस्था आणि आशा होती. ते जरी निरीश्वरवादी असले तरी धर्माबद्दल सकारात्मक होते. व्यक्तीच्या आयुष्यात, विशेषत: गरीब व दु:खी व्यक्तींना संकटप्रसंगी धर्म जगण्यासाठी आशा देत असतो. म्हणून ते धर्म नाकारत नसून धर्माची कसोटी उपयुक्तता व न्याय यावर तपासतात. बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी ते हिंदू धर्माची चिकित्सा करतात, कारण त्यांना धर्माच्या व्यक्तिगत आवश्यकतेपेक्षा किंवा व्यक्तिगत गरजेपेक्षा धर्माची सामाजिक उपयुक्तता महत्त्वाची वाटत होती. हिंदू धर्मानं व्यक्तीला आत्ममग्न करून टाकलं होतं. तो स्वत: पलीकडे बघायलाच तयार नव्हता. तेव्हा स्वत:च्या पलीकडे जाऊन बघणारा धर्म त्यांना हवा होता. या देशात हिंदू धर्मानं सामाजिक समता व न्यायाचं उत्तरदायित्वच नाकारलेलं होतं. त्यामुळेच अस्पृश्यता व वंचितता ही काहीच्या वाट्याला आलेली होती. ती नष्ट करणं व समता, स्वातंत्र्य, बंधता व न्याय प्रस्थापित करणं अपेक्षित होतं.

बाबासाहेब हिंदू धर्माचे विरोधक नव्हते, तर सर्वश्रेष्ठ सुधारक होते. धर्माची सामाजिक उपयुक्ततेच्या संदर्भात चिकित्सा झाली पाहिजे असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी त्यांनी जगातील सर्व प्रमुख धर्माचा अभ्यास केलेला होता. विशेषत: हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम व बौद्ध धर्माचा त्यांचा विशेष अभ्यास होता.

हिंदू धर्माची तर त्यांनी परखड चिकित्सा केली. ते म्हणत हिंदू धर्माचा विकास हा वैदिक धर्म, ब्राह्मण धर्म व हिंदू धर्म असा झालेला आहे. ब्राह्मण धर्म या टप्प्यावरच या देशात जैन व बौद्ध धर्म उदयास आले. याचे कारण म्हणजे व्यक्तिगत मोक्ष मिळवण्यासाठी ब्राह्मण धर्मात हिंसा घडायची. पशुबळी दिला जायचा, पण पशू हे शेतीसाठी उपयुक्त असायचे. तेव्हा हिंसा व पशुहत्या थांबवून शेती जगवण्यासाठी ब्राह्मणी धर्माला पर्याय म्हणून हे दोन धर्म उदयास आले. बाबासाहेबांच्या मते हिंदू धर्म ज्या मुख्य ग्रंथानुसार चालतो, तो म्हणजे ‘मनुस्मृती’ हा ग्रंथ एकाच वेळी धर्म, नीती व कायदा यांचं मिश्रण आहे. कारण धर्मग्रंथ या अर्थानं त्यात जाती व वर्णव्यवस्था सांगितलेली आहे; नीतीशास्त्रही आहे, कारण त्यात कर्तव्यंही सांगितलेली आहेत व कायदाही आहे; कारण त्यात शिक्षाही सांगितलेली आहे. बाबासाहेबांच्या मते, धर्माचं प्रयोजन हे नीती सांगणं असावं; कायदा सांगणं नसावं. (‘Religion must not rule, religion must be principle.’)

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

बाबासाहेबांनी पाश्चिमात्त्य देशात शिक्षण घेतल्यामुळे धर्माबद्दलच्या पारंपरिक धर्मसंकल्पना त्यांना मान्य नव्हत्या. ते म्हणतात, कोणताही धर्म पुढील कसोटीवर तपासून घेतला पाहिजे. जसं - नाकारण्याचं स्वातंत्र्य आहे, तसंच नवीन धर्मात काय स्वीकारावं हेही स्वातंत्र्य असलं पाहिजे. म्हणून तर त्यांनी पारंपरिक बौद्ध धर्म नाकारून बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यांनी ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हा ग्रंथ त्यासाठीच लिहिला. बाबासाहेब व्यक्तीची सर्व बंधनातून मुक्तता, धर्माची सामाजिक उपयुक्तता व वैयक्तिक नीतिमत्ता या दृष्टीनं धर्माकडे पाहत होते.

बाबासाहेबांनी बौद्ध धर्म जशास तसा स्वीकारलेला नाही, त्याचीही चिकित्सा केलेली होती. ते धर्माचे टीकात्मक विवेचन करतात. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम हे धर्म ईश्वरवादी आहेत. या धर्माचे संस्थापक स्वत:ला ईश्वराचे प्रेषित मानतात. ते व्यक्तीला आत्ममग्न करतात. सामाजिक नीतिमत्ता सांगून व्यक्तिगत स्वातंत्र्य बंदिस्त करतात. जैन धर्मात टोकाची अहिंसा सांगितलेली आहे. व्यवहाराच्या पातळीवर ही अहिंसा शक्य नाही. आंबेडकरांच्या मते, अहिंसा हे तत्त्व असावं, नियम असता कामा नये. म्हणून ते सम्यक, निरीश्वरवादी, विज्ञानवादी, कर्मवादी, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय मानणाऱ्या बौद्ध धम्माचा स्वीकार करतात. त्यांच्या मते, बुद्ध हा मोक्षदाता नसून मार्गदाता आहे.

बाबासाहेबांनी पारंपरिक बौद्ध धर्मही चिकित्सा करून काही पातळीवर नवीन अर्थाच्या संदर्भात स्वीकारलेला आहे. ‘धर्मक्रांती’ करण्याची एकमेव ताकद बौद्ध धर्मात त्यांना आढळली. व्यक्तिगत, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक या सर्व गुलामगिरीचे आधार बुद्ध नाकारतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही आधुनिक लोकशाहीला पूरक असलेली मूल्यं बौद्ध धर्मात आढळली म्हणून त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. बाबासाहेबांचं धर्म स्वीकारण्यामागचं प्रयोजन हे व्यक्तीला धार्मिक कर्मकांडापासून दूर ठेवून विज्ञान व नीतीतत्त्व याची सांगड घालणं, तसंच धर्माची सामाजिक उपयुक्तता किंवा संदर्भ त्यांना महत्त्वाचा वाटत होता.

बाबासाहेबांनी बुद्ध की मार्क्स याऐवजी बुद्धाला स्वीकारलं. त्यांनी पूर्णपणे जडवादी मार्क्स जरी नाकारला पण मार्क्स बुद्धाला समीप आहे, पण पर्याय नाही हेही सांगितलं. दोघंही दु:ख व शोषण मुक्तीचीच भाषा बोलतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मुल्यं जगाला फ्रेंच राज्यक्रांतीमुळे समजलेली असली, तरी त्यांना ती बुद्धानं सांगितलेल्या धम्म तत्त्वज्ञानात सापडलेली आहेत. ‘बुद्ध आणि मार्क्स’ या ग्रंथात आंबेडकर नमूद करतात की, फ्रेंच क्रांती समता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरली, रशियन क्रांतीनं बंधुता व स्वातंत्र्याचा बळी देऊन समता स्थापण्याचा प्रयत्न केला, पण बौद्ध धम्मात मात्र स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तीन्ही मुल्यं एकत्र येतात. साम्यवादात या तिन्हींपैकी एक असेल, पण बौद्ध धम्मात तीनही एकत्र असतील.

बाबासाहेब बौद्ध धम्मातील महत्त्वाच्या संकल्पना नाकारत नाहीत, पण त्याचा पारंपरिक आशय बदलून वैज्ञानिक आशय स्वीकारतात. त्यांची धर्मांतरामागची अपेक्षा अशी होती की, सापेक्ष ईहवादी, धर्मनिरपेक्ष व कर्मकांडविरोधी असलेल्या बौद्ध धर्माच्या अनुसरणामधून दलितांना चिकटलेलं पिढीजात गौणत्व नष्ट होईल आणि आधुनिक दृष्टीनं जगाकडे पाहणं त्यांना शक्य होईल. परंतु आंबेडकरांचं हे स्वप्न त्यांच्या तथाकथित अनुयायांनी आणि दलित समाजाच्या मागास मानसिकतेनं पार धुळीस मिळवलेलं दिसतं. नव्या धर्मानं दलितांचं मानुषीकरण होण्याऐवजी त्या धर्माचं दलितीकरण व पारंपरिक आविष्करण घडून येत आहे.

बाबासाहेबांचा धम्मचक्र प्रवर्तनाचा हेतू आध्यात्मिक असण्यापेक्षा अधिक इहलौकिक होता. बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना धर्मविरहित धम्म दिला. ते म्हणत, समाज धर्मासाठी नसून धर्म समाजासाठी आहे. म्हणून धर्माची सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून चिकित्सा झाली पाहिजे. बाबासाहेब अशा धर्माच्या शोधात होते की, जो धर्म असूनही ईश्वरवादी असणार नाही, आध्यात्मिक असूनही विज्ञाननिष्ठ असेल. त्याचा पाया ज्ञानाचा असेल, धर्म त्यांना तर्काच्या व बुद्धीच्या कसोटीवर स्वीकारायचा होता. आणि बौद्ध धर्म या सर्व बाबतीत इतर धर्मापेक्षा अधिक स्वीकार्य वाटला.

जातीचं वास्तव दुहेरी असतं. ते जेवढं भौतिक असतं तेवढंच मानसिकही असतं. सामाजिक-आर्थिक लढ्याच्या माध्यमातून कदाचित भौतिक वास्तव बदलता येईल. पण जातीचं मानसिक वास्तव जर बदलायचं झालं तर बौद्ध धर्माचा स्वीकार हाच एक मार्ग बाबासाहेबांना दिसत होता. बौद्ध धर्माच्या ध्वजाखाली सर्व शूद्रातिशूद्र जाती एकवटल्या तर त्यांच्या पृथक जातीय अस्मिता गळून पडतील आणि त्या सर्वांचा एक जातीविहीन वर्ग तयार होईल. म्हणजे त्यांना बौद्ध धम्म, धम्म-वर्ग मानसिकतेतून हवा होता. धम्म समाजपरिवर्तनासाठी त्यांना हवा होता. इहलौकिक जीवनाला व मानवी मूल्यांना महत्त्व देणारा एक अनिश्वरवादी व गतीशील धर्म म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची निवड केली होती. जातीमुक्त समाजच खऱ्या अर्थानं लोकशाही समाज असतो. कारण जातीय समाजात बहुसंख्याक जातीचं कायम बहुमत असल्यामुळे खरी लोकशाही तिथं नांदूच शकत नाही. बौद्ध धम्माबद्दल बाबासाहेबांच्या जन्मभराच्या व्यापक चळवळीचा एक भाग म्हणूनच त्याकडे पाहिलं पाहिजे.

बौद्ध धम्म हा जनवादी आहे. कारण त्यानेच प्रथम दलित-शोषित जनसामान्यासाठी आपली कवाडं खुली केली. म्हणून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे धम्माचं मध्यवर्ती सूत्र आहे. बौद्ध धम्म हा केवळ ‘जगात दु:ख आहे’ एवढं सांगून थांबत नाही, तर इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे ‘दु:खालाही कारण असतं’ आणि त्या कारणांचं निराकरण करून दु:खाचं निरसन करणं शक्य असतं, हा आशावाद तो माणसाला देतो. मानवी प्रज्ञेला आणि विचारक्षमतेला तो वेसण घालत नाही. निवड स्वातंत्र्य व निवडीचे निकष तो पुरवतो. जे तर्काला व बुद्धीला पटेल तेच घ्यायचं आणि जे पटणार नाही ते सोडून द्यायचं, असं तो बजावतो.

बाबासाहेबांची भूमिका धर्मचिकित्सकाची होती. तर्काला पटेल ते स्वीकारण्याचं आणि न पटेल ते नाकारण्याचं धम्मात दिलेलं स्वातंत्र्य घेऊनच ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ त्यांनी नवदीक्षितांना मार्गदर्शन करण्यासाठी लिहिला आहे.

बाबासाहेबांनी धर्माचे तीन निकष समोर ठेवून बौद्ध धम्म अंगिकारला.

१) तर्कावर टिकेल तेच ग्राह्य

२) लोककल्याण म्हणजेच बहुजन हित व बहुजन सुख

३) धर्माचा सर्वच भाग सारखा महत्त्वाचा नसतो. त्यात काही निश्चित स्वरूपाचा असतो, तर बराचसा भाग अनिश्चित स्वरूपाचा असतो. म्हणून अनिश्चित भाग परिस्थितीनुरूप नव्या अन्वयार्थानं बदलला पाहिजे. जसं – ‘बुद्ध अॅण्ड हिज धम्म’मध्ये बुद्धांनी सांगितलेल्या चार आर्यसत्यांपैकी दोन आर्यसत्यं वगळून ‘जगात दु:ख आहे’ आणि ‘दु:खाचं निरसन करणं शक्य आहे’ ही दोनच आर्यसत्यं आंबेडकरांनी मान्य केली होती. मधली दोन आर्यसत्यं ‘तृष्णा हे दु:खाचं कारण असून ती मानवी जीवनाला दु:खमय करते’ अशा आशयाची आहेत. ही आर्यसत्यं बुद्धाच्या जीवनविषयक दृष्टिकोनाला निराशाजनक करून टाकतात. कारण दु:ख निवारणाची संभाव्यताच त्यातून नाहीशी होते. माणसाला दु:खापुढे अगतिक करणारी ही दोन आर्यसत्यं वगळून बाबासाहेबांनी बुद्धाच्या संदेशाला आशावादी वळण लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

प्रश्नाची सोडवणूक युद्धानं होत नसते तर मैत्रीनेच ती शक्य होते, हे बुद्धाला प्राप्त झालेलं तत्त्वज्ञान बाबासाहेबांनी स्वीकारलं. गेल ऑम्वेट या विदुषीनं ‘बुद्धिझम इन इंडिया’ या ग्रंथात बाबासाहेबांच्या धम्मचक्र प्रवर्तनावरच्या टीकेचा आढावा घेतलेला आहे. त्यात त्यांनी रावसाहेब कसबेंच्या प्रतिक्रियेचीही नोंद घेतलेली आहे. कसबे असे म्हणतात की, ‘मार्क्सवाद्यांना जर एखादा धर्म घ्यावयाचा वाटलाच तर बौद्ध धर्माखेरीज दुसरा पर्याय त्यांना असणार नाही आणि बौद्ध धम्माला जर एखादा राजकीय विचार स्वीकारावा वाटलाच तर त्यांना मार्क्सवादाखेरीज पर्याय असणार नाही.’ कारण बुद्धाचा मार्ग मार्क्सच्या मार्गापेक्षा श्रेष्ठ आहे, असं सांगणारे बाबासाहेब मार्क्सची साध्य बुद्धाच्या मार्गानी जेव्हा जनतेच्या पदरात पडतील तेव्हाच हे श्रेष्ठत्व सिद्ध होईल, हेही आवर्जून नमूद करतात. शोषित वंचिताला आर्थिक न्याय मिळवून देऊन समताधिष्ठित समाजाची निर्मिती करणं हे मार्क्सचं साध्य होतं. ते बुद्धाच्या मार्गानं प्रत्यक्षात आणण्याचा बाबासाहेबांचा प्रयत्न होता.

आजचा वर्तमान संदर्भ पाहता बाबासाहेबांचा धम्मविषयक विचार आणि त्यांच्या अनुयायांचा व्यवहार पाहता बरीच संभ्रमावस्था दिसून येते. धर्माच्या आधारे जातीपातींना छेदून जाणारं शोषित-वंचितांचं संघटन बांधणं थांबलं आहे, बौद्ध अनुयायी कर्मकांडात, प्रतीक व पवित्रस्थान यात अडकलेले आहेत. लोकांत कडव्या बौद्ध जाणिवा निर्माण झाल्या आहेत. धम्माच्या चळवळीशी राजकीय चळवळीनं फारकत घेतलेली आहे. कारण असं दिसतं की, जरी आपण राजकीय क्षेत्रात एकत्र काम करू शकत नसलो तरी किमान धार्मिक क्षेत्रात तरी एकत्र राहू. बुद्ध विहाराशेजारीच सभागृह असावं व तिथं प्रबोधनाचं कार्य व्हावं असं दिसत नाही. बौद्ध समुदायाची ओळख इतर धर्म समुदायासारखी दिसून येत आहे. धम्माचरणाचं रूपांतर धर्माचरणात होऊन बाबासाहेबांनी ओढलेली धम्म व धर्म यातील सीमारेषाच फार पुसट झाली आहे. विपश्यनेचं प्रस्थ वाढलं आहे. पुस्तक किंवा ग्रंथ विक्रीऐवजी बौद्ध गीतांची गरज वाढली आहे. जागतिकीकरणातून आलेली नवीन अरिष्टं आणि त्या जोडीला जातीय छळ व अत्याचार वाढताना धम्मावर अधिक वेळ खर्च होत आहे. प्रत्यक्षात धम्म चळवळीनं ब्राह्मणवादाला जेवढं धारेवर धरलं, तेवढी भांडवलशाहीची चिकित्सा झाली नाही किंवा होत नाही. तसंच धर्म हा आजच्या मानवी जीवनाचा एकमेव नियंत्रक घटक आता सर्वस्वी राहिलेला नाही. त्यामुळे आमूलाग्र सामाजिक-राजकीय परिवर्तनाच्या क्रांतीसाठी केवळ धम्म चळवळीवर भिस्त ठेवून भागणार नाही, याची जाणीव बाबासाहेबांना होती म्हणून त्यांनी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन रिपब्लिकन पक्षाची रूपरेषा मनाशी आखली होती. हा ठरलेला पण राहून गेलेला बाबासाहेबांचा उद्देश त्यांच्या अनुयायांना कधीतरी कळो व तशी वाटचाल घडो एवढीच माफक अपेक्षा!

.............................................................................................................................................

लेखक विश्वांभर धर्मा गायकवाड शिवाजी महाविद्यालय, उदगीर (जि. लातूर) इथं राज्यशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

vishwambar10@gmail.com

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Sandesh Awdan

Sun , 06 December 2020

"हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम हे धर्म ईश्वरवादी आहेत. या धर्माचे संस्थापक स्वत:ला ईश्वराचे प्रेषित मानतात." हिंदू धर्माचे संस्थापक कोण, प्रेषित कोण?


Gamma Pailvan

Tue , 23 October 2018

विश्वंभर धर्मा गायकवाड, लेख चांगला आहे. कुठलाही अभिनिवेश न आंत लिहिलेला वाटतो. त्याबद्दल धन्यवाद. मला वाटतं की लेखातलं हे वाक्य महत्त्वाचं आहे : >> त्यांच्या मते, बुद्ध हा मोक्षदाता नसून मार्गदाता आहे. << . आंबेडकरांच्या या विधानाशी मी १०० % सहमत आहे. हा मार्ग कसा काटायचा? ते 'अप्प दीपो भव' या बोधीवचनातनं कळतं. याचा अर्थ 'स्वत:च स्वत:चा दीप बन' असा आहे. त्यामुळे बौद्धपांथस्थाने स्वत:च स्वत:चा मार्ग निर्माण करायला शिकलं पाहिजे. आता गम्मत बघा की या बोधीवचनास 'उद्धारेत आत्मना आत्मानं' ही गीतोक्ती प्रचंड जवळची आहे. किंबहुना ती वेगळी नाहीच. बोधिवचन एकट्याचा मार्ग सांगतं तर गीतावचन एकमेकांना धरून कसं ठेवावं याविषयी सांगतं. इतकाच काय तो फरक आहे. त्यामुळे बौद्धपंथ पारंपारिक हिंदू धर्मास जितका जवळ आहे तितका इतर कोणत्याही पंथास नाही. आणि मार्क्सवादास तर आजिबात जवळचा नाही. आजूनेक गोष्ट म्हणजे आज कोणी सामान्य बौद्ध मनुष्य भारतास त्याची आई मानतो. पण मार्क्स मानतो का? मार्क्सच्या मते भारत हे केवळ भांडवलदारांचे कडबोळे आहे. त्यामुळे जे डावे लोकं गौतमबुद्धाच्या नावे नाचताहेत, त्यांच्यापासून सर्वसामान्य नवबौद्धांनी जाम सावध राहिले पाहिजे. बुद्धास जे शोषितांचा आणि वंचितांचा प्रतिनिधी वगैरे मानताहेत ती शुद्ध धूळफेक आहे. सिद्धार्थ गौतम कधीच वंचित नव्हता. तो राजपुत्र होता. मग त्याच्या गळ्यात ही साम्यवादी धोंड कशासाठी? ती भारताला तोडण्यासाठीच ना? बौध्दांच्या वा नवबौध्दांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना भारत तोडायचं लक्ष्य साधायचं आहे. डाव्यांपासून सावधान !!!! आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......