‘बधाई हो’ : कलाकारांचा कथेत मिसळलेला अभिनय सिनेमाच्या साधेपणाला चारचांद लावतो!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘बधाई हो’ची पोस्टर्स
  • Sat , 20 October 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie बधाई हो Badhaai Ho आयुष्यमान खुराना Ayushmann Khurrana सान्या मल्होत्रा Sanya Malhotra अमित शर्मा Amit Sharma

‘डीप इम्पॅक्ट’ या सिनेमात नायकाची प्रेयसी शेवटाकडे जेव्हा नायकासोबत जीव वाचवायला निघते, तेव्हा तिचे आई-वडील त्यांना नुकत्याच झालेल्या मुलाला तिच्याकडे सुपूर्द करतात व तिला म्हणतात ‘त्याचा चांगला सांभाळ कर’. सिनेमा हॉलिवुडचा असल्यामुळे ते कृतीवर भर देतात. अशा भावनिक प्रसंगात शब्दांची साथ घ्यावी असं त्यांना वाटत नाही. असो. तर तो मुलगा त्यांना खूप उशिरानं झालेला असतो. ती टीनेजर असते तर तिचा भाऊ तान्हं बाळ. सिनेमात हा प्रसंग पाहताना एक प्रश्न पडतो- जवळपास लग्नाला आलेल्या मुलीला त्यांनी तुला आता लहान भाऊ किंवा बहीण होणार हे कसं सांगितलं असेल? तिची काय प्रतिक्रिया असेल? अमेरिकेतल्या सामाजिक वातावरणात एखाद्या जोडप्याला त्यांच्या वयाच्या मध्यात मूल होणार असेल तर ते नैसर्गिकच व समाजमान्य बाब आहे. एवढ्या उशिरा जन्माला आलेल्या बालकाचं पालनपोषण कोण करणार? एकल पिता-माता नाहीतर त्रोटक कुटुंब असणार्‍या त्या समाजात अशा बालकाचं काय होईल असे प्रश्न मनात येतात. कारण भारतीयांवर असणार्‍या ‘ज्या त्या गोष्टी, त्या त्या वेळी व्हायला हव्यात’ या संस्कारामुळे. त्यामुळेच ‘बधाई हो’ या सिनेमात घरात पणतूला खेळवण्याचे दिवस आले असताना अजून एक नातू/नात कशाला असा प्रश्न जितेंदर कौशिकच्या आईला पडतो.

प्रियंवदा कौशिक (नीना गुप्ता) सासूच्या टोमण्यांना कंटाळून बेडरूममध्ये रुसून बसलेली असते. तिचे प्रेमळ पती (गजराज राव) तिला त्यांची कुठल्यातरी मासिकात आलेली कविता वाचून दाखवत असतात. बाहेर पाऊस पडत असतो. एकोणीस आठवड्यांनी प्रियंवदा मुलगा नकुलसोबत (आयुष्यमान खुराना) डॉक्टरांकडे जाते. काही चाचण्या झाल्यावर डॉक्टर तिच्या पतीला सांगतात, ती गर्भार आहे. त्यांच्या तोंडाचा ‘आ’ वासला जातो. ही गोष्ट घरी कशी सांगायची याची चिंता दोघांनाही लागते. घरात नकुल, आज्जी (सुरेखा सिक्री) व नकुलचा भाऊ (शार्दुल राणा) यांना ते सांगतात, तेव्हा आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय याची त्यांना कल्पना येते.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

हृषीकेश मुखर्जी एक वाक्य नेहमी सांगायचे- ‘इट इज व्हेरी सिंपल टू बी हॅप्पी, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी सिंपल’. हे वाक्य इथं लागू होतं. हा सिनेमा अतिशय साधा आहे. यात रूढार्थानं वाईट प्रवृत्तीचे लोक नाहीत. नायकाला किंवा त्याच्या घरच्यांना कुणी त्रास देणारं नाही. एक अनपेक्षित प्रसंग उद्भवलाय. तो कसा निभवायचा हे मात्र नायकाला व त्याच्या घरच्यांना माहीत नाही. ते आलेल्या परिस्थितीला तोंड देतायत व त्यातून बाहेर यायचा प्रयत्न करतायत. कथेच्या साधेपणाचा तोल मात्र शेवटपर्यंत ढळत नाही. याचं श्रेय दिग्दर्शक व पटकथाकारांना. त्यांनी सिनेमाचा साधेपणा कुठेही सोडायचा नाही याच उद्देशानं सगळी रचना केलीय. त्याचा परिणाम जिवंत व्यक्तिरेखा आपल्या मनात घर करतात.

पटकथाकार शंतनु श्रीवास्तव, अक्षत घिल्डियाल व ज्योती कपूर रेल्वेत तिकीट कलेक्टरचं काम करणार्‍या कौशिक कुटुंबाला केंद्रस्थानी घेतात. त्यांच्या घराचे होता होईल तेवढे तपशील भरतात. हे तपशील किती आहेत ते नकुलच्या आतेबहिणीच्या लग्नात दिसून येतात. त्यामुळे टिपिकल भारतीय कुटुंबाचं चित्र उभं राहतं. बरं नुसतं उभं राहतं असं नाही तर त्यातील व्यक्तिरेखा काही प्रसंगांपुरत्या येतात तरी लक्षात राहतात. कारण पटकथाकार त्याला वास्तववादी ठेवतात. उगाच पात्रांना ठोकळेबाज करत नाहीत. त्यांच्या लेखनाला अचूक दिग्दर्शनाची जोड अमित शर्मा देतात. ‘तेवर’सारख्या स्टाईलबाज ढांसू संवादांनी भरलेल्या सिनेमात पदार्पण करणारे शर्मा इथं त्याच्या विरुद्ध टोकाच्या कथेत इतक्या छोट्या छोट्या गोष्टी अंतर्भूत करतात की, आपण जणू दिल्लीच्या लोधी कॉलनीचे रहिवासी आहोत असं वाटतं.

तसंच यात दोन प्रेमकथा आहेत. एक आहे नकुलची रेनीसोबतची, तर जतिंदरची प्रियंवदासोबतची. एक तरुणाईची तर दुसरी मध्यमवयीन जोडप्याची. तर त्याच्या जोडीला आहे समाजाचा दृष्टिकोन. अमेरिकेत अशा अनपेक्षित गर्भारपणाकडे समाज कसा बघतो हे ‘डीप इम्पॅक्ट’मध्ये दाखवलं नाही. पण भारतीय समाजात लैंगिकता ही पूर्वाश्रमींच्या घालून दिलेल्या संस्कारात बघायची गोष्ट आहे. ‘ज्या त्या गोष्टी, त्या त्यावेळी झाल्या की आयुष्य सुकर होतं’ हा पायंडा पिढ्यानपिढ्या झिरपत असल्यामुळे मध्यमवयीन स्त्री गर्भार राहते, तेव्हा घरातल्या लहान मुलापासून ते ऑफिसातल्या कर्मचार्‍यापर्यंत सर्वजण कुत्सितपणे जतिंदरला ‘बधाई हो’ म्हणतात! प्रियंवदाची सासू खास भारतीय मानसिकतेला शोभून तिलाच दोष लावते. नकुल व त्याचा भाऊ ते मान्यच करत नाहीत. नकुलला तर अगदी मेल्याहून मेल्यासारखं होतं. तो त्याच्या मैत्रिणीला भेटायचं बंद करतो. या सर्वांत फक्त प्रियंवदा व नकुलची मैत्रीण रेनी मात्र यात गैर काय आहे असं म्हणतात. रेनी तर एके ठिकाणी नकुलला म्हणते- ‘चाळीशी-पन्नाशीला आलेल्या जोडप्यांनी सेक्स लाईफ एन्जॉय करू नये असं थोडीच आहे’. नकुलला ते पटत नाही. त्याच्या प्रतिष्ठेला ते डाचतं. तो तिच्याशी बोलणं बंद करतो. हे मनाला पटणारं चित्रण हेच या सिनेमाचं बलस्थान आहे.

आशय जरी गंभीर असला तरी त्याचं सादरीकरण मात्र निखळ विनोदी आहे. मध्यंतरापर्यंत सिनेमा विनोदानं पूर्णपणे भरलाय. हा विनोद प्रसंगनिष्ठ आहे. व्यक्तिरेखांनी त्या त्या प्रसंगांना दिलेल्या क्रिया-प्रतिक्रियामधून उभा राहिलेला आहे. चपखल संवाद आहेत. त्यामुळे तो चिक्कार हसवतो. तसंच संवाद संपल्यावर चेहर्‍यावरील हावभावातून आलेल्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. उलट या प्रतिक्रियाच बर्‍याच प्रसंगात लक्षात राहणार्‍या. दिग्दर्शकाला पटकथेतलं ‘रीडिंग बिटवीन द लाईन्स’ समजायला लागलं की, तो अभिनेत्यांकडूनही उत्तम दर्जाचं काम काढून घेतो. इथं ते झालेलं आहे.

‘बधाईंयाँ तेनू’, ‘साजन बड़े सेंटी’, ‘मोरनी बनके’ आणि ‘नैना ना जोड़ी’ या गाण्यांना तनिष्क बागची, रोचक कोहली व जॅमनी दिलेलं संगीत कथानकात मिसळून जातं. तसंच त्यांचा वापरही मस्त. सर्वच कलाकारांचा संगीतासारखा कथेत मिसळलेला अभिनय त्याच्या साधेपणाला चारचांद लावतो. अगदी शीभा चढढा, शार्दुल राणासारखे छोट्या भूमिकेत असणारेही लक्षात राहतात. सान्या मल्होत्राची भूमिका अजून वाढवायला हवी होती. ‘दंगल’ व नुकताच येऊन गेलेल्या ‘पटाखा’नंतरची तिची अजून एक महत्त्वाची भूमिका आहे. तिची व्यक्तिरेखा ठोकळेबाज प्रेयसीची झाली असती, पण तिने ते होऊ दिलेलं नाही.

आयुष्यमान खुरानाची अजून एक उत्तम भूमिका, मागच्या भूमिकांहून वेगळी. इथं तो मध्यमवर्गीय मुलगा आहे, ज्याला स्वतःची स्वप्नं आहेत. ती जगणं गरजेचं आहे हे सतत टोकणार्‍या वडिलांना झेलणार्‍या मुलाची आहे. तो ती उत्तम निभावतो. ‘विक्की डोनर’, ‘शुभमंगल सावधान’ व हा सिनेमा यातून तो मध्यमवर्गीय भारतीयांच्या टिपिकल मुलांची भूमिका उत्तमपणे करू शकतो हे दिसून येतं. एका बाजूला राजकुमार राव व दुसरीकडे आयुष्यमान खुराना हे सध्याच्या समकालीन मध्यमवर्गीय तरुणांचे रुपडे झालेत. वयानुसार त्यांना अजून विविधांगी भूमिका मिळत राहोत.

या सिनेमाचे खरे हिरो आहेत नीना गुप्ता, गजराज राव व सुरेखा सिक्री. एक तर त्यांना त्यांच्या वयाच्या पूर्ण लांबीच्या व्यक्तिरेखा मिळणं हीच आश्चर्याची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी ही संधी सोडली नाही. तसंच दिग्दर्शक अमित शर्मा यांचं पण कौतुक त्यांची निवड केल्याबद्दल. एकाच पातळीवरचा अभिनय करून त्यांनी ती सार्थ ठरवली आहे. नीना गुप्ता नुकत्याच ‘मुल्क’मध्ये दिसल्या होत्या. पण अभिनयाला तितका वाव नव्हता. इथं मात्र मध्यमवयीन भारतीय सोशिक स्त्री त्या ज्या अचूकपणे दाखवतात, ते स्टँडिंग ओव्हेशन देण्यासारखं. तीच बाब सुरेखा सिक्रींची व गजराज राव यांची.

सध्या ‘मीटू’मुळे वातावरण ढवळून निघालंय. त्यातच अजून एका स्त्रीची कथा मांडून एकविसाव्या शतकातल्या भारतीयांची मानसिकता दाखवणार्‍या अमित शर्माच्या या प्रयत्नांना भरभरून प्रतिसाद द्यायला हवा.

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......